श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “इंडियाज मोस्ट फिअरलेस.. – भाग १, २, ३ ” – एकत्रित लेखक : शिव अरुर आणि राहुल सिंह ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : इंडियाज मोस्ट फिअरलेस – भाग १, २, ३
भारतीय लष्करी दलांमधील शौर्याच्या सत्यकथा
तीन भागात – एकत्र उपलब्ध
लेखक – शिव अरूर आणि राहुल सिंह
मूल्य : १२३०₹ सवलत मूल्य १०४०₹
भाग १) एल. ओ. सी. च्या पलीकडे जाऊन सप्टेंबर 2016मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांच्या ठाण्यांवरच्या यशस्वी हल्ल्याचे नेतृत्व करणारे मेजर
पृष्ठ: ३१५
मूल्य: ३५०₹
11 दिवसांत 10 अतिरेक्यांना ठार मारणारा सैनिक, कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होणाऱ्या भूमीवरून शेकडो लोकांची सुटका करण्यासाठी, भयावह वातावरणातल्या बंदरावर जहाज घेऊन जाणारे नौदलातले अधिकारी आणि रक्तबंबाळ स्थितीतही जळतं जेट विमान चालवणारा हवाई दलाचा पायलट !
– – ह्या सगळ्यांच्या शौर्याचा कस लावणाऱ्या घटनांचं हे कथन ! काही त्यात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित, तर काही यांच्याबरोबरच्या मोहिमेत त्यांना अखेरपर्यंत साथ देणाऱ्या इतरांनी सांगितलेल्या माहितीवर आधारलेल्या, अशा ह्या कथा !
‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’ हे पुस्तक असामान्य शौर्य आणि कमालीची निर्भयता, ह्यांचं दर्शन वाचकांना घडवतं. अत्यंत विपरीत परिस्थितीत आणि गंभीर आव्हानं समोर असतानाही, भारताच्या ह्या शूरवीरांनी ज्या धाडसाने त्यांच्यावर मात केली आहे, त्याच्या खिळवून ठेवणार्या हकिगती लेखकांनी ह्यात पुस्तकातून वाचकांपुढे ठेवल्या आहेत.
भाग 2) दहशतवादविरोधातील लक्षणीय मोहिमांच्या आजवर कुणीही न सांगितलेल्या हकिगती
पृष्ठ: ३३६
मूल्य: ४६०₹
2016 सालच्या सर्जिकल स्ट्राइक्सच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दहशतवादविरोधी चकमकींचे खिळवून ठेवणारे प्रत्यक्षदर्शी वृत्तान्त;
काश्मीरमधल्या भरदिवसा रात्रीसारख्या भासणाऱ्या विलक्षण जंगलांमधून दहशतवाद्यांचा पाठलाग करणारे सैनिक;
पाणबुडीवरच्या संपूर्ण क्रूला वाचवण्यासाठी आपल्या सर्वस्वाची आहुती देणारी तरुण नौदल अधिकाऱ्यांची जोडगोळी;
आपल्या सोबत्यांच्या मृत्यूचा सूड उगवत नाही तोपर्यंत झोपूही न शकलेला हवाईदलातला एक कमांडो;
पाकिस्तानी दहशतवाद्यांवर स्पेशल फोर्सेसने केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये आत्मा शांत करणारा आयकर खात्यातला एक ‘बाबू’ आणि अशा अनेक कथा.
– – त्यांच्या कथा, त्यांच्यात शब्दांत किंवा त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना सोबत करणाऱ्यांच्या शब्दांत.
‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’च्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या भागात थक्क करून सोडणाऱ्या निर्भयतेचं आणि भारतीय सैन्यदलाने कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचं अत्यंत जवळून दर्शन घडवणाऱ्या या कथा वाचल्याच पाहिजेत.
‘सैन्यदलाच्या धुरंधर कामगिरीचा खराखुरा आत्मा अगदी बारीक तपशिलांसह टिपण्याची कामगिरी ‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’ने पुन्हा एकदा करून दाखवली आहे. ’
– – कै. जनरल बिपिन रावत, माजी सैन्यदल प्रमुख
भाग 3) एक लष्करी वैद्यकीय साहाय्यक आपल्या कर्तव्याच्या आवाहनापलीकडे जात दोन्हीकडच्या सैनिकांना वैद्यकीय उपचार देण्याचा प्रयत्न करतो.
पृष्ठ: ३०४
मूल्य: ४२०₹
— लडाखच्या गलवान खोऱ्यातील दगाबाज रक्तपाताच्या गोंधळात आपले सहकारी सैनिक चीन सैन्याशी जीवन-मरणाची लढाई करत असताना एक लष्करी वैद्यकीय साहाय्यक आपल्या कर्तव्याच्या आवाहनापलीकडे जात दोन्हीकडच्या सैनिकांना वैद्यकीय उपचार देण्याचा प्रयत्न करतो.
— अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते या चक्रीवादळातून शेकडो लोकांचे जीव वाचवण्यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवरील कर्मचारी आपले सर्वस्व पणाला लावतात.
— भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आपले अपघातग्रस्त लढाऊ विमान जमिनीवर कोसळण्याच्या दोन सेकंद आधी विमानातून बाहेर उडी टाकतो आणि आपला जीव वाचवतो मात्र एक पाय गमावतो.
– – या पुस्तकात वरील साऱ्यांची अथवा त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याबरोबर असणाऱ्यांची कथने नमूद आहेत.
‘इंडियाज मोस्ट फिअरलेस 3 या पुस्तकात असाधारण धाडसाच्या आणि निर्भयतेच्या 10 सच्च्या कथा वर्णन केल्या आहेत. अकल्पनीय अशा प्रतिकूल परिस्थितीला आणि गंभीर चिथावणीला सामोरे जाताना या भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या बहादुरीची, वीरश्रीची झलक या कथांमधून पाहायला मिळते.
– – भारताच्या शूरवीरांची खरी कहाणी – रणांगणातली, रक्तात न्हालेली, पण अभिमानाने झळकणारी !”
‘इंडियाज मोस्ट फिअरलेस भाग १, २, ३ ’ ही केवळ पुस्तक मालिका नाही, तर ती आहे भारतीय जवानांच्या असामान्य शौर्याची साक्ष.
* पुलवामा, बालाकोट, गलवान — जिथे शब्द संपतात, तिथून भारतीय सैनिकांचं शौर्य सुरू होतं. “
भारताच्या सैनिकी इतिहासातील हे क्षण केवळ घटना नव्हेत, तर शौर्याच्या त्या जळत्या मशाली आहेत ज्या पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देतील.
— पुलवामामध्ये ४० जवानांचा बलिदान भारताच्या हृदयावर कोरलं गेलं.
— त्याच्या प्रत्युत्तरात आलेली बालाकोट एअर स्ट्राइक — शत्रूच्या हृदयात घुसून दिलेला धगधगता संदेश.
— गलवान खोऱ्यात, शस्त्रांशिवाय, हातघाईत लढत आपल्या साथींना वाचवण्यासाठी उभं राहिलेलं भारतीय सैन्य — जिथे रक्ताचा प्रत्येक थेंब मातीसाठी वाहिला गेला.
‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’ ही त्या रणधुरंधरांची सत्यकथा आहे — जे केवळ लढले नाहीत, तर मृत्यूलाही डोळ्यात डोळे घालून भिडले.
या कथा प्रत्यक्ष मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या जवानांच्या शब्दांत आहेत – तपशीलवार, थरारक आणि काळजाला भिडणाऱ्या कथा — त्यांच्या जीवावर आपापल्या घरात सुरक्षितपणे आणि निवांत जगणाऱ्या प्रत्येक भारतीयाने ज्या आदरपूर्वक वाचल्याच पाहिजेत अशा कथा.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






