श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “धूसर…” – लेखक – श्री सचिन श. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

जानकीबाई ‘घरकुल’ ह्या वृद्धाश्रमात, पोळ्या करायला जायच्या. रोज सकाळच्याच पोळ्या असत जानकीबाईंना, साधारण साठ – सत्तरच्या आसपास. एवढ्या पोळ्या पुरत असत कारण, कोणी एक खाई तर कोणीतरी कधीतरीच दोन. त्यामुळे पन्नासेक पिकली डोकी असलेल्या त्या वृद्धाश्रमात, इतक्या पोळ्या सहज पुरत असत. संध्याकाळी बरेचजण तसेही फलाहारच करत, तर अगदी काही जणच भात खात असत. पण म्हणजे थोडक्यात जानकीबाईंचं, एक वेळच कामावर जाऊन भागत असे.

तर आजही जानकीबाई नेहमीप्रमाणे पोळ्या करायला आल्या खर्‍या, पण नेहमीची तरतरी काही नव्हती चेहर्‍यावर त्यांच्या. वृद्धाश्रमाच्या संचालिकाबाईंच्या ते लक्षात आलं… नी त्यांनी विचारलं जानकीबाईंना, त्यांच्या अशा मुड आॅफचं कारण. जानकीबाईंनी पदर लावला डोळ्यांना नी म्हणाल्या… “लेकाला सांगितलं मी की आज एक दिवस इथल्या सगळ्यांना, पोळ्यांना छानपैकी तूप लाऊन देते… तशाही रोज कोरड्या नी पांढरटच पोळ्या खातात ही सगळी मंडळी… तर तुपाचा जो काही खर्च होईल तो देशील का?…”

तर लेक मला त्याचेच खर्च ऐकवू लागला… मलाही माहितीये की तो एका पतपेढीत शिपाई आहे… त्याची बायको घरीच शिवणकाम करुन, संसाराला थोडाफार हातभार लावते… आणि मला इथे जे काय मिळतात ते… आमची तशीही मारामारच असते गरजा भागवायची… पण म्हंटलं एखाद दिवस जरा काय हरकत आहे, तुपाचा खर्च करायला… करु आपलं आपल्यात अॅडजेस्ट “.

इतकं बोलून पुन्हा डोळ्यांना पदर लावला जानकीबाईंनी, आणि तेवढ्यात कसलासा खमंग नी गोडसर वास आला त्यांना स्वैपाकघरातून. जानकीबाईंनी प्रश्नार्थक बघितलं संचालिकाबाईंकडे… त्याही हसल्या नी खुणेनेच त्यांनी जानकीबाईंना, स्वैपाकघरात जायला सांगितलं. जानकीबाई घाईतच आत गेल्या… आणि हबकल्याच आपल्या लेकाला, सुनेला आणि काॅलेज शिकणार्‍या नातवाला तिथे बघून. सुन आणि नातू प्रत्येक ताटात पोळी… अ हं… पुरणपोळी वाढत होते. आणि लेक प्रत्येक पोळीवर तुप वाढत होता, अगदी सढळपणे. कोणाला तुप, कोणाला दूध आणि कोणाकोणाला तुप अन् दूध दोन्ही… हे आधीच विचारुन त्याप्रमाणेच ताटं वाढली जात होती. दूध हवं असणार्‍यांच्या ताटात, दूध भरलेली वाटीही होती. जानकीबाई अगदी पुरत्या भांबावल्या होत्या आता. आपल्या गोंधळलेल्या आईकडे बघून दिलखुलास हसतहसतच, लेक आईपाशी गेला. तोपर्यंत संचालिकाबाईही जानकीबाईंच्या पाठी येऊन उभ्या राहिलेल्या. त्या म्हणाल्या… “जानकीबाई… अहो मला कालच फोन आला होता तुमच्या लेकाचा, आणि त्याने मला सांगितलं होतं की तो हे सगळं घेऊन येणारेय आज इथे… तूम्हाला मात्र काहीही न सांगण्याबद्दल विनंती केली होती त्याने मला”.

जानकीबाईंचा लेक त्यांच्याकडे बघत बोलू लागला…

“आई अगं तू तुपाबद्दल बोललीस… तेव्हाच अगदी माझ्या मनात आलं होतं की, तुपासोबत तर मग पुरणपोळीच हवी… पण म्हंटलं तुला जरा धक्का द्यावा, म्हणून मग तुला नाही जमणार म्हणालो मी… आणि खर्चाचे पाढे वाचले तुझ्यासमोर”.

“अरे पण जे काही खर्च सांगितलेस मला, ते तर खरेच होते ना?… मग आता हा एवढा खर्च इथे झाल्यावर, तिथे कसं काय भागवायचं?”.

“अगं आपल्या घरापासून दोन गल्ल्या सोडून तो नवा टाॅवर झालाय ना, तिथेच मला रात्रीची सिक्युरीटी गार्ड म्हणून नोकरी मिळतीये… रात्री आठ ते सकाळी आठ… बाराशे तरी सुटतील तिथून”.

“म्हणजे तू सकाळी नऊ ते चार पतपेढीत काम करणार… घरी येऊन सुनेनी शिवलेली कापडं लोकांकडे पोहोचती करणार, ते सहाला घरी येणार… आणि पुन्हा आठला  घराबाहेर पडणार रात्रीच्या ड्युटीला जायला?… अरे नको रे इतका ताण घेऊ”.

“अगं आई तुझी कुठलीही इच्छा अपुरी राहू नये म्हणून… मी मधल्या त्या सहा ते आठ वेळेतही, कुठे काय मिळतंय का ते बघतोय”.

जानकीबाईंनी डोळे वटारत, लेकाच्या दंडावर जोराची चापटी मारली. सुनेनी आणि नातवानी आत्तापर्यंत वाढलेली ताटं, टेबलवर नेऊन ठेवलेली. सगळी मंडळीही एकेक करुन येत, आता जागेवर बसलेली… ताटात पुरणपोळी पाहून खुललेली. टेबलावर मांडलेल्या खुर्च्यांपैकी, मधली खुर्ची मात्र अजूनही रिकामीच होती. कोणीच बसलेलं नव्हतं तिथे, समोर वाढलेलं ताट असूनही. जानकीबाईंनी काहीतरी उमजून, फक्त पाहिलं लेकाकडे… आणि लेकाने होकारार्थी मान हलवली. जानकीबाईंनी पुन्हा पदर लावला डोळ्यांना, नी त्या जाऊन बसल्या रिकाम्या जागेवर.

नेहमीप्रमाणे वदनी कवळ घेता म्हणायला उठलेले एक आजोबा, सगळ्यांना उद्देशून म्हणाले… “आपल्या सगळ्या लोकांतून… खर्‍याअर्थी सगळ्यात श्रीमंत अशा जानकीबाईंना, खूप खूप शुभेच्छा आजच्या ‘ज्येष्ठ नागरीक दिनाच्या’… आणि त्यांच्या लेकाकडील ही मनाची श्रीमंती त्याच्या लेकातही, म्हणजेच जानकीबाईंच्या नातवातही अर्थातच उतरली असेल… म्हणून जानकीबाईंच्या सुनेचंही आत्ताच अभिनंदन करतो, तिच्या नशिबी पुढे कधीही वृद्धाश्रम नाही म्हणून “.

…. इतकं बोलून रोज खणखणीत आवाज लावणार्‍या आजोबांनी, आज काहीशा दाटल्या आवाजातच वदनी कवळ घेता सुरु केलं होतं… ताटावर बसलेल्या जानकीबाईंच्या, अन् वाढायला उभ्या त्यांच्या सुनेच्या भरुन आलेल्या डोळ्यांतून… ‘धूसर’ होत जात.

लेखक: श्री सचिन श. देशपांडे

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments