श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “आमच्या खेडेगावातलं जंतरमंतर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

ते तुमच्या दिल्लीच्या जंतरमंतर चं कौतुक आम्हाला नका सांगू… आमच्या इकडे गावा गावातून जिथं नदी वाहत जाते त्याच्या घाटा घाटावर असे कैक जंतरमंतर ची ठिकाणं आहेत… फार फार पूर्वीपासून चालत आलेली… आमच्या गावातील प्रत्येक घरातल्या सासुरवाशीण चे तो घाट हा जंतरमंतर चं सामुहिक मिटींग पाॅंईट म्हणून तो आजही या नावाने ओळखला जातो… घरघरात पूर्वापार एकच वाद चालत आलेला आहे… पिढ्यानपिढ्या आणि त्यावर कैक वेळा तात्कालिक तोडगे निघाले. वाद शमवला गेला. पण अजूनही तो पूर्णपणे मिटवला गेला किंवा संपलाच नाही… आजही तो त्या वाहत्या नदीच्या प्रवाहासारखा नित्य वाहतोच आहे… उफाळून येतोच आहे… घरघरातली सासू सुनेची आणि घरा घरातल्या दोन स्त्रियांमधील खळखळ आजही तिथे घरातही आणि घराबाहेरही ऐकू येत असते… कालानुरूप समस्या, प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले… स्त्री शिक्षणाचा प्रसार आणि त्याचे भलेबुरे परिणाम पण दिसू लागले, स्वावलंबनाने ती सक्षम झाल्याची समाज मान्यता मिळाली… आर्थिक आणि सामाजिक, राजकीय इतकेच पुरुषसत्ताक अभेद्य भिंतीला देखील जबरदस्त टक्कर देऊन तिने त्याचा पायाचं खिळखिळा करून दाखविला… खांद्याला खांदा लावून जाणारी नंतरच्या काळातली स्त्री आता तर पुरूषांच्या पुढे दोन पावलं अधिक जोमाने जाऊ लागली… सगळ्याच क्षेत्रात तिने आपला उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवला… काही ठिकाणी तर षुरूषांच्या मक्तेदारीलाच मोडीत काढले… जे आजवर त्याला जमले नाही ते तिने करून दाखविले… प्रसंगी यासाठी तिला घरातून आणि समाजातून बंडखोरी केल्याबद्दल टोकाचा अमानवी रोष पत्करावा लागला… तरीही ती न डगमगता पुढे पुढे वाटचाल करत आहे… एव्हढं सारं करून, मिळवून सुद्धा आजही ती तिच्या घराच्या उंबऱ्याच्या आत अपमानित राहीली आहे… आणि घरातली एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं अवमूल्यन करतेय… कजाग खाष्ट सासू, मतलबी मत्सरी जाऊ, काड्या घालणारी नि काडी लावून देणारी नणंद, इतकंच काय काहीवेळा पोटच्या मुलीकडून जिचा घरच्या बायकांनी तिच्या बुद्धी भेद करून मायलेकीत पाडलेले अंतर… हि सगळी त्या एकटीचा अवमान करत असताना कडक निर्बंध् घातले जातात… घरण्याची प्रतिष्ठा, पत सांभाळणारी कर्ती पुरूष मंडळी पण अश्या गोष्टींना घरच्या स्त्रियांच्याच बाजूने उभे राहतात… मग माहेराहून हुंडाच्या नावाखाली आर्थिक लूट असो, घरातली मालमत्तेची वाटणी असो, घरकामाची विभागणी असो… वंशाला दिवा न देणारी असो, व्यसनाधीनता असो कारणे अनेक असतात पण रोषाचा गाभा एकच असतो आणि त्या सगळ्यात बळी मात्र तिचाच दिला जातो… घरातले मारूमुटकून आणि मनात दाबून साठवलेले हे रागाचे फुत्कार आपल्या सख्यांजवळ बोलायला आणि बोलता बोलता यावर कसा तोडगा काढावा याचा तिथे झालेला खल म्हणजे सामाजिक, कौटुंबिक आंदोलन ठरते… घरोघरी मातीच्या चुली असतात… त्यामुळे या दडपशाही, तानाशाही, गुलामगिरी, स्वातंत्रा्याची गळचेपी हा एकच गाभा असलेले नि त्याचे विविध आयाम असलेले अनेक प्रश्न जीच्या जीवनाला भेडसावतात त्या सगळ्या या नदीच्या घाटावर आल्यावर आंदोलनाची चर्चा आणि दिशा ठरवतात… कोण आपलं कोण विरुद्ध कोणाची मदत आणि कधी कसा लढा द्यायचा याचा सामुदायिक चर्चा करून कार्यवाही ठरवली जाते… त्या दिल्लीच्या जंतरमंतर सारखी इथे पूर्व परवानगीची गरज लागत नाही.. घरातलं धूणं घेऊन घाटावर जाणे म्हणजे एकल किंवा दुकली बरोबर मोर्चा एकला चलोरे नेण्यासारखं आहे… भले ज्याच्या विरूध्द आंदोलन उभा करायचं ती तर घरातच असते पण घाटावर तिथे सह भगिनींशी विचारविनिमय करून दिशा आणि आंदोलनाचा अथ पासून इति पर्यंत खोलवर विचार, तयारी केलेली असते… मग धुणं धुता धुता मनातला त्वेष त्या कपड्याला जोरजोराने रगडत राहतो… या घाटावर सगळ्यांना मुक्त स्वातंत्र्य असले तरी जिथं बायकांचा घोळका एकत्र येऊन काही बोलत असतात तेव्हा इतर पुरूष मंडळी त्यांच्यकडे बघत नाहीत किंवा जिचा त्या विषयाशी काडीमात्र संबंध नाही अशी एखादीच विरळा स्त्री त्यात सामिल होत नाही… बरं आता आजकाल काही घरापुरते विषय मर्यादित न राहता घराबाहेरील अनेक विषयांवर सुध्दा तिथे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्राशी निगडित त्या असल्याने त्यावर देखील या घाटावर, , गावातील जंतरमंतर वर विचार मंथन चालूच असते… आणलेले कपडे धुवून होईपर्यंत तर कधी विचारमंथन संपेपर्यंत कपडे धुणे चालू ठेवयाचे हा फंडा इथे सूरू असतो… नदीचं पाणी वाहत असलं तरी या चर्चेच्यावेळी मात्र वेळ, घटीका निश्चल असते… या सगळ्या इथे झालेल्या विचारमंथनाची फलनिष्पत्ती अपेक्षेप्रमाणे मिळाली वा न मिळाली तरी उद्याच्या धुणे धुण्याच्या वेळेला पुन्हा नवा विषयावर मंथन सुरुच राहणार असते… पहाटेच्या सूर्योदयापासून ते संध्याकाळी रवि अस्ताला जाईपर्यंत असे गटगटाने स्त्री आंदोलन कर्त्या आप आपल्या ठरलेल्या वेळेनुसार येत जात असतात…

आणि जंतरमंतर कायमच गजबजता राहतो… म्हणूनच मी वर म्हटलं की तुमच्या दिल्लीच्या जंतरमंतर चं कौतुक आम्हाला सांगू नका… एकदा तुम्ही प्रत्यक्ष आमच्या गावात येऊन खात्री करून बघा… जोवर अंगावरचे मळलेले कपडे धुतल्या शिवाय पुन्हा परिधान करता येत नाही म्हणजे हा अव्याहत कामाचा रगाडा घेऊन नदीवर जाणं आलं… घाटावर म्हणजे जंतरमंतर वर रोज चं जाणं झालं… तुमचा दिल्लीच्या जंतरमंतर ला असतं का असा आंदोलन कार्यकत्यां चा वर्षाच्या तिनशेपासष्ट दिवसांचा मेळावा नाही ना… मग तर तुम्ही एकदा याच आमच्या गावातील जंतरमंतर ला भेट द्यायला…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted