स्मिता सुहास पंडित
जीवनरंग
☆ तिची पेन्शन : स्वाभिमानाची नवी ओळख… – लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆
घर सांभाळणाऱ्या हातांना पगार नसतो… पण सन्मानाची पेन्शन तरी असायला हवी.
सकाळचे साडेसात वाजले होते. स्वयंपाकघरातून कुकरच्या सलग तीन शिट्ट्या झाल्या, पाठोपाठ फोडणीचा खमंग वास घरभर दरवळत होता. घरात नेहमीसारखीच सकाळची लगबग सुरू होती.
“आई, आता तुम्ही जरा बसा बरं. भाजी झालीच आहे. चपात्या मी लाटते. सकाळपासून धावताय, जरा आराम करा, ” सून नेहा प्रेमाने म्हणाली.
छप्पन्न वर्षांच्या अलकाताई हसल्या…
“अगं, अजून राहुलचा डबा भरायचा आहे. तुझ्या दोघांचं दही ठेवायचं आहे. आणि हो, राहुलच्या आवडीची सुक्या खोबऱ्याची चटणी केली आहे आज. “
तेवढ्यात बेडरूममधून राहुलचा आवाज आला…
“आई… माझा निळा शर्ट कुठे आहे गं?”
“कपाटात डाव्या बाजूला तिसऱ्या कप्प्यात बघ. “
“मिळाला. “
तिकडे डायनिंग टेबलवर बसलेले सुधीरराव वर्तमानपत्र वाचत होते.
“अलका, चहात साखर जरा कमी घाल बरं का. डॉक्टरांनी सांगितलंय. “
“हो, लक्षात आहे माझ्या. “
“बाबा, मी आणते चहा, ” नेहा म्हणाली.
त्यावर सुधीरराव हसले.
“अगं, तुझ्या हातचा चहा छान असतो. पण तुझ्या सासूबाईंच्या हातच्या चहाची मला पस्तीस वर्षांची सवय आहे. “
घरात सगळं सुरळीत होतं. मुलगा, सून, नोकरीतून निवृत्त झालेले सुधीरराव आणि या सगळ्यांच्या मध्यभागी अलकाताई.
कोणाला काय हवं, कोणाला काय आवडतं, कोणाची तब्येत कशी आहे, घरात काय संपलंय, कोणाचा वाढदिवस कधी आहे, या सगळ्याचं चालतं-बोलतं व्यवस्थापन म्हणजे अलकाताई. त्यांच्याशिवाय घरातलं पानही हलत नव्हतं. तिची घराला आणि तिला घरची सवय झाली.
पण दुर्दैवाने त्यांच्या या कामाला ना पगार होता, ना रजा, ना पदोन्नती. कारण घरातल्या प्रत्येकाला वाटायचं…
‘ आई आहेत ना… त्या करतील.’
राहुल आणि नेहा ऑफिसला निघून गेले. घरात शांतता पसरली. अलकाताईंनी शेवटचं आवरलं आणि दोन कप चहा घेऊन त्या सुधीररावांच्या शेजारी येऊन बसल्या.
आज सुधीरराव खूप आनंदात दिसत होते. त्यांनी मोबाईल पुढे केला.
“अलका, बघ. “
मोबाईलवर बँकेचा मेसेज होता. पेन्शन जमा करण्यात आली आहे.
सुधीरराव अभिमानाने म्हणाले, “आज पहिली पेन्शन आली. पस्तीस वर्षांच्या नोकरीचं फळ. आता आयुष्य निवांत जाईल. “
अलकाताईंनी मोबाईलकडे पाहिलं, मग त्यांच्या चेहऱ्याकडे. चहाच्या कपातून निघणाऱ्या वाफेसोबत त्यांच्या डोळ्यांसमोर पस्तीस वर्षांचा संसार तरळून गेला.
राहुल लहान असताना तापाने फणफणत होता, तेव्हा सलग तीन रात्री जागून काढलेले दिवस… सासूबाईंच्या आजारपणात केलेली सेवा… सुधीररावांच्या बदल्यांमुळे पुन्हा पुन्हा उखडलेलं घर… मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवलेले क्षण… या सगळ्यात साडी घ्यायची राहिली, मैत्रिणींसोबत फिरायला जायचं राहिलं, अगदी स्वतःकडे लक्ष द्यायचंही राहून गेलं.
त्या हळूच म्हणाल्या,
“अभिनंदन हो. “
“धन्यवाद. “
काही क्षण शांतता पसरली.
मग अलकाताईंनी विचारलं,
“एक विचारू?”
“विचार ना. “
“तुम्ही आता रिटायर झालात ना?”
“हो. “
“मग माझं रिटायरमेंट वय किती?”
सुधीररावांनी वर्तमानपत्र खाली ठेवलं.
“म्हणजे?”
अलकाताई शांतपणे बोलू लागल्या.
“तुमची नोकरी पस्तीस वर्षांची होती. वयाची साठ वर्षं झाली आणि तुम्ही निवृत्त झालात. मीही पस्तीस वर्षांपासून या घरात काम करते आहे. लग्न झालं तेव्हा मी एकवीस वर्षांची होते. आज छप्पन्न वर्षांची आहे. माझी नोकरी कधी संपणार?”
सुधीरराव काही बोलले नाहीत.
अलकाताईंचा आवाज आता जरा भरून आला होता.
“मी पैशांचा हिशेब मागत नाहीये हो. हा संसार मी प्रेमाने केला. पण मला एक सांगा… मला कधी रविवार मिळाला का? मला कधी रजा मिळाली का? मी आजारी असताना मला कोणी म्हणालं का, आज तू आराम कर?”
सुधीरराव शांत होते.
अलकाताई पुढे म्हणाल्या,
“परवा शेजारच्या काकूंसोबत कीर्तनाला जायचं होतं. तिथे गरीब मुलांना खाऊ वाटायचा होता. पण माझ्याकडे जास्तीचें शंभर रुपयेही नव्हते. तुमच्याकडे मागायला संकोच वाटला. राहुलकडे मागावंसं वाटलं नाही. आणि मग मी गेलेच नाही. “
त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
“अहो, मला पैशांचा मोह नाही. पण नातवासाठी एखादं चॉकलेट घ्यायचं असेल… स्वतःसाठी एखादं पुस्तक घ्यायचं असेल… एखादी साधी साडी आवडली असेल… तर प्रत्येक वेळी मी कोणासमोर हात पसरावा का? माझ्या हक्काचे चार पैसे माझ्या हातात असू नयेत का?”
असं म्हणत त्या उठल्या. डोळे पुसले आणि पुन्हा स्वयंपाकघरात गेल्या. कारण दुपारच्या जेवणाची तयारी बाकी होती. गृहिणीचं काम कधीच संपत नसतं.
त्या रात्री सुधीररावांना झोप लागली नाही. पहिल्यांदाच त्यांनी अलकाताईंच्या आयुष्याचा इतक्या जवळून विचार केला.
– – आपल्याला पगार मिळाला. बोनस मिळाला… आता पेन्शनही मिळते आहे.
पण अलकाला काय मिळालं?… फक्त जबाबदाऱ्या?
दुसऱ्या दिवशी ते सकाळीच बँकेत गेले. त्यांनी एक नवीन खाते उघडलं आणि आपल्या पेन्शनमधून दर महिन्याला ठराविक रक्कम त्या खात्यात जमा होईल अशी व्यवस्था केली.
दुपारी ते घरी आले. अलकाताईंना त्यांनी एक नवीन कोरे पासबुक आणि एटीएम कार्ड दिलं.
अलकाताईंनी आश्चर्याने विचारले,
“हे काय आहे?”
“उघडून बघ. “
.. त्यावर नाव लिहिलं होतं… अलका सुधीर देशपांडे.
त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.
“हे माझं? पण कशासाठी?”
सुधीररावांनी त्यांचा हात हातात घेतला…
“अलका, हा तुझ्या त्यागाचा मोबदला नाही. कारण तुझ्या त्यागाची किंमत मी कधीच मोजू शकत नाही. पण हा तुझा हक्क आहे. आजपासून माझ्या पेन्शनचा एक हिस्सा दर महिन्याला तुझ्या खात्यात जमा होईल. हा पैसा फक्त तुझा असेल. तुला कोणाकडेही मागावं लागणार नाही. पस्तीस वर्षे तू या घरासाठी जगलीस. आता थोडंसं स्वतःसाठी जग. “
अलकाताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
त्या हळूच म्हणाल्या,
“मला पैशांचा आनंद नाही झाला हो. “
“मग?” सुधीररावांनी विचारलं.
अलकाताई हसल्या.
“आज पहिल्यांदा असं वाटलं… या घरात मी फक्त जबाबदारी नव्हते. माझं अस्तित्वही आहे. “
सुधीररावांनी त्यांचा हात घट्ट धरला.
त्या दिवशी अलकाताईंना पैसे मिळाले नव्हते. त्यांना मिळाला होता सन्मान. स्वाभिमान. आणि आयुष्यभर दिलेल्या योगदानाची दखल.
नोकरी करणाऱ्या माणसाला पेन्शन मिळते… पण घर उभं करणाऱ्या गृहिणीला किमान स्वाभिमानाची आर्थिक ओळख तरी मिळायला नको का?
अनेक स्त्रिया स्वतःच्या घराच्या जवाबदाऱ्या सांभाळताना स्वतःचं अस्तित्व विसरतात. त्यांचं पूर्ण आयुष्य संसारासाठी जातो. त्यांचे हक्क बनतो. पण पण त्याकडे दुर्लक्ष होत सगळं तुझंच आहे असं म्हणणं असतं. पण तसे अधिकार तिला मिळावे. हाच कथेचा उद्देश.
आज गरज आहे प्रत्येक घरात सुधीररावांसारखा विचार रुजण्याची. जोपर्यंत घर उभं करणाऱ्या ‘तिचा’ हा अधिकार तिला मिळत नाही, तोपर्यंत घराला खऱ्या अर्थाने घरपण येणार नाही. चला, आजच सुरुवात आपल्या घरापासून करूया आणि प्रत्येक गृहिणीला तिचा हक्क अन् स्वाभिमान मिळवून देऊया!”
लेखिका : सौ तृप्ती देव
भिलाई, छत्तीसगड
(कथा आवडल्यास नावासोबत शेअर करा)
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





धन्यवाद माझा लेख नावा सोबत शेयर केला