डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ बापमाणूस ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

काही दिवसांपूर्वी आमच्या ब्रह्मकमळाच्या झाडावर एका बुलबुलच्या जोडीने घरटे बांधले आणि थोड्याच दिवसात छोटी, चिमुकली पिल्ले दिसू लागली. आई – बाबा आपापल्या  पिल्लांसाठी खाऊ घेऊन येत असत. पण ते घरटे इतके खाली होते की आमच्या घरातील मांजरे त्यावर डोळा ठेवून होती. आणि एक दिवस त्यांनी डाव साधलाच.बिचाऱ्या आई बुलबुलची शिकार त्यांनी केली.पिल्ले एकटी पडली. पण बाबा बुलबुल मात्र आता दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडू लागले.ते दृश्य बघताना माझ्या डोळ्यासमोर बापाची अनेक रुपे उभी राहू लागली.

काही वर्षांपूर्वी लहान मुलांसाठी “निमो” नावाचा एक animated चित्रपट आला होता. त्यामध्ये छोट्या निमो माशाची आई मरते व त्याचे बाबा त्याचा डोळ्यात तेल घालून सांभाळ करु लागतात. पण दुर्दैवाने निमो कोळ्यांच्या जाळ्यात सापडतो आणि मग त्याला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी केलेली धडपड आपल्या काळजाला हात घालते.

मग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तो श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीच्या बापूचा ‛ विठोबा’!

लेकावर अमाप प्रेम करणारा ! बापूच्या आईला स्वतःच्या स्वार्थापुढे मुलगा आणि नवरा यांची किंमत नसते. पण हा विठोबा आपल्या या बापूवर इतके आंधळे प्रेम करत असतो की आपला मुलगा कधी चुकीच्या मार्गाला लागला हे त्यालाच समजत नाही.

याउलट नरेंद्र जाधवाचा मिश्किल आणि रांगडा बाप त्या प्रतिकूल परिस्थितीतही अनेक विनोद निर्माण करत आयुष्य आनंदाने कसे जगायचे हे नकळतपणे मुलांना शिकवून जातो.

तर ह. मो. मराठे यांचे वडील म्हणजे विक्षिप्तपणाचा नमुना! आपल्याबरोबर त्या लहानग्या आईविना असणाऱ्या पोराची फरफट करणारे! पण त्याचबरोबर त्या मुलावर माया पण असणारे ! असे अजब मिश्रण!

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असणारे शिवाजीमहाराज शत्रूशी दोन हात करताना जेवढे कणखर होते तितकेच आपला पुत्र शंभूराजांच्या बाबतीत अतिशय हळवे!  दिलेरखानाच्या छावणीतून पुत्राला परत आणण्यासाठी ते स्वतः जातीने जातात. अवघड जागेचे दुखणे तितक्याच कौशल्याने हाताळले पाहीजे हे त्यांच्यातील बापाला माहीत होते. म्हणूनच स्वतःतील राजेपण बाजूला ठेवून ते बाप बनून शंभूराजांना परत घेऊन येतात.

‘मार्टिना नवरातिलोव्हा’ नावाची ८०/९० च्या दशकातील  टेनिस खेळणारी लोकप्रिय खेळाडू! लहानपणी तिच्या पुरुषी दिसण्यावरुन शाळेतील मुले- मुली तिला चिडवत असत. त्यावेळी तिचे वडील हिरमुसलेल्या  तिला सांगतात,“ आयुष्यात सुंदर दिसणे महत्वाचे नाही तर आपल्या कर्तृत्वाने दुसऱ्याच्या जीवनात काहीतरी सुंदर अनुभूती देणे अधिक महत्त्वाचे आहे. ” आणि त्यानंतर तिने विम्बल्डनमध्ये  इतिहास घडवला. तिच्यात हा आत्मविश्वास केवळ वडिलांच्या शब्दांनी निर्माण झाला.

ज्या समाजात लहान असताना सिंधुताई सकपाळ  रहात होत्या त्या समाजात स्त्रियांनी शिक्षण घेणे योग्य मानले जात नव्हते. तरीही त्यांच्या आईच्या विरोधाला न जुमानता सिंधुताईंच्या वडिलांनी त्यांना यथाशक्ती शिक्षण दिले. त्याच इवल्याश्या पुंजीवर सिंधुताईनी आज केवढी भरारी मारली आहे हे आपण जाणतोच.

इंदिरा संत व ना.मा. संत यांचा मुलगा , लेखक‛ प्रकाश संत’ यांना वडिलांचा सहवास अगदी अल्पकाळ मिळाला. पण त्यांच्या लेखनातून प्रकाशना ते भेटत गेले व  त्यांचे जीवन समृद्ध होत गेले.      

याउलट प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला हिच्या सौंदर्य व अभिनयाचा फायदा घेत तिच्या वडिलांनी तिच्या लहान वयातच चित्रपटक्षेत्रात तिचा प्रवेश करवून अमाप पैसा मिळवला.

‛आनंद यादव’ यांना वडिलांच्या जाचामुळे अनेकदा ‛शिक्षणापासून वंचित रहावे लागते की काय?’ अशी परिस्थिती निर्माण होत असे.

परवाच झी वहिनीच्या ‘लिटल चॅम्प’ या कार्यक्रमात एका मुलीने वडीलांविषयी अतिशय कृतज्ञतापूर्ण उद्गार काढले. त्यांच्या वैयक्तिक समस्येमुळे आईचा सहवास नसणाऱ्या या मुलींना वडील तितक्याच जबाबदारीने सांभाळत आहेत. आणि ही गोष्ट खरोखरच प्रशंसनीय आहे.

असे हे वडिलांचे वेगवेगळे रंग त्या एका घटनेने मनात उभे राहिले. काळ बदलला तसे हे नाते पण बदलत गेले. पूर्वी घराघरात वडिलांची प्रतिमा ‛कडक शिस्तीचे’ अशीच असे. वडीलांसमोर बोलण्याची मुलांची हिम्मत होत नसे.पण हळूहळू ही मानसिकता बदलली आणि नाते अधिक दृढ होऊ लागले. वडील केवळ वडिलांच्या भूमिकेत न राहता मित्रत्वाच्या नात्याने मुलांशी जोडले गेले. काहीवेळा मनात असूनही  प्रत्यक्ष भावना व्यक्त करण्यास मनुष्याला संकोच वाटतो. पण आता फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून  दोघेही आपल्या भावना  अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचवू लागले आहेत.

जग बदलले, घरे बदलली, माणसे बदलली. त्यामुळे नात्यांचे रंग बदलले.पण पिढ्यान् पिढ्या वडिलांची भूमिका तिच राहिली. काही अपवाद असतीलही; पण घरातील ‘आधारवड’ म्हणून वडील आजही ठाम उभे असलेले दिसतात. त्या बुलबुल बाबासारखा पिल्लांच्या पंखात बळ येईपर्यंत तो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो.पिल्ले आकाशाला गवसणी घालू लागली की मात्र अभिमानाने डोळे भरुन त्याची भरारी बघण्यात धन्यता मानतो. म्हणूनच तो “बापमाणूस”!

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments