श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “शून्य… शून्य… शून्य…” – भाग – १ ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
आर्यभट्ट यांनी साधारण इ. स. ४५६ च्या आसपास शून्याचा ऊल्लेख केला. तर ब्रह्मगुप्त यांनी शून्याचे नियम निश्चित केले असं म्हणतात. सृष्टीची निर्मिती त्याच्याही आधी म्हणजे सुमारे १३ ते १४ अब्ज वर्षापूर्वी झाली असं म्हणतात. पण तरीही आपण सृष्टीची निर्मिती शून्यातून झाली असं म्हणतो.
मला याच्या इतिहासात जायचं नाही. पण शून्यामुुळेेच माझ्या आयुष्यात काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या.
शून्यातून सुरुवात करून बर्याच जणांनी ऊत्तुंग यश मिळवल्याचं आपण ऐकतो. मी ऊत्तुंग यश मिळवलं नसलं तरी, मला समजायला लागल्यापासून माझी सुरुवात सुध्दा शून्यापासून झाली आहे. अगदी २५ गुणांच्या परिक्षेत सुध्दा मला मिळालेले गुण अगदी ७, ८, ९ असे कितीही असले तरी ते लिहितांना मात्र ०७, ०८, ०९ याच पध्दतीने लिहिले गेले. म्हणजे आधी शून्यच लिहिला गेला. अशा रीतीने माझी सुरुवात शून्यापासून झाली. आणि नंतर त्याची सोबत कायम आहे.
अशा परिक्षेत परिक्षा २५ गुणांची, म्हणजे दोन अंकी होती. मिळालेले गुण ७, ८, ९ असेच एक अंकिच होते. फक्त ते ०७, ०८, ०९ असे लिहिल्यामुळे मला पैकीच्या पैकी गुण मिळाले नाहीतरी दोन अंकाच्या परीक्षेत मला दोनअंकी गुण मिळाले आहेत असा (गैर)समज मी करून घेत होतो. आणि तसा (गैर)समज मी अजूनही काही बाबतीत बाळगून आहे.
एक पदवी मिळवायला बरीच वर्ष जावी लागतात. शून्यातून सुरुवात करून यश मिळवणार्यांंनी सुध्दा काहीकाळ संघर्ष केला असेल. पण अक्कलशून्य, व्यवहारशून्य, विवेकशून्य, भावनाशून्य अशा शून्य असणाऱ्या बर्याच पदव्या मला विनासायास मिळाल्या. या पदव्या मिळवण्यासाठी माझे परिश्रम शून्य होते. आणि अशा पदव्या मला अल्पकाळात बर्याचदा मिळतात.
चांगल्या गोष्टींंच्या बाबतीत ती कुठे थांबवायची याला ऊत्तर नसलं तरी सुरुवात करावी लागते ती शून्यापासून.
मोबाईल फोनचं कार्ड घेतांनासुध्दा त्याने अगोदर दोन नंबर सांगितले. पण त्या नंबरमध्ये शून्य कुठेच नव्हता. मग काय मी ते कार्ड घेतलच नाही. आणि मग नंबरमधे शून्य असणारं कार्ड घेतलं. हा प्रवास इथेच थांबला नाही. परत प्रश्न आला तो रिंगटोनचा.
सुरुवातीला एक संगीत वाजणारी रिंगटोन होती. मी ती बदलली. आणि अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा या गाण्याची ओळ रिंगटोन म्हणून ठेवली. गाण्याच्या या ओळीत अर्थशून्य याचा अर्थ वेगळा असेल. पण मला अर्थ म्हणजे पैसा, आणि या पैशातून निर्माण होणारा कलह यात शून्य रस आहे. म्हणूनसुद्धा रिंगटोन मधेही मी शून्याची साथ सोडली नाही.
वेगवेगळ्या महत्वाच्या सामन्यांची आपली काही चिन्ह असतात. मला ऑलिंपिक सामन्याचे चिन्ह आवडते. कारण त्यात एक दोन नाही, तर चक्क पाच मोठीमोठी शून्य आहेत व ती एकमेकांत अडकली आहेत.
मला फक्त मारोतीस्तोत्र पाठ आहे. बाकीची स्तोत्र पाठ करण्याकडे मी पाठ फिरवली आहे. मारोतीस्तोत्र पाठ होण्याच कारण परत शून्य हेच आहे. त्यात वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा अशी ओळ आहे.
देवाची पुजा करतांना सुध्दा मी मारोतीस्तोत्र म्हणून झालं कि शांतपणे बसून राहिलेली पुजा संपवतो. पण घरच्यांना वाटतं मनापासून पुजा सुरु आहे. कसा बसलाय पहा शून्यात नजर लावून. आता मी शांत का बसलोय काय सांगणार त्यांना, दुसरं काही येत नाही… पण त्यांना माझी नजर शून्यात दिसते.
आपले रुपये सुध्दा पहा. १०, २०, ५०, १००, २०० असेच आहेत. हे असेच ठेवायला काही व्यवहारिक कारण असेल. पण शून्य आहेच.
मी काही गोष्टी शून्य टक्के व्याज आकारणार्या कंपन्यांकडून घेतल्या आहेत.
दूरदर्शनवर दाखवल्या जाणार्या मालिकेत आवडलेली मालिका म्हणजे पोलीसांनी गुन्हेगारांचा घेतलेला शोध. कारण या मालिकेच शिर्षक होत. एक शून्य शून्य…
शून्य प्रहर हा भारतीय संंसदेेच्या कामाचा एक भाग आहे. भारतीय संसदेमध्ये प्रश्नोत्तराचा तास आणि कामकाजाचा तास यामधील वेळेचा काळ म्हणजे शून्य प्रहर. आता संसदेत सुध्दा एखादा प्रहर शून्य प्रहर म्हणून मान्य असेल तर मला शून्याला मान द्यावाच लागेल.
“सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” हे गाणं माझ्याच बाबतीत मी म्हंटल तर, “शून्या शून्या मैफिलीत माझ्या” असंच म्हणेल. कारण माझ्या आयुष्याच्या मैफिलीत असलेली शून्याची साथ…
क्रमशः – भाग १
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






