सौ. अमृता देशपांडे

 ☆ विविधा ☆ आई☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

आज घरी लक्ष्मीपूजनाची गडबड चालू होती.  लक्ष्मीची तसवीर ठेऊन पिवळ्या शेवंतीचा हार घातला. घरातल्या प्रत्येकाने पूजेला आपले पैशाचे पाकीट ठेवले.बँकांची पासबुक्स,  चांदीची नाणी, सुवर्ण अलंकार,  हळदी कुंकवानं भरलेले करंडे, पाच फळांची परडी,  फुले, पंचामृत, धण्याच्या अक्षता, गूळ, पेढे सर्व तयारी जय्यत झाली. आदित्य,  माझा मुलगा,  सोवळे नेसून,  कपाळी केशरी नाम ओढून तयार झाला. नारळ पानसुपारीचा विडा ठेऊन पूजा सुरू करणार, तोच मला आठवण झाली,  अरे, तो लाल मखमली बटवा ठेवायचा राहिला की…. मी कपाटातला बटवा आणला आणि पूजेला ठेवला.

रीतसर पूजा झाली. आरती झाली. लक्ष्मीची स्तोत्रे म्हणून झाली. सर्वांनी कुंकू, फुले अक्षता वाहिल्या. तीर्थप्रसाद दिला. लक्ष्मीपूजन छान झाले.

न राहवून आदित्य नं विचारले, ” आई, त्या लाल बटव्यात काय आहे?” मी म्हटलं,  ” सांगेन नंतर.”

परवा सहज आदित्य ला आठवण झाली.  तेव्हा मी त्याला बटवा उघडून दाखवला.

” दहा रुपयाची नोट आईनं दिलेली.”  चेह-यावर प्रश्नचिन्ह घेऊन गडबडीत तो ऑफिसला गेला. पण माझ्या मनातून आज ते दहा रुपये हटेनात. रात्री अंथरूणावर पाठ टेकली तसे सर्व प्रसंग video बघावा तसे डोळ्यांसमोरून सरकू लागले.

ह्यांच्या, ( आदित्य च्या पप्पांच्या) अकाली निधनानंतर मला नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. दोन्ही मुलांचा सांभाळ आणि शिक्षण हे माझं पहिलं कर्तव्य होतं. सुरवातीला अगदी तुटपुंजा पगार ( रू.975/- फक्त) होता. ह्यांच्या पश्चात आलेली रक्कम हात न लावता ठेवायची, असं ठरवूनही वापरावी लागे. माझी एकूण सगळी ओढाताण आई बाबांना न सांगताच समजत असे. आईची तळमळ मला जाणवत होती.  बाबा नेहमीप्रमाणे ‘ हेही दिवस जातील,  धीर धर, म्हणून पाठिंबा देत होते.  ” फिरते रूपयाभवती दुनिया” याचा पावलो पावली प्रत्यय येत होता.

स्वतःच्या मेरीटवर घेतलेलं शिक्षण,  मेरिटवर मिळालेली नोकरी, मेहनत करून मिळवलेला पैसाच खरा, तोच आपले चारित्र्य ठरवत असतो.  हे आधी बाबांचे आणि नंतर ह्यांचे संस्कार.  हाता- तोंडाची जुळवणी करता करता वर्षे उलटली.

आई आजारी होती म्हणून तिला बघायला गेले होते माहेरी. तेव्हा आईनं माझ्या हातात ती पुडी दिली. उघडून बघते तर एक दहा रूपयांची जुनी नोट. काय आई तरी! क्षणभर विचार आला, आईकडे कुठून आले हे पैसे? कारण आता धाकटा भाऊ आणि भावजय सगळे व्यवहार बघत होते.  तिच्या समाधानासाठी घेतले मी ते पैसे. घरी आल्यावर कपाटात ठेऊन दिले.

पुढे 15च दिवसात आईनं या जगाचा निरोप घेतला. मला तिकडं पोचेपर्यंत पाच तास गेले. आईला तशी झोपलेली बघून मी तरी कोसळलेच.

” अशी कशी गेलीस ग आई? ” माझ्यातल्या वासरानं हंबरडा फोडला.

सर्व सोपस्कार झाल्यावर दुस-याच दिवशी परतावं लागलं. दिवसाला सुद्धा जायला जमलं नाही. तिचीच शिकवण, ” कर्तव्यात चुकारपणा करायचा नाही. कर्तव्य आपुलकीने करायचे. कर्तव्य आणि आपुलकी ची सांगड जबाबदारीने घालायची.” हे तिने आयुष्य भर केले, आम्ही ही नकळत तेच शिकलो.

आई गेली. सवाष्ण असतानाच गेली. गळ्यात दोन सुवर्ण वाट्या असलेली काळ्या मण्यांची पोत,  हातात दोन दोन काचेच्या बांगड्या,  कपाळावर लाल कुंकू इतके अहेव लेणे आयुष्य भर लेवून अखंड सौभाग्यवती राहून गेली. तिचा पार्थिव देह हिरव्या साडीत  झाकलेला होता.  मुखावर डोळे दिपवून टाकणारे तेज पसरले होते. येणारे लोक आश्चर्याने बघत होते.  देवीप्रमाणे नमस्कार करत होते. लोकांची गर्दी जमली होती.  चेह-यावरून नजर हटत नव्हती.

इतकी वर्षे कुणाची नजर लागू नये म्हणून आम्हां मुलांवरून, नातवंडांवरून  मीठमोह-या आईनं कितीतरी वेळा उतरल्या होत्या.आज मला तिची दृष्ट काढावीशी वाटली.

आई गेली.  घर माणसं असून सुनं सुनं झालं. डोळ्यातलं पाणी पापण्यातून परतवत मी परतले. दुसरे दिवशी जड मनाने पुडी उघडून नोट हातात घेतली. ती देताना आई मला बोलली होती. ” बेटा, खूप अवघड डोंगर चढलीस, खूप त्रास,  खूप दु:ख झेललेस.  पण तोंडातून चकार शब्द काढला नाहीस. ” मी म्हटलं  , ” आई तुझीच ना ग मी लेक, तुझ्याकडूनच शिकले.” तिनं माझ्या हातात पुडी दिली. जपून ठेव म्हणाली. ती नोट मी देवीसमोर ठेवली , नमस्कार केला आणि परत कपाटात ठेवली.

आईच्या जाण्याच्या दुःखानं मन आणि शरीर कमजोर आणि हळुवार झालं होतं. त्यातून बाहेर निघणं आम्हां भावंडांना जड जात होतं. महिनाच झाला जेमतेम, तोच बाबाही आम्हाला सोडून गेले. उरलासुरला आधार गेला. मातृछत्र,  पाठोपाठ पितृछत्र ही हरवलं.  आम्ही पार ढासळलो.  मूकपणे एकमेकाला सावरू लागलो.  दिवसामागून दिवस गेले.  दुःखावर काळ हाच उपाय असतो.

आई  गेल्यानंतर दोनच महिन्यात ध्यानी-मनी नसताना माझं प्रमोशन झालं. कमाईत थोडी सुधारणा झाली. डगमगणारी आर्थिक गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. पुढे पुढे तर कधीच आर्थिक चणचण जाणवली नाही. हा त्या दहा रुपयाच्या नोटेचा चमत्कार आणि आईचा आशीर्वाद. जाताना आई मला श्रीमंत करून गेली.

सहा फेब्रुवारी ला आईला जाऊन 13 वर्षे होतील. ती दहा रुपयांची नोट हीच आज माझी ताकद आहे आणि तीच माझी श्रीमंती.

मला आईच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं. बदलणारी परिस्थिती सहजपणे आणि सकारात्मकतेने स्वीकारण्याचे बाळकडू मला आईने पाजले. तिच्या विचारांच्या आणि मनाच्या श्रीमंतीने मलाही खूप शिकवले. आयुष्यात पैसाअडका,  दागदागिने कशाचाच हव्यास न धरता तिने अनेक आयुष्ये घडवली.

दहा रूपयांच्या रूपात आईने लक्ष्मी माझ्या हातात दिली. लक्ष्मीच्या तसबिरीकडे पहाताना मला आईचाच भास होतो.

आईचं दुसरं रूप लक्ष्मी?

की लक्ष्मीचंच सगुण रूप आई?

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments