श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७ आणि ८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ७ – –

मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे |

मना बोलणे नीच सोशीत जावे |

स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |

मना सर्व लोकांसि रे निववावे |७ |

अर्थ : हे मना तू धीराचा अंगीकार कर म्हणजेच तुझ्या ठायी धैर्य असू दे. लोकांनी निंदा किंवा टीका केली तरी ती सहन कर. बोलताना नेहमी नम्रतेनेच बोल आणि आपल्या बोलण्याने आणि वागण्याने लोक संतुष्ट होतील असे वाग.

या श्लोकात समर्थांनी मनाला फार सुंदर उपदेश केला आहे. तो लक्षात घेण्याआधी मागील श्लोकाचा संदर्भ घेऊया. मागील श्लोकात समर्थ म्हणतात,” साधकाने काम क्रोध मोह इत्यादी विकारांपासून दूर राहिले पाहिजे.” अर्थात हे दूर राहणे सोपे नाही. त्यासाठी काय करायला हवे ते समर्थ या श्लोकात आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, “आपण धैर्याचा अंगीकार करायला हवा. जीवनामध्ये अनेक संकटे येतात, मोहाचे प्रसंग येतात, आपली परीक्षा पाहणारे प्रसंग येतात. या सगळ्या प्रसंगामध्ये आपले मानसिक धैर्य टिकवून ठेवणे आवश्यक असते. ही एक प्रकारची साधना आहे जी सरावाने जमू शकते.

ज्याला प्रवाहविरुद्ध पोहायचे आहे आणि काही विशेष कर्तृत्व करून दाखवायचे आहे, त्याच्या अंगी धैर्य तर हवेच ! छत्रपती शिवाजी महाराजांना लढाईमध्ये काही वेळा माघारही घ्यावी लागली. प्रत्यक्ष श्रीकृष्णाला देखील रणांगणातून पळ काढावा लागला. स्वामी विवेकानंदांना देखील अनेक समस्यांचा, टीकेचा, नींदेचा सामना करावा लागला. परंतु या सगळ्या महापुरुषांनी कठीण परिस्थितीतही आपले धैर्य टिकवून ठेवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांना तर केवढी लोकनिंदा सहन करावी लागली परंतु  आपण अंगीकारलेले समाजप्रबोधनाचे कार्य ते करीतच राहिले.

अशा महापुरुषांना निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख समान असतात. त्यामुळे ते विचलित होत नाहीत. रामाला राज्याभिषेक होणार होता. तो त्याच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा प्रसंग होता. परंतु दशरथाने कैकयीला दिलेल्या वरामुळे त्याला वल्कले धारण करून वनवासात जावे लागले. परंतु याही परिस्थितीत त्याने आपले धैर्य आणि आनंदी वृत्ती सोडली नाही. आणि अशाही परिस्थितीत भरताला माता कैकयीकडे दुर्लक्ष करू नकोस असे सांगण्यास तो विसरला नाही. म्हणूनच महापुरुषांचे जीवन म्हणजे दीपस्तंभ असतात. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे याचा वस्तूपाठ ते आपल्याला घालून देतात. म्हणूनच ते गुण अगदी धारण करण्यासाठी समर्थ आपल्याला तोच उपदेश करतात.

माणसाला स्तुती आवडते परंतु जेवढ्या सहजतेने आपण स्तुतीचा स्वीकार करतो तेवढ्याच सहजतेने निंदेचा करू शकत नाही. त्यासाठी धैर्य लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात मना बोलणे नीच सोशीत जावे. या ठिकाणी धैर्याचा आणि टीका सहन करण्याचा दुसराही एक अर्थ घेता येईल. तो म्हणजे मनावर संयम राखणे, प्रतीक्षा करणे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही एक काळ असा येतो की त्या प्रसंगामध्ये त्याला मनावर संयम ठेवून कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. आजच्या पिढीत हा संयम, हे धैर्य कमी होताना दिसते आहे. तरुण अपयशाचा स्वीकार आणि अपमानाचा सामना सहजपणे करू शकत नाहीत. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळायलाच हवी ती नाही मिळाली तर ते एक तर खचून जातात किंवा हिंसक बनतात. अशी अनेक उदाहरणे आपण व्यवहारात पाहतो. म्हणूनच धैर्य अंगीकारणे, अपमान सहन करणे याचे प्रशिक्षण मनाला देणे आवश्यक आहे. ती वृत्ती अंगी बाणवावी लागते. मुलांना सुद्धा आई-वडिलांनी कठीण परिस्थितीचा सामना करणे, संकटात खचून न जाणे आणि अपयश आले तरी त्यातून पुन्हा उभे राहण्याची हिंमत ठेवणे या गोष्टी शिकवायला हव्यात. क्रिकेटसारख्या किंवा अन्य खेळांमधूनही अशा प्रकारची वृत्ती आपल्याला शिकायला मिळते. एखादा सामना हरला तरी निराश न होता, खेळाडू पुढचा सामना कसा जिंकता येईल त्या तयारीला लागतात. या सगळ्या गोष्टींमध्ये यश आणि अपयश सहजपणे कसे स्वीकारायचे याचे सुंदर शिक्षण आपल्याला मिळते.

जीवनामध्ये वागताना नम्रतेने बोलणे आवश्यक आहे. तसे संस्कार लहानपणापासून व्हायला हवेत ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देता येतो म्हणूनच पालकांनी तसे आपल्या मुलांना संस्कार द्यायला हवेत. ही नम्रता आतून घ्यायला हवी. ती मनाची वृत्ती व्हायला हवी. बऱ्याच वेळा आजच्या कार्पोरेट जगामध्ये काही लोक कृत्रिम नम्रता किंवा विनय धारण करताना दिसतात. परंतु त्या गोष्टी मनापासून नसतील तर त्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचे ढोंगच !

श्रीकृष्ण, श्रीराम यांचे सर्वांशी वागणे-बोलणे कसे होते हे पालकांनी गोष्टीतून मुलांना शिकवायला हवे. त्यांच्याजवळ ज्ञान होते, सामर्थ्य होते. परंतु तरी देखील त्यांनी आपली नम्रता सोडली नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात,” नम्र झाला भुता, त्याने कोंडीले अनंता.” त्याचे तात्पर्य हेच आहे. आपल्या बोलण्याने दुसऱ्याचे समाधान झाले पाहिजे, दुसरी व्यक्ती संतुष्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने बोलता आले पाहिजे. आपले म्हणणे दुसऱ्याला न दुखवता देखील उत्तम पद्धतीने सांगता येते. या गोष्टी वरील महापुरुषांच्या उदाहरणांकडे पाहिले तर आपल्या सहज लक्षात येतात.

या श्लोकात समर्थांनी धैर्य, संयम, नम्रता आणि गोड बोलणे ही आपल्या जीवनाला दिशा देणारी चतु:सूत्री दिली आहे. ती आपण लक्षात घ्यायला हवी.

स्वसंवाद: 

  • संकटसमयी माझे मन स्थिर राहते का, की लगेच खचते ?
  • टीका झाली तर मी संतुलित राहू शकतो का ?
  • माझ्या वागण्या, बोलण्यात नम्रता आणि सौजन्य आहे का ?
  • माझ्या बोलण्याने लोक संतुष्ट होतात का ?

– – –

श्लोक ८ वा – – – 

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी |

मना सज्जना हेचि क्रीया धरावी |

मना चंदनाचे परी त्वां झिजावे |

परी अंतरी सज्जना नीववावे |८|

अर्थ : हे मना ( सज्जन माणसा ), तुझी वागणूक अशा प्रकारे असू दे की मृत्यू पावल्यानंतरही तुझी कीर्ती मागे राहील. सुगंध देण्यासाठी चंदन ज्याप्रमाणे स्वतःला झिजवते अशाच प्रकारे तू देखील इतरांसाठी झिजून सज्जनांना संतोष होईल अशा प्रकारे वागावे.

माणसाचा देह नाशिवंत आहे. जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू निश्चित आहेच. जीवन आणि मृत्यू यांच्या दरम्यानचा कालावधी म्हणजे आपले आयुष्य. एखादी व्यक्ती किती जगली यापेक्षाही ती कशी जगली हे अधिक महत्त्वाचे. शंभर वर्षांचे दीर्घायुष्य मिळवून आपले आयुष्य मौजमजेत घालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा अल्पायुष्य लाभलेल्या परंतु इतरांच्या सेवेत आपले जीवन घालवणाऱ्या व्यक्तीचे जीवन कधीही श्रेष्ठ ! स्वामी विवेकानंदांना उणेपुरे चाळीस वर्षांचे आयुष्य लाभले परंतु या आयुष्यात त्यांनी जी मानवतेची सेवा केली ती अनेक जन्म घेऊनही इतरांना करणे कठीण आहे. आपले आयुष्य सत्कारणी लावायचे असेल तर त्यासाठी इतरांसाठी झिजण्याची तयारी हवी.  एक सुंदर मराठी गीत आहे…

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा

गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा

झिजूनी स्वतः चंदनाने

दुसर्‍यास मधुगंध द्यावा…

शीतलता आणि सुगंध हे चंदनाचे गुण आहेत. ते इतरांना देण्यासाठी ते स्वतः झिजत असते. चंदन रोज सहाणेवर थोडे थोडे उगाळले जाते. असे करताना त्याची झीज होत असते. परंतु ही झीज सोसून ते इतरांना सुगंध आणि शीतलता प्रदान करते. आपण असेही म्हणतो की जे हात इतरांना सुगंध वाटतात, त्या हातांनाही सुगंध येतो. तो गंध त्यांना आपोआप प्राप्त होतो.

इतरांसाठी काही करायचे तर फक्त एक दिवस झिजून चालत नाही. ती सवय व्हावी लागते, वृत्तीला तसे वळण लावावे लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात मना सज्जना हेचि क्रीया धरावी. अशा प्रकारचे सेवेमध्ये सातत्य असावे लागते. अशा प्रकारचे सातत्य जर आपल्या सेवेत आणि वागण्याबोलण्यात असेल तर त्यामुळे सज्जन म्हणजे समाजातील सदाचरणी लोक प्रसन्न होतात, संतुष्ट होतात.

समाजातील बऱ्याच लोकांकडे सत्ता आणि संपत्ती असते. त्यातील काही लोक आपल्या सत्तेच्या आणि संपत्तीच्या बळावर विविध संस्थांना देणग्या देऊन आपले नाव द्यायला लावतात. विविध प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. तशी ती त्यांना काही काळ मिळते देखील. इमारतीच्या फलकांवर किंवा दगडांवर त्यांचे नाव कोरले गेलेले असते. तरीदेखील काही काळानंतर अशा व्यक्ती विस्मृतीत जातात. परंतु कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा प्रसिद्धीची हाव न धरता जे सातत्याने समाजासाठी झिजत असतात, अशा व्यक्तींचे नाव समाज कायम आदराने घेत असतो. अशा व्यक्तींचे नाव समाजाच्या मनात कोरले जाते. त्याला कायमस्वरूपी आदराचे स्थान असते. अहिल्याबाईंनी आपला राज्यकारभार करत असताना समाजासाठी घाट बांधले, अन्नछत्रे पाणपोया उभारल्या. यासारखी विविध प्रकारची कामे केली आणि त्यासाठी पैसा खर्च केला. त्यामुळे आपण आजही त्यांचे नाव आदराने घेतो. इतरांची नावे विसरली जातात. म्हणूनच त्यांची कीर्ती आजही जिवंत आहे.

समर्थांचा संदेश स्पष्ट आहे —

.. .. ..  कीर्ती मागे राहावी असे वाटत असेल तर आयुष्य इतरांसाठी झिजवले पाहिजे. आणि हे झिजणे एकदाच नव्हे, तर वृत्ती म्हणून अंगीकारले पाहिजे.

“मना सज्जना हेचि क्रीया धरावी” —

.. .. .. ही कृती, ही वृत्ती, ही सातत्यपूर्ण सेवा — हाच खरा साधनेचा मार्ग आहे.

स्वसंवाद :

  • मी केवळ स्वतःसाठी जगतो आहे की इतरांसाठी झिजून त्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करतो आहे ?
  • माझ्या कृतींमागे प्रसिद्धीची अपेक्षा आहे का, की निखळ सेवाभाव ?
  • हा सेवाभाव मी एक वृत्ती म्हणून अंगीकारला आहे का ?
  • माझ्या वागण्याने किंवा सेवाभावाने समाजातील सज्जन किंवा सदाचरणी लोक संतुष्ट होतात का ?

– क्रमशः श्लोक ७ आणि ८ .   

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments