शोभा जोशी
वाचताना वेचलेले
☆ “देवाचे दर्शन…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆
कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता.
नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघून गेला.
त्याच्या मनात एक अधीरता, उत्कटता दाटून आली होती. मं
घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले.
हात जोडून तो नाथांना म्हणाला की,
“नाथबाबा,
मला_भगवंताचं,
श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. “
एकनाथ महाराज यांना काहीच समजेना.
हा कोण कुठला ब्राह्मण?
आपली व त्याची ओळख पण नाही,
त्याला मी कोठे रहातो?
हे पण माहीत नाही.
माझे घर शोधत शोधत तो आलाय.
तेवढ्यात तेथे गिरीजादेवी (नाथांच्या पत्नी) आल्या.
त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे, ते ऐकले होते.
नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले.
पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता.
“नाथबाबा, मला भगवंताचे,
श्रीकृष्णाचे दर्शन घडवा. “
त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती.
नाथांनी त्याला मंचकावर बसवले.
स्वत:च्या हाताने त्याचे पाय धुतले.
तोपर्यंत गिरीजादेवींनी गूळपाणी आणले.
ते पाहून त्या ब्राह्मणाचे ढमन भरून आले.
तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की,
“नाथबाबा, मला १५ दिवसांपूर्वी दृष्टांत झाला.
भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की,
‘मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाली श्रीखंड्याच्या रूपात रहात आहे.
आता माझी येथून जायची वेळ झाली आहे.
तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी ये. ‘
नाथबाबा,
मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान रहात होते.
ते कोठे आहेत? “
हे ऐकून गिरिजादेवींची शुद्ध हरपली.
नाथ देहभान विसरले.
प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या १२ वर्षांपासून पाणी भरत होता.
आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही.
इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन १५ दिवस अगोदर त्याला सांगितले.
तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो, असे सांगून निघून गेला होता.
नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले.
गिरिजादेवी भानावर आल्या.
मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागल्या.
ते श्रीखंड्याचे साधेपण,
त्याची प्रत्येक हालचाल,
शांतपणे आपले काम करणे
काल जातानाचे त्याच मुग्ध हसणे.
नाथांचे डोळे भरून वाहू लागले.
त्यांनी ध्यान लावले.
त्यांना समजले की,
खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, व्दारकेचा राजा आपल्या घरात पाणक्या बनून गेली १२ वर्ष रहात होता.
इकडे गिरीजादेवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती.
दोघांनीही एकमेकांकडे पाहिले.
गिरीजादेवी मनात म्हणत होत्या की….. ‘चोर, माखनचोर, चितचोर..
बारा वर्ष आमच्या जवळ राहिलास पण कळूनही दिले नाहीस.
इतक्या वर्षात तू
आमच्यावर अपार माया केलीस. ‘
नाथ खांबाला धरून ऊठले.
त्यांनी रांजण पाहिला,
त्याला स्पर्श केला.
श्रीखंड्यान बारा वर्षं खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली, तिला स्पर्श केला.
नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.
श्रीखंड्या जिथे जेवायला बसायचा,
जिथे विश्रांती घ्यायचा
नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जेथे जेथे झाला होता,
तेथे तेथे हाताने स्पर्श करू लागले.
गिरीजादेवींनी तर डोळ्यांतील अश्रूंनी,
श्रीखंड्या जिथे बसत असे, तेथली जमीन अक्षरशः भिजवून काढली.
कंठ दाटून आला.
त्यांनी आकाशाकडे बघितले.
आणि त्या म्हणाल्या की,
“हे भगवंता,
सगळीकडे तूच आहेस,
डोळ्यांत तूच, देहात तूच,
अंतर्बाह्य तूच आहेस.
आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तूच राहत होतास.
आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो.
आम्हाला क्षमा कर देवा
_श्रीकृष्णा…..
पण तू जर खरोखरच श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली १२ वर्ष रहात होतास, हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खूण दे….. “
काय आश्चर्य…..
त्याबरोबरच रांजण दुथडी भरून वाहू लागला,
जोरात वारा सुटला कोपऱ्यातली श्रीखंड्याची घुंगूरकाठी त्या वाऱ्याने पडली.
घुंगरांचा आवाज झाला.
त्या घुंगूरकाठीला एक भरजरी शेला बांधलेला होता.
त्या शेल्यातून केशर- कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला.
तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता.
तो आ वासून हे बघत होता.
भगवान श्रीकृष्णाने त्याची पण इच्छा पूर्ण केली होती.
आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते.
देव कुणाच्या तरी रूपात
आपल्या आसपास रहात असतो.
आपली सेवा करत असतो.
आपल्याला मदत करत असतो.
आणि आपल्याला हे माहीत नसते.
कळते तेव्हाच,
जेव्हा ती व्यक्ती निघून जाते.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




