श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ हाच मोक्ष अन् इथेच मुक्ती☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

म्हणो कुणी की ब्रह्म सत्य अन् विश्वचि अवघे मिथ्या, माया

मातीमधुनी यावे जन्मा, केवळ अंती माती व्हाया

*

व्यर्थ न आलो आभाळातुन, घेउन आलो निरोप त्याचा

होउन आलो गगनगंध मी, सखा व्हावया मृद् गंधाचा

*

नवरस आणिक सतरंगी ह्या, आलो जन्मी चिंब भिजाया

सुंदरता अन् चिरंजीविता, दोन घडींना थोडी द्याया

*

पाच इंद्रिये पाची खिडक्या, सताड उघड्या सदैव ठेवू

ऋतूऋतूंचे नित्यनूतनी, वैभव सारे भोगत राहू

*

भासभ्रमांची मायानगरी, कसे म्हणू या आयुष्याला

सत्य फुले ही, सत्यचि काटे, सत्य चांदणे, सत्यचि ज्वाला

*

फुलवू येथे अशी उपवने, यावे भेटी नंदनवनही

शाश्वतासही खिजवू थोडे, ईश्वर बनवू नश्वरासही

*

हटयोगी ना वितरागी मी, इहलोक खरी माझी प्रीती

हाच विठोबा, हीच पंढरी.. हाच मोक्ष अन् इथेच मुक्ती !

  

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments