श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ अथांग मुक्तधारा… कवयित्री : राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

प्रत्येकालाच कुठे जमते

सहज सुंदर बरसणे

​मनातली ओल जपत

पाऊस होऊन जगणे

 

​तो येतो तसाच

कोणताही मुखवटा न घालता

​धरेच्या कुशीत विरतो

स्वतःचे अस्तित्व न राखता

 

​आपण मात्र जगतो

हिशोबाच्या जगात भावनांच्या

​काठोकाठ भरूनही दाटतात

भिंती कोरड्या अहंकाराच्या

 

​पावसाकडे नसते कधी

भेदाभेदाची कोणतीच पट्टी

​तो सुवर्णमहालावरही बरसतो

आणि गरिबाच्या झोपडीवरही

 

​आपले प्रेम मात्र

शर्तींच्या चौकटीत अडकलेले

​माणसाचे दातृत्व नेहमी

स्वार्थाच्या तराजूत तोललेले

तो ढग होऊन येतो

आणि मुक्तहस्ते उधळतो

​आपण अमृताचा संचय करून

त्यालाच गळती लावतो

त्याच्या एका थेंबात

अंकुराचे प्राण हसतात

​आपल्या हजारो शब्दांत

नाते मात्र मुके राहतात

 

​निसर्गाचे हे देखणे रूप

कधीतरी माणसाला उमजावे

​पावसासारखे निखळ होऊन

फक्त देता देता उरावे…

कवयित्री : प्रा. राजश्री पाटील

प्रस्तुती : सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted