सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “हे कुठले रंग?” – लेखक : श्री विद्याधर शेणोलीकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

” हे कुठले रंग…? “.

आमच्या एम. आय. टी. कॉलेज परिसरात कोणताही सणवार म्हणजे नुसता नंगानाच असतो. बाहेरून आलेली मुलं-मुली आणि त्यांच्या नादानं आपली मराठमोळी मुलं-मुली नुसता धांगडधिंगा करत असतात. आज खाली चौकात रंगपंचमी निमित्त बरीच मुलं जमून रंग खेळत आहेत आणि हातात दारूच्या बाटल्या आहेत. खरंतर पूर्वी पुण्यात धुळवडीला रंग खेळतच नव्हते. रंगपंचमी ही पंचमीलाच साजरी केली जायची. परंतु आता सोशल मीडियामुळे देशभरातल्या विविध सणवारांचं वारं सर्वांना लागलं आहे आणि आपण कसे परंपरा सांभाळतो हे दाखवण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे.

 माझ्या आज्ज्यांनी कधी माझ्या आजोबांचा चेहरा चाळणीतून पाहिल्याचं मला आठवत नाही. माझ्या आईनंही माझ्या वडिलांचा चेहरा कधी चाळणीतून पाहिल्याचं मला आठवत नाही. पण आता चाळणीतून नवऱ्याचा चेहरा काय पहा आणि दिवाळीला छोटी दिवाली काय, आणि बडी दिवाली काय…

 काय नाही नाही ते प्रकार ऐकायला आणि पाहायला मिळतात. कसली छोटी दिवाली आणि कसली बडी दिवाली? ? आपल्याकडे दिवाळी ही दिवाळीच असते. आता खरं सांगायचं तर सर्व सणवार हे इव्हेंट झालेले आहेत.

 गणपतीत मंडप जाहिरातींनीच सजून गेलेला असतो आणि प्रायोजकच गणपती पेक्षा जास्त झळकत असतो. म्हणजे गणपती कुठला हे महत्त्वाचं नाही तर प्रायोजक कोण हे महत्त्वाचं…

 विसर्जन मिरवणुकांमध्ये तर डीजे बंद होतील त्या दिवशी बाप्पा खऱ्या अर्थाने पावला असं म्हणावं लागेल…

 “डीजे लावून मिरवणुका”… ही अक्षरशः पुणे शहराला लागलेली कीड आहे…

सामान्य पुणेकर या सगळ्यापासून फार दूर गेलेला आहे. पण आता खऱ्या पुणेकराला विचारतो कोण? ? खरा पुणेकर हा फक्त विनोद करण्यापुरता आणि टोमणे मारण्यापुरताच उरलेला आहे. पुण्याची संस्कृती लोप पावून तिथे विकृती आलेली आहे…

 पुण्यात पूर्वीही पान तंबाखू गुटखा खाणारे होते, परंतु या मंडळींना कुठेतरी मनाला चाड होती. रस्त्याच्या कडेला जाऊन पान तंबाखू थुंकावी एवढी लाज होती. आता सिग्नल ला बिनधास्तपणे तोंडातला गुटखा रिकामा करणे आणि परत वर शांतपणे तुमची प्रतिक्रिया बघणे ही विकृती फोफावत आहे. बसच्या शेजारून जायला तर धाडसच हवे. कधी अंगावर पिचकारी पडेल नेम नाही. आता पेठांमध्येही मटण चिकन खानावळींमध्ये सर्रास मिळते. स्पष्टच बोलायचं तर पुण्याच्या काहीशा ब्राह्मणी संस्कृतीला नाव ठेवत राहणे, सतत पुणेकरांवर टोमणे मारणे, पुणेकरांवर विनोद करणे यातच बाहेरून आलेली मंडळी धन्यता मानतात… आणि हळूहळू इथेच स्थायिक होतात… सध्या पेठा म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसचे कारखाने झाले आहेत. यात कुणाचं किती करियर होतं हा एक मोठाच प्रश्न आहे. सरकारी जागा पन्नास आणि परीक्षा देणारे पन्नास हजार…

 तरुण मुलं आपल्या आयुष्याचा मौल्यवान वेळ वाया घालवत आहेत हे दिसत असतं. यात खरोखर कोणाचं करियर होत असेल तर ते क्लास चालक, खानावळ वाले, पान सिगरेट वाले आणि जागा भाड्याने देणारे यांचं… या मुलांच्या वेड्यावाकड्या जाणाऱ्या बाईक्स म्हणजे शहराच्या वाहतुकीला डोकेदुखी झालेली आहे. तरुण मुलांमध्ये वाढणारी व्यसनं हा तर एक वेगळाच चिंतेचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांना बसणारी पुणेकर स्थानिक मुलं विरळाच आहेत. स्थानिक मुलं आयटी क्षेत्र वगैरे क्षेत्रात करिअर करून परदेशी जायची स्वप्न बघत असतात. पुण्याच्या वाहतुकीत वाहन चालवणं अक्षरशः अंगावर काटा आणणार असतं. पोलिसांवरही पुणेकरांचा विश्वास राहिलेला नाही असं म्हटल्यास वावगं ठरू नये. “हिट अँड रन” ची प्रकरणं वाढत आहेत आणि पुढे या प्रकरणांचं काय होतं हा पुणेकरांसाठी एक मोठाच कुतूहलाचा विषय आहे. आता शिक्षणाचे महत्त्व जाऊन पैशाला अवास्तव महत्त्व आलेलं आहे. बाहेरून आलेले तरुण कामधंदा बघायचं सोडून राजकारण्यांच्या सतरंज्या उचलण्यात धन्यता मानताना दिसतात. लाल सिग्नल तोडून जाणे हे पुणेकरांना आता नवीन चित्र नाही. वाहन चालवताना सतत सावध राहावं लागतं. कोण कुठल्या दिशेने येऊन धडकेल सांगता येत नाही. शिवाय धडकणारा मुजोरपणा दाखवतो तो वेगळाच…

 आता जो जेवढा मोठा गुंड, जो जेवढा मोठा गुन्हेगार तेवढा तो राजकारणात यशस्वी… एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्यासारखी नेतृत्वं आता लोप पावली आहेत. पूर्वी पुण्यातील सर्वच पक्षांचे राजकारणी अत्यंत सुसंस्कृत होते. भाषेत नम्रता, सुसंस्कृतपणा होता. आता राजकारणात प्रतिस्पर्ध्यांवर चिखलफेक करून रोजच धुळवड खेळली जाते. राजकारण, समाजकारण अत्यंत खालच्या पातळीला गेले आहे. आता घरं तुमच्या-आमच्यासाठी बांधली जात नसून बिल्डरांची पोटं भरण्याकरता बांधली जातात आणि बिल्डरांची पोटं काही भरता भरत नाहीत…

पूर्वी एखाद्या पुणेकराला विचारलं तू पुढे काय करणार आहेस? ?

तर कोणी म्हणायचा मी आय. आय. टी. ची तयारी करतो आहे, कोणी म्हणायचा मी परदेशी जाणार आहे, कुणी म्हणायचा मी एनडीए ची तयारी करतो आहे. आता काय, तर मी इस्टेट एजंट आहे, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे…

इस्टेट एजंट हा प्रकार तर मला कळलेलाच नाही. कुत्र्याच्या छत्रीसारखे गल्लीबोळात इस्टेट एजंट आहेत. पूर्वी कुठल्याही वाड्यामधून निळं आभाळ सहज दिसायचं… मोकळी हवा खेळती असायची… गल्ल्या शांत होत्या…

आता निळं आकाश दिसणं दुर्मिळ झालं आहे. धुकं तर कित्येक वर्षात पुणेकरांनी पाहिलेलंच नाही. दवबिंदू कसे असतात नव्या पिढीला माहीत नाही. चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत नाही…

पूर्वीचा पुणेकर सणवार हौसेनं करायचा. गणपती बघायला जाणे हा एक आनंद होता. एक उत्सुकता असायची. पुण्यातले गणपतीचे देखावे हे साऱ्या महाराष्ट्राचं आकर्षण होतं. स्वीट होम, जनसेवा, पुष्करणी भेळ ही पुणेकरांची विश्रांती स्थान होती. पूर्वीचा पुणेकर भेळेवर, मिसळीवर समाधान मानायचा. त्याला आनंद मिळवण्यासाठी गुटखा, दारू असल्या गोष्टींची गरज पडत नव्हती. ही व्यसन अपवादानेच केली जायची आणि या व्यसनांचा तिरस्कार केला जायचा. आता मात्र यात सगळ्या गोष्टी अभिमानाने मिरवल्या जातात. पुणे शहर हे आता शिक्षणाचं माहेर घर राहिलेलं नसून गुन्हेगारीचं माहेर घर झालेलं आहे असं खेदानं म्हणावसं वाटतं. या सगळ्यात जुन्या पुणेकराचा श्वास घुसमटतो आहे. आता जुनी रंगपंचमी घरात बसूनच आठवायची आणि खिडकीतून बाहेरचा धांगडधिंगा शांतपणे बघत रहायचा…

आणि रंगपंचमी, किंवा एकंदरच सणांच्या नावाखाली काय काय रंग उधळले जातात ते हतबलपणे पहात रहायचं…

एवढंच मूळ पुणेकरांच्या हाती राहिलं आहे…!!!

लेखक : श्री विद्याधर शेणोलीकर

कोथरूड, पुणे.

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments