दिवाळीच्या निमित्ताने खरोखरच कंबरडं मोडेपर्यंत साफसफाई करून झाली. डबे घासले, जाळी जळमटं झाडली, खिडक्या काचेची तावदानं, पंखे दिवे, अगदी सारं काही मायक्रो फायबरचे नवे कोरे फडके पार काळे होईपर्यंत पुसपुस पुसले. सारे काही घास घास घासले. म्हटलं पुरे झालं आता. अंमळ जरा शांत बसुया. फायलींचे कपाट नंतर आवरूया पण मग पुढच्या क्षणी वाटलं एकदा का विश्रांती घ्यायचं ठरवलं तर न जाणो पुन्हा परत उरलेली सफाई होईल की नाही मग राहिलं की राहूनच जातं त्यापेक्षा कामात काम होऊन जातं आणि फायलींचे कपाट नीट लावण्याचा माझा संकल्प जवळजवळ वर्षापूर्वीचाच आहे. यावर्षी तरी हे काम करूच या.
मंडळी! माझं कसं आहे ना मी कुठलेही काम अत्यंत व्यवस्थित आणि मनापासून जीव लावून करते. चाल ढकल मला आवडतच नाही. मी सगळ्या फाइल्स काढल्या. कपाटरिकामं केलं आणि फडकं घेऊन आतल्या सर्व फळ्या पुसायला घेणार इतक्यात एका जुन्या फाईल मधून एक अगदी जीर्ण झालेला कागद सरकून माझ्या जवळच येऊन पडला मी तो उचलला आणि दुसऱ्याच क्षणी एका हवेच्या झोक्याबरोबर माझं मन कसं नकळत हलकेच तरंगू लागलं. कागद जुना असला तरी कागदावरची वळणदार अक्षरं मात्र अजूनही मोगऱ्याच्या फुलांसारखी टवटवीत भासली. त्यावर लिहिली होती एक सुरेख कविता. कुणीतरी वेड्या मनानं माझ्यासाठी त्या काळात लिहिलेली,..
मी आहे असाच आभाळ बावरा पक्षी
ती आहे तशीच सुबक नाजूक नक्षी
मी उगाच उडून उधळतो रंग
ती लडिवाळ लाजरी सावरते अंग
मी मुक्त मोकळा करतो कहर
ती हळूच पंखावर पसरते पदर
मी तिला चिडवायचे शोधत राहतो
बहाणे
ती समंजस हुशारीने चुकवते सारेच निशाणे
मी भेटायला येताना वाजवत नाही
पाऊल
तिला कशी कोण जाणे बरोबर लागते चाहूल
शब्द सहज सुचतात तिच्यावर लिहिता लिहिता
निशिगंधाच्या फुलासारखी उमलून येते कविता
असे काहीसे आहे तिचे माझे मैत्र
माझ्या कोऱ्या कागदावर तिचे रंगचित्र।।
तसं म्हणायला गेलं तर कच्चीच होती ती कविता! अगदीच मुक्त विखुरलेले कसलाच काव्यशास्त्र भाव नसलेले ते शब्द पण तरीही वाचता वाचता माझ्या उमलत्या वयावर वर्षानुवर्षे चढत गेलेली वार्धक्याची धूळच जणू काही झटकली गेली. त्यावेळी झटकले होते या काव्यमय शब्दांना, त्या हळव्या प्रेमालाही, किती बेदरकारपणे, गर्विष्ठपणे, तुच्छपणे या भावनांची घोळक्यात खिल्लीही उडवली होती मग असे असतानाही मी हा कागद इतकी वर्ष का जपून ठेवला? की तो सहज अनाहूतपणे माझ्या आयुष्यात मलाही नकळत सोबत राहिला आणि आज आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर तो पुन्हा त्याच अर्थ भावनेने का बरं त्या शब्दांसकट त्या भावनांसकट फडफडत राहिलाय ? खरं म्हणजे त्या शब्दांच्यामागचा चेहराही आता आठवत नाही पण लपविलेल्या त्या भावनांचा सुगंध मात्र हिरव्या चाफ्यासारखा मनाच्या प्रवाहात असा अवचित दरवळला.
” कोशिश करना हमारा काम हैं, हार-जीत तो परिणाम हैं।” ••••
सध्या चालू असलेल्या भारत इंग्लंड ची मॅच, मी माझ्या वडिलांबरोबर बघत होते. शेवटच्या बाॅलवर सिक्स गेला. व त्या एका बॉलमुळे म्हणा किंवा सिक्स मुळे म्हणा आपण हातातोंडाशी आलेला मॅच हारलो. •••••
त्या नंतर त्यावर चर्चेला रंग चढला. जो तो आपापल्या बुद्धी नुसार, त्या एका बाॅलवर आपली प्रतिक्रिया देण्यात दंग होता. चर्चेला उधाण आलं होतं. प्रत्त्येक जण या क्षेत्रातील expert असल्यासारखे विश्लेषण करत होता. ••••
बॉल असा फेकला असता तर, ••पिच कसं आहे?? त्याप्रमाणे बॉल फेकायला पाहिजे होता. ••या मोमेंटवर कोणी फुल टॉस बॉल फेकतो का?? वगैरे वगैरे •• अंतरराष्ट्रीय स्टेजवर बसलेले कॉमेंटेटर्स तर आपले गहन विचार मांडत होते. जूने उदाहरण देऊन यावर चर्चा करण्यात गुंग होते. काय आणि कसं करायला हवं होतं?? यावर ‘expert comments ‘ देण्यात प्रत्येकाने स्वतः ला झोकून दिलं होतं. क्रिकेट प्रेमी तर पार कोलमडले होते. ••••
मी बाबांना विचारलं, •••हे सर्व बरोबर बोलताहेत का?? मला मॅच बघायला आवडत, पण खूप बारीक सारीक डिटेल्स काही कळत नाही. डिस्कस करता येत नाही. •••
तेंव्हा बाबा म्हणाले, •••
हा बॉलरही इंटरनॅशनल प्लेअर आहे. बरेच मॅचेस खेळलेला आहे. तो प्रत्यक्ष फिल्ड वर आहे. त्यानेही काही तरी विचार बॉलफेकण्यापुर्वी केलाच असेल ना. त्यालाही हे “एक बॉल पाच रन्स ” हे समीकरण माहित होतं, त्यालाही जिंकायचीच इच्छा होती. ते त्याच्या करिता आणि टीम करिता सर्वच दृष्टीने आवश्यक होतं. महत्वाचे होते. आणि फायद्याचेही होत. मॅच विनर/ फिनिशर म्हणून त्याच्यावर शिक्का लागला असता. तर, त्याची ‘ IPL’ मध्येही किंमत वाढली असती. जाहिराती मिळाल्या असत्या. ••••
“जैसा परफोर्मेंस वैसी प्राइस मिलती हैं।”••• बॉल फेकण्याआधी कॅप्टन व त्याचे डिस्कशन ही झाले होतेच. •••••
पण यावेळेस निशाणा ठिकाणी लागला नाही. हे खरय. त्याने जो विचार करून बॉल फेकला, तसं झालं नाही. बॅट्समनला पण जिंकायचं होत, त्यांच्यासाठी पण एकच चान्स होता, त्याने शेवटच्या बॉलवर आपले प्राण लावले, शक्ती लावली, तो सफल झाला. ••••
यात चूक कोणाचीच नाही. असं होतच. •••
“कोशीश करना हमारा कामं है, हारजीत तो परिणाम हैं ” •••••
दोघांनी आपापल्या दृष्टीने बरोबरच विचार केला. सिक्स च्या जागी तो कॅच आउट झाला असता. कदाचित स्टंप्स उडाले असते. तर बाजी पालटली असती. ••••
आयुष्यातही असच होत असत. किती तरी निर्णय आपण घेत असतो. प्रश्न / समस्याच्या degree of difficulty, नुसार आपण त्यावर विचार करतो, कधी दुसऱ्या कोणाबरोबर विचार विमर्श ही करतो. प्रत्येकाला आयुष्यात जिंकायचेच असते. कोणालाही हार, नुकसान नको असते. प्रत्त्येक जण धावायचाच प्रयत्न करतो, पडायचा करत नाही. पण प्रत्त्येक वेळेस आपल्या मनासारखे होतेच असं नाही. निर्णय घेताना परिस्थिती वर खूप विचार करूनही कधी कधी नुकसान होतेच. हार होते, निर्णय चूक घेतला, हेही सर्व नंतरच कळत. घटना घडून गेल्यावरच कळत. शेअर्स मध्ये नुकसान झाले. घराचे बुकिंग झाल्यावर बिल्डरने धोका दिला, पैशाची गुंतवणूक चूक जागी झाली. हे सर्व नंतरच कळत. प्रयत्न शेवटपर्यंत जिंकायचाच असतो. ••••
हार की जीत मॅच झाल्यावरच कळत. •••
यालाच नशीब म्हणतात का?? •••
प्रत्त्येक निर्णय विचार पूर्वक घेतल्यानंतर ही असं का होतं??
परिस्थिती बदलली की निर्णयही बदलतात. ••••
वेळ कधी कशी येईल?? सांगता येत नाही. रात्री रामाला राज्य द्यायचा निर्णय झाला होता, परंतु सकाळी वनवास मिळाला. ••••
“अपेक्षा घेऊन सुरू केलेला प्रत्येक दिवस अनुभव देऊनच जातो, मग तो देवमाणूस असो नाहीतर सामान्य माणूस असो. “••••
निसर्गाच्या नियमानुसार बदल होत असतात. आयुष्यात ही बदल होत असतातच. बालपण, तारुण्य, म्हातारपण या वेगवेगळ्या फेज मध्ये खूपदा गणित बदलत, समीकरण बदलतात. तेंव्हा त्याप्रमाणे आधी घेतलेले निर्णय कधी विचार पूर्वक तर कधी नाइलाजाने बदलावे लागतात. म्हणून निर्णय घ्यायचेच नाही असं नाही. पण लवचिकता ठेवावी. जेवढ लवचिक राहाल तेवढं चांगलं. ••••
खूपदा लोकांनी घेतलेल्या निर्णयांवर आपण चर्चा करतो. जोपर्यंत आपल्यावर एखादी ‘तशी’ वेळ येत नाही. तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी चे गांभिर्य कळत नाही. ••••
घरचा प्रमूखाला तर नेहमीच मोठे निर्णय घ्यावे लागतात. त्याच्या निर्णयावर तर घरच्यांच्या बऱ्याच गोष्टी/ भविष्य अवलंबून असतात. प्रमूख नेहमी परिवाराच्या भल्याचाच विचार करून निर्णय घेतो. पण ते नेहमी बरोबरच सिद्ध होत, असं नाही. ••••
घरच्या प्रमूखाची स्थिती घरावरील पत्र्याच्या शेडसारखी असते, जो ऊन, पाऊस, वादळ, वारा सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो. आयुष्यात येणारे उतार चढाव सर्वांना तोंड देतो. आपल्या क्षमतेनुसार निर्णय घेतो. पण त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की, ••••
“हा खूप आवाज करतो. ” नेहमी सर्व खुश असतातच असं नाही. ••••
घरच्यांना बरेच निर्णय पटत नाही. कदाचित चूकतही असतील. पण जाणूनबुजून कोणी नुकसान करण्यासाठी चूकीचे निर्णय घेत नाही. ••••
कदाचित नशीबात तेच लिहिले असते. म्हणून तसे निर्णय घेतले जात असावेत. •••
“अकल कितनी भी तेज़ हो, नसीब के बिना
जीत नहीं सकते ।” ••••
म्हणतात ना, ••••
” देवाला हसवायचे असेल तर त्याला आपला प्लान सांगावा, तो म्हणे गालातल्या गालात हसतो. ” त्याने आधीच आपले आयुष्य ठरवून ठेवलेले असते, त्याचे सर्व निर्णय घेऊन झालेले असतात. •••
“कोई चाहें कितना भी सोच ले,
आखिर में हुकुम का इक्का कुदरत ही फेंकती हैं।” ••••
निर्णय चूकला तर वाईट वाटणे सहाजिकच आहे. पण (guilt) अपराधीपणाची भावना नसावी. ••••
कधी कधी न ठरविलेल्या/ अपेक्षा नसलेल्या गोष्टी सहज घडतात/मिळतात. तर कधी खूप विचार करून घेतलेले निर्णय अपेक्षेप्रमाणे, मनासारखे नसतात. यालाच बहुतेक नशीबाचे खेळ म्हणतात. ••••
सध्या मोबाईल फोन हे फक्त मनोरंजनाचे साधन नसून मानवी विचारशक्ती, नातेसंबंध आणि सामाजिक जाणीवावर प्रभाव टाकणारे माध्यम झालेले आहे.
तर दुसरीकडे वैयक्तिक स्वरूपात त्याचा पेरूचापापा झालेला आहे. म्हणजे असे की, पे–पेन, रू–रूप, चा–चाव्या, पा–पास आणि पा–पाकीट
थोडक्यात फोनमध्ये लिखाणासाठी पेन, रूप पाहण्यासाठी कॅमेरा, परवलीच्या शब्द असलेल्या चाव्या, कोणत्याही प्रवासी वाहनाची तिकिटे म्हणजेच पास, आणि व्यवहार करण्यासाठी लागणारे पाकीट असे सगळे एकाच फोन मध्ये सामावलेले आहे.
असा हा सर्वगुणसंपन्न फोन जेवढा विधायक आहे तेवढा विघातकही.
पण त्याचा वापर कसा करावा हे ठरवणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे.
हे ज्याला कळले तो आजच्या काळात जिवंत राहण्यास योग्य आहे.
संध्याकाळी शाळा सुटल्यावर, रस्त्यावर, पहिल्या सिग्नलजवळ गाड्या थांबल्या. आमच्यासमोरच एक स्कूल बस उभी होती. सर्व प्राथमिक विभागाची मुले दिसत होती. गाडीत प्रचंड दंगामस्ती चालली होती. साहजिकच माझं लक्ष गेलं. मी कौतुकाने त्यांची दंगामस्ती पाहत होते.
खिडकीजवळ बसलेली एक छोटीशी मुलगी मात्र शांत बसली होती. मी तिच्याकडे बघून हसले, तशी ती पण हसली. माझ्याकडे बघून ती हळूच हात हलवू लागली. मीही हात हलवून तिला प्रतिसाद दिला.
तिला काय वाटलं, कोणास ठाऊक, तिनं एकदम विचारलं, “आण्टी, कहाँ जा रही हो? “
मी म्हटलं, “अपने घर”.
लगेच पुढचा प्रश्न आलाच, “कहाँ हैं आपका घर? “
“अगले सिग्नल के बाजूमे, ” मी उत्तरले.
ती गप्पा मारायच्या मूडमध्ये होती. “आपका नाम क्या हैं? ” तिनं असं विचारताच “गीता” या दोन अक्षरी उत्तराने ती एवढी खुश झालेली दिसली की मला त्याचे आश्चर्य वाटले.
“मेरे माँ का नामभी गीता हैं” या तिच्या उत्तराने त्या आश्चर्याचे कारण कळले.
मी तिला तिचं नाव विचारायच्या आतच सिग्नल चालू झाला. तिची बस पुढे निघाली. दिसेनासे होईपर्यंत तिचा इवला हात खिडकीबाहेर हलताना दिसत होता.
किती छान असतात ना ही छोटी मुलं! तिथे ओळखीची आवश्यकता नसते. एक छोटेसे हास्यही त्यांना दोस्तीसाठी, आपलेसे करण्यासाठी पुरेसे असते.
चार वाक्यांचं आमचं संभाषण, पण त्यात किती आनंद आणि आपलेपणा भरलेला होता, आम्ही दोघी खूप जुन्या मैत्रिणी आहोत असंच वाटलं मला. दिवसभराचा थकवा या छोट्याश्या संभाषणाने कुठच्या कुठे पळून गेला.
एखाद्या मनमोहक सुगंधाची बरसात व्हावी तसं वाटलं मला – एकदम प्रसन्न.
बायका घर कामामध्ये आपल्यापेक्षा नक्कीच खूप पुढे असतात हे नक्की. (म्हणजे, हा माझा अनुभव…)
घर नीट नेटकं ठेवणं, घराला घरपणं देणं, घरच्यांकरता सकाळ दुपार संध्याकाळ खाण्याची व्यवस्था करणं, घरी येणारे जाणारे यांचा पाहुणचार करणं, वगैरे वगैरे.. या सगळ्या फ्रंट घरामधली स्त्री च सांभाळत असते.
आणि आपला सर्वसाधारण असा समज असतो की बायका घर कामात आपल्यापेक्षा नक्कीच पुढे आहेत, पण टेक्निकल कामामध्ये नक्कीच आपल्यापेक्षा मागे आहेत. जसे घरातला गिझर बिघडला, पंखा चालत नाहीये, टीव्हीवर एखादा चॅनल लागत नाहीये, वगैरे वगैरे. कारण अशा गोष्टी दुरुस्त करण्यात बायका सहसा पुढाकार घेत नाहीत.
माझे विचार पण साधारण याच पॅटर्न मधले आहेत. त्यामुळे कुठलीही टेक्निकल संबंधी घरातली अडचण असेल तर बायकोला त्या मधले काहीही समजत नाही असे मी नेहमीच गृहीत धरून चालत असतो. आणि मी ते काम पूर्ण करतो.
पण परवाच्या एका अनुभवावरून माझ्या लक्षात आलं, की बायको टेक्निकल विषयामध्ये पण आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. त्याचं झालं असं –
बायकोला स्कूटर घेऊन संध्याकाळी कुठे बाहेर जायचं होतं. बायकोने बऱ्याच वेळ गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरू होत नव्हती. बायकोने मला हाका मारली. मी बऱ्याच वेळ स्कूटर सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण काही जमेना. कदाचित किक मारून सुरू झाली असती, पण किक मारणं आता आपल्या आवाक्यातले नाही हे मी ओळखून असल्यामुळे, विचार केला उद्या सकाळी मेकॅनिकला फोन करावा..
दुसऱ्या दिवशी सकाळी मेकॅनिकल फोन केला. लगेच मेकॅनिक आले. आणि बऱ्याच वेळ स्टार्ट करायचा प्रयत्न केला पण स्कूटर स्टार्ट होत नव्हती. त्यांनी बऱ्याच किक मारून पण प्रयत्न केला. पण जैसे थे. शेवटी मेकॅनिक म्हणाले : गाडी घेऊन जातो आणि बघतो काय झालंय ते..
आमची पार्किंगची जागा घराच्या बेडरूमच्या खिडकीच्या जवळच आहे. मेकॅनिक आले तेव्हा बायको घरामधे खिडकी जवळच उभी होती. कदाचित मेकॅनिक काय करतात ते बघत असावी.
मेकॅनिक जेव्हा मला म्हणाले, गाडी घेऊन जातो, तेव्हा बायकोने मला हाका मारली आणि म्हणाली, त्यांना सांगा की गाडीचा स्पार्क प्लग बदला. त्यामुळेच प्रॉब्लेम आहे
मी म्हटलं – स्पार्क प्लग का बरं
बायको : कारण काल मी जेव्हा गाडी स्टार्ट करत होते, तेव्हा मधून मधून फटाका वाजल्या सारखा आवाज येत होता. आणि आत्ता मेकॅनिक जेव्हा गाडी स्टार्ट करत होते, तेव्हा पण मधून मधून असाच फटाका फुटल्यासारखा आवाज येत होता. म्हणजे नक्कीच स्पार्क प्लग गेला आहे.
मी बायकोला हो म्हटलं, पण फटाक्या सारखा आवाज आणि स्पार्क प्लग बदलणे, यांचा मला काही त्याचा संदर्भ लागत नव्हता.
त्यामुळे मेकॅनिकला मी स्पार्क प्लग बद्दल काही बोललो नाही. मेकॅनिक नी पार्किंग जवळचं गेट उघडलं आणि गाडी ढकलत ढकलत घेऊन गेले.
तासाभरात मेकॅनिक चा फोन आला.
साहेब गाडी तयार आहे, घेऊन येऊ का?
मी : घेऊन या. गाडीमधे काय प्रॉब्लेम सापडला.
मेकॅनिक : साहेब गाडीचा स्पार्क प्लग खराब झाला होता, तो बदलला. आणि गाडी लगेच सुरू झाली.
मी : किती बिल झालं
मेकॅनिक : शंभर रुपये फक्त.
फोनवरचं बोलणं संपलं. मी बागेत गेलो गुलाबाच्या झाडाला मस्त फुलं लागली होती. एक छान फुल तोडलं, घरात जाऊन बायकोला फुल देत म्हटलं – गाडी दुरुस्त झाली आहे आणि मेकॅनिक गाडी घेऊन येत आहेत.
बायको : आज एकदम प्रेमानी हे फुल कशाबद्दल! स्कूटरला काय प्रॉब्लेम होता
मी : तू सांगितल्याप्रमाणे मी मेकॅनिकला स्पार्क प्लग बद्दल बोललो होतो. मेकॅनिक म्हणाले मी गाडी पूर्ण चेक केली आणि लक्षात आलं की प्रॉब्लेम स्पार्क प्लगचा आहे. तो बदलला आणि गाडी सुरू झाली….
तू प्रॉब्लेम अचूक ओळखला म्हणून तुला हे फूल. आणि मेकॅनिकनी पण प्रॉब्लेम काय आहे ते तू सांगितल्याबद्दल तुला धन्यवाद कळवायला सांगितले आहे.
मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझे ऑफिस दहाला सुरू होत असे. मी क्लार्क आणि सेवक यांचे काम दहा पासून सुरू होत असल्यामुळे आमचं लंच टाईम दुपारी दोन वाजता असे,
ज्यामुळे मुलींच्या मधल्या सुट्टीत मला त्यांच्याकडे लक्ष देणे सोयीचे जाईल. कारण त्यांची सुट्टी तीन वाजता होत असे. साधारणपणे डबा खाणा-या सगळ्या गटांमध्ये फिरून मुली डबा काय आणतात याचे मी निरीक्षण करत असे. बिस्किट, वेफर्स, चुरमुरे असे देणाऱ्या पालकांना मी पत्र देत असे किंवा बोलावून घेत असे आणि विद्यार्थिनींना पोळी भाजीचा डबा द्या असे आवर्जून सांगत असे. त्यांचे वाढीचे वय आहे तेव्हा त्यांना भरपूर आहार मिळाला पाहिजे.
या पद्धतीने मी वेगवेगळ्या गटात हिंडत असताना मग मुली आमचा एक घास घ्या ना बाई, आमचा एक घास घ्या ना, असा आग्रह करीत. त्याप्रमाणे जिच्या डब्यात अगदी साधं काही असायचं तो घास मी घेत असे.
सोलापुरात विशेषतः तेल-चटणी पोळी देण्याची पद्धत आहे. गरीब माणसांचे ते जेवण आहे. त्यामुळे बहुदा बऱ्याच वेळा मी तेल – चटणी पोळीवाला घास घेत असे.
हॉलच्या समोर एक मोठा गट बसलेला होता. पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी होत्या. आणि मी एका मुलीचा एक घास घेतला. तेव्हा मुलीने ओळखले ‘बाई तुम्ही तिची चटणी पोळी आहे म्हणून घेतलं ना, पण तिच्याजवळ अजून एक डबा आहे त्यात जिलबी आहे तो मात्र ती काही काढत नाही.
मी म्हणाले ‘चल असं कुठे असता कां?’ती म्हणाली ‘बाई तिला विचारा तिच्या मांडीखाली एक डबा आहे. आणि ती मुलगी रडायला लागली.
इतक्यात बेल झाली आणि ऑफिसमध्ये मला फोन आला म्हणून बोलावणे आले. मी ऑफिसात गेले एस. एस. सी. बोर्डाचा फोन होता त्यामुळे मी त्या कामात गर्क होते.
मधली सुट्टी झाल्यामुळे मुली वर्गात गेल्या. सगळीकडे शांतता पसरली आणि एक मुलगी माझ्या ऑफिस बाहेर हमसून हमसून रडताना मला तिचा आवाज ऐकू आला.
मी कामात बिझी होते. मी दरवाज्या वरील माझे सेवक शिवा यांना हाक दिली. म्हणाले ‘शिवा काय चाललंय, कोण रडतंय. ’
तेव्हा ते म्हणाले. ‘बाई एक मुलगी तुम्हाला भेटायचं म्हणते आणि खूप रडत आहे. ’
‘ठीक आहे पाठवा. ’ मग तीच ती मुलगी आत आली आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली ‘बाई नाही हो मी तुम्हाला मुद्दाम जिलेबी दिली नाही असं नाही.
मला खरंच वाटायला लागलं. मी म्हणलं ‘काही हरकत नाही. तुला ती जिलबी खायची होती कां?’ मी अगदी सहज म्हणाले आणि ‘अगं जे असेल डब्यात ना ते सगळ्यांनी वाटून खावं बाळा. ’
त्यावर तिने जे उत्तर दिलं ते असं होतं.
ती म्हणाली ‘बाई माझी आई एके ठिकाणी घर कामाला जाते. त्यांच्या घरी आज काही कार्य होते. त्यांनी माझ्या आईला वाढून दिलेले जे ताट होते ते आई घरी घेऊन आली आणि तो दुसरा डबा तिने मला दीड वाजता आणून दिला त्यामध्ये जिलबी होती. पण त्याला भात लागलेला होता. त्यामुळे ते खरकट्या सारखं वाटत होतं. मला वाटलं न जाणं कोणाच्या पानातील असेल तर म्हणून मी ती जिलबी कोणालाच दिली नाही. ’
आणि ती माझ्या कमरेला मिठी मारून अजूनच रडायला लागली. हे ऐकून माझे डोळे भरून आले. इतकेच काय आमचे सेवक शिवाजी कांबळे सुद्धा रडायला लागले. त्यांनी पटकन दार बंद करून पडदा सारखा केला.
मी खुर्चीवरून उठले. त्या मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले ‘बाळा या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण होय. तू खूप शिक आणि तुझ्या आईला सुखी कर. तुला शिक्षणाला जी कुठली मदत लागेल ती सेवा सदन शाळा, व्यक्तिशः मी कधीही करायला तयार आहोत. पण मन लावून अभ्यास कर आणि काही तरी बनण्याची जिद्द ठेव. ’
नंतर तिची समजत घालून मी तिला पाठवून दिले. मला जाणवले की तिला लक्षात येत होते कुणीतरी वाढून दिलेलं ताटातलं अन्न आपण खातो आहोत. एवढ्या कोवळ्या जीवाला हे कळणं फार वाईट होतं. पण परिस्थिती पुढे इलाज नव्हता.
ही गोष्ट माझ्या मनात कुठेतरी खोल रुतून बसली. त्यानंतर सोलापूर आकाशवाणी वरती ‘गाणी मनातली’ या सदरामध्ये अनेक स्त्रियांच्या मुलाखती झाल्या. त्यामध्ये एखादं गाणं लावायचं आणि ते आपल्याला का आवडले त्याच्या मागची घटना, प्रसंग हे सांगणे… असा तो कार्यक्रम होता.
त्याचे प्रसारण रात्री दहा वाजता होत असे त्या कार्यक्रमां मध्ये पाच एक गाणी मी लावली आणि ती गाणी मला कां आवडली असे प्रसंग सांगितले. त्यामध्ये मी हा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर ‘नन्हें मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्या है… ’ हे गाणं लावण्याची मी विनंती केली.
त्या घटनेचा प्रभाव लोकांवर एवढा पडला की रात्री साडे अकरापर्यंत मला लोकांचे फोन येत होते- ‘किती मनाची पकड घेणारा प्रसंग आहे, आम्ही रडलो… ’ असं लोक सांगत होते.
कार्यक्रम खूपच छान झाला होता.
त्यामध्ये साहित्यिक संपादक मा अरविंद जोशी सरांचा फोन आला. ते मला म्हणाले ‘तुम्ही शिक्षक असल्याचा मला आज हेवा वाटला. ’
आणि हे वाक्य माझ्यासाठी त्या कार्यक्रमाचे पावती ठरलं. त्यानंतर या प्रसंगावरती एखादी शॉर्ट फिल्म करावी असे माझ्या डोक्यात होते. सुमारे चौदा-पंधरा वर्षानंतर मी माझ्या एका शिक्षक मित्राला ही गोष्ट ऐकवली. त्यांनी त्याची पटकथा लिहून आणली. शिक्षणाचे महत्व पटवून देणारा एक प्रसंग त्याला जोडला आणि ‘जिलबी’ नावाचा लघु चित्रपट तयार झाला. त्यामध्ये डॉक्टर माननीय निशिगंधा ताई वाड यांनी मुख्याध्यापकाची भूमिका केली. विद्यार्थिनींच्या भूमिका इतर काही मुलींनी केल्या होत्या.
निशिगंधाताईंनी जेव्हा या चित्रपटाची पटकथा ऐकली तेव्हा त्यांचे ही डोळे भरून आले आणि तात्काळ त्यांनी या लघुपटात काम करण्यासाठी संमती दिली होती. या लघुपटाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर हा लघुपट अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये दाखल झाला. त्यात त्याला सहभाग मिळाला आणि त्याला बरीच पारितोषिके मिळाली.
त्यातल्या कथेला पारितोषक मिळालं मुख्याध्यापकाची भूमिका करण्याला निशिगंधाताईंना पारितोषिक मिळालं. विद्यार्थिनीची भूमिका करणाऱ्या मुलीला पारितोषक मिळालं. दिग्दर्शकाला पारितोषिक मिळालं आणि फिल्मला पारितोिषक मिळालं. किमान पाच-सहा ठिकाणी या फिल्मला पारितोषिके प्राप्त झाली. याशिवाय बर्लिन येथील फिल्म फेस्टिवल मध्ये या लघुपटाची निवड झाली. मेलबर्न ला या फिल्मचे स्क्रीनिंग झाले. मुलांच्या भावविश्वातली वेगळी फिल्म म्हणून त्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आले आणि सगळीकडेच या लघुपटला खूप गौरवण्यात आले. वृत्तपत्रांनी याच्यावरती भरभरून लिहिले.
अशा पद्धतीने एका छोट्या प्रसंगाचा हा एवढा मोठा चित्रपट उभा राहिला.
प्रसंग खूप घडत असतात. टिपणारा माणूस हवा. इतके खरे सेवा सदन शाळेच्या प्रांगणात घडणाऱ्या अशा अनेक घटनांनी वक्ता म्हणून माझी अनुभव समृद्धी वाढवली यात शंका नाही.
… आपली लहानपणची परिस्थिती आठवली तरी ही खूप झालं.. माणसाने पूढील आयूष्यात कितीही श्रीमंती आली तरी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवायचे असतात. परिस्थिती बदलते पण लहानपण सदैव आठवत राहात अगदी जीवनाच्या अंतापर्यंत – – –
एक उत्तम संगीतकार, कवी, गायक, विडंबनकार, लेखक, गुरू, इत्यादी विविध पैलू, विविध रंग, व्यक्तिमत्वात असलेल्या देवकाकांना 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या स्मृतिदिनानिमित्त आणि आजच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या शब्दांत मी आदरांजली वाहतेय –
“किती रे तुझे रंग किती रे तुझ्या छाया
दोनच डोळे माझे उत्सव जातो वाया (उतू जाणे)”
१९९५ च्या दरम्यान नाशिकच्या दातार परिवाराने निर्मिलेल्या माझ्या पहिल्या ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ या cd साठी जेव्हा शशी – उषा मेहता (ज्येष्ठ कवयित्री) या दाम्पत्याने काव्यनिवडीसाठी मदत केली. उत्तम दर्जेदार काव्य नि दर्जेदार संगीत असलेल्या कविता माझ्या आवडीने निवडल्या गेल्या. त्यावेळी विंदांची ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, ‘मागू नको सख्या’, ‘अर्धीच रात्र वेडी’, सुरेश भटांची ‘एवढे तरी करून जा’, ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो, ‘ शांताबाई शेळकेंची ‘प्रीती जडली तुझ्यावरी’…. अशा एक से एक सुंदर रचना निवडल्या गेल्या. गंमत म्हणजे सगळ्यांचे संगीतकार – यशवंत देवच होते.
या अलिबाबाच्या गुहेतल्या, रत्नांचा हार परिधान करायचे भाग्य मला मिळाले. वेस्टर्न आऊटडोअर सारख्या अप्रतिम स्टुडिओत ही रेकॉर्डिंग्जस व्हायची. ‘सर्वस्व तुजला वाहूनी…’ गाताना सॅक्सोफोन वादक मनोरीदा, सरोद वादक झरीनबाई दारुवाला अशा दिग्गजांचे प्रत्यक्ष भावपूर्ण सूर कानावर पडल्याने लाइव्ह गाणे गाताना गाणे ही तसेच प्रकट होत असे… प्रत्येक टेक फर्स्ट टेक असे. टेक झाल्यावर मी गाणे ऐकण्यासाठी रेकॉर्डिंग रूम मध्ये गेले… देव साहेबांच्या अश्रुधारा वहात होत्या. त्यांनी मला पाठ थोपटून शाबासकी दिली आणि डोळे पुसत ते म्हणाले, “अत्यंत सुंदर आणि हृदयापासून गायलात पद्मजाबाई! ” माझ्यासाठी हे मोठं बक्षीस होतं.
शब्दप्रधान गायकीत कुठे काय कसे गावे याचे, त्यांनी पुस्तक लिहून अगदी नवोदितांसाठी सुद्धा वस्तुपाठ रचला. गाणे प्रथम मेंदूतून व नंतर गळ्यातून गायले जाते मगच ते सहज उमटते, ही गुरुकिल्ली त्यांनी मला दिली. त्यांची भाषणे ऐकायला आम्ही उत्सुक असू. त्यांची देववाणी प्रासादिक होती. विनोदबुद्धी शेवटपर्यंत तल्लख होती. कायम ते हशा आणि टाळ्या घेत. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. शेवटी मात्र आजारपणात त्यांनी परमेश्वराला त्यांच्याच शब्दांत अशीच हाक घातली असेल…
(– – अशा या खट्याळ बांगड्या… ” वहिनीच्या बांगड्या ” चित्रपटाने मात्रं रड रड रडवलं..) इथून पुढे – –
बायका घराबाहेर पडू लागल्या नि मनगटी घड्याळं वापरू लागल्या तसा बांगड्यांचा रुबाब कमी झाला..
हातभर बांगड्या पाहण्याची सवय असणाऱ्या डोळ्यांना आता एका हातात घड्याळ नि दुसऱ्या हातात एखादी बांगडी दिसू लागली… त्यातही हातभर बांगड्यांसमोर मनगटी घड्याळ घालणाऱ्या महिला होत्याच..
मी नववीत होते.
माझ्या ताईचं लग्न चार-पाच दिवसांवर आलेलं..
“उद्या बांगड्या भरूया.. “.. आई नि दोन्ही काकवांचं बोलणं झालं..
…. तेव्हा बांगड्या भरणं हा विधी असायचा…. इव्हेंट नव्हे…
.. बांगड्या भरणं म्हणजे फक्त बांगड्या भरणं..
कासारणीला आदले दिवशी सांगून ठेवलेलं असायचं. कासारीण ठरलेल्या वेळी बांगड्यांनी भरलेल्या मोठाल्या पिशव्या घेऊन नवऱ्याच्या सायकलवरून यायची… आल्याबरोबर बांगड्यांचा मांड मांडायची.
तिच्यासमोर एक पाट ठेवला जायचा… शेजारी एखादी हुशार चुणचुणीत मुलगी बसायची.. कागद पेन घेऊन.. हिशेबनीस म्हणून… बांगड्या भरलेल्या महिलांची नावं नि त्यापुढे बांगड्यांची संख्या ती लिहायची.
… पहिला मान नवरीचा.. नाहीतर वरमायेचा.. मग करवल्या..
” जा गं मीने.. शेजारच्या विमलाबाई, सुनिताबाई, जोशीणबाई, दामलेकाकू, शेगुणशीबाई, .. सगळ्यांना बोलावून आण.. आणि हो मंजी, सवी, गंगी, कांची.. सगळ्यांना बोलाव बरं का.. आणि शेवी, शिर्मी, नर्मदा, लक्ष्मी यांना विसरू नकोस. “.. काकूचं फर्मान..
बांगड्यांचाच खर्च कसाबसा निभावणारा… खाण्यापिण्याला कुठून पैसे आणायचे?
माझ्या ताईलाही चुडा भरला…. आधीचीच सुंदर ताई त्या पाटल्या-बांगड्या नि हिरव्या चुड्यात दृष्ट लागण्यासारखी दिसत होती..
“आता लग्नाच्या दिवसापर्यंत घराबाहेर पडायचं नाही हं.. लग्नादिवशीच माहेरघरातून बाहेर पडायचं नि लग्न करून सासरघरी प्रवेश करायचा.. “.. आत्या बोलली तशी ताईचे डोळे पाण्याने भरले.. त्याचबरोबर आई, दोन्ही काकू, आक्का नि मी… डोळ्यातलं पाणी आवरेचना..
.. त्या चुड्यानं तिला सासरची करून टाकलं! !
मी बारावी पास झाले..
” चला आपल्याला बाहेर जायचंय.. ”
कुठे, कशासाठी.. कळायच्या आत आमची वरात शिखरे सराफांच्या दुकात पोहोचलीही..
” सोन्याच्या बांगड्या दाखवा हिच्या मापाच्या.. “.. आई-बाबांचा खूप राग आला. डोळे भरून आले.
मुलगी दहावी पास झाली की घड्याळ आणि बारावी पास झाली की सोन्याच्या बांगड्या…
.. ही बारावीची खरेदी म्हणजे लेकीच्या लग्नाची नांदी असे..
सासर-माहेरच्या सगळ्यांसाठी प्रचंड बागड्या खरेदी केल्या.
यथावकाश लेकीचा जन्म झाला.
…. चार-पाच महिन्याचं माझं बाळ रडायला लागलं की माझी आई तिला पायावर घेऊन डोलवायची.
तिची चिमुकली नात एका हातानं तिच्या बांगड्या धरून ठेवायची नि खिदळत जोरजोरानं डोलायची..
” तूही लहानपणी असंच करायचीस.. माझ्या बांगड्यांना घट्ट धरून ठेवायचीस.. पडू नये म्हणून.. ” आईला आठवण यायची..
…. माय-लेकीचा तो सोहळा.. आईच्या त्याच सोन्याच्या बांगड्यांनी पाहिलेला…! !
लेकीसाठी आणलेल्या भरपूर बांगड्या.. निरनिराळ्या रंगांच्या.. वेगवेगळ्या प्रकारच्या…
वर्षभराच्या लेकीनं एकदा अख्खी बांगडी तोंडात घालून घशात अडकवून घेतलेला प्रसंग.. तोंडचं पाणी पळवणारा..
आजही तिच्या कपाटात तिच्या सा-या बांगड्या मोठ्या खोक्यात जपून ठेवलेल्या… बांगड्यांच्या रूपात जपलेलं तिचं बालपणं..
.. आणि त्या आठवणी साठवून ठेवण्याचा माझा अट्टाहास..
वाढत्या लेकीला घेऊन प्रत्येक सुट्टीत माहेरी जाणं व्हायचंच्..
” हे बघ तुझ्या आप्पाने हे सोन्याचे गोट केलेत मला.. ” हातातले नवेकोरे जाडजूड सोन्याचे गोट दाखवत आई बोलली तेंव्हा तिचे डोळे चमकत होते..
… खरंतर सोन्यानाण्याने खूश होणाऱ्यातली ती आजिबातच नव्हती.. लगेचच लक्षात आलं..
हे गोट हा तिच्यासाठी फक्त दागिना नव्हता तर तिनं जन्म दिलेल्या, लहानाचं मोठं केलेल्या तिच्या लेकाच्या यशाचं, कर्तृत्त्वाचं नि आईबद्दलच्या प्रेमाचं, कृतज्ञतेचं ते प्रतीक होतं..
तो तिचा अभिमान होता..
” आई, आजीचे हात बघ किती छान मऊ लागतायत.. ” लेक म्हणाली तसं लक्ष आईच्या हाताकडं गेलं..
सुरकुतलेल्या त्या हातांनी काळजाचा ठोका चुकवला..
हातात फक्त सोन्याचे बिल्वर, पाटल्या नि गोट..
” आई. काचेच्या बांगड्या कुठायत? “
” हल्ली जड होतात गं.. “
पुढच्या वेळेला पाटल्या हातात नसलेल्या… सैल होतात.. हातातून ओघळतात म्हणून..
… पोटात पिळ पडला.. आई कमी कमी होत चाललेली…
” आई पडली.. हात फ्रॅक्चर झालाय.. ऑपरेशन करायचंय.. ” भावाचा फोन..
.. त्या ऑपरेशनने तिच्या सोन्याच्या बांगड्या.. बिल्वरही काढायला लावलेले..
तिनं बाकीचे दागिने वेळोवेळी नवीन करून घेतलेले..
.. पण लग्नातले ते बिल्वर.. शेवटपर्यंत तेच… कधीच न बदललेले.. कधीच हातावेगळे न केलेले..
ऑपरेशनने मात्र दोघांची फाटाफूट केलेली..
कधी न पाहिलेले तिचे ते भुंडे हात..
जीव गलबलून सोडणारे..
महिन्याभरात आई आम्हाला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेली…! !
दोन -तीन महिन्यांनी भाऊ नि वहिनी माझ्याकडे आले.. आईने माझ्यासाठी ठेवलेले तिचे दागिने घेऊन..
जाण्यापूर्वीच तिने तिच्या दागिन्यांचं वाटप तिच्या सुना-मुलींत कसं करायचं ते बाबांना लिहून दिलेलं…
एका रूमालात बांधलेला तो डबा देता-घेताना आम्हा भाऊ-बहिणींना अश्रू आवरता आले नाहीत..
डबा उघडला..
इतर दागिन्यांसोबत आईच्या त्या चार “सोन्याच्या बांगड्या”.. शंकरपाळीच्या डिजाईनच्या..
भाकरीवर शंकरपाळीचं डिजाईन काढणा-या..
झोपताना माझ्या डोक्यावरून हात फिरवणा-या..
डोलताना मला नि माझ्या लेकीला आधार देणा-या…
अन् लहानपणीच्या फोटोसारख्या…
आई सोबत नसतानाही आईची माया देऊन बाळाचं रडणं थांबवणा-या…
मी त्या हातात घातल्या..
.. माझे हात आईचे झाले…! !
इतर दागिने मी बॅंकेच्या लॉकरमधे ठेवते. पण या बांगड्या घरात..
सुख-दु:खाच्या क्षणी त्या हातात घेतल्या की आई भेटल्याचा भास होतो..
डोक्यावरून, पाठीवरून मायेचा हात फिरतो..
मी आश्वस्त होते..
परवा लक्ष्मीपूजनाला आईच्या बांगड्या काढल्या..
” आई, लग्नात मला या बांगड्या देशील? ”
लेकीचा मनापासून प्रश्न..
” अगं पण या किती जुन्या पद्धतीच्या आहेत… तुला नवीन करू आधुनिक प्रकारच्या.. “
” नको.. मला याच दे.. सोन्याच्या दुस-या बांगड्या कुठेही मिळतील.. पण असं शुद्ध सोनं, बावनकशी माया नि आजीचे आशीर्वाद त्यात नसतील.. “
… मला त्या बांगड्यात आईचा प्रसन्न चेहरा नि बांगड्यांनी सजलेले तिचे आशीर्वादाचे हात दिसले…! !
संस्कारांची, विचारांची, भक्कम आधाराची नि मुख्य म्हणजे अस्सल मायेची ही गंगा
” आईच्या बांगड्यां ” मार्फत पिढ्यानुपिढ्या वाहती राहण्याची मला ग्वाही मिळाली..
श्रावण महिन्यातला एक अत्यंत महत्त्वाचा खानदेशी सण म्हणजे बैलपोळा.
बैलपोळा हा सण कृतज्ञता दिन आहे.. आमचे कुटुंब शेतकर्यांचे. त्यामुळे बैलपोळा हा पशुधन पूजेचा दिवस आणि आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा सण. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस.
आता शेतीची तंत्रे बदलली. शेती यांत्रिक झाली असली तरीही शेतकरी आणि बैल यांचं नातं अबाधितच आहे.
श्रावण अमावस्येला बैलपोळ्याचा सण साजरा होतो. श्रावणातला शेवटचा दिवस. त्यादिवशी पिठोरी अमावस्याही असते. हिंदू संस्कृतीतला हा मातृदिनच. माझ्या माहेरी श्रावणातल्या शेवटच्या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येला “पिठोरी अमावस्ये”च्या पूजेचं महत्त्व असायचं.
– – या दिवशी ६४ योगिनींना प्रतिकात्मक रीतीने पूजले जाते. उपजीविकेसाठी उपयुक्त आशा या ६४ कला. घरच्या देव्हाऱ्यात ६४ योगिनी स्थानापन्न झाल्या आहेत असे समजून त्यांची पिठाच्या दिव्यांनी आरती केली जाते. घराचे प्रवेशद्वार, तुळशी वृंदावन आणि ईशान्य व दक्षिण दिशेला हे दिवे ठेवले जातात. आई, मुलांना एकत्रित बसवून ओवाळते आणि या दिव्यांचं “अतिथी कोण” म्हणत वाण देते. या पूजेमुळे पितृदोष दूर होतो, मुलाबाळांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. पितरांचा आशीर्वाद मिळतो अशी भावना आहे आणि याच श्रद्धेनुसार आमच्याकडे पिठोरी अमावस्या साजरी केली जायची. तोपर्यंत मी पोळा या सणाविषयी फक्त पुस्तकातून वाचले होते.
माझे लग्न झाल्यानंतर जेव्हा मी अमळनेरला, आमच्या घरी याच दिवशी साजरा होणारा बैलपोळ्याचा सण अनुभवला तेव्हा त्या सणामागचा आनंदोत्सव नेमका कशासाठी हे कळल्यावर मी खरोखरच भावनात्मकतेने भारावून गेले.
त्यादिवशी प्रामुख्याने माझे दीर ज्यांनी आमच्या शेतीची धुरा अत्यंत मनापासून सांभाळली त्या सुहासदादांचे या मुक्या प्राण्यांशी तसेच शेतमजुरांशी जडलेले नाते पाहून मी तेव्हाही आणि आजही भावनिक होते….. खरं म्हणजे मातृदिन(पिठोरी अमावस्या) आणि बैलपोळा दोन्ही दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याची माध्यमे… ज्या बैलांनी वर्षभर शेतकर्याची सेवाच केली असते त्यांच्या श्रमाचा गौरव, जाणीव म्हणजे बैलपोळा. त्यादिवशी बैलाला सुट्टी. वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी आरामाचा, विश्रांतीचा.
पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकर्यांकडून बैलांना आमंत्रण दिले जाते.
“आज आवतण घ्या, उद्या जेवायला या. ”
पोळ्याच्या दिवशी त्यांना प्रेमाने आंघोळ घालायची. त्यांची शिंगे रंगवायची, गळ्यात घुंगुरमाळा, पाठीवर रंगीबेरंगी, सुरेख कशीदा काढलेली झूल—अशी ही नटलेल्या, सजलेल्या ढवळ्यापवळ्यांची जोडी इतकी गोजीरी दिसते…! घरातल्यासुना, पुरणपोळी, तांदळाच्या खिरीचा रुचकर स्वयंपाक रांधतात. या महत्वाच्या पाहुण्यासाठी.
– – गावात मस्त फेरफटका मारुन संध्याकाळी हे सजलेले बैल घरी आले की सुना, लेकीबाळी त्यांचे औक्षण करतात. कपाळावर गंधाचा टिळा लावतात आणि स्वत:च्या हातानं घास भरवतात. फार ह्रद्य सोहळा असतो हा! शेतकर्यांच्या डोळ्यातला भाव आणि ढवळ्या पवळ्यांची मऊ पाणीदार नजर एकमेकांना भिडते आणि या अलौकिक नात्याचा बंध अधिक घट्ट होतो.
– – thank you आणि you are welcome… असं तर नाही ना म्हणत ते एकमेकांना?
या सणामागेही एक सुंदर कथा गुंफलेली आहे. अंधश्रद्धेचा भाग सोडून दिला तरी या सर्वच पौराणिक कथांमागची कल्पना आणि फँटसी मला आजही आकर्षित करते. साहित्य क्षेत्रात परंपरेनं जपलेलं हे शब्दधन आहे. त्या कथांत गुंफलेली पात्रं, संवाद म्हणजे एक महान कल्पनाविश्व आहे आणि जे नकळत आपलं जीवन आनंददायी करतं… अशीच ही पोळ्याची कथा…
नंदी म्हणजे भगवान शंकर-पार्वतीचे वाहन. नंदी हा शिवभक्त आणि पार्वतीलाही तो प्रिय होता. काही कारणाने, पार्वतीने रागाच्या भरात नंदीला शाप दिला की, ” तुला पृथ्वीवर जाऊन शेतकऱ्यांसोबत कष्ट करावे लागतील आणि तुझ्या माथ्यावर ओझे व्हावे लागेल. ”
नंदीला हा शाप ऐकून धक्का बसला. त्याने पार्वतीची क्षमा मागितली. माता पार्वतीचाही राग नंतर शांत झाला. तिचे हृदय परिवर्तन झाले आणि तिने नंदीला सांत्वन करत सांगितले, ” तुला मी शापमुक्त करते. मात्र तू शेतकऱ्यांचा साथीदार म्हणून कष्ट करशील आणि वर्षातून एकदा शेतकरी तुझी पूजा करतील आणि तुझा सन्मान करतील. त्या दिवशी तुला विश्रांती मिळेल आणि तुझा गौरव होईल, ”
हाच तो पोळ्याचा सण जो कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या दिवशी शेतावर राबणार्या सगळ्या मजुरांनाही जेवणाचे आमंत्रण असते.
माझ्या सासुबाई सर्वांना स्वत:आग्रह करुन वाढायच्या..
“पुरे माई… “
“कारं इतनामंदी कसकाय जालं…? “
असे जेवतानाचे अहिराणी संवाद. अतिशय गोडव्याचे.
ज्यांच्या श्रमानं धान्याची रास रचली, त्यांचा या घासावर खरा अधिकार या भावनेचा हा सण. विशेषत: खेड्यात त्याचे महत्व अधिक असले तरी काही ठिकाणी बाजारातून मातीचे बैल आणून त्यांची प्रतिकात्मक पूजा केली जाते. नैवेद्य दाखवला जातो. बळीराजा हाच अन्नदाता. त्याच्याविषयीची ही उपकृत भावना या सणाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. त्याचबरोबर “बळीराजा सुखी तर राष्ट्र सुखी” ही भावना जपली जाते.
वसुधैव कुटुंबकम्! हे हिंदुधर्माचे तत्व आहे. आणि या कुटुंबात पशु, पक्षी, प्राणी, वृक्षवल्ली, माती, जल, आकाश, तारे सगळ्यांची पूजा होते.
बैलपोळा म्हणजे बैलांची पूजा. ”श्रमिकहो! घ्या इथे विश्रांती. ” हाच त्यातला भाव. हीच त्यांच्या श्रमाला दिलेली भावपूर्ण वंदना…! !
आजकाल शेतीत ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचेही लोण शेतकर्यांच्या जीवनात क्रांती करेल पण तरीही ग्रामीण भागात बैलांचे महत्त्व कायम असेल. महाराष्ट्राच्या शेती संस्कृतीचा आणि ग्रामीण जीवनशैलीचा एक भाग म्हणून पिढ्यानुपिढ्या जपला जाईल.
माझ्या कन्यांच्या एका भारतभेटीत त्यांच्या सुहासकाकाने त्यांना एकेक शुभ्र रंगाची, लाल शिंगांची सुरेख छोटीशी बैलजोडी भेट म्हणून दिली. त्यांनीही ती तितक्याच आत्मीयतेने उरापोटी सांभाळत अमेरिकेला नेली.
– – प्रारूपतेने परंपरेचं लोण असं जपलं जातं हेच खरं!
” बांगड्या “… स्त्रीत्वाचा अविभाज्य भाग.. इतका की पुरुषाला..
” हातात बांगड्या भरल्यास का? ” असं ऐकावं लागावं…! !
बांगड्या घालण्यासाठी फक्त “स्त्रीजातीत जन्मणं “… एवढीच पात्रता..
बांगडीला वय, जात, धर्म, शिक्षण, देश, प्रांत, भाषा, आर्थिक स्थिती, नव-याचं असणं-नसणं.. कशाचाच अडसर नाही. फक्त “गोलाकार” एवढीच व्याख्या..
(खरंतर आता तीही नाही.. चौकोनी, पंचकोनी, षट्कोनी, चांदणी अशा कितीतरी विविध आकारात हल्ली बांगड्या मिळतात..)
बाकी बांगडीला रंगाचं किंवा मटेरियलचं बंधन नाही…
प्लास्टिक, चिकणमाती, लाखे पासून ते थेट लोखंड, स्टील, पितळ, चांदी, सोन्यातल्या… अगदी हिऱ्या माणकांच्या, पाचुंच्याही … एखाद्या राणी किंवा राजकन्यकेच्या हातातल्या… स्वप्नवत्…
काही साध्या… प्लेन.. तर काहींवर मणी, काचा, आरश्यांची सजावट…
असं असलं तरी काचेच्या बांगड्यांची नजाकत वेगळीच…
नाजुकशा किणकिणीनं मंत्रमुग्ध करणारी … सजणाला आवतण देणारी..
काही नशीबवान काचेच्या बांगड्यांना झळाळत्या सोन्याच्या पाटल्या, बिल्वर, तोड्यांची सोबत…
तर काही कष्टणाऱ्या मनगटांत मात्र एकाकी खुळखुळणाऱ्या… कर्तृत्ववान … कामाच्या रगाड्यातही स्वत:चं अस्तित्त्वं जपण्याची कसरत करणा-या..! !
” बांगडी ” हे नाव कसं नि कुठं जन्माला आलं? … मला अजूनही उत्तर न सापडलेला प्रश्न..
हिंदीतली ” चुडी ” नि मराठीतली ” बांगडी “..
शेवटचं ” डी ” सोडलं बाकी साधर्म्य कोणतचं नसलेली..
तशीच इंग्रजीतली ” बॅंगल “…
बांगडीतला ” ब ” घेऊन आलेली.
संस्कृतातील “कंकण ” ला मात्रं आमच्या कामवाल्या शेवी नि शिर्मिनं जपलेलं..
… ” वहिनी, हे बगा, काकणं भरूनशान आलो.. ” दोन दोन डझन बांगड्यांनी सजलेली मनगटं माझ्या आईला दाखवत शेवी नि शिर्मी तोंडभरून हसायच्या…
माझी आई… अगदी टिपिकल पन्नास वर्षांपूर्वीची स्त्री..
.. ” आई ” डोळ्यांसमोर आली की तिच्या गळ्यातलं लांबसर मंगळसूत्रं.. नि बांगड्यांनी सजलेले तिचे हात डोळ्यासमोर येतातच..
सोन्याच्या जडशा पाटल्या.. त्यापुढे दोन-तीन काचेच्या बांगड्या … मग सोन्याचा शंकरपाळीच्या नक्षीचा जाडसर बिल्वर… पुन्हा काचेच्या बांगड्या.. पुन्हा सोन्याचा बिल्वर.. त्यापुढे काचेच्या बांगड्या…
तिच्या गोऱ्यापान हातांत हा चुडा फार सुरेख दिसायचा… लग्नाकार्याला जाताना ती या चुड्यापुढे सोन्याचे तोडे घालायची तेंव्हा एखाद्या लक्ष्मीसारखी दिसायची..
.. ” आई, या एवढ्या बांगड्या घालून तुला काम कसं करता येतं गं? .. ”.. मी लहान असताना आईला विचारायची..
.. ” बाळा, या बांगड्या आदब शिकवतात. काम करताना शांतपणे, आदबशीर करायचं. धसमुसळेपणानं नाही.. काम करताना बांगडीचा आवाजही येता कामा नये.
संसार असाच करायचा असतो.. साऱ्या जबाबदाऱ्या पेलत… आपल्या माणसांना बांगड्यांसारखं एकत्र जपत … न फुटू देता… आणि बांगडीला बांगडी लागली तरी आवाज न होऊ देता… पाहणाऱ्याला फक्त बांगड्यांची शोभा दिसावी … हे गृहिणीचं कौशल्य असतं… “
त्या पोरवयात यातलं काहीच कळलं नाही..
नि
.. मोठं झाल्यावर हे तत्त्वज्ञान काही झेपलं नाही.
– – माझी आईसोबतची आठवण सुरू होते तीच आईच्या बांगड्यांनी..
माझा अगदी लहानपणचा म्हणजे चार पाच महिन्यांची असतानाचा फोटो … नुकती पालथी पडायला लागलेली मी… चिमुकल्या दोन्ही हातांच्या बोटात आईची सोन्याची बांगडी.. तोंडात घातलेली… फोटो काढताना रडायला लागले म्हणून हातात दिलेली… त्या परिचित आईच्या बांगडीनं माझं रडणं थांबलेलं..
कदाचित बांगडीलाच आई समजून…! !
मी चार-पाच वर्षांची असेन..
आई मला घेऊन संध्याकाळी भाजी आणायला जाई.. जाताना मी आईचं बोट धरलेलं असायचं..
परतताना मात्र आईच्या हातात भाजीच्या पिशव्या असायच्या.. मग मी आईच्या बांगड्यांना धरून चालायची..
… त्या बांगड्या मला आधार द्यायच्या..
… झोपताना आईच्या माझ्या डोक्यावरून फिरणा-या हाताबरोबर त्या बांगड्यांचा होणारा मायेचा स्पर्श… कधी कोणी अपमान केला, अपयश आलं तर आईच्या कुशीत शिरून रडताना आईचा पाठीवरून फिरणारा हात.. नि त्याबरोबर बांगड्यांचाही आश्वासक स्पर्श..
पण त्या माऊलीला स्वत:च्या जखमेपेक्षा आमच्या पायांची काळजी..
ती फुटकी बांगडी माय-लेकरांच्या चिरंतन प्रेमाला, मायेला ओसंडवून वाहवणारी…
नागपंचमीला आम्हा बहिणींना बांगड्या भरायला घेऊन जाणारी आई… आमच्या मिरजेतल्या ओगलेंच्या दुकानात..
.. त्या दुकानातल्या अनंत रंगीबेरंगी बांगड्या, कानातली-गळ्यातली, टिकल्या, नेलपॉलिश.. असा मायाबाजार बघून आम्ही बहिणी खुळावून जात असू.. अख्खं दुकान घरी घेऊन जावसं वाटायचं … आमच्या हातात प्लॅस्टिकच्या चमचमत्या जाड बांगड्या चढवल्या जायच्या.
मग आई बसायची बांगड्या भरायला… ओगले काका नाहीतर काकू आईच्या हातातल्या जुन्या बांगड्या एका लोखडाच्या दांडीने मारून फोडायचे. तेव्हा आम्ही दोघी बहिणी डोळे घट्ट मिटून घ्यायचो.. आईला बांगडी लागणार नाही नं? या भीतीनं..
” बांगड्या घट्ट बसणा-या पाहिजेत ” या आईच्या आग्रहास्तव आईचा हात दाबत दाबत बांगड्या भरल्या जायच्या… पुढे कधी त्या काढायची वेळ आली तर साबण लावून काढतानाची कसरत आजही डोळ्यापुढे येते.
ओगले काकांच्या दुकानाची फरशी बांगड्यांच्या तुकड्यांनी भरून गेलेली असायची… त्या तुकड्यातही आमचा जीव गुंतलेला असायचा. काकांच्या परवानगीनं ते तुकडे आम्ही गोळा करून खिशातून घरी आणायचो… मोठा खजिना गवसलेला असायचा. काचेचे ते तुकडे गॅसवर धरून एकमेकांना चिकटवून त्यांचा हार बनवणं, कागदावर चिकटवून नक्षी बनवणं, शोभादर्शकात हे तुकडे घालून त्याची बनलेली नक्षी पाहून आश्चर्यानं थक्क होणं… असे असंख्य प्रकार पुढचे कितीतरी दिवस चालायचे.
नागपंचमीची लालचुटुक मेंदी, नखांचं सुंदरसं नेलपॉलिश आणि मनगटातल्या बांगड्या या त्रयींना सजलेला स्वत:चाच गोरा-गोरा गोंडस हात निरखत बसून खूश होण्यात महिनाभर तरी जायचा..
… नंतर मात्र लिहिताना त्या बांगड्या टोचायला लागायच्या. त्यामुळे त्या शाळेतच काढून दप्तरात ठेवल्या जायच्या … भूमितीतील किंवा चित्रकलेतील वर्तुळे, कंटाळवाण्या तासाला बांगडीत पेन ठेवून फिरवत फिरवत वहीच्या मागच्या पानावर काढलेली नक्षी… काचापाणीचा खेळ… यासाठी त्या बांगडीचा उपयोग व्हायचा..
आमच्या काकूचं माहेर पंढरपुरचं.
ती माहेरी गेली की तिच्या परतीची मी वाट पहात बसायचे..
ती येताना सुरेखशा पंढरपुरी बांगड्या माझ्यासाठी आणायची..
आमची कन्या शाळा..
सहावीत आमच्या एका कडक बाईंनी कुंकु नि बांगड्या कंपलसरी केलेल्या… त्यांच्या तासापुरत्या दप्तरातल्या बांगड्या घालणं … स्वत:कडे नसतील तर मैत्रिणीकडून उसन्या घेणं नि त्या वर्गाबाहेर पडल्याक्षणी बांगड्या काढून दप्तरात ठेवणं.. हा आमचा रोजचा उद्योग..