मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ गाडी जोरात पळवायची असेल तर… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “गाडी जोरात पळवायची असेल तर…☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एका तत्ववेत्त्याने समोर बसलेल्या लोकांना प्रश्न विचारला, ‘ गाडी जोरात पळवायची असेल, फास्ट जायचं असेल तर गाडीला काय असणे गरजेचे आहे…? ‘

एक मुखाने सर्वांनी उत्तर दिलं, ‘ गाडी जोरात पळवायची असेल तर गाडीला ऍक्सिलेटर असणं गरजेचं आहे…! ‘

सर्वांना विचारून झाल्यानंतर हे महोदय हसत म्हणाले, ‘ गाडी जोरात पळवायची असेल, तर गाडीला सर्वप्रथम ब्रेक असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या गाडीला ब्रेक नाही त्या गाडीत तुम्ही बसाल का? तिला चालवायची हिम्मत कराल का? गाडी चालवताना कुठे आणि कधी ब्रेक मारून थांबायचं, हे जर समजलंच नाही तर अपघात ठरलेला..’

किती मोठी गोष्ट यांनी सोप्या भाषेत सांगितली…

आयुष्याचंही असंच नाही का?

आयुष्यात किती जोरात धावायचं…. यापेक्षा कोणत्या दिशेने जायचं आणि नेमकं कुठं थांबायचं… कुठे ब्रेक मारायचा हे कळणं जास्त महत्त्वाचं….!

पुढे पुढे जायचं असेल तर योग्य ठिकाणी ब्रेक मारता यायला हवा, हेच आयुष्याचं अंतिम सत्य….

असो, ज्यांच्या आयुष्याला कायमचा ब्रेक लागला आहे.. ज्यांची गाडीच पुढे जात नाही, अशांसाठी आपल्या मदतीमधून त्यांना केलेल्या मदतीचा हा लेखाजोखा…

ऑगस्ट महिना प्रचंड गडबडीत गेला…

ट्रेनिंग सेंटर मध्ये तयार होणारे लिक्विड वॉश, गिफ्ट आर्टिकल, आणखीही विविध वस्तू विक्री करणे, बाहेरगावच्या ऑर्डर घेणे, त्यांनी सांगितलेले पत्ते टाईप करणे, प्रिंट काढणे, पाकिटे तयार करणे आणि कुरिअर करणे…

या सर्व कामांसाठी आमच्याकडे कोणीही माणूस नाही, ही सर्व कामे मला आणि मनीषालाच करावी लागतात.

15 ऑगस्ट रोजी विविध संस्थांनी झेंडावंदनासाठी बोलावले होते, इथे झालेल्या छोटेखानी भाषणात ‘ भीक मागणाऱ्या लोकांना भीक देऊ नका, त्यांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेऊन त्यांना स्वावलंबी बनवा,’  असे सांगून सर्व ठिकाणी प्रॉडक्ट दाखवत हिंडलो….

त्यात गणपती आले, आणि या उत्सवासाठी लागणाऱ्या विविध वस्तू आपल्या लोकांनी तयार केल्या.

‘आपल्या मंडळासमोर आम्हाला विक्रीसाठी एक स्टॉल द्या’ असे गणेश मंडळांना आवाहन केले…

अनेक गणेश मंडळांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला….

खरंतर याची मूळ कल्पना, ‘मुरुडकर झेंडेवाले’ चे करता-करविता  श्री गिरीश मुरुडकर सर यांची, मी ऋणी आहे त्यांचा!

मग आमच्या ह्या दिव्यांग आणि वृद्ध लोकांना अशा विविध मंडळांकडे रोज घेऊन जाणे, आणून सोडणे, रोजच्या रोज विक्रीचे सामान पोहोचवून देणे, हिशोब ठेवणे, त्यांना गर्दीत काही होऊ नये याची काळजी घेणे…

आमची प्रचंड दमछाक झाली…!

आज आत्ता हा लेखाजोखा लिहिताना रात्र संपून पहाटेचे पाच कधी वाजून गेलेत कळलं नाही….!

.. हरकत नाही, यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक भिक्षेकऱ्यांना, माणूस म्हणून स्वातंत्र्य मिळाले, यातच आनंद आहे…!

” भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी ” ही डोळ्यासमोर घडणारी प्रोसेस पाहून जो आनंद होतो, तो वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत.

…… ‘ सुरवंटाचं फुलपाखरू होणं,’  ही प्रोसेस आम्ही शब्दशः  बघतो आणि जगतो सुद्धा…!

रक्षाबंधनाच्या दिवशी आणि त्यानंतर सुद्धा अनेक दिवस जिथे भेटू तिथे रस्त्यावर आमचे रक्षाबंधन पुढे अनेक दिवस चालूच होते…

…. कुणी सुतळी बांधली, कुणी दोरा, तर कुणी चिंधी…

दोन्ही हात भरून जायचे… आणि मनही…!

बाजारात मिळते तशी एकही आकर्षक राखी माझ्या दोन्ही हातांवर नव्हती…  पण वरवर ओबडधोबड दिसणाऱ्या, अनेक सुरकुतलेल्या हातांनी माझ्या लोकांनी बांधलेल्या या राख्या जगातल्या सर्वात सुंदर राख्या होत्या…!

….  ‘काय ओवाळणी देऊ मी तुम्हाला?’ मी विचारलं, तेव्हा एक आजी कमरेवर हात ठेवून टेचात म्हणाली, ‘काय देशील तू बोल?’

यावर खरंतर मी निरुत्तर झालो… यांना द्यायला माझ्याकडे आहेच काय…???

जे काही देतो आहे ते समाज…. म्हणजे आपण सर्व…!!!  मी फक्त पोहोचवण्याचे काम करतो आहे…

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या सर्वांच्या माध्यमातून तीन ताईंना व्यवसाय सुरू करून दिला… चार मुलींच्या थकलेल्या फिया भरून झाल्या…

… रक्षाबंधन खऱ्या अर्थाने साजरे झाले…!

या सर्वांबरोबरच रस्त्यावर वैद्यकीय तपासणी, हॉस्पिटलमध्ये रुग्ण ऍडमिट करणे, हॉस्पिटलमधील गोरगरीब रुग्णांना जेवणाचे डबे देणे, दिव्यांग व्यक्तींना कुबड्या – काठ्या तथा इतर वैद्यकीय साधने देणे, डोळ्यांच्या तपासणी करून डोळ्यांचे ऑपरेशन करणे, खराटा फलटणच्या माध्यमातून रस्त्यावर झाड लोट करणाऱ्या मंडळींना किराणा देणे, या आणि अशा अनेक बाबी सुरूच होत्या…!

आपल्या सर्वांच्या साथीने हे सुरू केलं आहे माऊली.. माझा प्रणाम स्वीकार करावा.

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिकवण… लेखिका : श्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

?

☆ शिकवण… लेखिका : श्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

मी लहान असल्यापासून लक्ष्मीबाई आमच्याकडे स्वयंपाकाला होत्या. त्यांचं वय किती होतं मला आठवत नाही पण आम्ही त्यांना आजी म्हणायचो. आजींच्या हाताला चव होती. तलम रेशमासारख्या गरम पोळ्या आणि दाणे, लसूण घालून त्यांनी केलेली आंबाडीची भाजी अमृतासारखी लागायची. शिरा, खीर, लाडू, वड्या, चिवडा, मसालेभात, रस्सा वगैरे करण्यात त्यांचा कोणी हात धरत नसे.

छोटा आंबाडा आणि नऊवारी लुगडं नेसणाऱ्या आजीना कधी हसताना बघितल्याचे आठवत नाही. हसणं तर जाऊदेच पण त्या कायम चिडलेल्या असत. काही बोलायला गेलं की अंगावर खेकसल्यासारख्या बोलत. आईशी त्यातल्या त्यात बऱ्या बोलत. आई त्यांना रोज सकाळी काय स्वयंपाक करायचा सांगत असे पण आजीनी कधी नीट हो म्हटल्याचे आठवत नाही. न बोलता त्या कामाला लागत. मला त्याच्याशी बोलायची भीतीच वाटत असे.

मी थोडी मोठी झाले तेव्हा आजींची एक गोष्ट मला खटकू लागली. आईने दहा पोळ्या करा म्हटलं की आजी १५ पोळ्या करायच्या. १५ लाडू करा म्डटलं की २०-२२ लाडू करायचे आणि जास्तीचे केलेले पदार्थ त्या गुपचुप घेऊन जायच्या. एकदा मी त्यांना पाच पोळ्या त्यांच्या नऊवारी लुगड्याच्या ओच्यात लपवताना बघितलं आणि आईला जाऊन सांगितलं.

मला वाटलं की आईला धक्का बसेल पण आईला यात नवीन काहीच नव्हतं. ती म्हणाली, “हो त्या जे करतील त्यातलं थोडं घरी नेतात हे मला माहित आहे.”

“अग ही चोरी नाही का? तू विचार ना त्यांना! त्यांनी मागितलं तर अन्न तू देशीलच ना? मग चोरी का करायची?” मी तडकून विचारलं.

आई म्हणाली,” नको विचारायला. त्यांना फार वाईट वाटेल. ६५ वर्ष वय आहे त्यांचे. आणि माणूस जेव्हा अन्नाची चोरी करतो ना तेव्हा ती त्याची गरज असते.”

एरवी राजा हरीश्चंद्र अंगात येणारी माझी आई अशी कशी बोलू शकते हे मला कळेना. मी लहानपणी माझ्या मैत्रीणीकडून दोन गोट्या तिला न सांगता घरी आणल्या होत्या. आईने रात्री दहा वाजता तिच्या लक्षात येताच गाढ झोपलेल्या मला उठवून त्या गोट्या परत देऊन ये म्हणून मैत्रीणीच्या घरी पाठवलं होतं. तिच आई आजींचं चोरी करणं काही न झाल्यासारखी बघत होती. मला काही उलगडत नव्हतं.

मी दहावी पास झाल्यावर काही ठिकाणी पेढे द्यायला गेले होते. मनात आलं आजींकडे डोकवावं. म्हणून मी त्यांचे घर शोधत तिथे गेले. आजी मला बघून चमकल्या. “ये की ग आत!” म्हणाल्या. मी पेढे दिले. आमच्या घरातील न सापडणारा गड्डू तिथे टेबलावर ठेवलेला दिसला.

आजींच्या चेहऱ्यावरचा राग त्या दिवशी शरमेत बदलला होता.

आजीनी लहानसं घर छान ठेवलं होतं. मला रव्याचा लाडू दिला व माझं कौतुक केलं. नंतर माझ्या नजरेला नजर न देता आजी म्हणाल्या, “तुझ्या आईचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. माझे लहानपणी खाण्याचे फार हाल झाले. तेव्हापासून अन्न दिसलं की थोडं घरी घेऊन यायची सवय लागली. वाटायचं घरात काहीच नसेल तर लेकरांना काय खाऊ घालायचं? म्हणून मी तुमच्याकडून काहीतरी जिन्नस घरी घेऊन येऊ लागले. आधीच्या नोकऱ्या केल्या तिथे हा माझा “गुण” त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. तुझ्या आईने मात्र बघितलं पण मला कधीही एका शब्दानं विचारलं नाही. रात्र रात्र ज्यांनी अन्नाशिवाय तळमळत काढली ना ते हाल परत नशिबी नकोत असं वाटायचं. पण हातून पाप घडलं हे कबूल करते.

त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून माझ्या गळ्यात घातली. ही माझी भेट तुझ्या दहावीच्या निकालाची. नाही म्हणू नको.”

“आई तुझी भारी हूशार बघ. मला त्या मानसोपचार करणाऱ्या तुझ्या बाबांच्या डॅाक्टर मित्राकडे, डॅा. रॅाय कडे तिनं नोकरी लावून दिली. ते डाक्टर आता माझ्यावर उपचार करतात. मला उपचाराची जरूर आहे.” आजीने डोळे पुसले.

मला सोन्याची साखळी घ्यायची नव्हती पण आजी ऐकेनात.

त्या म्हणाल्या,”क्लेप्टोमॅनिया का त्याच्यासारखे कायतरी आहे हे असं म्हणतात. ते डाक्टर पण पैसे घेत नाहीत. कसे फेडू मी तुझ्या आईचे उपकार? कधी एका शब्दाने वहिनी बोलल्या नाहीत मला.”

मी घरी आले व आईला साखळी दाखवली. आई म्हणाली, “आण ती इकडे. मी जपून ठेवते. आजींना कशी परत करायची बघेन मी.”

मी कौतुकाने आईकडे बघितलं. चोरी करणाऱ्या नोकरमाणसाला काढून टाकणारे बरेच असतात. पण आईने आजींचा संसार उध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना डॅा. रॅाय कडे त्यांना नोकरी लावून दिली व डॅाक्टरना आजीबद्दल काय करता येईल ते विचारलं. कुठेही वाच्यता न करता! आजी आमच्या घरचं काम झालं की डॉ. रॉय कडे जात असत.

आई, तू किती चांगली आहेस ग! म्हणत मी आईला मिठी मारली. आई माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली,” तुला त्या दिवशी वाटलं ना की आई कडे डबल स्टँडर्ड कसं…

कुणाला आवडतं का चोरी करायला? ती सुध्दा अन्नाची! मी त्यांना सरळ विचारू शकले असते पण मला वाटून गेलं की आधी एकदा डॅा. रॅाय ना विचारावं. बाबांचंही हेच मत होतं.

“अपराध्याला काही न बोलता माफी करणं ही पण एका प्रकारची शिक्षाच आहे बघ.” मी चमकून आईकडे बघितले.

“आजी सतत चिडचिड का करायच्या? कदाचित आपण जे करतो त्याचा त्यांना राग येत असेल असं मला वाटतय. एखादी सवय अशी असते की आपले चुकतंय माहित असूनही ते बदलता येत नाही.. अगदी दारू पिणाऱ्या माणसासारखे! म्हणून तर त्याला व्यसन म्हणायचं. ” आई म्हणाली.

“मग आई या चेनचं काय करणार आहेस?” मी कुतूहलाने विचारलं.

आईने क्षणभर विचार केला व ती म्हणाली, “त्यांना त्यांच्या चुकीची भरपाई करण्याची एक संधी तुला चेन देऊन मिळाली. त्याचा त्यांना आनंद मिळू दे. डॅाक्टर म्हणाले आहेत की behaviuor therapy चा आजींना खूप उपयोग होत आहे. एकदा त्याची ट्रीटमेंट संपली व ही सवय मोडली की त्याचे कौतुक म्हणून आपण हीच चेन त्यांच्या गळ्यात घालू.”

मी आईकडे अभिमानाने बघितलं. १० वर्षाच्या मला गोट्या परत करण्यासाठी झोपलेली उठवणं जेवढे महत्वाचं होतं तेवढच आजींना माफ करणं महत्वाचं होतं. त्यामुळे चोर हा शिक्का बसून एक व्यक्ती आयुष्यातून उठली नाही. माफी मध्ये पण शिक्षा असते कारण त्या व्यक्तीला आपल्या चुकीसाठी माणसे ओरडणार ही अपेक्षा असते. ते घडले नाही तर अजूनच अपराधी वाटत असावे हे मला हळूहळू कळू लागलं.

मी आईला घट्ट मिठी मारली! “आई ग तू डॅाक्टरांएवढीच उत्तम मानसोपचार तज्ञ आहेस ग!”

आईने दिलेले ही शिकवण मला आयुष्यभर उपयोगी पडत आहे. एखाद्या व्यक्तीला नावं ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा आजवरचा प्रवास कसा आहे हे बघायला मी शिकले आहे. बाहेरून दिसणारे एखादे आयुष्य हिमनगाच्या टोकासारखं असते. आत लपलेले बरच काही आपल्याला सहजी दिसत नाही..

Before you judge someone, at least walk a mile in his shoes म्हणतात ते उगीच नाही!

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती :  सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोसळणारा पाऊस… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ कोसळणारा पाऊस… ☆ श्री मंगेश मधुकर

साल १९८६……

पावसाळ्याचे दिवस, मी सातवीत असतानाची गोष्ट. संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी न जाता ग्राऊंडवर खेळत होतो. ढग दाटून आल्याचं खेळण्याच्या नादात लक्षातच आलं नाही. शिपाईमामा ओरडल्यावर निघालो. काही वेळातच धो धो पावसाला सुरवात झाली. एका दुकानाच्या शेडमध्ये उभा राहिलो. दोन तीन लोक आधीपासून होतेच. पावसाचं आक्राळविक्राळ रूप पहिल्यांदाच बघत होतो. सुरुवातीला भारी वाटलं परंतु वीजांचा कडकडाट, लाईट गेलेले, सगळीकडे अंधार झाल्यावर घाबरलो. बराच वेळ झाला तरी पाऊस पडतच होता. मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. खूप रडू येत होतं पण कसबसं आवरलं, कारण आजूबाजूला सगळे अनोळखी. रस्त्यावरसुद्धा फार गर्दी नव्हती. धीर सुटत चाललेला.

’ काय व्हायचं ते होऊ दे, पण थांबण्यापेक्षा भिजत जाऊ ’ असं सारखं वाटायचं पण हिंमत होत नव्हती. सडकून भूक लागलेली. शेवटी कसंबसं रोखून धरलेलं रडू फुटलंच. हमसून हमसून रडायला लागलो तेव्हा सोबतच्या लोकांनी पाठीवरून हात फिरवत धीर दिला. इतक्यात…………

… माझ्या नावाची नेहमीची हाक ऐकायला आली. कान टवकारले तर आवाज ओळखीचा वाटला. शर्टाच्या बाहीनं डोळे पुसून अंधारात आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर समोर गुडघ्यापर्यंत दुमडलेली पॅन्ट, शर्ट, एका हातात जुनी छत्री अन दुसऱ्या हातात स्टीलची मोठी बॅटरीच्या प्रकाशात आडोशाला थांबलेल्या प्रत्येकाकडं कावऱ्याबावऱ्या नजरेनं पाहणारे ‘नाना’ दिसले. जीव भांड्यात पडणं ही शाळेत शिकवलेली ‘म्हण’ पुरेपूर अनुभवली. “ नाना, नाना ” मोठयानं ओरडत पावसाची पर्वा न करता नानांच्या दिशेने धावत गेलो आणि घट्ट बिलगून जोरजोरात हमसून हमसून रडायला लागलो. नानांनी उचलून कवटाळलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं.

“ नाना, तुम्ही रडताय ”

“ नाही रे. पावसाचं पाणी तोंडवर उडलयं ”.. नानांनी तोंड फिरवून डोळे पुसलेले पाहिलं पण गप्प बसलो. घरी जाताना पाऊस होताच परंतु आता भीती वाटत नव्हती, कारण खांद्यावर दफ्तर एका हातात छत्री, बॅटरी असलेला हात मी घट्ट पकडलेला.. असे ‘नाना’ सोबत होते. हिमालयासारखा भक्कम आधार असल्यानं काही वेळापूर्वी भीतीदायक वाटणारा पाऊस आता भारी वाटत होता.

—- 

साल २०२3 

पावसाळ्याचे दिवस … संध्याकाळी पाच वाजताच आभाळ भरून आल्यानं लवकर अंधारलं. घाईघाईत ऑफीसमधून निघालो, तितक्यात धो धो कोसळायला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासोबत पावसाचा जोर वाढत होता. लगेच ट्राफिक जाम, जागोजागी पाणी साठलं मग नेहमीप्रमाणे …… चीड, संताप, वैताग, हतबलता अशा भावना मनात येऊन नंतर सवयीनं शांत झालो. इंच इंच गाडी दामटत तब्बल दीड तासानं घरी पोचलो. सगळीकडे अंधार होता. अंगात रेनसुट असूनही ओला झालोच. मला पाहून बायको प्रसन्न हसली.

“देवाची कृपा!! सुखरूप आलात”

“काय भयानक पाऊस आहे. ”

“हो ना. तुम्ही येईपर्यंत जीवात जीव नव्हता. पाऊस अन त्यात हा अंधार, फार भीती वाटत होती.”

“नाना आणि चिरंजीव कुठयंत ”

“नाना रोजच्याप्रमाणे फिरायला गेलेत आणि लेकाचा फोन आला होता दहा मिनिटात घरी येतोय.”

“एवढ्या पावसात फिरायला?? ”

“ते बाहेर पडले तेव्हा पाऊस नव्हता. सारखा फोन करतेय पण उचलत नाहीत. ”

“छत्री?? ”

“नाही नेली. मी सांगितलं, जाऊ नका, तरीही बाहेर पडले. ” 

“त्यांना घेऊन येतो. छत्री दे”

“आधी घरात या. कपडे बदला तोपर्यंत मी चहा करते. मग जा”

“नको. जवळच कुठेतरी असतील आधी त्यांना घेऊन येतो मग निवांत चहा!!! ” 

अंगात रेनकोट असूनही छत्री घेऊन चालतच बाहेर पडलो. सोसायटीत, रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य होतं….. ‘ काही गरज नव्हती. एक दिवस घरात बसले असते तर काही बिघडलं नसतं पण ऐकायचं नाही ’ स्वतःशीच चडफडलो.

मोबाईल टॉर्चमध्ये आडोशाला थांबलेल्यामध्ये शोधत होतो पण नाना दिसले नाहीत. फोन केला तर उचलला नाही. चक्क कॉल कनेक्ट झाला.

“ नाना, नाना मी बोलतोय. कुठे आहात ”.. काहीच प्रतिसाद नाही. मी ‘हॅलो, हॅलो’ करत असतानाच फोन कट झाला. पुन्हा कॉल केला. नुसतीच रिंग वाजत होती. काहीवेळानं उभा असलेला प्रत्येक माणूस नानांसारखाच वाटायला लागला. जवळ जाऊन पहायचं, खात्री पटली की पुढे जायचं, असं करत करत घरापासून दोन चौक पुढे आलो पण…. मनातली धाकधूक वाढली. सत्तरी पार केलेले नाना कुठं असतील, कसे असतील, काय करत असतील,.. ‘मन चिंती ते वैरी ना चिंती’ हेच खरं.

पुढे असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये चारपाच जण उभे होते. जवळ जाऊन पाहीलं पण पुन्हा निराशा. पुढे निघालो. पुन्हा फोन केला अन मागे असलेल्या दुकानाच्या बाजूनं ओळखीची रिंगटोन ऐकायला आली. जोरजोरात “नाना, नाना” अशा हाका मारायला लागलो. तेव्हा तिथल्या माणसांमध्ये हालचाल जाणवली. सर्वात मागे उभे असलेले नाना सावकाश पावलं टाकत पुढे आले. भीतीमुळे हात थरथरत होते. डोळे किलकिले करून ते अंदाज घेत होते. अंधारामुळे मला ओळखलं नाही. त्यांना सुखरूप पाहून अतिप्रचंड आनंद झाला.

“नाना!!! ” म्हणत मिठी मारली तेव्हा त्यांनी घट्ट पकडलं. त्यावरून मन:स्थितीचा अंदाज आला. खांद्यावर डोकं ठेवल्यावर दिलेले हुंदके जाणवले, तेव्हा मीसुद्धा डोळ्यातलं पाणी रोखू शकलो नाही.

“चला” पुढे केलेला हात त्यांनी घट्ट पकडला आणि काठी टेकवत चालू लागले.

“मी आहे काळजी नको” 

“आजकाही खरं नव्हतं. मी तर आशा सोडली होती. वाटलं की आता…… ” कापऱ्या आवाजात नाना म्हणाले.

“नका टेंशन घेऊ. फोन का घेतला नाही”

“कसा घेणार, गडबडीत चष्मा फुटला. नीट दिसत नव्हतं. त्यात अंधार, एकदोनदा घेतला तर आवाज आला नाही म्हणून.. खरं सांगू खूप घाबरलो होतो. देवासारखा धावून आलास. ”

“आठवतं… माझ्यासाठी तुम्हीपण असंच शोधत आला होता. ” नाना फक्त हसले…..

…. घरी जाताना मोबाईल वाजायला लागला मी दुर्लक्ष केलं. एका हातात छत्री अन दुसरा हात नानांनी पकडलेला.

काळासोबत आम्हां बापलेकाच्या आयुष्यातल्या जागा, भूमिका आणि जबाबदाऱ्या सगळं सगळं बदललं. फक्त एक गोष्ट कायम होती ती म्हणजे कोसळणारा पाऊस. आमच्या बदलत्या नात्याचा साक्षीदार…..

सोसायटीत पोचलो तेव्हा समोरून छत्री घेऊन येणारे चिरंजीव भेटले….

“बाबा, फोन का रिसिव्ह करत नाही”

“पाऊस होता म्हणून… ”

“आईनं सगळा प्रकार सांगितला. तुम्ही दोघंही बाहेर, त्यात फोन उचलत नाही, मग शोधायला निघालो”.

नाना आणि मी एकमेकांकडे पाहून हसलो तेव्हाच लाईट आले. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला त्यात कोसळणारा पाऊस फारच सुंदर दिसत होता.

 —-

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ Acceptance in adversity… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ Acceptance in adversity… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

*Acceptance in adversity * is the best medicine. * 

पुढच्या आठवड्यात महालक्ष्मी पूजनाचा तीन दिवसांचा उत्सव सुरू होणार आहे.

आमच्या देशमुखांच्या घरी तर हा वर्षाचा सर्वात महत्वाचा उत्सव असतो. म्हणजे दिवाळी चा सण सुद्धा नंबर दोन वर येतो. देशस्थांचा हा सण म्हणजे लय भारी.

सर्व अगदी साग्रसंगीत स्वयंपाक, फुलोरा, पूजा, डेकोरेशन, अगदी प्रसन्न वाटत घरात. अगदी लगबग असते दोन चार दिवस.. ••••

दरवर्षी नवीन साड्या, दागिने घालून महालक्ष्मी अगदी सजलेल्या असतात. आजच्या काळातही वीस पंचवीस जण जेवायला असतातच.. •••

सासूबाई आणि त्यांची असिस्टंट म्हणजे सूनबाई नेहा मिळून सर्व व्यवस्थित वेळेवर पार पाडतात. सर्व advance mangement असत. घरचे पुरुष ही मदतीला असतातच. सर्वांची काम वाटलेली असतात. •••

खरतर नेहा माहेरची नेहा चितळे म्हणजे कोकणस्थ, पण लग्नानंतर सर्व व्यवस्थित करते. ••••

लग्नाआधी देशमुखांनी तिला त्यांच्या घरच्या सणावारांची कल्पना दिली होती. आणि एकुलती एक सून म्हणजे नेहालाच सर्व करायचे आहे. हेही तिला सागीतले होते.

नेहाच्या सासूबाईंचा उत्साह अगदी दांडगा आहे. सर्व हौशेने करतात. •••

देशमुखांकडे सगळेच सण असल्यामुळे त्यावेळी घरच्या ज्येष्ठांनी तीन भावांमध्ये सणांची वाटणी करून दिली. उद्देश्य हा होता की त्यानिमित्ताने सर्व एकत्र येतील. व कोणावरही जास्त जबाबदारी पडणार नाही. पूढचा सर्व विचार करूनच हे सर्व ठरल. ••••

आज पंचावन वर्षे झाली, महालक्ष्मी सण देशमुख आजी अगदी आनंदाने, हौशीने, श्रद्धेने करतात. ••••

यावर्षी मात्र अनेक प्रश्न समोर‌ आहेत. अजय नोकरीच्या कामाने अमेरिकेत आहे. नेहाची नेमकी तीन दिवस महत्वाची मिटींग आहे. देशमुख आजींच्या पायाला दुखापत झाली आहे. आता वय पण पंच्याहत्तर च्या वर आहे.

देशमुख आजोबा मदत करायला तयार असतात. , लाडू वळायला. पुरण घोटायला, भाज्या निवडायला मी तयार आहे. पण कोणाच्या तरी देखरेखीखाली मी ते करेन. अस म्हणतात. ••••

आज नेहाने विचारले, ••• 

आई!! या वर्षी कस करायच?? मी सुट्टीचा प्रयत्न केला. मिटींगच्या तारखा पूढे ढकलायचा प्रयत्नही केला पण जमलं नाही.

आता पूढच्या आठवड्यात मी सकाळी ९ ते ८ बिझी असणार आहे. •••

आई म्हणाल्या, ••• अग!! ठीक आहे! मी पण नोकरी केली आहे. नोकरीचे प्रश्न मी समजू शकते. आपण काही तरी उपाय नक्कीच काढू. ••••

मी कालच चौकशी केली. शेजारच्या कुलकर्णी काकूंकडे तर मागच्या चार वर्षांपासून कोणी करणारे नाहीत. त्यांच्या घरी पण आपल्या सारख्याच उभ्या महालक्ष्मी असतात. •••

 त्या पूजेची तयारी करतात. महालक्ष्मी बसवायला, त्यांच्या साड्या नेसायला, दाग दागिने घालायला देशपांडयाची पल्लवी त्यांना मदत करायला जाते. •••

नैवेद्याचे चार बेसन लाडू त्या घरी करतात. अगदी थोडा आवश्यक तेवढा स्वयंपाक करून नैवेद्य तयार करतात. बाकी सर्व जेवणाची आॅर्डर देतात. •••

अग!! पुण्यात सर्व सोई आहेत. आणि पूजेचे महत्व समजून सर्व व्यवस्थित करणारे बरेच जण आहेत येथे. जोपर्यंत जमत तोपर्यंत सर्व साग्रसंगीत कराव. तो आनंद वेगळाच असतो. पण काही अडचणी आल्या तर adjustment करायलाच पाहिजे. •••

आता तुम्ही अमेरीकन कंपनीत काम करणार, त्यांना कदाचित गणपती बाप्पा माहीत ही असतील, पण आपल्या महालक्ष्मी पूजनाचे काय माहित असणार? •••

आजोबा म्हणाले, •••

अगदी बरोबर!!

आता घरच्या लक्ष्मींच्या अडचणी न समजता, त्यांना त्रास देऊन आपण महालक्ष्मींचा थाटमाट केला तर त्याचे पुण्य लाभेल का? •••

काही हरकत नाही नेहा.

अग!! देवाला सर्व कळत.. आपण फुलोरा म्हणजे करंज्या, लाडू, पात्या ची आॅर्डर देऊया. जेवणाचही तसच करूया.

सर्वांना नेहमी प्रमाणेच आमंत्रण दया. •••

सकाळी अजयचा फोन आला, तेंव्हा आजोबांनी त्याला येथील परिस्थिती व त्यावर काढलेला उपाय सांगितला.

अजयलाही मान्य होता. •••

 नेहाने फोन करून गुरुजींना सांगितले. सर्वांना आमंत्रण दिले. सौ. देशपांडे यांना फुलोरा, जेवणाची आॅर्डर दिली. या पुजेचे काही वैशिष्ट्ये असतात. म्हणजे ज्वारी पिठाची आंबिल, पडवळ टाकून कढी, सांज्याची पोळी पण लागतेच. सोळा भाज्यांची एक भाजी, इतर दोन तीन भाज्या, पाच प्रकारची भजी, कोशिंबीरी, मिक्स डाळीचे वडे. पुरण पोळी, सांज्याची पोळी तर महाप्रसादात असतेच. तिने सर्व व्यवस्थित सांगितले, व्हाट्सअप वर डिटेल्ड मेसेज ही केला. वेळ सांगितली. आदल्या दिवशी आठवण करून दिली.

संध्याकाळी बायका दर्शनाला येतात हळदीकुंकू समारंभ असतोच. जमेल तेवढी काम केली. बायकांना द्यायला लाडू चिवडा चा आॅर्डर दिला. पेपर प्लेट्स, ग्लासेस आणून ठेवले. मावशींच्या मदतीने येणाऱ्या मंडळीची बसायची सोय केली. घरातील आवरासावर केली. पूजेची तयारी करून ठेवली. नवीन दोन साडयाही काढून ठेवल्या. •••

नेहाच्या इतर जावा मदतीला आल्या होत्या.

सर्व अगदी मजेत, आनंदात, प्रसन्न वातावरणात पार पडल. •••

महालक्ष्मी पूजन अगदी व्यवस्थित पार पडल. नेहाची मिटिंग पण झाली. येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य ही छान झाले.

एकमेकांच्या अडचणी समजून, त्यातून सहज मार्ग काढला. एकमेकांच्या भा्वनांचा विचार केला. आणि मार्ग मिळाला.

म्हणतात ना, •••

भाषेचा अनुवाद होऊ शकतो, पण भावनाचा नाही. त्या समजूनच घ्याव्या लागतात.

*समजूतदार पणाचा अभाव असेल तर मात्र अगदी छोटस कारणही पुरेस असत घरात वादविवाद व्हायला. •••*

जेंव्हा घरचे जेष्ठ नवीन पिढीच्या समस्या समजून घेतात. तेंव्हा प्रसन्न वातावरणात सर्व गोष्टी, मग तो रोजचा दैनंदिन व्यवहार असो नाही तर एखादा समारंभ असो, सहज होतात. या बरोबरच सर्वांना एकमेकांबद्दल आदर आपूलकी वाढते. ••• आपापसातील बॉन्ड मजबूत होतो. •••

घरातील परंपरा, सण साजरे केलेच पाहिजे. ते बघूनच नवीन पिढी तयार होत असते. आता नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली आहे. तेंव्हा हे सर्व करताना सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे. •••

सण म्हणजे आंनद उत्साह, प्रेम, भक्ती. तेंव्हा वातावरणही त्याला साजेसेच असावे. आंतरिक जिव्हाळा असला तर सर्व सहज शक्य होत. •••

जास्त अवडंबर न करता, जे शक्य होईल ते मनोभावे श्रद्धेने केले तरी चालते. देवासमोर दिखावा चालतच नाही. देवाला सर्व समजतच. •••

आपणच * मी हे केल, मी ते केल * म्हणून मिरवतो, पण देवासाठी आपल्या भाव, भावना जास्त महत्वाच्या असतात.

  • ••

म्हणतात ना, •••

देव भावाचा भुकेला.

आपले विचार सगळ्यांना पटतीलच अस नेहमीच होत, अस नाही.

पण ते मांडायचे. सोडायचे नसतात. •••

कारण काही विचार पटले नाही तरी, विचार करायला मात्र नक्की लावतात.

खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नात कोणतंही असो. •••

स्वतः च्या आत्मविश्वासाची ढाल मात्र मजबूत असायला हवी. •••

म्हणतात ना, ••••

*Acceptance in adversity is the best medicine. *•••

कोणत्याही परिस्थितीत 

  • All is well * ही National anthem सर्वांनी लक्षात ठेवावी, म्हणत रहावी. आपोआपच परिस्थिती चे गांभिर्य कमी होत, आणि अनेक मार्ग सहज सुचतात. •••

आधुनिक जगाबरोबर चालताना आधुनिक कपडेही घालावेत आणि विचार ही ब्रान्डेड ठेवावेत. ••••

आज नेहाचा देशमुख परिवाराबद्दल आदर प्रेमभाव किती तरी पटीने वाढला..

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फुलोरा…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ फुलोरा☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

मान्य… माझं काहीच कर्तृत्व नाहीये यात. हे घर बाबांनी बांधलं. बंगल्यात रहायची माझी खरीच लायकी नाहीये.. नशीब… बंगल्यात रहायला मिळतंय यासाठी परमेश्वराचे आभार. आणि अर्थात बाबांचेही.

बंगल्यातल्या मोठ्या खोल्यांचं कौतुक नाहीये मला. मला वेड आहे अंगणाचं. अंगणातला प्रत्येक कोपरा, इंच न इंच मी वापरलाय. फुलं माझा जीव की प्राण. सकाळी मी लवकर ऊठतो. आंघोळून तैयार. फुलांची परडी घेऊन मी रोज सकाळी अंगणात येतो. मोगरा, सोनचाफा, प्राजक्त, जास्वंद, कुंद, जाई, तगर, कण्हेर, गुलाब, काटेकोरांटी… फुलंच फुलं.

अंगणी पारिजात फुलला. परडी ओसंडून वाहते नुसती. पुरून उरतील एवढी फुलं.

मग घरच्या देवांची पूजा. छान सोवळं नेसून. गंध फुलं. देवघरात फुलं वाहिली की नुसता घमघमाट. फुलांचा फक्त वास घ्यायचा नसतो. देवापुढे ती छान मांडली की एकदम भारी वाटतं. एखादवेळी गुहागरला जा. सकाळी सकाळी व्याडेश्वराच्या मंदिरात जाऊन बघा. चटकचांदणी, सोनचाफा, लाल जास्वंद.

काय अफलातून सजावट असते. मन करा रे प्रसन्न… प्रसन्न वाटतंच.

मी आपलं घरच्या बाप्पांना जमेल तेवढं फुलांनी सजवतो. पूजा झाली की अंगणात. झोपाळ्यावर घुटक घुटक खडा च्चमच चहा. पेपर वाचता वाचता समोर बघायचं. मस्त सिनेमा बघायला मिळतो दररोज.

.. तुम्हाला गंमत सांगतो.. आमचं कंपाऊंड जरा डिझायनर आहे. मधनं मधनं खिडक्या आहेत त्याला.

त्यातनं हात काय अगदी मुंडी सुद्धा आत घालता येते.

वही तो… हळू हळू या कंपाऊंडच्या खिडक्यांना हात फुटतात. क्वचित डोकीही. तशा आजूबाजूला बर्ऱ्याच बिल्डींगा.. आणि सतराशे साठ माणसं.

तसं मार्केट इथनं बऱ्यापैकी लांब. फिरणं आणि फुलं गोळा करणं. साथ साथ. मला काहीच प्राॅब्लेम नाहीये.

माझी पूजा सकाळी साडेसहाच्या आत उरकते. बाकीची फुलं कुणाच्या देवाला वाहिली गेली तर, मला आवडतंच ते.. फक्त फुलं तोडताना झाडांना इजा पोहचू नये. कळ्या तोडल्या जाऊ नयेत, एवढीच अपेक्षा.

तशा पुणेरी पाट्याही लावल्यात मी.

मेरे पास गाडी है, बंगला है,. आंगणभर फूलं है! मी नशीबवानच आहे.

तरीही फुलं वाटायला मला आवडतात. त्याहीपेक्षा फुलं अशी चोरीला गेलेली जास्त… फुलं तोडणाऱ्याला वाटतं की त्याला कुणी पहात नाहीये. चहा पिताना मात्र मला सगळं लाईव्ह दिसतं. एखादी मुंडी कंपाऊंड मधनं आत डोकावते. टपाटप फुलं वेचते. अचानक माझी नजरानजर. मुंडी एकदम कनफ्युजते. मी डोळ्यांनी रिलॅक्स म्हणतो आणि दिलसे हसतो. मुंडीच्या जीवात जीव.

…… दुसऱ्या दिवसापासून भीड चेपते.. आपलेपणाची निर्लज्ज भावना वाढीस लागते. वहिवाटीचा हक्क असल्याप्रमाणे, ताठ मानेनं फुलं तोडली जातात. चोरीची बोरं आणि चोरीची फुलं. देवाला काही फरक पडत नाही. वाहणाऱ्यानं निर्मळ मनानं अर्पणोमस्तु केलं की झालं…. चालायचंच… कंपाऊंडचा दरवाजा उघडून आत येत नाहीत हेच नशीब.

दोन महिन्यापूर्वीची गोष्ट. सकाळी पावणेसहा वाजता फुलं गोळा करायला अंगणात. मोक्यावरची फुलं गायब. कुणी तरी बिलंदर असावा. लवकर उठणारा.. … फुलं न्यायला हरकत नाही, किती न्यावीत?

नो लिमीट. खूप राग आला. मग विझला. बाप्पांची कृपा.

…. दुसऱ्या दिवशी एक चिठ्ठी लिहिली… “माझी घरची पूजा व्हायची असते. इतरांनाही फुलं हवी असतात… तुमच्यासाठी मी वेगळी फुलांची पिशवी ठेवत जाईन. “

.. सकाळी साडेपाच वाजता उठायला लागलो. माझी फुलं आणि त्याची फुलांची पिशवी. पिशवी कंपाउंड वाॅलवर ठेवून द्यायचो… वो आदमी समझदार था. प्राॅब्लेम संपला. मीही जरा लवकर उठायला लागलो.

मागच्या आठवड्यातली गोष्ट. मित्राच्या आईची तब्येत एकदम बिघडली. सकाळची वेळ. हॉस्पिटलं फुल्ल.

कुणी अॅडमिट करून घेईना… लग्नाच्या मुलीला प्रत्येक घरनं नकार मिळावा तसं झालेलं.

असंच एका हाॅस्पीटलमधे शिरलो. फुल्ल. एकदम हाक ऐकू आली.

” केळकर थांबा. अॅडजस्ट करतो. “

.. देव पावला. त्या देवदूताची ओळख लागेना. दहा दहा वेळा त्याला थँक्स म्हटलं.

” माफ करा. मी आपल्याला ओळखलं नाही. “

देवदूत हसला. मागे बोट दाखवलं… भिंतीवर देव्हारा. फुलांचा घमघमाट.

“साडेपाचची फुलांची पिशवी” ओळख पटली.

फुलं.. माझ्या अंगणातली फुलं.. एकदम देवाघरची फुलं झालेली.

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लाकूडतोड्याची गोष्ट “ लेखक : श्री सलील सुधाकर चौधरी ☆ प्रस्तुती – श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ लाकूडतोड्याची गोष्ट “ लेखक : श्री सलील सुधाकर चौधरी ☆ प्रस्तुती – श्री मकरंद पिंपुटकर 

माझ्या मुलाला रात्री झोपवताना गोष्ट सांगत होतो. मला माहीत असलेल्या सगळ्याच गोष्टी सांगून झाल्या होत्या म्हणून जुनीच गोष्ट पुन्हा सांगायला सुरुवात केली.

लाकूडतोड्याची गोष्ट सांगत होतो. एका गावात एक लाकूडतोड्या होता. तो झाडावर चढून लाकूड तोडत होता तेव्हा त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली.

आता मी झाड कसं तोडणार…. माझा उदरनिर्वाह कसा चालणार…. या चिंतेत तो रडायला लागला.

पण बाबा, झाडं तोडणं चूक आहे ना? झाडाना पण जीव असतो. लाकूडतोड्याला दुसरं काही तरी काम करायला पाहिजे….. चिरंजीवांचा प्रश्न!

मला काही उत्तर सुचलं नाही. माझं उद्दिष्ट त्याला झोपवायच होतं म्हणून मी गोष्ट पुढे दामटवली.

लाकुडतोड्याचं रडणं ऐकून पाण्यातून एक देवी प्रकट झाली.

तिने लाकूडतोड्याला विचारलं का रडतोयस?

एव्हाना त्याला आठवलं की ही गोष्ट आपण ऐकलेली आहे. तो म्हणाला आता देवी सोन्याची कुऱ्हाड देणार ना?

मी हो म्हंटल….. पुढे काय प्रश्न येणार आहे त्याचा अंदाज लागत नव्हता.

पण लाकूडतोड्याने दुसरी कुऱ्हाड का विकत घेतली नाही?

मी म्हंटल अरे तो गरीब होता. त्याला परवडली नसती.

मग देवीने कुऱ्हाडीची कॉस्ट कमी का नाही केली?

यावर काय उत्तर देणार याचा विचार करत असताना पुढचा प्रश्न आला.

लाकूड़तोड्याकडे सेव्हिंग्ज नव्हती का? एवढे दिवस काम करून त्याने “इमर्जन्सी फंड” जमा केला नाही?

माझ्या लक्षात आलं. दोनच दिवसांपूर्वी मी त्याला इमर्जन्सी फंड बद्दल सांगितले होते. त्या ज्ञानाचा वापर त्याने लगेच केला होता.

मला हसू आलं. आता पुढे ही गोष्ट सांगण्यात काही अर्थ नव्हता. मी गोष्टीला ट्विस्ट दिला. म्हणालो, “तुझं अगदी बरोबर आहे. इमर्जन्सी फंड, सेव्हिंग्ज आणि झाडं न तोडणं… हे सगळं आजच्या जगात खूप महत्त्वाचं आहे. पण तेव्हा ते लाकूडतोड्याला माहित नव्हतं”

ही गोष्ट खूप जुनी आहे. त्या काळात त्या लाकूडतोड्याला इमर्जन्सी फंडाबद्दल किंवा दुसरं काम करण्याबद्दल कुणी सांगितलं नव्हतं. त्याला फक्त माहित होतं की त्याला लाकूड तोडूनच पोट भरायचं आहे. “

देवीने त्याला सोन्याची किंवा चांदीची कुऱ्हाड दिली नाही. कारण देवीलाही वाटलं की त्याने दुसऱ्यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहावं. देवी म्हणाली की मी तुला थेट मदत करणार नाही. पण तुझी कुऱ्हाड हरवली आहे याकडे समस्या म्हणून नव्हे तर संधी म्हणून बघ.

वर्षानुवर्षे तू लाकडं तोडून बाजारात जाऊन विकणे हेच काम करतोयस म्हणून तुझं लक्ष दुसरीकडे जात नाही. आजूबाजूला नीट बघ. या जंगलात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला उदरनिर्वाहासाठी मदत करतील. तुझ्याकडून कधीही हरवणार नाही असं काहीतरी काम शोध. एवढं बोलून देवी अंतर्धान पावली.

लाकूडतोड्याला काय करावे ते कळत नव्हते. देवीच्या बोलण्याचा अर्थ लावत असतानाच त्याला सुचलं की मी झाडं तोडण्यापेक्षा झाडांवरची फळं तोडतो आणि फळं बाजारात जाऊन विकतो. त्याने तोच व्यवसाय सुरु केला. इतकी वर्षे जंगलात आल्यामुळे त्याला जंगलाची बरीच माहिती होती. पुढे पुढे त्याने जंगलातून मध, औषधी वनस्पती आणि कंदमूळं देखील मिळवून विकायला सुरुवात केली.

तिथेच न थांबता त्याने जंगलातील दुर्मिळ वनस्पतींमधून औषधे स्वतः तयार करायला सुरुवात केली. आता तो त्याच्या माहिती, ज्ञान आणि कौशल्याच्या आधारे पैसे कमवत होता. त्याला कुऱ्हाड हरवण्याची चिंता नव्हती. कारण कुऱ्हाड हरवू शकते. पण ज्ञान आणि कौशल्य कोणीच आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. या नव्या दृष्टिकोनाबद्दल लाकूडतोड्या दररोज देवीचे आभार मानत असे.

गोष्ट ऐकताना बाळ कधी झोपी गेलं ते कळलेच नाही. माझी झोप उडाली होती. कितीतरी कॉर्पोरेट लाकूडतोड्यांच्या कुऱ्हाडी AI नामक नदीमध्ये रोज पडताना दिसत होत्या!

लेखक : श्री सलिल सुधाकर चौधरी

प्रस्तुती : श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मांजरीशी गप्पा…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “मांजरीशी गप्पा…” ☆ श्री सुधीर करंदीकर

गप्पा या शब्दामध्ये एक वेगळीच जादू दडलेली आहे. गप्पा या कुणाबरोबरही असोत, त्या आपल्याला हमखास आनंदाच्या दुनियेत घेऊन जातात.

घरच्यांबरोबर आपल्या गप्पा अगदीच कमी असतात, त्याऐवजी वादविवाद आणि सूचनाच जास्ती असतात. त्यामुळे आनंदाच्या दुनियेत जाणे फार कमी असते. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी पण साधारण असाच प्रकार असतो.

गप्पा खऱ्या अर्थाने होतात त्या फक्त मित्र मैत्रीणीं बरोबर. भरपूर हसणे होते आणि आनंदाच्या दुनियेत मस्त फेरफटका होतो.

माझ्या एका मित्राकडची गंमत सांगतो – त्याची फॅमिली मोठी आहे. रात्री आठ पर्यंत सगळे घरी येतात. रात्रीच्या जेवणाच्या आधी सगळेजण हॉलमध्ये पंधरा मिनिटे बसतात. आणि प्रत्येकाने आज दिवसभरात काय गमती जमती अनुभवल्या, काय मजा केली /काय मजा झाली, किंवा आधीच्या काही मजेशीर आठवणी, याबद्दल प्रत्येक जण सांगतो. त्यामुळे सगळ्यांचे भरपूर हसणे होते आणि आनंदी दुनियेत सफर होते. आणि मग एकत्रित सह भोजन होते. एक दिवस त्या मित्राने मला रात्री त्याच्या घरी जेवायला बोलावले होते. बरोबर आठ वाजता पोहोचलो. आमच्या गप्पा सुरू झाल्या, आणि बघतो तर सव्वा आठ वाजता घरातले सगळेजण हॉलमध्ये जमा झाले. माझ्या एकदम लक्षात येईना, त्या मित्रांनी मला बॅकग्राऊंड समजावून सांगितली आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाला की आज गप्पांचा विषय आपण माझ्या मित्रा पासून सुरू करूया. मला माझ्या आवडीचा गप्पा हा विषय मिळाल्यामुळे मस्त गप्पा मी सुरू केल्या आणि पंधरा मिनिटे म्हणता म्हणता अर्धा तास गप्पा आणि सगळ्यांचे हसणे सुरू होते. नंतर मस्त जेवण झालं आणि बाय बाय झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी चहा पिताना बायकोला मी कालची रोज घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन गप्पा मारणे याबद्दलची घटना सांगितली. बायकोला ही कल्पना मनापासून आवडलीआणि आम्ही ठरवले की त्या दिवसापासून रोज रात्री जेवण्यापूर्वी पंधरा मिनिटे मन मोकळ्या गप्पा मारायच्या, आणि मग मस्त जेवण करायचे. आणि त्याप्रमाणे आमचा गप्पा हा कार्यक्रम रोज मस्त सुरू आहे. आणि याचा छान साईड इफेक्ट पण मी अनुभवतो आहे आणि तो म्हणजे – दिवसभरात जेव्हा जेव्हा गरमागरम चहा प्यावा असा मूड होतो तेव्हा बायको कडून हातात गरमागरम चहाचा कप न सांगता मिळतो. अजून एक चांगला साईड इफेक्ट म्हणजे माझ्या वाढदिवसाला बायको कडून वॉशिंग मशीन सारखे छान गिफ्ट पण मला मिळते, आणि वगैरे वगैरे……

पक्षांबरोबर गप्पा मारण्यात पण एक वेगळीच मजा असते. सकाळी मी वरती टेरेसवर गेल्यानंतर बऱ्याच वेळा कावळ्यांबरोबर छान गप्पा होतात. बागेत झाडांना पाणी घालताना फुल झाडांबरोबर पण मस्त गप्पा होतात. अशा गप्पा असतात थोडा वेळच पण पूर्ण दिवस मस्त जातो. (याबद्दलचे माझे अनुभव मी मध्यंतरी लिहून पाठवले होते. आपण कदाचित वाचले असतील)

एक दिवस असाच एक छान योग आला आणि तो म्हणजे चक्क मांजरीशी गप्पा मारण्याचा. त्याचे झाले असे –

एक दिवस सकाळी नऊ च्या सुमारास घरासमोरच्या रस्त्यावर विटामिन डी मिळवण्याकरता मी नेहमीप्रमाणे उन्हामध्ये फेऱ्या मारत होतो. रस्त्याच्या डावी उजवीकडे दोन्ही बाजूला बंगले आहेत आणि तारा लावून कंपाउंड आहेत.

मांजरींची सारखीच डावीकडच्या बंगल्या मधून रस्ता क्रॉस करून उजव्या साईडच्या बंगल्याकडे जाणे, किंवा तिकडून इकडे, अशी काहीतरी खाण्यापिण्याकरता ये जा सुरू असते.

त्या दिवशी मी फेऱ्या मारत होतो आणि डावीकडच्या कंपाउंड मधून एक मांजर बाहेर येत होती. तिला रस्ता क्रॉस करून समोरच्या कंपाउंड मध्ये जायचे होते. तिला जाऊ द्यावे म्हणून मी उभा राहयलो. मांजर पण उभी राहिली. कुणीच हलेना हे बघून मी मांजरीला म्हणालो – तुम्ही जा पलीकडे मी थांबलोय.

मांजर : तुमच्यामध्ये मांजर आडवी जाण्याला अपशकुन मानतात ना. म्हणून मी थांबले आहे.

मी : ठीक आहे मी आधी जातो

मांजर : नको नको. तुम्ही पण जाऊ नका, कारण आमच्या मध्ये पण चालताना माणूस आडवा जाणे याला अपशकून मानतात. आता यातून काय मार्ग काढावा हेच लक्षात येत नाही.

मी म्हटलं – मी मागे फिरतो. मग तुम्ही क्रॉस करा..

मांजर : मानलं तुम्हाला. तुम्ही अगदी विन विन सिच्युएशन मार्ग काढला.

मी अबाउट टर्न केले आणि दोन पावलं मागे गेलो. तेवढ्यात मांजरीने रस्ता क्रॉस केला.

मी पुन्हा अबाउट टर्न केले. मांजर उजवीकडच्या कंपाउंड शी उभी होती.

मांजर : ठीक आहे तुम्ही जा आता. कुणालाच अपशकून नाही. धन्यवाद

दोघांचे एकमेकांना बाय-बाय झाले. मी हात हलवून बाय बाय म्हणालो, मांजरीने एक पाय वर करून आणि म्याव म्याव आवाज करत बाय बाय केले.

आणि आम्ही मार्गस्थ झालो……..

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अबुधाबी येथील हिंदू मंदिर… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ अबुधाबी येथील हिंदू मंदिर ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

या वेळी दुबईला येताना मनात अबुधाबीचे मंदिर बघायचे असा विचार होताच.. माझी मुलगी प्राची आणि जावई मंदार ह्यांनी पहिल्या च सुटीच्या दिवशी अबुधाबी मंदिर बघायला जायचे ठरवले आणि मला मनापासून आनंद झाला…

ठरल्याप्रमाणे २६-७-२०२५, शनिवारी, दुपारी ४-३० वाजता अबुधाबी येथील मंदिर बघायला 

जाण्यासाठी निघालो. तिथे पोचायला १/१-१५ तास लागला. मंदिर खूप लांबून ही दिसत असते. एअरपोर्ट सारखी सिक्युरिटी असल्यामुळे प्रत्यक्ष मंदिरापर्यंत जायला १५/२० मिनिटे लागली. पाण्याची बाटली सुध्दा बरोबर नेता येत नाही, पण जागोजागी आत पाणी बाॅटल मिळते. मंदिर अप्रतिम बांधले आहे. मोदीजीनी या मंदिराला भेट दिली तेव्हाचा मोठा फोटो तिथे आहे.

मंदिर बांधायला जवळपास चार वर्षे लागली. आपल्या कडील बिर्ला मंदिराप्रमाणे मंदिरातील मूर्ती भव्य आणि देखण्या आहेत. शंकर-पार्वती, जगन्नाथ पुरीचा जगन्नाथ, राधा -कृष्ण, श्रीनिवास आणि पद्मावती, अय्याप्पा, स्वामी नारायण यासारख्या संतांच्या मूर्ती, राम- लक्ष्मण-सीता अशी वेगवेगळी मंदिरे एकाच दालनात आहेत. तेथील सर्व खांबांवर कोरीवकाम सुंदर केले आहे. त्यातून राम, कृष्ण यांच्या जीवनावरील चित्रे तयार केली आहेत.

अतिशय स्वच्छ, प्रसन्न वातावरण आहे. ७ वाजता गंगा आरती असते. मंदिराभोवती गंगा म्हणून पाण्याचा वाहता प्रवाह आहे. दिवे सोडतात. आपल्याकडे दिवाळीत छोटे सेलवर चालणारे दिवे मिळतात तसे दिवे विक्रीसाठी असतात, तसेच पाण्यावर तरंगणारी कृत्रिम कमळे ही असतात. आम्ही ती विकत घेतली. आणि गंगा आरतीच्या वेळी मंदिराभोवतीच्या पाण्यात सोडली. सर्व भारतीय श्रध्देने हे सर्व करतात. वातावरण प्रसन्न, हिंदू संस्कृतीचे असते.

त्यानंतर फोटो काढले आणि खाली उतरलो. तिथे फुड कोर्ट आहे. कालचे रात्रीचे जेवण आम्ही तिथेच घेतले. डाळ-तांदळाची खिचडी आणि दही.. बाकी बरेच खाण्याचे पदार्थ होते. त्यानंतर मुलांनी आईस्क्रीम आणि मी काॅफी घेतली. कोकम सरबत प्राचीने घेतले.. एवढे सर्व होईपर्यंत ९ वाजत आले होते. पुन्हा परतीचा तास दीड तासाचा प्रवास करून रात्री १०/१०-१५ वाजता घरी आलो.

… एक खूप छान नवीन देवस्थान बघायला मिळाले, तेही दुबईत! दिवस सार्थकी लागला.. थोडी दमणूक झाली, तसं बरंच चालावे लागते, पण आज विश्रांती!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माहेरची साडी… लेख क्र. ११ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ माहेरची साडी… लेख क्र. ११ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

२०१० साली मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. अनेक जुने विद्यार्थी भेटायला येत होते. एका दिवशी, संध्याकाळी शाळा सुटून गेली होती, मी ऑफिसमध्ये एकटीच काम करत होते, सोबत लिपिका (क्लार्क) जोशीबाई आवरावर करत होत्या.

इतक्यात, “बाई, आत येऊ का? ” म्हणत राहुल बायकोला घेऊन आत आला.

“अरे बापरे! किती वर्षांनी दिसतो आहे! कसा आहेस, बाळा? ” असं म्हणत, त्याला पाणी देण्यासाठी उठले तर म्हणाला, “बाई, पाणी नको. आत्ता घरूनच आलो आहे. आणि, काय हो बाई, शाळा सुटली ना? मग तुम्ही अजून इथे काय करताय? सर्व कामं बंद करा आणि चला बघू ताबडतोब आमच्याबरोबर. ” 

म्हटलं, “अरे, थोडं काम आहे. आत्ता नाही येता येणार. काय काम ते सांग तर खरं. “

माझी कामाची सबब त्याला परिचीत होती, लटक्या रागाने तो म्हणाला, “पण तुम्हाला माहितीये ना, मी अमेरिकेत असतो ते. तब्बल पाच वर्षांनी भारतात आलोय, उद्या सकाळीच परत जायचंय मला. आजच सकाळी समजलं, तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. म्हणून बायकोला घेऊन आलो. तुम्हाला तुमच्या आवडीची साडी घ्यायची आहे. चला, चला, उठा पाहू लवकर, ” असं म्हणून तो उभा राहिला.

मी त्याला खाली बसायला सांगितलं, “अरे, उद्या तुला जायचंय. तुला घाई असेल. उगाच वेळ नको वाया घालवू. एवढ्या घाईत आहेस. तू भेटायला आलास यातच मला साडी मिळाली, असं समज. ” असं म्हणून त्याची समजूत घालू लागले पण तो ऐकायला तयार नव्हता.

शेवटी त्याने पैसे भरून एक पाकीट माझ्या हातात दिलं आणि म्हणाला, “बाई, या सर्व पैशांची एकच साडी घ्या, मोठ्ठा पुरस्कार मिळालाय माझ्या बाईंना, मग साडीपण मोठ्ठीच हवी. ” 

“नक्की, ” असं म्हणून त्याच्यासाठी कॉफी मागवली. कॉफी पिऊन, नमस्कार करून दोघे निघून गेले आणि डोळ्यांतले आनंदाश्रू पुसत मी पुन्हा कामाला लागले.

पाचच मिनिटांत, माझ्या वर्गातल्या विक्रांतची (नाव बदललेले) आई मला भेटायला आली. आठवडा झाला, तो शाळेत येत नव्हता. शेजारी राहणाऱ्या मुलांना विचारलं तर तो आजारी असल्याचे समजलं.

“आता विक्रांत कसा आहे? ” असं म्हटल्यावर त्या रडायला लागल्या. खुर्चीत बसून त्यांना शांत होऊ दिलं. धुण्याभांड्याची कामं करून खंगलेल्या शरीराचं मुटकुळं करून त्या खुर्चीत बसल्या होत्या.

त्यांच्याशी बोलताना कळलं की विक्रांतला रक्तातली कावीळ झाली होती. आधी डॉक्टरांना निदान झालं नाही, आता तब्येत आणखी बिघडली म्हणून ऍडमिट करायला सांगितलं होतं.

म्हणून जिथे जिथे त्या काम करत होत्या, तिथून पैसे गोळा करत होत्या. परंतु खूपच कमी पैसे मिळाले होते त्यामुळे त्या खूपच निराश झाल्या होत्या.

समोरच, राहुलने मला दिलेले पैशांचे पाकिट होतं. ते मी तसंच उचललं आणि त्यांच्या हातात दिलं, म्हटलं, “बघा, एवढे पुरतील का हो? कमी पडले तर आणखीन देते. ” 

त्या नको नको म्हणत होत्या.

मी नोटा मोजल्या. तब्बल पाच हजार रुपये होते ते. त्यांना ४,००० रुपये कमी पडत होते. मी सगळेच पैसे त्यांच्या हातात ठेवले, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, म्हटलं, “आपला विक्रांत लवकर बरा होईल, अजिबात काळजी करू नका, रडू नका. बघा, तुम्हाला लागणारे पैसे परमेश्वराने माझ्याकडे आधीच पाठवून दिले होते. हे पैसे माझे नाहीत, तुमचेच आहेत. माझा एक विद्यार्थी नुकताच येऊन देऊन गेला. ” 

‘परमेश्वर आहे’ या गोष्टीवर माझा विश्वास होताच, तो आणखी दृढ झाला.

खरंच, याला योगायोग म्हणायचं की परमेश्वरी कृपा? काहीही म्हणा, पण आज मला परमेश्वर दिसला त्या आईच्या डोळ्यात.

तो आनंद, ते समाधान मला पाच हजाराच्या साडी मिळालं असतं का?

नक्कीच नाही.

हे सगळं घडत होतं जोशी बाईंच्यासमोर. पाच मिनिटात, त्यांनी एक पत्र सहीसाठी माझ्यासमोर आणलं. मी त्या पैशाचं काय केलं ते त्यात लिहून ‘ एका गरजवंताची गरज भागवल्याबद्दल’ राहुलचे त्यात आभार मानले होते. माझं काही एक न ऐकता, ते पत्र त्यांनी राहुलच्या घरी पाठवलं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच राहुलचा फोन आला. तो रात्री खूप उशिरा घरी आला होता.

“बाई, पत्र वाचून तुम्हाला साष्टांग नमस्कार करावासा वाटला, ” असं म्हणाला, पण सकाळची लगेचचीच फ्लाईट असल्याने भेटायला येऊ शकणार नव्हता. “आईकडे साडीसाठी पैसे देतोय, बरं का! ” हे त्याचे वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच मी त्याला म्हटलं, “अरे, तुझ्या साडीच्या पैशाने केवढा आनंद मला दिलाय, याची कल्पना तू करूच शकत नाहीस. मला साडी मिळाली, बरं का! “

यावर तो छान हसला. त्याला प्रवासासाठी शुभेच्छा देऊन मी फोन ठेवला.

खरंच, अशी माहेरची साडी मिळणारी, जगात, माझ्याइतकी भाग्यवान कुणी असेल का हो?

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मिरवणूक… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ मिरवणूक… ☆ श्री मंगेश मधुकर

रुटीन जगण्याला एनर्जी देणारा गणपती उत्सव…

एरवी आपापल्या जगात गुंग असलेले सगळे यानिमित्ताने एकत्र येतात. उत्साहानं विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. सर्वत्र असलेल्या भक्तिमय वातावरणामुळे छान वाटतं.

आमच्या सोसायटीतसुद्धा वेगळी परिस्थिती नव्हती. यंदा आमच्या मंडळाचं “रौप्य महोत्सवी वर्ष” 

त्यामुळे यावर्षी उत्सवाचे स्वरूप भव्य होतं… जवळच्या ‘गुलमोहोर’ सोसायटीच्या मंडळाचं सुद्धा पंचवीसावे वर्ष होतं. त्यामुळे ते सुद्धा जोरात होते. साहजिकच दोन्ही मंडळात तुलना सुरू झाली.

आपला उत्सव जास्तीत जास्त मोठा, दिमाखदार करण्यासाठी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची धडपड सुरू झाली. सोशल मिडियावर फोटो, रिल्स पोस्ट होऊ लागले. — 

— आणि गरज नसताना परस्परांविषयी आकस निर्माण झाला. तसं बघायला गेलं तर, इतक्या वर्षात दोन्ही मंडळामध्ये कधीच वाद, भाडंणं झाली नव्हती पण यंदा मात्र प्रचंड खुन्नस होती. दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली.

बाप्पांच्या आगमनाचा दिवस. दोन्हीकडं प्रचंड उत्साह. उत्सवाचे सर्वात मोठं आकर्षण म्हणजे मिरवणूक.

ती भारी नव्हे तर एकदम सुपर डुपर व्हायला पाहिजे यासाठी दोन्ही बाजूंचा खास प्रयत्न.

आकर्षक मयूर-रथात विराजमान झालेल्या आमच्या ”श्रीं” ची मिरवणूक दणक्यात सुरू झाली.

सगळी सोसायटी सहभागी झाली होती. बहुतेकांनी पारंपारिक वेशभूषा केलेली. नामवंत ढोल-ताशा पथकाच्या तालबद्ध वादनानं अवघ्या काही मिनिटांत वातावरण भारून टाकलं. सर्वांनी नकळत ताल धरला. मिरवणूक चौकात आली.. आणि..

आणि……

एकदम नाचणारे थांबले. वादन अन घोषणा बंद झाल्या. कारण, समोरून ‘गुलमोहोर’ ची मिरवणूक येत होती. दोन्ही मंडळ समोरासमोर आल्यावर विलक्षण शांतता पसरली. वातावरण तणावपूर्ण. आता काय होणार याची प्रत्येकाच्या मनात धास्ती.

.. दोन्ही बाजूंनी एकदम “मोरया, मोरया”चा गजर सुरू झाला. जल्लोषात असलेल्या तरुण कार्यकर्त्यांच्या नजरेत विखार दिसत होता. त्यांनी डोक्यातली खुन्नस वागण्यातून दाखवायला सुरुवात केली. घोषणांचा आवाज आणि वातावरणातला तणाव वाढत चाललेला.

पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शांततेत मिरवणुका पुढे नेण्याचं ठरलं. त्यानुसार एकमेकांसमोरून मिरवणूक पुढे जाऊ लागली.

.. दोन्ही मंडळाची पथकं शेजारी आल्यावर एकदम जागेवर थांबली. पथकप्रमुख काही क्षण एकमेकांशी बोलले आणि….

… एकदम ‘तर्रssssssssssssतर्र, तर्रssssssssssssतर्र’ एक ताशा वाजायला लागला.

त्याला दोन्हीकडच्या ताशावाल्यांची साथ मिळाली. सर्वांनी एकत्र वादन सुरू केलं. ते पाहून ढोलवाल्यांच्या अंगात जोश आला. ताशाला ढोलाच्या ठेक्याची साथ मिळाली.

…. मग काय!!!

तणावपूर्ण खुनशी वातावरणाची जागा आनंदानं घेतली. ढोल-ताशाच्या तालावर सगळे बेहोशपणे नाचायला लागले. गर्दीच्या टाळ्यांची साथ मिळाली. क्षणात भान हरपणारा माहौल तयार झाला. तरुणाई तर जास्तच जबरदस्त जोशात होती. पथकांच्या एकत्रित वाजवण्यानं चौकात ‘नादब्रम्ह’ वातावरण तयार झालं.

वादनाचा प्रभाव इतका की बाजूनं जाणारं ट्राफिक थांबलं. मंत्रमुग्ध करणारा भन्नाट अनुभव जो तो मनात साठवत होता.

…. काही वेळानंतर वादन थांबल्यावर टाळ्यांचा कडकडाट बराच वेळ चालू होता. मनातली जळमटे आनंदाच्या त्सुनामीत वाहून गेली. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी गळाभेट घेत, हात मिळवत कटुता दूर केली.

आणि.. “गणपती बाप्पा मोरया” जयघोष करत दोन्ही मिरवणुका आपापल्या मार्गे पुढे सरकल्या.

तेव्हा प्रत्येकाच्या चेहरा आनंदी आणि समाधानी होता.

– – “ विघ्नहर्त्यानं आपलं काम केलं. ” हीच भावना प्रत्येकाच्या मनात होती.

दोन्ही मंडळांची एकत्र भव्य विसर्जन मिरवणूक त्याच पथकांसह काढायची असं ठरतयं.

बुद्धीच्या देवानं सुबुद्धी दिली असं म्हणायचं.

मंगलमूर्ती मोरया

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares