सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

काना मात्रा वेलांटी….भाग – 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सुरुचीसाठी आदर्श निबंध  लिहायला हवा.असे मी ठरवते आता पुढे..)

सुरुचीच्या आणि माझ्या वयातलं अंतर! ती उमलणारी बालिका आणि माझे पक्व मन.खऱ्या खोट्यातून गेलेली मी. जागोजाग धुक्कळ पसरलेले. पण तरीही मला हे अंतर पार करून तिच्या लेव्हल पर्यंत जायला हवेच.

ऑफिसातला हाही दिवस माझा नेहमी प्रमाणे गेला. कामात गुंतलेला.मिलवानीची  चार्जशीट तयार झाली. रमीला काटदरे येऊन गेली. वाटत होती तेवढी ती लेचीपेची नव्हती. चांगली संतुलित आणि कणखर दिसली.

लंच टाईम जरा हलकाफुलका रिकामा गेला.

सुरेंद्र पांडे भविष्य पहायचा. तो सहज म्हणाला

” मॅडम आज मी तुमचा हात पाहतो.”

तशी स्टाफशी   माझी रिलेशन्स खेळीमेळीची आहेत. कधी कामापुरते वाद-विवाद होतात. वातावरण उष्ण आणि गढूळ होते. पण पुन्हा उडालेला धुरळा जमिनीवर बसतो आणि हवा मोकळी स्तब्ध शांत होते.

सुरेंद्र ला मी हात दाखवला.

” हं बघा.

त्यांनी माझा हात उलटासुलटा करून पाहिला. सांगितलं मात्र काहीच नाही. शेवटी मीच कंटाळून म्हणाले,

” अरे! काहीतरी सांग. वाईट असलं तरी चालेल मला.”

” मॅडम तुम्ही फार चांगल्या आहात!पण तुम्हाला चंद्रबळ कमी आहे. त्यामुळे मानसिक सौख्य कमी. तुम्ही सगळ्यांसाठी झटता. पण तुमच्या कृतीचे सगळीकडेच चुकीचे अर्थ निघतात.  पण आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्ही बऱ्याच अध्यात्मिक बनाल.”

” का कोण जाणे! पण थोडीशी मी डिप्रेस्ड झाले. क्षणभर मनात आलं सुरेंद्र ला खरंच कळत असेल का काही .थोडेसे त्यांनी बरोबर हे सांगितले. पण मनाला बजावलं. आपण बुद्धिवादी आहोत.  one must master our stars या विचारांचे आहोत. मनाची अशी घसरगुंडी होता नये.

पुन्हा केबिनमध्ये गेले. उगीचच माझीच केबिन मला नव्यासारखी आणि परकी वाटू लागली. भिंतीवरचे गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस ,इंदिराजींचे फोटो कोपर्‍यातली पृथ्वी, टेबलावरच्या ग्लास मधून दिसणारी कॅलेंडर्स,मॅथेमॅटिकल टेबल्स, कुणाकुणाचे पत्ते, वुमन मॅगझीन मधले माझ्या मुलाखतीचे कात्रण. पण त्या सर्व नीरस, रंगहीन कागदामध्ये एक चित्र होतं! विस्मयाने काढलेले.  अनेक रंगांनी रंगवलेलं. एक घर होतं. पक्षी होते. उंच झाडे होती. दोन समांतर रेषा घरापासून निघालेल्या.ती एक वाट होती. दूर दूर जाणारी. या टोकापासून त्या टोकापर्यंत.

संध्याकाळची वेळ.  दिवस संपत आल्याची चाहूल देणारी.

ऑफिस ते घर. परतीचा प्रवास. पुन्हा घराचे विचार. सकाळचं विस्मयाचं ठणठणीत बोलणं आठवलं.

” तुला वेळच नसतो  आमच्याशी बोलायला.”

आजचा दिवस मात्र चांगलाच समजायचा. नाही तर रोज काही ना काही कारणावरून ऑफिस मधून परतायला उशीर होतोच. आज ऑफिसर्स कोआॅर्डीनेशन मिटींगला जाण्याचे टाळले म्हणून. पुढल्या सेशनला  चंद्रमणी बोलेलंच काहीतरी. नोकरी करणाऱ्या स्त्रियांविषयी त्याला फारच राग आहे. म्हणजे तसं आपण कधीही मिटिंग चुकवत नाही पण आज सकाळीच सुरुची ला प्रॉमिस केले होते . तिचा निबंध आज लिहून दिलाच पाहिजे.

मी कोण होणार.?

अजून काही ठरलं नाही. स्कूटरवरून जाताना समोरून चेहऱ्यावर येणारा वारा कसा सुखद वाटत होता! हा वारा, ही गती, मला फार आवडते. मनातल्या विचारांना एक ठेका देते.. आज काय झालं असेल ते असो, पण उद्या नक्की चांगलं होईल असा आशावाद निर्माण करते. आज सिग्नल पाशी ही थांबावं लागलं नाही. समाधान वाटलं. तेवढाच वेळ वाचला.

घरी आले तेव्हा सुरुची खेळायला गेली होती.  विस्मयाला अमृता घेऊन गेली होती. काय केले टेस्ट मध्ये कोण जाणे! बहुतेक नीट केली असणार. तसा व्हेरी गुड रिमार्क असतोच तिला. तारा ही सर्व आवरून माझीच वाट पाहत होती. मी वाॅश  घेतला. हाऊस गाउन चढवला. ताराने गरम चहा आणून दिला. तो घेतला. हातात वही पेन्सिल घेऊन बसले. सुरुची येईपर्यंत काहीतरी मुद्दे काढून ठेवू या. सुरूची चा निबंध चांगला झालाच पाहिजे.

टेबलवर वही होती सुरूचीची . शेवटच्या पानावर पेन्सिलीने काहीतरी लिहिले होते.

मी कोण होणार? डॉक्टर, इंजिनियर, पत्रकार, पुढारी, समाजसेविका, गायिका की चित्रकार? नको रे बाबा!! यापैकी मला काहीही व्हायचे नाही.  मी सांगू? मला कोण व्हायचंय?

आई …

एक चांगली आई . म्हणजे विद्वान  नव्हे. ऑफिसात जाणारी आई नव्हे. मला मुलांवर कधीही न चिडणारी, सदैव प्रेमाने वागणारी, मुलांशी खेळणारी, गप्पा मारणारी, हसरी, खेळणारी आई व्हायचे आहे. श्यामच्या आई सारखे. रात्री झोपताना गाणं म्हणणारी. गोष्टी सांगणारी. आई होणं किती महान आहे! जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी! या जगातली चांगली आईच कुठेतरी हरवलेली आहे.

पुढच्या ओळी मला दिसल्साच नाहीत. माझे डोळे पाण्याने डबडबले. ही माझी अकरा वर्षाची मुलगी विचार करू शकते? तिच्या बाल मनातून ओघळलेले नैसर्गिक भाव!  शब्द चुकले असतील. काना, मात्रा वेलांट्या कुठेकुठे राहिल्या होत्या. चुका शुद्धलेखनाच्या होत्या. पण विचार प्रामाणिक आणि निडर होते. आयुष्याला ही असेच व्याकरण असते का? काना मात्रा वेलांट्या  तिथेही  असतात कां? जशा त्या शब्दाला आकार देतात, अर्थ देतात. त्या चुकल्या तर शब्दाचा उच्चार बदलतो. शब्द बेढब, अर्थहीन बनतो. सुरुची चे शुद्धलेखन सुधारण्याचा मला अधिकार आहे का? तिचे विचार पुस्तकी नव्हते.  ते सहजस्फूर्त  होते. भावनिक कुपोषणामुळे निर्माण झालेला तो विद्रोह होता. एका चौकटीतल्या सुंदर चित्रातला न दिसणारा,तो एक प्रमाण  चुकलेला आकार होता. तो टिपून घ्यायला एखाद्या कलाकाराची दृष्टी हवी. डोळे झाकले म्हणून दोष जात नाहीत. जे एखाद्याला सुंदर दिसतो ते दुसऱ्याला तसं दिसेलच असं नाही. सुरुची ने लिहिलेल्या त्या ओळी वाचून मी एकदम पराभूत झाले. मी कोण होणार होते, कोण झाले, मला काय मिळालं ?

धपकन सुरूची ने माझ्या गळ्यात हात घातले.

“मम्मी केव्हा आलीस? आणि मी लिहिलेलं तू वाचलंस मम्मी? मी असंच लिहिलं. गंमत म्हणून. मला वाटलं म्हणून. आय डोंट मिन ईट मम्मी! आय लव यु व्हेरी मच! मेरी अच्छी मम्मी! चल आपण परत लिहूया. फेअरबुकमधे असं काही लिहून चालणार नाही.  दुसरं काहीतरी लिहूया.

मग मी सुरुचीचा एक पापा घेतला.

“नको काय हरकत आहे हेच लिहिलं तर? हे छान आहे. खूप सुंदर लिहिले आहेस तू. तेवढे काना, मात्रा, वेलांट्या कुठे कुठे विसरली आहेस.. तेवढं दुरुस्त कर…..

समाप्त

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments