सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते स्वामी विवेकानंद” – लेखिका : सौ. अंजली दिलीप गोखले – परिचय : कर्नल शरदचंद्र पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

पुस्तक : हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते स्वामी विवेकानंद 

लेखिका : सौ. अंजली दिलीप गोखले.

मो. नंबर : ८४८२९३९०११ (+91 84829 39011)

प्रकाशक : विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे

पृष्ठ्संख्या : ३५६.

मूल्य. रु. ४००/-

कर्नल शरदचंद्र पाटील

या पुस्तकाचे मुखपृष्ठ इतके आकर्षक आहे की, पाहताक्षणीच पुस्तक हातात घेऊन पाहण्याची इच्छा होते. हिंदुत्वाचा भगवा ध्वज, त्यावर सर्व विश्वाचा – विशेषत: अमेरिका, यूरोप आणि आफ्रिकेचा नकाशा, ध्वजाच्या कडांचे ज्वाळांमध्ये रूपांतर, समोर (त्यांच्या पारंपरिक भगव्या वेषामधील) स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा जयजयकार करणारा हजारो लोकांचा समूह आणि हे सर्व काळ्या अंधारातून वर आलेले! वा! मुखपृष्ठावरूनच पुस्तकाचे प्रयोजन लक्षात येते. मलपृष्ठावर मोजक्या दहा ओळीत स्वामीजींचे जीवनकार्य मांडलेले. त्या ओळी अशा आहेत :

… स्वामीजींच्या आईने भगवान शंकराकडे ज्या, जशा सुपुत्राची मागणी प्रार्थनेने केली होती, तसेच होते स्वामीजी…

… त्यांच्यातले सद्गुण ओळखून वडिलांनी जसे मार्गदर्शन केले, तसेच घडले स्वामीजी…

… सद्गुरू रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पट्ट्शिष्याला ओळखून, त्याला प्रेमाने आपलेसे करून, आपल्या ज्ञानाची ओंजळ पुरती रिकामी करून त्याला जशी झळाळी दिली, तसे तेज:पुंज बनले स्वामीजी…

… आपल्या गुरुदेवांच्या इच्छेप्रमाणे आयुष्यात फक्त त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी झटले स्वामीजी…

आपल्या मातृभूमीबरोबर सगळ्या जगाच्याच हितासाठी झटले स्वामीजी…

… ‘हे विश्वची माझे घर’ म्हणत ज्ञानदेवांचे पसायदान आचरणात आणून आपल्या आयुष्याची अक्षरश: आहुती दिली ती स्वामीजींनी…

स्वामीजींचा संपूर्ण जीवनपट अगदी तपशीलवारपणे २८ प्रकरणांमध्ये लेखिकेने मांडला आहे. १२ जानेवारी १८६३ रोजी, म्हणजे मकरसंक्रांतीच्या पहाटे विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी या दांपत्याच्या जीवनात स्वामीजींचा जन्म झाला. जणु हिंदू धर्मावर आलेले मळभ दूर करण्यासाठी, धर्माच्या संकल्पनेत आणि आचरणात आमूलाग्र बदल घडविण्यासाठीच नरेंद्र या बाळाचा जन्म झाला होता.

नरेंद्र उर्फ बिले याला लहानपणापासूनच ध्यान धारणेची आवड होती. तो एकपाठी होता, मैदानी खेळात प्रवीण होता, संगीतामध्ये आणि गाण्यामध्ये त्याला रुचि होती आणि वाचनाची तसेच निरीक्षणाची त्याला आवड होती. कॉलेजमध्ये एकदा प्राचार्य वर्ड्स्वर्थची कविता शिकवत होते. ते म्हणाले – “मनाची विशुद्धता आणि एखाद्या लक्ष्यावरील पूर्णत्व यामुळे दिव्य अनुभूती येऊ शकते. अशी दिव्य अनुभूती घेतलेला एकच महापुरुष मी पाहिलेला आहे आणि तो महापुरुष म्हणजे दक्षिणेश्वराचे पुजारी रामकृष्ण परमहंस. तेच नाव नरेंद्रच्या मोठ्या चुलतभावाने मोथ्या आदराने घेतले. त्यामुळे त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि तो रामकृष्ण परमहंसांचे दर्शन घ्यायला दक्षिणेश्वरला गेला. तिथून पुढे नरेंद्र आणि रामकृष्ण परमहंस यांचा संपर्क वाढतच गेला. त्याची परिणति स्वामीजी हे रामकृष्णांचे पट्ट्शिष्य बनण्यात झाली.

स्वामीजी पाच वर्षे श्री रामकृष्ण परमहंस यांच्या सानिध्यात राहिले. गुरुंनी त्यांना वेदान्तासह सर्व ज्ञान प्रदान केले. गुरूंच्या महानिर्वाणानंतर सर्व शिष्यांनी एक मठ स्थापन केला. त्यानंतर स्वामीजींनी अनेक टप्प्यांमध्ये भारतयात्रा केली. स्वामीजी जिथे जात तिथे लोकांना आपलेसे करत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, बोलण्याची सर्वांवर छाप पडे. या भारत यात्रेची सांगता कन्याकुमारीला झाली, जिथे समुद्रातील एका खडकावर स्वामीजी पोहत पोहत गेले आणि तेथे त्यांनी सलग तीन दिवस ध्यान केले.

त्यांच्या अनुयायांनी पैसे गोळा केले, खेतरीच्या राजाने वित्तसहाय्य केले आणि स्वामीजी शिकागोच्या सर्व धर्म परिषदेला जाऊ शकले. त्यांच्या भाषणाची सुरवात त्यांनी ‘लेडिज अ‍ॅण्ड जंटलमेन’ या शब्दांनी न करता ‘माय ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स ऑफ अमेरिका’ या शब्दांनी केले आणि त्या शब्दांनी इतिहास घडवला. फक्त एका धर्मपरिषदेला गेलेले स्वामीजी तब्बल दोन वर्षे अमेरिका आणि इंग्लंड इथे राहिले. त्यांनी हिंदू धर्माविषयी सर्व लोकांच्या सर्व शंका दूर केल्या, अनेक शिष्य मिळवले आणि भारत भूमी चा उद्धार करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकली.

भारतात परतल्यावर त्यांनी बेलूरच्या मठाची स्थापना केली हिंदू धर्मियांचे कर्म कांड कमी कसे करता येईल ते पाहिले, शेकडो व्याख्याने दिली (त्यातल्या अनेकांचे नंतर शिष्यांनी पुस्तकांमध्ये रूपांतर केले) आणि देशात जागृती निर्माण केली. त्यांची प्रकृती साथ देत नव्हती तरी त्यांनी देशभर धर्मजागृतीचे कार्य सुरूच ठेवले. शेवटी ४ जुलै १९०२ रोजी स्वामीजींनी महासमाधी घेतली.

मी इथे अगदी संक्षिप्तपणे लिहिले आहे. पण लेखिकेने स्वामीजींच्या कार्याचे अगदी तपशीलवार वर्णन केले आहे. लेखिकेने स्वत: स्वामीजींच्या कार्याचे जे विश्लेषण केले आहे, ते सुद्धा अतिशय सखोलपणे केलेले आहे. उदा. स्वामीजींचे शिक्षणाविषयीचे विचार मांडताना लेखिका म्हणते – स्वामीजींच्या मते परकीय नियंत्रण नसलेल्या पद्धतीने आपल्याच ज्ञानाच्या विभिन्न शाखांच्या अध्ययनाची आज आपल्याला जरूर आहे. आजच्या तरुणांनी असे शिक्षण घेतले पाहिजे, की ज्यायोगे उद्योगधंद्याची वाढ होईल आते फक्त नोकरीच्या मागे न लागता आपली उपजीविका करू शकतील आणि आपल्या आपत्तींना तोंड देण्यास समर्थ होतील. (योगायोगाने अगदी हेच विचार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहेत.)

पुढे एके ठिकाणी लेखिका म्हणते – आत्तापर्यंत स्वामीजींबद्दल हिंदू धर्म, योग, तत्त्वज्ञान, वेद, वेदान्त, अध्यात्म, परमार्थ, भारतभ्रमण, गरिबांबद्दल असलेली कणव, शिष्यांवरचे प्रेम, आपुलकी, गुरुदेव व कालीमाता यांच्या बद्दलचा आदर, ओढ, भक्ती, अमेरिका – इंग्लंडमध्ये केलेला वेदांचा प्रसार, प्रचार, मठ स्थापना, प्रवचने असेच सगळे समजून घेत आलोय. पण स्वामीजी गीतकार, संगीतकार, गायन – वादन यामध्येही तेवढेच तरबेज होते, होते हे वाचून फक्त आणि फक्त थक्क व्हायला होते. एकाच व्यक्तीत एवढे गुण? केवळ अशक्य वाटते. पण त्यांच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नव्हतीच. सर्वगुणसंपन्न या शब्दाचा खरा अर्थबोध विवेकानंदांना समजून घेताना होतो.

आणखी एके ठिकाणी लेखिका म्हणते – स्वामी विवेकानंद जन्माला आले भारतामध्ये – पूर्वेकडे. त्यांचे कार्यक्षेत्र ठरले पश्चिमेकडे. पूर्व आणि पश्चिम, भारत आणि जग, हिंदू संस्कृती, ख्रिस्ती धर्म, इस्लाम या सगळ्यांचा वेध त्यांनी घेतला. इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान या सगळ्यांचेच त्यांना समान सर्वार्थ आकलन होते.

स्वामीजींनी भ्याडपणाला कधीही थारा दिला नाही. ते नेहमी म्हणायचे की गृहस्थाश्रमी माणसाने नेहमी अन्यायाचा सबल प्रतिकार केला पाहिजे. त्यासाठी शक्तिवान असले पाहिजे. स्वामीजींनी कधीही मांसाहार त्याज्य मानला नाही.

पुस्तक परिचयामध्ये प्रत्येक गोष्ट लिहिता येत नाही (नाहीतर तेच एक पुस्तक बनेल). पण शेवटी इतकेच सांगू इच्छितो की, हे पुस्तक अतिशय चांगले आहे. पूर्णपणे व्याकरण दोषविरहित आहे. सोप्या, समजणार्‍या भाषेत आहे. माझ्यामते हे पुस्तक प्रत्येक मराठी घरात असलेच पाहिजे. (मला नक्की ठाऊक नाही; पण लेखिकेशी संपर्क केल्यास कदाचित सवलतीच्या दरात पुस्तक मिळू शकेल.)

परिचय : कर्नल शरदचंद्र पाटील (शरद)

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments