रमा मोडक

🌸 जीवनरंग 🌸

☆ बॅकसीट… – लेखक : श्री अतुल काटेकर ☆ प्रस्तुती – रमा मोडक ☆

मला गाडी चालवायला भयंकर आवडतं.

आवडतं म्हणण्यापेक्षा खरं तर.. Driving was my passion.

लांबचा प्रवास असो, अनोळखी रस्ता असो किंवा एखादं नवीन ठिकाण असो—स्टीअरिंग हातात आलं की एक वेगळाच आत्मविश्वास यायचा.  

गाडी चालवताना रस्त्याबरोबर मनही धावत राहायचं.

आजही गाडी चालवतो … पण आता गरज असेल तेव्हाच.

हल्ली मात्र मागच्या सीटवर बसायला बरं वाटतं.

आवडत नाही… पण बरं वाटतं!

विशेषतः मुलं सोबत असतील आणि लांबचा प्रवास असेल तर माझा एक जुना डायलॉग ठरलेलाच,

“अरे, बदली ड्राइव्हर आपल्यात आहे बरं का! ”

पण मुलं माझं काही ऐकून घ्यायला तयार नसतात.

“बाबा, तुम्ही मागे बसा. तुम्ही आराम करा. कशाला driving करून ताण करून घेता? ”

मग मी थोडा नाखुशीने मागच्या सीटवर जाऊन बसतो.

कधी कधी मात्र माझ्यातल्या ड्राइव्हरचा ego थोडासा दुखावतो!

अरे, मी खुडूक झालो नाही अजून गाडी चालवता येते मला!

अजून हात-पाय धड आहेत. डोळे नीट आहेत.  

अजून रस्ते ओळखतो.

मग मला मागे का बसवता?

पण मध्यंतरी एका अपरिहार्य कामासाठी कुटुंबा समवेत अचानक रात्री बाहेरगावी जावं लागलं.

ड्राइव्हर मिळाला नाही.

मुलाला म्हटलं,

“चल, तू आणि मी दोघे आहोत. जाऊ या. ” आलटून पालटून ड्राईव्ह करू “तो तयार झाला आणि आम्ही निघालो.

रात्रीचा शांत रस्ता… बाहेर अंधार… आणि मी निवांत मागच्या सीटवर डोळे मिटून बसलो होतो.

मनात एक विचार आला,

“मुलं आपल्याला मागच्या सीटवर बसायला सांगतात, ते फक्त driving च्या ताणा मुळे नाही…”

कदाचित त्यामागे त्यांची काळजी असते.

“आता कुठपर्यंत तुम्ही कष्ट घेणार?

आम्ही आहोत ना…

तुम्ही आराम करा. ”

आणि कदाचित त्याहूनही मोठा एक न बोललेला संदेश असु शकतो —

“बाबा, तुम्ही नोकरीतून निवृत्त झालात… आता हळूहळू संसाराच्या प्रत्येक गोष्टीतूनही निवृत्त व्हायला शिका. ”

हा विचार मनात आला आणि मी स्वतःशीच विचार करू लागलो.

खरंच…

आपण कुठंतरी थांबणं गरजेचं नाही का?

प्रत्येक गोष्टीत आपलीच लुडबूड का असावी?

मुलांनी एखादा निर्णय घेतला की त्यावर आपलं मत असायलाच हवं का?

विचारलं नसेल तरी सल्ला देणं आपलं कर्तव्य आहे का?

मुलं आपापसात काही बोलत असतील तर मध्ये पडायलाच हवं का?

“माझ्याशिवाय हे अडेल…”

“मलाच सगळं कळतं…”

“माझ्या अनुभवाएवढा अनुभव कुणाला नाही…”

ही भावना आपण कधी ना कधी सोडायला नको का?

कारण अनुभव मोठा असतो, पण प्रत्येक अनुभवाचा अधिकार पुढच्या पिढीवर चालवण्याचा परवाना नसतो.

आपण आयुष्यभर मुलांना चालायला शिकवलं.

पहिल्यांदा ते पडू नयेत म्हणून हात धरला.

नंतर सायकल शिकवताना मागून सीट पकडून ठेवली.

पण एक वेळ अशी आली की हात सोडावा लागला.

पोहताना देखील आधार काढला तरच पोहता येऊ शकतं..

कारण हात धरून ठेवला असता तर ते सायकल चालवायला शिकलेच नसते! पोहायला शिकले नसते!

संसाराचंही तसंच आहे.

आपण मुलांना आर्थिक शिस्त शिकवली, शिक्षण दिलं, चांगलं-वाईट समजावलं, संकटात उभं राहिलो. पण एक वेळ अशी येते की त्यांना स्वतःचे निर्णय, स्वतःच्या चुका आणि स्वतःचे अनुभव जगू द्यावे लागतात.

मुलाने घर घेतलं तर,

असं करू नकोस, तसं कर…

मुलीने नोकरी बदलली तर,

ही नौकरी, कंपनी सोडू नको किंवा सोड..

मुलांनी मुलांच्या शिक्षणाचा निर्णय घेतला तर,

आमच्या वेळी मी असं केलं होतं…

आपण हे सगळं काळजी / प्रेमापोटीच करतो.

पण कधी कधी प्रेमाचं रूपांतर नकळत नियंत्रणात होतं.

हे लक्षात येणं महत्त्वाचं.

मुलं स्वतः गाडी घेऊन लांबच्या प्रवासाला गेले, तर आपण फोन करून विचारतो,

 “कुठे पोहोचलात? ”

जेवलात का? ”

गाडी हळू चालव.

रस्त्यात थांब.

काळजी आहे यात शंका नाही.

पण त्याच मुलाला रोज दहा वेळा फोन करून त्याच्या प्रवासाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवण्याची गरज आहे का?  

विश्वास म्हणजे काळजी सोडणं नव्हे; काळजीची पद्धत बदलणं.

आणि मग मला जाणवलं, बॅकसीट म्हणजे मागे जाणं नाही.

बॅकसीट म्हणजे पुढच्या पिढीला पुढे जाण्याची जागा करून देणं.

जोपर्यंत आपण Driving seat सोडत नाही, तोपर्यंत पुढची पिढी Steering wheel हातात घेणार कशी?

आपणच प्रत्येक निर्णय घेत राहिलो, तर त्यांना निर्णय क्षमता येणार कशी

आपणच प्रत्येक अडचण सोडवत राहिलो, तर त्यांना संकटांशी सामना करण्याचा आत्मविश्वास मिळणार कसा?

आयुष्य म्हणजे एक मोठा प्रवास आहे.

आपण बराच रस्ता चाललो आहोत.

काही खड्डे अनुभवले, काही सुंदर वळणं घेतली, काही चुकीचे रस्तेही पकडले.

आता पुढच्या पिढीच्या हातात संसाररुपी गाडीच्या चाव्या देण्याची वेळ आली आहे.

कुटुंबाचा प्रवास एखाद्या समृद्धी महामार्गासारखा सहज स्मूथ व्हायचा असेल, तर steering सतत आपल्या हातात ठेवून चालणार नाही.

रिमोट कंट्रोल चालणार नाही..

अलिप्त राहता यायला हवं. अलिप्तता म्हणजे नातं तोडणं नव्हे.

अलिप्तता म्हणजे नात्यात राहूनही प्रत्येक गोष्टीवरचा आपला हक्क सोडणं.

असे विचार मनात चालू असतानाच मुलाने आवाज दिला..

“बाबा.. आता थोडा वेळ तुम्ही गाडी घ्या. मला एक डुलकी घ्यायची आहे. ”

त्याने गाडी बाजूला घेतली.

मी हसत हसत पुढे जाऊन Driving seat वर बसलो.

आणि गाडी सुरू करताना मनातल्या मनात मला माझ्याच विचारांचं हसू आलं.

अरे हो!

मुलांनी मला बॅकसीटवर बसवलंय म्हणजे माझी उपयुक्तता संपली असं नाही.

उलट…

त्यांना खात्री, विश्वास आहे की बाबा आहे.

गरज पडली तर बाबाच मदतीला येतात.

फरक एवढाच—

आता मला प्रत्येक वेळी driving seat वर बसायचं नाही.

कधी कधी मागे बसून त्यांचा प्रवास पाहायचा आहे.

त्यांना चुकू द्यायचं आहे.

चुकातून शिकून पुन्हा उठू द्यायचं आहे.

आणि गरज पडली तर…

फक्त एवढंच म्हणायचं आहे—

“घाबरू नकोस… मी आहे. ”

कारण शेवटी,

बॅकसीट ही निवृत्तीची जागा नाही…

ती विश्वासाची जागा आहे. जस गाडीला रिझर्व इंधन असत अगदी तसं.. आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचं तर ” बॅकअप”.

आणि कदाचित आयुष्याच्या या टप्प्यावरची खरी शहाणपणाची खूणही हीच—

कधी स्टीरिंग आपल्या हातात घ्यायचं,

आणि कधी प्रेमाने ते पुढच्या पिढीच्या हातात सोपवायचं…

हे समजणं!

 

लेखक : श्री अतुल काटेकर.

प्रस्तुती : रमा मोडक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted