सुश्री अर्चना दादासाहेब मुळे
मनमंजुषेतून
☆ शुभं करोती की मालिका…? ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆
शुभं करोती कल्याणं
आरोग्यम धनसंपदा..
हातपाय धुऊन देवासमोर दिवा लावण्याची, शुभंकरोती म्हणण्याची संध्याकाळची वेळ आजकाल कुणी पाळत नाही. कारण यावेळी घराघरातील ‘इडियट बाॅक्स’ रंगीबेरंगी प्रकाशाच्या दिव्यानी भिंती उजळवून टाकतो. त्यातील भावना प्रेक्षकांच्या हृदयात घर करतात. नायकांबरोबर रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जवळीक निर्माण करतात. एखाद्या करमणूकप्रधान मालिकेतील कलाकार हसतात तेव्हा प्रेक्षकही हसतात. मालिकेत नायिका रडते तेव्हा प्रेक्षक भगिनींचा पदर, रूमाल डोळ्याला लागतो. खलनायिका कट कारस्थान करते तेव्हा प्रेक्षक रागाचं टोक गाठतात. मध्यमवर्गीय कौटुंबिक कथानक भाव खातं. तर भक्तीचं कथानक भक्त तयार करतं. संतांच्या मालिका सुरू झाल्या की भक्तगणात पूर्वीच्या तुलनेत नक्कीच वाढ झाली. त्याचबरोबर ऐतिहासिक मालिका प्रचंड लोकप्रिय होतात. याचं कारण भारतात दूरदर्शन पाहणार्यांची संख्या खूपच जास्त आहे. इथं दूरदर्शन हे मनोरंजनाचं सर्वात मोठं माध्यम आहे. भारतातील प्रेक्षकांच्या भावनांचा ‘रिमोट कंट्रोल’ मालिकातील पात्रांच्या हातात आहे. पात्रांच्या उद्याच्या स्वप्नाबरोबर आपलं स्वप्न रंगवणं हे भारतीय प्रेक्षकांकडून सवयीने घडतं. प्रेक्षकांचा स्वभाव घडण्यात मालिकांचा प्रचंड मोठा हात आहे.
‘रामायण’ ‘महाभारत’ ‘मालिका यायच्या तेव्हा प्रेक्षक दूरदर्शन संचाला हळदी कुंकू लावायचे. रामाचा प्रवेश झाला तर औक्षण करायचे. तेव्हा लोक घराबाहेर पडत नसत. भक्ती उफाळून यायची. रावण आणि कौरवांचा राग मनामनात रूजला गेला.
काही वर्षांपूर्वी सासू सुनेवर आधारीत एक मालिका सुरू होती, तेव्हा मालिका सुरू असताना नवरा घरी आला तर त्याने त्याला हवं ते आपापलं घ्यायचं. त्यावेळी चहा, पाणी असं काहीही मागायचं नाही. असा कित्येक घरातला नियम होता.
अलिकडच्या काही मालिकांमधील घरात ज्याचं चुकतं त्याला शिक्षा करण्याचा नियम असतो. प्रत्यक्षात एका सुनेने कामात असल्याने सासर्यांचा फोन उचलला नाही तर त्यानी दहा दिवस तिचा फोन काढून घेतला.
अशा गंमतीजमती आजूबाजूला घडतात तेव्हा प्रेक्षकांची मानसिकता बदलली की बिघडली असे प्रश्न पडतात. मोबाईलवर मालिका पाहणार्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. सतत हा आरशासारखा दिसणारा दूरदर्शन, त्याचंचं प्रतिबिंब प्रेक्षकांच्या मनावर पडावं याची पुरेपूर काळजी घेतो. मग प्रेक्षकांची मानसिकता बिघडली तर…?
पात्रांची चिंता – मालिकेतील पात्राचा अपघात झाला. पात्र बदलण्याची वेळ आली, आर्थिक अडचणी आल्या तर प्रेक्षकांची चिंता वाढते. त्याचं आता काय होणार या विचाराने ते चिंताग्रस्त होतात.
मानसिक शक्तीचा र्हास – स्वत:च्या वास्तव दैनंदिन जीवनाकडे दुर्लक्ष होतं. मालिका बघून दैनंदिन जीवनातील कडवट आठवणीना विसरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं वास्तवापासून दूर पळण्याची सवय लागते. खर्या आयुष्यातील समस्या हाताळण्याचं कौशल्य विकसित होत नाही. मानसिक शक्तीचा र्हास होतो.
भावनांचा उद्रेक – मालिकातील आरडा ओरडा, सतत रडणं, सततची षडयंत्र बघून विनाकारण भावना तीव्र होतात. विशेषकरून याचा ज्येष्ठ नागरिकांवर परिणाम होतो. तसेच मालिकांमधे दिसणारी घरं, कपडे, उदयोग, करोडो रूपयांमधील व्यवहार सगळं ऐकून समाधानाची भावना निर्माण होत नाही. ईच्छा अतृप्त राहायला लागतात. कारण मालिकांमधील सर्व भौतिक सुखांबरोबर प्रेक्षक तुलना करायला लागतात. नात्यातलं प्रेम कळेनासं होतं. धारणांचं निश्चयीकरण व्हायला लागतं. सासू अशीच असते. सून तशीच असते. अशा धारणा तयार होतात.
मालिका म्हणजे बाजारपेठ – मालिका प्रेक्षकाना गुंतवून ठेवतात. मधेमधे येणार्या जाहिराती प्रेक्षकांच्या मनात घर करतात. जाहिरातीत असणारी नायिका मुलाना भरपूर प्रोटीन मिळावं, त्याचे कपडे पांढरे शुभ्र असावेत म्हणून काळजी घेते. पाळण्यातल्या बाळापासून आजोबांपर्यंत सगळ्यांचा मोह वाढतो. बाजारातून आपसूक त्या वस्तू घरोघरी येतात. मालिका या जणू बाजारपेठेचं एक साधन होय. खरतर मालिकांमधून एखादी कथा जितकी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेते. तितकीच ती प्रेक्षकांची तार्किक विचार करण्याची क्षमता नष्ट करते. मालिका पाहण्यात महिलांचा वेळ वाया जातो असं प्रत्येकीला वाटतं पण तरीही मालिका पाहणं कुणी बंद करत नाही. म्हणून मालिका आपल्या खिशावर राज्य करते. देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकते. आपण काय पाहतो त्यापेक्षा कंपन्याना काय विकायचं आहे हे मालिकांची बाजारपेठ ठरवते.
टी आर पी – मालिकांमधे सगळ्याच भावनांचं अतिभयंकरीकरण केलेलं दिसतं. एक नायिका असते. एक खलनायिका असते. एक अति सुसंस्कृत, तर दुसरी टोकाची वाईट असते. एकटीचे निर्णय कधीच चुकत नाहीत. ती नेहमी अति सहनशील असते. दुसरी सतत कट कारस्थानच करत असते.
उदा: ठरलं तर मग मधील सायली आणि प्रिया. आपल्या आजुबाजुला सायली इतकं सहनशील, विचारी, कार्यतत्पर, कधीही न चुकणारी अशी सून आणि प्रिया इतकं टोकाचं कट कारस्थान करणारी अशी सून कुठल्याच घरात नसते. पण अशा सुना, त्यात सासू अशी जिला एक सून प्रचंड आवडती असते. दुसरी प्रचंड नावडती असते. असं वास्तवात नसतं. पण घराघरात तसंच दिसायला हवं असतं. म्हणून मालिकांचा टी आर पी वाढतो.
उपाययोजना –
मालिकांची निवड – स्क्रीनच्या मालिकांच्या ढिगार्यातून आपल्या आवडीची, सोयीची एखादी मालिका निवडायला हवी. सगळ्या मालिका बघायलाच हव्यात का याचा सारासार विचार करायला हवा. त्यामुळे वेळ वाचेल. चुकीची मानसिकता, भावनिक गोंधळ, विचारांचा ओव्हर लोड कमी करता येईल.
उत्तम समीक्षक व्हा – मालिकांतील पात्रांचा अभ्यास करता येतो. मालिका समीक्षकाच्या भुमिकेतून बघता आली पाहिजे. तार्किक विचार जागृत ठेवले पाहिजेत. भावनांच्या आहारी जाणं थांबवता आलं पाहीजे.
नो टी. व्ही डे – आठवड्यातून किमान एक दिवस टी व्ही न बघण्याचा निर्णय घ्यावा. त्या दिवशी इतर छंदाना वेळ द्यावा. नैसर्गिक डोपामाईन वाढीवर लक्ष द्यायला हवं.
चांगली वाईट मालिका – मालिका बघताना त्यातून चांगलं काय घेता येईल याचा विचार करावा. त्यातील पात्रांवर चर्चा करावी. पात्र वाईट असेल तर ते का वाईट आहे. अशा विचारांची मुलांबरोबर देवाणघेवाण व्हावी.
काय टाळायचं – रडक्या मालिका बघणं बंद करावं. एकटं बसून मालिका बघू नये. झोपण्यापूर्वी थ्रिलर मालिका बघू नये.
च्युईंगम जसं चव संपली तरी चघळली जाते अगदी तसंच मालिका ‘मानसिक च्युईंगम’ सारख्या चिवट होईपर्यंत चघळल्या जातात. शेवटपर्यंत चिकटून राहतात. रबरासारख्या ताणतात. तशी प्रेक्षकांची नाती पण ताणली जातात. नात्यातील कडवटपणा चिघळला जातो. त्यामुळं मानसिक वेळ खर्ची पडतो. वेळ कधीच उलट चक्र फिरवत नाही. वेळ, विचार याना मालिकांच्या ताब्यातून या स्वत:च्या हातात घ्यायला हवं. तरच मन खर्या दिव्यातील प्रकाशात तेजोमय, भक्तीमय होईल हेच खरं..!!!
२०२४ – २५ मधील विविध मीडिया रिपोर्ट्स नुसार…
॰ भारतात सुमारे ९० कोटी लोक टी व्ही पाहतात.
॰ भारतात जवळपास २३ कोटी कुटुंबाकडे टी. व्ही आहे.
॰ भारतात ‘स्मार्ट टी व्ही आणि इंटरनेट’ असं जोडून पाहणार्यांच्या संख्येत ८५% वाढ झाली आहे.
॰ भारतातील ग्रामीण भागात सध्या प्रेक्षकांची संख्या ४८ दशलक्ष कुटुंबाच्या पार गेली आहे.
॰ भारतातील ६०% पेक्षा जास्त मालिका या नकारात्मक भावनांवर आधारीत असतात.
॰ भारतात पुरुषांच्या तुलनेत मालिका बघण्याचं महिलांचं प्रमाण साधारणपणे ७० ते ७५ % जास्त आहे.
॰ महाराष्ट्रात मराठी मालिका पाहणार्यांचे प्रमाण ९०% आहे.
॰ एक सामान्य भारतीय कुटुंब दिवसाला सुमारे ३. ५ तास टी व्ही पाहतं.
॰ विशेषत: जवळजवळ ७५ % महिला प्रेक्षक दुपारी १ ते ५ या वेळेत टी. व्ही पाहतात.
© सुश्री अर्चना मुळे
समुपदेशन तज्ज्ञ, सांगली
संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415
फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




