सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ चार अनुवादित कथा – (१) मंत्री-महोदय पुन्हा या – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ (२) चेकमेट… सुश्री मीरा जैन (३) ऑनलाईन… डॉ. लता अग्रवाल (४) हेही असत्य… तेही असत्यच … पण …! – श्री रामदेव घुरंधर, मॉरिशस ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆☆☆☆☆
(१) मंत्री-महोदय पुन्हा या – लेखक :- श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
ब-याच वर्षांची शिक्षा भोगत तुरुंगात खितपत पडलेल्या भोलारामला शोधत, चक्क पोलिस अचानक एक दिवस तुरुंगात आलेले पाहून भोलारामच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. पोलिसांनी त्याला तुरुंगातून बाहेर काढलं, आणि त्यांच्या गाडीतून ते त्याला शहरातल्या एका शानदार हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्याच्यासाठी एका स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली गेली. त्याच्या आंघोळीसाठी गरम पाणी… उत्तम साबण अशी सोयही तिथे केलेली होती. शिवाय त्याला नवे कपडेही देण्यात आले. खूप चविष्ट नाश्ता… चहा… जेवण अशी सगळी बडदास्त ठेवत, त्याला त्या खोलीत डांबून ठेवण्यात आलं.
हे सगळं भोलारामसाठी समजण्यापलीकडचं होतं. मधून मधून पोलिसांचा एखादा माणूस यायचा, आणि त्याला काय हवं-नको ते विचारून जायचा… असं दोन दिवस चाललं होतं. दुस-या दिवशी संध्याकाळी पोलिसांनी त्याला हॉटेलच्या त्या खोलीतून बाहेर काढलं, आणि पुन्हा तुरुंगात नेऊन आधीसारखं डांबून टाकलं.
या सगळ्या अनपेक्षित घडामोडींमुळे कमालीचा बुचकळलेला भोलाराम त्याच्या कोठडीच्या गजांमधून बाहेर बघत उभा होता. तेव्हा जेलरचं बोलणं त्याच्या कानावर पडलं, ‘‘ कसा झाला मंत्री महोदयांचा दौरा? ”… ते पोलिसांना विचारत होते.
‘‘ खूपच गडबडीत… धावपळीत, पण पडला पार एकदाचा. कुठलीही अप्रिय आणि विपरित घटना घडली नाही, हे महत्त्वाचं. भोलारामची गरजच पडली नाही…” एका पोलिस ऑफिसरने सांगितलं.
‘‘ पण सर्व प्रकारची काळजी तर घ्यावीच लागते ना… मंत्री-महोदयांच्या रक्तगटाचं रक्त मिळणं दुर्मिळ असतं. तोच रक्तगट असणारा माणूस शोधणं हे तर फार कठीण काम. आता बघा ना… तुमच्या इथल्या सगळ्याच्या सगळ्या कैद्यांच्या रक्तगटाची नोंद तपासली, तेव्हा कुठे हा एकटा भोलाराम सापडला… तोच रक्तगट असणारा. यावेळी गरज पडली नाही, हे बरंच झालं. पण त्याचं नाव आमच्या रेकॉर्डमध्ये नोंदवून घेतलं आहे आम्ही. पुन्हा जेव्हा-केव्हा मंत्री-महोदयांचा दौरा असेल, तेव्हा त्याला पुन्हा घेऊन जाऊ आम्ही…” दुस-या ऑफिसरने सविस्तरपणे सांगितलं.
हे सगळं बोलणं भोलारामला नीट ऐकू आलं, आणि त्याला गेल्या दोन दिवसात खायला मिळालेलं स्वादिष्ट जेवण आणि शानदार हॉटेलमधली ‘त्याची स्वतंत्र खोली’ .. सगळं सगळं आठवलं… आणि त्याच्या तोंडून आपोआपच शब्द बाहेर पडले… ‘‘मंत्रीजी… महिन्यातून निदान एक तरी चक्कर इकडे मारत जा की हो…”
मूळ हिंदी कथा :- ‘फिर आना मंत्रीजी’
लेखक :- श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
☆☆☆☆☆
(२) चेकमेट… सुश्री मीरा जैन
वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी कित्येक दिवस रोज सुरू असलेली आंदोलनं , धरणे , मोर्चे , या सगळ्यामुळे सरकार अक्षरशः वैतागून गेलं होतं. या विषयावर आंदोलनकर्त्यांबरोबर अनेक वेळा बैठका आणि प्रदीर्घ चर्चा करून झाल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगून झालं होतं. प्रसंगी कायद्याचा कडक अवलंबही करून झाला होता. पण काही केल्या आंदोलनं थांबतच नव्हती. आंदोलनकर्ते दुसरा कुठलाही पर्याय स्वीकारायला तयार नव्हते. दिवसेंदिवस आंदोलनाला आणखी उग्र स्वरूप यायला लागलं होतं. शेवटी नाईलाजानेच सरकारने त्या वेगळ्या राज्याच्या मागणीला मान्यता द्यायचा निर्णय घेतला —- पण त्या बदल्यात आंदोलनकर्त्यांनी सरकारची फक्त एक अट मान्य केली पाहिजे असेही बजावले. — आणि ती अट ऐकताच, अगदी दुसऱ्याच दिवसापासून धरणं, आंदोलनं, मोर्चे — हे सगळं अचानकपणे पूर्ण बंद झालं. आणि ‘ वेगळं राज्य ‘ मागण्याची ती भन्नाट युक्तीही पार पुसली गेली .. राज्यात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आणि सरकारची युक्ती अपेक्षेपेक्षा जास्त सफल झाली. —-
ती अट फक्त एवढीच होती की —–‘ वेगळं राज्य स्थापन झाल्यानंतर, त्यासाठी इतके दिवस आंदोलनं करणाऱ्यांपैकी एकाही आंदोलनकर्त्याच्या कुटुंबातील कुणीही, किंवा नातेवाईकांपैकी – मित्रमंडळींपैकी कुणीही, किंवा स्वतः तो आंदोलनकर्ताही त्या नव्या राज्यात होणाऱ्या एकाही निवडणुकीला उभा राहण्यासाठी पात्र असणार नाही— बस — फक्त एवढीच एक अट —-’
मूळ हिंदी कथा : ” सवा सेर ”
कथाकार : सुश्री मीरा जैन
☆☆☆☆☆
(३) ऑनलाईन… डॉ. लता अग्रवाल
‘‘हॅलो’’
‘‘हॅलो, नमस्कार. मी ऑनलाईन गिफ्ट सर्व्हिस मधून बोलतो आहे. मी तुमची काय सेवा करू शकतो मॅडम?”
‘‘मला माझ्या मुलाला देण्यासाठी एखादं चांगलं गिफ्ट सुचवाल का?”
‘‘हो हो, नक्कीच. काय वय आहे तुमच्या मुलाचं?”
‘‘अठ्ठावीस वर्षे.”
‘‘ओ.के. गुड. सॉरी मॅडम, पण गिफ्ट किती रुपयांपर्यंत घ्यायचं आहे तुम्हाला, ते सांगता का?”
‘‘साधारण ५०० ते ६०० रुपयांपर्यंत.”
‘‘ठीक आहे. मग तुम्ही त्यांना एखादा चांगला बॉडी-स्प्रे भेट देऊ शकता.”
‘‘नको. तो स्प्रे वापरत नाही. आणखी काही सुचवाल का?”
‘‘हो, नक्कीच मॅडम. भेट देता येतील अशा पुष्कळ वस्तू आहेत आमच्याकडे. तुम्ही त्यांना एखादा चांगला गॉगल देऊ शकता. चालेल का?”
‘‘आणखी काय काय आहे?”
‘‘वॉलेट देण्याची कल्पना कशी वाटते तुम्हाला?”
‘‘नाही. ते पण नाही चालणार त्याला.”
‘‘हरकत नाही. मग एखादा चांगला शर्ट घ्या मॅडम त्यांच्यासाठी.”
‘‘हो, हो, शर्ट चालेल.”
‘‘ओके. गुड… साधारण कोणता रंग आवडेल तुम्हाला?”
‘‘असं करा. तुम्हाला जो रंग चांगला वाटेल, त्या रंगाचाच शर्ट पॅक करून पाठवून द्या.”
‘‘ठीक आहे मॅम. तुमचा पत्ता सांगाल का?”
‘‘हो, सांगते… संजय मित्रा, ३०४ रेव्हेन्यू स्ट्रीट, लोधी सर्कल, कलकत्ता.”
‘‘आई… तू?”
‘‘हो, मीच. बाळा. घरी तू माझ्याशी कधीच इतकं गोड बोलत नाहीस, आणि त्यासाठी माझं आईचं मन तळमळत होतं. म्हणून मग विचार केला, की फोनवरून तुझ्याशी असं बोलावं. आता मनाला खूप छान, शांत वाटतंय् बाळा. थॅंक यू…”
मूळ हिंदी कथा : ऑनलाईन
कथाकार : डॉ. लता अग्रवाल
☆☆☆☆☆
(४) हेही असत्य… तेही असत्यच … पण …! – श्री रामदेव घुरंधर, मॉरिशस
जरासा उतारवयाकडे झुकलेला रामशरण लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांचे मनोरंजन करत असे. त्याच्या गोष्टी लोकांना इतक्या आवडायच्या की त्या ऐकण्यासाठी लोक अगदी अधीर झालेले असायचे. म्हाताऱ्या लोकांना गोष्टी सांगतांना तो त्यांचं वय आवर्जून लक्षात घेत असे… आणि तरुण श्रोत्यांसाठीच्या गोष्टी तर पावसाच्या सरींवर सरी बरसाव्यात तशा त्याच्या ओठातून जणू बरसत असत. लहान मुलांसाठी तर त्याच्याकडे मोठा खजिनाच होता गोष्टींचा. तो दिसला रे दिसला की मुलं धावत जाऊन त्याच्याभोवती गोळा व्हायची. इतकेच नाही तर मुलींसाठी आणि आया-बायांसाठीही गोष्टींचं एक वेगळंच भांडार होतं त्याच्याकडे.
गोष्टी सांगून धूमधाम उडवून देणाऱ्या त्या रामशरणची माहिती राजाच्या कानावर जायला कारणीभूत ठरला तो राजाच्या रथाचा सारथी. एकदा राजाला रथातून फेरफटका मारायला जायचं होतं. पण तो सारथी काही वेळेवर पोहोचू शकला नाही. राजाने त्याला याचा जाब विचारला …. “ रस्त्यावर खूप गर्दी जमा झाली होती, त्यामुळे मी मधेच अडकून पडलो,” असं त्याने सांगितलं. रामशरणच्या गोष्टींचं वेड लागलेली माणसं तिथे मोठ्या संख्येने गोळा झाली होती आणि फेर धरल्यासारखी त्याच्याभोवती दाटीवाटीने उभी होती म्हणे.
राजाला रामशरणबद्दल फारच कुतूहल वाटायला लागलं होतं. हा माणूस त्याच्या गोष्टींमधून नेमकं काय ऐकवत असेल ?… त्याने जेव्हा त्याबद्दल माहिती काढली तेव्हा त्याला असं कळलं की त्याच्या गोष्टी अद्भुत वगैरे अजिबात नसतात. शिवाय त्या धादांत खोट्या .. कपोलकल्पित असतात. त्याने रामशरणला दरबारात हजर करण्याचा हुकूम सोडला… त्याप्रमाणे तो हजर झाला. त्याला दरडावत राजा म्हणाला, “ तुझ्या गोष्टी पूर्णतः खोट्या असतात हे मला कळलंय. याचा अर्थ तू लोकांना असत्याची सवय लावतो आहेस. “
“ मी केवळ लोकांचं मनोरंजन करण्यासाठी गोष्टींचा आधार घेतो. माझ्या गोष्टी ऐकून लोक जेव्हा खूश होतात तेव्हा मला माझ्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं महाराज “..
पण राजाने त्याचं म्हणणं अजिबात ऐकून घेतलं नाही, आणि त्याच्या गोष्टी सांगण्यावरच बंदी घातली. ही आज्ञा ऐकून रामशरण थरथर कापायला लागला. हात जोडून गयावया करत म्हणाला … “ महाराज.. गोष्टी तर माझ्या रक्तातच आहेत. गोष्टींच्या रूपाने मी खरं तर माझं थेंबथेंब रक्त वाटत असतो. कृपया माझा हा आधार माझ्यापासून हिरावून घेतला जाऊ नये. “
त्याने खूप विनवण्या केल्या पण राजाने त्याचा हुकूम मागे घेतला नाही. रामशरणला ‘ खोटारडा ‘ ठरवत रागाने त्याला दरबारातून हाकलून दिलं, आणि वर असंही बजावलं की तरीही जर त्याने खोट्या गोष्टी सांगणं हट्टाने सुरूच ठेवलं तर त्याला राज्यातूनच हाकलून दिलं जाईल. बिचारा रामशरण रडतच तिथून निघून गेला.
त्यावेळी दरबारात उपस्थित असलेले राजकवी मात्र आता आपल्या कवितांचा विचार करायला लागले होते. रामशरणच्या बोलण्यात खोटेपणा होता, तसा त्या राजकवीच्या लिखाणातही खोटेपणाच होता की….. विवस्त्र होऊन नदीत अंघोळ करणाऱ्या एखाद्या काल्पनिक स्त्रीवरही तो कविता करायचा, आणि त्याच्या तशा कविता ऐकून राजा अतिशय खूश होऊन त्याला भरघोस बक्षीसही द्यायचा. एकदा एका शत्रू असणाऱ्या राजाबरोबर केलेल्या लढाईत पराजित होऊन राजा परत आला होता. तो पराजय शब्दबद्ध करण्याऐवजी, कवीने त्याच्या कवितेत असं लिहिलं की ‘ राजाच्या तलवारीचा खणखणाट ऐकून शत्रूचे सैन्य नेहेमीच अक्षरशः सैरावैरा पळायला लागत असते .’
– – राजकवीने राजाला ‘ विश्वसम्राट ‘ म्हणत एका खूप मोठया ‘ असत्याचा नायक ‘ बनवले होते आणि त्या असत्यावर आधारित असलेले एक “ महाकाव्य “ लिहिले होते. आणि त्या जोरावर त्याला कायमस्वरूपी
“ राजकवी “ हे सन्मान्य पद प्रदान करण्यात आले होते.
… हेही असत्य … आणि तेही असत्यच … पण तरीही ????
मूळ हिंदी कथा : “ यह झूठ, वह झूठ .. “
हिंदी कथाकार : श्री रामदेव घुरंधर , मॉरिशस.
☆☆☆☆☆
चारही कथांच्या अनुवादिका : : मंजुषा सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





