श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ ’आई आठवताना…’ – लेखक : डॉ. रघुनाथ माशेलकर – शब्दांकन : श्री सागर देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
माझ्या पहिल्यावहिल्या विदेश प्रवासाच्या वेळी असंच झालं. इंग्लंडला जायचं होतं. तिकिटाचे पैसे नव्हते. आमच्या ओळखीच्या काही जणांनी मदत केली. हे सर्व पैसे नंतर आम्ही परतही केले. चाळीतल्या आमच्या छोट्याशा जागेत अभ्यासाजोगं वातावरण कुठून येणार? मग गिरगाव चौपाटीवरील दिव्यांच्या प्रकाशात मी अभ्यास करायचो. रेल्वे स्टेशनवर शेवटच्या गाड्या गेल्या की तिथे प्लॅटफॉर्मवर जाऊन बसायचो. अभ्यासातली चिकाटी कायम होती; त्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात 30 वा आलो आणि बारावीच्या परीक्षेत बोर्डात 11 वा आलो. माझ्या आईला अशा वेळी खूप आनंद होत असे. मात्र पुढचं उच्चशिक्षण घेणं अशक्य आहे असं वाटत असतानाच, सर दोराबजी टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप मिळाली आणि माझं शिक्षण पुढं चालू राहिलं.
गोव्यात मडगाव येथे 10 मे 2011 रोजी माझ्या ‘Reinventing India’ या ग्रंथाचं प्रकाशन झालं. माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मातृभूमीची -म्हणजेच आपल्या भारत देशाची समृद्ध वाटचाल आणि भविष्याची दिशा रेखाटण्याचा प्रयत्न मी या ग्रंथात केला आहे. हे पुस्तक मी माझ्या आईला अर्पण केलं आहे. त्या अर्पणपत्रिकेत मी लिहिलंय… “dedicated to my mother, who is no more, and yet is everywhere. “
आजही माझ्या आईचं सदेह अस्तित्व नसलं तरी ती आमच्या सहवासातच आहे; किंवा आम्ही कुटुंबीय तिच्या सहवासात आहोत, अशी माझी भावना आहे.
‘माझी आई माझं प्रेरणास्थान आहे, तिने मला जीवनमूल्यं शिकवली’, असं मी नेहमी सांगतो. कारण तिच्यामुळंच मी घडलो, संस्कारित झालो आणि आयुष्यातील अनेक आव्हानांना सामोरा जात-जात इथंवर येऊन पोचलो.
दक्षिण गोव्यातलं माशेल हे आमचं मूळ गाव. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं. आई आणि मी एकमेकांच्या सोबतीला उरलो. मला त्यावेळचं फारसं आठवत नाही; पण वडिलांच्या निधनानंतर आई आणि मी मुंबईत आलो. त्यानंतर आम्हा मायलेकरांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. माझ्या आईचं नाव अंजलीबाई. प्रचंड सोशिक, धीराची अन् जिद्दीचीही.
गिरगावातील खेतवाडीमध्ये एका छोट्याशा चाळीत आम्ही राहू लागलो. उदरनिर्वाहासाठी आई कष्टाची अनेक कामं करायची. तिचं शिक्षण जे ते लिहिण्या-वाचण्यापुरतंच झालं होतं. त्यामुळे तिला नोकरी मिळत नव्हती.
शिवणकाम मिळणार म्हणून ती एकदा काँग्रेस हाऊसजवळ गेली. मोठी रांग होती तिथं. संध्याकाळी तिचा नंबर लागला. पण ‘किमान तिसरी झालेल्यांनाच घेतलं जाईल’, असं सांगण्यात आलं. त्यामुळं तिला नाइलाजाने परत फिरावं लागलं; पण त्याचवेळी तिनं आपल्या मनाशी निश्चय केला, ‘मी माझ्या मुलाला खूप खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. ’
मला आठवतंय… गिरगावातून लोअर परळपर्यंत डोक्यावर कापडाचे तागे घेऊन ती चालत जात असे. दोनशे वार कापड ती डोक्यावरून वाहून न्यायची; कारण पाटीवाल्याला द्यायला सहा आणेही तिच्याकडे नसत. म्युनिसिपालटीच्या शाळेत मी जाऊ लागलो; पण त्या वेळी शाळेतल्या चाचणी परीक्षेसाठी लागणारा तीन पैशांचा कागद आणणंही आम्हांला अशक्य व्हायचं. आमची शाळाही गरीब होती. माझ्या आईच्या डोळ्यांत त्या वेळी पाणी यायचं, तरी तिनं धीर सोडला नाही.
लहानपणापासून मी अभ्यासात हुशार होतो, पण समोर प्रतिकूल परिस्थितीचं आव्हान! वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत मला अनवाणी चालावं लागलं. तरीदेखील मोठ्या निर्धारानं प्रयत्नपूर्वक माझा अभ्यास मी सुरू ठेवला. अभ्यासातली एखादी शंका आली, काही अडलं तर विचारणार कुणाला? माझा एक मामा दोन वर्षं मुंबईत होता, त्याची त्या वेळी मदत झाली, मार्गदर्शन मिळालं. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आमच्या शाळेत मला खूप चांगले शिक्षक लाभले. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा खूप मोलाचा आहे. खेतवाडीतील मराठी शाळेमध्ये प्रवेश फीचे 21 रुपये भरायचे होते. त्या वेळी एवढी मोठी रक्कम कुठून आणणार? अखेर कुठून कुठून मागून, उसनवारी करून माझ्या आईनं या पैशांची जुळवाजुळव केली.
पुढं माझ्या पहिल्यावहिल्या विदेश प्रवासाच्या वेळी असंच झालं. इंग्लंडला जायचं होतं. तिकिटाचे पैसे नव्हते. आमच्या ओळखीच्या काही जणांनी मदत केली. हे सर्व पैसे नंतर आम्ही परतही केले. चाळीतल्या आमच्या छोट्याशा जागेत अभ्यासाजोगं वातावरण कुठून येणार? मग गिरगाव चौपाटीवरील दिव्यांच्या प्रकाशात मी अभ्यास करायचो. रेल्वे स्टेशनवर शेवटच्या गाड्या गेल्या की तिथे प्लॅटफॉर्मवर जाऊन बसायचो. अभ्यासातली चिकाटी कायम होती; त्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात 30 वा आलो आणि बारावीच्या परीक्षेत बोर्डात 11 वा आलो. माझ्या आईला अशा वेळी खूप आनंद होत असे. मात्र पुढचं उच्चशिक्षण घेणं अशक्य आहे असं वाटत असतानाच, सर दोराबजी टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप मिळाली आणि माझं शिक्षण पुढं चालू राहिलं.
मोलमजुरी करून आपल्या मुलाला वाढवताना त्यानं काही वावगं वागू नये, यासाठी माझ्या आईचं माझ्यावर बारीक लक्ष असे. लहानपणी मी पत्ते, गोट्या खेळलेलं तिला अजिबात आवडत नसे. एकदा तर तिनं गोट्या गटारात फेकायला लावल्या होत्या. पत्ते हातात दिसल्यावरही ती रागावल्याचं मला अजून आठवतंय.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून मी पुढचं शिक्षण घेतलं. रासायनिक अभियंता झालो. नोकरी शोधू लागलो. एवढ्या वर्षांच्या काबाडकष्टांनंतर आपल्या आईला चार दिवस सुखाचे लाभावेत ही त्यामागची इच्छा होती. पण आईनं विचारलं, ‘तुझ्या विषयातली पुढची पदवी कोणती? ती तू घे. ’ मग अवघ्या तीन वर्षांत मी पीएच. डी. झालो.
आई म्हणायची, ‘तू घरात नको लक्ष घालू, जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घे. पोट हे भरतंच, त्यासाठी मी काम करीन. मी तुझ्या पाठीशी आहे. कष्टाचं फळ परमेश्वर आपल्याला देतोच. ’ परदेशात मी गेलो तेव्हा दर आठ दिवसांनी मी व आई एकमेकांना न चुकता पत्र पाठवत असू. तिला इंग्रजी येत नव्हतं आणि म्हणून ती माझ्या मित्रांकडून पाकिटावर इंग्रजीतून पत्ता लिहून घेई. शेवटी तिला वाटलं की, आपणच शिकावं. तिने कॅपिटल इंग्रजी अक्षरात स्वत: पत्रावरील पत्ता लिहून मला पत्र पाठवलं होतं.
माझ्या मुलींकडून फोन करायला ती शिकली. मी दौऱ्यावर असलो की नियमितपणे तिच्याशी फोनवर बोलायचो. घरात कोकणी बोलायची, पण पुढे ती एखादं इंग्रजी वाक्यही बोलून जायची. मला खूप आनंद वाटायचा.
एक गोष्ट आवर्जून नोंदवलीच पाहिजे. माझी पत्नी वैशाली आणि माझी आई यांच्यातले संबंध हे अगदी आई आणि मुलीसारखेच होते. खूप जिव्हाळा होता दोघींमध्ये.
पुण्यात 2000 साली सायन्स काँग्रेसचं ऐतिहासिक आणि संस्मरणीय अधिवेशन झालं, त्या वेळी माझं अध्यक्षीय भाषण झालं. पंतप्रधान अटलजींसह अनेक नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रांतील दिग्गज व हजारो पुणेकर त्यावेळी उपस्थित होते. माझी आई टी. व्ही. वरून हा सोहळा पाहात होती. त्या वेळी तिला खूप समाधान वाटलं, आनंद वाटला. तिच्या सर्व कष्टांचं सार्थक झालं, अशीच जणू तिची भावना होती!
अलीकडेच काही वर्षांपूर्वी माझ्या आईचं वार्धक्यानं निधन झालं, पण अधूनमधून ती माझ्या स्वप्नात येते. आशीर्वाद देते. आता ती नाही याची पोकळी जाणवतेच, पण तिच्या आशीर्वादामुळे आणि आठवणींमुळे तिचं अस्तित्वही जाणवतं. तिची शिकवण आणि तिची मूर्ती नेहमी डोळ्यांसमोर येते.
☆
लेखक : डॉ रघुनाथ माशेलकर
शास्त्रज्ञ
शब्दांकन : श्री सागर देशपांडे
प्रस्तुती :श्री अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






