श्री संभाजी बबन गायके
☆ “मी ‘मोल’करीण” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मी ‘मोल’ करीन!
कोणत्या कामाचं किती मोल करावं हे परिस्थिती ठरवते. मूल्य या संस्कृतातील शब्दाचं आजचं रूप म्हणजे मोल! यातून अमोल, अमूल्य, अनमोल, मौल्यवान इत्यादी शब्द आले असावेत.
आधुनिक जीवनपद्धतीत, विशेषत: नोकरी करणा-या महिलांना घरकामात मदत ही अपरिहार्यच ठरली आहे. आहे रे (haves) गटातील माणसांना यामुळेच नाही रे (have nots) गटातील माणसांना जवळ करावे लागते. आणि या दोन्ही गटांतील लोकांचे एकमेकांचे सहसंबंध कालपरत्वे बदलत जाताना दिसतात.
मोलकरीण हा शब्द आता मागे पडला असून कामवाली बाई आणि हल्ली नुसतंच बाई असं म्हटलं जातं. इंग्रजी माध्यमात शिकणारी तथाकथित उच्च मध्यमवर्गातील मुलं मराठी शाळेतली मुलं त्यांच्या शिक्षकांना बाई म्हणत असली की त्यांची टिंगल करतात! बाई हा अत्यंत सन्मानदर्शक शब्द असा भलत्याच अर्थाने रूढ होऊ पाहतो आहे. काही ठिकाणी ताई, मावशी हे शब्द वापरले जातात. पण मावशी हा शब्द आता रूग्णालयामध्ये सेवा करणा-या महिलांना आणि मामा हा शब्द तेथे काम करणा-या पुरूषांना चिकटवला गेला आहे!
अगदी फार पूर्वी केवळ अतिश्रीमंत कुटुंबांनाच घरकामासाठी माणसं नोकरीत ठेवणं परवडत असे. ती गरजही होती आणि प्रतिष्ठीतपणाचं एक लक्षणसुद्धा. राजेराजवाडे त्यांच्या मुलींना लग्नात भेट म्हणून काही दासीही तिच्यासोबत धाडून देत.
अर्थात अपवादात्मक परिस्थितीमध्येच, पण घरकामासाठी जाणा-या महिलांना संबंधित घरातील ज्येष्ठ महिला आणि काहीवेळा पुरुषांच्या विचित्र वागण्यास तोंड द्यावे लागते… असे ऐकले आहे.
संबंधित महिला काम करीत असताना तिच्या मागे कमरेवर हात ठेवून तिच्यावर पर्यवेक्षण करणे, अति सूचना करणे म्हणजे बारीक लक्ष ठेवणे हा एक प्रकार असतो. यामुळे काही घरांत कामवाल्या टिकत नाहीत, असा अनुभव आहे.
प्रत्येक घरातील स्वयंपाकाची पद्धत, भाषा निराळी असते. त्यामुळे दुस-या महिलेच्या हाताच्या पोळ्या, भाजी, घासलेली भांडी, धुतलेले कपडे, केलेली स्वच्छता आणि भाषा, लहेजा निश्चितपणे निराळा असणारच… पण यावर काही मालकिणी किंवा त्यांच्या घरातल्या ज्येष्ठ महिला कटाक्ष ठेवून असतात.
एक आजीबाई तर बाई भांडी घासून गेल्या की, ती भांडी पुन्हा एकदा विसळून घेत. सुनेने कामवाल्या ताईस अर्धा कप चहा दिला तर चहाचे महिन्याभराचे किती पैसे होतील? असा सवाल सासू विचारू शकते.
आपल्या घरात अन्न शिजवणा-या व्यक्तीची त्या अन्नावर वासना जाणे काही अगदीच अशक्य नाही. त्यामुळे त्यांना त्याचा एखादा भाग खायला देणे हे काही फार चुकीचे ठरत नाही.
या व्यवसायात असलेल्या महिलांची कर्मकहाणी अत्यंत वेगळीही असू शकते. दारुडा नवरा आणि मोलकरीण हे समीकरण तसे बरेच रूढ होते. आता अगदीच तसे नसले तरी संसाराला हातभार लागावा म्हणून चार घरची कामे करणा-या अत्यंत व्यावसायिक महिलाही आढळून येतात… आणि यात काहीही गैर नाही.
अन्नाची, पैशांची, दागिन्यांची, वस्तूंची चोरी करणे, सतत रजा घेणे, चहाड्या करणे, घरातील चर्चेत आपली मते मांडणे, पगार वाढवला जावा म्हणून अनेक खटपटी करणे, उसने पैसे घेणे, न सांगता काम सोडून निघून जाणे, एखाद्या महिलेला एखाद्या घरात काम धरू नको म्हणून धमकावणे इत्यादी अनेक तक्रारीही या महिलांच्याबाबतीत असतात, आणि त्यात तथ्ये आहेत. पूर्वीच्या काळी अत्यंत प्रामाणिक म्हणून ख्याती असलेल्या समाजघटकातील लोकही आता जबरी चोरी, खून करताना आढळत आहेत. पण बदलत्या सामाजिक, नैतिक परिस्थितीचा हा परिणाम आहे. पण म्हणून सर्वच महिलांवर असा शिक्का मारणे योग्य नाही. आपल्या घरात कामासाठी नेमल्या जाणा-या व्यक्तींची खातरजमा करून घेणे, ही आपलीच जबाबदारी ठरते.
प्राप्त परिस्थितीला सामोरे जात अनेक महिलांना हा व्यवसाय पत्करावा लागतो. यांपैकी अनेक महिलांनी जिद्दीने त्यांच्या मुलांना शिकवून मोठे केल्याचीही उदाहरणे भरपूर दिसतील. यासाठी मालकांचे सहकार्य मात्र लागतेच. आणि हे ओळखून मदत करणारी माणसं खरंच मोठ्या मनाची असतात. घरातील महिलांचे आणि घरकामासाठी येणा-या महिलांचे जीवाभावाचे नाते निर्माण झाल्याचेही दिसून येते. मोलकरणीच्या मुलींनी शिकावे यासाठी आग्रह धरणारी कुटुंबेही आहेतच, हे समाजाचे सुदैवच आहे! याच बरोबर मोलकरणीच्या लहान मुलींनी सुद्धा आपल्याकडेच मोलकरीण म्हणून कामाला यावे, असे वाटणारी माणसेही कमी नाहीत.
मोलकरीण मुलीच्या लग्नात कन्यादान करणारे सुशील लोकही असतात. वधू-वर सूचक मंडळ चालवणा-या एका व्यक्तीने त्यांच्या घरी घरकाम करणा-या एका परित्यक्त मुलीचे लग्न जुळवून दिल्याचेही समजले.
पण काही महिलांना अत्यंत दुर्दैवाने एखाद्या कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सदस्याकडून काही उपद्रव होण्याची शक्यता असते. काही महिला केवळ पोटासाठी हे प्रकार सहनही करतात. मोलकरीण आणि त्या घरातील पुरुष यांच्यातील विशिष्ट संबंध यांबाबत चित्रपटांतून विचित्र चित्रणही पहायला मिळते, पण हे ठीक नाही.
काही कुटुंबांत कित्येक वर्षांपासून सातत्याने सेवा करणा-या महिला आढळतात. त्यांच्या समोरच त्या घरांतील मुळे लहानाची मोठी झालेली असल्याने या महिलांचा या मुलांवर जीव असणे, त्यांनी त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून दटावणे असेही प्रकार आढळतात. एखाद्या कुटुंबात जर सुनेचा/सासूचा छळ होत असेल तर त्या घरातील पुरुषांना चार शब्द सुनावण्याचाही अधिकारी काही जुन्या मोलकरीण महिलांना असल्याचे पाहिले गेले आहे.
कोरोना काळात काही महिला मदतनीसांनी एकाकी वृद्ध दांपत्यांची जीवाचा धोका पत्करून सेवा केल्याचीही उदाहरणे आहेत.
काही वेळा तर जिथे काम करतात त्या कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा उत्तम आर्थिक परिस्थिती असलेल्या मोलकरणीही असतात… परिस्थिती सुधारली तरी काम करण्याची सवय असल्याने ब-याच महिला काम करीत राहतात… आणि ते पैसे मुलांच्या संसाराला लावत असतात.
‘विनापाश महिला’ हवी आहे अशी कधी कधी वर्तमानपत्रात जाहिरात बघायला मिळते. अशा महिला असू शकतात. काही कुटुंबे अशा महिलांना घरी ठेवून घेतात आणि त्यात त्यांनाही कुटुंबाचे प्रेम, आधार मिळू शकतो. मराठीत ‘मोलकरीण’ नावाचा चित्रपट खूप गाजला. अर्थात प्रत्यक्ष आयुष्यात असं झालेलं असण्याची शक्यता खूप कमी आहे. पण या चित्रपटात आईने मुलासाठी केलेला त्याग, त्या चित्रपटातील देव जरी मज कधी भेटला सारखी गाणी, सुलोचना यांचा अभिनय रसिकांच्या कायम लक्षात राहील, असा आहे.
आपण आपल्या आयुष्यात येणा-या, मग त्या मोलकरणी का असेनात भावनिक नाते जोडले पाहिजे, त्यामुळे आयुष्य सुकर होते, असे दीपा लागू एकदा एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या… आणि हे सांगताना त्या भावनावशही झाल्या होत्या. त्यावेळी उपस्थितांना तो विचार फारसा पटलेला दिसला नाही. परंतू मग त्यांनी अशी काही उदाहरणे सांगितली. मुले परदेशी असणारे आजारी लोक, घरात कुणाला असाध्य विकार असणारी कुटुंबे यांना कामवाल्या मावशींचा, आज्जींचा मोठा आधार मिळाल्याचेही दिसून येते.
मराठी दूरचित्रवाहिनीवरील एका विनोदप्रधान कार्यक्रमात एक अविवाहित पुरुष आणि त्याच्या घरात मोलकरीण म्हणून काम करणा-या महिलेचे भावबंध अत्यंत वेगळ्या पातळीवरचे दाखवण्यात येतात! तो संघर्षरत, मध्यमवयीन कलाकार माणूस आहे. ती गरजू, अल्पशिक्षित महिला आहे. ती त्याच्या घरात ते घर जणू तिच्याच मालकीचे आहे, अशा आविर्भावात वावरते. प्रसंगी मालकाला खडसावते, त्याची टिंगल करते. अर्थात विनोदी कार्यक्रम असल्याने लेखकास हे स्वातंत्र्य घेता आलेले आहे, हेही खरेच.
दूरचित्रवाणी वाहिनीवर नुकत्याच प्रसारित झालेल्या या कार्यक्रमातील एका skit मध्ये मालक आणि मोलकरीण यांच्यातील अत्यंत तरल अशा नात्याचे सादरीकरण पहायला मिळाले. कसलेले अभिनेते समीर चौगुले आणि नम्रता संभेराव यांनी या नात्यातील काही पैलू अत्यंत भावनिक प्रसंगांतून उलगडून दाखवताना कमाल केली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांत हसता हसता आसवेही तरळून गेली. शेवटी माणूसच माणसाला जीव लावू शकतो. ही मोलकरीण मालकाचे लग्न जुळावे म्हणून हक्काने प्रयत्न करते, मालक वेळेवर जेवावेत म्हणून त्यांना रागे भरते, त्याला राखीही बांधते आणि भाऊबीजेची हक्काची ओवाळणीही वसूल करते. त्याची आणि तिची भाषा निराळी आहे… पण मानवी नात्यातील मृदपणा सारखाच आहे! शेवटी आपण कुणाकडे कोणत्या नजरेने पाहतो, यालाही महत्त्व आहेच की!
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच… आपल्या अनुभवाला आलेली बाजू कायमची तशीच असेल असं गृहीत धरून चालणे ठीक नाही. गरज सर्वांनाच पडू शकते!
आपल्याला आपल्या सभोवताली असलेल्या लोकांचे मोल मात्र करता आले पाहिजे… मी (योग्य ते) मोल करीन… असं प्रत्येकाने ठरवले की माणसांचे मूल्य वाढू लागेल, असं निश्चित वाटतं!
संसाराचा गाडा ओढण्यासाठी कष्ट करीत असणा-या तमाम प्रामाणिक, सालस बाई, ताई, मावशी, आज्जी यांना नमस्कार. त्यांच्या परिस्थितीमध्ये लवकरच सुधारणा होवो, आणि त्यांना ही कामे करावी लागू नयेत, अशी शुभेच्छा!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




