शालिनी जोशी
चित्रकाव्य
सकाळच्या या वेळी...
शालिनी जोशी ☆
☆
सकाळच्या या वेळी
तीरीप दारी किरणांची
उंबऱ्याशी बसून आजी
दिसे वाट पाहे कोणाची
*
वेळ ही गडबडीची
परी आजी दिसे निवांत
चिंतेची रेषा उमटली
चेहऱ्यावरच्या सुरकुत्यात
*
घरात सारा शुकशुकाट
सारी मुलेबाळे पांगली
पोटासाठी दूर देशी
जाऊन असावी स्थिरावली
*
चौकट वाड्याची रंगीबेरंगी
साक्ष गत वैभवाची
गजबज होती मुलामाणसांची
आणि हालचाल पाहुण्यांची
*
वेळ पुरत नव्हता आजीला
शेती घर सांभाळताना
आता राहिली एकटी
घर तिला सोडवेना
*
भाकरीची चवड थापून
खरखरीत आजीचे हात
आता कोणासाठी रांधावे
प्रश्नाला उत्तर नव्हतं
*
सर्वच खेड्यांची ही व्यथा
करू आशा होईल दूर
येतील नवीन लघुउद्योग
खेड्यात शेती बरोबर
*
खेडीच होतील नंदनवन
नव वैभव होईल प्राप्त
आजीचे स्वप्न येईल सत्यात
जय किसान जय नवभारत…
☆
© शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






