पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गुढीपाडव्याचे महात्म्य ☆ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

नवीन वर्ष सुरू करण्याच्या प्रथा अनेक आणि वेगळ्या आहेत. एक जानेवारीपासून व्यावहारिक वर्ष सुरू होते. एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष, कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी वर्ष, एक जून पासून शैक्षणिक वर्ष, त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचे वर्ष हे चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. त्यालाच आपण ” गुढीपाडवा ” असे म्हणतो. याला वर्ष प्रतिपदा, तसेच युगादी तिथी असेही म्हटले जाते. वर्षारंभाचे दिवस जरी वेगवेगळे असले तरी, एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे वर्ष हे बारा महिन्यांचे आहे. ” द्वादश मासौ संवत्सर:/” असे वेदाने प्रथम सांगितले. आणि जगाने ते मान्य केले आहे. या सर्वांमधे चैत्रशुद्ध प्रतिपदा हा वर्षारंभ दिवस सर्वात योग्य प्रारंभ दिवस आहे. त्याची कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. नैसर्गिक आणि भौगोलिक — गुढीपाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपावर येतो. (संपातबिंदू, क्रांतीवृत्त व विषुववृत्त हे दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांना छेदतात तो बिंदू) आणि त्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो. त्या काळात उत्साहवर्धक आणि समशीतोष्ण असे हवामान असते. झाडांनाही नवीन पालवी येत असल्याने तीही टवटवीत दिसतात. कधीही नवनिर्मिती ही आनंददायीच असते. तेव्हा अशा वातावरणात नवीन वर्षा ची सुरुवात करणे योग्य आणि आदर्श आहे.

‘गुढीपाडवा ‘ या सणाला पौराणिकही आधार आहे. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला, तो हा दिवस. महाभारताच्या आदी पर्वात उपरीचर राजाने, त्याला इंद्राने दिलेल्या कळकाची काठी जमिनीत रोवली. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून “गुढीपूजन ” केले जाऊ लागले. एका कथेनुसार, शंकर पार्वती यांचे लग्न चैत्रशुद्ध प्रतिपदेला ठरले आणि तृतीयेला झाले. म्हणून या दिवशी आदिशक्ती पार्वतीचीही पूजा करतात.

ऐतिहासिक दृष्टीने विचार करता, “शालिवाहन” नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य केले. आणि त्यावर पाणी शिंपडून, त्याला जीवन दिले. आणि प्रबळ शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाने क्षात्रतेज संपलेल्या समाजात आत्मविश्वास निर्माण केला. आणि शत्रुवर विजय मिळविलेला हा दिवस. आणि शालिवाहन शक सुरू झाले.

अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाचे महत्व सांगायचे तर, या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली असे मानतात. त्यामुळे हा दिवस वर्षारंभ मानला जातो. व्यावहारिक दृष्ट्या गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मानला गेला आहे. या दिवसातील कोणतीही घटिका ही शुभ मुहूर्तच असल्याने वेगळा मुहूर्त काढावा लागत नाही. गणेशयामल या तंत्र ग्रंथात सांगितले आहे की, 27 नक्षत्रांपासून निघालेल्या लहरींमध्ये सत्वगुण निर्माण करणाऱ्या प्रजापती लहरी चैत्र महिन्यात आणि विशेषतः चैत्रशुद्ध प्रतिपदेला सर्वात जास्त असतात. म्हणून तो दिवस वर्षारंभ मानणे रास्त आहे

या दिवशी पूजा करण्याची ही एक विशिष्ट पद्धत आहे आजच्या पिढीला याची उपयुक्तता सांगणे गरजेचे आहे. प्रत्येक रूढी परंपरेला शास्त्रीय आधार आहे. या दिवशी अभ्यंग स्नान करून ब्रह्मदेवाची दवणा (थंड असतो म्हणून) वाहून नंतर महाशांती केली जाते. ” नमस्ते बहुरूपाय विष्णवे नमः’/ हा मंत्र म्हणून विष्णूची पूजा करतात. इतिहास, पुराणे यांचे दान देतात. गुढीपाडव्या दिवशी जो वार असेल, त्याच्या देवतेचीही पूजा केली जाते. संवत्सर पूजा केल्याने आयुष्य वृद्धी होते. शांती लाभते. आरोग्य लाभते. समृद्धी येते. अशी समजूत आहे. प्रत्यक्ष गुढी उभी करताना, एका उंच वेळूच्या टोकाला भरजरी खण किंवा साडी, साखरेच्या गाठींची माळ, फुलांचा हार, आंब्याची आणि कडुलिंबाची डहाळी आणि या सर्वांवर तांब्याचा किंवा

चांदीचा कलश अशी सजवून गुढी दाराशी किंवा खिडकीशी उभी केली जाते. याला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. विजयाचे, मांगल्याचे, उत्साहाचे, आणि आनंदाचे प्रतीक म्हणून ही गुढी असते. समोर रांगोळी काढून गुढीची पूजा केली जाते. कडूलिंब आणि आंब्याच्या झाडांच्या पंचांगाचे आयुर्वेद शास्त्रातील महत्त्व ओळखून हा सन्मान त्यांना दिला आहे. (ते देव वृक्ष आहेत). कलशरुपी सूत्राच्या सहाय्याने वातावरणातील सात्विक लहरी घरात प्रवेश करतात. (अँटेनाच्या कार्याप्रमाणे). या दिवशी नववर्षाच्या पंचांगाची पूजा करून वर्षफल श्रवण केले जाते. जेवणात पक्वान्न करून, प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या चटणीचा प्रसाद ग्रहण केला जातो. कटू संबंध दूर करून साखरेप्रमाणे एकमेकात संबंध वाढवून एकमेकांना सदिच्छा देतात. शेतकरी जमीन नांगरणी सुरुवात करतात. पारंपारिक वेशभूषा करून मिरवणुका काढून आनंद लुटतात.

आपल्या प्रत्येक सणाला शास्त्रीय आधार आहे. तो नवीन पिढीने अभ्यासायला हवा. आज काल आपल्या संस्कृतीचे प्रतिक म्हणून अगदी छोट्या टेबलवर ठेवण्यासारख्या गुढ्या परदेशी लोक घेऊन जायला लागले आहेत.

या शुभदिनानिमित्त येणारे नवीन संवत्सर “परभाव ” संवत्सर, शालिवाहन शके 1948 सर्वांना सुखाचे आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो ही सदिच्छा.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments