श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ ज्येष्ठ... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
शुष्क धरेवर शुभ्र घनासह पाय रोवले ज्येष्ठाने
कपाशीपरी मेघ भासती, की पंख पसरले हंसाने
*
वसंत सरला, ग्रीष्म भडकला, आग पेटली चोहीकडे
गुलमोहर हा उतू चालला केशरमिश्रित पडती सडे
*
दिवस लांबले, पवन थांबला, पानोपानी रंग बदलले
सर हलकिशी यावी म्हणूनी आसुसले हे डोळे
*
कुटुंबलत्सल कुठे पक्षिणी घरट्यातून विसावे
मातीमधुनी क्वचित कोठे मृगकीटक खुणावे
*
ज्येष्ठ तपस्वी ऋषी मुनींसम या धवल मेघमाला
श्यामवर्ण मेघांचा होईल सुखवी जो बळीराजाला
*
सुहास रघुनाथ पंडित. सांगली.
९४२१२२५४९१
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



