सौ. शोभा जोशी
वाचताना वेचलेले
☆ “प्रारब्ध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
केलेली कर्म ही केंव्हा ना केंव्हा भोगल्या शिवाय त्यातून सुटका नाही. म्हणून उगाच असं झालं, तसं झालं,असं करायला हवं होतं. मग असं झालं असतं. वगैरे, वगैरे सगळं विसरा.
– – कारण जे झालं ते तसंच होणार होतं. ते आपलंच पूर्वीचं केलेलं कर्म आहे.
*
कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा, श्री कृष्णाने, वसुदेव- देवकीची कारागृहातून सुटका केली तेव्हा देवकी त्याला म्हणाली,
“हे कृष्णा!! अरे तू स्वतः साक्षात् परमेश्वराचं रूप आहेस ना? तर मग तू कधीच कंसाचा वध करू शकत होतास…! मग कंसाला मारून आमची त्याच्या कैदेतून सुटका करायला तू चौदा वर्ष॔ का थांबलास?
यावर श्रीकृष्ण म्हणाले.
“माते, गेल्या जन्मात तू मला चौदा वर्षे वनवासात कां बरं पाठवलं होतंस?”
श्रीकृष्णांचं उत्तर ऐकून देवकीला धक्काच बसला.
देवकी म्हणाली मी?….अरे मी कधी तुला चौदा वर्षं वनवासात पाठवलं होतं….?_हे काय बोलतो आहेस तू….?
त्यावर कृष्ण भगवान म्हणाले,_
“माते ही घटना गतजन्मातली असल्यामुळे आता तुला त्यातलं काहीच आठवत नाही. पण गेल्या जन्मात तू कैकयी होतीस…आणि तूच मला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवलं होतंस.
हे ऐकून देवकीला धक्काच बसला, आणि तिने आश्चर्याने विचारलं,
“कृष्णा मी गेल्या जन्मातली कैकयी..? तर मग त्या जन्मातली कौसल्या कोण…?”
यावर श्रीकृष्ण हसून वदले,__
माता यशोदा म्हणजे गेल्या जन्मीची कौसल्या होय. जिला गेल्या जन्मात, माझी आई असूनही चौदा वर्षं पुत्रप्रेमाला पारखं व्हावं लागलं होतं. तेच प्रेम तिला माझी माता म्हणून या जन्मी लाभलं…..आणि तुला पुत्र प्रेमाला पारख व्हावं लागलं.
“माते, प्रत्येकाला आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांची फळं ही भोगावीच लागतात…..त्यातून देवांचीही सुटका होत नाही….!”
– – विचार करा मग आपण कां वाईट वाटून घ्यावं.? जे आहे ते भोगूनच संपवणे हे योग्य. कारण सुटका नाही….. ‘ गत जन्माची पापे. ती येती भोगरुपे…’
– – आणि भोग हे सोडूनच संपवावे लागतात.
श्रीकृष्ण:शरणं मम् ॥
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




