☆ जीवनरंग ☆ बोध कथा – चतुर मंत्री ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा २. चतुर मंत्री
धारानगरीत एक राजा होता. राजेलोकांना वेगवेगळे छंद असतात. तसे या राजाला ज्योतीष्यांशी चर्चा करण्याचा नाद होता. त्याच्याकडे दररोज एक ज्योतिषी येत असे. त्याच्याकडे येणारे सगळेच ज्योतिषी तज्ञ असत असे नाही.
एक दिवस त्याने एका ज्योतिष्याला “मी किती वर्षे जगणार?” असे विचारले. ज्योतिषी उत्तरला, “महाराज, आपण यापुढे दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जगणार नाही.” हे ऐकून राजा खूपच चिंताग्रस्त झाला. मृत्यूचे भय कोणाला नसते?
राजाची अवस्था पाहून जवळच बसलेल्या त्याच्या मंत्र्याला खूप दुःख झाले. मंत्री ज्योतिष्याला म्हणाला, “महाराज दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जगणार नाहीत हे आपण सांगितले. पण तुम्ही स्वतः यापुढे किती काळ जगणार हे सांगू शकता का?” “ मी यापुढे अजून वीस वर्षे जगू शकतो” असे तो ज्योतिषी उत्तरला. तेव्हा मंत्र्याने आपली तलवार उपसून त्या ज्योतिष्याचा शिरच्छेद केला. मग तो मंत्री राजाला म्हणाला, “महाराज, याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण घाबरून जाऊ नका. स्वतःचा मरणकाळ जाणू न शकणारा ज्योतिषी इतरांचा मृत्युकाळ कसा बरे जाणू शकेल? तेव्हा आपण चिंतामुक्त व्हावे.” मंत्र्याच्या ह्या बोलण्याने राजा निर्धास्त तर झालाच, शिवाय मंत्र्याच्या चातुर्याने खूष होऊन त्याला भरपूर पारितोषिकेही दिली.
तात्पर्य – ज्योतीष्याचे वचन विश्वासार्ह नसते.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈