📖 वाचताना वेचलेले 📖
☆ महापूजा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. उषा नाईक ☆
☆
‘मी’ ‘माझे’ ‘माझ्यामुळे’ हे शब्द अहंकारामुळे बंधनात टाकतात.
आपल्याकडून सारे करवून घेतो तो दयाळू परमात्मा.त्याने जन्मस्थ सारे नीटनेटके अवयव दिले नसते तर आपण काय करू शकणार होतो ?
*मी सुंदर चित्र काढले, कारण मला डोळे आणि हातांची साथ मिळाली. ती देणगी भगवंतानी दिली.
*मी रोज सुखाने जगतोय, कारण प्रभूने प्राणवायू निर्माण केला आहे.
*मी बोलून संवाद करीत आहे, कारण मला जीभ आणि स्वरयंत्राची देणगी दिली आहे.
*मी सर्वत्र भ्रमण करतो, कारण मला चालायला पाय दिले आहेत.
*मला सारे आठवते, कारण मला स्मरणशक्ती दिली आहे
*बालपणी माझी उदरभरणाची सोय झाली, कारण मातेच्या स्तनात देवाने दुग्धनिर्मिती करून ठेवली.
*मला सुमधुर संगीताचा आनंद घेता येतो,व्यवहार करता येतो, कारण मला जन्मस्थ श्रवणशक्ती दिली आहे.
*मी अन्नपाणी गिळू शकतो, कारण माझ्या श्वासनलिकेवर एक पडदा येऊन ते अन्नपाणी परस्पर अन्ननलिकेत पोहोचते.
*जन्मापूर्वीच शरीरात सा-या सुविधा ठेवून गर्भाशयातून माझी सुखरूप सुटका ‘त्या’ ने केली आहे.
मग माझे कर्तृत्व काय आहे ? मी उगाच का मिरवत बसावे ? कर्ता करविता ‘तो ‘ आहे ही जाणीव नित्य ठेवणे हीच महापूजा आपण करावी.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. उषा नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



