सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ रखमाबाई राऊत – लेख क्र. ४ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
रखमाबाई राऊत – सावे.
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
मी रखमाबाई राऊत किंवा रखमाबाई सावे! सावे हे माझ्या सख्ख्या वडिलांचं आडनाव तर राऊत हे माझ्या सावत्र वडिलांचं आडनाव! माझ्या आईचा बालविवाह झाला आणि तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षी माझा जन्म झाला. 17 व्या वर्षी बिचारी विधवाही झाली. मग माझाही बालविवाह झाला. पण आजोबांनी माझे पती दादाजी यांना सांगितलं की तुझे शिक्षण पूर्ण कर मग तिला नांदायला घेऊन जा. त्यामुळे मी आईकडेच राहिले. देव काही सगळी दुःखंच आपल्या वाट्याला देत नाही, काही थोडे चांगले दानही टाकतो. माझे आजोबा हरिश्चंद्र यादव हुशार होते. इंग्रजी शिकलेले, आधुनिक विचारांचे होते. त्यांनी ‘रायबहादूर’, ‘जस्टिस ऑफ पीस’ अशा स्थानांवर काम केले होते. इंग्रज लोकांच्यात त्यांची उठ बस होती. त्यांनी माझ्या आईचा पुनर्विवाह करण्याचे ठरवले. ते माझे सावत्र वडील, डॉक्टर सखाराम राऊत, शल्यचिकित्सक व प्रोफेसर होते. हेही एक चांगलं दान देवानं माझ्या पदरात घातलं. तेही सुधारक विचारांचे होते म्हणून हा विवाह होऊ शकला. नाही तर त्याकाळी कांहीं प्रगत लोकांच्या विचारांमुळे विधवा विवाह होत होते, पण सापत्य विधवा विवाह मात्र अशक्य होता. त्यामुळे हे लग्न झाल्यावर त्यावर जोरदार टीका सुरू झाली. पण माझ्या वडिलांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून माझ्या आईला आधार दिला. बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह यावर वाद होऊन दोन गट पडले. एक पुरोगामी व दुसरा प्रतिगामी! अशा रीतीने हा विवाह गाजला.
मला अभ्यासाची अतिशय आवड होती. त्यामुळे मी ब्रिटिश लायब्ररीतून पुस्तके आणून घरीच अभ्यास करीत होते. कदाचित डॉक्टर सखाराम यांच्यामुळे असेल पण मला डॉक्टर व्हावं असं वाटत होतं. १८८५ साली, मी २० एक वर्षाची होते, अचानक एक दिवस मला नांदायला पाठवा, असा दादाजींकडून निरोप आला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. वाटलं, आता सगळं संपलं. आपल्या सगळ्या स्वप्नांची राख होणार. दादाजींनी शिक्षणाकडे पाठ तर फिरवली होतीच. पण त्यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर ते त्यांच्या मामाकडे राहायला आले होते. मामाने तर घरात दुसरी बाई ठेवली होती. पत्नीचा छळ चालू केला होता. तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. दादाजी काहीही काम धंदा करत नव्हते. रंगेल आणि व्यसनी होते. त्यामुळे मला डॉक्टरांनी पाठिंबा दिला की, तू जाण्याची काहीही गरज नाही, मी त्याला सांगतो. खरं म्हणजे दादाजींनी माझ्या मागं लागावं असं काहीही माझ्यात नव्हतं. त्यांनी दुसरं लग्न केलं असतं. पण माझ्या सख्ख्या वडिलांची काही थोडी इस्टेट होती व आईने पुनर्विवाह केल्यामुळे तिने ती माझ्या नावावर केली होती. त्यामुळे दादाजींना माझी गरज निर्माण झाली होती. मी येत नाही हे पाहिल्यावर त्यांनी कोर्टात दावा दाखल केला. नशिबाने वकील चांगले होते. त्यांनी नांदायला जाण्यासाठी जबरदस्ती करणे हे रानटीपणाचे ठरेल असा निर्णय दिल्याने दावा फेटाळला गेला. पण काही समाजकंटक असतातच. त्यांनी दादाजींना वरच्या कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. वरच्या कोर्टात मात्र मला नांदायला जाणं हेच माझं कर्तव्य आहे, इच्छेचा प्रश्न नाही असं सांगितलं. त्यामुळे नांदायला जा नाहीतर सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगायला लागेल असा निर्णय दिला. मी ही जिद्दीची होते. नांदायला जाणार नाही, तुरुंगवास भोगेन असं निक्षून सांगितलं आणि सगळीकडे खळबळ माजली. हा माझा उद्दामपणा वाटला, व तो शिक्षणाचा परिणाम आहे, असा निष्कर्ष काढला गेला. माझ्या मनात विचार आला की हा फक्त माझ्या एकटीचा प्रश्न नाही, कितीतरी स्त्रियांवर असे अन्याय होत असतात. याला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे. मग मी स्त्री-पुरुष भेद, स्त्रीचे हक्क, सामाजिक विषमता यावर लेख लिहायला सुरुवात केली. ते ‘अ हिंदू लेडी ‘ या टोपण नावाने ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध केले. आणि मग पुन्हा दाव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली. आजोबांमुळे बरेच इंग्रज लोक ओळखीचे होते. त्यामुळे ही चर्चा भारतातच नाही तर इंग्लंड, युरोपमध्येही सुरू झाली. मध्यंतरीच्या काळात माझंही आई-वडिलांचे छत्र हरवलं होतं. मी एकटी पडले होते. तोपर्यंत काही लोकांनी मध्यस्थी करून दादाजींना फक्त पैसे हवे आहेत हे सांगितल्यावर मीही थोडे पैसे देऊन दादाजींना केस मागे घ्यायला सांगितले. पण पैशाचा हा ससेमिरा तसा थांबणार नाही म्हणून मी घटस्फोटाची केस दाखल केली.
हरायचं नाही, हे मी मनाशी पक्क ठरवलं होतं. मी राणी विक्टोरिया यांनाही मला घटस्फोट मिळावा. मला या लग्न बंधनातून मुक्त करावं. मला शिक्षणाची, डॉक्टर होण्याची संधी द्यावी. अशी विनंती करणारं पत्र पाठवलं आणि काय आश्चर्य त्यांनीही माझ्या बाजूने निर्णय दिला. या घडामोडींचे दोन फायदे झाले. एक म्हणजे ‘एज ऑफ कन्सेंट ॲक्ट १८९०’ हा कायदा, मी उभ्या केलेल्या मुद्द्यांमुळे संमत झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिटिश साम्राज्याने बालविवाह प्रतिबंधक कायदा संमत केला. विवाहाचे कमीत कमी वय दहा वरून बारा केले.
तीन वर्षं या कोर्ट कचेरीत गेली. आता भूतकाळ मागे टाकायचा. डॉक्टर व्हायचं, आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी, स्त्री स्वातंत्र्यासाठी काम करायचं असं मनाशी ठरवलं. इंग्लंडमध्ये काही लोकांनी माझ्या शिक्षणासाठी फंड उभा केला. त्यामुळे डॉक्टर होण्याचा माझा मार्ग मोकळा झाला. हा एक मोठा फायदा मला मिळालेल्या प्रसिद्धीचा झाला. महिलांसाठी असलेल्या लंडनमधील कॉलेजमधून मी डॉक्टर ही पदवी घेतली. तिथे एक विचित्र नियम होता. मुलींना डॉक्टर होता येत होतं पण पदवीदान केलं जात नव्हतं. तिथेही मी या गोष्टीचा निषेध नोंदवला आणि एम. डी. ची परीक्षा ‘ऑन जॉईंट बोर्ड ऑफ द कॉलेज ऑफ फिजिशियन्स् अँड सर्जन्स् ऑफ एडिंबरा ॲन्ड ग्लासगो ‘ या संस्थेत दिली. चांगल्या प्रकारे उत्तीर्णही झाले. मग ‘लायसनशिएट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनस् अँड सर्जनस् ‘ ही पदवी मिळाल्यानंतर माझं नाव इंग्लंडच्या मेडिकल रजिस्टर मध्ये सनदशीर रीतीने दाखल झालं.
मी भारतात परत आल्यावर निरनिराळ्या इस्पितळातून नोकरी केली. माझ्यासाठी इंग्लंडमध्ये गोळा केलेल्या फंडामधून भारतात सात इस्पितळे उभी करण्यासाठी मी अर्थसहाय्य केले. नोकरीबरोबरच स्त्रियांसाठी कार्य सुरू केले. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडायची हे ठरवलेलं होतं. त्यामुळे पुन्हा लग्नाच्या बंधनात न पडता विधवा, परित्यक्ता, अनाथ बालके यांचे आश्रम काढले. त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांना घरचे लोक घराबाहेर पाठवायचे नाहीत. त्यामुळे साक्षरता वर्ग घेऊ शकत नव्हते. मग मी भजन, प्रवचन, कीर्तन या गोष्टी सुरू केल्या व त्यामधून स्त्रियांना साक्षर केलं. आरोग्य विषयक चर्चा घडवून आणल्या. हॉस्पिटलच्या कामातून निवृत्त झाल्यावर सुद्धा स्त्रिया, बालके यांच्यासाठी काम करणं शेवटच्या श्वासापर्यंत थांबवलं नाही. एकच ध्यास होता स्त्रीमुक्ती झाली पाहिजे. अस्पृश्यतेची समाजातील कीड नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी व्याख्याने ठेवली. आजोबांच्या मालकीचं गावदेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं. असमर्थ, दुर्लक्षित अशा समाजातील घटकांवर जास्त लक्ष केंद्रित केलं. माहित नाही किती जणींच्या लक्षात मी राहिले असेन. माझं समर्पण, माझा त्याग यांची जाणीव कुणाला झाली की नाही कुणास ठाऊक ! ९२ वर्षांचं आयुष्य मिळालं. खूप काम करता आलं त्यामुळे मी समाधानी होते.
– – – शेवटपर्यंत माझं एकच तत्व, एकच ध्यास होता की मी अन्याय सहन करणार नाही व इतर कुठल्याही स्त्रीवर अन्याय झाला तर तिला तो सहन करू देणार नाही !
—- लेख क्र. ४.
शब्दांकन : मंजिरी येडूरकर
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







