☆ जीवनरंग ☆ खजिना ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆ 

राजा अगदी ऐटीत सोपानराव सावकारच्या दुकानात शिरला. ” तुम्ही मौल्यवान वस्तू गहाण ठेवून त्याच्या बदल्यात रोख पैसे देता म्हणे!!” आपल्या हातात असलेली रेशमी कपड्यांची पोटली तिथे ठेवत राजा म्हणाला. भरलेल्या पोटलीकडे आणि 9-10 वर्षाचा राजाकडे सोपानराव लालसेने बघू लागले.

“आहे काय ह्या पुरचुंडीत एवढे, चोरी बीरी तर केली नाहीस ना ?”

सोपानराव मोठ्या आवाजात म्हणाले. ” नाही हो मी गावा कडून येताना हा माझा खजिना घेऊन आलो आहे. माझ्या साठी तो लाख मोलाचा आहे. पण तुम्ही मला पाच हजार रूपये द्या,  नंतर मी तो सोडवून घेईन. ”

पुरचुंडी पालथी करत राजा म्हणाला. र्‍हा

समोर छोटे शंखशिंपले, सागरगोटे, रंगीबेरंगी छोटे छोटे दगड हे सगळे पसरलेले पाहून सावकारला खूप चिड आली. ” हा… हा आहे तुझा खजिना?  ह्या कचर्‍याचे पाच हजारच काय कोणी पाच रूपयेसुद्धा देणार नाही. ”

राजाला हे ऐकून राग आला, ” तुम्हाला काय माहित हे सगळे मी किती मेहनतीने कमावले आहे? ह्याच्यासाठी तर माझे मित्र स्वतःला सुद्धा गहाण ठेवून घेतील. ” सकाळी सकाळी पहिलं गिर्‍हाईक असं आल्याने सोपानराव खूपच चिडलेले होते. त्यांनी सगळ्या वस्तू उचलल्या आणि सरळ जाउन जवळच्या गटारीच्या नाल्यात टाकून दिल्या. छोट्या राजाला काही कळायच्या आत त्याचा खजिना गटारीत वाहून गेला.  त्याला रडूच आले.  तो संतापाने थरथरत कापत म्हणाला, ” तुम्हाला माझा खजिना  कचरा वाटला ना,  कधी तरी तुमचा खजिना पण  कचरा होईल तेंव्हा तुम्हाला कळेल.”
दिवसभर राजा जेवल्या खाल्या शिवाय चाळीच्या जिन्यात आई ची वाट बघत होता. त्याची आई लोकांचं  धुणंभांड्यांचं काम करी आणि बाबा हातगाडीवर हमाली करत. सध्या एक महिन्या पासून बाबांना बरे नसल्याने ते कामावर जाऊ शकत नव्हते. त्याचमुळे बाबांच्या औषधांसाठीच राजा स्वत:चा खजिना गहाण ठेवून पैसे आणणार होता. पैसे तर नाहीच मिळाले उलट त्याचा खजिना गटारीत वाहून गेला.

त्याच दिवशी संध्याकाळी  नोटाबंदी लागू झाली. पाचशे आणि हजारच्या नोटा चालनातून रद्द झाल्या. सावकाराला वेड लागल्या सारखे झाले. तो स्वत:कडे  आणि हातात असलेल्या पाचशे व हजार रूपयांच्या नोटांकडे बघत राहिला. सावकराच्या कपाटात असलेल्या लाखो रुपये किंमतीच्या नोटांचा कचरा झाला होता.

 

© सौ. स्मिता माहुलीकर

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

खूप मजेशीर बोधकथा