श्री अनिल वामोरकर
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ “भाजलेल्या शेंगा” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
मित्रांनो, आपण रोज जीवन जगतो… पण बऱ्याचदा आपल्या जगण्यातली गोडी हरवलेली असते. कारण? कारण आपण पावलोपावली नाराज होतो, आणि तेही अशा बारीक सारीक गोष्टींवरून, ज्या क्षणभरात विसरून टाकायला हव्या होत्या. पण त्या मनात कुठेतरी खोलवर कायमस्वरुपी घर करून राहतात… आणि मग सारा दिवस, कधी कधी संपूर्ण आयुष्य नाराजीतच जातं!
कधी एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा मनासारखी घडली नाही म्हणून, कधी कोणी हसून बोललं नाही म्हणून, कधी एखाद्यानं साधं ‘थॅंक यू’ बोललं नाही म्हणून, कधी एखाद्यानं आपलं मत नाकारलं म्हणून, कधी चुकून कुणीतरी विसरलं म्हणून…. या अशा कितीतरी गोष्टींवरुन आपण सतत नाराज होत असतो.
खरंच विचार करा मित्रांनो, यातून काय मिळतं हो?
मानसशास्त्र सांगतं, माणसाचं मन म्हणजे एक ‘कंटेनर’ आहे. ते सतत आठवणी, प्रसंग, भावना साठवत जातं. पण त्यात नेमकं काय साठवायचं, हे आपल्यावर असतं. जर प्रत्येक छोटीशी नकारात्मक गोष्ट आपण गोळा करत राहिलो, तर मन हे डस्टबिन होऊन जातं. पण जर त्याऐवजी आपण एखाद्याचं हसू, एक छोटासा गोड क्षण, एखाद्यानं दिलेलं प्रेम लक्षात ठेवलं, तर हेच मन ‘गार्डन’ होऊन जातं.
नाराज राहणे ही एक सवय असते. हो, सवयच. आणि तीही फार हळूच लागते. ती सवय वाढत जाते आणि मग आनंदाची दारं हळूहळू बंद व्हायला लागतात. कारण नाराज मन आनंदाला श्वास घ्यायलाच देत नाही.
कधी बसमध्ये कुणीतरी आपल्याला धडकून गेलं, कधी एखाद्यानं फोन नाही उचलला, कधी मित्रांनी आपल्याशिवाय प्लॅन केला, कधी घरात कुणी आपल्या कामाची दखल घेतली नाही, अशा रोजच्या कितीतरी बारीक सारीक गोष्टी असतात ज्यामुळे आपण आपल्या मनातल्या ‘मी’ला दुखावतो.
पण आपण एक गोष्ट मात्र विसरतो- ती म्हणजे सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष देणं, आपल्याशीच प्रेमानं वागणं, आपल्याला केंद्रस्थानी ठेवणं असा काही सृष्टीचा नियम नाही. प्रत्येकाला आपलं आयुष्य, आपली जबाबदारी, आपले स्वभाव आणि मर्यादा असतात.
मानसशास्त्र सांगतं – “Perception is projection. ” आपण जसं पाहतो, तसं आपल्याला दिसतं. जर आपण सतत दोष बघत राहिलो, तर जगात सगळं चुकीचं वाटेल. पण जर आपण क्षमाशीलतेनं पाहिलं, तर समजूत आणि प्रेम हे खूप सोपं होऊन जातं.
मन म्हणजे एखाद्या बाळासारखं असतं. त्याला शिकवायला लागतं. रोज थोडं थोडं. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण ठरवलं पाहिजे- “आज मी कुणावर नाराज होणार नाही. “
आणि तसं रोज करत गेलं, की मनातला नाराजीचा अंधार तुटतो आणि आनंदाचा अन् समाधानाचा लख्ख प्रकाश उमलतो.
मित्रांनो, आनंद ही अवस्था नसते, तर ती वृत्ती असते. ती आपण ‘घडवायची’ असते. कोणी चुकलं, दुर्लक्ष केलं, अपमान वाटावा, असं वागलं तर स्वतःला एकच प्रश्न विचारावा-
“यामुळे मी नाराज राहिलो, तर काय साधणार आहे? ”
अशावेळी एक छोटा श्वास घ्या, डोळे मिटा, आणि स्वतःलाच सांगा- “मी क्षमा करतो. मी मुक्त होतो. ”
माफीत खुप शक्ती असते. माफ करणं म्हणजे दुसऱ्याला काहीतरी देणं नव्हे तर ते स्वतःला शांतता देणं आहे. कारण प्रत्येक नाराजी, राग, खंत ही आपल्या मनावर एक ओझं टाकत असते. जोपर्यंत नाराजी, राग आपल्या मनात आपण साठवून ठेवतो, तोपर्यंत आपण त्या ओझ्याखाली दबलेले असतो… आपल्याला अजिबात मोकळं वाटत नाही… मात्र जेव्हा आपण माफ करतो तेव्हा आपण त्या गोष्टीच्या गुंत्यातून स्वतःला अलग करतो आणि तेव्हाच खरं सुख, खरी मोकळीक अनुभवायला लागतो.
आपण खूश राहणं ही काही इतर कोणाच्या वागण्यावर अवलंबून असणारी गोष्ट नाही… खूश राहण्याचा कंट्रोल आपल्याकडेच असावा असे वाटत असेल, तर त्याबाबत मनाला शिस्त लावणे गरजेचे असते.
शिस्त ही की-
✩ गोष्टी personally न घेणं
✩ दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची तयारी ठेवणं.
✩ आणि स्वतःला सतत सांगणं, “माझा आनंद माझ्या हातात आहे! तो इतरांवर अवलंबून नाही. “
जगात प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवतो. जर आपण एखाद्यामुळे दुखावलो गेलो, तर त्याने आपली सहनशक्ती वाढते. जर कुणी दुर्लक्ष केलं, तर त्यातून आपण ‘स्वतःकडे’ वळतो. आणि ही ‘स्वतःकडे’ वळण्याची वाट, हीच खरी आत्मशांतीची वाट असते.
कधी कधी मनातला एक छोटासा विचारसुद्धा जीवन बदलवण्यास कारण ठरतो.
जसं “काहीही झालं तरी, मी आजही सुखात आहे, समाधानी आहे. “
हा विचार संपूर्ण दिवस सकारात्मक प्रकाशाने भरून टाकतो.
थोडक्यात,
आनंद मिळवायचा नसतो, तो घडवायचा असतो.
राग विसरायचा नसतो, तो सोडायचा असतो.
नात्यांत परिपूर्णता शोधायची नसते, तर स्वीकाराची जागा तयार करायची असते.
आणि या सगळ्याचं मूळ आहे आपल्या मानसिकतेत. ती आपण घडवू शकतो. हळूहळू, रोज थोडी थोडी. कारण मन घडतं… आपल्याच हातांनी. ते फुलवायचं की बिघडवायचं, हे आपणच ठरवायचं.
चला तर मग आजपासून नाराजीला सुट्टी देऊया… कारण, आता आपण ‘खूश’ राहायला शिकतोय!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




