तुम्हाला माहित आहे कां, 19 व्या शतकापर्यंत मराठी लिपी मध्ये विरामचिन्हेच नव्हती. विरामचिन्हे ज्याने सुरू केली तो ब्रिटिश होता. जेव्हा बोली भाषेचं लिपीत रूपांतर झालं तेव्हा कोणत्याही लिपीत विरामचिन्हे नव्हती. संस्कृत सर्वात प्राचीन समजतो पण त्यात देखील दंड सोडल्यास कोणतीही विरामचिन्हे नाहीत. जसं जसं टंकलेखन सुरू झालं, छपाई सुरू झाली तसं तसं प्रथम इंग्रजी लिपी मध्ये विरामचिन्हांचा वापर सुरू झाला. भारतात इंग्रजांचे राज्य सुरू झाल्यानंतर टंकलेखन व छपाई यासाठी मराठी लिपी तितकी योग्य नाही असे लक्षात आले. त्यावेळी मराठी भाषेमध्ये जे काही बदल केले गेले त्या बदलांचे श्रेय एक इंग्रज अधिकारी मेजर थॉमस कँडी याच्याकडे जाते. याचा जन्म इंग्लंड मध्ये 13 डिसेंबर 1804 रोजी झाला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत थॉमस व त्याचा जुळा भाऊ जॉर्ज दोघांनी भारतीय भाषांचा अभ्यास केला. त्यांची नियुक्ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये क्वार्टर मास्टर म्हणून झाली व ते दोघे 1922 ला भारतात आले. इन्फंट्री रेजिमेंट मध्ये भाषांतर कार म्हणून काम करू लागले.
त्याच वेळी मॉल्सवर्थ हा इंग्लिश – मराठी डिक्शनरी चे काम करत होता. त्याला मदत करण्यासाठी 1930 मध्ये जॉर्ज ला पाठवले. पण मॉल्सवर्थ आजारी पडल्यामुळे 1936 मध्ये तो मायदेशी इंग्लंडला रवाना झाला. पुढे थॉमस, जॉर्जच्या मदतीला आला व ती डिक्शनरी 1840 च्या दरम्यान पूर्ण झाली. 1838 मध्ये जॉर्जने आर्मीची नोकरी सोडली व तो ख्रिश्चन धर्मासाठी काम करू लागला. ‘ख्रिस्ती धर्म कसा उत्पन्न झाला व कसा पृथ्वीवर वाढला’ हे मराठीतील पुस्तक जॉर्जने लिहिले. 1854 मध्ये जॉर्ज इंग्लंडला परत गेला. कांहीं काळानंतर मॉल्सवर्थ पुन्हा भारतात आले आणि त्यांनी परत दुसरी मोठी इंग्रजी– मराठी कोशाची वाढवलेली आवृत्ती तयार केली. त्यांचाही मराठीचा गाढा अभ्यास होता. ते ही नंतर इंग्लंडला परत गेले. थॉमस मात्र अखेरपर्यंत भारतातच राहिले.
त्यांनी महाराष्ट्रातील समाज, भाषा परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास केला. त्यांची नियुक्ती महाराष्ट्रातच झाली असल्याने त्यांनी मराठी भाषा, मराठी साहित्य व दैनंदिन कामकाजातील मराठी यांचा अभ्यास केला. मराठी भाषेत व्याकरणाची शास्त्रीय चौकट बांधण्याचे काम त्यांनी केले. शब्दांचे व्युत्पत्तीशास्त्र तपासले, वाक्यरचनांचे प्रकार निश्चित केले. सर्व विषयांची पाठ्यपुस्तके, ख्रिश्चन शाळांसाठी मराठीत बनवून, छापून घेतली. कित्येक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत भाषांतर केले, जसे ‘इंडियन पिनल कोड’, ‘सिव्हिल प्रोसिजर कोड’. अनेक मराठी अनुवाद करणाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे त्याची मुख्य सरकारी भाषांतरकार म्हणून ब्रिटिश सरकारने नेमणूक केली. महाराष्ट्रात कामकाज मराठीत चालायचे पण कागदपत्रांमध्ये भाषा ही गोंधळलेली होती, ठाम शब्दरचना नव्हती व अति संस्कृतनिष्ठ होती. त्याने भाषेला संक्षिप्त, स्पष्ट नमुन्यात, अभिव्यक्ती मधील अनिश्चितता टाळून नवीन रूप दिले. अहवाल, परिपत्रके आज्ञा, कार्यवृत्ते कशी लिहावीत याचे नियम बांधून दिले. मराठी भाषा मुद्रण व टंकलेखन करण्यायोग्य व्हावी म्हणून काही अक्षरांची पुनर्रचना केली. अक्षररूपांचे नमुने तयार केले. संयुक्त अक्षरांची सुलभ विभागणी केली. प्रशासकीय शब्दांची शुद्धता निश्चित केली.
थॉमसने मराठी भाषेत सर्व प्रथम विरामचिन्हांचा वापर सुरू केला. विरामचिन्ह हे शब्दाच्या पुढे लगेच आले पाहिजे मध्ये रिकामी जागा असू नये पण विराम चिन्हा नंतर एका अक्षराची रिकामी जागा सोडून पुढचा शब्द लिहावा, तसेच स्वल्पविराम, अर्धविराम कुठे द्यावा, सिंगल कोट, डबल कोट कधी द्यावा या सर्व गोष्टींचे त्याने नियम तयार केले. मराठी भाषेचा असा विज्ञाननिष्ठ अभ्यास करणारा हा पहिलाच इंग्रज गृहस्थ होता. त्याने ‘विरामचिन्हांची भाषा’ हे पुस्तक लिहिले.
मराठी कोशाचे काम करताना त्यावेळी पुण्याच्या पाठशाळेतील अनेक विद्वान पंडितांचे त्यांना सहाय्य लाभले. कोशाच्या कामानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष मराठी पाठ्यपुस्तके व इंग्रजी ग्रंथांचे सुगम भाषांतर यावर केंद्रित केले. इतरांनी केलेल्या भाषांतरात सुधारणा व दुरुस्त्याही केल्या. मराठी भाषेस आधुनिक वळण लावण्यात त्याचा फार मोठा वाटा आहे. आधुनिक मराठीच्या ग्रांथिक शैलीवर त्याचा फार मोठा ठसा आहे. मराठी कोश रचना व व्याकरण यावर त्याचे प्रभुत्व होते. वाक्यरचनेतील शैथिल्य व अनियमितता काढून तिला बंदिस्तपणा आणण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. आपल्या दृष्टीने इंग्रजी – मराठी कोश हे तर त्यांचे चिरंतन कार्य आहे. याशिवाय त्यांनी नीती बोधकथा, नवीन लिपी धारा, विरामचिन्हांची परिभाषा, वाचन पाठमाला, बालमित्र, हिंदुस्थानातील इंग्रजांच्या राज्यांचा इतिहास इत्यादी ग्रंथ लिहिले. त्यांनी कांहीं काळ पुणे संस्कृत कॉलेज मध्ये सुप्रिटेंडंट म्हणून, डेक्कन कॉलेज मध्ये प्रिन्सिपल म्हणून काम केले. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीने अखेरपर्यंत मराठीचा अभ्यास, मराठी भाषेचा विकास हेच ध्येय ठेऊन काम केले. अखेर 24 फेब्रुवारी 1877 ला महाबळेश्वर येथे देह ठेवला.
(पूर्वसूत्र- सहस्त्रबुद्धे आजोबांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा माझ्या मनात झिरपणारं समाधान मला दिलासा देत होतं. त्यामुळे यापुढं जे घडेल ते ‘तो’ म्हणेल तसं’! तिकडे सहस्त्रबुद्धे आजोबाही असाच विचार करत असतील याची मला खात्री होती.
तरीही त्याची प्रचिती दुसऱ्या दिवशीच मला येणार आहे याची मात्र कल्पना नव्हती! )
प्रत्यक्षात पुढं जे घडत गेलं ते अगदी सहज चढावं वाटलं तरीही ते ‘तो’च घडवत असावा तसं कसोटी पहाणारंच होतं. पुढच्याच क्षणी कडेलोटही झाला असता अशीही वळणं आली. क्षणकाळ जीव घुसमटलाही. पण तो अंधार नवी प्रेरणा देऊन पुढची वाट दाखवत राहिला होता! इतक्या वर्षांनंतर आज सगळं आठवतानाही तो एखादा चमत्कार असावा तसंच वाटत रहातं!
मागे वळून पहाताना आजही मला जाणवतं कीं त्यादिवशी सहस्त्रबुद्धे आजोबांच्या घरातून बाहेर पडताना निर्णायक असं काही हाती लागलेलं नसतानाही मन मात्र पूर्वीसारखं अस्वस्थ नव्हतं. शांत होतं. जे होईल ते सर्वांच्याच हिताचं असेल हा विश्वास हळूहळू मनात झिरपत दृढ होत गेला होता. आणि मग आधी प्रत्येकक्षणी ‘पुढं काय होणार?.. ‘ याबद्दल असणाऱ्या अनिश्चिततेची जागा आता उत्सुकतेने घेतली होती. जे होईल ते चांगलंच असणाराय. आपण फक्त निमित्त आहोत हीच भावना मनात होती.
आता यापुढं जे करायचं ते आपल्या बाजूने कुणालाही झुकतं माप देणारं नसेल आणि ते कुणाच्याही चुकीचं समर्थन करणारंही नसेल हे माझ्यापुरतं मी त्याच क्षणी ठरवूनच टाकलं. आता आपण घ्यायचा निर्णय कुणावरही अन्याय न करणारा जसा तसाच सर्वांना योग्य न्याय देणाराही असायला हवा असं मनापासून वाटत राहिलं. पण ही परस्परविरोधी दोन टोकं जुळवून समतोल साधायचा कसा ते मात्र त्याक्षणापर्यंत स्वच्छ दिसत मात्र नव्हतं.
त्या सकाळी सहस्त्रबुद्धे आजोबांकडून बाहेर पडल्या क्षणापासून ऑफिसमधे पोहोचेपर्यंतच्या अर्ध्या एक तासात याच संदर्भातले असेच सगळे विचारतरंग मनात उमटत राहिले होते. त्याच वेळी तिकडे वखरेसाहेबांच्या मनात मात्र वेगळीच घालमेल सुरू होती. ते माझीच वाट पहात होते!
तो गुरुवार होता. शनिवारीच त्यांना सोमवारच्या मुंबईत होणाऱ्या एम्. डी. मीटिंगसाठी रिलिव्ह व्हायचं होतं. मधे फक्त उद्याचा शुक्रवारचा एकच दिवस. जे व्हायचं ते जास्तीत जास्त उशीर म्हणजे उद्या सकाळीच पूर्ण होणं आवश्यक होतं. मिटींगला जाण्यापूर्वी तयारी करायच्या इतर असंख्य विषयांच्या बाबतीतल्या कामांच्या नियोजनाच्या व्यस्ततेतही प्रदीर्घ काळ प्रलंबित राहून आता ऐरणीवर आलेल्या या तक्रारीचा विषय वखरेसाहेबांना खूप अस्वस्थ करत होता. मीटिंगच्या संदर्भातल्या इतर अनेक अत्यावश्यक विषयांकडे दुर्लक्ष करून याचाच विचार करत बसणं त्यांना शक्यही नव्हतं आणि त्याच्याकडं दुर्लक्ष करणंही पुढं अधिकच अडचणीचं ठरू शकणार होतं. अशा विचित्र कात्रीत ते सापडलेले होते. कारण मुंबईतल्या मीटिंगमधे काय घडू शकेल याची चुणूक नुकत्याच झालेल्या एम्. डी. व्हिजिटमधे आम्ही सर्वांनीच अनुभवलेली होती. पण प्रत्यक्षात सर्वात जास्त झळ लागली होती ती वखरेसाहेबांनाच! त्याचे चटके अजूनही त्यांना जाणवत असायचे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये हीच माझी धडपड होती, पण त्या दृष्टीने सुरू असलेल्या माझ्या अथक प्रयत्नांना अद्याप यश मात्र मिळत नव्हतं.
“काय झालं? काय म्हणाले सहस्त्रबुद्धे?”
मी त्यांच्या केबिनमधे पाऊल टाकताच वखरेसाहेबांनी उत्सुकतेने विचारलं. त्यांना अपेक्षित असणारं उत्तर अर्थातच माझ्याजवळ नव्हतं. त्याक्षणी ‘आता प्रभूदेसाई आणि सहस्त्रबुद्धे आजोबा या दोघांपुरताच हा विषय मर्यादित नाहीय. त्या दोघांपेक्षाही तो आज वखरेसाहेबांसाठीच अधिक महत्वाचा आहे’ हे मला तीव्रतेने जाणवलं.
“सर, मी आज त्यांना नेमक्या परिस्थितीची कल्पना दिलीय. त्यांना ते पटलंय असं वाटतंय तरी. आज आपण त्यांच्या तक्रारीबद्दल नियमांच्या चौकटीत राहून काय करायचं ते ठरवून टाकूया. आता त्यात दिरंगाई नको. मी त्याबद्दलची एक नोट तयार करून तासाभरातच तुम्हाला ब्रिफ करतो. “
“पण त्यामुळे त्यांचं समाधान होऊन ते तक्रार मागं घेतील याची खात्री आहे कां?”
“त्यांचं समाधान होणं हेच महत्त्वाचं आहे. ते कसं करायचं याचा विचार करूनच मी माझी नोट बनवतो. आजचा पूर्ण दिवस आपल्या हातात आहे. सगळं व्यवस्थित होईल. मी ब्रिफिंग घेऊन येतोच. ”
मी त्यांना दिलासा मिळावा म्हणून बोललो खरा पण प्रत्यक्षात माझ्यापुरतं अजूनही सगळं अधांतरीच होतं!
मी माझ्या केबिनमधे आलो. टेबलवर आजच्या इन्वर्ड मेल मधील पत्रांचा ढीग माझीच वाट पहात होता. पण आत्ता या क्षणी दुसऱ्या कुठल्याही कामांचे विचार मला नको होते. समोरचा तो पत्रांचा गठ्ठा मी शांतपणे बाजूला सरकवून ठेवला आणि ड्रॉवरमधली माझी डायरी बाहेर काढली.
नोट तयार करण्याच्या दृष्टीने लाईन ऑफ ॲक्शन ठरवायची म्हणजे त्या तक्रारीची दखल घेऊन प्रभूदेसाईंच्या विरुद्ध काय ॲक्शन घ्यायची हे ठरवायला हवं. सहस्त्रबुद्धे आजोबांनी सांगितलेलं कितीही खरं असलं तरी समोर कुठलाही सबळ पुरावा नसताना त्यांना शिक्षा करणं समर्थनीय कसं ठरणार? प्रश्न निरूत्तर करणाराच होता. मग समर्थनीय ठरेल असं काय करता येईल? स्वत:लाच विचारावं तसा मनात उभारलेला हाच प्रश्न मला नेमकी दिशा दाखवणारा ठरला. आता उद्या जे होईल ते होईल. निदान आज तरी याच गोष्टीचा विचार करत असंच अधांतरी तरंगत राहून इतर कामांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही असं वाटलं. या समोरच्या पत्रांच्या ढिगात कांही महत्त्वाची पत्रं असतील तर? क्षणाचाही विचार न करता मी तो पत्रांचा गठ्ठा पुढे ओढला. एकेक पत्रावरून नजर फिरवून ते बाजूला ठेवत गेलो. त्याच पत्रांमधे सेंट्रल ऑफिसकडून आलेल्या एका पत्राने माझं लक्ष वेधून घेतलं. आत्ता या क्षणी सहस्त्रबुद्धेंच्या तक्रारीच्या संदर्भात ताबडतोब करण्यासारखी एकच गोष्ट आहे हे ते पत्र मला बजावून सांगतंय असं वाटलं आणि दुसऱ्याच क्षणी ते पत्र घेऊन मी तातडीने वखरेसाहेबांच्या केबिनकडे धाव घेतली. त्या एका पत्राने मनातल्या विचारांना आणि पुढे घडणाऱ्या घटनांनाही वेगळं वळण देत मला निर्णयप्रक्रियेच्या नेमक्या रस्त्यावर आणून सोडलं होतं! मी ब्रिफिंग बनवण्यात वेळ घालवून ते इन्व्हर्ड मेल पाहिलंच नसतं तर? अगदी वरवर साधा वाटणारा घटनाक्रमसुद्धा ‘तुला मी दिलेल्या अंत:प्रेरणेवरच असा अवलंबून असतो’ हे जणू ‘तो’ मला समजावत होता!
मी वखरेसाहेबांच्या केबिनचं दार ढकलून आत जाताच त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं.
“अरे वा,.. नोट तयारही झाली एवढ्यांत? ग्रेsट.. ! शो मी… ” त्यांनी उत्सुकतेने हात पुढे केला.
“सर, त्या आधी सेंट्रल ऑफिसकडून हे पत्र आलंय त्याला तातडीने उत्तर द्यायला हवं. त्या तक्रारीच्या बाबतीत काय करायचं याचा नंतर शांतपणे विचार करता येईल. “
“शांतपणाने विचार करायला नंतर वेळ आहेच कुठं… ?”
“हे पत्र त्या तक्रारीच्या संदर्भातलंच आहे सर. आणि त्यावर ‘Most urgent’ असा रिमार्कही आहे. आधी याला तातडीने उत्तर देणं आवश्यक आहे सर. शक्यतो फॅक्सनेच. तरच ते आजच्या आज एम्. डी. ऑफिसला मिळू शकेल. आणि मग त्याच बेसिसवर फायनल रिपोर्टिंग एम्. डींसमोर ठेवलं जाईल. ही केस तुम्ही मिटींगला निघण्यापूर्वी क्लोज होईल या दृष्टीने विचार करायला आजचा संपूर्ण दिवस आपल्या हातात आहे सर. उद्या सकाळी मी नेहमीसारखं सहस्रबुद्धेंच्या घरी जाणार आहेच. आपण काय करणार आहोत याबरोबरच त्यांनी काय करायला हवं हे मी उद्या त्यांना समजून सांगेन. सगळं व्यवस्थित होईल सर. खात्री आहे माझी. ” त्याक्षणी जे मनात आलं ते मी मोकळेपणानं बोलून टाकलं. माझ्याही नकळत ‘सगळं व्यवस्थित होईल’ हा शब्द दिला त्यांना देऊन बसलो. पण ते व्यवस्थित म्हणजे नेमकं काय हे मला स्वतःला तरी कुठं माहित होतं?
माझं बोलणं ऐकूनही त्यांचं समाधान झालेलं नव्हतं. त्यांनी नाईलाजाने मी दिलेल्या पत्रावरून आपली नजर फिरवली. बघता बघता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले.
ते पत्र म्हणजे या तक्रारीच्या प्रकरणात आम्ही झोनल आॅफीसच्या पातळीवर तातडीने काय केलंय आणि त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे याबद्दलचा सविस्तर अहवाल एम्. डी. मीटिंगच्या पार्श्वभूमीवर आमच्याकडून मागवण्यात आलेला होता. पत्र आजच मिळालं होतं आणि त्याची पूर्तता आम्हाला तातडीने म्हणजे आजच्या आजच करणं आवश्यक होतं.
“येस्स्.. यू आर राईट. तरीही मी मिटींगला निघण्यापूर्वी सहस्त्रबुद्धेनी ही तक्रार मागे घेतली तरच मिटींगचं टेन्शन नाहीसं होईल. अदरवाईज… “
“आॅफकोर्स सर. तेही होईल. नक्की होईल.. ” मी आश्वासन दिलं.
पुढं ड्राफ्ट फायनल करून फॅक्स करण्यात दोन तास कसे उलटून गेले समजलंच नाही.
‘सदरच्या तक्रारीचं नेमकं कारण तक्रारदाराला समक्ष भेटून, चर्चा करून आम्ही समजून घेतले. केवळ कम्युनिकेशन गॅपमुळे निर्माण झालेल्या गैरसमजातून त्यांनी ही तक्रार केली गेल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तक्रारदाराशी होणाऱ्या प्रत्यक्ष भेटी आणि चर्चांदरम्यान त्याच्याकडून मिळालेला प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे. लवकरच ते तक्रार मागे घेतील असा विश्वास वाटतो’ अशा आशयाचा तो फॅक्स पाठवला तेव्हाच थोडं रिलॅक्स वाटलं. प्रश्न सुटला नसला तरी त्याची बोच तात्पुरती तरी थोडी कमी झाली होती. तरीही वखरेसाहेब पूर्णत: स्वस्थ नव्हतेच. कारण हा अर्धविराम होता. ते मिटींगला निघण्यापूर्वी या प्रकरणाला पूर्णविराम मिळणंच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. आणि… अर्थातच माझ्यासाठीही!
दिवसभराची सगळी कामं मार्गी लावून खूप थकल्यानंतर संध्याकाळी उशिरा मी वखरेसाहेबांच्या केबिनमधे गेलो ते उद्या सकाळी सहस्त्रबुद्धेंना भेटायला जाईन तेव्हा त्यांना काय सांगायचं हे ठरवूनच. पण मी जे ठरवलंय ते वखरेसाहेबांना योग्य वाटेल? कारण ते अंमलात आणणं म्हणजे थोडीतरी झळ प्रभूदेसाईना लागणं अपरिहार्यच होतं. ते वखरेसाहेबांना योग्य वाटलं नाही तर… ?
आम्ही चमत्काराना शिरोधार्य मानून त्यांच्या सबळ पुराव्यांची मागणी आजपर्यंत कधीच नाही केली. म्हणून परंपरेनं घालून दिलेल्या अंधार वाटेनं चाचपडत चालताना होणा-या ससेहोलपटीला सामोरे जाताना होणारी आमची दुर्दशा आम्हालाच बघवत नाही. तरी ही आम्ही भाकडकथांचा आमच्या मनावर असणारा पगडा आव्हेरून सत्य शोधण्याचा प्रयास का करत नाही. हा ही एक चमत्कारच मानायला हवा.
नवनव्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असणा-या घटनांच्या माध्यमातून मिळणारा समयसूचकतेचा शहाणपणा आमच्यात आत्मविश्वास निर्माण करतच नाही. पण नवसासायासाना आणि प्रत्यक्षानुभुती न देणा-या चमत्काराना मात्र सहज मान्य करून त्यांच्याच भरवशावर आपण अफाट विश्वास ठेऊन डळमळीत पायावर जीवनाचा मजबूत आरसेमहाल उभा केल्याच्या आनंदात उत्साहाने वावरत असतो. मग अचानक निर्माण होणा-या वादळाने सारेच जमीनदोस्त होते तेव्हा दैव नावाच्या जुन्या अनभिज्ञ संकल्पनेला उरी कवटाळून आरण्यरुदन करत माथेफोड करून घेतो. पण हे असेच का करतो ते तरी आपल्याला कळते का?
परंपरा, लोकमानस आणि जनरहाटीच्या नावाखाली आपल्यावर लादलेल्या आंधळ्या संस्कारांच्या कर्मकांडातूनच आपण त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत रहातो. हा ही एक चमत्कारच नाही का?
युगानुयुगाच्या आमच्यावर लादल्या गेलेल्या काल्पनिक चमत्काराच्या विळख्यातून आमचा समाज कालत्रयी मुक्त होणार नाही इतका प्रबळ कसा झाला आहे तेच कळत नाही.
मती गुंग करणारे चमत्कार मानवी जीवनाला समाधान मानून घेण्यासाठी मिळालेला एक शापच आहे हे स्पष्ट दिसत असूनही तो मान्य करायला आपले मन धजतच नाही. हा ही एक चमत्कारच आहे.
तो मानवी जीवनाच्या सुरुवातीपासूनच मानवाच्या मानगुटावर विराजमान झाला आहे. जेव्हा तो आपले मानगूट सोडेल तेव्हाच आपण समर्थ, बलशाली आणि आत्मनिर्भर बनू असे कुणालाच कसे वाटत नाही.
☆ “मानुषप्राण्यापासून माणूस होण्याचा प्रवास” ☆ श्री जगदीश काबरे ☆
मनुष्य हा जिवंत प्राणी असला, तरी केवळ जैविक प्रक्रिया आणि प्रेरणांनी चालणारे यंत्र नाही. भूक लागली की अन्न घेणे, तहान लागली की पाणी पिणे, किंवा लैंगिक प्रेरणेने प्रेमसंबंध निर्माण करणे, हे सर्व नैसर्गिक आहे. पण या कृतींमध्ये केवळ शारीरिक क्रिया असेल तर त्यात ‘मानवता’ नसते. आपण या कृती सराईतपणे करतो, पण एकवेळ अशी येते की आपल्या मनात “का? ” हा प्रश्न उभा राहतो. आपण का जगतो, का खातो, का पितो, का प्रेम करतो, का द्वेष करतो, हे प्रश्न पडणे ही आपल्या माणूसपणाची सुरूवात असते. यंत्राला “का? ” विचारता येत नाही; ते फक्त ‘कार्य’ करते, पण मानव विचार करतो. विचारच त्याला जैविकतेच्या पलीकडे घेऊन जातो.
“का? ” हा प्रश्न म्हणजे सज्ञानतेचा प्रारंभ आहे. एकदा हा प्रश्न पडला की सर्व अनुभवांवर एक नवा प्रकाश पडतो. भूक लागली म्हणून खाणे आणि पोषणासाठी खाणे यात फरक जाणवतो. प्रेम हे केवळ शारीरिक नसून भावनिक आणि बौद्धिकही आहे, हे कळते. प्राण्यांमध्ये सर्वसाधारणपणे दोनच लिंग का आहेत? ” हा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा जैविक रचनेपलीकडे जाऊन प्रजोत्पादन, समाजरचना, आणि लैंगिकतेच्या नैतिक-मानसिक अर्थाचा शोध सुरू होतो. अशा वेळी आपण “यंत्र” नसतो, तर “चेतन प्राणी” बनतो.
मानवाचा विकास हा या ‘का? ’ च्या शोधामुळेच झाला आहे. आदिमानव आकाशातील वीज, पाऊस, आग, तारे, मृत्यू, जन्म या सगळ्यांविषयी का, कसे, कशासाठी, असे प्रश्न स्वतःलाच विचारत गेला आणि त्यातून वैज्ञानिकता जन्माला आली. विज्ञान म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत. धर्म, परंपरा, आणि समाजरचना अनेकदा उत्तरं देतात, पण विज्ञान प्रश्न विचारतं. कारण “का” विचारण्यातच प्रगती आहे. आपण जेव्हा भौतिकतेच्या पलीकडे विचार करतो, तेव्हा आपल्याला मानवतेची खरी किल्ली सापडते.
विज्ञान आपल्याला मानवतेकडे नेणारा मार्ग आहे. ते केवळ यंत्रे निर्माण करत नाही, तर आपल्या विचारांना सज्ञान बनवतं. विज्ञानामुळे आपण शरीर, मन आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधाचा अर्थ शोधतो. “यंत्र” म्हणून शरीराचं महत्त्व नाकारायचं नाही; शरीर म्हणजे आपल्या अनुभवांचं माध्यम आहे. पण शरीराच्या मर्यादेपलीकडे जाणारा विचार म्हणजेच माणूसपण. शरीराला भूक लागते, पण मनाला ज्ञानाची भूक असते. शरीर तहानेने पाणी मागतं, पण मन ज्ञानाची तहान बाळगतं. शरीर लैंगिकतेने प्रेम व्यक्त करतं, पण विचारांच्या उंचीवर ते सर्जनशीलतेत आणि करुणेत रुपांतरित होतं.
यंत्राला आदेश दिले की ते चालतं; पण माणूस विचार करून स्वतःचे आदेश ठरवतो. हीच त्याची ओळख आहे. जर आपण विचार थांबवले, प्रश्न विचारणे थांबवले, तर आपण पुन्हा यंत्र होतो… समाज, धर्म, बाजार किंवा राजकारण यांच्या नियंत्रणाखाली चालणारे यंत्र. पण “का? ” हा प्रश्न विचारणारा माणूस मुक्त असतो. तो कोणत्याही धर्माचा अंधानुयायी राहत नाही, कोणत्याही जात-लिंग-धर्माविषयी द्वेष बाळगत नाही, कारण त्याला समजतं की द्वेषाचं मूळ अज्ञानात आहे. “मला परधर्मीयांचा राग का येतो? ” असा प्रश्न पडतो, तेव्हा आपण आपल्या भीती, संस्कार, आणि इतिहासाकडे पाहू लागतो. त्या प्रक्रियेतून आपण स्वतःला घडवत मानवतेकडे पोहोचतो.
“का? ” हा प्रश्न म्हणजेच आत्मजागृती. तो प्रश्न आपल्याला स्वार्थातून परमार्थाकडे, अंधश्रद्धेतून विवेकाकडे, आणि यंत्रमानवतेतून खऱ्या मानवतेकडे नेतो. विज्ञान म्हणजे या प्रवासाची दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. विज्ञान सांगतं की सर्व गोष्टींचं कारण असतं, प्रत्येक क्रियेला परिणाम असतो, आणि सर्व विश्व एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणूनच विज्ञान आपल्याला अंधानुकरणापासून वाचवतं, आणि प्रश्न विचारायला शिकवतं.
मानवाचा उत्क्रांती प्रवास हा शरीराच्याच नव्हे तर विचारांच्याही उत्क्रांतीचा आहे. एकेकाळी आपण फक्त अन्नासाठी जगत होतो, पण आज आपण अर्थपूर्ण जगण्यासाठी धडपडत असतो. या प्रवासात “का? ” हा प्रश्नच आपल्याला चालना देतो. शरीर मर्यादित आहे, पण विचार अमर्याद आहे. शरीर मरण पावते, पण विचार जिवंत राहतात. म्हणूनच विचारविश्वात रममाण होण्यात खरी मजा आहे. तिथे आनंद भौतिक सुखांपेक्षा गहिरा असतो, कारण तो ज्ञानातून, सत्याच्या शोधातून मिळतो.
विज्ञानसाक्षरता म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील प्रयोग नव्हे, तर जीवनाकडे विवेकाने पाहण्याची वृत्ती. “का? ” विचारणं म्हणजेच विज्ञानसाक्षरतेचा पाया. प्रत्येक प्रश्न आपल्याला नव्या उत्तराकडे, नव्या शोधाकडे घेऊन जातो. आणि या सततच्या शोधामुळे आपण यंत्रापेक्षा श्रेष्ठ होतो. कारण आपण फक्त जगत नाही, तर “जगण्याचा अर्थ” शोधतो.
माणूस म्हणून आपली खरी ओळख त्याच्या विचार करण्याच्या शक्तित आहे. आपण खाणं, पिणं, प्रजनन करणं या क्रिया केवळ शरीरासाठी करतो; पण विचार करणे, प्रश्न विचारणे हे उन्नतीसाठी करतो. शरीर जगण्यासाठी आहे, पण विचार हे जीवनाचं कारण आहेत. म्हणूनच “का? ” हा प्रश्न पडणं म्हणजे प्राण्यापासून मानवाकडे झालेला प्रवास आहे. विज्ञान हा त्या प्रवासाचा धागा आहे, जो आपल्याला ज्ञान, करुणा, आणि मानवतेकडे नेतो. शरीर, यंत्र, जग ही सर्व साधनं आहेत; पण विचार हेच अंतिम साध्य आहे. त्या विचारविश्वात रममाण झाल्यावरच आपण खऱ्या अर्थाने “माणूस” होतो.
हि काही दोघांच्या मधली तुलना नाही. पण फोन आणि वयानुसार माणसाचं वागणं यात काही साम्य आहे का असा विचार.
फोनचे वेगवेगळे, बदलत जाणारे लँँडलाईन, काॅर्डलेस, मोबाईल असे प्रकार आपण पाहिले, कदाचित अजून काही बघायला मिळतील. याच पध्दतीने आपणसुध्दा बालपण, तारुण्य, म्हातारपण अशा माणसाच्या अवस्था पाहिल्या आहेत. आणि आपल्याच बाबतीत अनुभवल्या आहेत. आपलंंच म्हातारपण अनुभवणार आहोत.
फोन ज्या पध्दतीने आणि क्रमाने बदलत गेले अगदी त्याच क्रमाने नाही, पण त्यांचा वापर होतो त्या पध्दतीने वयानुुसार माणसाच्या वागण्यात बदल होतो असं वाटलं.
काॅर्डलेस फोन. हा चालता फिरता वापरता येतो. पण त्याची एक मर्यादा असते. एका ठराविक मर्यादेच्या बाहेर आपण त्याला नेत नाही. आपलं बालपण असं काॅर्डलेस फोन सारखं असतं. घरातले, शेजारचे हे हौसेने कडेवर, छोटी छोटी पावलं टाकत त्यांच्यासोबत नेतात.
किंवा शाळेत जायला लागल्यावर घराबाहेर पण हाकेच्या अंतरावर असतो. एका मर्यादेत असतो. म्हणून बालपण हे काॅर्डलेस फोन सारखं असतं.
हा फोन चार्ज करावा लागतो. लहानपणी आपण इतरांच्या कडेवर जरी असलो तरी काहीवेळानंतर आई जवळ जाण्याची धडपड करतो. ते एक प्रकारचं चार्जींगच असतं.
मोबाईल फोन, म्हणजे आपलं तारुण्य. हा कसा केव्हा, कुठेही, कधीही नेता येतो. तसंच तारुण्यात आपण मनसोक्त फिरत असतो. अगदी गावाच्या या कोपर्यापासून त्या कोपर्यापर्यंत. वेळेची पर्वा न करता.
आणि आता लँडलाईन. म्हणजे उतारवय. आपण अजून या अवस्थेत गेलो नाही. पण घरात आपण हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. लँडलाईन कसा एकाच जागेवर असतो. हलवला तरी जास्त लांब जात नाही. तसंच हे आयुष्य असतं. बसण्या उठण्याच्या, फिरण्याच्या जागा ठरलेल्या असतात. हाॅल, बेडरूम आणि गॅलरी. किंवा घरापुढची मोकळी जागा. तीसुद्धा असेल तरच. आणि वेळ सुध्दा ठराविक, किंवा ठरवून दिलेली.
बोलायचं असेल तर या फोन जवळच जावं लागतं. लांबून बोलता येत नाही. कधी कधी तर थोडं वरच्या आवाजात बोलावं लागतं. तो वाजला तर बोलणं ऐकायलाही त्याच्या जवळ जावं लागतं. अगदी सगळ तसंच उतारवयात असतं.
अगदि सुरुवातीला जेेव्हा लँडलाईन आले तेव्हा डायल करुन फोन लावता येत नव्हता. तर आपल्याला कोणता नंबर लावायचा आहे हे ऑपरेटरला सांगायला लागायचं. म्हणजेच संभाषणासाठी गरज असायची ती एका मधायस्थाची. उतारवयात कमी ऐकायला येेत त्यामुुळे तिथेही समोरचा काय म्हणतोय, आणि आपल्याला काय सांगायचं आहे. यासाठी कधीकधी अशा मध्यस्थाची गरज वाटते.
लँडलाईनवर फोन करतांना किंवा आल्यावर काहीवेळा आपल्याला दुसर्याच दोन जणांत संभाषण सुरु असल्याच असंच लक्षात यायचं. क्राॅस कनेक्शन असं याला म्हणायचो. हे क्राॅस कनेक्शन उतारवयात सुध्दा अनुभवायला येतं. आपण यांना सांगत काही असतो. आणि वेगळाच विचार किंवा तर्क करत ते काही वेगळच विचारतात नाहीतर ऊत्तर देतात. परत बरोबर आहे नं. असं समोरचा आणि आपण दोघांनाही एकदम विचारतात. यावर आपल्याकडे ऊत्तर नसतं. असं सगळंकाही उतार वयात होतं. म्हणून उतारवय हे लँडलाईन सारखं वाटतं.
खरखर हा लँडलाईन वर बोलतांना कायम येणारा अनुभव. तो अनुभव सुुध्दा उतारवयात येतो. फक्त लँडलाईन वरची खरखर ही फोनमधली असायची. उतारवयातली बोलण्यातच असते.
अशा पध्दतीने फोनचे बदलत गेलेले प्रकार आणि वयानुसार बदलत जाणाऱ्या आपल्या आयुष्यात काही साम्य आहे का. असा विचार करत होतो.
सालूमरादा थियाक्का यांचे १५/११/२५ रोजी निधन झाले. त्यानिमित्त विशेष लेख:
सामान्यांतील असामान्य
मुख्यमंत्र्यांचा एक लाख झाडे लावण्याचा संकल्प, वनराई संस्थेने माळरानावरती ६००० झाडे लावली, तर कोणी आपल्या ६१ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त सहाशे दहा तुळशीची रोपे भेट म्हणून दिली. अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. अर्थात यातील किती झाडे जगली, याची बातमी कधीच होत नाही, ही गोष्ट वेगळी. आरंभशूर सगळेच असतात. पण नंतर लागणारे सातत्य, कष्ट विसरतात. हे सांगण्याचे कारण मध्यंतरी वाचनात आलेली एक बातमी. नुसती बातमी नव्हे तर सत्यकथा आहे. घडली आहे. घडत आहे आणि पुढे घडत राहण्याचे शाश्वती देणारा मार्ग दाखवणारी आहे. धडा देणारी स्त्री आहे सालूमरादा थियाक्का.
एका निरक्षर घरात जन्माला आली. मोलमजुरी करणारा पती मिळाला. मूलबाळ झालं नाही. पण या दुःखाचा कोणताही बाऊ न करता घराजवळील हायवेवर या माऊलीने ३८५ पेक्षा जास्त वडाची झाडे लावली आहेत. नवऱ्याची ही साथ मिळाली. रणरणत्या उन्हातही लोकांना सावली देत ही झाडे डौलाने उभी आहेत. झाड लावून त्यांचे पोटच्या मुलांप्रमाणे दोघांनी काळजी घेतली. त्या सगळ्या झाडांची माता ती झाली. एवढेच नव्हे तर आज पर्यंतच्या आयुष्यात ८००० झाडे तिने लावली. मुलबाळ नाही या दुःखात रडत न राहता ८००० पेक्षा जास्त ठणठणीत आणि सुस्थितीत असलेल्या समाज उपयोगी मुलांची आईच ती झाली. १०० मुले असलेल्या गांधारी पेक्षाही ती श्रेष्ठ ठरली.
आजचे तिचे वय विचारले तर १०६ वर्षे पूर्ण. गेले ८० वर्षे सतत ती वृक्षारोपणचे काम करते आहे. पर्यावरण, हरित परिणाम, प्रदूषण, ऑक्सिजनचे प्रमाण इत्यादी कोणत्याच गोष्टीशी तिचे कोणतेच देणेघेणे नाही. तरी निष्ठेने तिने हे काम केले. तिला कल्पनाही नसेल, ही झाडे पुढे कित्येक पिढ्यांचा आधार होणार आहेत. निवडलेली झालेली वडाची, भरपूर ऑक्सिजन देणारी आणि कायम हिरवीगार असणारी, पारंब्यातून पुनर्लागवड करणारी आहेत. एकदा रुजली की त्यांची काहीही सेवा करावी लागत नाही. रामाने सेतुबांधताना छोट्या खारीने आपल्या वाटा उचलला. त्यासाठी तिला कोणतेही आमंत्रण द्यावे लागले नाही, की मोबदला द्यावा लागला नाही. तसेच आपले काम निरपेक्ष बुद्धीने करून लोकांपुढे आदर्श ठेवणारी थियाक्का. अक्षर ओळख नाही म्हणून निरक्षर असते तरी सुशिक्षितच म्हटली पाहिजे. कृतीतून तिने दाखवून दिले की वय हा एक आकडा असतो. आयुष्य किती जगता यापेक्षा कसं जगता याला महत्त्व आहे. थियाक्काने दोन्ही साधलं.
आपला सत्कार होईल बक्षीस मिळेल, याची काही तिला जाणीवही नव्हती. आणि अचानक भारत सरकारचे निमंत्रण आले. काय वाटले असेल तिला, ती बावरली असेल. तिला नकोसे वाटली असेल. पण लोकाग्रहास्तव तिला ते स्वीकारावे लागले असेल. भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने तिला सन्मानित केले. खरंतर भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराचाच मान वाढवला. कार्यक्रमाचे वेळी राष्ट्रपतींचे डोक्यावर तिने मायेने हात फिरवला. तो दिवस होता १६ मार्च २०१९. राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद.
नवीन इकोसिस्टीम जन्माला घालणारी ती खरी कर्मयोगी. पोटा पाण्यापुरती मोलमजुरी करून झाडांना जगण्याचे काम तिने निस्वार्थपणे केले. कर्मयोग काय असतं दाखवून दिले. शेतात काम करणाऱ्या बहिणाबाई चौधरीनी आपल्या अहिराणी भाषेतील काव्यातून ज्ञानयोग सांगितला. जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. त्या ज्ञानयोगी ठरल्या. चोखा महाराच्या पत्नीने सोयराने नवऱ्याच्या ग्राम स्वच्छतेच्या शूद्राच्या व्यवसायात मदत करून भक्तियोग साधला. अनेक अभंग तिने लिहिले. प्रत्यक्ष भेटूरायाचे दर्शन कधीही झाले नाही. तरी समाधानी राहिली. अशा या स्त्रिया आणखीही आहेत आणि होतील. पण सामान्यात निर्माण होऊन असामान्य ठरल्या. सामान्यांच्या मार्गदर्शक झाल्या.
☆ तुमचा बॉस हरमनप्रीत कौरसारखा असेल तर? – मूळ लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर ☆
२ नोव्हेंबरला भारताने इतिहास घडवला. २०२५च्या विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल जिंकून.
प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा क्षण. स्त्रियांच्या क्रीडाक्षेत्रातील ऐतिहासिक क्षण.
फटाके, जयघोष आणि तिरंगी सोहळ्यावर मात केली एका छोट्याशा कृतीने.
संघाच्या विजययात्रेच्या वेळी कप्तान हरमनप्रीतने एक असामान्य गोष्ट केली – तिने दोन ख्यातनाम महिला क्रिकेटपटूंना आमंत्रित केले. झूलन गोस्वामी आणि मिताली राज या त्या दोन निवृत्त दिग्गज क्रिकेटपटू. त्यांच्या हातात विश्वचषक देऊन हरमनप्रीतने त्यांनाही विजययात्रेत सामील करून घेतलं.
या एकाच कृतीने नेतृत्वसंस्कृतीचं एक उत्तम उदाहरण जगासमोर सादर केलं.
या एका साध्या कृतीमुळे तिचे नेतृत्वगुण झळाळून उठले.
हरमनप्रीतने त्यांच्याकडे ‘भूतकाळ’ म्हणून नाही, तर ‘पाया’ म्हणून बघितलं. त्यांनीच तर या पिढीला स्वप्नं बघायला उद्युक्त केलं होतं.
त्यांना आमंत्रित करून तिने जे उदाहरण घालून दिलं, त्यामुळे तिची उंची कमी झाली नाही, उलट कित्येक पटींनी वाढली. कारण स्वतःला सुरक्षित समजणारा नेताच आपल्या प्रकाशझोतात इतरांना सहभागी करून घेतो.
आणि हे करून तिने स्वतःच्या संघाला मौल्यवान देणगी दिली – विश्वास, नम्रता आणि संघवृत्तीची संस्कृती.
आता, आपण क्रिकेट थोडं बाजूला ठेवून आपल्या कामाच्या जागेकडे वळूया.
आजकाल बऱ्याच ऑफिसांतील नेते असुरक्षित कप्तानाप्रमाणे वागतात.
ते इतरांचे योगदान कमी लेखतात. त्यांना मान्यता दिलीच तर हातचं राखून देतात. एखादा चांगली कामगिरी करतोय, असं वाटलं, तर त्यांना आपलं महत्त्व कमी होण्याची भीती वाटते.
आणि मग त्यांना आश्चर्य वाटतं, की ‘आपली टीम उत्साही, कार्यप्रवृत्त का नाही? ‘
उत्तर सोपं आहे. कार्यसंस्कृती ही वरून खाली झिरपत असते.
जर नेता राजकारण करत असेल, तर त्याची टीम धोका पत्करायला तयार होणार नाही.
जर नेता सगळ्यांचं श्रेय स्वतःकडे घेत असेल, तर त्याच्या टीममधील लोक कामाची जबाबदारी घेणं टाळतात.
जर नेता इतरांचं यश साजरं करत नसेल, तर टीम यश साजरं करणं सोडूनच देते.
निकृष्ट नेतृत्वामुळे सामर्थ्यशाली टीमचाही विचका झालेला मी अनेकदा पाहिला आहे. याचं कारण कौशल्याचा अभाव नसून मानसिक सुरक्षिततेचा अभाव हेच आहे.
जेव्हा नेत्याचं वागणं विश्वासाऐवजी भीतीवर आधारित असतं, तेव्हा त्याच्या टीममधील लोकांचं कौशल्य, हुशारी विझून जाते.
कल्पना करा, जर हरमनप्रीतने विश्वचषक हातात घेऊन फक्त आपल्या संघासमवेत फेरी मारली असती, ते उज्ज्वल यश स्वतःच मिरवलं असतं, तर त्यातून ‘हा माझा विजय आहे’, हा संदेश जगाला मिळाला असता.
पण झूलन आणि मितालीला त्यात सामील करून तिने ‘माझ्या विजया’चं रूपांतर ‘आपल्या परंपरे’त केलं.
संस्कृती अशीच घडत असते – विशिष्ट कार्याविषयीच्या वक्तव्यामुळे ती निर्माण होत नाही, तर यासारख्या नम्र क्षणांनी ती विकसित होत असते.
कॉर्पोरेट नेत्यांना त्या विजययात्रेपासून बरंच काही शिकण्यासारखं आहे.
खरे नेते त्यांच्या टीमशी स्पर्धा करत नाहीत, ते त्यांना पूर्णत्व देतात.
ते पुष्टीकरणाच्या पाठी धावत नाहीत, ते निष्ठा निर्माण करतात.
त्यांना आपली जागा कोणी घेईल, अशी भीती वाटत नाही, उलट ते आपली जागा घेऊ शकतील, अशी माणसं तयार करतात आणि त्यांचा आदर करतात.
अशा तऱ्हेने कायम टिकणारी कार्यसंस्कृती तयार होते, जिथे यश हे एकदाच घडणारी घटना नसते, तर ती एक सातत्यपूर्ण परंपरा असते.
मी जेव्हा झूलन आणि मितालीला साश्रू नयनांनी तो चषक उंचावताना बघितलं, तेव्हा माझ्या मनात एक विचार चमकून गेला – नेतृत्व म्हणजे चषक मिळवणं नव्हे, तर तुमच्यासमवेत चषक धरण्यासाठी कोण योग्य आहे, याची जाण असणं, हे खरं नेतृत्व.
अशाच प्रकारे तुम्ही असा संघ तयार करू शकता, जो फक्त एकदाच जिंकून थांबणार नाही, तर तो नेहमी जिंकतच राहील, तुम्ही गेल्यानंतरही.
आणि त्या एकाच कृतीमुळे हरमनप्रीतने फक्त विश्वचषकच जिंकला असं नाही, तर तिने त्याहूनही दुर्लभ अशी गोष्ट जिंकली – मनं आणि आदर – तिच्या संघाचा आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांचा.
मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात
मराठी अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ काय हवे? विद्वत्ता की चातुर्य? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
काय हवे:विद्वत्ता की चातुर्य?
*
माझे एक मित्र आहेत, नाव त्यांचे पंडित.
आणि या पंडित नावाच्या मित्राचा जेव्हा जेव्हा फोन येतो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात एक विचार येतो आणि लगेच कविवर्य मोरोपंतांच्या एका सुभाषितातल्या ओळींची आठवण होते:
”केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार।
शास्त्रग्रंथविलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार।।”
मी स्वतःशीच हसतो, कारण मोरोपंतांनी ‘पंडित मैत्री’तून मनुष्याला चातुर्य येतं असं सांगितलं आहे. गंमत थोडा वेळ बाजूला राहू देऊ पण माझ्या मनात एक प्रश्न नेहमी घोळत राहतो. तो हा की. मोरोपंत हे स्वतः इतके मोठे विद्वान असूनही त्यांनी या चार मार्गातून मिळणाऱ्या अंतिम फळाला ‘विद्वत्ता’ न म्हणता, ‘चातुर्य’ (Practical Wisdom) असे का म्हटले असेल बरं? त्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षाही काहीतरी अधिक महत्त्वाचे सांगायचे आहे, हे निश्चित!
येथेच विद्वत्ता आणि चातुर्य यातील सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक स्पष्ट होतो, जो जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. विद्वत्ता आणि व्यावहारिक चातुर्य यातील फरक स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट बऱ्याच वेळा सांगितली जाते. आपल्यापैकी बहुतेकांनी ती वाचलीही असेल. एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते. अनेक शास्त्र आणि ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता. एकदा ते नदी ओलांडण्यासाठी एका नावाड्याच्या बोटीत बसले.
नावेत बसल्यावर पंडितजींनी नावाड्याला विचारले, “अरे, तू कधी व्याकरण, तत्त्वज्ञान किंवा धर्मशास्त्र वाचले आहेस का? “
नावाड्याने नम्रपणे उत्तर दिले, “महाराज, मला हे काहीच माहीत नाही. “
पंडितजी उपहासाने म्हणाले, “तुझ्या आयुष्यातील पाव भाग तर व्यर्थ गेला! “
थोडे पुढे गेल्यावर नदीत अचानक वादळ आले आणि बोट डळमळू लागली.
घाबरलेल्या नावाड्याने पंडितजींना विचारले, “महाराज, तुम्हाला पोहता येते का? “
पंडितजी घाम पुसत म्हणाले, “मी फक्त शास्त्रे वाचली आहेत; मला पोहता येत नाही! “
यावर नावाड्याने शांतपणे उत्तर दिले, “महाराज, तुमचे तर पूर्ण आयुष्यच व्यर्थ गेले! कारण ही बोट बुडणार आहे. “
ही कथा आपल्याला सांगते की, केवळ ‘ज्ञान’ (विद्वत्ता) पुरेसे नसते, तर ते ज्ञान आणि त्यासोबत जगण्याचे ‘व्यवहारिक शहाणपण’ (चातुर्य) असणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्वान माणूस आपल्या विषयात पारंगत असतो, पण अनेकदा तो जगापासून, व्यवहारापासून आणि ‘लोकांच्या स्वभावा’पासून अनभिज्ञ असतो. तो आपल्या ग्रंथसिद्ध भूमिकेवर किंवा नियमांवर ठाम असतो. तो ‘जे योग्य आहे’ तेच करायचा हट्ट धरतो.
याउलट, चतुर माणूस लवचिक भूमिका घेतो. चतुर माणूस आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता परिस्थितीनुसार, वेळेनुसार आणि समोरच्या व्यक्तीनुसार आपली रणनीती बदलतो. ही लवचिकता म्हणजे नैतिकतेचा त्याग नव्हे, तर उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करण्याचे व्यावहारिक ज्ञान आहे. तो ‘काय करायचे आहे’ (Aim) यावर लक्ष केंद्रित करतो, तर विद्वान ‘कसे करायचे’ (Process/Rule) यावर ठाम राहतो. विद्वत्ता आपल्याला ज्ञान देते, पण चातुर्य आपल्याला ते ज्ञान वापरण्याची कला शिकवते.
मोरोपंत वरील श्लोकात चातुर्य मिळवण्यासाठी चार मार्ग सांगतात, आणि ते सर्व केवळ ग्रंथपठणाचे मार्ग नाहीत, तर प्रत्यक्ष जीवनातील अनुभवाचे मार्ग आहेत: देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार आणि शास्त्रग्रंथविलोकन. या चार क्रियांमध्ये मोरोपंत केवळ शास्त्रग्रंथ वाचून पांडित्य मिळवण्याऐवजी, देशाटन, मैत्री आणि सभेतला संचार यांसारख्या प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारी चातुर्य प्राप्त करण्यावर भर देतात.
चांगदेव महाराजांनी तब्बल १४०० वर्षे तपश्चर्या केली. त्यांची प्रचंड विद्वत्ता आणि कठोर साधना यामुळे लक्षात येते. मात्र, ज्ञानेश्वरांना पाठवलेल्या पत्रात मायना काय लिहावा हे एवढ्या मोठ्या विद्वान संताला कळू शकले नाही. जेव्हा ते संत ज्ञानेश्वरांना भेटायला वाघावर बसून आले, तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांना चक्क भिंत चालवून प्रती-उत्तर दिले. १४०० वर्षांच्या तपश्चर्येनंतरही त्यांना व्यावहारिक शहाणपण (चातुर्य) आले नव्हते, हे या प्रसंगातून स्पष्ट होते.
बिरबल हा अकबराच्या दरबारातील ‘विद्वान’ असण्यापेक्षा ‘चतुर’ (Wise) म्हणून अधिक प्रसिद्ध होता. त्याने दरबारातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी मानवी स्वभावाचे अचूक निरीक्षण केले आणि हजरजबाबीपणा वापरला. मानवी मनाचा त्याचा अभ्यास उत्तम होता. त्याचा वापर करण्यातून त्याचे चातुर्य दिसून येते.
श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे चातुर्याचा आदर्श नमुना आहे, कारण त्यांनी वेळप्रसंगी घेतलेली लवचिक भूमिका. जेव्हा त्यांना जाणवले की बलवान अशा जरासंधासमोर उघडपणे टिकाव लागणे शक्य नाही, तेव्हा त्यांनी आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी मथुरेहून द्वारकेला स्थलांतर केले. त्याचप्रमाणे, कालयवनापासून बचाव करण्यासाठी त्यांनी रणांगणातून पळ काढला आणि प्रसंगी ‘रणछोड’ हे नाव आनंदाने स्वीकारले. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने ‘युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म’ म्हणून लढून प्राण दिला असता; पण श्रीकृष्णाने तत्त्वांची तडजोड न करता धर्माचे रक्षण करण्यासाठी रणनीतीत लवचिकता आणली. अशा प्रकारची लवचिकता छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा अनेक प्रसंगात दाखवली. परंतु महाभारत युद्धात भीष्माचार्य, द्रोणाचार्य किंवा कृपाचार्य यांना ती दाखवता आली नाही. आपल्या तत्त्वांना किंवा प्रतिज्ञाला थोडी मुरड घालून त्यांनी अधर्माची बाजू सोडली असती तर त्यांच्यासारखे महान कोणी ठरले नसते. परंतु तसे न केल्यामुळे त्यांचा रणांगणामध्ये अंत झाला. अगदी रामायणातील हनुमान सुद्धा चातुर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ही सांगितलेली सगळी माणसे विद्वान, बुद्धिमान तर होतीच परंतु विद्वत्ता आणि चातुर्य त्यांच्या व्यक्तिमत्वात हातात हात घालून चालत होते. आणि नेमके हेच आपल्या शिक्षण पद्धतीने करणे अपेक्षित आहे.
आजच्या शिक्षण पद्धतीकडे पाहता अनेकदा असे जाणवते की, आजची शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना ज्ञान देते, पण त्यांच्यात व्यावहारिक शहाणपण निर्माण करण्यात कमी पडते. (Knowledge comes but wisdom lingers) अशी परिस्थिती निर्माण होत आहे. पुस्तकी ज्ञान (विद्वत्ता) मिळते, पदवी मिळते पण मिळालेले ज्ञान कसे वापरावे याचे व्यावहारिक शहाणपण (चातुर्य) येण्यास वेळ लागतो.
मोरोपंतांनी याच व्यावहारिक चातुर्यावर भर दिला. म्हणूनच, ते आपल्याला ‘विद्वान’ होण्यापेक्षा ‘चतुर’ (Wise) होण्याचा संदेश देतात. जीवनात पुढे जाण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, आणि आनंदी राहण्यासाठी ही व्यावहारिक बुद्धिमत्ता किंवा चातुर्यच खरे उपयुक्त ठरते.
आज आपल्या हातात माहितीचा अपार साठा आहे, ज्ञानाचे दरवाजे उघडे आहेत; पण जीवन जगताना, निर्णय घेताना, नाती सांभाळताना, आणि संकटांचा सामना करताना आपल्याला मदत करते ते चातुर्य, म्हणजेच व्यावहारिक शहाणपण. मोरोपंतांनी शतकांपूर्वी दिलेला संदेश आजही तितकाच लागू आहे — विद्वत्ता महत्त्वाची आहेच, पण चातुर्य त्याहूनही महत्त्वाचे!
म्हणूनच,
चला, फक्त जाणकार न बनता, जाणिवेने वागणारे बनूया!
फक्त माहिती गोळा न करता, त्या माहितीचे जीवनात रूपांतर करू या!
(पूर्वसूत्र- दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहस्त्रबुद्धे आजोबांच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा मनात विचार होते ते आता त्यांच्याशी काय बोलायचं याचेच. मनातली हतबलता कधीच विरून गेली होती. अनिश्चिततेचा तर लवलेशही नव्हता. हीच पुढे घडू पहाणाऱ्या चमत्काराची सुरूवात आहे याची मात्र मला त्याक्षणी कल्पनाही नव्हती!)
सहस्त्रबुद्धे आजोबांनीच दार उघडलं. ‘या’ म्हणाले आणि लगबगीने आत गेले. वेळेचा अंदाज घ्यायला मी माझ्या हातातल्या घड्याळकडं पाहिलं त्याच वेळी पाण्याचं तांब्या-भांडं घेऊन बाहेर आलेल्या आजोबांच्या ते नेमकं लक्षात आलं.
“गेले तीन दिवस अशीच वेळेची सर्कस चाललेय तुमची. मी फार त्रास देत नाहीय ना तुम्हाला?”
“अजिबातच नाही. उलट खूप वेळ घेऊन येता आलं असतं तर तेच मला जास्त आवडलं असतं. ” मी मनापासून म्हणालो. आणि ते खरंही होतं. केवळ बँक स्टाफच्या आत्मकेंद्री विचारांमुळे ग्राहक कसे दुखावले जातात आणि बॅंक-व्यवस्थापनालाही त्याचा किती मनस्ताप होत असतो याचा खूप काही शिकवून जाणारा अनुभव बँकिंग क्षेत्रामधल्या माझ्या तोवरच्या दीर्घ वाटचालीत मी प्रथमच घेत होतो. त्यामुळेच त्यादिवशीच्या कटू घटनेमुळे दुखावल्या गेलेल्या सहस्त्रबुद्धे आजोबांना समजून घेणंही आवश्यक आहे असंच मला वाटत होतं.
सहस्त्रबुद्धे आजोबांबद्दल मला कितीही सहानुभूती वाटत असली तरी केवळ त्यांच्या समाधानासाठी मी प्रभूदेसाईंना अतिशय कठोर शिक्षा करू शकणार नव्हतो आणि म्हणूनच आजोबांना अपेक्षित असणारा न्यायही मला देता येणार नव्हता. कारण प्रभूदेसाईंना शिक्षा करायची तर बँकेच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर आरोप ठेवून तो पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाचाच एक भाग म्हणून माझ्यावरच येणार होती. त्यामुळे सहस्त्रबुद्धे आजोबांचं समाधान करायचं तर त्यांना प्रोसेसमधील या अडथळ्यांची जाणीव करून देणं जेवढं आवश्यक होतं तेवढंच अडचणीचंही ठरू शकणार होतं. कारण आजोबा ते ऐकून दुखावले, अस्वस्थ झाले, चिडले तर सगळ्याच प्रकरणाला नकारात्मक कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. ज्या उद्देशाने हे सगळंच प्रकरण आम्ही धसाला लावलं होतं तो उद्देशही पूर्ण झाला नसता ते वेगळंच. त्यामुळे परिस्थिती अतिशय नाजूकपणे हाताळणं आवश्यक होतं. बोलण्यातल्या कौशल्यापेक्षा आजोबांच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधणं गरजेचं आहे असा विचार मी केला. गेल्या तीन दिवसात वेळोवेळी या प्रकरणाबद्दल माझ्या मनात जे जे विचार येऊन गेले ते सगळे अतिशय निखळ स्वरूपात आजोबांपुढे व्यक्त करून त्या पार्श्वभूमीवर यापुढे त्यांनी काय करणं आपल्याला अपेक्षित आहे हेही अतिशय स्पष्ट शब्दात त्यांना सूचवणं हाच एकमेव मार्ग मला योग्य वाटला. याच्या परिणामतः येणारं यशापयश ‘त्या’च्यावर सोपवून मी बोलायला सुरूवात केली.
“आजोबा, खरं सांगायचं तर या सगळ्या प्रकरणाबद्दलचेच विचार गेले तीन दिवस माझ्या मनात ठाण मांडून बसलेले आहेत. तुमच्या दुखावलेल्या भावना, तुम्हाला झालेला मनस्ताप, आणि त्यामुळे तुमच्यासारख्या वयोवृध्द ग्राहकाच्या मनातली बॅंकेची प्रतिमा डागाळली गेल्याच्या विचाराचाच मला खूप त्रास होतोय. खरंतर ग्राहकाला बॅंकेत तत्पर आणि चांगली सेवा मिळावी यासाठी सर्वच बॅंकांमधे काटेकोर नियम आहेत. एखाद्या ग्राहकाने तक्रार केली तर त्याचं तत्परतेने निराकरण होतेय कीं नाही हे पहाण्यासाठी आवश्यक ती यंत्रणाही कार्यरत आहे. खरं सांगायचं तर यामुळेच निर्माण होऊ पहाणारी तक्रार शक्यतो ब्रॅंचपातळीवरच योग्य पध्दतीने हाताळून त्याचं निराकरण करण्याचाच प्रयत्न बहुतेक ब्रॅंचमॅनेजर्स करीत असल्याने स्थानिक पातळीवरच त्याची दखल घेतली जाते.
प्रभूदेसाईंच्या बाबतीत मात्र जे घडलं ते खरंच त्यांच्यासारख्या सूज्ञ माणसांकडून कधीच अपेक्षित नाहीय. ही नकळत झालेली चूक नाहीये. आमच्या साहेबांशी बोलतानाही मी त्यांना जे सांगितलं होतं तेच आज तुम्हालाही सांगतो. ब्रॅंच मॅनेजरच्या दृष्टीने मोठ्या रकमांची डिपॉझिट्स बँकेत ठेवणारे खातेदार हेच महत्त्वपूर्ण ग्राहक असा अपवादात्मक कां असेना पण कांही मॅनेजर्सचा चुकीचा समज असतो. कदाचित त्या दिवशी समोर बसलेल्या अशाच एका कस्टमरला तत्पर सेवा देताना कोणताही अडथळा मधे येऊ नये असा प्रयत्न करत असतानाच प्रभूदेसाईंनी दुसऱ्या ग्राहकावर आपल्याकडून अन्याय होऊ नये याचीही काळजी, केवळ ते ब्रॅंच मॅनेजर होते म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणूनही घ्यायला हवी होती असंच मला वाटतं. विशेषतः तुम्ही बराच वेळ बाहेर ताटकळत बसलाय हे त्यांच्या लक्षातही न येणं हेच चुकीचं होतं. तुम्ही आपणहोऊन पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा केबिनमधे गेलात तेव्हा निदान तिथेच बसलेल्या दुसऱ्या ग्राहकासमोर तरी त्यांनी तुमचं हसतमुखानं स्वागत करून नेमकं काय काम आहे हे विचारून घ्यायला हवंच होतं. एरवी इंटरकाॅमवरून अकाऊंटंना पूर्वकल्पना देऊन तुम्हाला त्यांच्याकडेही ते पाठवू शकले असते. तुमचं एक अगदी साधं काम हातावेगळं करण्यासाठी फक्त दोन मिनिटंही पुरेशी ठरली असती. असं असताना त्यांना ते करावंसं न वाटणं हेच आक्षेपार्ह आहे.
ज्या मन:स्थितीत तुम्ही बॅंकेत आला होतात त्याचा विचार करता प्रभूदेसाईंच्या वागण्या-बोलण्यावरील तुमच्या प्रतिक्रिया कितीही टोकाच्या असल्या तरी त्या नैसर्गिक आणि अपरिहार्य अशाच होत्या… “
ते लक्षपूर्वक ऐकत होते. मी बोलायचं थांबलो तसं भानावर येत त्यांनी चमकून माझ्याकडं पाहिलं. त्यांची ओलसर नजर पाहून मला पुढं काय बोलावं सुचेचना.
“… हे सगळं पुन्हा आठवताना, ऐकताना तुम्हालाही खूप त्रास होतोय हे समजतंय मला आजोबा. पण असं असूनही तुमच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी तुमचं पूर्ण समाधान होईल असं मी काय करायला हवं तेच मला समजत नाहीय ” मी म्हणालो.
” म्हणजे?”
“प्रभूदेसाईंना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करून तुम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे. असं वाटणं यात गैर कांहीच नाही. पण तुम्ही थोडं समजूतीनं घेतलंत तर तुमच्या दृष्टीनं यातून समाधानकारक मार्ग कसा निघेल याचा विचार आपण करू शकू असं मला वाटतं. “
“सबुरीनं घ्यायचं म्हणजे काय करायचं?”
“कोणत्याही कर्मचाऱ्यांने नकळत किंवा जाणीवपूर्वक केलेल्या कुठल्याही चुकीची त्याला काय शिक्षा करायची याचे बँकांचे काही नियम आहेत आणि त्यासाठीची ठराविक प्रोसेसही. त्या बाहेर न जाता प्रभूदेसाईंना त्यांच्याकडून झालेल्या चुकीची स्पष्ट शब्दात कल्पना देऊन त्यांच्या बाबतीत नेमकी काय ॲक्शन घ्यायची हे ठरवावं लागेल. हे सगळं शक्यतो झोनल ऑफिसच्या पातळीवरच झालं तर लगेच अंमलात आणता येऊ शकेल. सर्व अहवाल सेंट्रल ऑफिसला पाठवून त्यांची अनुमती घ्यायची तर त्या प्रोसेसला बराच वेळही लागू शकेल. या दोन्हीपैकी जे करायचं ते तुमचं समाधान होईल असं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. पण जे कांही ठरेल त्याचा अंतिम निर्णय अर्थातच आमच्या डी. जी. एम्. साहेबांचाच असेल. तरीही त्याची पूर्वकल्पना तुम्हाला देऊन तुमची संमती घेण्याचं आश्वासन मी तुम्हाला देतो. “
“ठीक आहे. जे ठरेल ते सांगा मला. त्यानंतर काय करायचं ते मी पाहिन. ” आजोबा कांहीशा नाराजीने म्हणाले.
मी त्यांचा निरोप घेऊन जायला निघालो. पण ही अनिश्चितता अशीच सोबत घेऊन जाणं मला नको होतं. विषय पूर्णतः संपायला हवा होता आणि या क्षणापर्यंत तरी आजोबांचा अॅप्रोच मला निश्चिंत करणारा वाटत नव्हता. मी जाता जाता क्षणभर थबकलो. आजोबा माझ्याकडेच पहात होते.
“जाण्यापूर्वी एकच सांगायचंय. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. अनुभवी आहात. खरंतर मी तुम्हाला कांही सांगणं योग्य आहे की नाही मला माहित नाही. तुम्ही भाविक आहात, दत्त महाराजांच्यावर तुमची श्रद्धा आहे याची मला कल्पना असल्यानेच हे सांगावंसं वाटतंय म्हणून सांगतो.. “
त्यांनी मला आत येऊन बसायची खूण केली. निसटू पहाणारा क्षण जणू अकल्पितपणे क्षणभर थबकला होता. तो घट्ट धरून ठेवत मी ‘त्या’नेच प्रेरणा द्यावी तसं बोलू लागलो….
“कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याचा, चुकीबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार केवळ व्यवस्थेचा एक भाग म्हणून माणसाने स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे नियम ठरवलेले आहेत. त्या नियमांप्रमाणे घेतलेला निर्णय सर्वार्थाने न्याय देणारा असतोच असं नाही. पण या सर्व व्यवस्थेवरही सर्वाधिकार असलेली एक अदृश्य यंत्रणा ‘वर’ कार्यरत असते. सोप्या भाषेत आपण ज्याला ‘देव’ म्हणतो त्या देवाची यंत्रणा. तो पहात असतो सगळं. आणि प्रत्येक क्षणी घडणाऱ्या घटनांचा साक्षीदारही तोच असतो. न्याय देणारा जसा तो तसाच अन्यायाचं निवारण करणाराही तोच. त्या देवाच्या काठीला आवाज नसतो. पण अतिशय योग्य पद्धतीने, कुणाच्याही नकळत, कसलाही गाजावाजा न करता, त्या काठीने होणारा न्यायनिवाडा हा अन्यायचं निराकरण करणारा, अन्याय झालेल्याला खऱ्या अर्थाने न्याय देणाराच असतो. एकच सांगावंसं वाटतं, प्रभूदेसाईंना काय शिक्षा करायची हेही आपण ‘त्या’च्यावर सोपवूया. जे होईल ते योग्यच असेल हा विश्वास असू दे. मी आमच्याकडून जे करणं आवश्यक आणि शक्य असेल ते सगळं करीन. उद्याची आपली भेट असेल ती या विषयापुरती शेवटची असेल हे नक्की. येतो मी… “
त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा माझ्या मनात झिरपणारं समाधान मला दिलासा देत होतं. यापुढं जे घडेल ते ‘तो म्हणेल तसं’ ! तिकडं सहस्त्रबुद्धे आजोबाही असाच विचार करत असतील याची मला खात्री होती.
तरीही त्याची प्रचिती दुसऱ्या दिवशीच मला येणाराय यांची मात्र मला कल्पना नव्हती!!
माझ्या समवयस्क पिढीतील लोकांना लहानपणी हातात पडलेल्या पहिल्या “शिस पेन्सिलीच” त्याकाळी, त्या वयात काय अप्रूप होतं ते नक्कीच आठवत असेल! मला आज बहात्तरीत आठवतंय त्याप्रमाणे तेंव्हा मराठी चौथीपर्यंत काळीशार दगडी पाटी आणि चुन्याची पांढरी षटकोनी किंवा चौकोनी पेन्सिल, यावरच ‘लिहित्या हाताच्या’ बोटांना आम्हां मुलांना समाधान मानावं लागत असे! या वाक्यातील ‘लिहित्या हाताच्या’ या माझ्या शब्दप्रयोगावर आपली वाचनाची गाडी अडखळली असेल, तर त्याबद्दल आपलं समाधान होईल असा खुलासा आधी करतो, म्हणजे मग तुम्ही पुढचा लेख वाचायला आणि मी पुढे लिहायला मोकळा!
आपण म्हणालं आता हे काय तुमच नवीनच? “लिहिता हात” म्हणजे काय? तर त्याच कसं आहे मंडळी, जसं काही काही लोकं बोलतांना “खाता हात” आणि “धुता हात” असे शब्दप्रयोग करतात, तसा मी “लिहिता हात” असा शब्दप्रयोग केला तर कुठे बिघडलं? कारण आपल्यापैकी बरेच जण डावरे (का डावखुरे? ) असण्याची शक्यता गृहीत धरूनच मी या नवीन हाताचा “शोध” सॉरी, नवीन शब्दप्रयोगाचा शोध लावलाय! दुसरं असं की समस्त डावऱ्यां मंडळींकडून, मी माझ्या सारख्या उजव्यांना उजवं माप देतोय, असा बिनबुडाचा आरोप कशाला ऐकून घेवू? काय बरोबर ना मंडळी?
हां, तर काय सांगत होतो मंडळी, हातात आलेल्या पहिल्या शिस पेन्सिलीच अप्रूप! तर अशी ही शिस पेन्सिल आपल्या स्वतःच्या मालकीची म्हणून पाचवीत हाती येई पर्यंत, जर आपण कुतूहलापोटी आपल्या ताई किंवा दादाच्या शिस पेन्सिलीला नुसता हात जरी लावला असेल, तरी आपण तिचा किंवा त्याचा ओरडा त्याकाळी नक्कीच खाल्ला असेल. शिवाय एखाद्याचा दादा किंवा ताई जास्तच रागीष्ट असेल तर? त्या ओरडयाबरोबर त्याची किंवा तिच्या हातची चापटपोळी. आपण म्हणालं, हे सगळं जरी काही प्रमाणात खरं असलं, तरी या सगळ्याचा आणि आजच्या लेखाच्या शीर्षकाचा संबंध काय? सांगतो, सांगतो मंडळी, जरा सबुरीन घ्या!
तर पाचवीत पहिल्यांदाच हाती आलेल्या नव्या कोऱ्या “शिस पेन्सिलीला” टोक काढायला, त्याकाळी आजची “शार्प” लहान मुलांची पिढी जे “शार्पनर” वापरते, त्याचा शोध बहुतेक लागायचा होता म्हणा किंवा माझ्या सारख्या मध्यमवर्गातल्या मुलांना त्याकाळी ते विकत घेणं परवडत नव्हतं म्हणा, पण तेव्हा आम्ही मुलं शिस पेन्सिलीला टोक काढण्यासाठी एखाद जुनं अर्ध “भारत ब्लेड” वापरत असू. पण मंडळी, त्या शिस पेन्सिलीला अर्ध्या ब्लेडने टोक काढता काढता, पेन्सिलीतून तीच टोक बाहेर येण्या आधीच हाताच्या एखाद्या बोटातून हमखास लाल भडक रक्त बाहेर येई. मग काय, अशावेळी माझी जी काय रडारड सुरु व्हायची त्याला तोड नसायची! कारण त्या वयात असं एखाद “कठीण” काम, स्वतःच स्वतः अभिमानाने करतांना, आपल्याच हातून आपल्याच चुकीमुळे बोटातून रक्त आलेला, बहुदा तो आयुष्यातला पहिलाच प्रसंग असायचा. मग हे सगळं आईला कळताच तिची बोलणी खात खात, कधी कधी त्या सोबत तिच्या हातचे धपाटे तोंडीलावण्यासारखे खाता खाता, तिने आठवणीने बरोबर आणलेला मातकट रंगाचा “रामबाण कापूस” ती मला बोटावर झालेल्या माझ्या जखमेवर लावी. तो लावता लावता तोंडाने, “साधी एका शिस पेन्सिलला टोक काढता येत नाही आणि म्हणे मला पेन्सिलचा अख्खा नवीन बॉक्स हवाय! टोक काढतांना गाढवासारखं (? ) स्वतःच बोट कापून घेतलंस, तरी त्या नावाखाली आज तुझी अभ्यासातून मुळीच सुटका नाही, कळलं? बस अभ्यासाला! “
मंडळी, तेंव्हा जरी साने गुरुजींची “श्यामची आई” त्याकाळच्या आयांच्या कितीही आवडीची असली, तरी सगळ्याच मुलांच्या आया काही “श्यामच्या आईसारख्या” आपापल्या मुलांशी वागत नव्हत्या नां! त्यामुळे माझ्या आईच्या तोंडातल्या वरच्या डायलॉगचा शेवट, माझ्या शरीराचा कुठला तरी अवयव त्यातल्या त्यात तिच्या उजव्या हाताच्या जवळच्या टप्प्यात असेल, त्यावर त्याच हाताची एक सणसणीत बसूनच होत असे!
मंडळी, त्या औषधी “रामबाण कापसाची” एक खासियत होती. तो नुसता जखमेवर दाबून धरताच एका क्षणात जखमेतून येणार रक्त, रेड सिग्नल मिळाल्यावर पूर्वी जशा गाड्या थांबत तसं थांबत असे! हल्ली रेड सिग्नल आणि त्याच्या जोडीला पोलिसाचा आडवा हात व त्याच्या जोडीला त्याच्या तोंडातली शिट्टी, याला सुद्धा कोणी जुमानत नाही हा भाग निराळा. दुसरं असं की आजच्या सारखा तो काही “वॉटरप्रूफ बँडेडचा” जमाना नव्हता. त्यामुळे औषधी “रामबाण कापसाच्या” फर्स्टएडवरच अशा जखमांची तेंव्हा बोळवण केली जायची. अशी “रामबाण कापसाची” त्या काळातली फर्स्टएड मलमपट्टी आपण सुद्धा कधीतरी अनुभवली असेल! आजकाल कशातच “राम” उरला नाही, मग हा “रामबाण कापूस” तरी कसा उरेल, खरं की नाही? असो! कालाय तस्मै नमः!
तेंव्हा आजच्या सारखी गल्ली बोळात उगवलेली, वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणारी महागडी एसी “सलोन” तर सोडाच, पण साधी “शंकर केश कर्तनालय” सारखी “सलून” सुद्धा शहरातल्या ठराविक उच्चभ्रू वस्तीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नव्हती! आणि त्यावेळेस ती असली काय किंवा नसली काय, तेंव्हा त्याची पायरी चढून स्वतःच डोकं भादरण चाळीतल्या कोणालाच त्या वेळेस तरी परवडण्यासारखं नव्हतं! किंबहुना त्या सलूनमधे जाऊन एका वेळच्या डोकं भादरायच्या खर्चात, “भावजा” नामक आमच्या आठ चाळीच्या संकुलचा एकच नाभिक असलेल्या नाभिकपुढे पुढे अख्खी दोन वर्ष नतमस्तक होता आलं असतं, असा साधा सरळसोट मध्यमवर्गीय हिशेब त्यात होता, हे ही तितकंच खरं! त्यामुळे “भावजाच्या” सकाळच्या सातच्या अपॉइंटमेंटसाठी चाळकऱ्यांना दहा दहा वाजेपर्यंत वाट पहात बसण्याशिवाय पर्याय नसायचा. कधी कधी त्याला जास्तच उशीर झाला, तर घरातली वडील मंडळी आम्हां पोरांना त्याची स्वारी कुठल्या चाळीत आपल्या हातातलं कसब दाखवत बसली आहे, याचा शोध घेण्यासाठी पाठवत असे. आता मी जरी “भावजाच्या” केस कापण्याला त्याच्या हातातलं कसब म्हटलं, तरी तेंव्हा बहुतेक “क्रू कटचा” शोध त्याच्याच “मशीन” मधूनच जन्माला आला असावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढे आमच्या या “भावजाचा” तो “क्रू कट” त्यावेळच्या पोलीस शिपायांच्या माथी जाण्यामागे आमच्या “भावजाचाच” तर हात नाही ना? इतपत शंका घेण्यास काही चाळकऱ्यांची मजल तेंव्हा गेली होती.
केस कापायला आपल्यापुढे कोण बसलंय, त्याच वय काय, त्याला कसे केस कापून हवेत अशा क्षुल्लक गोष्टींची चर्चा न करता, समोरच्या व्यक्तीच डोकं आपल्यापुढे त्याची मान दुखेपर्यंत जास्तीत जास्त वाकवून, दिसला केस काप करत, तो डोक्यावरील केसांची “कतले आम” त्याच्या पद्धतीने करत सुटे! या त्याच्या केस कापण्याच्या स्वतःच्या स्टाईलमुळे एखाद्या सोमवारी, आठ चाळीतल्या समस्त आयांचा आपापली मुलं मागच्या बाजूने ओळखण्यात फारच गोंधळ उडे मंडळी. कारण केस कापल्यावर सगळी मुलं मागून थोडे दिवस तरी सारखीच दिसायची! मग काही कारणाने एखाद्या मुलाला दुसऱ्याच आईचा फटका खायचा प्रसंग सुद्धा ओढवायचा!
त्या जमान्यात हिंदी सिनेमे पाहण्यापेक्षा लोकं मराठी संगीत नाटकं पहाणं जास्त पसंत करीत असतं. त्यामुळे हिंदी सिनेमांतल्या एखाद्या “कुमारा” सारखी आपण पण हेअरस्टाईल करावी असं कोणाला वाटत नसे. शिवाय तशी फॅशन पण तेंव्हाच्या तरुण मंडळीत फोफावली नव्हती आणि मराठी संगीत नाटकातल्या एखाद्या कळलाव्या नारदा सारखी हेअरस्टाईल (? ) करायचा तर प्रश्नच नव्हता. कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई!
आज वयाच्या बहात्तरीत “डोक्याने” किंवा “डोक्याची” अनेक कामं करून म्हणा, अथवा अनूवांशीक जीन्समुळे म्हणा, आजमितीस मानेवर जी काय पांढऱ्या केसांची तुरळक झालर उरल्ये, ती वाढल्यावर कापायला सटी सामाशी “सलूनमधे” जायचा योग येतो, तोच काय तो! पण आता पूर्वीसारखी “भावजा” समोर लहानपणी जशी मान तुकवावी लागत असे, तशी आता सलूनमध्ये तुकवावी लागत नाही, हेच काय ते त्यातल्या त्यात मनाला समाधान! फक्त या बाबत एकच तक्रार मी मनातल्या मनांत स्वतःलाच करत असतो मंडळी. माझ्या मानेवरची केसांची पांढरी तुरळक झालर कापायलासुद्धा, एखाद्याच्या डोक्यावरील संपूर्ण जंगल कापण्या इतकेच पैसे द्यावे लागतात! त्यामुळे वेगळ्या अर्थाने आपलं पाकीट किंवा खिसा कापला जातोय, याच नाही म्हटलं तरी माझ्या सारख्या पेन्शनराला आत कुठेतरी दुःख होतच होतं!
केस कापण्यावरून आठवलं, साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी ट्रेनच्या किंवा बेस्ट बसच्या प्रवासात ज्याच पाकीट किंवा खिसा कापला गेला नाही, असा चाकरमानी मिळणं विरळाच! आणि कोणी फुशारकीने तसं म्हटलं तर त्याने त्यावेळच्या ट्रेनच्या “थर्ड क्लासने” गर्दीच्या वेळेस डोंबिवली किंवा विरार लोकलमधून, संध्याकाळच्या रश अवर मधे प्रवास केलेलाच नसावा, हे तुम्ही त्याला खात्रीपूर्वक सांगू शकता.
त्यावेळच्या ट्रेनमधल्या खिसा कापण्याच्या एक एक चमत्कारिक आणि सुरस कथा आज नुसत्या आठवल्या तरी खूपच मनोरंजन होतं. सध्या पाकीट आणि खिसा कापणाऱ्या टोळ्या अस्तित्वात आहेत की नाहीत, अशी शंका घेण्या इतपत सध्याची परिस्थिती आहे. कारण आत्ताच्या कलियुगी अशा चिल्लर चोऱ्या करण्यापेक्षा, आजकाल सगळ्यांनाच स्वतःच्या जिवापेक्षा प्यारा झालेल्या एखाद्या महागड्या “मोबाईलची” चोरी करण्यावर सांप्रत काळातील चोरांच्या नवीन पिढीने आपला मोर्चा वळवला आहे, हे आपण सुद्धा मान्य कराल. त्यामुळे पुन्हा एकदा मी “कालाय तस्मै नमः” म्हटलं, तर आपल्याला त्यात वावगं वाटणार नाही अशी आशा करतो!
एखाद्या वास्तूच उदघाटन त्याच्या दाराला लावलेल्या आडव्या “लाल फीतीला” कापून, कोणा मान्यवरच्या हाती करायची पद्धत आपल्याकडे कधी पासून आली, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. कारण स्वातंत्र्यापुर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही वर्ष मान्यवरांच्या हस्ते “दिप प्रज्वलनकरून” एखाद्या कार्यक्रमाची सुरवात व्हायची, हे आपल्याला आठवत असेलच. स्वातंत्र्यानंतरच्या काळात तेव्हांच्या स्वतःला फॉरवर्ड समजणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी अशा समारंभात ही फीत कापायची पद्धत सुरु केली असावी, असा आपला माझा अंदाज! अर्थात त्याचा उगम नक्कीच त्यांच्या डोक्यतून न हॊता, त्यांनी या बाबतीत सुद्धा इंग्रजांचेच अनुकरण करण्यातून झाला असावा, हे ही तितकंच खरं असण्याची शक्यता जास्त!
हल्ली गल्ली बोळात स्वतःला “नेता” म्हणवणाऱ्या लोकांना तोटा नाही आणि त्यांच्या निरुद्योगी अनुनायांचे तर “सगळं काही” फुकट मिळत असल्यामुळे मोहोळच उठलेलं आपल्याला पाहिला मिळतं. अशा या स्वयंभू नेत्यांना काही उत्साही लोकं आपल्या कुठल्याही “वास्तूची” उदघाटनाची फीत कापायला बोलवत असतात आणि हे नेतेही तेवढ्याच तत्परतेने, उत्साहाने असे समारंभ अगदी अगत्यपूर्वक अटेंड करत असतानां आपण पाहिले असेल. मी वर “कुठल्याही वास्तूची” उदघाटनाची फीत असं म्हटलं, कारण सध्या आधीच नावापुरत्या राहिलेल्या फुटपाथवर, एखाद्या नवीन बांधलेल्या “सार्वजनिक शौचालयाची” फीत कापून त्याच उदघाटन सुद्धा असे नेते करत असतात! एवढच कशाला, त्या सार्वजनिक शौचालयावर स्वतःचा मोठा फोटो आपल्या नावासकट, मोठ्या आणि भडक रंगात रंगवला आहे की नाही याची आधी खात्री करून घेतात आणि मगच त्या शौचालयाचे फीत कापून उदघाटन करतात!
“सकल उत्पन्नाच्या मूलभूत गुंतवणूकीवर मुळापासून कर कापला जाईल! ” हे एखाद्या कंपनीच्या गुंतवणूक विषयीच्या फॉर्मवरच्या सर्वात छोट्या फॉन्ट मधलं प्रिंट केलेलं वाक्य, शुद्ध मराठीत असलं तरी, वाचायला म्हणण्यापेक्षा “कळायला” बऱ्याच जणांना जरा जड जाईल! म्हणून सोप्या चालू भाषेत सांगायचं तर, “Tax will be deducted at source! ” असं म्हणतो, म्हणजे 99% वाचकांचा जीव भांड्यात पडेल, याची मला खात्री आहे!
“अरे काय सांगू तुला, या वेळेस मी दीड लाखाचं फुल सेव्हिंग केलं, तरी पंचावन्न हजार टॅक्स भरायला लागला! “
“टॅक्स! ” तुमच्या माझ्यासारख्या जगातल्या तमाम मध्यमवर्गीयांचा, अगदी कधीही, कुठेही आणि कोणाबरोबरही उगाच “फुकट” चर्चा करण्याचा जागतिक विषय! आता या आधीच्या वाक्यात मी जो “फुकट” शब्द वापरला त्याला कारण म्हणजे, आपल्या सारख्या लोकांनी या विषयावर कितीही वायफळ चर्चा केली तरी, त्याचा सरकारवर दबाव पडून, सरकार टॅक्सच्या टक्केवारीच्या स्लॅबमधे बदल करेल ही शक्यता अजिबातच नसते. हे जरी आपल्या सारख्या लोकांना दरवर्षीच्या अनुभवावरून माहित असलं तरी, त्यावर चर्चासत्र किंवा परिसंवाद हे सगळ्याच बजेट नंतर झडतच असतात!
मंडळी, अजूनही कुठं कुठच्या “कापण्याचे इव्हेंट” होऊ शकतील असे अनेक प्रकार जे मला माहित आहेत, ते आपल्याला सुद्धा माहित असतील. पण एखाद्या लेखाची पण काही शब्दमर्यादा असते हे सुद्धा आपल्या सारख्या चाणाक्ष वाचकांना माहित असेलच! त्यामुळे वरील लेख कोणी छापणार असेल तर, त्यांच्या “एडिटरकडून” मूळ लेखाची (मला) नको इतकी “काट छाट” होण्याआधीच लेख संपवतो!