📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘पेन्शन…’ – लेखक: श्री. अमोल अ. पवार ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

सकाळीसकाळी, बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत, हुज्जत घालत होती. तिचा आवाज इतका कर्कश होता, की बँकेतले स्टाफही क्षणभर थबकले. ती निराधार योजनेतील तिची पेन्शन मागत होती. पण यादीत तिचे नाव नव्हते. कारण शासकीय टेक्निकल त्रुटीमुळे तिचे नाव वगळण्यात आले होते.

गावातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत अमरनाथची नुकतीच बदली झाली होती. टापटीप राहणीमान, नाकासमोर काम आणि समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलण्याची सवय असलेला हा तरुण, पहिल्याच दिवशी बँकेच्या गडबडीत गोंधळून गेला होता.

तिचं एकच म्हणणं होतं, “तुम्हीच खाताय माझे पैसे. “

अमरनाथने स्टाफकडून विचारपूस केली. उत्तर मिळालं, “तिचं दर महिन्याचं हेच नाटक आहे. कधीही येते, भांडते, ओरडते आणि मग निघून जाते. ”

पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळेच घडले.

दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा आली, अमरनाथने कॅश काऊंटर घेतले होते.

ती लाईनमध्ये उभी राहिली आणि तिचा नंबर आला तेव्हा पुस्तक दिले आणि ती भांडणाच्या तयारीत उभी राहिली.

अमरनाथने तिला काही न बोलता पाचशे रुपयांच्या नोटा काढून दिल्या.

ती क्षणभर गोंधळली.

मग त्या पैशांकडे पाहून डोळे लुकलुकत म्हणाली, “माझी पेन्शन थटवता व्हय… आज कशी दिली? येत नाय म्हणायचं, अन आता कसली दिली? ”

सगळा स्टाफ अचंबित झाला. पण कुणाला काही कळले नाही.

त्यानंतर दर महिना ती म्हातारी वेळेवर बँकेत येऊ लागली. पेन्शन घेऊन जाऊ लागली.

एक वर्ष, दीड वर्ष सरले. दर महिन्याला ती आली, लाईनीत उभी राहिली, पुस्तक दिले, आणि तिच्या हक्काच्या पेन्शनचे पैसे अमरनाथकडून घेत राहिली.

अमरनाथने एकदाही तिला खरे सांगितले नाही की ते पैसे त्याच्या पगारातून जात आहेत.

त्या दरम्यान त्यांची चांगली ओळख झाली. अमरनाथ तिचं पुस्तक घेताना हसून म्हणायचा, “आज्जी, येतेय की नाही आता शासनाकडून पेन्शन… तुमचा दरारा सगळ्यांच्यावर आहे” आणि ती काहीबाही बडबड करत पैसे घेऊन जायची.

दोघांत चेष्टा मस्करी चालू लागली.

परंतु, एके दिवशी अमरनाथ बँकेत नव्हता.

ती आली, लाईनीत उभी राहिली.

पुस्तक दिले.

पण स्टाफने तिला सरळ सांगितले.

तिचं खातं बंद झाले आहे…!

तिला राग आला आणि ती अजून बडबड करू लागली.

“तो साहेब कुठंय? तो दर महिन्याला देतो मला माझी पेन्शन! “आणि आता आज काय झालं..

स्टाफने सांगितलं,

“अमरनाथ साहेबांचा आज अपघात झालाय. ते गंभीर जखमी झालेत. आणि कराडच्या दवाखान्यात आहेत. “

म्हातारी काही बोलली नाही. गप्प बसली. दुसऱ्या दिवशी ती परत आली. पुन्हा विचारलं.

“पैशे आले नाहीत आणि नेहमीचे अमरनाथसाहेब पण आले नाहीत. ” ती दंगा करू लागली.

मुख्य साहेबांनी तिला केबिनमध्ये बोलावलं. आणि खरे सांगितले.

“आज्जी, तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षांपूर्वीच बंद झाली आहे. अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायचे. आणि आता त्यांचा अपघात झालाय. बेशुद्ध आहेत. ऑपरेशनसाठी तीन चार लाख लागणार आहेत. “

तिचा चेहरा पडला. ती काहीही बोलली नाही. शांत मान खाली घालून उभी राहिली. तिचे डोळे भरून आले आणि ती तिथून निघून गेली.

त्याच रात्री कराडच्या हॉस्पिटलमध्ये अमरनाथचे ऑपरेशन करायचे होते. खर्च – चार लाख येणार होता.

घरात वडील नव्हते.

एक आई, एक लहान बहीण.

दोघीही रडत होत्या.

स्टाफ आणि साहेबांनी साडेतीन लाख त्यांच्या हातात दिले आणि त्यांना मदत केली. ऑपरेशन झाले. काही दिवसांनी अमरनाथ शुद्धीवर आला. हालचाल झाली. बोलू लागला. आईने साहेबांनी मदत केल्याचे सांगितले. त्याला खूप अभिमान वाटला की सर्वांनी मदत केल्यामुळे आपल्याला अमोल जीवदान मिळाले आहे. त्यांचे उपकार विसरता येणार नाहीत.

एक महिना गेला. तो बँकेत येऊ लागला.

काम सुरळीत सुरु झाले.

पेन्शन वाटपाचा दिवस आला.

अमरनाथ काउंटरवर होता. आणि ती म्हातारी पुन्हा आली.

पुस्तक दिलं.

आजारपण, औषधाचा खर्च व कामावरील सुट्टीमुळे अमरनाथकडे तिला द्यायला पैसे नव्हते.

तो म्हणाला, “आज्जी, आज आले नाहीत पैसे… पण इथे दाखवतेय की उद्या नक्की येणार आहेत… ” त्याचं बोलणं अडखळलं. त्याच्या डोळ्यांत अपराधीपणा दिसत होता.

म्हातारी काही बोलली नाही.

ती सरळ आत काऊंटरमध्ये गेली. आणि एका क्षणात अमरनाथला घट्ट मिठी मारली. व जोरजोरात रडू लागली. त्याला काहीच कळले नाही.

सगळा स्टाफ बाहेर आला. आश्चर्याने सगळे बघत होते.

साहेब केबिनमधून बाहेर आले, पुढे येऊन म्हणाले, “आता सांगतो अमरनाथ…

हिला सगळं कळलं आहे. तू तिला तुझ्या पगारातील पैसे देत होतास, हे जेव्हा तिला कळलं तेव्हा अपघातानंतर तुझं ऑपरेशनच्या वेळी एका तासात हिने तिचं घरातील सोनं गहाण ठेवून साडेतीन लाख रुपये माझ्याकडे आणून दिले.

आणि एक अट घातली – हे तुला सांगायचं नाही. आम्ही मान्य केलं. पण आज ती थांबू शकली नाही. तू तिला दर महिन्याला मदत करत होतास. आणि तिला समजल्यावर तिने कसलाही विचार न करता तिच्या आयुष्याची शिदोरी तुला देऊन तुझा जीव वाचवला. “

अमरनाथचे डोळे भरून आले. त्याने त्या म्हातारीला घट्ट मिठी मारली आणि दोघे आज्जी-नातू रडू लागले.

अमरनाथ म्हणाला “आज्जे, का एव्हढं केलंस माझ्यासाठी.. “

आज्जी रडत म्हणाली, ” मी परकी असली तरी तू आज्जीसारखं माझ्यावर प्रेम केलंस… मला दीड वर्ष पेंशन देत हुतास. मग मी माझ्या नातवाला अशी दवाखान्यात तडपडत ठेवेन का रे बाळा….!”

पण सगळा बँकेचा माहोल भावनिक झाला.

सगळेजण रडत होते.

कधी कधी आपलं दिलेलं प्रेम आणि केलेली मदत नकळत आपल्या आयुष्यात मोठं काही परत घेऊन येतं. कर्माच्या हिशेबात एकही रुपया कमी-जास्त राहत नाही. जीवन अमोल आहे.

दिलेलं आपल्याकडे परत येतंच – त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवून कर्म चांगले करत रहा.

लेखक: श्री. अमोल आ. पवार

प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments