सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई गेली आणि माहेर संपले…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आई जोपर्यंत असते, तोपर्यंत कौतुक असते. आराम असतो. एक प्रकारचा निवांतपणा असतो. तिच्यावर आपले मूल सोपवून बहिणींबरोबर, मैत्रिणींबरोबर गप्पांचे फड रंगतात, भटकणे सुरु होते.

एक स्वातंत्र्य असतेच असते.

ते कुठेतरी हरवले हे मात्र खरे… आई गेली आणि त्या दिवशी हे माहेर संपले.

सुट्टीला घरी आले की आवडणारा पदार्थ आवर्जून करणारी आई….

तुपाची-लोणच्याची-आवडत्या गुळांब्याची बरणी भरून बाजूला काढून ठेवणारी आई….

सकाळी उशीरा पर्यंत हाका न मारणारी आई….

‘झोपा गं आता. खुसूखुसू करत बसू नका, ‘असे सांगणारी आणि अलगदपणे आपल्यामध्ये सामील होणारी आपली आई.

दुपारच्या सुखदुःखाच्या गप्पा. त्यात सुद्धा संसाराचे महत्त्व समजावून सांगणारी आई. तडजोडी करूनचं संसार करावा लागतो. तरच तो आनंदाने होतो, नाहीतर नाते तुटते. ते आपल्याला टिकवायचे आहे, तोडायचे नाही असे सांगणारी आई.

संसारात मन शांत ठेवावे.

भांडण तंटा झाला तर विसरून जावा.

नवऱ्याचे चार चांगले गुण लक्षात ठेवावेत आणि आपल्या चांगल्या वागण्याने हळूहळू माणूस बदलतो हे शिकवणारी आई.

दुपारी जेवण झाले की आडवे होऊन सांगणारी आई. मुलाला वाढवताना कसे वाढवावे हे शिकवणारी आई.

दुपारी गप्पा मारता मारता तिच्या पोटावर हात ठेवून झोपताना एक प्रकारच्या शांततेचा मी अनेकदा अनुभव घेतलेला आहे. तिची कितीतरी रूपे आहेत.

त्यानंतर हळू-हळू संसारात रमायला सुरुवात झाली आणि

‘माहेर’ ही जाणीव कमी होत गेली.

कदाचित स्वीकारले असेल मनाने.

‘ती’ गेली…. आणि‌ तिच्या बरोबर इतकी वर्ष असणारी मावशी, मामा, भाऊ ही माहेरची म्हणून आपली असणारी नातीही गेली. पुसली गेली आपल्या आयुष्यातून.

जिच्यामुळे ती जोडलेली होती तिच्या जाण्याने ती नाती पण कुठेतरी हरवली आणि मागे राहिले एकटेपण..

जे दरवर्षी सुट्टी लागली की प्रकर्षाने जाणवायचे.

आजूबाजूच्या मैत्रिणी, मुलीबाळी

माहेरी जाताना बघून आत कुठेतरी तुटायचे, वाईट वाटायचे. आपल्याला असे ठिकाण राहिले नाही, म्हणून वाईट वाटायचे.

पण हळूहळू माणूस सगळ्या गोष्टी स्वीकारतो. मुले मोठी झाली की आपल्यालाही त्याची सवय होऊन जाते. आता मे महिन्यात जाणवणारा एकटेपणा, माहेर नसल्याचे दुःख कमी झाले आहे. तरी सुद्धा कुठे तरी आत त्याचा सल आहेच.

लाड करून घ्यायला वयाची अट नसतेच मुळी, पण प्रत्येकीला एक हक्काचे माहेर मात्र असावं, असे मला कायमचं वाटत आले आहे.

तो जिव्हाळा, आपलेपणा, कौतुक, डोळयांतलं प्रेम, आराम, ती ऊब, काळजी, कुठेतरी हवीहवीशी वाटत असते. उन्हाळ्याच्या सुट्टीतला हा आनंद हरवलाय एवढे मात्र खरे. ‘मामाच्या गावाला जाऊया’, ही संकल्पना हळूहळू लुप्त होऊ लागलीय.

माहेरी गेले होते गं महिनाभर…

हे कुणाला तरी आनंदाने सांगायचे राहूनच गेले आहे. कित्येक वर्षात.

आई वडील आहेत, तोवर त्यांना जपा, एकन्एक दिवस सगळयांनाच जायचे आहे.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments