मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पाटा वरंवटा ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पाटा वरंवटा ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

पाटा वरंवटा हा तेंव्हा

स्वयंपाकाचा साथी होता

किती वाटा वाटण तुम्ही

कामाला दणकट होता!!

*

बारीक, भरडे हवे तसे

कौशल्यच हातजोराचे

घरच्याघरात स्त्रियांसाठी

जिमच होते जणू ते घरचे!!

*

चव त्यामुळे पदार्थाची

जिभेवर रेंगाळत राही

घरचे जेवण सकस असे

पंगतीतही कौतक होई!!

*

कधी वडारीण दारावरती

टाकी लाऊन देण्या येई

टाकी लावता पाटावरवंटा

सेवेला परत तयार होई!!

*

बारशात कधी हा वरवंटा

बाळा आधी पुजला जाई

गोविंद घ्या, गोपाळ घ्या ची

बाळा आधी गोपा होई!!

*

अजूनही किचनमधे माझा

अस्तित्वात पाटा-वरवंटा

कित्येक वर्षे स्वयंपाकात

खुपच होता त्याचा वाटा!!

*

लहानमोठा दगडी खलबत्ता

यांचा तेंव्हा दुजा साथी होता

छोठ्या टेचायाच्या कामी

चुलीजवळच हाती होता!!

*

पाट्या वरंवट्याच्या सोबत

आजही येते त्याची आठवण

श्वास चालू आहे तोवर राही

मनात आठवणींची साठवण!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हा रक्तपुष्पी फुलोरा… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हा रक्तपुष्पी फुलोरा… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त : उद्धवमात्रा : 2+8+2+2=14)

ते रूप विहंगम दिसते 

उमलून रोज येताना 

जास्वंद देखणा हसतो

पानात फूल होताना 

*

स्वागत अरुणाचे करण्या

अरुणा नामाने येतो

हरिवल्लभ कोणी म्हणती

श्री चरणी सेवा देतो 

*

गजवदनाला प्रिय भारी

ही जवाकुसुमी फुलारी

हा लाल लाल जयपुष्पी

किरिटावर शोभा न्यारी

*

रंगात रंगला सारा 

हा रक्तपुष्पी फुलोरा 

पिवळा, जांभळा, भगवा

अन् शुभ्र दिसे हा गोरा

*

बहुगुणी आणि उपयोगी

कुंतलास जासुम जपतो

झुपक्यात उमलतो गोंडा

झिरमाळी पानी लपतो

*

मी पाहत बसते याला 

वाऱ्यावर झुलतो जेव्हा

कलिकेचे फुलात सजणे 

भ्रमराचे गुंजन तेव्हा

*

पाकळीत झालर फुलते

रंगांच्या मखमालीवर

काव्यात उतरतो माझ्या

गाणे होते मग सुस्वर

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ माझी मायबोली… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? माझी मायबोली… ? श्री आशिष  बिवलकर ☆

(१) 

मराठी प्रसवे | माझी मायबोली |

ज्ञानियांची वाली | राजभाषा ||१||

*
मराठी धरते | ज्ञानाची सावली |

भाषांची माऊली | जगी श्रेष्ठ ||२||

*
मराठी दाखवी | जगाची खिडकी |

सर्वांची लाडकी | मातृभाषा ||३||

*
मराठी गिरवी | हाती बाराखडी |

मुळाक्षर कडी | ज्ञानासाठी ||४||

*

मराठी शिकवी | संतांचे वचन |

ज्ञानाचे लोचन | अध्यात्माने ||५||

*

मराठी पाजते | मुखी बाळकडू |

पराक्रम घडू | कर्तूत्वाने ||६||

*

मराठी फोडते | मदांध ते तख्त |

क्षात्रधर्म व्यक्त | सामार्थ्यांने ||७||

*

(२) 

जन्माला आल्यावर,

बोबडे बोल आले ओठी |

श्वासाश्वासात जगतो,

माझी भाषा माय मराठी |

*
अमृताहुनही गोड,

जीची महती वर्णावी जगजेठी | 

ज्ञानाचा महासागर,

सामावते माझी माय मराठी |

*

शब्दातून व्यक्त होण्यासाठी,

जन्मोजन्मी जिव्हेशी जोडल्या गाठी |

कशाचीही तमा न बाळगता,

व्यक्त होताना बोलतो मराठी |

*

संतांनी आयुष्य खर्चले,

समाजाच्या उध्दारासाठी |

साध्या सोप्या शब्दात,

लिहल्या ओवी मराठी |

*

नाठाळांच्या माथी हाणायाला,

वापरतो शब्दरुपी काठी |

संताप व्यक्त करतांना,

शिव्यांची लाखोली वाहतो मराठी |

*

कविता लिहिण्याचा छंद जडला,

मी असेल नसेल.. त्याच स्मरतील पाठी |

माझ्या शब्दांवर प्रेम करणारे,

काव्य रसिक असतील मराठी |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वात्सल्याचा गाव ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वात्सल्याचा गाव ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

(१)

घरी परतता संध्याकाळी

कोणी तरूणी लेकुरवाळी

मना पिलाची ओढ लागते

तटतटते अंगी काचोळी!!

*

पिलू भुकेले नजरेपुढती

पाय आपसूक वेगाने पडती

पिलू पाहता वक्षामधूनी

अमृत धारा बरसत जाती!!

*

  कवयित्री : नीलांबरी शिर्के

 

(२) 

गायीच्या न् आईच्या नेत्री

वात्सल्याचा वसतो गाव

बुडी मारूनी तिथे खोलवर

घ्यावा म्हणते त्याचा ठाव!!

*

नाक दाबुनी डोळे मिटले

आणि तळाशी गेले थेट

सदाचार अन संस्कृतीचे

ममताभरले काळीज बेट!!

*

त्या गावातुन फिरता जाणवे

निरामय विचारसहवास

पावन हळवी लहर भरवी

आपुलकीने विचार घास!!

*

तृप्तपणे माघारी फिरताना

मातृत्व वात्सल्य मिळे वसा

वसा घेऊन परतताना  

भरला जाई काळीज कसा!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गरसोळीची श्वेतपाकळी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गरसोळीची श्वेतपाकळी… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त : पादाकुलक, मात्रा : 8+8=16)

तुझा नाजूक नखरा राजा 

जणू मोरणी चमचम नाकी

उमलली सान ती सूर्यफुले

बटव्यात तुझ्या पुंजी बाकी 

*

तुझ्या गुणाला तोडच नाही

बंदुकीचेच फूल शोभले

कंबरमोडी तव् नामाने

किती फायदे तुझे लाभले

*

एकदांडीत दगडी पाला

दिसे वेलीस वेढली पाने

असेे कुठेही रानोमाळी

कशी बहरली सजली राने

*

नाही केली कुठे लागवड 

नाही जपले तुझ्या फुलाला

माळरानात वाढवले रे

भगवंताने तुझ्या रुपाला

*

कुटकुटी तुला गुडघेमोळी

गरसोळीची श्वेत पाकळी

पिवळा गोंडा शोभून दिसे

किती नाजूक तुझी रे कळी

*

तुझ्या फुलाला गुंफत गेले

त्याचे गजरे सुंदर झाले

शब्द अलवार त्यात गोवता 

काव्यसाजात समोर आले

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आनंदी जीवन… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आनंदी जीवन… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

कुठे जन्मलो यास महत्व न देणे 

आशावाद हृदयी धारून येणे 

कुठेही कसेही फुलारून जाणे 

हेच जाणसी तू आनंदी जगणे ||

*

आनंदी जगणे देई दुसऱ्या आनंद

अवचित हृदयी येतसे मकरंद

जरी पंकात त्या विलसे अरविंद

विष्णू लक्ष्मी येती रूपे मिलिंद||

*

रूपे मिलिंदाचा होई गुंजारव

भ्रमणातून लाभे दूजा जागी ठाव

विस्तार किर्तीचा लाभे त्यास गाव

जिद्दीने जगे त्यास मिळे आदर्शाचा वाव||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जरासं ‘ऑफलाईन’… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जरासं ‘ऑफलाईन’… ? श्री आशिष  बिवलकर ☆

७) चित्रकाव्य — 

“ जरासं ऑफलाईन.. “ कवी : आशिष बिवलकर

चित्रकाव्य : “ जरासं ‘ऑफलाईन’.. “.

कितीही चुका असल्या तरी,

पदरात घेत असते माय मराठी |

लिहिणाऱ्याच्या भावना जाणते 

सारं काही समजून घेत जगजेठी |

शब्द जरी इंग्रजी असले तरी,

समजणारा समजून घेतो |

‘ध’ चा ‘मा’ न करता,

त्याच्या परी खपवून घेतो |

*

सर्व्हर जरी कनेक्ट नसला तरी,

सूचना माणसांना कनेक्ट ठेवते |

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात,

तिच्या परी तरी परफेक्ट वाटते |

*

ऑनलाईनच्या दुनियेत,

थोडं ऑफ लाईन जगावं |

व्हरच्युअल झालेल्या जगात,

प्रत्यक्ष एकमेकांना भेटावं |

*

कितीही आधुनिक झालो तरी,

बांधिलकीची नाळ तूटू नये |

आपल्यापासून दुरावला गेलाय,

स्वप्नात देखील कुणाला वाटू नये |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हळदीकुंकू असेही ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हळदीकुंकू असेही ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

हळदकुंकू भाळी लेऊन

गवत हिरवे डोलू लागले

सुवासिनींचा मेळा जमला

गप्पाचे फड जणू रंगले

*

अल्पायुषी जरी आहे जगणे

देखणेपणातच दरवळणे

हिरव्या गालिचावर लोळत

सुंदर वाटे मना.. फूल होणे

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मुग्धी देखण्या गुच्छात… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मुग्धी देखण्या गुच्छात… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(अष्टाक्षरी)

मन गेले वेलीपाशी

जुई बहरून आली

मधाळल्या श्रावणात

किती गोरी गोरी झाली

*

 तिच्या सुगंधाने मला 

 अशी भुरळ पाडली

 दव भरल्या पानात

 शुभ्र गणिका वेढली

*

कधी गजऱ्यात तिला 

गाठी गाठीत माळले

मुग्धी देखण्या गुच्छात 

तिच्यावर मी भाळले

*

किती नाजूक साजूक 

मुलायम पाकळीत 

सुगंधीत सांजवेळी

जुई चिमण्या कळीत

*

मोह घालीते आंबष्ठा

सूर्यकिरणाची ओढ 

बहरात पर्जन्याच्या 

जुई दिसतसे गोड

*

कुणी मगधी म्हणती 

कुणी उसीमल्लीगाई 

किती तरी नावे तुला

कादरमल्लीगे बाई

*

वैद्य बहुगुणी तू गं

अत्तराची नवलाई

पान फूल खोड मूळ

अनमोल वनराई

*

तुला ओंजळीत घेते

शब्द मोत्यांचे शिंपण

कवितेचे गोड देते

बहुमोल गं कोंदण

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – दुधावरची साय – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – दुधावरची साय – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

कोण मी? ओळखा पाहू 

डोळे झाकी आजोबांचे 

कोण बरं? कोण आहे?

बोल खोटे फसण्याचे ||

*

साखरेचे पोते गोड 

आवडते सगळ्यांचे 

ओढ लावी जीवा भारी 

असे सर्वस्व घराचे ||

*

आजी-आजोबा नातीचे 

मस्त रंगे रसायन 

घोडा घोडा करताना 

हृदयाचे सिंहासन ||

*

नाती संगे खेळताना 

देहभान हरपते 

आजोबांच्या जगण्याचे 

प्रयोजन ती ठरते || 

*

खेळ लुटूपुटीचा हा 

गाभा आनंदाचा असे 

डोळ्यांमध्ये पाणी अन 

ओठांवर गोड हसे ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares