सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – २ – रेडिओ – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी

“नमस्कार श्रोतेहो… हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. सकाळचे पाच वाजून सत्तावन्न मिनिटे आणि बारा सेकंद झाले आहेत. आपल्या आजच्या सभेला सुरुवात करु या मंगलध्वनीने…

आणि मग तो मंगलध्वनी सुरु व्हायचा. अगदी लहानपणी पासून दिवसाची सुरूवात अशीच होते. आणि दर पाच मिनिटांनी बदलणारे कार्यक्रम वेळ सांगतात. सकाळच्या घाईत घड्याळ बघावे लागत नाही. ते काम रेडिओ ऐकला की आपोआप होते. शिवाय ते कार्यक्रम ज्ञानात भर घालतात हा खूप मोठा आणि महत्वाचा फायदा! आजही मला लहानपणी निवेदन करणारे निवेदक व त्यांचे निवेदन आठवते. सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या द्यायला आल्या की शाळा कॉलेजला निघायची योग्य वेळ झाली हे लक्षात यायचे. आणि त्या बातम्या संपल्या की उशीर झाला असे समजायचे.

सकाळी सकाळी रेडिओ लावायची जुनी सवय बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या करते. आज गाणे ऐकले शब्द शब्द जपून ठेव एकीकडे काम चालू होते. आणि इतके अर्थपूर्ण गाणे ऐकत असताना माझ्या मनात कसे विचार येतात याचे हसू आले. आणि जपून ठेवलेल्या वस्तू आठवायला लागल्या. आणि कुठे कुठे जीव अडकतो याची गंमत वाटली.

परवा सहज कपाट आवरताना जरा पिवळसर पडलेली कॅरीबॅग सापडली. उघडून बघितले तर रेडिओचे लायसन सापडले. आता असे वाटेल हा काय प्रकार आहे? पण पूर्वी (मी लहान असताना) रेडिओ साठी परवाना आवश्यक होता. एका वर्षा साठी १/२ रुपये पोस्टात भरून त्या पुस्तकावर तिकीट लावून आणावे लागायचे. आणि घरात टेबल सारखे मोठे रेडिओ असायचे तो नीट ऐकण्यासाठी ३/४ फूट लांबीची व २/३ इंचाची तांब्याची जाळी असलेली पट्टी घरात लावावी लागायची. आणि छोटा रेडिओ (ट्रांझिस्टर) सायकलच्या हॅण्डलला लावून लोक ऐटीत फिरायचे. आणि ज्याच्याकडे लायसन नसेल तो लपवून ट्रांझिस्टर नेत असे.

हे सर्वच रेडिओ मात्र नवनवीन कपडे घालायचे.

त्यात गृहिणीची कलाकुसर व दृष्टी याची जणू परीक्षा व्हायची. काही जणी तर त्यावर स्वहस्ते भरतकाम करायच्या आणि कौतुक मिळवायच्या.

आमच्या कडे मोठ्ठा रेडिओ होता. लांबून बघितले तर पुस्तकांचे कपाट वाटावे असा होता. मी कायम त्याच्या बटणावर पाय ठेवून वर चढून दूध प्यायला बसायची. मग जेवायला बसायची. ही बाल सवय त्याचा उपयोग कळायला लागल्यावर सुटली.

विशेष म्हणजे या रेडिओचे सर्वत्र दर्शन होते. शेतात, मळ्यात, चौकात, पारावर, बागेत कुठेही सूर ऐकू येतात. मधल्या काही काळात असे भय वाटत होते की सगळ्या आधुनिक साधनांच्या गदारोळात आपला रेडिओ लुप्त होईल का? पण रेडिओने आपले स्थान कायम ठेवले आहे. स्वरूप बदलले आहे. सुटसुटीत झाले आहे. पूर्वीच्या अडचणी (रेडिओ वापरातील) आता नाहीत. त्याने प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये स्थान मिळवले आहे. आणि पेन सारखे छोटे स्वरूपही धारण केले आहे. आणि आता ऐकू येणारी स्टेशन्स सुद्धा वाढली आहेत.

काही वर्षांपूर्वी प्रसारित होणारे कार्यक्रम आधुनिक स्वरूप धारण करून पुन्हा प्रसारित होऊ लागले आहेत.

या रेडिओच्या अनंत आठवणी बऱ्याच जणांच्या मनात जागृत असतील.

रेडिओवर एक जाहिरात लागते. एक सखी दुसरीला विचारते, “कुटं ग शिकलिस एवढं ग्यान? ” लगेच दुसरी उत्तरते, “आपल्या रेडिओनं श्यानं केलंय की, तू बी ऐकत जा. ” हे ऐकून अगदी पटले. खरेच जे नियमित रेडिओ ऐकतात त्यांचे मन विविध माहिती, ज्ञान, आरोग्य, गृहिणींना मार्गदर्शन, मनोरंजन, यांनी भरून जाते. आणि या साठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. शिवाय डोळेही बिघडत नाहीत.

या रेडिओची सुरुवात भारतात १९२३ साली झाली. पण ती खाजगी कंपनी होती. आणि ती दिवाळखोरीत निघाली. नंतर १९३६ मध्ये ही कंपनी सरकारने ताब्यात घेतली आणि ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण केले.

प्रासंगिक कार्यक्रम सादर करणे. हे तर रेडिओचे खास वैशिष्ट्य आहे.

रेडिओवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर लिहायचे म्हंटले तर एक वेगळाच लेख होईल.

आज जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने भारतातील रेडिओ विषयी काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हा विषय खूप मोठा आहे. जे माझ्या सारखे रेडिओ प्रेमी आहेत त्यांना नक्कीच असे वाटते, हा रेडिओ अजरामर होवो. या मनापासून शुभेच्छा!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments