सुश्री अरूणा मुल्हेरकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “पखाल” – गझल-संग्रह गझलकारा : सुश्री संजीवनी तोफखाने ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
पुस्तक : पखाल – गझल–संग्रह
गझलकारा : डाॅ. सौ संजीवनी तोफखाने
प्रकाशक ~ शाॅपिझेन (ई प्रकाशन)
सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी ताई गझला लिहू लागल्या. पखाल या त्यांचा बासष्ट गझलांचा संग्रह.
पखाल, एक चामड्याची पिशवी. त्या पिशवीतून जेव्हा शेतमळ्यांना, बागेला पाणी घातले गेले की रोपे, लता, वेली कशा अगदी टवटवीत दिसायला लागतात. धरित्री हिरवीगार होऊन मन कसे अगदी प्रसन्न होते. या ठिकाणी संजीवनीताईंच्या एकेक शेरांनी ही पखाल भरलेली आहे आणि त्यातून एक एक शेर जसे बाहेर पडतात तशी वाचकांची मने अल्हादित झाल्याशिवाय राहत नाहीत. गदिमांच्या भावसाहित्यावर डॉक्टरेट पदवी घेतलेल्या सौ संजीवनी ताई किती संवेदनक्षम आहेत ते वाचकांना त्यांच्या या बासष्ट गझलातून जाणवल्याशिवाय राहणार नाही.
पखाली ही या पुस्तकातील चौतीसावी गझल. गझलेच्या मतल्यात त्या म्हणतात,
या वाहता पखाली सारी हयात गेली
काही बरीच वर्षे ही खेळण्यात गेली
.. मतला वाचताक्षणीच आपल्या लक्षात येते की ही रूपकात्मक गझल आहे. या ठिकाणी पखाल
ही प्रपंचाचा भार वाहणारी आहे. हा संसाराचा पसारा मांडला खरा पण उभे आयुष्य तो पसारा समेटण्यातच गेले याचे कुठेतरी गझलकाराला मनातून शल्य आहे. या जीव घेण्यास्पर्धेत फक्त धावणेच शिल्लक आहे, सर्व उमेद त्यातच खर्च झाली. सुरुवातीला अशा प्रकारे ही गझल नकारात्मक वाटत असली तरी गझलकाराचे मन मात्र सकारात्मकच आहे. त्या म्हणतात,
ना हार मानली मी ना धीर सोडलेला
काही पळे परंतु साधावयात गेली
.. जीवनातील अनंत अडचणींशी सामना करतच पुढे जायचे, काही काळ खर्च झाला तरी हरकत नाही, हा फार मोठा संदेश त्यांनी समाजाला दिला आहे. लहानपणापासून प्रत्येकावर जे संस्कार झाले असतात, तेच अखेर जीवनाच्या वाटेवर कामी येतात हेच खरे.
डॉ. संजीवनी ताईंचा अध्यात्माचा सखोल अभ्यास आहे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक वगैरे धार्मिक ग्रंथांवर त्या अगदी सहज सुलभ असे भाष्य करतात. त्यामुळे त्यांच्या एक एक गझला वाचताना ही गोष्ट सहज लक्षात येते की समाजातील, आयुष्यातील विविध विषयांवर लिहिताना या गझलांना अध्यात्मिक बैठक आहे. या *पखाली*त ही शेवटच्या शेरात त्या ईश्वराशी संवाद साधतातच.
कोsहम् ही अशीच एक आध्यात्मिक गझल. माणसाचे मन घोड्यासारखे पळते आणि भौतिकाची ओढ सुटत नाही हे शाश्वत सत्य त्या या गझलेतून मांडतात.
ब्रह्म तो मी अंश त्याचा थांब आहे माहिती
तोच मी हे जाणतो पण जीव चळतो सारखा
.. या एका शेरातून माणसाची कळतं पण वळत नाही ही अवस्था त्या किती सार्थ शब्दातून सांगून जातात. मोहना रे, मर्म, रस्ते, शोधते त्याला, सखया, प्रेम गझलेचे, अशा कितीतरी गझला अध्यात्म या सदरात मांडता येतील. समर्पण ही अशीच संपूर्ण आध्यात्मिक गझल आहे असे म्हणावे लागेल. अध्यात्माला वाहून घेण्यातच नरदेहाचे सार्थक आहे हा फार महत्त्वाचा उपदेश संजीवनी ताई वाचकांना करतात.
विषयांचे बाहुल्य आणि विविधता ही या गझल संग्रहाची खासियत आहे असे मी म्हणेन.
प्रियकर- प्रेयसी, पती- पत्नी यांचे प्रेम, समाजाचे सुंदर/ भेसुर चित्र, गतस्मृती, शब्द, विविध भावना, माणसा माणसातील नातेसंबंध, निसर्ग, आयुष्यात घडणाऱ्या नानाविध घडामोडी, जीवनाशी निगडित प्रत्येकच गोष्ट त्यांच्या या गझलातून वाचावयास मिळते आणि वाचल्यावर वाचकही परांगमुख होतो असा माझा अनुभव आहे.
कुंपण चरते आहे’ ही गझल वाचली की खरंच पटतं, आपल्याला आयुष्यात इतकी माणसं भेटतात आणि इतके अनुभव येतात, की कोण कसे आहे, कुणावर कसा विश्वास ठेवावा हा प्रश्नच पडतो. त्या म्हणतात…..
कसा धरावा बरे भरवसा आणि कुणाचा कोणी
अहो बघा तर कुंपण येथे चर चर चरते आहे
… या ठिकाणी कुंपण शेत खाते या म्हणीची आठवण येते.
का वय पहावे – कोणतीही गोष्ट करण्यासाठी वयाचे बंधन पाळणे नको हा फार मोलाचा संदेश या गझलेत मिळतो. पावसात भिजण्यासाठी, फुलण्यासाठी, सुरांच्या संगतीत झुलण्यासाठी, लुटुपुटूचे रुसण्यासाठी आणि शेवटी नश्वर देहाचा त्याग करण्यासाठी का वय पहावे? असा सवाल त्या वाचकांना विचारतात.
रस्ते ही अशीच एक वेगळी गझल! रस्त्यांच्या माध्यमातून स्थितप्रज्ञतेचे महत्व गझलकारा वाचकांना सांगतात…..
किती कष्टती किती साहती परोपकारी रस्ते
निर्वीकारी स्थितप्रज्ञ मज संत वाटती रस्ते
समाजातील घातक प्रवृत्तीनी गझलकारा संजीवनी ताई विचलित झाल्या आहेत. आपल्या मुलांचं परदेश गमन, आतंकी हल्ले, विकृत नराधम वृत्ती यांना कैसे थोपवावे हा महाविकट प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे, त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीत सगळ्याच गोष्टींचे एक प्रकारचे*अनामिक भय* मनाला ग्रासले आहे. दागिने घालण्याचे, कुणाला काही सांगायचे, बाजारातून काही विकत आणायचे, अगदी साध्या सुध्या गोष्टींचे भय वाटत असते. त्या म्हणतात,
तुम्हासारखा पोटी यावा पुत्र वाटते
राजे तुमचे नाव द्यायचे वाटतसे भय
. खरोखरीच विचार करण्यास लावणारा असाच हा शेर आहे.
‘ अतर्क्य ‘ ही सुद्धा समाजाचे भेसुर चित्र दर्शविणारी गझल म्हणता येईल.
* आयुष्याच्या मैफलीत मी रमते सखया*
* संसाराला जरी ओढता दमते सखया*
* समरस होणे पर दुःखाशी स्वभाव माझा*
* देह झिजविणे दुसऱ्यासाठी गमते सखया*
संसारात पती, मुलांसोबत रममाण झालेली ही स्त्री असली तरी *अविरत चिंतन तुझेच करते मनी मानसी*
* तुलाच भजण्या केवळ वाणी श्रमते सखया*
कुठेतरी ईश्वर भजनात, नामस्मरणात रमणारी ही स्त्री आहे. म्हणजे पुन्हा अध्यात्म कुठेतरी डोकावतेच आहे.
‘हिंदोळा’ या गझलेतून मात्र एका सामान्य संसारी स्त्रीची मनोवृत्ती स्पष्ट दिसून येते.
दिले झोकुनी संसाराच्या रगाड्यातची
स्वातंत्र्याच्या कल्पनेत मम दुमत राहिले
.. स्त्री कितीही स्वतंत्र झाली, तरी कुठेतरी ती बंधनात अडकलेली आहेच हे त्रिकालाबाधित सत्य या शेरातून दिसते. याच विषयावरील आयुष्य दावणीला या गझलेला विसरून चालणार नाही.
निसर्गाचा होत असलेला ऱ्हास आणि त्याचे दुःख ‘वसुंधरा’ या गझलेत व्यक्त झाले आहे.
शेवटचा शेर– – *माय मी असे तुझी नको करू व्यथीत रे*
काळजी मात्र तुझीच बोलली वसुंधरा काळजाला भिडणारा आहे. आईला कितीही त्रास दिला तरी ती तिच्या लेकराच्या भल्याचाच अहोरात्र विचार करीत असते आणि त्यासाठी स्वतःला कष्टवित असते. वसुंधरा ही अशीच आपली माय आहे आणि माणसाने तिचा कितीही ऱ्हास केला तरी तिला माणसाचीच काळजी वाटते. क्या बात है!
कृष्ण गोकुळ सोडून द्वारकेला जाताना राधेच्या मनाची विकलावस्था ‘राधा’ या गझलेत गझलकाराने मांडली आहे. ही जरी गझल असली तरी कवितेकडे झुकणारी गझल आहे, म्हणून अधिक भावते यात शंका नाही.
‘श्रावण’ ही गझलसुद्धा एक निसर्ग कविताच वाटते. श्रावण महिन्याच्या पावसातल्या सरींनी वातावरणातला अल्हाद, बहरलेल्या वृक्ष लता, सण वारांचा उत्साह या सर्व गोष्टी या काव्यमय गझलेला चैतन्यमय करतात.
खरंतर या संग्रहातील प्रत्येकच गझल वाचून विचार करण्यास लावणारी आहे. परंतु सर्व बासष्ट गझलांवर भाष्य करणे उचित होणार नाही. वास्तविक माझ्या मते यातील एकेका गझलेचे स्वतंत्रपणे रसग्रहण झाले पाहिजे, इतक्या या गझला परिपक्व अशा आहेत.
अगदी नवख्या वाचकालाही सहज समजेल की ही गझलकारा सामान्य नसून एक अनुभव संपन्न दीर्घ आयुष्य जगलेली अशी स्त्री आहे.
गझलाच्या तांत्रिकते विषयी काय बोलावे? प्रत्येकच गझलेची जमीन, गझलियत ही
अगदी जोरकस आहे, म्हणूनच गझल वाचल्यावर वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे. या गझलातील आनंदकंद, भुजंगप्रयात, मंजूघोषा, देवप्रिया, राधा वगैरे गणवृत्ते आणि अनलज्वाला, हरी भगिनी, वनहरिणी यासारखी मात्रावृत्ते अगदी योग्य पद्धतीने वापरली असल्यामुळे सर्व रचना लयबद्ध झाल्या आहेत. गझलातील कमाल, जहाल, धमाल, गुलाल, मशाल, किंवा हिरे, नुरे, भरे, यासारख्या स्वरकवाफी यातून गझलकाराची भाषा समृद्धी दिसून येते.
‘अभिजात’ ही एक वेगळी गझल म्हणता येईल. भाषेतील अक्षरांचे किती उपकार जीवनात आहेत याची जाणीव करून देणारी ही गझल आहे. अलवार अक्षरांची गीते, दमदार अक्षरांचे लेख, अलवार, दमदार, सरकार, दरबार, उपकार, फिटणार – अशा या अतिशय जोरदार कवाफी म्हणता येतील.
घडवेन अक्षरांचे अभिजात छान लेणे
तरीही न मात्र देणे फिटणार अक्षरांचे
– आईचे उपकार कधीही न फिटणारे असतात, तद्वतच हे मातृभाषेचे उपकार आहेत.
मुसलसल आणि गैर मुसलसल असे दोनही प्रकारचे गझल या संग्रहात वाचावयास मिळतात.
डॉ. संजीवनी ताईंचा हा गझल संग्रह 101% वाचकांच्या पसंतीस उतरणार यात शंकाच नाही. अधिकाधिक वाचकांनी तो अवश्य वाचावा ही विनंती.
या पखालीच्या घवघवीत यशासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी डाॅ. संजीवनीताईंना माझ्या भरभरून मनःपूर्वक शुभेच्छा!
परिचय : अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈








धन्यवाद अरुणाताई. खूप छान, अभ्यासपूर्ण लेखन.