श्री मनोहर जांबोटकर
वाचताना वेचलेले
☆ खाण्याची विकृती टाळावी, भारतीय संस्कृती जपावी – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,
पण जेवणापूर्वी ‘वदनी कवळ‘ आणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो ll१ll
*
वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो,
पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो ll२ll
*
चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,
पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो ll३ll
*
हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली,
आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll ४ll
*
पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो,
पण गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो ll५ll
*
बिर्याणी, फ्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो,
पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय.. ?ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो ll६ll
*
पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो
आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो ll७ll
*
दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो,
पण आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार विसरलो ll८ll
*
सॅलड या भपकेदार नावाने झाडपाला खायला शिकलो,
पण कोशिंबीर, चटणी, रायते आणि पंचामृत खायचे विसरलो ll९ll
*
इटालिअन पिझ्झा, पास्ताची चटक लागली,
आळूची पातळ भाजी, भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll
*
मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले,
फ्रेश लेमन ज्यूस, सोडा का नाही? म्हणून विचारू लागलो ll११ll
*
साखर भात, गव्हाची खीर, लापशी इतिहास जमा झाली,
अन स्वीट स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll
*
मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नॅपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो,
पण पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो ll१३ll
*
फॉरवर्ड झालो, फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना,
स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणून बुजून) विसरलो…
*
कवी : अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈






