श्री मोहन निमोणकर
वाचताना वेचलेले
☆ “वृद्धत्व एकटेपणा आणि निर्णय…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
★★★
वृद्धाश्रम चालवणारा माझा एक मित्र सांगत होता, त्यांच्या वृद्धाश्रमात ९७ वर्षांच्या एक बाई आहेत. त्या़ंचा एकुलता एक मुलगा आणि सून दोघेही निवर्तले आहेत. एकुलता एक नातू त्याच्या कुटुंबासह इंग्लंडमध्ये रहातोय. जेव्हा या बाईंच्या शेवटच्या घटका येतील तेव्हा त्यांच्या उपचारांच्या बाबतीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या वृद्धाश्रम चालवणाऱ्यांना देण्यात यावे आणि त्या निर्णयाला नंतर कोणी आव्हान देऊ नये, अशी कायदेशीर तरतूद करणारे कागदपत्र तयार करण्यासाठी, त्याला त्यांनी आत्ता बोलावून घेतले आहे. तो सांगत होता, त्या कागदपत्रात नक्की काय लिहायचे, हे कोणालाच धड सांगता येत नाही. याविषयी काही विचारच केला गेलेला नाही.
आमचे शेजारी आहेत त्यांची मामी गेला महिनाभर हाॅस्पिटलमध्ये आहे. शेजाऱ्यांचे मामा मनमोहन सिंग रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर असताना त्यांचे P. A. नंतर The Times of India मध्ये editor finance वगैरे पदे भुषवलेले. मामी M. A. (English) Gold Medalist. अत्यंत सधन आणि मुलंबाळं नाहीत. मामा काही वर्षांपूर्वी अचानक गेले. आता मामी वय ८७+ शेवटच्या घटका मोजत आहे. ते सांगत होते, मामीला पैशाची काय विल्हेवाट लावली आहेस, असं विचारण्याचा आम्हाला धीर होत नसे. तिला वाटेल, आम्हाला काही इंटरेस्ट आहे. कदाचित तसंच तिच्या माहेरच्या लोकांना पण वाटत असेल. आता मामी सहीसुद्धा करू शकत नाही. कुठे काय इन्व्हेस्टमेंटस आहेत, बॅंक अकाऊंटस… कोणाला माहीत नाही. हे दोघे सत्तरीतले भाचे सगळी धावपळ आणि उपचारांचे पैसे खर्च करत आहेत.
त्या बाईच्या सोसायटीत कळलं तेव्हा शेजारचे लोक आले. त्यांना वेगळाच प्राॅब्लेम आहे. सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. या बाईने तिच्या फ्लॅटचं नाॅमिनेशन गेली तीस वर्षे अमेरिकेत स्थायिक झालेल्या भाचीच्या नावाने केलं आहे. भाची म्हणते, मला त्यात काही इंटरेस्ट नाही.
हे सगळं चित्र किती भयानक आहे!
आत्ता आपल्या पिढीत मुलं परदेशी असणाऱ्यांना अशा समस्या आहेत. पण पुढच्या पिढीत माझ्या माहितीत देशात, परदेशी एकेकटी रहाणारी, लग्नाचं वय उलटून गेलेली असंख्य मुलंमुली, अत्यंत उच्चशिक्षित आणि मुलं होऊ न दिलेली जोडपी दिसायला लागली.
हा केवढा भयानक प्रश्न पुढच्या काळात उपस्थित होणार आहे!
मध्यंतरी माझ्या नवऱ्याला काही शेअर्स डिमॅट करायचे राहून गेले होते. त्या कामासाठी फंड मॅनेजरच्या ऑफिसमध्ये जावं लागलं असताना तिथल्या माणसाने सांगितलं होतं, की हजारो कोटींचे शेअर्स पडून आहेत. काही वर्षांनी ते मूळ कंपनीच्या मालकीचे होतात, पण खूप व्याप करावा लागतो. पण ही गोष्ट नुसती पैशाची झाली. जिथे माणूस मृत्यूशय्येवर आहे आणि त्याच्या वतीने त्याच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी कोणीच नाही, त्या माणसाचं काय करायचं हा केवढा मोठा प्रश्न नजिकच्या भविष्यात निर्माण होणार आहे!
★★★
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




