श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ महाशिवरात्र ☆ श्री सुहास सोहोनी ☆
(वृत्त : कटाव)
☆
श्री सोमेश्वर, आदिनाथ तू,
गौरीहर तू, सांब सदाशिव …
🌺
झर झर नादे गंगा वाहत ..
डम डम डमरू ध्वनि उच्चारित ..
नाद घुमत जणु अनाहताचा ..
त्रिलोक व्यापी हुंकाराचा ..
🌺
भस्मविलेपित काया बळकट
त्रिशूलधारी हस्तहि दणकट
रुद्र रूप तव क्रुद्ध भयंकर
तड तड तांडव हलवि चराचर
🌺
चंद्रकोर मस्तकी विराजित
नागफणा कंठाला वेष्टित
रुद्राक्षांची माला शोभत
व्याघ्रचर्म हे वस्त्र लपेटित
🌺
उत्कर्षाप्रति विनाशातुनी
सृजन साधण्या विलयामधूनी
करि निर्दालन दुष्ट खलांचे
हीच प्रार्थना मम तव चरणी
🌺
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
दि. २६-२-२०२५.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈