मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळीचा फराळ करू नका, पण… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ दिवाळीचा फराळ करू नका, पण लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

दिवाळीचा फराळ करू नका, पण त्याची टिंगलही करू नका!

अभ्यंग स्नानानंतर सर्व कुटुंबियांनी एकत्र बसून दीपावलीच्या सणानिमित्त आणि आनंदाप्रीत्यर्थ फराळ करणे ही आपली पिढ्यापिढ्यांची परंपरा आहे. नंतरही दिवाळीच्या सर्व दिवशी हा प्रघात सुरूच राहतो. करंजी, लाडू, अनरसा, चिरोटे, शंकरपाळे, चकली, शेव, कडबोळी, चिवडा अशा अनेक पारंपरिक पदार्थांची मांदियाळी समोर येते. या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर दही पोहे खाऊन या फराळ कार्यक्रमाची सांगता होत असे.

या कार्यक्रमानिमित्त घरातील सगळ्या नातेवाईकांनी एकत्रित बसून हास्यविनोद करणे, अनेक घरात या निमित्त आलेला एखादा पाहुणा, आधीच्या फराळाच्या आठवणी असा एक गोफ विणला जात असे. घरात फराळ करण्याआधी देवळामध्ये जाऊन देवाला फराळाचे पदार्थ, नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. एखाद्या नातेवाईकाचे, मित्राचे कुणी मागच्या वर्षात निधन पावले असेल तर त्याच्या घरी सर्वात आधी फराळाचे पदार्थ पाठवण्याची पद्धत आजही पाळली जाते. समाजातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम, इस्पितळे, सीमेवर लढणारे सैनिक यांना अत्यंत आठवणीने फराळाचे पदार्थ पाठवण्याची प्रथा लाखो लोकं पाळतात. भारतातून दरवर्षी विदेशामध्ये टनावारी फराळाचे पदार्थ पाठवले जातात.

फक्त दिवाळीलाच केले जाणारे हे सर्व पदार्थ, हळूहळू बदलणाऱ्या काळानुसार वर्षभर, मुबलक आणि अनेक प्रकारांमध्ये सहज मिळू लागले. खास दिवाळीचे पदार्थ ही त्याची ओळख आणि प्रसिद्धी पुसट होत गेली.

पण त्याचा दुष्परिणामही असा झाला की दिवाळीला हे पदार्थ खाणे म्हणजे जुनाट बुरसटलेली कल्पना आहे, असेच हळूहळू वाटू लागले. या पदार्थांचा तिरस्कार करणे, ते खाणाऱ्यांना कमी लेखणे, त्यांची थट्टा करणे अशा गोष्टी सुरू झाल्या.

चारचौघं भेटले की जाहीरपणे आम्ही हल्ली फराळाचं काही करीतच नाही, हे अगदी घोटवून, रंगवून सांगितले जाते. ” त्या चकल्या, करंज्या खाण्याऐवजी आम्ही चक्क पावभाजी करतो, पाणीपुरी करतो; गोड गोड अगदी नको वाटते ” अशा गोष्टी रंगवल्या जातात. गोडाला आपण अति नाके मुरडल्यामुळे, अनेकांना मधुमेहामुळे, खरंच गोड खाणे अशक्य झाले आहे. पण त्याच वेळी अनेक मोठमोठ्या नटांनी केलेल्या जाहिरातीतील ” कुछ मिठा हो जाये ” ही चॉकलेट्स आपल्याला चालतात हे आश्चर्यच म्हणायचे!

किती वर्षे तेच तेच लाडू, चकल्या, करंज्या खायचे, अशी आपल्या फराळ संस्कृतीची सातत्याने टिंगल करणारी माणसे मात्र आपला मुस्लिम शेजारी शीरखुर्मा किती छान बनवतो आणि आपल्याला आणून देतो याचे कौतुक करतात. एखादा ख्रिश्चन मित्र ख्रिसमसला किती छान केक पाठवतो, याचेही वर्णन ऐकायला मिळते. त्यांना केक किंवा शीरखुर्मा ऐवजी चॉकलेट खा असे सांगण्याचे कुणाच्यातही धैर्य नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुणीही ख्रिश्चन माणूस “किती वर्षे तोच तोच केक खायचा? ” असे म्हणत नाही. कुणीही मुस्लिम माणूस किती वर्षे “तोच तोच शीरखुर्मा खाणार? “, असे म्हणत नाही. किंवा त्याऐवजी शेजारीपाजारी पावभाजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस नेऊन देत नाही. ते त्यांचीच संस्कृती पाळतात आणि आपण त्याबद्दल त्यांचे कौतुकही करतो. मग आपण आपल्या इतक्या पिढ्यांच्या परंपरेची टिंगल टवाळी का करतो?

जशा चकल्या, करंज्या, चिवडा, लाडू या गोष्टी वर्षभर उपलब्ध असतात, तशाच पावभाजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस वर्षभर उपलब्ध असतेच ना!

एकत्रित फराळ करणे ही आपली कित्येक पिढ्यांची परंपरा आहे. यात आपल्या धर्माच्या, संस्कृतीच्या, सामाजिक संबंधांच्या अनेक छटा दडलेल्या आहेत. अनेक गरीब महिला आणि संस्था यांना प्रचंड रोजगार उत्पन्न होतो. माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला खरोखरच कंटाळा आला असेल तर फराळाचे पदार्थ बनवू नका, विकत आणू नका, खाऊ नका. पण त्याची जाहीर कुचेष्टा करणे, टर उडवणे या गोष्टी अवश्य टाळा.

लेखक : श्री मकरंद करंदीकर

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दिवाळी म्हणजे…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दिवाळी म्हणजे…☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

बापरे…   ऑक्टोबर महिना संपला?

ऑक्टोबर आला कधी आणि गेला कधी कळलंच नाही…!

विजयादशमीने या महिन्याची सुरुवात झाली….  

हा दिवस विजयाचा….!

जिंकणं हे मोरपिसासारखं असतं…..   ते हळूच गालावरून फिरतं आणि गुदगुल्या होतात….   त्याला काहीही वजन नसतं….   जिंकणं झेलायला ताकद लागत नाही…  

…. पण हरणं म्हणजे मणामणाच्या बेड्या, अत्यंत जड…   लोकांचे टोमणे, आणि बरंच काही….   खरी ताकद हे हरणं झेलायला लागते…  

…. जो हरूनही, हरण्याचं ओझं उचलून पुढे पुढे चालत राहिला आहे…   तो तिथेच निम्मा जिंकलेला असतो…. आणि हरणंही तितकं वाईट नसतं….   हरणं मिठासारखं खारट असेलही, पण आयुष्याला चव त्यामुळेच येते…!

जिंकलेल्या माणसांच्या कथा वाचल्याने फक्त चांगला संदेश मिळतो….  

पण हरलेल्या माणसांच्या कथा वाचल्याने, ते का हरले? हे आपल्याला “रेडीमेड” समजतं, जे आपण पुढे टाळू शकतो….  

…. जोरात उडी मारायला, दहा पावलं मागे यावं लागतं हे अंतिम सत्य आहे….   ती दहा पावलं मागे येणं म्हणजे हार नव्हे….   मोठी बिल्डिंग बांधायला आधी जमिनीत 100 फूट खोल खाली जावं लागतं, तेव्हाच आपण उंची गाठू शकतो….   आकाशात झेप घ्यायची असेल तर जमिनीच्या मुळाशी जावंच लागतं….  

“अपयश” नावाचा रोग झाला तर, परिश्रम आणि सातत्य हे त्यावरचं रामबाण आणि जालीम औषध आहे….! जो जिंकतो त्यांना “मेडल” मिळत असेलही, पण जे वारंवार हरून सुद्धा परिश्रम आणि सातत्याने यश मिळवतात त्यांच्या गळ्यात “हार” घातला जातो….!

आणि या “हाराची” किंमत त्या “मेडल” पेक्षा जास्त असते माऊली…!!! जिंकलो की स्वतःला आवरणं आणि हरलो की स्वतःला सावरणं म्हणजे आयुष्य….!

असो, तर या महिन्यात दिवाळी आली….  

दिव्यांची ओळ / मालिका म्हणजे दिवाळी…!

अंधाराला दूर सारून प्रकाश निर्माण करणे म्हणजे दिवाळी….  

घराघरात दिवे लावणं म्हणजे दिवाळी….  

फराळ तयार करणे (हल्ली विकत आणणे) आणि तो खाणे म्हणजे दिवाळी….  

डोळे चोळत पहाटे एखाद्या सांगितीक कार्यक्रमाला जाऊन हजेरी लावणे म्हणजे दिवाळी…  

फटाके उडवून नवीन कपडे घालणे म्हणजे दिवाळी….  

…..   हे सर्वांनाच माहित आहे….  

खरं तर ….

..  एखाद्याची “वेदना” समजून घेऊन “वैद्य” होणं म्हणजे दिवाळी…  

..  गुण माहित असताना एखाद्याला “साथ” देणं हा स्वार्थ, पण दोष माहित असताना एखाद्याला “हात”देणं म्हणजे दिवाळी…!

..  स्फोट घडवण्यासाठी वातीला आग लावणं नव्हे…   स्फोट घडण्याआधी ती वात विझवणे म्हणजे दिवाळी…!

..  स्वतःच्या अंगणात रांगोळीआणि दाराबाहेर दोन दिवे लावणे म्हणजे दिवाळी नव्हे… ज्यांना अंगणच नाही, अशांच्या दारात जाऊन फराळ देऊन, त्यांच्या चेहऱ्यावरच्या ओबडधोबड परंतु आनंदी रेषा, आपल्या मनात सन्मानाने रांगोळी म्हणून जपणे म्हणजे दिवाळी…!

..  ज्यांना डोळेच नाहीत, अशा विझलेल्या दोन दिव्यांमध्ये तेज निर्माण करणे म्हणजे दिवाळी….  

..  अंधारात अडखळणाऱ्या वाटसरूला वाट दाखवण्यासाठी “कंदील” आणि “पणती” घेऊन पुढे जाणे…   त्याला वाट दाखवणे…   म्हणजे दिवाळी….!

आपला कंदील कदाचित छोटा असेलही…   पण जेव्हा तो आपण दुसऱ्याला दाखवतो, तेव्हा तो कंदील भव्य “आकाश कंदील” होऊन जातो…..   दुसऱ्याला वाट दाखवण्यासाठी वापरलेला, आपला छोटा दिवा / पणती सुद्धा मग खऱ्या अर्थाने “दिव्य” होऊन जाते…  

…. मुळात आपल्याला “आकाश कंदील” व्हायचंच नाही, आपल्याला व्हायचं आहे “आभाळ कंदील”..!

आदरणीय कवयित्री शांताबाई शेळके यांनी “आभाळ” आणि “आकाश” मधला फरक सांगितला आहे….  

“आभाळ” भरलेलं असतं पाण्याने….  

“आकाश” रिक्त / रिकामं / कोरडं असतं….!

जे भरलंय ते “आभाळ”…..  

जे रिकामं आहे ते “आकाश”….!!!

आपण माणसं आहोत, आपण रिक्त / रिकामे आणि कोरडे असूच शकत नाही….   आपण प्रेम, दया, माया, सहानुभूती या सर्वांनी भरलेले आहोत….  

मग आपण कोरडे कसे…????

..  आपण “आभाळ”आहोत आपण “आकाश” नाही…!!!

..  आपल्याला “आकाश” व्हायचंच नाही….  

..  आपल्याला व्हायचं आहे “आभाळ”…..!

या दिवाळीत आपण “आकाश कंदील” नाही….  

“आभाळ कंदील” लावूया का….?

…..   आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही हेच करण्याचा प्रयत्न केला….   केलेत आपणच आम्ही फक्त माध्यम झालो…!

– यावर्षी दिवाळीत आपण सर्वांनी मिळून रस्त्याकडेला राहणाऱ्या जवळपास पंधराशे लोकांना संपूर्ण फराळ दिला आहे. त्यांचीही दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.

– दुसऱ्या पुढे हात पसरून जगणाऱ्या तीन व्यक्तींना स्वतंत्र काम करण्यासाठी मदत केली आहे. ज्या हातांनी ते भीक मागायचे तेच हात आता काम करू लागले आहेत.

– जवळपास 500 लोकांना रस्त्यावरच वैद्यकीय ट्रीटमेंट दिली आहे.

– ज्यांची दृष्टी अधू झाली आहे अशा सर्वांची डोळे तपासणी करून, गरजूंचे ऑपरेशन करून चष्मे दिले आहेत. आता ते पुन्हा नव्याने जग बघू लागतील. काम करण्यातील मुख्य अडथळा आता दूर झाला आहे. यांना आपण कामाची संधी देणार आहोत.

– लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अत्यंत गरीब आणि 400 गरजू महिलांना आपण सर्वांनी मिळून नवीन साड्या दिल्या आहेत.

– जे लोक आता काम करू लागले आहेत परंतु रस्त्याकडेला भिजत झोपतात, अशांसाठी त्यांच्या निवासाची व्यवस्था आपण केली आहे.

– पूर्वी याचना करणाऱ्या लोकांकडून स्वच्छतेचे काम करून घेऊन सर्वांना महिनाभर पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.

– रस्त्यावर उपाशी पडून असणाऱ्या लोकांना जेवणाचे डबे दिले आहेत.

– हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत परंतु जेवण आणून देणारं जवळचं मात्र कुणी नाही, अशांना हॉस्पिटलमध्ये जाऊन जेवणाचे डबे दिले आहेत.

…   या सर्व गोष्टींना “अन्नदान” म्हणणे मला योग्य वाटत नाही, दान करणारे आपण कोण? देणारा आणखी कोणीतरी वेगळा आहे….   आपण यांची फक्त भूक भागवण्यासाठी माध्यम म्हणून काम केले…   “क्षुधाशांती” हा शब्द मला जास्त योग्य वाटतो…!

आपण सर्वांनी शारीरिक, आर्थिक आणि मानसिक मदत भरभरून केली आहे, आणि म्हणून या महिन्याचा लेखा योगा आपल्या पायाशी सविनय सादर…!

आपण आपल्या हातांनी दिले…   म्हणून आम्ही ते पोहोचवू शकलो…  

..  हो…   आम्ही फक्त पोहोचवणारे, बाकी यात माझा आणि मनीषाचा काहीही रोल नाही…!

..  आपण दुसऱ्याला आनंद वाटणारं झाड आहात, आम्हाला त्याची फांदी व्हायला आवडेल….  

..  दोन्ही हातांनी आपण तळागाळातल्या लोकांना सेवा देत आहात, या हाताचं एखादं बोट व्हायला आम्हाला आवडेल…  

आपणास कृतज्ञतापूर्वक नमस्कार करत आहोत, कृपया स्वीकार करावा हि प्रार्थना 

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पंढरपूर कानपूर नागपूर” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “पंढरपूर कानपूर नागपूर” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

… लेखाचं शीर्षक वाचलत ना? हा एक खेळ आहे असं तुम्हाला सांगितलं तर….   अहो खरंच हा खेळच आहे. सांगते कसा ते.

राष्ट्रसेविका समितीच्या शाखेमध्ये त्या दिवशी ताई म्हणाल्या,

” आज आपण पंढरपूर कानपूर नागपूर हा वेगळा खेळ खेळु “

‘हे काय बरं? ’ आम्हाला काही कळेच ना…   आम्ही प्रथमच अशा खेळाचे नाव ऐकत होतो. असा खेळ असतो? ताईंनी खुलासा केला. म्हणाल्या,

“आहे ना हा खेळ. सांगते कसा खेळायचा ते. पंढरपूर म्हटलं की कमरेवर हात ठेवायचे, कानपूर म्हटलं की कानावर हात आणि नागपूर म्हटलं की हात नाकावर ठेवायचा. मी भराभर म्हणत जाईन त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची. “

आम्ही म्हटलं,

“त्यात काय..  किती सोपा खेळ..  चला सुरू करू”

ताई म्हणाल्या,

“थांबा…   पण एक करायचं..  मी समोर उभी राहणार. तुम्ही माझ्याकडे बघून कृती करायची.”

..  आम्हाला कळेना इतकी सोप्पी कृती ताईंनी कशाला दाखवायला हवी? साधे हात तर हलवायचे आहेत…  

आम्ही खेळायला उभ्या राहिलो.

ताईंनी शांत सुरात अजून एक खुलासा केला. म्हणाल्या,

“नीट ऐका…   मी पंढरपूर म्हटलं की तुम्ही हात कमरेवर ठेवायचे, मी कानावर हात ठेवीन, नागपूर म्हटलं की मी कमरेवर हात ठेवीन…..   म्हणजे मी काहीही चुकीचं करेन. तुम्ही मात्र योग्य तेच करायचं आहे.”

अरेच्या या खेळाची अशी मेख आहे का?

मग सुरू झाली गंमत….  

कानपूर म्हटलं की कानावर हात ठेवायला जावं तर समोर ताईंनी कमरेवर हात ठेवलेला…   पुढे पंढरपूर म्हटलं तर ताईंनी नाकावर ठेवलेला…   आम्हाला सगळं कळत होतं तरी पण आम्ही चुकत होतो…..   त्यात आसपास बघितलं तर प्रत्येकीची कृती वेगळीच होत होती. सगळा सावळा गोंधळ सुरू झाला.

प्रथम आम्हाला हसू आलं…. पण थोडा खेळ झाल्यावर…  

‘ही साधी गोष्ट…   आपल्या स्वतःच्या बावळटपणामुळे चुकीची करत आहोत ‘…   या विचाराने स्वतःचाच राग आला. इतकं कसं आपल्याला कळत नाही….  

…. काही वेळानंतर लक्षात आलं की हा ब्रेन गेम आहे. शरीर, मन आणि मेंदू यांचा समन्वय हवा आहे. मेंदूला कानपूर ऐकलं की कानावर हात ठेवायचे हे कळत होतं…  

पण डोळे….   समोर ताईंनी नाकावर हात ठेवलेला बघत होते. त्यामुळे कृती करताना शरीर व मन गोंधळात पडत होतं.

त्यात ताईंनी भराभर करायला सांगितले होते. म्हणजे मेंदूला हेतूपूर्वक विचार करायला वेळच दिला जात नव्हता. त्यामुळे अजून चुकत होतो … खेळातून बऱ्याच जणी बाद होत गेल्या. साध्या खेळाचे रूपांतर विलक्षण वेगळ्याच अशा वळणावर गेलं…  

शांतपणे विचार केल्यावर त्यातला अजून अर्थ ध्यानात आला. हे समाजप्रबोधनाचे उत्तम उदाहरण होतं. तुमच्या मनात सत्य काय आहे हे माहीत असेल तर तीच कृती करायची. समोरचा काय सांगतो इकडे जरूर पाहायचं…   ऐकायचं…..   पण स्वतः कृती मात्र योग्य तीच करायची.

आपण एकटे कधी नसतोच..  समोर, आसपास कोणीतरी असतंच. ते जर चुकीचं करायला सांगत असतील तर ते करायचं नाही…. समोरचा बोलतो एक आणि कृती दुसरीच करतो हे लक्षात आलं की सावध व्हायचं. एखादे वेळी फसलो तर…   दुसऱ्या वेळी विचार करून वागायचं.

क्षणभराच्या चुकीने खेळातून बाद झालो. पण व्यवहारात असे वागलो तर फार मोठी किंमत द्यावी लागणार आहे…..   त्यामुळे कोणाचा आदर्श ठेवायचा… त्याबरोबरच कोणाचे अनुकरण करायचे नाही….   याचे भान ठेवायचे. चौकस राहायचे.

… तुम्ही विचार करा…   कदाचित तुम्हाला अजून नवीन अर्थ गवसेल.

ताईंनी गमती गमतीत एक नवा विचार आमच्या मनात रुजवला. तो धडा घेऊन घरी आलो.

आता वागताना ती शिकवण आठवणीत ठेवून वागायचा प्रयत्न करू. याचा उपयोग आपल्या कुटुंबाला होणार आहेच….   तसाच समाजाला पण होणार आहे.

– – चला तर..  नवं काही शिकूया….   शहाणे, सुज्ञ, नागरिक होऊ या. आजच्या स्थितीत त्याची फार गरज आहे.

…   सुजाण नागरिक ही राष्ट्राची मोठी संपत्ती असते. हे लक्षात ठेवू या…. मनाने कणखर बनू या…  

… यासाठी जिथे आपल्याला अशी शिकवण मिळत असेल तिथे जायला मात्र हवे आहे.

 आणि हो … संगत कोणाची आहे हे पण महत्त्वाचे असते.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वर्ल्ड कप” च्या निमित्ताने…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “वर्ल्ड कप” च्या निमित्ताने…” ☆ सुश्री शीला पतकी 

रात्रीचे बारा वाजलेले..  स्टेडियम खचाखच भरलेले..  शेवटचा कॅच तिने घेतला आणि मैदानात एकच जल्लोष…   फक्त विजय आणि विजय!! जगत जेता विजय!!! …   

झुंजार होऊन लढलेल्या त्या सगळ्या लढवय्या मुली रडतानाही खूप सुंदर दिसत होत्या. त्यांच्या वाहणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबात मला शंभर वर्षाच्या स्त्रिया दिसत होत्या… 

– – मी मनामध्येच राजा राममोहन राय, सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले, रमाबाई रानडे, धोंडो केशव कर्वे…   या सगळ्यांना मनापासून नमस्कार केला..  म्हणाले..  “पुरुषप्रधान संस्कृतीतल्या विकृत मनोवृत्तीमधून तुम्ही आम्हा स्त्रियांना बाहेर काढलं, शिक्षणाचे महत्त्व पटवलं, हळूहळू समाज मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत सतर्क होऊ लागला. आठ नऊ वर्षाची मुलगी झाली की तिचं लग्न 40 वर्षाच्या माणसाशी करणारी तत्कालीन समाजव्यवस्था..  नऊ दहा वर्षाच्या परकरी पोरीला नऊवार लुगड नेसून एका गुलामगिरीच्या जोखड्यात बांधून ठेवणारा समाज..  त्यांनी तिला कधी अंगणात खेळू दिले नाही..  मनमुराद नाचू दिलं नाही..  काही शिकू दिले नाही..  अक्षर वाचशील तर नवरा मरेल…   असले धाक घातले… नवरा म्हणजे काय हे माहीत नसणाऱ्या त्या मुलीला नाहक भीती घातली आणि तिचं बालपणच हिरावून घेतले. आठ नऊ वर्षाच्या पोरीला सातत्याने ‘आता मोठी झालीस उड्या मारणे बंद कर. नाचण बंद कर..  खेळणं बंद कर’…   त्या लेकराचे लहानपणच हिसकावून घेतलं..  30 30 वर्षाच अंतर असलेल्या पुरुषाशी विवाह लावून दिला..  तो मेला की तिचं केशवपन केलं…   तिला तिचं आयुष्य जगू दिलं नाही. खऱ्या अर्थानं जगातल्या अर्ध्या पुरुषी संख्येने अर्ध्या महिला संख्येचा छळवाद मांडला होता. ही पुरुषी मानसिकता आजही बदलली नाहीच आहे…   

…   पण म्हणून स्त्रियांना दाबून ठेवणं हे योग्य नव्हतं. शंभर दीडशे वर्षांपासून बाई शिक्षणासाठी धडपडली, चोरून शिकली…   तर समाजातून तिला बहिष्कृत करण्यात आलं…   शिकवणाऱ्या शिक्षकांना चिखल शेणाचा मारा सहन करावा लागला! तत्कालीन समाजासमोर एकच गोष्ट होती की…   स्त्री ही भोग्य वस्तू आहे. तिने घरात राबावं..  आम्हाला व्यवस्थित जेवायला घालावं..  प्रसंगी तिला दागिने घालून नटवलं जायचं…   पुढे पुढे देवी म्हणून तिचे गोडवे गायले जायला लागले …

…   पण या सगळ्यामागे एक कट होता..  तो म्हणजे स्त्रीला कुठल्यातरी एका चौकटीत दाबून ठेवायचं होतं. पण अनेक थोर समंजस समाजसेवकांनी या असल्या रुढीच्या चौकटीतून स्त्रियांना मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे स्त्री-जातीवर अनंत उपकार आहेत. स्त्रिया शिकल्या..  स्वतंत्र विचार करू लागल्या. युद्धही जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री त्यांच्यासाठी गुरु ठरल्या आणि महाराष्ट्र घडला.

…   शिवाजी महाराज म्हणजे धैर्य शौर्य आणि चातुर्य आणि व्यवस्थापन कौशल्य असलेला हिंदू धर्माचा रक्षण करणारा राजा..  हा असा राजा होता की ज्याने बलाढ्य मोगल सत्तेला जेरीस आणले. आज महाराष्ट्राचे नव्हे तर सगळ्या जगाचे ते दैवत आहे.

…   अशा अनेक थोर पुरुषांच्या मार्गदर्शिका या स्त्रिया होत्या. पुरुषांना हे ठाऊक होतं की स्त्रिया विलक्षण बुद्धिमान आहेत आणि म्हणूनच त्यांना पुढे येऊ दिलं गेलं नाही. अंगणात मनमोकळ खेळू दिले नाही…   आणि आज…   आज त्याच मुलीने जगज्जेतेपद मिळवलं. पण शिक्षणानं खऱ्या अर्थाने बाई घडली सगळी कवाडे तिला खुली झाली ती अभिनयात पुढे गेली स्वयंपाकात पुढे गेली. अन्नपूर्णा तर तिच्यात होतीच..  विमान चालवणे, वाहन चालवणे, अवकाशात संचार करणे, संशोधन, मेडिकल- – अर्थ – कोणतंही क्षेत्र तिला वर्ज्य नव्हतं..  हाती धुपाटणं घेऊन धुणं बडवत बसलेल्या असंख्य स्त्रियांचा सुद्धा आज विजय झाला..  त्याच धुपाटण्याची चेंडू फळी करून पोरीने जग जिंकलं त्यांच्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाबरोबर एक एक गोष्ट मला आठवत होती…   

…   खरंच पोरींनो तुम्ही खूप झुंजलात..  विजयी झालात आणि बाईसारख्या हळव्या होऊन रडलात सुद्धा…   रडतानाही तुम्ही फार सुंदर दिसत होता…   आज जगातल्या सगळ्यात देखण्या मुली तुम्ही होता..  तुमच्या मनगटात दम होता आणि तुमच्या अश्रूत ऋजुता होती. तिथेही बाईपण जपलंत. आज तुमचा आम्हाला अभिमान वाटला. स्त्री जगज्जेता झाली होतीच पण तिला ते सिद्ध करता आलं…!

…   अगदी रामायण काळापासून आपण पाहतोय, बाईला सगळं सिद्ध करावंच लागलं, पण त्यात ती कुठेही कमी पडली नाही. माझ्या भारतीय लेकीनो..  तुमचं मनापासून अभिनंदन!!! …   आणि आपल्या संस्कृती आणि संस्काराप्रमाणे तुम्हा सगळ्यांना ओवाळून तुमची दृष्ट मनातच मी काढली.

..  “खूप लडी मर्दानी..  अरे तुम तो झाशीवाली रानी हो”..  हे शब्द सहज ओठी आले. काल सगळ्या जगाला कळलं …

बाईपण भारी देवा! बाई पण भारी देवा!! – – 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आपली दिवाळी आणि पशुपक्षांचा शिमगा…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “आपली दिवाळी आणि पशुपक्षांचा शिमगा…” ☆ श्री सुधीर करंदीकर

यावर्षीची दिवाळी आपण सगळ्यांनीच खूप उत्साहात आणि आनंदात साजरी केली असणार. फटाक्यांचे कर्कश आवाज आणि धुरांचे लोट यांना यापुढे दिवाळीचाच एक भाग असे मनाने मानले तर त्यांचा त्रास होत नाही.

या दिवाळी मधला माझा एक अनुभव — 

आज नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो. फिरण्याच्या रस्त्यावर बरीच मंदिरे आहेत, त्यामुळे अनायसेच सर्व देवी – देवतांचे रोजच दर्शन घडते आणि पुण्य पदरात पडते. आज दीवाळी मधले दर्शन, म्हणजे नक्कीच भरभरून पुण्य मिळत असणार, हे नक्की.

फिरण्याच्या रस्त्यावर मारुतीचे एक देऊळ आहे. मंदिराच्या दाराजवळच, बाहेर एक मोठा फळा लावलेला आहे. त्यावर नेहेमी सुविचार लिहिलेले असतात. मला सुविचार वाचायला नेहेमीच आवडते. मी अगदी रोज फळ्यावरचा सुविचार वाचायला हमखास तिथे थांबतो. काही काही सुविचार, खरंच सुंदर असतात आणि हमखास ते मनात मुरतात आणि मग आपोआप आचरणात उतरतात, हा माझा अनुभव.

आज फळ्यावर बघितलं तर चक्क इंग्रजीत लिहिलेले होते — 

# Please Save us from loud noise and smoke.

We can not tolerate it. Please help us!!

खाली काही पक्षी, प्राणी यांची चित्रे होती.

बहुदा या पक्षांनी आणि प्राण्यांनी काल रात्री हे फळ्यावर हे लिहिले असावे. आणि सगळ्यांनाच वाचता यावे, म्हणून कदाचित, आपली व्यथा त्यांनी इंग्रजीत लिहिली असावी.

चित्रांच्या खाली निरनिराळ्या अक्षरात उत्तरादाखल बरेच संदेश लिहिलेले होते. सुविचार लिहिण्याच्या फळ्यावर हा प्रकार नविनच होता. हे काय नवीन आहे, म्हणून मी खालचे वाचायला सुरवात केली —-

काही वाचकांनी आज सकाळीच आपली मते मांडली होती —

# Dear birds and animals –

sorry to say that your request will remain on this board only. सणासुदीच्या दिवसात, कुणीही कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. आम्ही हा त्रास सहन करतो, तसा तुम्ही पण सहन करायला शिका. We have no choice and you too are sailing in the same boat. Your helpless friend – मनवा

# Dear birds and animals – sorry to learn your pains. मनवा यांनी लिहिले आहे, ते बरोबरच आहे. कुणाला काही सांगणे, म्हणजे ‘पालथ्या घड्यावर पाणी ओतणे’ असा प्रकार आहे. हेल्पलेस परिस्थितीतून जेव्हा आपल्याला जावे लागते, तेव्हा संतांचे वचन आठवून शांत रहावे, “जे जे होईलं ते ते पाहावे (म्हणजे कानठळ्या सोसाव्या, धुराचा श्वास घ्यावा), पण चित्ती असू द्यावे समाधान”. आम्ही हेच करतो.

Your friend – मेघना 

# Dear birds and animals –

मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. खरंतर तुमच्या मदतीकरता प्राणी मित्र, पक्षी मित्र, वृक्ष मित्र अशा खूप संस्था आहेत. पण कान बधिर करणाऱ्या आवाजांमुळे आणि विषारी धुरामुळे, त्यांचे सदस्यच परेशान आहेत, त्यामुळे अशावेळेस त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करणे चुकीचेच वाटते. पण काहीतरी मार्ग तर काढायलाच पाहिजे. संध्यातरी मला दोनच पर्याय दिसत आहेत — 

१) आलीया भोगासी असावे सादरं, चित्ती असू द्यावे समाधानं. अशी मनाची तयारी करायला सुरुवात करा.

२) आपल्याला इथे नोकरी मिळू शकत नाही, हे समजल्यावर जसे बरेच जण परदेशात पलायन करतात, तसेच इथून स्थलांतरित होण्याचे काहीतरी बघा. परदेशात जाता आले तर उत्तम, कारण तिथे प्राणी आणि पक्षी यांची कदर केली जाते. निसर्गाचा समतोल, पशु / पक्षी / कीटक यांच्यामुळेच साधतो, हे त्यांना समजते व त्याप्रमाणे ते वागतात. Very very sorry.

तुमची मैत्रीण – वसुंधरा

हे सगळे वाचून, आपण सगळेच किती हेल्पलेस आहोत, याची जाणीव झाली. पूर्वी दिवाळीत फटाके उडायचे, पण ते आजच्या तुलनेत अगदी साधे असायचे. थोडासा आवाज / थोडासा धूर / थोडासा रंगीबेरंगी प्रकाश, हे सगळे डोळ्यांना आणि कानाला मजा देऊन जायचे. मजा यायची.

जमाना बदलतोय, फटाक्यांची विक्री आता वर्षभर सुरु असते. पूर्वी दिवाळीत फटाके असायचे, नंतर लग्नात सुरु झाले, नंतर वाढदिवसांना सुरु झाले, नंतर दहीहंडीला सुरु झाले, नंतर नवरात्रात सुरु झाले, नंतर शिवरात्रीला सुरु झाले, नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरु झाले. कुठल्या ना कुठल्या निवडणुका तर वर्षभर सुरुच असतात, निवडणूक म्हटलं, कि कुणीतरी जिंकणारच आणि आनंद साजरा करायचा, म्हणजे मोठमोठे फटाके आलेच. अशी ही यादी वाढतच चालली आहे. काहीतरी कारण शोधायचं आणि फटाके फोडायचे, हेच सत्र सध्या सुरु आहे.

आपण हेल्पलेस झालो, कि नेहेमी देवाकडे धाव घेतो. मी विचार केला, इथे तर देव अगदीच समोर आहे, म्हणजे त्याच्याकडे पोहोचायला, धाव घेण्याची पण जरूर नाही. मी आत मंदिरात गेलो, हात जोडले आणि देवाला म्हणालो – माणसानी असे वेडेवाकडे फटाके बनवणे, ते वर्षभर उडवणे, याची बिचाऱ्या पक्षांना / पशूंना शिक्षा मिळायला नको? त्यांच्याकरता काही तरी कर, ही मनापासून तुला प्रार्थना आहे. वयस्कर मंडळी, आजारी मंडळी, लहान बालके, आणि फटाके उडवणाऱ्यांसकट सगळेजण, यांना पण ही शिक्षाच आहे. काहीतरी उपाययोजना कर आणि हे थांबव, कमी कर.

प्रार्थना करून मी बाहेर पडलो. असं म्हणतात, कि पशु पक्षांना थर्ड सेन्स असतो. त्यांचे हितचिंतक कोण आहेत, वगैरे त्यांना कळतं. आपल्या हितचिंतकाला ते धन्यवाद देण्याचा नेहेमीच प्रयत्न करतात.

मी मंदिराच्या बाहेर पडलो. फुटपाथ वरची २-३ कुत्री माझ्या पाया – पायाशी करायला लागली. आणि नाजूक आवाजात भुंकायला लागली. बहुदा त्यांना मला थँक्स म्हणायचे असावे. मी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि पुढे निघालो.

घरापर्यंत पोहोचलो. केंव्हातरी दर्शन देणारा भारद्वाज पक्षी, चक्क गेटवर बसून धन्यवाद देण्याकरता माझी वाटच बघत असावा. मला बघताच तो उडून गेला. मी मनापासून नमस्कार केला.

हे सगळं वाचून, आपण सगळ्यांनीच, या संदर्भात काहीतरी सकारात्मक करायचंच, असं मनाशी ठरवलं, तर देवाच्या कृपेने, आपल्याला अशक्य असे काहीच नाही, आणि कुठलाही बदल हा आपण नक्कीच घडवू शकतो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्राचे अंगण…. – भाग – २ ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ चित्राचे अंगण…. – भाग – २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले– १७ ऑक्टोबर , वसुबारसेचा दिवस. संध्याकाळी शुभदाचा फोन आला, ‘एक गुड न्यूज आहे.’ मी म्हंटलं ‘काय?’ मला वाटलं, एखादा, तिची कथा असलेला दिवाळी अंक आला असणार. पण नाही. न्यूज भलतीच ‘गुड… गुड… गुड… ‘ होती. तिला प्रा.ताम्हनकर सरांचा फोन आला होता, ‘परिषदेतर्फे आचार्य अत्रे पुरस्कारासाठी तुमची निवड झाली आहे. तुम्ही तो स्वीकाराल ना!’ आता इतका चांगला सन्मान कोण नाकारणार? मला मोबाईलवर हे ऐकल्यावर वाटलं, की सांगलीत असते, तर तिच्या घरी गेले असते. तिला घट्ट मिठी मारली असती आणि गरागरा फिरवलं असतं. आता मुंबईत आहे. नाईलाज आहे. पण मन मागोवा घेऊ लागलं इतकी आमची घट्ट मैत्री कधी आणि कशी झाली? आता इथून पुढे )   

घटना खूप जुनी.  ३५-३६ वर्षे होऊन  गेली असतील. सांगली नगरवाचनालयातर्फे  जिल्हा साहित्य संमेलन करायचे ठरले. वसंत कानेटकर अध्यक्ष म्हणून निश्चित झाले. कार्यक्रम नेहमीचेच.  कविता वाचन,  कथाकथन, परिसंवाद वगैरे…… कार्याध्यक्ष होत्या, डॉ. तारा भवाळकर. त्या  शुभदाच्या बंगल्यासमोर रहायच्या.  त्यांनी शुभदाला येऊन कार्यक्रमाची माहिती दिली आणि सांगितले, ‘या संमेलनात तू कथाकथन करायचे आहेस.’ ती  म्हणाली, ‘मी आजपर्यंत कधीच कथाकथन केले नाही. मी फक्त कथालेखन करते.’ त्या म्हणाल्या, ‘ ते काहीही असो, तू या संमेलनात कथाकथन करणार म्हणजे करणार आणि तुझीच कथा सांगणार.’ ते तिचे पहिले कथाकथन.  कथा ऐकताना ती  नवखी कथनकार आहे, असे मुळीच वाटले नाही. तिची कथा रंगली.  तिने टाळ्या-बिळ्या घेतल्या. यानंतर तिचे कथाकथनाचे  खूप कार्यक्रम झाले.

—  पूर्वाश्रमीची चित्रा म्हणजेच आत्ताच्या सुप्रसिद्ध लेखिका सुश्री शुभदा साने.

…… शुभदा साने हे नाव त्या दिवशी मी प्रथम ऐकलं. मला वाचायची आवड आहे खरी, पण, घर-संसार, नोकरी यामुळे मासिक वाचनाला मर्यादा पडतात. त्या दिवशी माझ्या मनात आलं , सांगलीत असून इतकी चांगली लेखिका मला कशी माहीत नाही?  मग मी तिच्याकडे गेले आणि तिची ओळख करून घेतली. त्या सुमाराला मी नव्याने कथा लिहू लागले होते,  तर ती  प्रथितयश होण्याच्या मार्गावर होती. परिचय झाला. तिचं मनमोकळं बोलणं यामुळे तो वाढत गेला. मग नुकत्याच लिहिलेल्या किंवा लिहू घातलेल्या कथांविषयी ती  बोलायची. मीही  माझ्या कथांच्या कल्पनेवर चर्चा करायची. अर्थात तिच्या तुलनेत माझा वेग अतिशय मंद होता. हळू हळू परिचय….  मैत्री…… घनिष्ठ मैत्री…..  सख्खी मैत्रीण असा आमचा प्रवास होत गेला.

आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली, एकदा सांगली आकाशवाणीचे प्रख्यात निवेदक वामन काळे शुभदाला भेटले. ते म्हणाले, ‘तुम्ही ‘युवावाणी’साठी कथावाचन कराल का?’ त्यानंतर तिचे कथावाचन आकाशवाणीवरून प्रसारित झाले. त्यानंतर ‘साहित्य सौरभ’, ‘सये साजणी’ इ. विभागातून तिचे लेख, कविता, संवाद  प्रसारित झाले. ‘प्रतिबिंब’ या कौटुंबिक श्रुतिका मालेतील काही श्रुतिका तिने लिहिल्या. आकाशवाणीवरील लेखनात सर्वात महत्वाचं आणि कस पहाणारं लेखन म्हणजे ‘रघुनाथाची बखर ‘ या   तिच्या वडलांनीच लिहिलेल्या कादंबरीचे नाट्यरुपांतर . त्यावेळचे नाट्यविभागाचे  प्रोग्रॅम  इन्चार्ज, श्री. शशी पटवर्धन यांनी तिच्यावर ही जबाबदारी  सोपवली. काहीशा साशंक मन:स्थितीतच तिने ही जबाबदारी स्वीकारली आणि उत्तमपणे पार पाडली. ही कादंबरी १३ भागात, नाट्यरूपात सांगली आकाशवाणीवरून प्रसारित झाली आणि श्रोत्यांनी त्याला मनापासून दाद दिली.

तिने काही वृत्तपत्रातून आणि मासिकांमधून सदर स्वरूपही लेखन केले. त्यात आवर्जून उल्लेख करावा अशी दोन सदरे, म्हणजे ‘सुवासिनी’मधून गेल्या दोन वर्षात आलेली सदरे. केल्या वर्षी तिने ‘कथेची कथा’ हे सदर लिहिले होते. कोणती घटना-प्रसंग, त्यातील व्यक्ती अनुभवल्यावर आपल्याला कथा सुचली, आणि कथा म्हणून आपण त्यात काय बदल केले, हे सांगणारे ते सदर . हे सदर वाचकांना खूप  आवडले. त्याची दाद फोनवरून तिला मिळत गेली. तसेच यंदाच्या वर्षी ‘सुवासिनी’ मध्येच तिने ‘आठवणीच्या हिंदोळ्यावर ‘ हे आपल्या साहित्यिक प्रवासाचे, त्यातील कटू-गोड आठवणींचे वर्णन करणारे सदर लिहिले आहे. तेही लोकप्रिय झाले आहे .

शुभदाच्या लेखनाबद्दल ‘सुवासिनी’च्या संपादिका ‘आसावरी केळकर’ म्हणतात. ‘त्या कथा खूप छान लिहितात. वाचकांनाही त्या आवडतात. तशी त्यांची पत्रे येतात. जे लेख त्या लिहितात, ते पूर्ण अभ्यास करून, रंजक होईल, अशा पद्धतीने आणि मनापासून लिहितात.’ तिचे कथासंग्रह वाचलेल्या ‘गौरी गाडेकर’ म्हणतात, ‘शुभदा साने आपल्या ओघवत्या शैलीत व्यक्तिरेखा आणि त्यांच्या आजूबाजूचं वातावरण उत्तम प्रकरे साकार करतात. त्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, अनपेक्षित शेवट . त्या कथानकाला आशी काही कलाटणी देतात, की वाचकाला वाटतं, ‘अरेच्चा! आपल्याला तर वाटलं होतं… त्यांनी आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम कथा लिहिल्या आहेत. भविष्यातही त्यांच्या हातून आणखी उत्तमोत्तम कथा लिहिल्या जातील, याची खात्री आहे.’ सातत्याने ‘सह्याद्री’च्या दिवाळी अंकात कथा लिहिणार्‍या शुभदाबद्दल ‘सह्याद्री’चे संपदक ‘स्वप्नील पोरे’ म्हणतात, ‘ शुभदा साने यांच्या कथा मनाला स्पर्श करतात, याचे कारण कथा विषयाची त्यांच्याकडून होणारी हळुवार हाताळणी. ही हाताळणी हळुवार असली, तरी तेवढ्याच ताकदीची असते. त्यांच्या कथा कौटुंबिक असल्या, तरी पारंपारिक साच्यातल्या नाहीत. नव्या काळातील घराघरातील रंगभूमी दिनाच्या स्पंदने टिपण्यात त्यांची कथा यशस्वी झाली आहे. अनेक गुंतागुंतीचे विषय, त्यांची लेखणी एकेक पापुद्रा उलगडावा, तशी उलगडून सांगते. त्यांच्या कथांमध्ये नैसर्गिक ओघ आहे, तशीच उत्कंठाही आहे. ‘ती आणि तिची आई’, ‘संधी’, ‘त्या दिवसापासून’ या   सह्याद्रीत प्रसिद्ध झालेल्या कथा वाचकांना खूप आवडल्या होत्या.’

शुभदाच्या लेखन कमाईतले आणखी एक श्रेयश म्हणजे, चोखंदळ आणि उत्तम कथावाचक, श्री. दीपक रेगे यांनी तिच्या काही कथा यू ट्यूबवर वाचल्या आहेत. आशा या माझ्या, विविध माध्यमातून वाचक-श्रोत्यांपर्यंत पोचलेल्या मैत्रिणीच्या हातांना आणि लेखणीला राज्य पुरस्काराचे भाग्य लाभू दे , अशी सदिच्छा व्यक्त करत मी थांबते.

– समाप्त – 

© सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थोडं मागं वळून बघताना… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

??

☆ थोडं मागं वळून बघताना… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली यांच्या वतीने कै.श्रीनिवास शिंदगी बालरंगभूमी पुरस्कार जाहीर झाला आणि माझ्या डोळ्यासमोर माझी आजपर्यंतची सांस्कृतिक वाटचाल आली.

.. .. मी आज हा पुरस्कार घेऊ शकते ते केवळ माझे गुरुवर्य श्री. शांताराम कमते यांच्यामुळे. सर्वात प्रथम त्यांनी माझ्यातल्या अभिनय गुणांची मला ओळख करून दिली. कलाविश्व महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर कमते सरांनी मला अभिनयाची पहिली संधी दिली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मद्रासीने केला मराठी भर्तार’, आणि ‘मोरूची मावशी’ या  दोन नाटकात मला काम दिले… आणि माझी माझ्याशी नव्याने ओळख झाली.

लहान असताना मी नकला करत होते.पण रंगभूमीवर काम करण्याचे धाडस मला कमते सरांमुळे मिळाले. श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय असताना प्रा. माणगावकर सरांनी मला ‘लोककला प्रशिक्षण शिबिरा’ला पाठविले आणि मला टर्निंग पॉइंट मिळाला. वेगवेगळ्या लोककलांची तिथे ओळख झाली. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत होतो ज्यात ओवी,भारूड, प्रबोधनपर गीते आणि पथनाट्य असे. मी प्रथमतः पथनाट्य हा प्रकार इथे अनुभवला.रस्त्यावर नाटक करणे तेव्हा नवीन होते.हा नाट्य प्रकार मला खूप आवडला.वेगवेगळ्या महाविद्यालयातून , वेगवेगळ्या गावातून हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला गेला. त्याचे जवळपास १०० एक प्रयोग झाले. यातील एक प्रयोग अविस्मरणीय ठरला. तो म्हणजे ‘आनंदवन’ मधील… बाबा आमटे, साधना आमटे, यांच्यासमोर पथनाट्य सादर करण्याची संधी मिळाली. तिथल्या वातावरणात आम्ही भारावूनच गेलो. खूप चांगला अनुभव आला.

माझ्या बालनाट्य लेखनात ‘बालरंजन’चा मोठा हात आहे.बालरंजन संस्थेच्या वतीने सलग बत्तीस वर्षे मी सांगलीत मोफत बालनाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केले .ही संस्था श्री.सुरेश कोरे यांनी सन १९८८ मध्ये स्थापन केली.तेव्हापासून या प्रशिक्षण शिबिरात मी सहभागी होते.तिथं मार्गदर्शन केलं. मग मुलांना रुचेल, पचेल, आवडेल अशा विषयावर लेखन करावे असे वाटू लागले आणि तिथून माझ्या बालनाट्य-लेखनाची सुरुवात झाली.बालनाट्याचा पहिला प्रयोग शिबिरात होत असे– नंतर स्पर्धेसाठी. पथनाट्ये ही प्रथम शिबिरात आणि नंतर चौकाचौकात सादर झाली. बालनाट्याचे बाळकडू आता अंगात चांगलेच मुरले होते आणि त्याचा उपयोग नोकरी करत असताना झाला.

राणी सरस्वती देवी कन्याशाळा, सांगली, येथे सेवेत असताना या सगळ्या नाट्यप्रवासाचा खूप चांगला उपयोग झाला. विद्यार्थिनिंना नाटकाची ओळख करून देणे सहज शक्य झाले.आमच्या शाळेत सुरुवातीला स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम तीन तासाचा होत असे. विशेष म्हणजे टेप रेकॉर्डवरती गाणी होत नसत. तबला पेटीच्या साथीनेच हा कार्यक्रम पूर्ण होत असे. इथे खूप चांगल्या गोष्टी नव्याने करण्याची, नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. शाळेत असताना अनेक ठिकाणी बालनाट्ये, पथनाट्ये स्पर्धेत सादर केली. त्यांना उज्वल यश मिळाले.

– – १९९३ ला रत्नाकर मतकरी लिखित ‘कळ लाव्या कांद्याची कहाणी’ हे तीन अंकी नाटक बसवले. त्याचा प्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृहात झाला. या नाटकात पंचवीस विद्यार्थिनी सहभागी झालेल्या होत्या.शाळेच्या माजी विद्यार्थिनी समितीच्या आर्थिक सहाय्यासाठी  याचा पहिला प्रयोग झाला. नंतर त्याचे  दोन-तीन प्रयोग झाले. यावेळी शाळेतील पदाधिकारी, सहकारी शिक्षक, विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे श्रीमती उषा कुलकर्णी यांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले.

कणकवली येथील ‘नाथ पै एकांकिका स्पर्धेत’ बालनाट्य सादर करून बक्षीस मिळविले. इचलकरंजी, कराड इथेही बालनाट्यांना यश प्राप्त झाले. चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मी विज्ञान विषयक एक एकांकिका सादर केली.

२१ व्या ‘अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलना’साठी मी बोधचिन्ह केले. याच संमेलनात ‘कशी जिरवली’ हे बालनाट्य सादर केले. या संमेलनात सहभागी झाल्यावर मग आता आपलेही साहित्य प्रकाशित करावे असे वाटू लागले आणि ‘आम्ही तुमचे सोबती’ हा एकांकिका संग्रह आणि ‘शाळेला चाललो आम्ही’ हा पथनाट्य संग्रह, अशी माझी दोन पुस्तके प्रकाशित झाली.आज एकूण आठ पुस्तके प्रकाशित आहेत.

८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आम्ही ‘अशांती’ हे पथनाट्य सादर केले होते. तेव्हा   मा. गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी हे पथनाट्य पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातही  विद्यार्थिनींचे पथनाट्य सादर केले. 

बालनाट्य, पथनाट्य लेखन, दिग्दर्शन याचबरोबर ‘नागा नृत्य’  बसवणे ही माझी खासियत होती. संपूर्ण जिल्ह्यात या नागानृत्याने अनेक बक्षीसे मिळवली. सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सांस्कृतिक कार्यक्रमातही  हे नृत्य सादर केले होते. तसेच सांगली जिल्हा परिषद क्रीडा विभागाच्या वतीने  घेण्यात आलेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मी ८० विद्यार्थ्यांचे नागा नृत्य सादर केले.

विद्यार्थिनींच्या मनात नृत्य नाट्य या कलागुणांचा विकास व्हावा या हेतूने मी शालेय स्तरावर प्रशिक्षण शिबिरे घेतली. सांगली आकाशवाणीच्या शालेय कार्यक्रमात बालनाट्य, नाट्यछटा सादर करण्याची संधी विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिली. सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या अनेक नृत्य, नाट्य स्पर्धांसाठी, तसेच लठ्ठे फेस्टिवलच्या नृत्य, पथनाट्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणूनही काम करण्याची संधी मला मिळाली. .

आता नृत्य बसवत नाही. पण नाटक स्वस्थ बसू देत नाही.बालनाट्य लेखनाचे काम आजही सुरू आहे. महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत माझी नाटके सादर होत आहेत. बालकांच्या अभिनयातली सहजता आणि निरागसता नेहमी मनाला आनंद देतात.त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मनावरची मरगळ दूर करते. म्हणून त्यांच्यासाठी सतत काम केले पाहिजे असे मला मनापासून वाटते. 

शिंदगी सरांचे ‘मिठाईचे घर’ हे बालनाट्य मी शाळेत असताना बघितले होते.शिंदगीसर भेटले की नेहमी माझे कौतुक करत असत. ते मला गुरूस्थानी आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने हा पुरस्कार मला मिळतोय याचा मला खूप आनंद झाला आहे. यापुढेही मी बालरंगभूमीसाठी सतत कार्यरत राहीन ..

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्राचे अंगण…. – भाग – १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ चित्राचे अंगण…. – भाग – १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

परवा आमच्या शेजारचं एक बाळ रडत होतं. असेल दोन अडीच वर्षाचं. त्याच्या आईने मोबाईलवर गाणं लावलं आणि ती त्याला रिझवू लागली. मला एकदम आठवण झाली, आमच्या  लहानपणी बाळ रडायला लागलं , की आई किंवा घरातलं कुणी तरी त्याला अंगणात नेई आणि गाणं म्हणे, 

‘बाळाच्या अंगणात कोण कोण आलं बाई, कोण कोण आलं ? मग बाळाच्या अंगणात चिमण्या चिवचिवून जात. काऊ, मैना, पोपट, साळुंक्या येत. माऊ, भू भू, गाय , बैल, हरण, ससा येत.  म्हणणाराची कल्पनाशक्ती जेवढी मोठी,  तेवढा गाणं लांबे. हे गाणं आठवता आठवता मला एकदम सुचलं. कसं सुचलं, कुणास ठाऊक? मला सुचलं , 

‘चित्राच्या अंगणात कोण कोण आलं  बाई कोण कोण आलं ?

कोण कोण आलं बाई, त्यांनी काय काय केलं, बाई काय काय केलं? ‘ 

.. .. पण ही चित्रा कोण?  तिच्या अंगणात म्हणजे तिच्या मनाच्या अंगणात का? नाही. …. मनाच्या अंगणात नाही. जीवनाच्या अंगणात…   

‘चित्राच्या अंगणात (जीवनात) कोण कोण आलं  बाई कोण कोण आलं ? 

चित्राच्या मनात कोण कोण राहिलं बाई, कोण कोण राह्यलं ?

मग तिने काय काय केलं बाई काय काय केलं ?

मग तिने त्यांना कागदावर उतरवलं बाई , कागदावर  उतरवलं.  

मग तिने त्यांना कागदावर उतरवलं बाई , कागदावर  उतरवलं.‘ 

– – – त्या कागदावर उतरवलेल्या माणसांच्या मग झाल्या कथा ….. 

चित्रा म्हणजे श्री.ज.जोशी यांच्या घरातील एक प्रकाशमान नक्षत्र. १९४८साली, ते त्यांच्या घरात दाखल झालं. दिसायला सुरेख, म्हणून चित्रा नाव ठेवलं असेल, किंवा चित्रा नक्षत्रावर जन्मलेली, म्हणून चित्रा नाव ठेवलं असेल. दोन्ही दृष्टीने नाव यथार्थ होतं. श्री. ज. जोशी म्हणजेच श्रीकृष्ण जनार्दन जोशी. मराठीतील एक जेष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक. मराठी साहित्याचा आढावा, त्यांचा नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. तर अशा साहित्यिकाचा वारसा आपल्या कुवतीप्रमाणे पुढे नेणारी त्यांची लाडकी कन्या,  म्हणजे चित्रा. या चित्राने अनुभवलेली, तिच्या मनात रेंगाळलेली माणसे, तिने कागदावर उतरवली. जशीच्या तशी नव्हे,  कधी थोडे रूप पालटून, व्यक्तिमत्व आणि घडलेल्या घटना यात थोडा फेरफार करून.

‘चित्रांगण’ हे चित्राचं पहिलं पुस्तक. पण ते छापलं  गेलं चित्रा असताना नव्हे, तर चित्राची शुभदा झाल्यावर. 

चित्रा शाळेत असल्यापासून कविता, कथा लिहायची. पण काहीसा भिडस्त स्वभाव, आपण विशेष काही करतोय …… इतरांपेक्षा वेगळं., याची जाण नसणं, यामुळे तिने आपलं लेखन फारसं कुणाला दाखवलं नाही. मैत्रिणींनाही त्याबद्दल सांगितलं नाही आणि वडलांनाही नाही. पहिली कविता पाचवीत  असताना तिने   लिहिली.  ती  शाळेच्या  मासिकात छापून  आली. त्यानंतर एकदा साधना मासिकाने मुलांसाठी काव्यस्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात तिची कविता ‘सावल्या ‘ ही प्रथम क्रमांकाने निवडली गेली. तिला पुरस्कार मिळाला आणि कविताही छापून आली.    कथास्पर्धेतही एकदा तिच्या कथेला पुरस्कर मिळाला होता , पण बाईंनी तिचे कौतुक न करता दुसरा नंबर आलेल्या त्यांच्या  लाडक्या विद्यार्थिनीचे कौतुक केलं, याचंही तिला त्या बालवयात वैषम्य वाटलं. स्वाभाविकच होतं ते, नाही का?  बालोद्यानमध्ये तिची कथा तिने वाचली, पण मैत्रिणींना ती ऐकायला सांगावी, हे काही तिला सुचले नाही.  अशा तऱ्हेने, कविता, कथा लिहीत आपल्या बालपणावर साहित्य निर्मितीच्या  पाउलखुणा उमटवत ती  कॉलेजकन्या झाली. कन्या नव्हे, तरुणी. वाचन-लेखनाची आवड तिने तिथेही जोपासली होती. 

एकदा तिने एक कथा लिहिली. वडलांना न सांगता, दाखवता त्या वेळच्या सुप्रसिद्ध ‘सत्यकथा’ मासिकाकडे ती पाठवली. काही दिवसांनी सत्यकथेचे कार्यकारी संपादक श्री. राम पटवर्धन यांचे पत्र आले, ‘लेखिकेमध्ये लेखन गुण दिसतात, पण अधिक खोलवर जायला हवं. ‘ वडलांना त्यांचं आलेलं पत्र पाहून तिला आश्चर्य वाटलं. ती  म्हणाली, ‘दादा, तुम्हाला तर मी काहीच सांगितलं नव्हतं, मग त्यांचं तुम्हाला कसं पत्र आलं ?’  ते हसत हसत म्हणाले, ‘अग, वर तू दिलेला आपला पत्ता एकच ना !’ त्यानंतर मात्र तिने अधिक खोलात जाऊन लिहिलेल्या तिच्या तीन-चार कथा पुढे सत्यकथेत प्रसिद्ध झाल्या. 

आणखी एक सांगण्यासारखा किस्सा म्हणजे एकदा माधव कानिटकर (प्रपंच, मानिनीचे संपादक) तिच्या वडलांना भेटायला आले होते. त्यावेळी तिने एक कथा नुकतीच लिहून पूर्ण केली होती. ती  टेबलावरच ठेवून ती त्यांना ‘बसा’  म्हाणाली आणि आत गेली. वडील आंघोळीला गेले होते. वेळ घालवण्यासाठी माधव कानिटकर टेबलावरची कथा उचलून वाचू लागले. त्यांना ती इतकी आवडली, की त्यांनी तिला हाका मारल्या आणि सांगितले की, ते ही कथा त्यांच्या अंकात छापणार म्हणजे छापणार!’

अभ्यास करता करता चित्राचं तुरळक लेखन चालू होतं. यथावकाश ती बी.ए. झाली आणि नंतर चित्रा जोशीची ‘सौ. शुभदा श्रीधर साने’ बनून सांगलीत नांदायला आली. 

—  पूर्वाश्रमीची चित्रा म्हणजेच आत्ताच्या सुप्रसिद्ध लेखिका सुश्री शुभदा साने.

सांगली तसं जुनाट गाव. परंपरानिष्ठ,  कर्मठ. घरातील लोकही तसेच. कर्मठ. शुभदा पुण्यासारख्या शहरातून आलेली. स्वतंत्र विचारसरणी असलेल्या घराचे संस्कार. तिला या घरात सामावताना खूप तडजोड करावी लागली. या ओदासिन्याच्या काळात तिचा विरंगुळा होता, लेखन आणि वाचन. तिच्या लेखनाचं  घरात कुणालाही  कौतुक नव्हतं.  नाही  म्हणायला अपवाद श्रीधरपंतांचा. त्यांना मात्र शुभदाच्या लेखनाचं  अतिशय अप्रूप होतं. ज्याच्या-त्याच्या जवळ ते तिच्या लेखनाचं कौतुक करत. पण बाकीच्यांना मात्र तिच्या लेखनाशी काही देणं-घेणं नव्हतं॰ पण ती लिहीत होती आणि कथा छापून येत होत्या.  

एकदा मनाच्या  विमनस्क अवस्थेत तिने ‘डोह’ कथा लिहिली. नुकतीच लग्न झालेली.  सासुरवाशीण. सासरी कष्ट. छळ. उपेक्षा. सकाळी नदीवरून पाणी आणायचं . समोर नदीचा खोल डोह. एकदा घरी तिला भेटायला आलेले वडील तिला म्हणाले, ‘आज मी तुझ्याबरोबर येतो. ते मुलीबरोबर नदीवर गेले. तिचं ते एकटक डोहाकडे बघणं पाहून त्यांच्या काळात चर्रर्रर्र झालं. ते म्हणाले , .’बाळ माझं एक ऐकशील? थोडी उशिरा उजाडल्यावर वर्दळ सुरु झाली, की पाण्याला ये.’ ती दुसऱ्या दिवशीही लवकरच पाण्याला गेली. पुन्हा डोहाकडे काही विचाराने बघितले आणि तिला समोर दिसले,  दोन व्याकूळ झालेले, तिच्याकडे काही अपेक्षेने पहाणारे डोळे. जणू तिच्यापुढे आखलेली लक्ष्मणरेषाच. ती, ती  रेषा ओलांडू शकली नाही.’ तर अशी ही ‘डोह’ कथा. पुढे ही कथा ‘सत्यकथे’त प्रकाशित झाली. 

एकीकडे शुभदाचा संसार वाढत, फुलत होता. तिला दोन मुले झाली. संपदा आणि भूषण. मुलांना  वाढवण्यात, त्यांचं  लालन-पालन करण्यात तिच्या लेखनाचा वेग मंदावला, पण थांबला नाही. कथा लेखन चालू होतं. त्या प्रकाशित होत होत्या. हळू हळू पुस्तकेही निघत होती. ‘चित्रांगण’ला पहिल्या पुस्तकासाठीचे  महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळाले. नंतर ‘माणूस’,  ‘तुमचं आमचं’ , ‘आणि म्हणूनच’, ‘आणि किती तरी…’  दिलासा, मुक्ती, वजीर, सारखे ३८ कथासंग्रह, सुवर्णमध्य, सारखे ललित लेख संग्रह रंग -बेरंगी, धम्माल गोष्टीसारखे बालकविता आणि बालकथा संग्रह अशी सगळी मिळून तिची आता ५० पुस्तके आहेत. ‘आणि किती तरी’ला ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा शंकर खंडू पाटील पुरस्कार मिळाला. याशिवाय, श्री. दा. पानवलकर, राजेंद्र बनहट्टी, अनंत फंदी असे काही महत्वाचे आणि इतर अनेक छोटे-मोठे  पुरस्कार तिला मिळाले आहेत. या सर्वांवर कळस म्हणजे तिला नुकताच, ४ नोहेंबरला, रंगभूमी दिनाच्या आदल्या दिवशी मिळालेला आचार्य अत्रे पुरस्कार. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सांगली शाखेतर्फे, ‘रंगभूमी दिनाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गतच’ तिला हा पुरस्कार देण्यात आला. 

१७ ऑक्टोबर , वसुबारसेचा दिवस. संध्याकाळी शुभदाचा फोन आला, ‘एक गुड न्यूज आहे.’ मी म्हंटलं ‘काय?’ मला वाटलं, एखादा, तिची कथा असलेला दिवाळी अंक आला असणार. पण नाही. न्यूज भलतीच ‘गुड… गुड… गुड… ‘ होती. तिला प्रा.ताम्हनकर सरांचा फोन आला होता, ‘परिषदेतर्फे आचार्य अत्रे पुरस्कारासाठी तुमची निवड झाली आहे. तुम्ही तो स्वीकाराल ना!’ आता इतका चांगला सन्मान कोण नाकारणार? मला मोबाईलवर हे ऐकल्यावर वाटलं, की सांगलीत असते, तर तिच्या घरी गेले असते. तिला घट्ट मिठी मारली असती आणि गरागरा फिरवलं असतं. आता मुंबईत आहे. नाईलाज आहे. पण मन मागोवा घेऊ लागलं इतकी आमची घट्ट मैत्री कधी आणि कशी झाली? 

– क्रमश: भाग १

© सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मातृभाषेतून शिक्षण… लेख क्र. १९ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ मातृभाषेतून शिक्षण… लेख क्र. १९ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

“बाई, कसेही करा पण हिला तुमच्या शाळेत ऍडमिशन द्या,” समोर बसलेले पालक उच्चविद्याविभूषित होते. गेले चार दिवस रोज येत होते. त्यांची अडचण मला समजत होती पण आता तर ऑगस्ट महिना उजाडला होता, वर्गही पूर्ण क्षमतेने भरलेले होते.

काय करावे मलाही समजेना. 

पालक काकुळतीला येऊन विनवणी करत होते, मुलगी बिचारी – कोपऱ्यातल्या खुर्चीवरून हळूच माझ्याकडे पाहत होती. तिची नजर जणू काही मला सांगत होती, “घ्या ना हो मला तुमच्या शाळेत !” 

ही मुलगी गेली दोन वर्षं – ज्युनियर केजी, सिनियर केजी – स्टेशनजवळील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात शिकायला जात होती. पण तिथे सतत ती आजारी असायची, झोपून राहायची. 

तिच्या आजारपणासाठी अनेक डॉक्टर झाले, पण तिला कोणताही शारीरिक आजार नाही असं सगळ्याच डॉक्टरांनी सांगितलं. दिवसेंदिवस मुलगी खूपच अशक्त होऊ लागली. 

तिच्या आजाराचं निदान “शाळा” आहे हे समजल्यावरती आईने तिची शाळा बदलायचा निर्णय घेतला, पण वडील मात्र आपल्या निर्णयाला ठाम चिकटून होते, “मी इंग्रजी माध्यमात शिकलो, माझी मुलंही इंग्रजीच माध्यमातच शिकतील,” हा त्यांचा हट्ट. पण जूनमध्ये शाळा उघडल्यावर मुलगी काही शाळेत जायलाच तयार नव्हती, शेवटी नाईलाजाने का होईना पण वडिलांना पटलं आणि म्हणून आता ऑगस्ट महिन्यात प्रवेशासाठी ते आमच्या शाळेत येत होते. 

मी मुलीशी बोलले. ती पटकन माझ्याजवळ येऊन उभे राहिली, “बाई, मी येऊ का तुमच्या शाळेत? मला आवडेल इथे यायला!” हे बोलत असतानाही तिचा चेहरा फुलला होता.

शेवटी मी तिला प्रवेश दिला, तेव्हा ती नाचायलाच लागली, “आजपासूनच येते मी शाळेत !”

मुलांना इंग्रजी माध्यमात घालण्याचा अट्टाहास कशासाठी ? आपल्या मातृभाषेतून शिक्षण देणे महत्त्वाचे हे निदान या पालकांना तरी लवकर कळले आणि एक कोमेजलेली कळी पुन्हा टवटवीत झाली.

– लेख क्र. १९ 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर…! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ आठवणींचा त्रिपूर…! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आज त्रिपुरी पौर्णिमा! दसरा- दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते! त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो!

तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो. लहानपणी त्रिपुर पाहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू! वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून गेलेली दिसत असे. गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दीपमाळा मी खूप पाहिल्या..

त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना मुद्दाम खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली, तेव्हा शंकरांनी त्रिपुरासुराची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाऊ लागले.

या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. एकादशी पासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध आणि शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

पण… माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला. सासुबाई सांगत, “समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला. ” त्याकाळी जन्म वेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! त्यामुळे लग्नानंतर तारखेपेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला यांचा वाढदिवस साजरा केला जाई!

सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात माझे धाकटे दीर आणि मुले यांचा पुढाकार असे. आम्ही सर्वजण पणत्या, मेणबत्ती घेऊन त्रिपुर लावण्यास मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या प्रकाशाने उजळून गेलेले पाहण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे. शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे निरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खूपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!

प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस ऊबदार शालीत गुरफटून घेत डिसेंबर, जानेवारी येतात. , पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.

ह्यांच्या आयुष्याचा एक एक त्रिपुर पूर्ण होत असताना मनाला खूप आनंद मिळत होता! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो!

दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी ह्यांचे निधन झाले, पण त्रिपुरी पौर्णिमा ही त्यांचा जन्म दिवस म्हणून कायमच मनात राहील!

त्यांच्या आठवणींचा त्रिपूर मनात सतत तेवत राहील हे नक्की!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares