सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – ऑनलाईन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
“हॅलो”…
“हॅलो, नमस्कार. मी ऑनलाईन गिफ्ट सर्व्हिस मधून बोलतो आहे. सांगा मी तुमची काय सेवा करू शकतो?”
“मला माझ्या मुलाला देण्यासाठी एखादं चांगलं गिफ्ट सुचवाल का ?”
“हो हो, नक्कीच. काय वय आहे तुमच्या मुलाचं?”
“अठ्ठावीस वर्ष”
“ओ.के. गुड. सॉरी मॅडम, पण तुम्हाला गिफ्ट किती रुपयांपर्यंत घ्यायचं आहे ते सांगता का ?”
“साधारण ४०० ते ५०० रुपयांपर्यंत.”
“ठीक आहे. मग तुम्ही त्यांना एखादा चांगला बॉडी स्प्रे भेट देऊ शकता मॅडम.”
“नको. तो स्प्रे वापरत नाही. आणखी काही सुचवाल का?”
“हो नक्कीच मॅडम. भेट देता येतील अशा पुष्कळ वस्तू आहेत आमच्याकडे. तुम्ही त्यांना एखादा चांगला गॉगल देऊ शकता. चालेल का?”
“आणखी काय काय आहे ?”
“वॉलेट देण्याची कल्पना कशी वाटते तुम्हाला?”
“नाही. ते पण नाही चालणार त्याला.”
“हरकत नाही. मग एखादा चांगला शर्ट घ्या मॅडम त्यांच्यासाठी.”
“हो हो, शर्ट चालेल.”
“ओ. के. गुड. साधारण कोणता रंग आवडेल तुम्हाला ?”
“असं करा, तुम्हाला जो रंग चांगला वाटेल, त्या रंगाचाच शर्ट पॅक करून पाठवून द्या.”
“ठीक आहे मॅडम. तुमचा पत्ता सांगता का ?”
“हो सांगते… मि. संजय मित्रा, 304 रेव्हेन्यू स्ट्रीट, लोधी सर्कल, कोलकाता.”
“आई …. तू ?”
“हो, मीच. बाळा, घरी तू माझ्याशी कधीच इतकं गोड बोलत नाहीस. आणि त्यासाठी माझं आईचं मन तळमळत होतं. म्हणून मग विचार केला की फोनवरून तुझ्याशी असं बोलावं. आता मनाला खूप छान, शांत वाटतंय बाळा. Thank you …..”.
मूळ हिंदी कथा : डॉ. लता अग्रवाल
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
जबरदस्त शेवट.सुंदर कथा.