मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दिवशी असं झालं… भाग २ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ त्या दिवशी असं झालं… भाग २ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆

(‘मी त्याला वाचवू शकलो असतो मॅम.. आपल्या सिद्धार्थला मी वाचवू शकलो असतो.. ’ असं म्हणत तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला.

‘इतका विचार करू नकोस गौरव! झालं ते झालं…. सगळं काही नियतीच्या हाती… ’ लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडणार्‍या, सैन्यातील त्या मेजरला कसं समजावावं, ते शकुंतला मॅमच्या लक्षात येत नव्हतं.) 

इथून पुढे – – 

‘खूप वेदना होताहेत मॅम… प्लीज… मला पेन किलरचा आणखी एक डोस द्या. ’

‘आत्ता दोन तासांपूर्वी जेवणानंतर तुला इंजक्शन दिलं होतं ना! इतकं जास्त पेन किलर घेणं योग्य नाही. तुझ्या शरिरावर पुढे त्याचा वाईट परिणाम होईल. ’

‘मला त्याची पर्वा नाही. इंजक्शन द्या. बस्स! ’ गौरव अशा काही अवस्थेत बोलून गेला की शकुंतला मॅमचं अंतर कापत कापत गेलं आणि मग त्याला इंजक्शन देणं त्यांना भागच पडलं. इंजक्शन देता देता त्या म्हणाल्या, ‘त्या दिवसाबद्दल… ऑपरेशनबद्दल तुला काही बोलावंसं वाटलं, तर तू मला तुझी फ्रेंड समज…. बोलण्यामुळेसुद्धा वेदना थोड्या कमी होतील. ’ गौरव काहिशा विचित्र नजरेने, काही वेळ त्या बेस हॉस्पिटलच्या मायाळू हेड नर्सकडे बघत राहिला आणि हळू हळू इंजक्शनच्या गुंगीत निद्रेच्या कवेत शिरला.

दर दुसर्‍या तिसर्‍या दिवशीचं हेच दृश्य असायचं. ते बेचैन दिवस आणि त्रासदायक रात्रीच्या दरम्यान एक हसवणारा क्षणदेखील आला होता. मोबाईलवर बोलता बोलता गीतालीनं एकदा एक विचित्रच मागणी केली. मोबाईलवरच्या नेहमीच्या सांभाषणानंतर, टिप्सीच्या नवनवीन करामती, बोलणं, ऐकवता ऐकवता ती एकदम म्हणाली, ‘मला त्या गोळ्या हव्या आहेत हीरो…. डॉक्टरांनी तुझ्या पोटातून आणि हातातून काढलेल्या सगळ्या गोळ्या… ’

‘काय? ? ? ’ चमकून गौरवने विचारलं. आपण जे ऐकलं, त्याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.

‘शोना, मला त्या गोळ्या हव्या आहेत…. सगळ्याच्या सगळ्या.. तुला लागलेल्या. जेव्हा घरी येशील तेव्हा आपल्याबरोबर घेऊन ये. सगळ्याच्या सगळ्या.. सात गोळ्या. ’

‘अरे, तू काय करणार त्यांचं? ’

‘काहीही करीन. तुला काय करायचय? नवी रेसिपी बनवीन एखादी. ’

‘काय फलतु गोष्ट बोलतेयस गीतू, इथे हॉस्पिटलमध्ये त्या गोळ्यांचा डिस्प्ले केला जातो. कमॉन… डोन्ट बी चाइल्डिश.. काय करणार तू त्यांचं? ’ गौरवचं हसू थांबता थांबत नव्हतं.

‘तू बस, घेऊन ये. ,. कमीत कमी एक तरी गोळी मला हवीच! ’

तो हसरा क्षण किती तरी वेळपर्यंत वॉर्डाच्या भिंतींवर रेंगाळत राहिला. श्रीनगरच्या त्या आर्मी बेस हॉस्पिटलच्या एका खोलीत एक खास असं संग्रहालय बनवलेलं होतं…. दुनियेतील सगळ्यात वेगळं असं ते संग्रहालय असावं बहुतेक. इथे मागच्या काही युद्धात आणि आतंकवादाशी जोडल्या गेलेल्या सगळ्या ऑपरेशन्समध्ये, घायाळ झालेल्या सैनिकांच्या शरिरावर झालेल्या सर्जरीनंतर काढलेल्या गोळ्या, ग्रेनेडचे तुकडे, बॉम्बमध्ये वापरले गेलेले टोकदार खिळे, छर्रे इ. गोष्टींचा संग्रह होता. ज्या हुतात्म्यांच्या वा घायाळ सैनिकांच्या शरीरातून ते काढले होते, त्यांचे नाव, ते कधी काढले याची तारीख, तो सैनिक घायाळ कधी झाला, त्याची तारीख या सगळ्या गोष्टींच्या नोंदी तिथे होत्या. जगातील सगळ्यात वेगळा असा कोलाज संग्रह होता तो… जसा काही जखमांचंही नक्षीकाम केलय. पाच वर्षांपूर्वी गौरव जेव्हा काश्मीरमध्ये पहिल्यांदा पोस्टींगवर आला होता, तेव्हा एक दिवस असाच, इथे भरती झालेल्या एका जवानाला तो भेटायला आला होता. त्यावेळी त्याने हे अद्भूत संग्रालय पाहिलं होतं. त्या दिवशी एक उनाड विचार त्याच्या मनात चमकून गेला. कधी आपलंही नाव या जखमांच्या नक्षीकामात सामील होईल का? काही भटक्या विचारांना वास्तवाचा पदर ओढून घेण्याची मोठी वाईट सवय असते.

बेस हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या गौरव विचार करत होता, जर त्या दिवशी… इतक्या दिवसांच्या पूर्वी, त्याने जो विचार केला, तसा केला नसता तर आज खुशहाल आणि सिद्धार्थ जिवंत असते का? कसं सगळं उलटं पालटं होऊन गेलं. त्या दोघा आतंकवाद्यांना मारण्याचं किती व्यवस्थित, छान प्लॅनिंग केलं होतं. खरं म्हणजे ते अगदी साधं आणि सोपं ऑपरेशन होतं. सिद्धार्थचा हट्ट त्याने का बरं पुरवला? गोळ्यांचा आवाज कानात अजूनही घुमतोय आणि धूसर धूसर झालेल्या स्मृतीच्या पडद्यावर किती तरी दिवसांनंतर त्या दिवसाचं दृश्य स्पष्ट उमटू लागलय. एवढ्यात शकुंतला मॅम त्याची नेहमीची औषधं देण्यासाठी त्याच्याजवळ आल्या, तेव्हा त्याने हात धरून त्यांना बसवून घेतलं आणि भिंतींवरच्या समोरच्या झरोक्याकडे एकटक बघत त्या दिवशीची कहाणी सांगू लागला. त्याचा आवाज जसा काही खोल विहीरीतून येत होता… घुसमटल्यासारखा.

सप्टेंबरला ढकलून पळवत लावत, कुडकुडायला लावणारा, हुडहुडी भरवणारा, ऑक्टोबर येऊन पोहोचला होता. जिथे तिथे उघडे-बोडके चिनार उभे होते. जमीन त्याच्या लाल, तपकिरी पानांनी नटली होती। बर्फाची पांढरी शुभ्र चादर पांघरण्याच्या त्रासापूर्वी जणू ती आपल्या परीने उत्सव साजरा करत होती. धरतीच्या या उत्सवाकडे गौरवच्या बटालियनचं मुळीच लक्ष नव्हतं. आत्ता आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमीमुळे, बटालियनला जसा काही विद्युत करंटने स्पर्श केला होता. बटालियनचा खास खबर्‍या शौकतचा फोन आला होता. कॅंम्पपासून काही अंतरावर असलेल्या दल सरोवराला लागून असलेल्या गावात दोन आतंकवादी लपून बसले आहेत. बातमीनुसार गावातील सगळ्यात मोठा सफरचंदाचा बागायतदार मोहम्मद रसीद अहमदने एवढ्यातच दोन मजली घर बांधले होते. त्याच्या या नव्या घरात काही दिवसांपासून दोन विदेशींनी… बहुदा अफगाणी आतंकवादींनी आश्रय घेतला होता. शौकतच्या विस्तृत वर्णनानुसार पहिल्या मजल्यावर बनवलेल्या दोन खोल्यांच्यामधील भिंत जरा जास्तच रुंद दिसते. त्याच्या आत एक लहानसं तळघर बनवलेलं आहे. पोलीस किंवा फौजेची तुकडी जेव्हा तिकडच्या बाजूने गस्त घालत जाते, तेव्हा हे दोन आतंकवादी तळघरात उतरून लपून बसतात. भिंतीत बनवलेल्या त्या तळघरात उतरण्यासाठीचा रस्ता, दुसर्‍या मजल्यावरून आहे. सर्वसामान्य काश्मिरी घरांप्रमाणे धान्य वगैरे ठेवण्यासाठी जसा माळा बनवला जातो, तशा माळ्यावरून तळघरात उतरण्याचा रस्ता आहे. एका लाकडी पट्टीने तो झाकला आहे. ऑपरेशनचं प्लॅनिंग सुरू झालं. गावाचा नकाशा चांगल्या रीतीने समजून घेतला गेला. जवळ जवळ पस्तीस घरांचं हे गाव दल सरोवराच्या दक्षिणेकडून निघणार्‍या नाल्याने दोन्ही बाजूंनी घेरलेलं होतं. रसीद अहमदचं घर आणि बाग गावाच्या एका कडेला होती. प्लॅनप्रमाणे असं ठरलं की दहा दहा जवानांच्या दोन तुकड्या मेजर गौरव वत्स आणि कॅप्टन सिद्धार्थ रायच्या नेतृत्वाखाली औपचारिक गस्तीच्या स्वरुपात गावात प्रवेश करतील… गावातील लोकांची सहजच चौकशी करत, अचानक रसीद अहमदचं घर घेरतील. तिसरी रिझर्व्ह तुकडी नाल्याजवळ, अचानक काही परिस्थिती उद्भवली, तर त्याचा निपटारा करण्यासाठी तिथे थांबेल.

गावात जाण्यासाठी नाल्यावरचा छोटा पूल ओलांडताना गौरवच्या छातीत धडधड होऊ लागली होती. गावात प्रवेश केल्यावर दोन्ही तुकड्या वेगवेगळ्या दिशेने विभक्त झाल्या. गाववाल्यांकडून दुआ-सलाम घेत पुढे जाताना, जवळ जवळ प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा विचित्र तणाव जाणवत होता. त्यांचा हा तणाव शौकतच्या बातमीला पुष्टी देत होता. दुआ-सलाम करत आणि वाटेत भेटणार्‍या लहान मुलांना चॉकलेट्स वाटत, दोन्ही तुकड्या स्वत:ला अगदी सामान्य असल्याचं भासवत दोन्ही दिशांनी रसीद अहमदच्या घराच्या दिशेने पुढे निघाल्या. काही क्षणातच रसीद अहमदचं घर चारी बाजूंनी घेरलं गेलं. तुकडीमध्ये असलेल्या लाइट मशिनगन्स योग्य जागी लावून ठेवल्या गेल्या. घरातून बाहेर पडणारे त्यांच्या निशाणावर रहातील आशा तर्‍हेने त्या लावल्या गेल्या. गौरव आणि सिद्धार्थ आपल्या एक एक साथीदार जवानाला घेऊन घराच्या समोर आले. ट्रेनींगच्या दरम्यान शिकवलेलं असतं की कुणीही सनिक एकेकटा कुठलीही गोष्ट करत नाही. सगळ्या गोष्टी जोडी जोडीने होतात. इंग्रजीत त्याला बड्डी – पेअर असं म्हणतात. त्यानुसार दोघांनी आपल्या आपल्या बड्डी – पेअरसह चाल केली होती. घरातल्या सगळ्या व्यक्तींना बाहेर येण्यास सांगितलं गेलं. जेव्हा रसीद अहमदला विचारलं गेलं की घरात आणखी कोण कोण आहेत, तेव्हा रसूल निष्पापपणे म्हणाला, ‘पता मत है! अल्लाह कसम सब खैरियत है’ त्याचं उत्तर निष्पापपणाची एक नवी परिभाषा लिहीत होतं आणि त्यावर गौरवला वाटत होतं, वळून त्याला एक जोरदार थप्पड मारावी…

आत्तापर्यंत सगळं गपचूप ऐकणार्‍या शकुंतला मॅमनी अचानक गौरवला थांबवत म्हंटलं, ‘त्यांची तरी काय चूक आहे यात गौरव? त्यांचं म्हणणं ऐकलं नाही, तर ती एके-47 ने मरणार आणि फौजेचं म्हणणं ऐकलं नाही, तर त्यांच्याकडून मार खाणार. कधी कधी मला वाटतं, या काश्मीरी लोकांचे जितके हाल होताहेत ना, तितके जगातल्या दुसर्‍या कोणत्याच लोकांनी सहन केले नसतील. ठीक आहे… तू पुढे सांग. ’

रसीद अहमद आणि त्याच्या घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी बसवल्यानंतर गौरवने मशिनगन घेतलेल्या सैनिकाला समोरच्या दरवाजावर लक्ष ठेवण्याची ताकीद दिली आणि नंतर त्याने आणि सिद्धार्थने आपआपल्या बड्डी – पेअरबरोबर अतिशय सावधगिरी बाळगत घरात प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर पोचल्यावर जिन्याजवळ असलेया दोन खोल्यांमधील भिंतींची जरा जास्तच असलेली जाडी पाहिल्यावर शंकेला कुठे जागाच नव्हती. बटालियन कॅंम्पमध्ये विचार विनिमय होऊन ठरल्यानुसार, वर माळ्यावर पोचून गौरवला माळ्याच्या फरशीवर पडून आपल्या रायफलच्या नळीने त्या लाकडी पट्टीला उचलायचं होतं. ही पट्टी भिंतीमध्ये काढलेल्या जागेला लपवून ठेवत होती. पट्टी उस्कटताच गौरवच्या बड्डीने, लांसनायक खुशहाल सिंहने त्या खालच्या जागेत दोन ग्रेनेड फेकायचे होते. बस्स! काम तमाम! सिद्धार्थ आणि त्याच्या बड्डीला जिन्यावरून आपआपल्या रायफलद्वारे तळघराच्या तोंडाशी कव्हरिंग फायर द्यायचं होतं. गडबडीला सुरुवात इथून झाली. सिद्धार्थ त्याला म्हणाला, ‘गौरव सर आपण आत्तापर्यंत खूप यशस्वी ऑपरेशन्स केलीत. माझी ही पहिलीच वेळ आहे. आत तळघरात ग्रेनेड मी फेकेन. सर.. प्लीज… ’ सिद्धार्थच्या त्या ‘प्लीज’मध्ये काय होतं कुणास ठाऊक, गौरव एकदम ‘होय’ म्हणून गेला.

‘ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. त्यासाठी मी कधीच स्वत:ला माफ करणार नाही. आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला हे शिकवलं गेलं होतं की ऑपरेशनच्या शेवटच्या भागात कुठलाही बदल करता कामा नये पण मी तीच चूक केली. ’ शकुंतला मॅम त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला थोपटत राहिल्या आणि पुन्हा पुन्हा म्हणत राहिल्या, ‘ही सगळी नियती आहे बेटा… ’

अचानकच विहीरीच्या अधीक खोलवरून निघाल्यासारख्या अधीकच गुदमरलेल्या आवाजाने कहाणीचा धागा पकडला….

– क्रमशः भाग दुसरा 

मूळ हिंदी  कथा – ‘गर्लफ्रेंड’  मूळ लेखक – गौतम राजऋषि

अनुवाद –  उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दिवशी असं झालं… भाग १ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ त्या दिवशी असं झालं… भाग १ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆

‘तुला काही झालं असतं ना… तू मेला असतास ना… तरी मी तुझ्याशी आजिबात बोललो नसतो… कधीच… ’ संग्रामचा हा मोबाईलवर आलेला डायलॉग ऐकताना, त्याही स्थितीत गौरवला खदाखदा हसू आलं. त्याही स्थितीत… म्हणजे गेले पाच-सहा दिवस असह्य वेदनांमुळे बाहेर पडणार्‍या किंकाळ्यांना मोठ्या संयमाने रोखून धरत असतानाही, त्याला संग्रामच्या बोलण्याचं हसू आलं. त्याला असं खदाखदा हसताना आहून बेस हॉस्पिटलची हेड नर्स शकुंतला मॅमनी त्याच्याकडे चमकून पाहीलं. त्याच्या या अशा मोठमोठ्याने हसण्यामुळे, तीन दिवस आधी पोटावर आणि डाव्या हातावर घातलेल्या टाक्यांवर अतिरिक्त ताण तर पडणार नाही ना, अशी त्यांना शंका येत होती आणि तसं होणं मुळीच योग्य नव्हतं. शकुंतला मॅमच्या चमकून बघण्यामागे ही काळजी होती. पण गौरवला असं हसताना पाहून तिचं मन द्रवलंही. गेल्या पाच-सहा दिवसाच्या त्याच्या मूक अश्रूपाताची ती एकटीच साक्षीदार होती.

श्रीनगरच्या या आर्मी बेस हॉस्पिटलच्या भितींवर या दिवसात दु:ख, वेदनेचा, नवा मजकूर लिहिला जात होता. बदामी बागेच्या आर्मी कॅंन्टोंन्मेंटच्या विशाल पसरलेल्या परिसराच्या मधे असलेले ते बेस हॉस्पिटल किती तरी वर्षांपासून किती तरी किंचाळ्यांचं, कण्हण्याचं मूक साक्षीदार बनलय. विशेषत: गेल्या दहा-पंधरा वर्षापासून, जेव्हापासून आतंकवादाने या घाटीत आपलं डोकं वर काढलय, तेव्हापासून जरा जास्तच. गोळ्यांनी विंधलेल्या, बॉम्बनी क्षत-विक्षत झालेल्या सैनिकांच्या शरिरांनी या हॉस्पिटलचे बेड भरलेलेच असायचे.

ऑफिसर वॉर्डच्या दहा बेडच्या हॉलमध्ये एका कोपर्‍यातल्या बेडवर गौरव पडलेला होता. शेजारी ठेवलेल्या एका उंच स्टॅंडवर प्लॅस्टर घातलेला त्याचा डावा हात क्लिपमध्ये बांधून ठेवलेला होता. ओठातून उमटत असलेलं दबक्या आवाजातलं कण्हणं, त्या भिंतींवर नव्या काव्यपंक्ती लिहीत चाललं होतं. गौरव… मेजर गौरव वत्स… सात गोळ्या आपल्या शरीरात सामावलेला. केवढा तरी रक्तपात झाल्यानंतर, हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मते, त्याचं जीवंत रहाणं हा मोठाच चमत्कार होता. डॉक्टरांच्या या कथित चमत्कारानंतर, त्याच्या शौर्याची, वीरतेची सगळीकडे चर्चा होत होती. ‘कॉन्ग्रेचुलेशन मेजर.. ’ आणि ‘वेल डन माय बॉय… ‘ सारखे उद्गार भेटायला येणार्‍यांच्या ओठांवर विराजमान होते. अशा सगळ्या ‘कॉन्ग्रेचुलेशन्स’ आणि ‘वेल डन’वर, गौरवला सगळ्या मर्यादा तोडून आभाळाला जाऊन भिडेल, इतक्या मोठयाने किंचाळावसं वाटतं. कसलं शौर्य? कसली वीरता? जेव्हा त्याचा बड्डी… साथीदार लांस नायाक खुशहाल सिंह याने त्याच्यासमोर प्राण सोडला होता… जेव्हा त्याच्यासाठी बाहेर पडलेल्या गोळीने त्याच्या लाडक्या अतिप्रीय सिद्धार्थचा जीव घेतला, तेव्हा तो काहीच करू शकला नाही. मग यात शौर्य कुठून आलं? किती तरी वेळा त्याला वेदना असह्य होते. खूप मोठयाने ओरडावसं वाटतं पण त्याने स्वत:वर कामालीची बंधने घालून घेतली आहेत. ओठातून बाहेर पडण्यापूर्वीच किंचाळीला मूक व्हावं लागत होतं. तसंही, कुठल्याही सैनिकाला, आपलं दु:ख, आपल्या वेदना, यामुळे कण्हण्याची, ओरडण्याची परवानगी, त्यांची वर्दी देत नाही. ‘गट्स’ आणि ‘ग्लोरी’चा परीघ, क्रूरतेच्या हद्दीपर्यंत सगळा अंधार, वर्दी आपल्या चमकत्या आवरणाखाली लपवून ठेवते.

तीन दिवस आय. सी. यू. मध्ये बेशुद्धावस्थेत पडून राहिल्यानंतर आज जेव्हा त्याला ऑफिसर वॉर्डमध्ये आणलं गेलं, तेव्हा त्याला त्याचा मोबाईल हातात घेण्याची परवानगी मिळाली. शेकडो एसएमएसनी त्याचा इनबॉक्स तुडुंब भरला होता. पहिला कॉल त्याने गीतालीलाच केला.

‘हाऊ आर यू माय हीरो? ’ स्वत:ला सहज असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करता करता ती हमसून हमसून रडू लागली.

’कमॉन सोना… तूच जर असं करू लागलीस, तर कसं होणार? तूच तर माझी ताकद आहेस ना! ’

‘किती दुखतय? ’

‘आता कुठलं दु:ख सोना! तू विचारलंस आणि सगळं दु:ख गायब. हा… हा… ’ गौरवनं जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला.

’राहू दे… राहू दे… हा डायलॉग तुझ्या गर्लफ्रेण्डससाठी राखून ठेव! ’

‘कुठल्या गर्लफ्रेण्डस बेबी? कधीच सुटल्या सगळ्या… तुझ्याशी बांधला गेलो तेव्हा. बरं मला सांग, मम्मी, पप्पा कसे आहेत? आणि माझी टिप्सी? ’ गौरवने विषय बदलत विचारलं. त्याच्या मनात अनेकानेक एसएमएसनी भरलेला इनबॉक्स चमकत होता. पण ते कुणाचे आहेत, ते त्याला कळणार नव्हतं कारण काही दिवसांपूर्वीच त्याने स्वत:च सगळे नंबर डीलिट केले होते.

‘न्यूज कळल्यापासून मम्मींचं रडणं थांबतच नाही आहे. पप्पा गप्प गप्प आहेत. आजीचं रडणं पाहून टिप्सीला कळलं, आपल्या पापांना गोळी-बिळीसारखं काही लागलय. काल आपल्या सगळ्या दोस्तांना सांगत होती की तिच्या पापांना गुंडांशी लढताना जखम झालीय. ’ गीतालीचे हुंदके मोबाईलच्या स्पीकरमधून बाहेर पडून वॉर्डमध्ये तरंगू लागले.

हॉस्पिटलच्या मूक भितींवर आधीपासूनच लिहिलेल्या दु:ख, वेदनांच्या कहाण्यांवर नवीन नवीन थर चढत होते. त्याला संग्रामच्या कॉलने थोडासा विसावा मिळाला होता. कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येक क्षणी त्याची हसरी, खेळकर वृत्ती कायम असायची. अथांग पीडेच्या क्षणीही, त्याच्या कॉलने हसण्यासाठी गौरवला विवश केलं होतं. गौरवकडून सगळं जाणून घेण्यासाठी तो उतावीळ झाला होता. ऑपरेशनमध्ये कुठे गडबड झाली की ज्यामुळे आतंकवाद्यांचा निपटारा करताना गौरवच्या बटालियनला इतकं नुकसान सोसावं लागलं? झालेल्या क्षितीसाठी नुकसान शब्द छोटाच म्हणायला हवा. यावेळी गौरवला ते जाणवत असणार, ही गोष्ट संग्रामच्या लक्षात येत होती. दोन आतंकवाद्यांना मारून टाकण्यात भारतीय सेनेचा एक कॅप्टन आणि एक जवान यांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं आणि एक मेजर अतिशय घायाळ होऊन हॉस्पिटलमध्ये पडला होता. संग्रामने दोन-तीन वेळा विचारल्यावर गौरवने कण्हल्यासारख्या आवाजात म्हंटलं होतं, ‘हे सांग संग्राम, कुणाच्या असण्यासाठी कुणाचं नसणं, नियतीच्या कोणत्या कायद्यात बसतं? ’

‘मला माहीत आहे गौरव तू कॅप्टन सिद्धार्थबद्दल बोलतो आहेस ना? कसं झालं दोस्त हे सगळं? तुम्हाला जर पक्की खबर होती की त्या घरात विदेशी आतंकवादी लपलेले आहेत, तर घरात घुसण्याची काय गरज होती? बाहेरूनच बॉम्ब टाकून घर का नाही उडवलंत? सरकार मालकाला पूर्ण पैसे देतंच की! ’

‘सगळं कसं धूसर धूसर आहे संग्राम… आत्ता मला तू माफ कर. ’

‘ठीकाय! ठिकाय! आत्ता तू आराम कर. स्वत:ची काळजी घे. जे झालं ते झालं. यू डीड युअर बेस्ट… गीतालीचा कॉल आला होता. तुला बघायला श्रीनगरला यायचं म्हणतेय. मला म्हणत होती, घेऊन चल… मलासुद्धा तुला बघावसं, भेटावसं वाटतय. ’

‘कुणीही येणार नाही इथे… मला एकट्यालाच राहू दे. ’ गौरवने ओरडत फोन कट केला.

सगळी मीडिया या ऑपरेशनच्या वेळी सेनेच्या झालेल्या त्रुटीबद्दल हा:हा:कार माजवत होती. संग्रामला माहीत होतं की सत्य काय आहे, ते केवळ आणि केवळ त्याचा जिगरी दोस्त गौरवच सांगू शकतो आणि ते सत्य तो आपल्या चॅनेलद्वारा सर्वांपुढे आणू इच्छितोय. दोघांची दोस्ती लहानपणापासूनची. ‘दो जिस्म मगर एक जान’ सारखा एखादा बिल्ला लावून वाढलेली. मोठी झालेली. आता गौरवच्या आवाजात असलेली वेदना संग्राम आपल्या छातीत अनुभवत होता. संग्रामच्या प्रश्नांनंतर गौरवला पेन-किलरच्या इंजक्शनची अवश्यकता कित्येक पटीने जास्त वाटू लागली होती. शकुंतला मॅमला थोडी काळजी वाटत होती. पेन-किलरच्या इतक्या जास्त डोसाचा काही विपरीत परिणाम तर गौरवच्या शरीरावर होणार नाही ना? . या काळजीपोटीच गौरवने वारंवार केलेल्या विनंतीवरून त्याला हॉस्पिटलच्या परिसरात सिगरेट ओढण्याची परवानगी देण्यात आली होती. गौरवचं म्हणणं होतं की विल्सवाल्यांनी आपली ‘क्लासिक’ नावाची जी चौर्‍याऐशी मिलीमीटरची नळी… सिगरेट बाजारात उतरवलीय, तिच्या तोडीचं दुसरं पेन-किलर सध्या तरी शक्य नाही. यावर, शकुंतला मॅम आणि गौरवच्या डॉक्टरांचं हसू त्या ऑंफिसर वॉर्डमध्ये किती तरी वेळ खळखळत राहीलं.

वेदनेच्या उत्तुंग लहरींनी भिजलेला फेसाळ किनारा, केव्हढ्या तरी दु:खाचा फेस घेऊन हळू हळू वाहणारा काळाचा प्रवाह गुपचुप बघत होता. काश्मीरच्या त्या ऑक्टोबरच्या कुडकुडणार्‍या थंडीत धुक्यात न्हालेल्या दुपारी आणि उदास हुडहुडी भरवणार्‍या रात्रींच्यामध्ये पेन कीलरच्या इंजक्शनच्या गुंगीत असताना मधेच खडबडून जागा व्हायचा गौरव. दूरवरून, ’गौरव सर.. ’ अशी हाक यायची आणि खूप वेळपर्यंत त्याच्या कानाच्या अनंत खोलीत, त्याची झोप उडवत ती गुंजत राहयाची. दूरवरून येणार्‍या प्रत्येक हाकेसरशी त्याला उठून तिकडे जावंसं वाटायचं पण पोटावर बांधलेल्या भरभक्कम पट्ट्या आणि क्लिपमध्ये अडकवलेला त्याचा प्लॅस्टर घातलेला डावा हात त्याला तसं करण्यापासून रोखायचा. त्या रात्री सिद्धार्थचा आवाज ‘गौरव सर… सेव्ह मी प्लीज… ’, वॉर्डचे झरोके आणि खिडक्या यातून खाली उतरून वॉर्डच्या चारी बाजूच्या भिंतींवर टांगला गेला. डॉक्टरांनी त्याचे पोट आणि डाव्या हातावर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून टाके घातले होते, त्याला अवघा दीड आठवडा झाला होता.

आकाशातून बारीक बारीक बर्फाचे फाये हळू हळू खाली उतरत होते. मध्यरात्र होऊन गेली होती. कॅप्टन सिद्धार्थ राय आपल्या फूल बॅटल गिअरमध्ये रक्तरंजित वर्दीसहित वॉर्डच्या एका झरोक्यातून तरंगत तरंगत त्याच्या बेडच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या चेहर्‍यावरून टपकणारं रक्त गौरवाच्या पोटावर पडत होतं आणि न जाणे, कसल्या उदास, विरक्त दृष्टीने तो टकामका गौरवकडे बघत होता. क्षणभरातच गौरवच्या चित्काराने सगळा वॉर्ड गडबडून उठला. थोड्या वेळापूर्वी शिफ्ट ड्यूटीवर आलेल्या शकुंतला मॅम पळतच गौरवच्या बेडपाशी आल्या. ऑक्टोबरच्या त्या थंडीतही घामाने भिजलेल्या गौरवला पाहून त्या घाबरून गेल्या. त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवत त्यांनी विचारलं,

‘काय झालं बेटा? आर यू ऑल राईट? ’

‘मी त्याला वाचवू शकलो असतो मॅम.. आपल्या सिद्धार्थला मी वाचवू शकलो असतो.. ’ असं म्हणत तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला.

‘इतका विचार करू नकोस गौरव! झालं ते झालं… सगळं काही नियतीच्या हाती… ’ लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडणार्‍या, सैन्यातील त्या मेजरला कसं समजावावं, ते शकुंतला मॅमच्या लक्षात येत नव्हतं.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी  कथा – ‘गर्लफ्रेंड’  मूळ लेखक – गौतम राजऋषि

अनुवाद –  उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेकंड बेस्ट — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ सेकंड बेस्ट — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(अपर्णाची जुळी मुलं मनूला फार फार आवडत आणि लाघवी अपर्णा अति माया करी मनूवर.

दिवस कसे पळत होते नुसते. अपर्णाचे मोहित रोहित आता आठ वर्षांचे झाले. अपर्णा संसारात बुडून गेली.)

– इथून पुढे – – 

एक दिवस ती मनूला म्हणाली”मनू, माझ्याबरोबर तुझ्या कोणी चांगल्या डॉक्टर असल्या तर येशील का त्यांच्याकडे? ”

मनू म्हणाली “का ग अपर्णा? काही होतंय का तुला? ”अपर्णा म्हणाली मनू, मला छातीत गाठ वाटतेय. पण उगीच शंका नको म्हणून चांगल्या डॉक्टरला दाखवूया. मी अजून यांना पण बोलले नाहीये काही. ”

अपर्णा संकोचून म्हणाली.

मनूने त्याच आठवड्यात डॉ मोने यांची अपॉइंटमेंट घेतली. डॉ मंजिरी मोने मनूची खूप चांगली मैत्रीण होती. अपर्णा आणि मनू डॉ मोनेच्या क्लिनिकवर गेल्या. डॉक्टरांनी अपर्णाला नीट तपासलं.

त्यांनी मनूला सांगितलं आपण यांची बायॉप्सी करूया.

लगेचच त्यांनी छोटासा तुकडा घेतला आणि म्हणाल्या“ मी हा पॅथॉलॉजी ला पाठवते. घाबरू नको अपर्णा. ही गाठ साधी असण्याची शक्यता जास्त आहे. चार दिवसांनी रिपोर्ट मिळेल तुला”.

चार दिवसांनी पॅथॉलॉजी चा रिपोर्ट आला. , दुर्दैवाने ती गाठ malignant होती. मनूला अतिशय वाईट वाटलं.

अपर्णा शांत होती. तिची आई गावाकडून आली. अपर्णाचं mastectomy म्हणजे पूर्ण ब्रेस्ट काढून टाकायचं ऑपरेशन झालं. भास्कर आणि मनू चोवीस तास तिच्याजवळ होते.

अपर्णा दहा दिवसांनी घरी आली. नंतर केमो थेरपीचे चक्र सुरू झालं. सगळ्या केमो पार पडल्या

मनू ऑफिस मधून रोज अपर्णाकडे जाई. तिला छान खायला करून देई. गप्पा मारून तिचे मनोरंजन करी. अपर्णा बरी झाली. तिचे सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. मनूला खूप आनंद झाला. अपर्णाची आई पुन्हा गावाला गेली.

मुलं आता बारा वर्षांची झाली.

अचानक अपर्णाला पुन्हा बरं नाहीसं व्हायला लागलं. अचानक वजन कमी व्हायला लागलं.

तिला पुन्हा डॉक्टरांकडे नेलं.

अपर्णाच्या कॅन्सरच्या सेकंडरीज आता सगळीकडे पसरल्या होत्या. मध्यंतरीची वर्षे इतकी चांगली गेली आणि अचानक या कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं.

एम आर आय स्कॅन सगळं सगळं झालं. दुर्दैवाने हा कॅन्सर सगळीकडे पसरलेला दिसला. आता ओपन करण्यात काही अर्थ नव्हता.

बिचारी अपर्णा हळूहळू अंथरुणाला खिळली. फक्त वेदना शामक गोळ्या हेच औषध उरले तिच्यासाठी.

अपर्णा शांतपणे सहन करत निमूट पडलेली असे. मनूला तिचे हाल बघवत नसत. भास्कर सतत तिच्या जवळ बसलेला असायचा. मुलं कावरीबावरी होत. अपर्णा आता तर अंथरुणात न दिसण्याइतकी बारीक झाली होती.

कधी ती छान उत्साही असे तर कधी निराशेच्या आवर्तनात गुदमरून जाई.

मनूला विचारी”, मीच का ग मनू, मीच का? मला नाही ग मरायचं इतक्या तरुणपणी. जेमतेम चाळीशी ओलांडलीय मी. यांच्या कितीतरी अपेक्षा स्वप्नं आहेत ना. ती अर्धवट सोडून मी कशी जाऊ मनू? ”

मनूच्या डोळ्यांना धारा लागत.

“अपर्णा, होशील ग तू बरी. आता नवीन गोळ्यांनी तुला बघ छान वाटेल. ”मनू सांगायची. कधी बरे कधी खूप वाईट असे दिवस चालले होते.

आता घरी चोवीस तास ऑक्सिजन सिलिंडर आणून ठेवावा लागला. भास्करने ऑफिस मधून रजाच घेतली. अपर्णाच्या सासूबाई सतत सुनेजवळ बसत होत्या. मनू तर फक्त ऑफिसला जाण्यापुरतीच बाहेर असे. शेवट काय होणार हे सगळ्याना कळून चुकलं होतं.

त्या दिवशी अपर्णा खूप घाबरी झाली. तिला सतत ऑक्सिजन द्यावा लागला. ग्लानीत पडून राहिली अपर्णा.

दुसऱ्या दिवशी मनूने रजा घेतली आणि दिवसभर अपर्णा शेजारी बसून राहिली. अपर्णाने डोळे उघडले.

“मनू मला एक वचन देशील?

मी तर आता चालले. माझा हा संसार मी मधेच सोडून चाललेय. माझी मुलं अडनिड्या वयाची आहेत. नवरा तर फक्त पंचेचाळीस वर्षाचा. माझ्या भास्करशी लग्न करशील?

मला सगळं माहीत आहे ग, तुझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्याने सांगितलं होतं मला. आम्ही एकमेकांपासून कधीही काही लपवलं नाही ग. मलाच वाईट वाटायचं की तुझ्यासारख्या गुणी मुलीला भास्करने का नकार दिला असेल? आणि मग माझ्यात होकार देताना त्याने काय पाहिलं असेल?

केवढं मोठं मन तुझं ग, हे सगळं विसरून तू माझ्यासारख्या सामान्य मुलीशी मैत्री केलीस. ”

अपर्णा दमून गेली. तिला धाप लागली. मनूने तिचा हात हातात घेतला. अपर्णाला झोप लागली हे बघून तिने हळूच तिला पांघरूण घातले आणि ती घरी आली.

आई ही मनूची सगळ्यात जवळची मैत्रीण.

“मनू, बरी आहे का ग अपर्णा? काय ग देव तरी. दृष्ट लागावी असा संसार करत होती पोर आणि हे काय ग अरिष्ट? ”मनूच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं.

मनू, नक्की काय झालंय? तू अस्वस्थ का?

मनूच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आईला अपर्णा म्हणाली ते सगळं सांगितलं.

आई म्हणाली, तू काय म्हणालीस मग तिला? ”

आई, तुला काय वाटतं, मी काय करावं? ”आई गप्प बसली.

“मनू, मला काही सुचत नाहीये ग. एकीकडे वाटतं तुझा संसार उभा रहावा, इतक्या उशिरा का होईना..

मनू शांत होती. ”आई मी अपर्णाला हो म्हणणार नाही. त्या जात्या जिवाला मी खोटे वचन नाही ग देणार.

आई, तुला सगळं माहीत आहे. मी भास्करवर मनापासून प्रेम केलं. पण तो मला कधीच आपलं म्हणाला नाही. त्याचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि नाही. ,

त्याच्या अपर्णाबरोबरच्या संसारात तो पूर्ण सुखी होता. मीसुद्धा मनोमन आनंदच मानला त्यांच्या सुखात. अपर्णा माझी खरोखर जिवलग मैत्रीण झाली.

ती म्हणाली मला, भास्कर पण तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.

आई, पण मलाच आता त्याच्याशी लग्न नाही करावंसं वाटत.

माझं कोवळ्या वयातलं प्रेम त्याला नको होतं.

तो कधीही माझा नव्हता. मग आता हा निष्क्रीय संसार मी का करू? मला त्याच्यावर काही सूड नाही ग उगवायचा.

पण तूच सांग, वठलेल्या झाडाला पुन्हा तो कोवळा बहर येईल का?

मी खरोखर त्याला माझं मानलं पण असं जबरदस्तीनं थोडंच कोणी आपल्यावर प्रेम करतं का?

बरं मी तयार झालेही लग्न करायला जयशी.. तर त्या जयची आई मध्ये आली आणि लग्न मोडलं माझं. माझ्या नशीबातच लग्न नाहीये कदाचित.

आता जर मी भास्करशी लग्न केलं तर मला त्या संसारात जागोजागी अपर्णा दिसेल.

भास्कर तिला कसा विसरेल आई?

माझ्याशी लग्न ही एक तडजोड करणार आहे तो.

त्याचा अवेळी विस्कटलेला संसार सावरायला मी हवीय त्याला.

त्याचे गोड मुलगे मला मनू मावशी म्हणतात. एकदम मी त्यांच्या आईची जागा कशी घेऊ? पण मलाच हे काहीच नकोय.

मला सगळे नक्की स्वीकारतील.

ओळखीची मुलगी बरी हाही विचार तेही करतील.

भास्करसुद्धा ही तडजोड म्हणूनच करणार.

त्याच्या आयुष्यत फक्त अपर्णाच होती आणि रहाणार.

मी आता एक स्वतंत्र बाई झालेय.

मला आता ही तडजोड जमणार नाही आई.

खर बोलायचं तर मला त्याच्या संसारात तो देऊ करत असलेलं हे दुय्यम स्थान नकोय.

हे सेकंड बेस्ट म्हणतात तसं आहे. पहिलं नाही म्हणून दुसरं स्वीकारणं.

मी भास्करची कधीही प्रायॉरिटी नव्हते आणि नाही. अजूनही नाहीये.

मला नाही आता या दुय्यम स्थानावर जायचं. मला आता अपर्णाने सजवलेला तिचा संसार नको. मला तिची सतत आठवण येत राहील तिथे.

आई, मी अपर्णाला असं वचन देणार नाही.

ती गेल्यानंतर काय करायचं हा सर्वस्वी भास्कर आणि त्याच्या कुटुंबीयांचा प्रश्न आहे. तूच सांग. मी बरोबर करतेय ना? ”

मनू आईला मिठी मारून हुंदके देऊन रडायला लागली. आईने तिला जवळ घेतलं. आपल्या या अतिशय सद्गुणी मुलीसाठी आईला अत्यंत वाईट वाटलं. काय विचित्र योग असावेत या मुलीचे असं मनात आलं आईच्या.

बाळा, तुझं बरोबर आहे. तू मनाविरुद्ध नको लग्न करू भास्करशी.

एवढ्या मोठ्या पोस्टवर नोकरी करतेस तू मनू. पुन्हा या संसारात पडणं जर तुला मनापासून नको असलं तर नको पडू. तू जो निर्णय घेशील तो मला, बाबांना मान्यच असेल.

त्याच रात्री अपर्णा गेलीच.

मनूने तिला वचन देण्याचा किंवा न देण्याचा अवघड प्रश्न उभाच राहिला नाही.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेकंड बेस्ट — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ सेकंड बेस्ट — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

मनू अगदी मनस्वी मुलगी.

लहानपणापासून ती स्वतंत्र विचारांची होती. चाळीत शेजारी शेजारी लागून खोल्या. मनूचे वडील अगदी सामान्य नोकरीत आणि आई शिक्षिका.

मनू दिसायला काही सुंदर नाही पण अतिशय स्मार्ट आणि आरोग्याचं तेज होतं तिच्या सर्वांगावर. सुंदर तजेलदार वर्ण आणि मोठे डोळे.

मनू अभ्यासात हुशार तर होतीच पण उत्तम स्पोर्ट्स् पर्सनही होती. मनूच्या मैत्रिणीसुद्धा खूप. सतत घोळका तिच्या घरी यायचा आणि मनूच्या आई प्रेमाने त्यांना खायला करायच्या.

मनूच्या चाळीत खालच्या मजल्यावर नवीन बिऱ्हाड आलं. मनू तेव्हा असेल तेरा चौदा वर्षाची.

मनूच्या आई आणि मनू त्यांना भेटायला गेल्या. काही लागलं तर सांगा, बाई हवी तर पाठवू का असं विचारायला.

मनूला त्यांचा मुलगा भास्कर तिथे दिसला. तिच्यातून दोन तीन वर्षांनी मोठा असेल. किती देखणा होता तो दिसायला. उंच, लख्ख गोरा निळे घारे डोळे. मनू बघताक्षणी त्याच्या जणू प्रेमातच पडली.

भास्करला आणखी एक बहीण होती. ती नव्हती भास्कर सारखी देखणी. पण स्वभावाने खूप गोड आणि अभ्यासात हुशार. रेवतीची आणि मनूचीही छान दोस्ती झाली.

मनूला भास्कर फार आवडायचा. या ना त्या निमित्ताने मनू त्यांच्या घरी जायची. घरी काही छान केलेलं असलं तर आवर्जून भास्करच्या घरी द्यायची. चाळीतल्या बायका हसायच्या.

“मनू, प्रेमात पडलीस काय गो भास्करच्या? बघ हो. तू एवढी हुशार आणि तो आपला बेताबेताचा.  रूप काय चाटायचं असतं का? ”

मनू काही बोलायची नाही. पण आपलं वागणं सोडायची नाही.

भास्कर तर तिच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करायचा. तो बरा त्याचा अभ्यास बरा.

मनू उत्तम मार्क्स मिळवून अकरावी झाली आणि कॉलेजला गेली. मनू एमकॉम् झाली आणि तिला बँकेत नोकरी मिळाली. फार आनंद झाला तिला.

भास्करला मात्र कमी मार्क्स मिळाले. तो कॉलेजला गेला पण फार मोठं ध्येय काही नव्हतं त्याच्या डोळ्यासमोर. डिग्री घ्यायची आणि मिळेल ती नोकरी करायची असं माफक ध्येय होतं त्याचं.

त्या दिवशी मनू भास्करच्या घरी गेली. , तो एकटाच होता घरी.

“भास्कर, सरळच विचारते, मला फार आवडतोस तू. लग्न करशील माझ्याशी? मी छान संसार करीन बघ तुझा. माझ्या मनात फक्त तूच असतोस नवरा म्हणून कायम. करशील लग्न माझ्याशी? ”

भास्कर शांतपणे म्हणाला, ”मनू माझ्या मनात तुझ्याबद्दल अशा भावना मुळीच नाहीत. तू हुशार आहेस देखणीही आहेस. मी तुझ्याइतका मुळीच हुशार नाही.

आपलं लग्न झालं तर कायम माझ्या मनात ही तुलना राहील, की आपण मनूपुढे सामान्य आहोत. नकोच हे व्हायला

“अरे हे काय बोलतोस तू? मला जर तू आवडतोस तर या गोष्टींचा विचारच कसा येईल माझ्या मनात?

अजून विचार कर भास्कर. आपला संसार सुंदर होईल. मीही नोकरी करते आहेच. आपण मोठं घर घेऊ. ”

“हेच नकोय मला. तुझ्या जिवावर मला मोठं व्हायचं नाहीये. मला नाकापेक्षा मोती जड नकोय. आई पण हेच म्हणते माझी. ”,

मनूला आता राग आला. ”हो का? म्हणजे काकूंचं मत आहे हो हे? तुला स्वतःला नाही का काही समजत? ठीक आहे मग. ”

मनू तिथून निघून गेली. तिला रेवती भेटली.

“मनू आमचा दादा अगदी मूर्ख आहे बघ. मी पण स्वप्न बघितलं होतं की मनूच माझी वहिनी होईल. ,

सोड तू. त्याला अक्कल नाहीये. तुला खरंच याच्याहून चांगला हुशार जोडीदार मिळेल. हिरा टाकून घेईल काच हातात. मूर्ख आहे दादा. ”रेवती म्हणाली.

भास्करने एका फर्ममध्ये अकाउंटंटची नोकरी घेतली.

मनूला तिचे आईबाबा म्हणाले,

मनू, आता लग्नाचं वय झालं तुझं. बघायला लागू या ना मुलगे? बघ. ते घैसास विचारत होते त्यांच्या पुतण्या बद्दल. छान मुलगा आहे बघ अगदी. ”

“आई मला फक्त भास्करशीच लग्न करायचं आहे. पण तो नाही म्हणतो. ”

”मनू हा काय वेडेपणा? मूर्ख आहे असं म्हण तो मुलगा. अग हातात आलेला हिरा टाकतोय तो. असं समज की तोच तुझ्या योग्यतेचा नाहीये. असं नको करू मनू. ”

आई बाबांनी खूप समजूत घातली. मनू घैसासांचा जय बघायला तयार झाली. संध्याकाळी घैसास मनूच्या घरी आले. जय आणि आईबाबा आणि जयची बहीण.

जयला बघताक्षणीच मनू आवडली.

तिथेच त्याने सांगून टाकलं, “मनू मला आवडलीस तू. तुमचा होकार असेल तर अगदी साधे लग्न करायला मला आवडेल. मला डामडौल आणि उधळपट्टी आवडत नाही. ”

घैसास गेल्यावर बाबा म्हणाले, मनू, काय मग? आवडला का जय? किती स्मार्ट हुशार आणि पुन्हा खूप शिकलेला मुलगा आहे ग. काय कळवू त्यांना?

“बाबा हो सांगा त्यांना.

मला आवडला हा मुलगा.

आता भास्कर इतका सुंदर नाहीये पण हुशार आहे. ” 

बाबा हसले. अजून ते भास्करचं खूळ आहेच का डोक्यात? मनू, संसार रूपावर होत नाही. पुरुषाची बुद्धिमत्ता महत्वाची. ”मनूला हे पटलं.

त्या रात्री ती भास्करला भेटली.

“भास्कर असं असं माझं लग्न ठरतंय.

तू हो म्हणालास तर अजूनही मी त्यांना नकार कळवू शकते”.

भास्कर म्हणाला, छे छे.. तू जरूर लग्न कर त्याच्याशी. माझ्या शुभेच्छा. ”

मनू घरी आली. साखरपुड्याची तारीख ठरली. मनूची आई हौसेने तयारीला लागली.

इतक्यात घैसासांचा निरोप आला. येऊन भेटा. मनूचे आईबाबा 

घैसासांना भेटायला गेले.

जयच्या आईनी त्यांचे स्वागत केलं आणि म्हणाल्या,

“तुम्ही आमच्यावर अवलंबून राहू नका. लग्न ठरलं आणि माझी आई गेली अचानक काहीही हासभास नसताना, कोणताही आजार नसताना..

मनूचा पायगुण बरा नाही. कशाला विषाची परीक्षा बघायची? नकोच ते. आपण साखरपुडा रद्द करूया. ”

अहो पण.. जयचं काय म्हणणं आहे? या युगात कसले हो पायगुण आणि अशा गोष्टी? ”

जय माझ्या शब्दा बाहेर नाही. तर हे लग्न आता होणार नाही हे निश्चित. ”

आईबाबा हताश होऊन घरी आले.

मनू बँकेतून आल्यावर त्यांनी हे तिला सांगितलं. ,

”जाऊ दे ना आई. काही नका वाईट वाटून घेऊ. , आता मलाच लग्न करायचं नाहीये. माझ्यासाठी आता स्थळं बघू नका. ”मनू तिथून निघून गेली.

दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या.

भास्करचे आईवडीलआणिभास्कर कोकणात जाऊन भास्करचं लग्न गुपचूप उरकून आले. कोणालाही पत्ता न लागता.

दुसऱ्या दिवशी घरात सत्यनारायणाला मात्र सगळ्या लोकांना बोलावलं. भास्करची बायको सगळ्याना प्रसाद देत होती. काकूंनी ओळख करून दिली.

ही अपर्णा. आमची नवी सून हो.

अगदी गडबडीत ठरलं सगळं. ”

कोणी काही बोललं नाही. मनू, तिचे आईवडील सगळे सत्यनारायणाला जाऊन आले.

अपर्णा मनूएवढीच होती दिसत.

“छान आहे ग अपर्णा. ” मनू म्हणाली. साधी दिसतेय अगदी. ”

दुसऱ्या दिवशी अपर्णा आपण होऊन मनू कडे आली. “मनू, काल नीटसं बोलणं झालं नाही आपलं. मला तुझ्याशी मैत्री करायला खूप आवडेल. इथे माझ्याएवढं कोणीच नाही. आणि तू नोकरी करतेस ना? मी फार शिकलेली नाही पण मला संसाराची खूप आवड आहे. मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. ”

ही साधी सरळ मुलगी मनूला फार आवडली. चहा घेऊन ती निघाली आणि म्हणाली

” येत जा ग मनू. मीही येत जाईन तुमच्याकडे. चालेल ना काकू? ”

हसत हसत ती निघून गेली.

किती सरळ साधी आहे पोरगी ही.

भास्करपुढे दिसायला थिटीच आहे हो. ”मनूच्या आई म्हणाल्या.

अपर्णाने आपल्या गोड वागण्याने सगळ्याना आपलंसं करून टाकलं.

मनू तर तिची घट्ट मैत्रीण झाली. आपली सगळी गुपितं सांगायला हक्काची मैत्रीण मिळालीअपर्णाला.

“काय ग मनू. करून टाक की ग लग्न. मला बघू दे ना माझी मैत्रीण सुखात असलेली. ”

अपर्णा, आत्ता कुठे मी दुःखात आहे ग? नको वाटतं आता ते लग्न. तू तुझ्या नवरा आणि ही तुझी दोन गोड पोरं मस्त आहेत की. मी नाही ग बाई त्या फंदात पडणार.

मस्त पगार आहे, बँक फ्लॅट देतेय पण आईबाबा तयार नाहीत ना तिकडे यायला. ”मनू हसून म्हणे.

अपर्णाची जुळी मुलं मनूला फार फार आवडत आणि लाघवी अपर्णा अति माया करी मनूवर.

दिवस कसे पळत होते नुसते. अपर्णाचे मोहित रोहित आता आठ वर्षांचे झाले. अपर्णा संसारात बुडून गेली.

 – क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जलसाक्षर… भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ जलसाक्षर… भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

(22 मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जातो. या जलदिनाच्या निमित्ताने नाशिक येथील महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने एक कथा स्पर्धा आयोजित केली होती. त्या कथा स्पर्धेतील माझी पारितोषिक प्राप्त कथा. जलदिनानिमित्ताने रसिकांसमोर सादर.)

☆

(आणि या सर्व गोष्टी आपण उद्यापासून आपल्या घरात करायच्या असा त्यांने दीर्घ संकल्प केला. या संकल्पनेवर विचार करीतच वाचू रात्री शांत झोपी गेला.)

इथून पुढे – – 

सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलवर वाचून जाहीर केले की आपण आदर्श जलसाक्षर कुटुंब व्हायचे. आजपासून शॉवर बंद. फक्त एक बदली पाण्यातच अंघोळ करायची. वसू वसकन ओरडली “ते तुमचं जलसाक्षर वगैरे तुमचं तुम्ही बघा. मला मनसोक्त शॉवर घेतल्याशिवाय स्वच्छच वाटत नाही.शी! एक बादली म्हणे! आणि तुम्हाला काय ती थैरं करायची ना ती तुमच्यापुरती ठेवा. आम्ही निरझर ठीक आहोत” वासूने जलतज्ञाचे म्हणणे परोपरीने समजावून देण्याचा प्रयत्न केला, पण जलतज्ञा एवढी प्रतिभा शक्ती त्याच्याकडे नव्हती व मुळातच तो नवरा असल्याने साहजिकपणे वसूला आपलं म्हणणं पटवून देऊ शकला नाही. नेहमी प्रमाणेच सपशेल पराभव पत्करून गप्प बसण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय काय असणार होता? आता सू बरोबरच्या चर्चेचा निष्कर्ष काही वेगळा नसणार हे आमच्या चरणाक्ष वाचकांनी ओळखले असणारच. सासू म्हणजे प्रत्यक्ष बायकोची आई! तिच्यासमोर तोंड उघडणे त्याला आजपर्यंत जमले नव्हते ते आज कसे जमेल? त्यामुळे त्या आघाडीवर संपूर्ण शांतताच. पण सखू मोलकरीण जेव्हा धुणे भांडी होईपर्यंत नळ तसाच चालू ठेवून पाणी वाया घालवीत होती त्यावेळी मात्र वरील सर्व अपयशाचा राग एकवटून तो तिच्यावर ओरडला “आधी पाणी बंद कर. येथून पुढे असे पाणी वाया घालवलेले मला चालणार नाही.” असे काहीसे मोठ्या जोशात बोलून आपण निदान एक तरी शौर्यकृत्य करू शकतो याचे समाधान वाटून विजयी मुद्रेने तो ऑफिसला गेला. ऑफिसला गेल्यावर त्याने शिपायाला पंखा चालू करून पाणी आणायला सांगितले पाण्याचा ग्लास समोर आल्यावर त्याने शिपायाला सांगितले पाणी फक्त अर्धा ग्लास द्यावे शिपायाने लगेच अर्धा बेसिन मध्ये ओतला आणि त्याच्यासमोर ठेवला. वासू म्हणाला 

“अरे ते पाणी वाया का घालवतोस? अनेक लोक अर्धा ग्लास पाणी पिऊन अर्धा वाया घालवतात. आपणाला पाणी वाचवले पाहिजे. जलसाक्षर झालं पाहिजे.”

“हे बगा सायेब, तुमाला अर्धा ग्लास पाणी पायजे होतं, ते मिळालं ना? उरलेल्याचं काय झालं तुमाला काय करायचंय? समजा कुणाला अर्धा ग्लास नाही, पूर्ण हवा तर मी काही येरझारे घालत बसू काय? ते जमायचं नाय! आणि माझं वागणं खटकत असंल तर तुमी सोत्ता पाणी घेत जावा आजपासून.” 

पुन्हा दुपारी असाच ऑफिसमधील कलिग्ज कडूनही चेष्टाचा विषय बनलेला व जलसाक्षरतेच्या जागृती मध्ये सपशेल अपयशी ठरलेला आपला कथा नायक खिन्न मनाने घरी परतला. तिथेही वेगळंच संकट त्याची वाट बघत होतं. 

दारातून आत आल्या आल्या चहा सुद्धा न देता वसू त्याच्यावर ओरडली “तुमचं ते जलसाक्षरता वगैरे बंद करा बघू आधी! साऱ्या शहराचा ठेका काय तुम्ही घेतलाय का? तुम्ही आज सकाळी सखूवर ओरडला. ती काम सोडून चालली होती. आता काय धुणं भांडी तुम्ही करणार का? त्या जलसाक्षरते साठी? एक तर कामाला बाई मिळत नाही. तुम्ही असलेल्या बायांना पळवून लावा. मी कशीबशी तिची समजूत घातली, पण घरच्या बाबतीत अक्कल पाजळू नका! काय कोणाला जलसाक्षर करायचं ना ते ऑफिसमध्ये करा. घरी नको‌.”

आपल्या जलसाक्षरता मोहीमे मध्ये असाच चारी मुंड्या चितपट झालेला वासू श्रांत व क्लांत मनाने झोपी गेला. 

वासू सकाळी उठला कालच्या संपूर्ण दिवसाची नकारात्मकता त्याच्या मनात अजूनही भरून राहिली असल्याने त्याला निरुत्साही वाटत होते. अंगात थोडी कणकण असावी असेही त्याला वाटू लागले. कुणाशीही न बोलता चहा पिऊन तो आराम खुर्ची बाल्कनीत टाकून, आज फिरायला जाण्याचे रहित करून, आराम खुर्चीत विसावला. आज सिकलीव्ह टाकण्याचा निर्णय घेत डोळे मिटून शांत पडून राहिला. सखुबाई अजून आली नव्हती. आज ती आली नाही तर घडणाऱ्या महायुद्धाला कसं तोंड द्यायचं याचा तो विचार करू लागला आणि तो अधिकच अस्वस्थ होऊ लागला. घरातही सगळीकडे वादळापूर्वीची शांतता पसरली होती.

वासूला जरा डुलकी लागली आणि बेलच्या आवाजाने जाग आली. उशिरा का होईना सखुबाई आल्यामुळे त्याचा जीव भांड्यात किंवा अक्षरशः धुणंभांड्यात पडला असेही म्हणायला हरकत नाही. सखुबाईची तब्येत बरी नसावी. आल्या आल्या सासूने विचारले 

“काय झालं? वसू ss जरा सखुबाई साठी चहा टाक आणि मलाही टाक घोटभर तिच्याबरोबर” 

आणि संभाषण सुरू झालं 

“अवो, काय सांगू? आज पयलं पाणी आलं उशिरा, ते सुदा थेंब थेंब, काल पाणीबंदीचा दिवस, त्यामुळं पाण्यापाई भांडाभांड सुरू, कसंतरी चार बादल्या पाणी मिळालं. ते सुदा मारामारी करून. जीव मेटाकुटीला आला बघा. त्यात एका बाईनं कळशी मारली फेकून, कंबर दुखायला लागली. आता असं रोजच झालं तर काय करायचं आजीबाई? ” “सखू अगं यंदा धरणातलं पाणी आता संपायला आलंय. नगरपालिकेनं तरी कुठून आणायचं पाणी? आता आमच्याकडे बोरिंग आहे म्हणून चाललंय. पण ते सुद्धा किती पुरेल उन्हाळ्यात कुणास ठाऊक? अगं, जावईबापू तुला काल बोलले ते का आमच्यासाठी बोलले? आम्हाला पाणी थेंबा थेंबानं किंवा टँकरनं भरावं लागतं का? ते लागतं तुम्हालाच! आमच्या लहानपणी गावाकडं हौदभर पाणी आम्ही मुली हसत मजेत विहिरीचं ओढून भरायचो. त्यामुळे मला पाण्याचे महत्व कळतं. मी अजूनही कधी शॉवर घेतला नाही. एका बादलीत अंघोळ करते आणि माझं लुगडं मी स्वतः अर्धी वारली पाण्यातच धुवून टाकते. होय की नाही? हे बघ आपल्या गावाची लोकसंख्या समज दहा लाख. एका कुटुंबात चार माणसे धरली तर अडीच लाख कुटुंबं. आमच्या सारखी फ्लॅट बंगल्यात राहणारी निदान एक लाख कुटुंब तरी असतील. त्यांच्या घरी तुझ्यासारख्या बाया काम करतात ना? ” 

तेवढ्यात वसूनं चहा आणून ठेवला. आणि तीही आईच आईचं बोलणं ऐकू लागली. 

*सखू घे, चहा घे आणि ही गोळीही घे, अंग दुखायचं कमी होईल. तर मी असं म्हणत होते, या एक लाख घरांमध्ये तुझ्यासारख्या बायांनी जर पाच बादल्या पाणी वाचवलं. फक्त त्रास काय तर सारखा नळ चालू बंद करायचा. तेवढाच ना? पण तुझ्या या दुखण्यापेक्षा कमीच नाही का? जर एका कुटुंबात पाच तर एक लाख कुटुंबात पाच लाख बादल्या पाणी वाचेल ना? आता जावईबापू रोज चार बादल्या पाणी वाचवतात. वसु आणि सू नं निदान तीन-तीन बादल्या पाणी वाचवलं तर आमच्या दहा बादल्या. अशा एका घरातून पंधरा बादल्या पाणी वाचलं, तर एकूण 15 लाख बादल्या पाणी वाचलं ना? म्हणजे जर तुमच्या घरी पाच बाटल्या पाणी लागत असेल, तर तुमच्यासारख्या तीन लाख कुटुंबाची सोय होईल की नाही? मग हा वैताग मारामाऱ्याच बंद नाही का होणार? मी बाई फार शिकले नाही. पण अजूनही पाणी वाचवायचे अनेक मार्ग या तज्ञ लोकांना माहीत असतात. जावईबापू हुशार आहेत. जास्त शिकलेले आहेत. ते अशा तज्ञांची भाषणे ऐकून आपल्याला जे सांगतात ते आपल्याच भल्यासाठी ना? उलट त्यांचे कडून अशी भाषणे आपण समजून घेतली आणि ते उपाय आचरणात आणले तर! आपलाच सगळ्यांचा सर्व शहरवासीयाचा फायदा होणार आहे, होय की नाही! ”

आजीबाई खरं आहे तुमचं म्हणणं, मला पटलं बर का! काल मला साहेबांच्या बोलण्याचं वाईट वाटलं, पण आता पटलं की त्यांचं बोलणं आमच्यासाठीच होतं. आम्ही जर हित पाणी वाचवलं, तर आमचाच फायदा होईल. मी चुकले आजीबाई. साहेबांना सांगा चुकी झाली म्हणून. मी आजपासून पाणी वाचवणार नक्की! ” 

“आता कसं? आता तू हेच तुझ्या जवळच्या सर्व बायांना सांगायचं बरं का? आणि तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून पाण्याची बचत करायची, म्हणजे हा पाण्याचा प्रश्न सोपा होऊन जाईल” 

वसू सुद्धा आईचं बोलणं ऐकून म्हणाली “आई माझं सुद्धा चुकलंच. मी सुद्धा हे म्हणाले तसेच वागीन! ” या सर्व जाणांमध्ये सू कशी मागे राहील?

“आजी मी तुझ्यासारखंच माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना सांगेन” 

असं म्हणत क्लासला पळाली. बाल्कनी मध्ये हे ऐकणाऱ्या वासू च्या डोक्यात जलसाक्षरतेचा प्रकाश पडत होता आणि सासूच्या अभिमानाने त्याचा उर भरून आला होता! एवढ्यात वसु बाल्कनीत आली आणि वासूला बघताच

 “आज असे का बसलात? बरं नाही का वाटंत? चला करू आत मध्ये बसा मी चहा आणते”

असं म्हणत चहा बेडरूम मध्ये घेऊन आली आणि म्हणाली 

“अहो माझं चुकलं बरं! मला माफ करा ना प्लीज! ” 

वसु म्हणाला “इतक्या दुरून माफी कशी करता येईल? त्यासाठी जवळ यावे लागेलच ना? ” 

“चला चावट कुठले” 

असं म्हणत असतानाच वाचू ने तिला माफ केले. 

आता वासूने वसूला कसे माफ केले असेल हे आमच्या चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच!

वासू आणि वसू सारखे माफीनामे तुमच्या आमच्या ही घरात घडोत. अशी ही जलसाक्षरतेची साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!!!

– समाप्त –

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जलसाक्षर… भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ जलसाक्षर… भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

☆

ऐका ऐका जलदेवता तुमची कहाणी… 

अर्थात जलसाक्षरतेची कहाणी… जेहेत्ते कालाचे ठायी एका आटपाट नगरीमध्ये वासू हा एक मध्यमवर्गीय, मध्यमवयीन, मध्यममार्गी असा एक सर्वसामान्य मध्यम माणूस रहात असे. आता मध्यम म्हटले की त्याचा फ्लॅट असणार बंगला नव्हे. त्याची दुचाकी असणार चारचाकी नव्हे. मध्यमवयीन म्हणल्यानंतर तो कुठेतरी नोकरी करीत असणार रिटायर्ड नव्हे. तसेच त्याला वाङ्मयाची व्याख्यानांची आवड वगैरे असणारच. ओघानेच त्याच्या बायकोचे नाव वसू असायलाच हवे. वाङ्मयीन नियमानुसार त्याला एक सासू असायला हवी. हो ना? तशी ती या वासुला सुद्धा आहे. जेहेत्ते कालाच्या पद्धतीनुसार वासुला एकच मूल असणार आणि ती मुलगीच असायला काय हरकत आहे? नाही का? म्हणजे समाज प्रबोधन वगैरेच्या दृष्टीने ते बरे असावे. होय की नाही? तर असे हे चौकोनी कुटुंब आपल्या कथानायकाचे. अरे हो पण त्या कन्यारत्नाचे नाव काय? ते काहीही असू शकेल. सुशीला, सुकन्या, सुधन्वा वगैरे वगैरे. छे छे ही नावे जुनी वाटतात. त्यामानाने सुधन्वा 

ठीक वाटेल नाही का? पण ते आपल्याला काय करायचंय? कारण त्या कन्यकांना शॉर्ट फॉर्म ची सवय. आणि प्रत्येक नावाचा शॉर्ट फॉर्म करूण्याचा वसा त्या आटपाट नगरीच्या लोकांनी इतिहासकाळापासून घेतलेला होता असे म्हणतात. तेथील एका नव्या दमाच्या इतिहास संशोधकाने पुरातन काळी श्रीराम दशरथ रघुवंशी यांना एसडीआर व लक्ष्मण दशरथ रघुवंशी यांना एलडीआर म्हणत असत असे कोणत्या तरी जवळपास सापडलेल्या पुराणकालीन शिलालेखावरून स्पष्ट होते. असे विधान करून पुराव्या दाखल संबंधित शिलालेखाचे फोटो व्हाट्सअप वरून व्हायरल केलेत असे ऐकले आहे. अरे पण हे असे जुन्या जाणत्या लेखकांसारखे मी विषयांतर का बरे करीत आहे? पण. तर आपला मूळ विषय म्हणजे वासू. तर या वासूच्या कन्येचे नाव काय ते काही का असेना? पण तिच्या सर्व मित्रमैत्रिणी तिला सू या नावानेच पुकारत असल्याचे व त्यांनाही तिचे नक्की नाव माहित नसल्याने आपणालाही ते माहित करून घेण्याची आवश्यकता नाही. असो. तर ते कन्यारत्न म्हणजे सू. तर असे हे चौकोनी कुटुंब वासू, वसू, सासू आणि सू ही झाली या चौकोनी कुटुंबाची ओळख. तूर्त एवढीच ओळख पुरे. तर झालं काय की वासुने एका दिवशी पेपरात वाचलं अर्थात मध्यमवर्गीय व मध्यमवयीन म्हटल्यावर तो पेपर लहान सहान बातम्यांसह संपूर्ण वाचत असणार हे ओघाने आलंच. असो. तर त्याने वाचलं की अर्थात अत्यंत छोट्या व न दिसणाऱ्या कोपऱ्यात छापलेल्या बातमीत वाचलं. या आटपाट नगरीमध्ये जलसाक्षरता या विषयावर एका प्रसिद्ध जलतज्ज्ञाचं व्याख्यान आहे. अर्थात तज्ज्ञ म्हणजे मराठी नसणार. जलतज्ज्ञ म्हणजे उत्तरेकडील असू शकतो. त्याचं आडनाव सिंग वगैरे असायला काहीच हरकत नाही. अर्थात तो कोणी का असेना. पण तो अत्यंत बुद्धिमान, प्रभावी वक्ता व त्या विषयावरील जाणकार मराठी आहे असे वासुला खात्रीने वाटले. हे मात्र नक्की. असो. तर त्या जाणकाराच्या व्याख्यानाला जायचे वासुने ठरवले. अर्थात मध्यम वगैरे असल्यामुळे वासुची अशीही इच्छा होती की आपले संपूर्ण कुटुंब जलसाक्षर व्हावे. परंतु कौटुंबिक सभेमध्ये नेहमीप्रमाणे त्याचा हा प्रस्ताव एक विरुद्ध तीन मतांनी फेटाळण्यात आला. सासूचा अर्थातच भजनी मंडळाचा कार्यक्रम असल्याने ते मत विरोधी पडलं. साड्यांच्या भव्य सेलची पानभर जाहिरात आजच्याच पेपरला असल्याने वसूचं मत सुद्धा विरोधात गेलं आणि चि. सू पूर्ववतच सायंकाळी मैत्रिणींबरोबर भटकंतीस जात असल्याने व तारुण्यपूर्व वयोमानात असल्याने वडिलांबरोबर जाण्याची शक्यता नसल्याने ते मत विरोधात जाणार हे वासुने कायमचे गृहित धरलेले असते. अशा तऱ्हेने फेटाळल्या गेलेल्या ठरावाचा एकमेव समर्थक वासुने एकट्यानेच व्याख्यानाला जायचे असे वाचून ठरवले असणार हे आमच्या चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आत्तापर्यंत आले असेलच. 

तर अशा तऱ्हेने आपला कथानायक श्री वासूजी हे बरोबर सहा वाजता तेथे पोहोचले येथे एकही वाहन अथवा प्रेक्षक वा संयोजक यांचे पैकी कोणाचाही पत्ता नव्हता. फक्त दोन कर्मचारी गेटवर फ्लेक्स लावण्याच्या खटपटीत होते. गेटवरचा बोर्ड पाहून वासूने मोठा आ वासला. बोर्डवर ‘जलसा मंडळ’ असे लिहिले होते. त्यांनी त्या कर्मचाऱ्याला विचारले “अहो येथे व्याख्यान आहे ना? ”

“ कुणास ठाऊक? आम्हाला फक्त इथे हा जलसाचा बोर्ड लावायला सांगितले आहे”. 

बुचकळ्यात पडलेल्या वासूचा आs असून तसाच उघडा असताना, घाईघाईत एक मनुष्य हातात पिशवी व काही गुच्छ सांभाळण्याची कसरत करत करत आत शिरला. त्याच्या मागोमाग आत शिरत वासूने त्याला विचारले “अहो येथे व्याख्यान आहे का हो? ”

“हो”

“मग हे जलसा मंडळ काय आहे? ”

“ ते आमच्या संस्थेचं नाव आहे. ‘जल ललकार साहित्य मंडळ’ या संस्थेतर्फे ते व्याख्यान आहे.”

“मग ते व्याख्यान आहे केंव्हा? ” 

“सात वाजता” 

“अहो पण पेपर मध्ये सहा वाजता छापलंय” 

“हो बातमीत वेळ सहाची दिली की आटपाट नकरीचे लोक सात वाजेपर्यंत येतात. तुम्ही इथले दिसत नाही? आता बघा ना, सहाची वेळ द देऊन सुद्धा तुमच्याशिवाय अजून कोणी दिसते का? जर पाहुणे चुकून वेळेवर आले तर संस्थेच्या इभ्रतीचा पंचनामा होणार ना? पण तुम्ही जाऊ नका, चहा येईलच इतक्यात आपण चहा घेऊ” 

चहा आला. चहा पिता पिता मी त्याला विचारलं

“का हो पण या कार्यक्रमाला किती प्रेक्षक येतील! ” 

कार्यक्रम ठरवतानाच त्याची सोय करून ठेवावी लागते. आता असं पहा स्वागत गीतासाठी आम्ही पाच मुली घेतल्यात. आवाज कसा का असेना पण त्यांचे मित्र मंडळ मोठे असावे. कुठल्यातरी क्लासच्या असाव्यात, म्हणजे ते मित्र मंडळ, त्यांच्या घरची व काही कॉलनीतली मंडळी यापैकी साधारण हिशोबासाठी कमीत कमी 15 पकडा. एक सामूहिक जलनृत्य आहे. त्यांचीही अशाच हिशोबाने २० धरा, जलकाव्य स्पर्धेचे पाच विजेते त्यांची पंधरा, जलावतरण सन्मान चिन्हासाठी मनपाचे पाणी सोडणारे कर्मचारी व प्लंबर यांचे कुटुंबीय किमान 20 धरू. म्हणजे 70‌ संस्थेचे किमान पाच‌. असे 75 नक्की‌. मग बातमी वाचून येणारे काही रिकामटकडे बावळट चार-पाच, असे 80 जण आले की चित्कार गर्दी झाली‌. हो की नाही? ” 

वासूने पुन्हा एकदा आ वासला बायको व्यतिरिक्त आपला बावळटपणा तोंडावर बोलणारे असेही काही लोक असू शकतात ही शक्यता त्यांने कधीच गृहीत धरली नव्हती‌. तेवढ्यात त्यांच्या वॉर्ड मध्ये मनापाचे पाणी सोडणारा कर्मचारी (आता वाचकांना त्याचं नाव कशाला हवंय? त्याची काही गरज नाही. आणि कुणाला हवं असल्यास त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने काहीही समजावं. सगळं लेखकांनंच कशाला सांगायला हवं? वाचकांनीही थोडसं स्वतःचं डोकं वापरायला काय हरकत आहे? ) असो. 

“काय वासूनाना;” करत तो सहकुटुंब त्यांचे जवळ येऊन बसला आणि आपण कसे प्रामाणिक व कर्तबगार कर्मचारी आहोत याचे रसभरीत वर्णन करत वासूला कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत पकडून ठेवले. अर्थात नंतरचा कार्यक्रम रटाळपणा आणि गोंधळाने भरलेला असला तरी जलतज्ञाचे भाषण मात्र अत्यंत उद्बोधक प्रभावी व समर्पक होते. वासूला आपण तो रटाळपणा सहन करत थांबल्याचे सार्थक झाले असे वाटले. पूर्वीच्या सर्व नकारात्मक गोष्टींना झटकून तो जलतज्ञांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे मनात घोळवीत राहिला.

सतत तीन वर्षाच्या कमी पावसामुळे पाणीसाठे कमी झाले आहेत. मुळातच पाणी अपुरे. आठवड्यातून एक दिवस पाणी बंद करून सुद्धा उपलब्ध पाणीसाठा अपुरा असल्याने पाणी बचती शिवाय पर्याय नाही. नागरिकांनी पाणी अत्यंत काटकसरीनेच वापरणे आवश्यक आहे. श्रीमंतांनी बाथटब बंद ठेवले पाहिजेत. शॉवर मुळे एका बादलीत होऊ शकणारऱ्या स्नानासाठी पाच सहा ल्या पाणी वापरले जाते. म्हणजे चार-पाच बदल्यांचा अपव्यय होतो. सतत नळ बंद ठेवणे आवश्यक आहे. पण त्यांच्या ऐवजी नळ सतत चालू ठेवून पाण्याचा अपव्य केला जातो. शर्ट एक दिवस वापरत असाल तर तीन दिवस वापरून मग धुवायला टाका. जीन्सच्या पॅन्ट वापरा त्या आठवड्यातून एकदा धुतल्या तरी चालतात. वाहने पाईपने धुण्यापेक्षा ओल्या फडक्याने पुसा वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आपल्याला अमलात आणता येण्यासारख्या आहेत हे वासूला मनोमन पटले. आणि या सर्व गोष्टी आपण उद्यापासून आपल्या घरात करायच्या असा त्यांने दीर्घ संकल्प केला. या संकल्पनेवर विचार करीतच वाचू रात्री शांत झोपी गेला.

– क्रमशः भाग पहिला 

☆

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संबंध… ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ ‘संबंध…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“Graceful,  durable old furniture आणि New fashionable furniture ची सांगड घालून घर सजवू या. ” 

काल छायाचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मला तिने विचारले,  “मागच्या वर्षी तुझ्या नेहाचे लग्न झाले ना. तुमच्या काय अपेक्षा होत्या ग?? नेहाच्या काय अटी होत्या?? “

मी म्हंटले,  “काय ग?? काय झाले आज?? अचानक हा प्रश्न कुठुन डोक्यात आला?? असं का विचारते आहेस?? “

छाया म्हणाली,  “अग!! यावर्षी अजयचे लग्न करायचा विचार आहे. एका विवाह संस्थेत‌ नाव नोंदवले होते. काही मुलींची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. मुलींकडच्यांचे फोन पण येत आहेतच. मला तर हे खूप कठीण काम वाटतंय ग. कसं करावं की मुलींची पण dignity राहिल,  व सर्व दृष्टीने समाधान होईल. खूप जास्त मोठ्या अपेक्षा नाहीत आमच्या,  आपल्या सारखीच असावी. एकदा वाटतं मुलीला आधी आम्ही बघून,  मग अजयने बघावी का? एकदा वाटतं,  आधी अजयनेच बघावी,  तिच्याशी बोलावे,  भेटावे व नंतर जर गोष्टी पूढे गेल्या तर मग पूढच्या गोष्टी कराव्यात. “

छाया पुढे म्हणाली,  “मला वाटलं तुझ्याशी थोडं बोलावं म्हणजे,  माझे‌ विचार थोडे स्पष्ट होतील. तुला मुलीच्या आईचा अनुभव आहे ना. तेंव्हा मुलीकडे कसा आणि काय विचार करतात हे कळेल. खूप अपेक्षा असतात का ग?? आजकाल म्हणे मुली आधी मुलाचे पॅकेज किती?? व प्रोपर्टी किती आहे?? हेच बघतात. खरं आहे का?? “

मी म्हंटले,  “खरं सांगू का?? अग! प्रत्त्येक घर वेगळं असतं. अग! आपली मुलगी आनंदी रहावी यापेक्षा दुसरे काय हवं असतं ग?? आम्ही नेहाला पहिल्या पासून हेच सांगत आलो,  की लग्न झाल्यावर दोनाचे चार हात होतात. तेंव्हा दोघे मिळून खूप कमवू शकता. मुलगा चांगला पाहिजे व घरचे अन्य सदस्य पण महत्वाचे असतातच. पैशापेक्षा माणसं महत्वाची.

मला अस वाटते,  आधी तुम्हीच बघा. घरदार बघून बरंच लक्षात येतं. चौकशी करा. एखादी चांगली फॅमिली,  म्हणजे तुमचे,  त्यांचे विचार जुळत असतील तर,  दोन्ही कडील पूर्ण फॅमिलीने दोन तिनदा भेटण्यास काही हरकत नाही. गप्पांमध्ये बरेच कळते. तुमचे विचार,  अपेक्षा,  परिस्थिती,  त्यांच्या घरचे सणवार लक्षात येतात.

आजकाल मुली शिकलेल्या असतात,  त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारणे बरोबर वाटत नाही. तेंव्हा अशा भेटीत सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. बोलताना त्यांचा विचारांचा कल कळतो. व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन कळतो. चांगले होमवर्क करून जा,  म्हणजे बोलण्यात कोणते विषय काढायचे??? याची तयारी होईल.

सध्याची‌ परिस्थीती म्हणजे,  समाजात सध्या चालू असलेली प्रथा बदलायला हवी आहे. मुलींचे विचारही सध्या वेगळ्या दिशेने जात आहेत. घरातील माणसांपेक्षा घरातील वस्तूं जास्त महत्त्वाच्या वाटतायेत.

आजकाल मुलांचे आई-वडीलही आधीच माघार घेतात. आधीच ठरवून मोकळे होतात. आधीच असे दाखवतात की लग्न झाल्यावर वेगळे राहणेच बरं राहील. व त्याअर्थाचे वक्तव्य देतात. तयारी करतात. हा शेवटचा option असावा. “

“मुलाला मुलगी पसंत पडली की,  तिने अजयला नीट साथ द्यावी. बस,  एवढीच अपेक्षा आहे आमची. बाकी आमची काही अपेक्षा नाही. आमचा भार आमच्या मुलावर नाही. ते वेगळे राहिले तरी चालेल,  वगैरे वगैरे बोलून मोकळे होतात. आधी पासून असे सिग्नल आपल्या बोलण्यातून द्यायची काय गरज?? त्यापेक्षा आम्हाला सून मुलीच्या रुपात हवी आहे,  घराला सांभाळणारी,  आमच्यात मिळुन मिसळून राहणारी. तिच्या नोकरी करण्याला आमचे बंधन नसेल. दोघांना दोन्ही घरचा आधार असणारच आहे. दोन्ही घरी अडीअडचणी ला ही मुलं असतीलच.

लग्न म्हणजे दोन्ही घरचा नेहमीचा संबंध असायला हवा. दोन्ही घरच्या सुख दुःखात एकमेकांची साथ हवी.

अहो! एकाच घरच्या दोन भावांची घरे वेगळी असतात. कारण दोन्ही घरच्या बायका वेगवेगळ्या घरातुन येतात ना म्हणून. आपल्या बाबतीत तर आपण अगदी दोन वेगळ्या फॅमिलीज आहोत. तेंव्हा फरक असणारच आहे. तुमच्या आणि आमच्या काही चांगल्या पद्धती मिळुन‌ नवीन काही चांगल्या पध्दती दोन्ही घरात सुरू होतील. नक्कीच चांगले होईल. आणि घाई कशाचीच नाही. adjust व्हायला थोडा वेळ लागेल एवढंच. ‘ अशा अर्थाचे बोलणे जास्त चांगले व‌ positive वातावरण निर्माण करेल.

मुलगा लग्न झाल्यावर आपला रहात नाही असा विचारच करायचा नाही. मी छायाला म्हंटलं,  “तू आपल्या सूनेबद्दल जे चित्र मनात रेखाटलं आहे ते तसंच व्हायला तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. हे बघ आरामदायी म्हातारपण हवे असेल तर एकत्र राहणं तुमच्या करिता चांगलेच आहे व नोकरी करणाऱ्या सूनेकरिता पण ते सोईस्करच असणार आहे. दोन पीढी एकत्र रहायचे म्हणजे सोपं गणित नाही. तडजोड करावीच लागणार आहे. कारण जनरेशन गॅप एवढा मोठा आहे की सर्वांचे सर्वांना सर्व पटेल हे शक्यच नाही.

अग! पस्तीस वर्षे झाली आम्हा दोघांना बरोबर राहून. तरी प्रत्त्येक गोष्टी वर एकमत असतंच असं नाही. पण आपल्या माणसांसाठी तडजोड केली तर काय हरकत आहे?? नोकरी करणारी सून पाहिजे तर तडजोड जास्तच करावी लागेल. स्पष्ट व गोड बोलून सर्व सहज शक्य होऊ शकतं. मनातल्या मनात धूसफूस,  भुणभुण करणे,  बाहेरच्या लोकांना घरातील गोष्टी सांगण्यापेक्षा घरातील लोकांशी स्पष्ट बोलून मार्ग काढणे जास्त चांगले नाही का?? त्यामुळे कान भरणे हा प्रकार होणारच नाही.

सून म्हणजे,  तुझ्या एवढाच तिचा पण मान‌ या घरात असायला हवा आहे. ती तुमची पुढची पिढी आहे. तुझ्या लाडक्याची अर्धांगिनी आहे. मुलगा तेवढा माझा,  मग सून‌ तुझी नाही का?? हा दूजाभाव नको.

अजयला नुसता खोकला झाला तरी तू काळजी करते,  तेवढेच प्रेम आपल्या सूनेवरही करायचे. आपण आपल्या कडून पूढाकार घ्यायचा. सूनेला आपलं मानणे व ते आपल्या कृतीतून दाखविणे ही या नात्याची सर्वात महत्त्वाची व आवश्यक पहिली पायरी आहे.

माझी आजी म्हणायची,  मुलगा तर माझा आहेच. सूनेला आपलसं करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करते. तिच्या घरच्यांचा मान ठेवते. शेतावरून आंबे आले,  धान्य आले की आधी त्यातले थोडे तरी मी सूनेच्या माहेरी नक्की पाठवते. सूनेचा वाढदिवस मी आठवणीने साजरा करते. हे असे प्रसंग नातं घट्ट करतात.

माझा मुलगा आता फक्त माझा नाही त्याच्यावर माझ्या इतकाच हक्क असणारी त्यांची बायको ही आहे,  हे सत्य पचले पाहिजे. आता सूनेचे माहेर ही माझ्या मुलाची extended फॅमिली असणार आहे. हे ही सत्य पचले पाहिजे.

मन मोठ्ठं व मोकळं ठेवावे लागेल. लहान सहान गोष्टींवर दुर्लक्ष करणे,  प्रतिक्रिया न देणे,  body language वर लक्ष देणे हे प्रयत्नपुर्वक शिकावे लागेल.

सूनेच्या नावाने बोंब मारणे,  सर्वात सोप्पे काम आहे. पण त्यात आपण आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडण्यात कमी पडलो‌ का?? हाही अर्थ निघतोच. तेंव्हा home work खूप करायचे आहे.

Ego, पैसा, practical approach, प्रतिष्ठा, formal relations, चढाओढ, शोबाजी, property, माणसांपेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा, ही समज या सध्याच्या परिस्थितीत हावी आहे. या पेक्षा प्रेम,  संबंध,  आत्मियता,  एकमेकांची काळजी,  आधार,  समाधान या जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत हे पुन्हा एकदा समाजात युवा मंडळीला समजावयाची गरज आहे. सुरवात करायला हवी आहे. वेळ लागेल,  उशिरा का होईना पण परीणाम नक्की दिसतील.

पैसा व माणसं हे दोन्ही आयुष्यात महत्वाचे व आवश्यक आहेत पण त्याचा बॅलन्स सांभाळता आला पाहिजे.

कुठे थांबायचे??? हे प्रत्येकाला प्रत्त्येक क्षेत्रात नेहमी समजलंच पाहिजे. मग ते प्रकृतीवर अतिक्रमण असो किंवा पैशामागे धावणे असो. जूनी पीढी असो नाही तर नवीन पिढी असो.

आपली पीढी म्हणजे नवीन व‌ जून्या पद्धती रितीरिवाज,  संस्कार यांना जोडणारा ब्रिज आहे व त्यामधून मार्ग काढायला आपण शिकलो आहोत. अनेक challenges बघीतले आहेत,  झेलले आहेत,  व यशस्वीपणे पार केले आहेत. आता हे challenge ही सफलतेने पार पाडू या. नवीन वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलायचा प्रयत्न करू या. विचारांचे नातं इतकं घट्ट करूया की मतभेद पण हसत हसत स्विकारायला शिकूया. Graceful, durable old furniture व New fashionable furniture ची सांगड घालून पुन्हा एकदा घर सजवू या.

सामान्य जीवन जगणे हे खरंतर प्रत्येकाकरिता व त्याच्या कुटुंबीयांकरिता असामान्य व आनंददायी गोष्ट असते.

सुनेला पारखायचा नाही, समजायचा प्रयत्न करावा. म्हणतात ना, ‘रिश्ते बरकरार रखने के लिए एकही शर्त है, किसी की कमियां नहीं, अच्छाइयां देखें। ईश्वर तो सिर्फ मिलाने का काम करता हैं। संबंधों में नजदीकियां और दूरियां बढ़ाने का काम तो इन्सानही करता हैं।’

 

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अपरिचिताचा शेवटचा प्रवास…” (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – कन्नड अनुवादक : अज्ञात – मराठी अनुवादक : डॉ. सुभाष भोसले ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “अपरिचिताचा शेवटचा प्रवास…” (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – कन्नड अनुवादक : अज्ञात – मराठी अनुवादक : डॉ. सुभाष भोसले ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

(‘अपरिचिताचा शेवटचा प्रवास’ ही एक सोशल मीडियावर लोकप्रिय झालेली हृदयस्पर्शी कथा आहे. या कथेत एका टॅक्सी चालकाचा आणि एका वृद्ध प्रवाशाचा अनुभव मांडला आहे. या कथेचे मूळ लेखक केंट नर्बर्न (Kent Nerburn) आहेत. ही कथा त्यांच्या “Make Me an Instrument: The Humble Journeys of a Everyman“ या पुस्तकातील एका भागावर आधारित आहे, ज्याला “The Taxi Ride“ या नावाने ओळखले जाते. या कथेचा कोणताही एक अधिकृत ‘एकुलता एक’ अनुवादक नाही. ही कथा प्रामुख्याने सोशल मीडिया (फेसबुक आणि व्हॉट्सॲप) आणि ब्लॉग्स द्वारे मराठीत लोकप्रिय झाली.-  AI आधारीत जानकारी)

मी एक टॅक्सी चालक आहे. बहुतेक वेळा मी रात्रीची पाळी करतो. गेल्या आठवड्यात रात्री साधारण अकरा वाजता एक वयस्कर गृहस्थ माझ्या टॅक्सीत बसले. पांढ रा कुर्ता, धोतर, थकलेले डोळे—पण त्यांच्या आवाजात एक वेगळीच ठामपणा होता.

टॅक्सीत बसताच ते म्हणाले,

“आज रात्री तू मला पाच ठिकाणी घेऊन जायचे आहे. मी तुला ५००० रुपये रोख देईन. पण प्रवास संपेपर्यंत ‘का?’ असा एकही प्रश्न विचारायचा नाही.”

त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यावर पाच पत्ते लिहिले होते.

पहिला थांबा

दक्षिण कोलकात्यातील एक जुने घर. मी गाडी थांबवली. ते खाली उतरले नाहीत. फक्त काच खाली करून त्या घराकडे शांतपणे पाहत राहिले. दहा मिनिटे गेली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आवाज नव्हता.

“चला… पुढच्या ठिकाणी जाऊया,” ते हळूच म्हणाले.

दुसरा थांबा

एक प्राथमिक शाळा. गेट बंद होते. आत अंधारात खेळाचे मैदान दिसत होते. ते गाडीतून उतरले आणि हळूहळू झोपाळ्याजवळ गेले. त्यावर बसून हलके हलके झोके घेऊ लागले. वीस मिनिटांनी ते परत आले.

ते म्हणाले, “इथे मी ४३ वर्षे शिक्षक म्हणून काम केले. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ इथेच गेला.”

तिसरा थांबा

एक छोटंसं जुने कॉफी हाऊस. ते आत गेले आणि चहाचा एक कप मागवला. एका कोपऱ्यात बसले, पण चहाला हातही लावला नाही. फक्त आजूबाजूला पाहत बसले. पंधरा मिनिटांनी हलकंसं हसत बाहेर आले.

ते म्हणाले, “इथेच मी पहिल्यांदा उमादेवीला भेटलो होतो… १९६९ साली.”

चौथा थांबा

निम्ताला स्मशानभूमी. ते खाली उतरले. एका स्मृतीफलकासमोर उभे राहून काहीतरी पुटपुटत होते—जणू प्रार्थना करत होते. अर्ध्या तासाने परत आले तेव्हा त्यांचे डोळे लाल झाले होते.

ते म्हणाले, “ती गेल्याला आता तीन वर्षे झाली.”

पाचवा थांबा

एक मोठे सरकारी रुग्णालय. त्यांनी गाडी थांबवायला सांगितले. मग माझ्याकडे पाहून म्हणाले,

“आता मी तुला कारण सांगतो. मला चौथ्या टप्प्यातील कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणतात—काही आठवडे… कदाचित काही दिवसच उरले आहेत. म्हणून आज रात्री माझे संपूर्ण आयुष्य शेवटच्या वेळेस पाहून घ्यायचे होते.”

.. .. हे ऐकून मी स्टेअरिंगवर डोके टेकवून रडू लागलो.

ते शांतपणे म्हणाले—

“ते घर… जिथे मी माझी मुलं वाढवली.

ती शाळा… जिथे मला माझ्या आयुष्याचा उद्देश सापडला.

ते कॉफी हाऊस… जिथे मी प्रेमात पडलो.

ते स्मशान… जिथे मी माझ्या पत्नीला शेवटचा निरोप दिला.

आणि हे रुग्णालय… जिथे आज मी दाखल होणार आहे. मी पुन्हा घरी परतणार नाही.”

.. .. .. त्यांनी ५००० रुपये माझ्या हातात दिले.

“धन्यवाद. तू मला माझे आयुष्य पुन्हा एकदा पाहायला मदत केलीस. माझ्या आयुष्यातील शेवटचा अपरिचित माणूस—पण खूप माणुसकीने वागणारा.”

मी म्हणालो, “नको तात्या, हे पैसे मी घेऊ शकत नाही.”

ते म्हणाले, “घे. हे देण्यासाठी माझ्याकडे आता कोणी नाही. माझी मुलं माझ्याशी बोलत नाहीत. मित्रही उरले नाहीत. पण तू मला तीन तास दिलेस—तीन तास माणुसकीचे. त्याची किंमत पैशापेक्षा जास्त आहे.”

त्यांनी आपली छोटी बॅग घेतली आणि रुग्णालयात आत गेले.

दुसऱ्या दिवशी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला पाहून हलकंसं हसलं.

“तू आलास?”

मी म्हणालो, “तुम्हाला असंच सोडून येणं मनाला पटत नव्हतं.”

आम्ही दोन तास बोललो—त्यांच्या पत्नी उमादेवीबद्दल, त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल, आणि दूर गेलेल्या मुलांबद्दल.

मी रोज जाऊ लागलो. चहा घेऊन जायचो, त्यांना वर्तमानपत्र वाचून दाखवायचो. कधी कधी फक्त त्यांच्या शेजारी शांत बसायचो.

एकदा ते म्हणाले,

“मी एकटाच मरणार असं वाटत होतं. पण तू आता इथे आहेस. शेवटी एक अपरिचितच कुटुंबासारखा झाला—हेच माझं भाग्य.”

मी त्यांचा हात हातात घेत म्हणालो,

“तुम्ही एकटे नाही.”

दुसऱ्या दिवशी पहाटे ३:१७ वाजता त्यांचं निधन झालं. मी त्यांचा हात धरून तिथेच बसलो होतो.

त्यांचे शेवटचे शब्द होते—

“सगळ्यांना सांग… अपरिचित लोकांकडे लक्ष दे. आपण सगळे कुठेतरी निघालो आहोत. काहीजण जलद, काहीजण हळूहळू. पण वाटेत माणुसकी दाखवत जा. तू तसं केलंस… आणि माझे शेवटचे दिवस सुंदर केलेस.”

मॉनिटरचा आवाज थांबला… आणि सरळ रेषा दिसू लागली.

त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त सहा लोक होते—

मी, तीन परिचारिका, एक वकील आणि त्यांचा एक जुना विद्यार्थी.

४३ वर्षांचे अध्यापन.

५२ वर्षांचा संसार.

८१ वर्षांचे आयुष्य… आणि शेवटी फक्त सहा माणसं.

त्या दिवशी मला एक मोठा धडा मिळाला—

प्रत्येक अपरिचित माणूस कोणाच्या तरी आयुष्याचं संपूर्ण जग असतो.

प्रत्येक प्रवाशामागे एक कथा असते.

प्रत्येक माणूस जगत असतो… आणि कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, इतकीच त्याची अपेक्षा असते.

आजही ते ५००० रुपये मी खर्च केलेले नाहीत. ते माझ्या टॅक्सीतच ठेवले आहेत. कारण प्रत्येक प्रवासी कदाचित आपल्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासावर असू शकतो.

त्या एका शिक्षकाने मला शिकवले—

माणुसकी ही काही अतिरिक्त गोष्ट नाही; तीच खरं आयुष्य आहे.

चला… आपणही असा प्रयत्न करूया.

कदाचित आपल्याला  भेटणारा एखादा अपरिचित माणूस त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात असेल.

आपण त्याच्या आयुष्यात थोडासा का होईना, प्रकाश आणि माणुसकी देऊया.

माणूस म्हणून जन्माला आलो, तर माणुसकी विसरून कसं चालेल?

अनुवादक : डॉ. सुभाष भोसले

(हा एखाद्या टॅक्सी चालकाचा खरा अनुभव आहे की एखाद्या लेखकाची कल्पित कथा आहे, हे मला माहीत नाही. कोणीतरी हे इंग्रजीतून कन्नडमध्ये भाषांतर केले होते. मी ते कन्नडमधून मराठीत अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचलेल्या मजकुरात थोडेफार बदल करून, चांगला संदेश देण्याच्या सद्भावनेने येथे शेअर करत आहे). 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणुसकी… लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ माणुसकी… लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

दरवाजा अर्धवट उघडाच होता. आत ऑफिसमध्ये प्रचंड शांतता होती… फक्त एका जुन्या छडीचा जमिनीवर टेकतांना टक-टक आवाज येत होता. रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने वर मान करून पाहिलं, दारात एक कृश, वृद्ध माणूस उभा होता. पांढरे केस, जुना फाटलेला सदरा, आणि हातात निळे प्लास्टिक फोल्डर… कदाचित बायोडाटा. तो हळूहळू आत आला… जणू प्रत्येक पाऊल उचलताना त्याला वेदना होत होत्या.

रिसेप्शनिस्ट मुलीने विचारलं.. “आपण? ”

तो वृद्ध म्हणाला, “नोकरीसाठी… अर्ज द्यायचा होता. ”

त्या एका वाक्याने संपूर्ण ऑफिस अवाक् झालं. HR मॅनेजर अभिषेक त्याच्याकडे पाहून थक्क झाला. ६८–७० वर्षांचा माणूस, काठी टेकत चालत… नोकरी मागण्यासाठी आला होता. अभिषेकने अचंबित होऊन विचारलं,

“आजोबा, नोकरी? कोणती नोकरी हवी तुम्हाला? ”

वृद्धाने फोल्डर पुढे केला. त्यांचे हात थरथरत होते. “काहीही काम चालेल बेटा. मी शिकून घेईन.” त्याच्या आवाजात अशी वेदना जाणवत होती की, जणू आयुष्याने त्यांचं सगळं काही हिरावून घेतलं होतं.

अभिषेकने त्यांचा बायोडाटा उघडला आणि वाचताच त्याचे डोळे पाणावले.

बायोडाटा:

नाव: सुरेश पाटील

वय: ६९ वर्षे

शिक्षण: बारावी पास

अनुभव: ३२ वर्षं सरकारी शाळेत शिपाई. शाळा उघडणे, साफ- सफाई, मुलांना मदत, चहा-पाणी.

निवृत्ती: ९ वर्षांपूर्वी

पण शेवटची ओळ वाचून अभिषेक थबकला –

“पेन्शनचे पैसे फसवणुकीने गेले, घरात कोणी कमावणारा नाही,

दोन नातवंडे शाळेत जातात, सुनेची तब्येत बरी नसते. नोकरी नाही मिळाली तर घर चालवणं अवघड होईल. ” 

अभिषेकने त्याच्याकडे पाहिलं.

त्या डोळ्यांत फक्त नव्हती तर विवंचना होती.

ऑफिसमध्ये कुजबुज सुरू झाली..

“या वयात नोकरी?”,

“आता या वयात काय काम करणार?”

“चॅरिटी थोडी चाललीये इथे?”

पण अभिषेकच्या डोळ्यांसमोर त्याच्या वडिलांचा चेहरा आला. ‘जर माझ्या बाबांवर कधी अशी वेळ आली तर? ’ त्याचं मन ढवळून निघालं. तो म्हणाला, “आजोबा, बसा ना. छोटासा इंटरव्ह्यू घेऊया.”

वृद्ध थोडा गोंधळला… “बेटा, इंटरव्ह्यू नको… फक्त काम दे. मी सगळ्यात आधी येईन, मेहनत करीन.”

अभिषेक हसला. “ठीक आहे, पण सांगा ना… नोकरी का हवी आहे?”

ते ऐकून वृद्धाचा गळा भरून आला. “बायको गेली तीन वर्षांपूर्वी…

मोठा मुलगा ट्रक अपघातात गेला. सून एकटी आहे, दोन नातवंडं शाळेत शिकत आहेत. लहान भावाने फसवून पेन्शन घेतली… केस चालू आहे पण न्याय कुठे इतक्या लवकर मिळतो?” त्याने हलकेच हसत म्हटलं.. “सून आजारी आहे, मुलं शिकत आहेत… शाळेची फी भरू शकत नाही, म्हणून झोप येत नाही… घरात धान्यही नाही राहिलं. शेजाऱ्यांकडून उधार मागितले तेव्हा तर खूप अपमानित वाटलं होतं, ” त्याचे डोळे पाणावले. म्हणूनच बेटा, नोकरी हवी आहे… कोणतीही.”

अभिषेक गप्प झाला… मग तो थेट मालकीण मीरा किल्लेदार यांच्याकडे गेला.

सगळं ऐकल्यावर मीरा म्हणाल्या, “अशा लोकांना आपण टाळतो अभिषेक… काहीतरी करायला हवं.”

अभिषेक म्हटला, “मॅडम, त्यांना दया नको… सन्मान हवा आहे.

मीरा म्हणाल्या, “ठीक आहे. त्यांना ऑफिस असिस्टंटची नोकरी द्या. हलके फुलके काम द्या.. आणि प्रत्येक महिन्याला थोडं जास्त पेमेंट देऊया, पण त्यांना असं वाटलं पाहिजे की हा त्यांचा कष्टाचा पैसा आहे, मदत नाही.”

जेव्हा दोघे बाहेर आले, ते वृद्ध आजोबा हातात फोल्डर घट्ट पकडून उभे होते… कदाचित आता नकार मिळेल… असा भाव त्यांच्या डोळ्यांत होता.

मीरा हसून म्हणाल्या, “श्री सुरेश पाटील?”

वृद्ध दचकून उभा राहिला.

“तुमची नियुक्ती झाली आहे.”

क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही. “ख…खरच?” त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

“हो आजोबा, उद्यापासून काम सुरू.”

तो फोल्डर छातीशी घट्ट धरून रडू लागला… “बेटा, आज तुम्ही माझं अंधारं घर उजळून टाकलं.”

अभिषेक म्हणाला, “आता तुम्ही आमच्या ऑफिसचे आजोबा आहात.”

दुसऱ्या दिवशी तो वृद्ध व्यक्ती स्वच्छ कुर्ता घालून आला, दाढीही थोडी ट्रिम केली होती. पाणी ठेवणे, फाइल्स नेणे, झाडांना पाणी देणे..

सगळी कामं प्रेमाने करत होता. एका महिन्यानंतर त्याला पगार मिळाला ८, ००० रुपये + ३, ००० बोनस.

आजोबा सदगदित होऊन म्हणाले… “इतके पैसे मी कधीच पाहिले नाहीत बेटा…” त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

अभिषेक म्हणाला.. “हे पैसे तुम्ही कमावले आहेत आजोबा…

ही तुमची स्वाभिमानाची कमाई आहे. “

पण दोन महिने झाल्यावर एका सकाळी तो कामावर आला नाही. फोन करून तपास केला तर सून म्हणाली – “दादा, बाबा आजारी आहेत… आम्ही रुग्णालयात आहोत…”

अभिषेक आणि मीरा धावत दवाखान्यात गेले. बेडवर आजोबांना ऑक्सिजन लावलेला होता. अभिषेकला पाहताच आजोबा हसले. म्हणाले, “बेटा… कामावर येऊ शकलो नाही… सॉरी…”

अभिषेकचे डोळे भरून आले.

आजोबा म्हणाले, “आज नातवाची फी भरायची होती… तेवढी तू भरशील ना बेटा?”

अभिषेक म्हणाला, “आजोबा, ती मी आधीच भरली आहे.. तुमच्या नावाने.” 

आजोबांच्या डोळ्यांत पाणी आलं. “देव तुझं भलं करो बेटा…

तू मला पुन्हा माणूस असल्याची जाणीव दिलीस…” आणि पुढच्याच क्षणी त्यांचा हात सैल झाला… आजोबा गेले…

त्या दिवशी ऑफिसमध्ये कुणाचंही कामात मन लागलं नाही…

सगळ्यांनी दोन मिनिटे शांत राहून मौन पाळलं.

मीरा म्हणाल्या, “श्री सुरेश पाटील आमचे कर्मचारी नव्हते, ते आमच्या कुटुंबाचा भाग होते. त्यांच्या नातवंडांच्या शिक्षणाचा खर्च कंपनी उचलेल.”

अभिषेकने त्यांचा फोल्डर उघडला, त्यात एक चिठ्ठी होती. “जर मला नोकरी मिळाली, तर माझा नातू शिकेल. नाही मिळाली, तर तो शाळा सोडेल… माझी एकच इच्छा.. तो माझ्यापेक्षा चांगला माणूस बनो.”

अभिषेकच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, “आजोबा, तुमचा नातू नक्की काहीतरी मोठं काम करेल.”

कंपनीने आजोबांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू केली.. ‘सुरेश पाटील स्मृती शिष्यवृत्ती’. अनेक गरीब मुलांची फी त्या निधीतून भरली जाऊ लागली.

काही लोक बायोडाटामध्ये कौशल्य लिहितात, पण त्या आजोबांनी माणुसकी लिहिली होती. कारण कधी कधी नोकरी म्हणजे फक्त पोट भरणं नसतं, ती एखाद्या घराची आशा, एखाद्या नातवाचं भविष्य, आणि एका वृद्ध बापाची इज्जत असते.

‘आणि सुरेश आजोबा शेवटपर्यंत इज्जतीने जगले…’

तुम्हीही कुणाच्या आयुष्यात ‘अभिषेक’ आणि ‘मीरा’ होऊ शकता का?

**

लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्र जिवांचे… – भाग – २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ मैत्र जिवांचे… – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(दहावीचा रिझल्ट लागण्यापूर्वीच सुरेखा विवाह बंधनात अडकली. तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आपण काही मदत करू शकलो नाही याचं दुःख त्यावेळी आपल्या डोळ्यातून वाहत होतं.)

इथून पुढे – – 

बारावीच्या परीक्षेनंतर आपण ब्युटी पार्लरच्या कोर्स करीत होता तेव्हा सुरेखाच्या सासरी जाऊन तिची मॉ॑ तिला घेऊन आली. सुरेखाचा रसरशीत आनंदी चेहरा हरवून गेला होता. डोळ्यात कसलीही ओळख नव्हती. मागच्या दोन वर्षात तिची दोन ऍबॉर्शन्स झाली (की केली) होती. आता तिला तिसऱ्यांदा दिवस गेले होते. लाडक्या लेकीची अशी अवस्था पाहून खंतावून वडील देवाघरी गेले. सुरेखाची मॉ॑ मात्र मोठ्या धीराची. अनेक औषधोपचार करून तिने सुरेखाला सावरलं. जीवाचं बरं वाईट करायला निघाली सुरेखा हळूहळू लहानग्या सुरजमध्ये रमायला लागली. मुंबईत कामासाठी आलेला सुरेखा चा नवरा गावी गेला तो परत आलाच नाही. आता सुरेखा एका नर्सिंग ब्युरोतर्फे वृद्ध आजारी स्त्रियांची सेवा करण्याचं काम करते. लग्न होऊनसुद्धा सुख मिळेलच असं नाही. काय लिहिलं असेल आपल्या नशिबात? या विचाराने सोनल जागीच होती.

नाक्यावर चकाट्या पिटून, सिगारेटी फुंकून उशिराने घरात आलेला सुनील पाणी पिऊन झोपायला गेला तरी सोनल जागीच होती.

सुरेखाची नाईट ड्युटी होती म्हणून एक दिवस त्यांचं टिटवाळ्याला जायचं ठरवलं. गाडीच्या वेगाबरोबर त्यांच्या गप्पांचा वेगही वाढला. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यावर मी टिटवाळ्यायला एक छोटी जागा बुक केलीये त्या बिल्डिंगचं काम कुठपर्यंत आलाय ते बघून येऊया. तुला माहितीये माझी मॉ॑ मोठ्या जिद्दीची आहे. तिने आम्हाला कष्ट करायला शिकवले. मॉ॑चा आधार आहे म्हणून जमतय सारं. पण स्वतःच्या आणि सुरजच्या भविष्याचा विचार करायलाच पाहिजे…

गणपतीचे दर्शन घेऊन दोघी साईटच्या ठिकाणी गेल्या.

टिटवाळ्याच्या बिल्डरचा मॅनेजर मॉ॑चा गाववाला आहे. त्यांच्यामुळे थोडं लोन मिळालं. थोडे पैसे मॉ॑ने लोन म्हणून दिलेत. लोनचे हप्ते भरताना दमछाक होते. पण स्वतःसाठी, सुरजसाठी सारं सोसलंच पाहिजे.

किती लांब जागा आहे ग. इथून कशी तू तुझी ड्युटी करणार. ?॔

॓आपल्या बजेटमध्ये बसणारी जागा लांबच असणार.

॓ माझ्या व्यवसायाला आता वाढती मागणी आहे. तूसुद्धा लोन काढून इथे जागा घेतेस का? आपण दोघी मिळून इथे ब्युटी पार्लर आणि नर्सिंग ब्युरो काढू.॔

सोनलच्या मनात विचार गरगरू लागले. खरंच काय हरकत आहे जागेसाठी प्रयत्न करायला!

चाळीच्या दाराशी सुरज आईची वाट पाहत उभाच होता. त्याला प्रेमाने जवळ घेऊन सुरेखाने सोनलला अच्छा केलं.

विचारांच्या भोवऱ्यात गरगरताना आपण देखील जागा घेऊ शकतो का? प्रयत्न करायला काय हरकत आहे?

जिना चढून सोनल खोलीत शिरली. घरात काय झालंय हे कळल्यावर सोनलच्या पायाखालची जमीनच सरकली. आई ज्यांच्याकडे अनेक वर्ष काम करत होती त्याच घरात चोरी करण्याचा तिने प्रयत्न केला ते देखील बाबांच्या हट्टाला धमकावणीला बळी पडून. गदगदून रडणाऱ्याआईकडून ही हकीगत तुटक- तुटक ऐकताना त्यादिवशी आपण सुरेखाला भेटून घरी आलो होतो त्यावेळच्या आई पप्पांच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला. उमाताईंच्या घरी प्रामाणिकपणे आई अनेक वर्षे काम करते. उमाताई त्यांच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. त्यांच्या फ्लॅटची किल्ली साने वाहिनींकडे असायची. त्या आईला चांगल्या ओळखत असल्यामुळे शिवाय आई विश्वासू असल्यामुळे, त्यांनी आईला पुन्हा उमाताईंच्या फ्लॅटची चावी दिली. डुप्लिकेट किल्लीचा वापर करून आई त्यांच्या घरात शिरली. पण बाहेर गेलेल्या उमाताई बँकेची कागदपत्र विसरल्या म्हणून स्वतःजवळच्या किल्लीने दार उघडून अचानक आत आल्या आणि हा सगळा प्रकार उघडकीला आला. आई सर्वांच्या हाता पाया पडू लागली. नवऱ्याच्या दमदाटीमुळे मी हे केलं माझी चूक मला कबूल आहे. तुमच्या कशालाही हात लावायचा धीर मला झाला नाहीये. मला माफ करा. कामावरून काढा पण पोलिसात जाऊ नका. अशा गयावया केल्या. पण उमाताईंचा मुलगा आणि मुलगी पोलीस कम्प्लेंट करण्याच्या निर्णयावर ठाम होती.

॓फसले ग तुझ्या पप्पांच्या नादाने. मलाही मोह आवरता आला नाही. इतकी वर्ष कष्ट करून अब्रूने राहिले साऱ्याची माती झाली.॔ स्वतःच्या थोबाडीत मारून घेत वत्सलाबाई असहायपणे रडत बडबडत होत्या. सोनलचं काळीज गोठून गेलं होतं. उद्या सकाळी पोलीस दारात येणार या कल्पनेने घाबरून पप्पांनी दारूचा आधार घेतला व उशिरा घरी परतले. पण आता सुटका नाही या भावनेने सोनलला रडूसुद्धा फुटत नव्हतं. सकाळी कसंबसं आवरून खाल मानेने सोनल बाहेर पडली पण झालेला सगळा प्रकार डोळ्यापुढे नाचत होता. विचाराच्या तंद्रीत व लोकांच्या अविश्वासाच्या नजरांना सामोरे जात सोनल जिना उतरून रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली. पण तितक्यात मागून आलेल्या सुरेखाने तिला घट्ट पकडून तिथल्या एका बाकावर बसवलं. तिला शांत करीत सुरेखा म्हणाली ॓आई वडिलांच्या चुकीचं फळ आपण कशाला भोगायचं? आपण आपली लढाई लढायची. एकदाच मिळणाऱ्या या आयुष्याला पाठ दाखवायची नाही.

सोनल तुला आत्तापर्यंत न सांगितलेली एक गोष्ट सांगते. माझ्या नवऱ्याने त्याच्या गावी एका मुलीशी केंव्हाच दुसरी शादी केली. त्यांना दोन मुलेही आहेत हे समजल्यावर देखील मी हिम्मत सोडली नाही. भाईच्या मदतीने मी इथे स्वतंत्र जागा घेतली. आशेचे धागे तुटून गेले असले तरी मी हिम्मत सोडली नाही. माझं आयुष्य मी सन्मानाने जगणार आहे. तुलाही तुझं आयुष्य संपविण्याचा अधिकार नाही. तू माझ्याबरोबर तिथे राहायला ये. आपण तिथे पार्लर आणि नर्सिंग ब्युरो चालू करू. माझी टिटवाळ्याची जागा सहा महिन्यात पूर्ण होईल. आता थोडी कळ काढ. चल्, आपण स्नेहा मॅडमकडे जाऊ. त्या नक्की तुझी बाजू समजून घेतील याची मला खात्री आहे.

नशिबावर मात करायला निघालेली त्या दोघींची पावलं एकमेकींच्या साथीने निश्चयाने पुढे पडत होती.

– समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares