गौरी गाडेकर
इंद्रधनुष्य
☆ Gen Z’ असणे म्हणजे नेमके काय? – लेखिका : मेधा खासगीवाले ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर ☆
काल एका किंचाळकन्येचं वक्तव्य ऐकले आणि मन अक्षरशः सुन्न झाले. “आम्ही Gen Z आहोत, हे टॉलरेट करणार नाही”, असे म्हणत ती *कारगिलसारख्या* अत्यंत दुर्गम आणि संवेदनशील भागात गस्त घालणाऱ्या सैनिकांविषयी अतिशय अपमानास्पद भाषेत बोलत होती.
‘Gen Z’ असणे म्हणजे नेमके काय?
आधुनिक असणे, प्रश्न विचारणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे सर्व स्वागतार्हच आहे. पण ह्याचा अर्थ इतिहासाचे अज्ञान, कर्तव्याविषयी अनादर आणि देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्यांचा अपमान असा निश्चितच होत नाही.
कारगिल ही केवळ पर्यटनासाठीची रमणीय जागा नाही. त्या पर्वतरांगांतील प्रत्येक दगडामागे शौर्याची, त्यागाची आणि रक्ताची कहाणी दडलेली आहे. याच भूमीत २७ वर्षांपूर्वी भीषण युद्ध झाले. त्या युद्धात पाचशेहून अधिक भारतीय सैनिकांनी प्राणांची आहुती दिली आणि त्याहून कितीतरी अधिक सैनिक गंभीर जखमी झाले, कायमचे अपंग झाले. असंख्य कुटुंबांनी आपले पुत्र, पती, वडील आणि भाऊ गमावले. आजही त्या परिसराचे रक्षण करण्यासाठी सैनिक प्रतिकूल हवामानात आणि जीवघेण्या परिस्थितीत अखंड गस्त घालत असतात.
अशा संवेदनशील भागांतून कधी सैनिकांचे ताफे जातात, तर कधी शस्त्रास्त्रे, अन्नधान्य आणि इतर आवश्यक युद्धसामग्रीची वाहतूक केली जाते. सुरक्षेच्या कारणास्तव काही वेळ रस्ते बंद ठेवावे लागतात. पुलवामा अटॅक आपल्यासमोरच झाला आहे. पर्यटक म्हणून आपण तिथे गेलो असू आणि त्यामुळे आपल्याला थोडा विलंब किंवा गैरसोय झाली, तरी ती जाणीवपूर्वक केलेली अडवणूक नसते. ती देशाच्या सुरक्षेसाठी असलेली अपरिहार्य व्यवस्था असते.
आपल्या दहा दिवसांच्या पर्यटनापेक्षा, देशाची सुरक्षा नक्कीच अधिक महत्त्वाची आहे, एवढे साधे भान आपल्याला असू नये का?
“आमच्या करातून सैनिकांचा पगार दिला जातो, त्यांना सैन्यात भरती व्हायला आम्ही सांगितले होते का? ” अशा प्रकारची वक्तव्ये करताना लाज वाटत नाही का? हे ऐकताना मनात एकच प्रश्न उभा राहतो की नागरिक म्हणून आपल्याला अधिकार शिकवले जातात; पण कर्तव्ये, संवेदनशीलता आणि कृतज्ञता शिकवली जात नाहीत का?
— — होय, सैनिकांना पगार मिळतो. पण पगार अनेकांनाच मिळतो. उणे ३५ अंश तापमानात, प्राणवायूची कमतरता असताना, बर्फाच्छादित पर्वतांवर आणि उघड्या दगडी चौक्यांमध्ये कोणता ‘टॅक्सपेयर’ आपले नेहमीचे काम करतो? तिथे कोण ऑफिस उघडून हिशेब लिहीत बसतो? कोण शाळा, कॉलेज भरवतो? कोण व्यवसाय चालवतो? कोण सर्जरी करतं? कोण आरामदायी इमारती बांधतो? कोण आपल्या कुटुंबापासून महिनोन्महिने दूर राहून, मृत्यू समोर दिसत असतानाही देशाच्या सीमेवर उभा राहतो? ते सुद्धा कोरडा शिधा खाऊन.
फक्त सैनिक!
आपण पर्यटक म्हणून काही दिवस त्या भागात गेलो, तरी थंडी, विरळ हवा आणि खडतर प्रवासामुळे आपली अवस्था बिकट होते. उत्तम कपडे, गरम अन्न, वाहन आणि सुरक्षित निवास असूनही आपल्याला त्रास होतो आणि त्याच प्रदेशात सैनिक अनेक महिने राहतात. कधी अपुऱ्या सुविधांमध्ये, कधी वादळात, कधी हिमवर्षावात; मिळेल ते अन्न खाऊन, डोळ्यांत तेल घालून आपली सीमा सांभाळतात. त्यांच्या त्या त्यागाची किंमत केवळ पगाराच्या आकड्यांत मोजण्याची हिंमत तरी आपल्याला कशी होते
परदेशांत अनेकदा एक वेगळे आणि हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळते. गणवेशातील जवान दिसला की सामान्य नागरिक आदराने त्याला अभिवादन करतात. तरुण सैनिकालाही वयोवृद्ध लोक सलाम करतात. विमानतळावर लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि त्यांच्याबरोबर कर्तव्यावर निघालेल्या सैनिकांना विमानात चढण्यासाठी प्राधान्य दिले जाते. कारण गणवेशामागचा त्याग त्या समाजाला समजलेला असतो.
आणि आपल्या देशात?
— — कर्तव्य बजावून थकलेले सैनिक रेल्वेच्या डब्यात जागा न मिळाल्याने प्रसाधनगृहाजवळ जमिनीवर झोपलेले दिसतात. हे दृश्य पाहिले की तळपायाची आग मस्तकात जाते. ज्यांच्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित झोपतो, त्यांनाच प्रवासात बसण्यासाठी साधी जागाही मिळत नाही. उठून थोडा वेळ देण्याची तसदी पण घेतली जात नाही. यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? *
— एका सैनिकाने लिहिलेले वाक्य मनात खोलवर कोरले गेले आहे— “आमच्याविषयीचा आदर केवळ शब्दांमधून व्यक्त करू नका; तो तुमच्या कृतीतून दिसू द्या. “
खरंच, वर्षातून दोन दिवस ‘जय जवान’ म्हणणे, समाजमाध्यमांवर तिरंग्याचे चित्र लावणे, किंवा देशभक्तीपर गाणी शेअर करणे, म्हणजे सैनिकांचा सन्मान नव्हे. त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवणे, नियमांचे पालन करणे, त्यांच्या कामात अडथळा न आणणे, प्रवासात त्यांना जागा देणे, त्यांच्या कुटुंबीयांशी संवेदनशीलतेने वागणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याविषयी आदराने बोलणे हा खरा सन्मान आहे.
देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांविषयी अपमानास्पद भाषा वापरणे, हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नव्हे; ती असंवेदनशीलता, अज्ञान आणि कृतघ्नता आहे.
सैनिकांना तुमच्या दयेची गरज नाही. त्यांना अवास्तव देवत्वही नको आहे. फक्त योग्य सन्मान, कृतज्ञता आणि संवेदनशील वागणूक मिळायलाच पाहिजे.
मुलांवर संस्कार करताना पालकांनी त्यांना केवळ स्वतःचे अधिकार शिकवून चालणार नाही. देशाप्रती असलेली कर्तव्ये, सैनिकांच्या त्यागाबद्दलची कृतज्ञता, गणवेशाचा सन्मान आणि सार्वजनिक जीवनातील शिस्त यांचेही भान लहानपणापासून दिले पाहिजे. कोणाशी कशा पद्धतीनी आपण बोलतो? आधुनिक विचार असणे म्हणजे उद्धटपणा, बेजबाबदारपणा किंवा देशरक्षकांचा अपमान करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. *अधिकारांची भाषा आपल्याला उत्तम येते. आता आपल्या मुलांना नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. *
सैनिकांचा सन्मान केवळ भाषणांत, घोषणांत आणि समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये नको; तो आपल्या विचारांत, शब्दांत आणि प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे. एक सैनिक बनण्यासाठी जेवढे शारीरिक परिश्रम करून घेतले जातात आणि मानसिक ताकद वाढवली जाते, तेवढे परिश्रम ह्या किंचाळकन्येला आणि समविचारी माणसांना एक दिवस करायला लावले तरी मेंदूतले आणि जिभेवरचे किडे वळवळायचे थांबतील. आकड निघून जाईल.
Enough is enough!
लेखक : मेधा खासगीवाले
प्रस्तुती : गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈















