श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सहस्त्रबुद्धे आजोबांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा माझ्या मनात झिरपणारं समाधान मला दिलासा देत होतं. त्यामुळे यापुढं जे घडेल ते ‘तो’ म्हणेल तसं’! तिकडे सहस्त्रबुद्धे आजोबाही असाच विचार करत असतील याची मला खात्री होती.

तरीही त्याची प्रचिती दुसऱ्या दिवशीच मला येणार आहे याची मात्र कल्पना नव्हती! )

प्रत्यक्षात पुढं जे घडत गेलं ते अगदी सहज चढावं वाटलं तरीही ते ‘तो’च घडवत असावा तसं कसोटी पहाणारंच होतं. पुढच्याच क्षणी कडेलोटही झाला असता अशीही वळणं आली. क्षणकाळ जीव घुसमटलाही. पण तो अंधार नवी प्रेरणा देऊन पुढची वाट दाखवत राहिला होता! इतक्या वर्षांनंतर आज सगळं आठवतानाही तो एखादा चमत्कार असावा तसंच वाटत रहातं!

मागे वळून पहाताना आजही मला जाणवतं कीं त्यादिवशी सहस्त्रबुद्धे आजोबांच्या घरातून बाहेर पडताना निर्णायक असं काही हाती लागलेलं नसतानाही मन मात्र पूर्वीसारखं अस्वस्थ नव्हतं. शांत होतं. जे होईल ते सर्वांच्याच हिताचं असेल हा विश्वास हळूहळू मनात झिरपत दृढ होत गेला होता. आणि मग आधी प्रत्येकक्षणी ‘पुढं काय होणार?.. ‘ याबद्दल असणाऱ्या अनिश्चिततेची जागा आता उत्सुकतेने घेतली होती. जे होईल ते चांगलंच असणाराय. आपण फक्त निमित्त आहोत हीच भावना मनात होती.

आता यापुढं जे करायचं ते आपल्या बाजूने कुणालाही झुकतं माप देणारं नसेल आणि ते कुणाच्याही चुकीचं समर्थन करणारंही नसेल हे माझ्यापुरतं मी त्याच क्षणी ठरवूनच टाकलं. आता आपण घ्यायचा निर्णय कुणावरही अन्याय न करणारा जसा तसाच सर्वांना योग्य न्याय देणाराही असायला हवा असं मनापासून वाटत राहिलं. पण ही परस्परविरोधी दोन टोकं जुळवून समतोल साधायचा कसा ते मात्र त्याक्षणापर्यंत स्वच्छ दिसत मात्र नव्हतं.

त्या सकाळी सहस्त्रबुद्धे आजोबांकडून बाहेर पडल्या क्षणापासून ऑफिसमधे पोहोचेपर्यंतच्या अर्ध्या एक तासात याच संदर्भातले असेच सगळे विचारतरंग मनात उमटत राहिले होते. त्याच वेळी तिकडे वखरेसाहेबांच्या मनात मात्र वेगळीच घालमेल सुरू होती. ते माझीच वाट पहात होते!

तो गुरुवार होता. शनिवारीच त्यांना सोमवारच्या मुंबईत होणाऱ्या एम्. डी. मीटिंगसाठी रिलिव्ह व्हायचं होतं. मधे फक्त उद्याचा शुक्रवारचा एकच दिवस. जे व्हायचं ते जास्तीत जास्त उशीर म्हणजे उद्या सकाळीच पूर्ण होणं आवश्यक होतं. मिटींगला जाण्यापूर्वी तयारी करायच्या इतर असंख्य विषयांच्या बाबतीतल्या कामांच्या नियोजनाच्या व्यस्ततेतही प्रदीर्घ काळ प्रलंबित राहून आता ऐरणीवर आलेल्या या तक्रारीचा विषय वखरेसाहेबांना खूप अस्वस्थ करत होता. मीटिंगच्या संदर्भातल्या इतर अनेक अत्यावश्यक विषयांकडे दुर्लक्ष करून याचाच विचार करत बसणं त्यांना शक्यही नव्हतं आणि त्याच्याकडं दुर्लक्ष करणंही पुढं अधिकच अडचणीचं ठरू शकणार होतं. अशा विचित्र कात्रीत ते सापडलेले होते. कारण मुंबईतल्या मीटिंगमधे काय घडू शकेल याची चुणूक नुकत्याच झालेल्या एम्. डी. व्हिजिटमधे आम्ही सर्वांनीच अनुभवलेली होती. पण प्रत्यक्षात सर्वात जास्त झळ लागली होती ती वखरेसाहेबांनाच! त्याचे चटके अजूनही त्यांना जाणवत असायचे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये हीच माझी धडपड होती, पण त्या दृष्टीने सुरू असलेल्या माझ्या अथक प्रयत्नांना अद्याप यश मात्र मिळत नव्हतं.

“काय झालं? काय म्हणाले सहस्त्रबुद्धे?”

मी त्यांच्या केबिनमधे पाऊल टाकताच वखरेसाहेबांनी उत्सुकतेने विचारलं. त्यांना अपेक्षित असणारं उत्तर अर्थातच माझ्याजवळ नव्हतं. त्याक्षणी ‘आता प्रभूदेसाई आणि सहस्त्रबुद्धे आजोबा या दोघांपुरताच हा विषय मर्यादित नाहीय. त्या दोघांपेक्षाही तो आज वखरेसाहेबांसाठीच अधिक महत्वाचा आहे’ हे मला तीव्रतेने जाणवलं.

“सर, मी आज त्यांना नेमक्या परिस्थितीची कल्पना दिलीय. त्यांना ते पटलंय असं वाटतंय तरी. आज आपण त्यांच्या तक्रारीबद्दल नियमांच्या चौकटीत राहून काय करायचं ते ठरवून टाकूया. आता त्यात दिरंगाई नको. मी त्याबद्दलची एक नोट तयार करून तासाभरातच तुम्हाला ब्रिफ करतो. “

“पण त्यामुळे त्यांचं समाधान होऊन ते तक्रार मागं घेतील याची खात्री आहे कां?”

“त्यांचं समाधान होणं हेच महत्त्वाचं आहे. ते कसं करायचं याचा विचार करूनच मी माझी नोट बनवतो. आजचा पूर्ण दिवस आपल्या हातात आहे. सगळं व्यवस्थित होईल. मी ब्रिफिंग घेऊन येतोच. ”

मी त्यांना दिलासा मिळावा म्हणून बोललो खरा पण प्रत्यक्षात माझ्यापुरतं अजूनही सगळं अधांतरीच होतं!

मी माझ्या केबिनमधे आलो. टेबलवर आजच्या इन्वर्ड मेल मधील पत्रांचा ढीग माझीच वाट पहात होता. पण आत्ता या क्षणी दुसऱ्या कुठल्याही कामांचे विचार मला नको होते. समोरचा तो पत्रांचा गठ्ठा मी शांतपणे बाजूला सरकवून ठेवला आणि ड्रॉवरमधली माझी डायरी बाहेर काढली.

नोट तयार करण्याच्या दृष्टीने लाईन ऑफ ॲक्शन ठरवायची म्हणजे त्या तक्रारीची दखल घेऊन प्रभूदेसाईंच्या विरुद्ध काय ॲक्शन घ्यायची हे ठरवायला हवं. सहस्त्रबुद्धे आजोबांनी सांगितलेलं कितीही खरं असलं तरी समोर कुठलाही सबळ पुरावा नसताना त्यांना शिक्षा करणं समर्थनीय कसं ठरणार? प्रश्न निरूत्तर करणाराच होता. मग समर्थनीय ठरेल असं काय करता येईल? स्वत:लाच विचारावं तसा मनात उभारलेला हाच प्रश्न मला नेमकी दिशा दाखवणारा ठरला. आता उद्या जे होईल ते होईल. निदान आज तरी याच गोष्टीचा विचार करत असंच अधांतरी तरंगत राहून इतर कामांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही असं वाटलं. या समोरच्या पत्रांच्या ढिगात कांही महत्त्वाची पत्रं असतील तर? क्षणाचाही विचार न करता मी तो पत्रांचा गठ्ठा पुढे ओढला. एकेक पत्रावरून नजर फिरवून ते बाजूला ठेवत गेलो. त्याच पत्रांमधे सेंट्रल ऑफिसकडून आलेल्या एका पत्राने माझं लक्ष वेधून घेतलं. आत्ता या क्षणी सहस्त्रबुद्धेंच्या तक्रारीच्या संदर्भात ताबडतोब करण्यासारखी एकच गोष्ट आहे हे ते पत्र मला बजावून सांगतंय असं वाटलं आणि दुसऱ्याच क्षणी ते पत्र घेऊन मी तातडीने वखरेसाहेबांच्या केबिनकडे धाव घेतली. त्या एका पत्राने मनातल्या विचारांना आणि पुढे घडणाऱ्या घटनांनाही वेगळं वळण देत मला निर्णयप्रक्रियेच्या नेमक्या रस्त्यावर आणून सोडलं होतं! मी ब्रिफिंग बनवण्यात वेळ घालवून ते इन्व्हर्ड मेल पाहिलंच नसतं तर? अगदी वरवर साधा वाटणारा घटनाक्रमसुद्धा ‘तुला मी दिलेल्या अंत:प्रेरणेवरच असा अवलंबून असतो’ हे जणू ‘तो’ मला समजावत होता!

मी वखरेसाहेबांच्या केबिनचं दार ढकलून आत जाताच त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं.

“अरे वा,.. नोट तयारही झाली एवढ्यांत? ग्रेsट.. ! शो मी… ” त्यांनी उत्सुकतेने हात पुढे केला.

“सर, त्या आधी सेंट्रल ऑफिसकडून हे पत्र आलंय त्याला तातडीने उत्तर द्यायला हवं. त्या तक्रारीच्या बाबतीत काय करायचं याचा नंतर शांतपणे विचार करता येईल. “

“शांतपणाने विचार करायला नंतर वेळ आहेच कुठं… ?”

“हे पत्र त्या तक्रारीच्या संदर्भातलंच आहे सर. आणि त्यावर ‘Most urgent’ असा रिमार्कही आहे. आधी याला तातडीने उत्तर देणं आवश्यक आहे सर. शक्यतो फॅक्सनेच. तरच ते आजच्या आज एम्. डी. ऑफिसला मिळू शकेल. आणि मग त्याच बेसिसवर फायनल रिपोर्टिंग एम्. डींसमोर ठेवलं जाईल. ही केस तुम्ही मिटींगला निघण्यापूर्वी क्लोज होईल या दृष्टीने विचार करायला आजचा संपूर्ण दिवस आपल्या हातात आहे सर. उद्या सकाळी मी नेहमीसारखं सहस्रबुद्धेंच्या घरी जाणार आहेच. आपण काय करणार आहोत याबरोबरच त्यांनी काय करायला हवं हे मी उद्या त्यांना समजून सांगेन. सगळं व्यवस्थित होईल सर. खात्री आहे माझी. ” त्याक्षणी जे मनात आलं ते मी मोकळेपणानं बोलून टाकलं. माझ्याही नकळत ‘सगळं व्यवस्थित होईल’ हा शब्द दिला त्यांना देऊन बसलो. पण ते व्यवस्थित म्हणजे नेमकं काय हे मला स्वतःला तरी कुठं माहित होतं?

माझं बोलणं ऐकूनही त्यांचं समाधान झालेलं नव्हतं. त्यांनी नाईलाजाने मी दिलेल्या पत्रावरून आपली नजर फिरवली. बघता बघता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले.

ते पत्र म्हणजे या तक्रारीच्या प्रकरणात आम्ही झोनल आॅफीसच्या पातळीवर तातडीने काय केलंय आणि त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे याबद्दलचा सविस्तर अहवाल एम्. डी. मीटिंगच्या पार्श्वभूमीवर आमच्याकडून मागवण्यात आलेला होता. पत्र आजच मिळालं होतं आणि त्याची पूर्तता आम्हाला तातडीने म्हणजे आजच्या आजच करणं आवश्यक होतं.

“येस्स्.. यू आर राईट. तरीही मी मिटींगला निघण्यापूर्वी सहस्त्रबुद्धेनी ही तक्रार मागे घेतली तरच मिटींगचं टेन्शन नाहीसं होईल. अदरवाईज… “

“आॅफकोर्स सर. तेही होईल. नक्की होईल.. ” मी आश्वासन दिलं.

पुढं ड्राफ्ट फायनल करून फॅक्स करण्यात दोन तास कसे उलटून गेले समजलंच नाही.

‘सदरच्या तक्रारीचं नेमकं कारण तक्रारदाराला समक्ष भेटून, चर्चा करून आम्ही समजून घेतले. केवळ कम्युनिकेशन गॅपमुळे निर्माण झालेल्या गैरसमजातून त्यांनी ही तक्रार केली गेल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तक्रारदाराशी होणाऱ्या प्रत्यक्ष भेटी आणि चर्चांदरम्यान त्याच्याकडून मिळालेला प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे. लवकरच ते तक्रार मागे घेतील असा विश्वास वाटतो’ अशा आशयाचा तो फॅक्स पाठवला तेव्हाच थोडं रिलॅक्स वाटलं. प्रश्न सुटला नसला तरी त्याची बोच तात्पुरती तरी थोडी कमी झाली होती. तरीही वखरेसाहेब पूर्णत: स्वस्थ नव्हतेच. कारण हा अर्धविराम होता. ते मिटींगला निघण्यापूर्वी या प्रकरणाला पूर्णविराम मिळणंच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. आणि… अर्थातच माझ्यासाठीही!

दिवसभराची सगळी कामं मार्गी लावून खूप थकल्यानंतर संध्याकाळी उशिरा मी वखरेसाहेबांच्या केबिनमधे गेलो ते उद्या सकाळी सहस्त्रबुद्धेंना भेटायला जाईन तेव्हा त्यांना काय सांगायचं हे ठरवूनच. पण मी जे ठरवलंय ते वखरेसाहेबांना योग्य वाटेल? कारण ते अंमलात आणणं म्हणजे थोडीतरी झळ प्रभूदेसाईना लागणं अपरिहार्यच होतं. ते वखरेसाहेबांना योग्य वाटलं नाही तर… ?

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted