सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “अंगणातील आभाळ” – लेखक : डॉ. यशवंत पाठक ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

पुस्तक : अंगणातील आभाळ

लेखक : डॉ. यशवंत पाठक

प्रकाशन : ग्रंथाली प्रकाशन 

‘अंगणातील आभाळ’ हे डॉ. यशवंत पाठक यांचं आत्मकथन. याची सुरुवात दोन शब्दापासून होते. ते मुळी प्रास्ताविक वाटतच नाही. तिथूनच आत्मकथेला सुरुवात झालीयसं वाटतं. त्यात त्यांनी म्हंटलय, बालपणीपासून ते ४ थी पर्यन्त ते पिंपळनेरला होते. ते एकत्र कुटुंब होतं. घरात बावीस माणसे. आजोबांचा मोठा मुलगा भाऊ. म्हणजे नानाचे वडील. घरात यशवंताला नाना म्हणत. पुस्तकभर आपल्याला नानाच भेटतो. यशवंत नाही. आई म्हणाली, ’नानाला नाशकाला घेऊन जाते. ’ तेव्हा घरात सगळ्यांनीच आकांडतांडव केलं. आईला नाही नाही ते बोलले. आजी म्हणाली, ‘नानाला ने. शिकव. ‘ 

या ‘दोन शब्दात’ त्यांनी दोन-तीन वाक्यात आजोबा- आजीला डोळ्यापुढे उभं केलय. आपल्याला ‘शब्दाचे आभाळ’ दाखवणार्‍या आजोबांना आणि आपल्या सायपदराखाली जपत ‘अनुभवाचे आभाळ’ दाखवणार्‍या आजीला त्यांनी हे पुस्तक अर्पण केलं आहे.

अखेर आई नानाला नाशिकला घेऊन आली.

इथून पुढे त्यांची आत्मकथा येते. एस. एस. सी. ते पीएच. डी. पर्यंतचा प्रवास यात आहे, असे त्यांनी लिहिले आहे.

नाशिकचे त्यांचे घर नदीकाठी. गोदावरीला तिथे गंगाच म्हंटलं जातं. घर वरच्या मजल्यावर. घरातून पंचवटीतल्या सर्व देवांचं दर्शन होई. घर दोन लहान खोल्यांचं. त्यात नाना, त्याची दोन धाकटी भावंडे बंड्या, बेबी, आई आणि वडील भाऊ, म्हणजे त्र्यंबकबुवा राहत. ते प्रसिद्ध कीर्तनकार होते. त्यामुळे जागोजागी जाऊन ते कीर्तने करीत. कीर्तनात मिळालेला शिधा (धान्य वगैरे), आरतीतले पैसे व मिळालेली बिदागी, यावर घर चाले. दिवसेंदिवस ही मिळकत कमी होत गेली. दारिद्र्य हे प्रारब्ध झाले. संसार फटका झाला, पण आई तो शिवून, त्याला ठिगळं लावून काटकसरीने तो करायची. कुणाकडे काही मागणे तिला नको वाटे. ती मायाळू होती, तशीच कर्तव्य कठोर होती. भाऊ दिसायला राजबिंडे, विद्वान, अभ्यासू, चांगले गाणारे. उत्तम कीर्तंकारात जे जे म्हणून हवे, ते भाऊंकडे होते. भाऊ संतापी होते, पण त्यांचा संताप लगेच जाई. ते तसे प्रेमळ होते.

घराच्या ४२ पायर्‍या उतरून खाली आले की पायाला अंगण लागे. वर आभाळ दिसे. वास्तवाच्या अंगणात नाना आभाळाएवढे उंच होण्याची स्वप्ने बघे.

अंगणातून बाहेर आले, की पायाखालची असीम जमीन त्यांना आभाळाएवढे अनुभव देई. यात अनेक प्रकारचे अनुभव होते. कडू- गोड, आंबट-चिंबट, खारट-तुरट….. अनेक प्रसंगातून घेतलेले अनेक अनुभव. ते प्रसंग, त्यातील सहभागी लोक, त्यांचे संवाद, या सार्‍यातून त्यांनी त्यांच्या जीवनात भेटलेल्या अनेक व्यक्तींची आपल्याला भेट घडवलीय. त्यात बाळासाहेब दिंडोरकर, सोहोनी सर, कार्डिलेले सर, श्री. रा. टीकेकर यांच्यारखी विद्वान, आदरणीय मंडळी आहेत. घराशेजारी रहाणार्‍या हडपीण काकू, रोज सकाळी येणारा वासुदेव, न्हाव्याचे काम करणारा भिकुबुवा यासारखी अनेक मंडळी आहेत. त्यांची वर्णने वाचून त्या त्या व्यक्ती डोळ्यापुढे उभ्या रहातात. त्यांच्या घरांचं वर्णनही अगदी बारकाव्याने केलं आहे.

 एका मठातील महंताबद्दलही त्यांनी खूप लिहिलय. त्यांना नानाबद्दल आस्था आहे,. नानाच्या कॉलेजच्या अ‍ॅडमिशनाला पैसे कमी पडत होते. कुठेच कुणाला काहीही न मागणार्‍या नानाच्या आईने नाईलाजाने त्यांच्याकडे पैसे मागितले होते. ‘लवकरच परत करीन’, असंही ती म्हणाली. त्यांच्यावर तिची श्रद्धा होती. एका शेठाजींकडून त्यांनी नानाच्या शिक्षणासाठी मदत मागीतली. शेठजींनी त्याला आनाथ मुलांच्या फंडातून पैसे पैसे दिले. पण त्याला ते आवडले नाही. तो म्हणतो मी अनाथ नाही. महंतांनी ते पैसे आईला परस्पर दिले. नानाने त्यांना हात लावत नाही. आई म्हणाली, आपली परिस्थितीच अशी. काय करणार? यामुळे तू काय खरोखरच अनाथ झालास का? ‘हा सगळा प्रसंग प्रत्यक्षातच वाचायला हवा.

पुस्तकात अनेक प्रसंग असे आहेत, की जे प्रत्यक्षात वाचूनच त्यातला आनंद, किंवा, परिस्थिती किंवा मर्म समजून घ्यायला हवे. असाच एक प्रसंग, चिपळूणला रामनवमीच्या निमित्ताने केलेल्या कीर्तनाचा. कीर्तने उत्तम झाली. नाना तबल्याच्या साथीला. सुरूवातीला त्याच्याबद्दल साशंक असलेले मुख्य ट्रस्टी महाबळेश्वरकर त्याच्या तबला वादनावर खूश होऊन गेले. आईदेखील दुपारी दोन ते चार बायकांसाठी कीर्तन करी. या वेळी त्यांची संभावनाही चांगली झाली. हे सगळं वर्णनही प्रत्यक्षच वाचायला हवं.

नाना कोलेजमध्ये शिकत असतानाच अभिषेक, मंत्रजागर, शांतिपाठ, सदावर्त, एकादष्णी, संकल्प सोडणे, इ॰ कामे गरजेनुसार करत असे. आर्थिक गरज होतीच. यावेळी कॉलेजच्या मित्र-मैत्रिणीनी आपल्याला अशा अवतारात पाहू नये, असे त्याला स्वाभाविकच तारुण्यसुलभ भावनेने वाटत असे. मंदिरात आणि नदीकाठी अशी धार्मिक कृत्ये करताना, भटजींच्यातले परस्परातले हेवे-दावे, भांडणे, मत्सर, स्वत:ला श्रेष्ठ ठरवणे, इतरांची मानहानी करणे, इतरांची गि-हाइके आपल्याकडे ओढणे, या गोष्टी कशा घडत, त्याचे प्रत्ययकारी वर्णन लेखकाने केले आहे.

चतुर्मासात अनेक शेठजी ब्राम्हण भोजन घालत. वस्त्र-पात्र- दक्षणा देत. अशाच एका प्रयोजनाला वडील बाहेरगावी गेले असल्यामुळे नानाला जावे लागले. त्या कार्यक्रमात काय काय घडले, जेवायला पानावर बसलेल्याला उठवून दुसरीकडे बसवणे, जगन्नाथ भटांनी शेठजींच्या पुढे दाखवलेली लाचारी, इतरांशी मात्र अरेरावी, त्यांचे व विष्णु भटाचे माना-पानावरून झालेले भांडण, मारामारी हा सगळा भाग प्रत्यक्ष वाचूनच अनुभवायला हवा. आध्यात्मिक क्षेत्रात वावरणार्‍या या लोकांचे पाय मातीचे आणि मने कशी चिखलांनी बरबटलेली आहेत, याचे दर्शन इथे होते.

कॉलेजमध्ये शिकताना नानाचा सहभाग वक्तृत्व, निबंधस्पर्धा, संस्कृतिक कार्यक्रम इ. मध्ये असे. अधून-मधून भिक्षुकीही होतीच. पुढे त्याला शाळेत टायपिस्टची नोकरी मिळाली. बी. ए. ला ऑनर्स मिळाल्यावार त्याच (तो शिकत असलेल्या) शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. नंतर त्यांनी एम. ए. केले. त्यांतर त्यांना मनमाडच्या कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. प्राध्यापकाच्या नोकरीसाठी विविध कॉलेजेसमध्ये इंटरव्ह्यू देताना झालेले संवाद, त्यातील राजकारण यांचे नेमके दर्शन त्यांनी घडवले आहे. पुढे मनमाड च्या डॉक्टर महाजनांशी त्यांचे मैत्र जुळले. त्यांनी पीएच. डी. करण्याचा आग्रह धरला. बाळासाहेबांनी विषय सुचवला, ’कीर्तन परंपरा आणि मराठी वाङ्मय’ मग या विषयावर त्यांचा अभ्यास चालू झाला.

कीर्तनाच्या नारदीय, वारकरी, रामदासी, गाणपत्य इ. अनेक परंपरा आहेत. मग त्यांचे वारसदार, मठपती महंत, बुवा इ. ना भेटणे, त्यांच्या परंपरा समजून घेणे, आख्याने, पोथ्या, बाडे मिळवणे यासाठी भ्रमंती, अभ्यास सुरू झाला. या भ्रमंतीत, मठपती, महंत, बुवा इ. चे आलेले अनुभव, त्यांच्याशी घडलेले संवाद, दिले आहेत. इथेही स्वत: आणि आपली परांपराच कशी श्रेष्ठ याबद्दल तावातावाने बोलणे, दुसर्‍याला हीन, कमी लेखणे, याचे त्यांनी खुमासदार शैलीत वर्णन केलं आहे. अनेक बाडातून त्यांना दुसर्‍याची आख्याने स्वत:ची म्हणून दिलेली दिसली. म्हणजे इथेही कीर्तन चौर्य आहे तर, त्यांच्या मनात आले.

प्रत्यक्ष लेखन करताना आपल्या पत्नीचा आपल्याला खूप उपयोग झाला, असं कृतज्ञतापूर्वक त्यांनी लिहिलय. विशेषत: लेखन सोप्या भाषेत रसाळपणे लिहीले गेले पाहिजे, याबद्दल ती आग्रही होती.

प्रबंध सबमिट् करतानाचा अनुभवही त्यांनी मोठ्या खुसखुशीतपणे लिहिला आहे. अर्थात् वाचकाच्या दृष्टीने. लेखकाची परिस्थिती तेव्हा कशी झाली असेल तोच जाणे. महिन्याभराने त्यांना पीएच. डी. मिळाल्याचे पत्र आले.

नानाला पीच. डी. मिळाली, तेव्हा भाऊ मात्र हयात नव्हते. त्यांची आत्यंतिक इच्छा होती, की नानाने उत्तम कीर्तनकार बनावे. नाना काही कीर्तनकार झाला नाही. पण त्याने ‘कीर्तन परंपरेवर’ संशोधन करून भाऊंची कीर्तनाची नाळ जोडून घेतली

पुस्तकाचा हा परिचय म्हणजे ट्रेलर आहे. नानाच्या जीवनात घडलेल्या गोष्टी, त्याने घेतलेले अनुभव, विविध प्रसंग, त्या त्या वेळचे संवाद, त्यातून आणि निवेदनातून व्यक्त झालेली व्यक्तिचित्रे, वातावरण, लेखकाचं व्यक्तिमत्व, त्याचं भावविश्व, हे सगळं नीट समजावून घेण्यासाठी ‘अंगणातलं आभाळ’ वाचायलाच हवं. पुस्तकाच्या शेवटी आपल्या, ‘अंगणातील आभाळावर एक अतिशय सुरेख थोडी दीर्घ कविता लेखकाने दिली आहे.

पुस्तकाचे मूखपृष्ठ मात्र आकर्षक आणि सार्थक वाटत नाही. कदाचित् मला त्याचे मर्म उलगडले नसेल.

परिचय : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments