श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ भूतबंगला… ☆ श्री प्रदीप केळूसकर

विनायकचे मंदाशी लग्न झाले आणि मंदा परबांची सुन म्हणून आमच्या गावात आली. खरं तर विनायक निलाशी लग्न करणार असा सर्वांचा अंदाज होता कारण कुठल्या कुठल्या जत्रेत दोघे फिरताना दिसत होती. नीला विनायकच्या दुकानात बऱ्याच वेळा दिसें आणि कारण नसताना त्याच्याशी हसत बोलत असे. त्यामुळे माझ्यासकट सर्वाना वाटतं होते, विनायक नंदाशी लग्न करेल पण अचानक एक दिवस बातमी आली, विनायकचे लग्न ठरले.. पण नंदाशी नाही तर तालुक्याच्या गावातील कुणा दुसरी बरोबर.

माझी पत्नी पण आश्चर्यचकित झाली. तिला ही बातमी समजली तेंव्हा ती मला म्हणाली…

‘काय चल्ला तुमच्या मित्राचा? एका मुलीक फिरवल्यानं आणि दुसऱ्या बरोबर पाट धरता?

‘आसता बाये एखाद्याचा नशीब.. तेंका होयो तितके बायलो गावातत..

मग मला कळले विनायक च्या आई बाबांना नीला पसंत नव्हती. त्याचे बाबा मला रस्त्यात भेटले तेंव्हा म्हणाले..

‘नीला म्हणजे चालू पोर ता.. कोणाचेय गाडीवर बसुन जाईत.. मी विन्याक सांगलंय.. त्या पोराक माझ्या घरात हाडू नको..

मी गप्प झालो. शेवटी विनायक चे मंदाशी लग्न झाले.

मंदा दिसायला यथातथाच होती पण गुणी होती. तिला घरातील कामे उत्तम येत. ती घरात आली आणि परबांचे घर आणि परिसर स्वच्छ दिसू लागला. तिला अनेक पदार्थ येत, त्यामुळे विनायकचे आई बाबा खूष होते शिवाय हे सर्व ती खालच्या मानेने करी. पण विनायकचे लग्न झाले तरी निलाचे कारण नसताना विनायकच्या दुकानात जाणे आणि चेष्ठामस्करी करणे कमी झाले नव्हते. एक दिवस माझी पत्नी मला म्हणाली..

‘तुमच्या मित्राच्या दुकानात गेल्लात हल्ली?

‘जातंय मधी मधी..

‘त्या नीलाचो मुक्काम अजून आसता म्हणे दुकानात?

‘मी पण बघितलंय.. पण आपण काय शकतो दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात?

‘पण आता घरात बाईल आसा मा? पूर्वीचे दिवस वेगळे.. आता सांभाळून वागा..

मी गप्प राहिलो.

गणपतीच्या दिवसात परबाकडे सत्यनारायण होता म्हणून माझी पत्नी त्यांच्याघरी मदतीला गेलेली. रात्री घरी आल्यावर मला म्हणाली..

‘मंदा गप्पगप्प होती.. त्यान्च्याकडे काम करणारी काशी म्हणत होती..

‘मंदाक अंदाज इलोवा.. कोणीतरी चिठी लिहून विनायक आणि नीलाची भानगड आसा, अशी बातमी दिलिया.. त्या दिवसापासून मंदा गप्पगप्प आसा. मंदान आपल्या आईवडिलांका बोलावून आणल्यानं.. तेनी जावयाक जाब विचारलो.. पण विन्यात काय बदल नाय. विन्याच्या आईबाबांनीपण विन्याची खरडपट्टी काढली, पण..

शेवटी मी विन्याचा मित्र म्हणून त्याश्याशी बोलायला गेलो.

‘विन्या.. पूर्वीचे दिवस वेगळे पण आता घरात मंदा आसा.. तेच्याशी लग्न करून तेका घरात आणलंस.. आता त्या निलाचो नाद सोड, त्या नीला पायी तुजो दुकानात लक्ष नाय आणि संसारात पण नाय. लहान गावात असले गोष्टी प्रत्येकाक कळतत आणि तसेच ते तूझ्या बायकोक पण कळले बहुतेक..

‘पण मी बाबांका सांगाललंय, माका मंदाशी लग्न करुचा नाय, तरीपण माझ्या गळ्यात घातल्यानी..

‘पण त्यात त्या मंदाचो काय दोष? तेच्या गळ्यात माळ घातलास मा? असो दोन दगडावर पाय ठेवून मोठया संकटाक आमंत्रण देतंस, या लक्षात ठेव.

दसऱ्याच्या सुमारास नीला गावातून नाहीशी झाली, तिचे आईवडील तिला शोधत होते, त्यानी त्त्यांचे सर्व नातेवाईक, ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली.. पण तिचा पत्ता लागला नाही.. मग लोकात कुजबुज सुरु झाली.. विन्यान नीलाक म्हापश्यात ठेवल्यानं आणि शनिवारी रविवारी आपण तिकडे जाता. आता विन्याचे दुकानात पण लक्ष नव्हते, त्याच्या दुकानात अनेक वस्तू मिळतं नव्हत्या.. दुकानातील कपाटे खाली दिसू लागली.

पंधरा दिवसानंतर माझी बायको मला सांगू लागली.

‘मंदा दिवाळीक माहेरी गेला ता परत येऊकच नाय..

मला वाईट वाटतं होते, एका नीलापायी परबांच्या घरात दुःख आले होते.

विन्याचे आईबाबा साधी माणसे होती. त्याना विन्याचे वागणे आवडत नव्हते पण.. विन्यापुढे त्त्यांचे पण काही चालत नव्हते, त्यात विन्याचे दुकानावरील दुर्लक्ष त्याना त्रास देत होते.

दिवाळीनंतर मंदाच्या वडिलांनी तिला सासरच्या घरी पोहोचवले.

घरी आल्यापासून मंदा गप्पगप्पच होती. विन्याला मंदा घरात असली काय नसली काय फरक पडत नव्हता. दुपारी घरी जेवण मिळतं होते.

मग मला कळले मंदा नवऱ्याबरोबर भांडत होती, त्या निलाचा नाद सोडण्यास सांगत होती. आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत होती. पण विन्या कुणाला भीक घालत नव्हता. शनिवार रविवार निलाकडे पळत होता.

आणि एके दिवशी.. मी तालुक्याच्या गावात जायचे म्हणून सकाळी लवकर स्कुटरला किक मारत होतो.. एव्हड्यात परबांच्या घराकडून ओरड ऐकू आली.. मोठमोठ्याने रडणे ऐकू आले.. माझी बायको पटकन घरातून बाहेर आली आणि मी स्कुटर परबांच्या घराकडे जोरात घेतली. मी आणि पत्नी पटकन घरात शिरलो.. विन्याची आई मोठमोठ्याने ओरडत होती.. बाबा थरथरत उभे होते.. मंदाने बिष घेतलेले दिसत होते.. तोंडाला फेस आला होता.. माझी बायको पटकन पुढे झाली.. मी आणि तिने मंदाला उचलून बाहेर रिक्षात घेतले, रिक्षा सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली.

हॉस्पिटलमध्ये पोचण्याआधी मंदाने मान टाकली होती. डॉक्टरनी तिच्या मृत्यूची खात्री केली.. मग शवव्हिचेदन.. पोलीस कम्प्लेंट.. विन्याला अटक.. केस सुरु झाली.

मंदाच्या आत्महत्येमुळे परबांच्या घरावर अवकळा आली. मंदाच्या वडिलांनी विनायक तिला त्रास देत असल्याने आणि त्याच्या बाहेरख्याली वागण्याने कंटाळून मंदाने विष घेतले असा जबाब दिला. विन्या चार महिने जेलमध्ये राहिला आणि मग जमिनावर सुटला. त्याच्या दुकानाचे बारा वाजलेच होते.

विन्याचे आईबाबा या घरात राहायला घाबरू लागले. तरुण सुनेने घरात जीव दिला होता. तिचा आत्मा या घरात घुटमळतो आहे असा त्यांचा समज झाला होता. विन्या आता नीलाकडे रहात होता. विन्याच्या आईला वाईट वाईट स्वप्ने पडू लागली, त्यात तिची सुन रडताना दिसू लागली. विन्याच्या बाबांना कुणीतरी रडताना ऐकू येऊ लागले.. त्या दोघांची झोप उडाली.

शेवटी दोघांनी ते घर सोडले आणि ते त्यान्च्या कुटुंबाच्या जुन्या घरी राहू लागले.

मग जिकडेतिकडे बातमी पसरली.. कुणाला केस सोडलेली मंदा दिसू लागली, कुणाकुणाला विहिरीवर कपडे धुणारी मंदा दिसू लागली.. त्या वाडीतील लोकांनी त्या विहिरीवर जाणे सोडले.

गेले कित्येक वर्षे हा बंगला बंद आहे. मध्यंतरी विन्याचे वडील वारले.. मग दोन वर्षांनी त्याची आई वारली. म्हापशाला रहात असलेली नंदा मग गावात आली, त्या बंगल्यात विन्यासह राहू लागली.. तिची मुलगी पाच वर्षांची होती.

नीला या बंगल्यात राहू लागली खरी पण तिची मुलगी सतत आजारी पडू लागली. तिचे शाळेत लक्ष लागेना.. निलाला पण वाटू लागले… मंदाचा आत्मा या घरात वावरतो आहे, तो कुणाला सुख देणारं नाही.. तिने विन्याला सांगून जागा बदलली.

आता लोकांची खात्रीच झाली.

या घरात मंदाचा अतृप्त आत्मा कुणाला टिकू देत नाही.. त्यामुळे लोक या घराला म्हणू लागले.. भुताचा बंगला..

भुताच्या बंगल्याच्या आजूबाजूला झाडी वाढली. गेट गंजून गेले. विहिरीवरील पाण्याला शेवल चिकटला. कुणी सुद्धा कुणी त्या बाजूला जाईना. त्या बंगल्याच्या समोर बस स्टॉप होता.. त्याचे पण नाव पडले.. ‘भुताच्या बंगला स्टॉप.

जागा विनायकच्या नावे होती. विनायक आता म्हातारा झाला होता, नीला पण म्हातारी. त्यांची लेक शहरात. विनायकला पैशाची निकट होती.. म्हणून तो ही जागा आणि बंगला विकायला निघाला. पण कोण जागा विकत घेईना. तो मला सांगायला लागला.. ‘या बंगल्यासाठी गिऱ्हाईक बघ. मी त्याला म्हंटले.. ‘ही जागा भुताची म्हणून प्रसिद्ध झालिया.. आपल्या भागातलो कोण विकत घेऊचो नाय.. कोणी बाहेरचो आपटलो तर बघूया. पुढील दहा वर्षे तो बंगला तसाच होता.. हळूहळू जीर्ण होत चाललेला.

बाबुभाई पटेल यांची शहरात हार्डवेअर दुकानें होती. त्यांचे या भागावर लक्ष होते. त्यान्च्या मेहुण्यासाठी किरण पटेल याच्यासाठी जागा हवी होती.. जमिनीच्या एका एजेंटने त्यांना ही जागा दाखवली. बाबुभाईना जागा आवडली. पण अनेकांनी त्याना हा “भूतबंगला.. असल्याचे सांगितले. इथे रात्रीची भुते येतात असे पण सांगितले. बाबुभाई हसले.. त्यान्च्या लक्षात आले, ही जागा कोण घेणार नाही, मालकाकडे पाडून मागायला हवे.

बाबुभाई विनायकला भेटले. विनायक खूष झाला कारण पहिल्यांदाच कुणी गिऱ्हाईक आले होते. विनायकने किंमत सांगितली त्याच्या निम्याने बाबुभाईनी जागा मागितली आणि पदरात पाडून घेतली. विनायक खूष कारण त्या जागेचे थोडे तरी पैसे मिळाले.

बाबुभाईनी जेसीपी मागविले आणि संपूर्ण बंगला पाडला आणि दणकत बिल्डिंग उभी केली. खाली दुकान, त्याच्या बाजूला गोडावून आणि वरती राहायला मोठा फ्लॅट.

बाबुभाईचा मेहुणा किरण पटेल याने हार्डवेअर दुकान सुरु केले. भरपूर माल ठेवला. परिसरातील सुतार, वेल्डर, बांधकाम कामगार सर्वाशी गोड बोलून धंदा बसवीला.

दुकानावरती घरी बायको, मुले राहायला आली. नातेवाईक येतजात राहिले. गाड्या आल्या, ट्रक्स आले.. पातेलांच्या धंद्याला बरकत आली.

पण गावातील जुने लोक अजून ‘पटेलाना मंदाचे भूत दिसते का? याचीच चौकशी करत राहिले.

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments