सौ.राधा पै
वाचताना वेचलेले
☆ “नि:स्वार्थ दान…” – लेखिका : श्री गणेश केळकर ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆
दान… हा शब्द जितका साधा, तितका तो प्रसंगानुरुप रूपं बदलतो.
कधी हात देतो,
कधी आधार देतो,
आणि कधी जिवंत राहण्याची ताकद देतो.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन बॅग, नवीन वही, नवीन बॉक्स, ही गोष्ट काही मुलांसाठी नेहमीची आणि काही मुलांसाठी, स्वप्नासारखी.
एकदा एका शिक्षकाला दिसलं की वर्गातील छोटा दिनू नेहमी वहीच्या एका पानाच्या कोपऱ्यावरच लिहितो.
लिहायला सांगितलं की तो घाबरत म्हणायचा, सर, पान संपलं की आईस काय सांगू…?
दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी कुणालाही न सांगता वर्गातील काही मुलांना पुस्तके, वह्या, पेन्सिली दिल्या. दिनूचा चेहरा पाहण्यालायक होता.
त्याने वह्या हातात घेतल्या आणि उद्गारला, “सर, आता मी मोठ्ठा निबंध लिहीन.” शालेय साहित्य दान म्हणजे फक्त वही देणं नाही. ते मुलाच्या आयुष्याला ‘रिकामं पान’ न ठेवता, लिहायला प्रवृत्त करणं.
पूर आला, भूकंप झाला, एखादं कुटुंब अचानक रस्त्यावर आलं, तेव्हा दान म्हणजे फक्त पैशाचा विषय नसतो, तो वेळेचा आणि उपस्थितीचा असतो. गावात पूर किंवा भूकंप येऊन घरं उध्वस्त झाली तेव्हा, गावातील सगळे एकदिलाने उभे राहिले.
मुलं घराबाहेर रडत होती.
आणि तेव्हा एक म्हातारी आजी आली आणि म्हणाली, “बाळांनो, चला, माझ्या घरात ऊब आहे. कपडेही आहेत. या आत या.” कपडे महाग नव्हते, घर मोठं नव्हतं.
पण त्या क्षणी वेळेला तिच्या त्या कृतीने इतका आधार दिला की जणू संकटाचं वादळ जाणवलंच नाही.
आपत्कालातील दान म्हणजे, संकटाशी दोन हात करणे.
औषधांचं दान म्हणजे शरीर वाचवणं, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मनाला दिलासा देणं.
एकदा रुग्णालयात एका वृद्ध बाबांना महागडी औषधं लिहून दिली. पण महिना अखेर पेन्शन शिल्लक नव्हती.
ते औषधांच्या काऊंटरवर उभे राहून शांतपणे म्हणाले, “थोडं कमी देता येईल का? “
तेव्हा मागून कुणीतरी हात पुढे करून पूर्ण बिल भरलं.
तो माणूस नावही न सांगता निघून गेला. त्या वृद्धांचे डोळे पाणावले.
औषधाने शरीराला बळ मिळालं, आणि त्या अनोळखी व्यक्तीने दिलेल्या दयाळूपणाने मनाला.
औषधदान म्हणजे, तुम्ही जगलात तर आम्हा सर्वांचं चांगलं जगणं अधिक परिपूर्ण होणं, असा नि:शब्द संदेश.
गावात जत्रा भरते किंवा धार्मिक उत्सव असतो, त्यावेळी अन्नछत्र असतं. जेवण झाल्यावर म्हणजे प्रसाद भक्षण केल्यावर धन्यवाद म्हणू नये. यात आभार नसतात. तर यात आपलेपणा असतो.
आणि खरंच, जिथे एखादं लहान मूल प्रसादाचा द्रोण हातात घेऊन हसतं, जिथे एक वृद्ध ‘देवा, भरभराट होवो’ असं मनोमन आशीर्वाद देतो, तिथे देणाऱ्याला अचानक काहीतरी मिळाल्यासारखं वाटतं. अन्नदान म्हणजे फक्त पोट भरत नाही, माणुसकीही भरभरून वाहते.
‘अवयवदान, रक्तदान’ या शब्दांचा रोज टीव्हीवर, वर्तमानपत्रात उल्लेख असतो. पण त्यातली खरी ऊब कळते ती एखाद्या कुटुंबाच्या डोळ्यांतून. एकदा एका ओळखीच्या कुटुंबात दुर्दैवी घटना घडली.
पण त्या घरातील मुलाने शेवटच्या क्षणी आईचा हात हातात घेऊन शांतपणे सांगितलं, “आई, तुझं हृदय कुणाचातरी ठोका वाढवेल, तुझे डोळे कुणाचातरी पहाट उजळतील.”
त्या वाक्यानं घरभर शांतता दाटली. दुःख होतंच. पण त्यावर जीवनाचा सुगंधही मिसळला. अवयवदान हा कृतज्ञतेचा सर्वोच्च आकार.
कारण यात देणारा निघून जातो, पण त्याचं हृदय, त्याचे डोळे, त्याचा श्वास कुणाच्यातरी आयुष्यात चालत राहतो.
दान म्हणजे फक्त काहीतरी देणं नाही. दान म्हणजे मनातून निघालेली सहज कृती. कधी एखाद्याला पावसात छत्री देणं, कधी शाळेतल्या मुलाला पुस्तक देणं,
कधी वृद्धाश्रमात शांतपणे बसून ‘काय सांगताय? ‘ विचारणं, हे सगळंही ‘दान’च. कारण दानाचं मूळ एका छोट्याशा भावनेत असतं : ‘मी तुला माझ्यातलं थोडं देतो, कारण तू आणि मी वेगळे नाही.’
आपत्कालातला आधार, गरीब मुलांना दिलेलं साहित्य, गरजूंना केलेली मदत, रुग्णांना दिलेली औषधं, ही सगळी वेगवेगळी रूपं आहेत, पण मूळ एकच आहे… माणुसकी.
दान करताना माणूस मोठा होत नाही, तो फक्त स्वतःला अधिक मानवी बनवतो.
दान हा एक छोटासा शब्द, पण अर्थ मात्र आकाशाएवढा. त्यात प्रेम आहे, करुणा आहे, त्याग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना सामावून घेण्याचे आपलेपण आहे. अन्नदानाने भूक भागते, अवयवदानाने ओआयुष्यच मिळतं.
एक जिवंत माणसाला ऊब देतं, दुसरं मृत्यूनंतरही अर्थ देतं. मात्र दोन्हींचा सूत्रधार एकच- ” माणुसकी. “
लेखक: श्री.गणेश केळकर
प्रस्तुती:सौ.राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





