मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Gen Z’ असणे म्हणजे नेमके काय? – लेखिका : मेधा खासगीवाले ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ Gen Z’ असणे म्हणजे नेमके काय? – लेखिका : मेधा खासगीवाले ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर ☆

काल एका किंचाळकन्येचं वक्तव्य ऐकले आणि मन अक्षरशः सुन्न झाले. “आम्ही Gen Z आहोत, हे टॉलरेट करणार नाही”, असे म्हणत ती *कारगिलसारख्या* अत्यंत दुर्गम आणि संवेदनशील भागात गस्त घालणाऱ्या सैनिकांविषयी अतिशय अपमानास्पद भाषेत बोलत होती.

‘Gen Z’ असणे म्हणजे नेमके काय? 

आधुनिक असणे, प्रश्न विचारणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे सर्व स्वागतार्हच आहे. पण ह्याचा अर्थ इतिहासाचे अज्ञान, कर्तव्याविषयी अनादर आणि देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्यांचा अपमान असा निश्चितच होत नाही.

कारगिल ही केवळ पर्यटनासाठीची रमणीय जागा नाही. त्या पर्वतरांगांतील प्रत्येक दगडामागे शौर्याची, त्यागाची आणि रक्ताची कहाणी दडलेली आहे. याच भूमीत २७ वर्षांपूर्वी भीषण युद्ध झाले. त्या युद्धात पाचशेहून अधिक भारतीय सैनिकांनी प्राणांची आहुती दिली आणि त्याहून कितीतरी अधिक सैनिक गंभीर जखमी झाले, कायमचे अपंग झाले. असंख्य कुटुंबांनी आपले पुत्र, पती, वडील आणि भाऊ गमावले. आजही त्या परिसराचे रक्षण करण्यासाठी सैनिक प्रतिकूल हवामानात आणि जीवघेण्या परिस्थितीत अखंड गस्त घालत असतात.

अशा संवेदनशील भागांतून कधी सैनिकांचे ताफे जातात, तर कधी शस्त्रास्त्रे, अन्नधान्य आणि इतर आवश्यक युद्धसामग्रीची वाहतूक केली जाते. सुरक्षेच्या कारणास्तव काही वेळ रस्ते बंद ठेवावे लागतात. पुलवामा अटॅक आपल्यासमोरच झाला आहे. पर्यटक म्हणून आपण तिथे गेलो असू आणि त्यामुळे आपल्याला थोडा विलंब किंवा गैरसोय झाली, तरी ती जाणीवपूर्वक केलेली अडवणूक नसते. ती देशाच्या सुरक्षेसाठी असलेली अपरिहार्य व्यवस्था असते.

आपल्या दहा दिवसांच्या पर्यटनापेक्षा, देशाची सुरक्षा नक्कीच अधिक महत्त्वाची आहे, एवढे साधे भान आपल्याला असू नये का? 

 “आमच्या करातून सैनिकांचा पगार दिला जातो, त्यांना सैन्यात भरती व्हायला आम्ही सांगितले होते का? ” अशा प्रकारची वक्तव्ये करताना लाज वाटत नाही का?  हे ऐकताना मनात एकच प्रश्न उभा राहतो की नागरिक म्हणून आपल्याला अधिकार शिकवले जातात; पण कर्तव्ये, संवेदनशीलता आणि कृतज्ञता शिकवली जात नाहीत का?

 — — होय, सैनिकांना पगार मिळतो. पण पगार अनेकांनाच मिळतो. उणे ३५ अंश तापमानात, प्राणवायूची कमतरता असताना, बर्फाच्छादित पर्वतांवर आणि उघड्या दगडी चौक्यांमध्ये कोणता ‘टॅक्सपेयर’ आपले नेहमीचे काम करतो?  तिथे कोण ऑफिस उघडून हिशेब लिहीत बसतो?  कोण शाळा, कॉलेज भरवतो?  कोण व्यवसाय चालवतो?  कोण सर्जरी करतं?  कोण आरामदायी इमारती बांधतो?  कोण आपल्या कुटुंबापासून महिनोन्‌महिने दूर राहून, मृत्यू समोर दिसत असतानाही देशाच्या सीमेवर उभा राहतो?  ते सुद्धा कोरडा शिधा खाऊन.

फक्त सैनिक! 

आपण पर्यटक म्हणून काही दिवस त्या भागात गेलो, तरी थंडी, विरळ हवा आणि खडतर प्रवासामुळे आपली अवस्था बिकट होते. उत्तम कपडे, गरम अन्न, वाहन आणि सुरक्षित निवास असूनही आपल्याला त्रास होतो आणि त्याच प्रदेशात सैनिक अनेक महिने राहतात. कधी अपुऱ्या सुविधांमध्ये, कधी वादळात, कधी हिमवर्षावात; मिळेल ते अन्न खाऊन, डोळ्यांत तेल घालून आपली सीमा सांभाळतात. त्यांच्या त्या त्यागाची किंमत केवळ पगाराच्या आकड्यांत मोजण्याची हिंमत तरी आपल्याला कशी होते

परदेशांत अनेकदा एक वेगळे आणि हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळते. गणवेशातील जवान दिसला की सामान्य नागरिक आदराने त्याला अभिवादन करतात. तरुण सैनिकालाही वयोवृद्ध लोक सलाम करतात. विमानतळावर लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि त्यांच्याबरोबर कर्तव्यावर निघालेल्या सैनिकांना विमानात चढण्यासाठी प्राधान्य दिले जाते. कारण गणवेशामागचा त्याग त्या समाजाला समजलेला असतो.

आणि आपल्या देशात?

— — कर्तव्य बजावून थकलेले सैनिक रेल्वेच्या डब्यात जागा न मिळाल्याने प्रसाधनगृहाजवळ जमिनीवर झोपलेले दिसतात. हे दृश्य पाहिले की तळपायाची आग मस्तकात जाते. ज्यांच्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित झोपतो, त्यांनाच प्रवासात बसण्यासाठी साधी जागाही मिळत नाही. उठून थोडा वेळ देण्याची तसदी पण घेतली जात नाही. यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? *

— एका सैनिकाने लिहिलेले वाक्य मनात खोलवर कोरले गेले आहे— “आमच्याविषयीचा आदर केवळ शब्दांमधून व्यक्त करू नका; तो तुमच्या कृतीतून दिसू द्या. “

खरंच, वर्षातून दोन दिवस ‘जय जवान’ म्हणणे, समाजमाध्यमांवर तिरंग्याचे चित्र लावणे, किंवा देशभक्तीपर गाणी शेअर करणे, म्हणजे सैनिकांचा सन्मान नव्हे. त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवणे, नियमांचे पालन करणे, त्यांच्या कामात अडथळा न आणणे, प्रवासात त्यांना जागा देणे, त्यांच्या कुटुंबीयांशी संवेदनशीलतेने वागणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याविषयी आदराने बोलणे हा खरा सन्मान आहे.

देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांविषयी अपमानास्पद भाषा वापरणे, हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नव्हे; ती असंवेदनशीलता, अज्ञान आणि कृतघ्नता आहे.

सैनिकांना तुमच्या दयेची गरज नाही. त्यांना अवास्तव देवत्वही नको आहे. फक्त योग्य सन्मान, कृतज्ञता आणि संवेदनशील वागणूक मिळायलाच पाहिजे.

मुलांवर संस्कार करताना पालकांनी त्यांना केवळ स्वतःचे अधिकार शिकवून चालणार नाही. देशाप्रती असलेली कर्तव्ये, सैनिकांच्या त्यागाबद्दलची कृतज्ञता, गणवेशाचा सन्मान आणि सार्वजनिक जीवनातील शिस्त यांचेही भान लहानपणापासून दिले पाहिजे. कोणाशी कशा पद्धतीनी आपण बोलतो?  आधुनिक विचार असणे म्हणजे उद्धटपणा, बेजबाबदारपणा किंवा देशरक्षकांचा अपमान करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. *अधिकारांची भाषा आपल्याला उत्तम येते. आता आपल्या मुलांना नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. *

सैनिकांचा सन्मान केवळ भाषणांत, घोषणांत आणि समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये नको; तो आपल्या विचारांत, शब्दांत आणि प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे. एक सैनिक बनण्यासाठी जेवढे शारीरिक परिश्रम करून घेतले जातात आणि मानसिक ताकद वाढवली जाते, तेवढे परिश्रम ह्या किंचाळकन्येला आणि समविचारी माणसांना एक दिवस करायला लावले तरी मेंदूतले आणि जिभेवरचे किडे वळवळायचे थांबतील. आकड निघून जाईल.

Enough is enough!

लेखक : मेधा खासगीवाले

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृष्ण आणि वपुंची भेट.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ कृष्ण आणि वपुंची भेट.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

कृष्णाने वपुंना विचारलं, “माणसांवर एवढं लिहिलंस; पण माणूस तुला कळला का? ”

वपु हसले. “कळला असता तर लिहिलंच नसतं. माणूस हा समजून घेण्यापेक्षा अनुभवण्याचा विषय आहे. ”

कृष्णही हसले.

“अगदी खरं. अर्जुनाला मी गीता सांगितली; पण त्याचं युद्ध त्यालाच लढावं लागलं. मी फक्त त्याच्या रथाची दिशा सांभाळली. ”

वपु म्हणाले, “म्हणजे माणसाला सल्ल्यापेक्षा सारथीची गरज जास्त? ”

“कधीकधी, ” कृष्ण म्हणाले, “सल्ला देणारे अनेक असतात; पण संकटात रथावर आपल्या शेजारी बसणारा एकच हवा असतो. ”

क्षणभर दोघेही शांत झाले.

कृष्ण म्हणाले, “सुदामा माझ्याकडे काही मागायला आला नव्हता. म्हणूनच त्याची मैत्री श्रीमंत होती. आज माणसं मैत्रीही उपयोगासाठी करतात. नात्यांमध्ये प्रेम कमी आणि अपेक्षा जास्त झाल्या आहेत. ”

वपुंच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं गंभीर झालं.

“मग उपाय काय? ”

कृष्ण म्हणाले, “स्वतःला जिंकण्याचा प्रयत्न कर. जग जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःलाच हरवतो. ”

वपु म्हणाले, “हे सांगणं सोपं आहे. ”

“हो, ” कृष्ण म्हणाले, “म्हणूनच गीता लिहावी लागली. जगणं सोपं करण्यासाठी नव्हे; जगण्याकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासाठी. ”

वपु पुन्हा हसले.

“माझ्या आयुष्याच्या रथाला कोणते घोडे जोडले आहेत, हे मला कधी कधी समजत नाही. ”

कृष्ण म्हणाले, “मला माहीत आहेत—स्वार्थ आणि अहंकार. प्रत्येकाच्या रथाला हे दोन घोडे असतात. फरक एवढाच की काहींच्या हातात लगाम असतो, काही घोड्यांच्या हातात स्वतःच लगाम देतात! ”

वपु मोठ्याने हसले.

कृष्ण म्हणाले, “आणि लक्षात ठेव—तुझ्या आयुष्याच्या रथाला माझ्यासारखा सारथी नेहमी मिळेलच असं नाही. म्हणून तुझ्यातला कृष्ण जागा ठेव. विवेक जागा ठेव. मग रथ कुठेही गेला तरी दिशा चुकणार नाही. ”

वपुंनी कृष्णाकडे पाहिलं.

“मग शेवटी माणसाला काय हवं? ”

कृष्ण म्हणाले—“ थोडं प्रेम, थोडी मैत्री, योग्य वेळी मिळालेला योग्य शब्द आणि स्वतःच्या मनाला लगाम घालण्याइतका विवेक. बाकीचं आयुष्य स्वतः शिकवतं.”… आणि कृष्ण निघून गेले.

***

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०७ आणि १०८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०७ आणि १०८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 श्लोक क्र. १०७ – –

मना कोप आरोपणा ते नसावी ।

मना बुधि हे साधुसंगी वसावी ।

मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ।

मना होई रे मोक्षमार्गी विभागी ।।१०७।।

अर्थ : हे मना, क्रोधाला आपल्यावर स्वार होऊ देऊ नकोस. आपल्या बुद्धीचा वापर साधुसंतांच्या सहवासात राहण्यासाठी कर. हे मना, दुष्ट किंवा वाईट लोकांच्या संगतीचा त्याग कर. (आणि अशा रीतीने) मोक्षमार्गाचा वाटेकरी हो.

(कोप – क्रोध/राग, आरोपणा – आरोहण करणे /स्वार होणे, नष्ट – दुष्ट /वाईट, चांडाळ – कर्माने किंवा वागणुकीने नीच मनुष्य, विभागी – वाटेकरी)

विवेचन : साधकासाठी अत्यंत महत्वाचा उपदेश समर्थांनी या श्लोकात केलेला आपल्याला आढळतो. व्यवहारात आणि परमार्थात क्रोध अपार हानी करतो. ज्याला आपल्या क्रोधावर ताबा ठेवता आला, त्याला आपल्या मनावर ताबा ठेवता आला असे म्हणायला हरकत नाही. व्यावहारिक जीवनात क्वचित प्रसंगी क्रोध येणेही जरूर असते. पण त्याला आपल्या डोक्यावर किती स्वार होऊ द्यायचे हे आपल्याला ठरवता आले पाहिजे. साधकाने तर क्रोधरहित व्हायला शिकले पाहिजे. कारण अति क्रोधामुळे सर्वनाश होऊ शकतो. क्रोधाचा भर ओसरल्यावर होणाऱ्या पश्चातापाचा मग काही उपयोग होत नाही.

त्यासाठी समर्थ म्हणतात की आपली बुद्धी साधुसंगी वसावी. म्हणजे संत किंवा सज्जन व्यक्तींच्या सहवासात आपण राहिले पाहिजे. आपण कोणाचा संग करतो त्यावरही आपले चारित्र्य अवलंबून असते. ” Man is known by the company he keeps. ” अशी एक इंग्रजी म्हण आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात सज्जनांचा संग करा. सज्जनांच्या किंवा सद्गुरूंच्या सहवासात केवळ देहाने असता उपयोगी नाही. मनाने आणि बुद्धीने देखील त्यांच्या सोबत राहायला हवे. बऱ्याच वेळा थोर पुरुषांच्या सहवासात आलेले त्यांचे नातेवाईक किंवा अनुयायी त्यांची शिकवण न घेता, त्यांचा फायदा आपल्या प्रपंचासाठी करून घेतात. स्वामी समर्थांच्या चरित्रात त्यांचे भक्त म्हणवणाऱ्या अशा अनेक ढोंगी व्यक्तींची उदाहरणे आपल्याला वाचायला मिळतात. तेव्हा संतांच्या सहवासात मनाने आणि बुद्धीने त्यांचेच होऊन जावे.

मोरोपंत सुद्धा ” सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो ” असे म्हणतात. तर तुकाराम महाराजांनी ” न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, ” असे म्हटले आहे. थोडक्यात संतांचा सहवास हा परीस स्पर्श असतो. तो एकदा झाला की आपल्यातील अहंकार, कर्तेपणा, मी पणा गळून पडतो. क्रोधाची जी सामुग्री असते तीच त्यांच्या सहवासात नष्ट होते. प्रत्यक्ष संतांचा सहवास जरी नाही मिळाला तरी आजच्या काळात त्यांच्या ग्रंथांचे वाचन आणि त्यात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे मनापासून पालन करणे हा देखील संतांचा सहवासच आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा यासारख्या कुठल्यातरी एका ग्रंथाचे नियमितपणे वाचन करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांच्या सहवासात राहण्यासारखेच आहे असे म्हणता येईल.

दुष्ट किंवा वाईट व्यक्तींची संगत असेल तर ती जाणीवपूर्वक सोडायला हवी. त्यांच्या सहवासात त्यांचे गुण (खरे म्हणजे दुर्गुण) आपल्यालाही लागण्याची शक्यता असते. वाईटाचे, खोट्या गोष्टींचे समर्थन करण्यात मग आपल्यालाही काही वावगे वाटत नाही. ज्यांचे कर्म अत्यंत दुष्टपणाचे असते, समाजाच्या दृष्टीने घातक असते, अशा व्यक्तींसाठी समर्थांनी ‘ चांडाळ ‘ असा शब्द वापरला आहे. ज्यांना मोक्षमार्गावर वाटचाल करायची आहे, त्यांनी तर अशा व्यक्तींचा सहवास कटाक्षाने टाळायला हवा. संतांच्या सहवासात वावरताना मनाने आणि बुद्धिनेही त्यांचे आचरण आत्मसात करून त्यांच्याशी एकरूप व्हावे. क्रोधाचा जाणीवपूर्वक त्याग करावा. अशा रीतीने आपण मोक्षमार्गाचे वाटेकरी व्हावे अशी समर्थांची इच्छा आहे.

स्वसंवाद

१. माझ्या मनात येणाऱ्या क्रोधाला मी माझ्या बुद्धीवर आणि नातेसंबंधांवर स्वार होऊ देतो का? राग शांत झाल्यावर मला पश्चात्ताप होतो का?

२. संतांच्या किंवा सज्जन विचारांच्या सहवासात असताना, मी केवळ माझ्या सांसारिक ‘स्वार्थाचा’ विचार करतो, की माझ्या अंतःकरणाचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यांचे विचार बुद्धीने आत्मसात करतो?

३. मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे, “सुसंगती सदा घडो, ” हे माहीत असूनही मी माझ्या दैनंदिन व्यवहारात केवळ स्वार्थासाठी वाईट किंवा नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांची संगत बाळगतो का?

४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, संसाराच्या विवंचनेतून बाहेर पडून अंतरीची शांती मिळवण्यासाठी मी या ‘मोक्षमार्गाचा’ वाटेकरी (विभागी) होण्यास तयार आहे का?

===== 

श्लोक क्र. १०८ – –

सदा सर्वदा सज्जनाचेनि योगे ।

क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ।

क्रियेवीण वाचाळता ते निवारी । 

तुटे वाद संवाद तो हितकारी ।।१०८।।

अर्थ : हे मना, सज्जनांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्या वागण्यात बदल घडतो. भगवंताच्या भक्तीबद्दल प्रेम निर्माण होते. एखादी गोष्ट स्वतः आचरण केल्याशिवाय त्याबद्दल बोलू नये. चर्चेतून जेव्हा एखाद्या शंकेचे निरसन होते, तेव्हा ती चर्चा परमार्थाला हितकारक ठरते.

(वाचाळता – व्यर्थ बडबड (करणे), वाद संवाद – साधकबाधक चर्चा, तुटणे – निकालात निघणे/संपुष्टात येणे)

विवेचन : मागील श्लोकाप्रमाणे या श्लोकातही समर्थांनी सज्जन संगतीचा महिमा सांगितला आहे. इथे सज्जन म्हणजे साधुसंत असाच अर्थ समर्थांना अपेक्षित आहे. कारण आपल्या वागणुकीतील जो बदल समर्थांना अपेक्षित आहे, तो साधुसंतांच्या संगतीतच होऊ शकतो. संतसंगतीचा महिमा अपार आहे. ‘ आपल्यासारखे करती तात्काळ, नाही काळवेळ तयालागी ‘ असे संतांबद्दल म्हटले जाते. संत म्हणजे परीस आहेत. त्यांच्या संगतीत राहिलो की ते आपल्याला त्यांच्यासारखेच करून टाकतात. वृत्तीत अंतर्बाह्य पालट होतो. पण त्यांच्या संगतीत केवळ देहाने राहून उपयोगी नाही. मनाने आणि बुद्धीने देखील त्यांचेच होऊन राहावे. त्यांच्याशी एकरूप व्हावे. असे झाले म्हणजे आपल्याही वागणुकीत बदल घडतो. आपल्या मनात ईश्वरभक्ती निर्माण होते. ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होते. देवाच्या अस्तित्वाबद्दल मनात जी शंका असते, ती नाहीशी होते. रामकृष्ण परमहंसाच्या सहवासात येण्याआधी स्वामी विवेकानंदांच्या मनात परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका होती. पण रामकृष्ण परमहंसाच्या सहवासात येताच ती दूर तर झालीच पण त्यांच्या वृत्तीतही अंतर्बाह्य पालट झाला. अशा प्रकारे जेव्हा बुद्धी संतांच्या चरणी स्थिर होते, तेव्हाच अपेक्षित आणि आश्चर्यकारक असे आंतरिक परिवर्तन घडून येते.

आज खरे साधुसंत कोणाला म्हणावे असा प्रश्न आपल्याला पडतो. भोंदूबाबांचा बाजार भरला आहे. पण ज्यांच्या सहवासात आपल्याला शांती आणि समाधान मिळते आणि आपली ऐहिक सुखाची ओढ कमी होऊन परमार्थाकडे मनाची प्रवृत्ती होते अशा व्यक्तींना संत, सज्जन किंवा साधू म्हणायला हरकत नाही.

संतांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंतरात शांती आणि समाधान वास करीत असते. त्यामुळे व्यर्थ बडबड करून ते आपली शक्ती वाया घालवत नाहीत. ते अत्यंत मोजके आणि हिताचे बोलतात. त्यामुळेच त्यांच्या सहवासात आपल्यामध्ये बदल घडून येतो. ‘ बोले तैसा चाले ‘ या उक्तीचे ते मूर्तिमंत उदाहरण असतात. आपण सामान्य माणसे किंवा ज्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार झाला आहे अशी माणसे आपले ज्ञान दाखवण्यासाठी बाष्कळ बडबड करतात. पण त्याप्रमाणे त्यांचे आचरण नसल्याने लोकांना त्यांचे बोलणे ऐकताना कंटाळा येतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, ” आचारल्याविण बोलू नये. ” ” क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे “ही उक्ती आपल्याला माहिती आहे. संत सोहिरोबा म्हणतात, ” अनुभवाविण मान डोलवू नको रे. ” सर्व संतांच्या सांगण्यात आणि शिकवणुकीत एकवाक्यता आहे.

श्लोक क्रमांक १०८ ते ११५ या श्लोकांची रचना एक विशेष दृष्टिकोन ठेवून समर्थांनी केली आहे असे वाटते. कारण हे श्लोक वाद आणि संवाद, किंवा चर्चा आणि निरर्थक वाद याबद्दल आपल्याला विशेष मार्गदर्शन करतात. चर्चा किंवा वाद-संवाद आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी असावा. वादासाठी वाद घालू नये. साधुसंतांच्या संगतीत चर्चेतून आपल्या ज्या शंका दूर होतात, त्या आपल्याला परमार्थ मार्गावर पुढे वाटचाल करण्यासाठी हितकारक ठरतात. अर्थात त्यांच्याकडून ज्या शंकांचे निरसन करून घ्यावयाचे त्या शंका परमार्थासंबंधी असाव्यात. कोणतीही शंका मनात ठेवून ईश्वरभक्ती करू नये. त्या शंकांचे निरसन अधिकारी व्यक्तींकडून किंवा गुरूंकडून करून घ्यावे. एकदा का मनातील शंका दूर झाल्या की निःशंक मनाने आपण हरिभक्ती करू शकतो.

स्वसंवाद

१. मी संतांचे विचार किंवा धार्मिक ग्रंथ केवळ माझे ज्ञान वाढावे म्हणून वाचतो, की त्यामुळे माझ्या वागण्यात बदल घडून यावा या हेतूने वाचतो?

२. संत सोहिरोबांनी म्हटले आहे, “अनुभवाविण मान डोलवू नको रे”, मी उगीचच मला सर्व कळते म्हणून मान डोलावतो की नामस्मरणाचा स्वतः अनुभव घेऊन माझी भक्ती दृढ करतो?

३. माझ्या रोजच्या बोलण्यात किंवा समाजमाध्यमांवरील चर्चेत मी केवळ माझा अहंकार शमवण्यासाठी ‘व्यर्थ वाद’ घालत बसतो, की शंकांचे निरसन करणारा ‘हितकारी संवाद’ साधतो?

४. तुकाराम महाराजांच्या सूत्राप्रमाणे, जर ‘बोले तैसा चाले’ हेच साधुत्वाचे खरे लक्षण असेल, तर माझे स्वतःचे जगणे माझ्याच बोलण्याशी किती प्रामाणिक आहे?

– क्रमशः श्लोक १०७ आणि १०८

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऋषी गेले नाहीत ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ऋषी गेले नाहीत ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

☆

काळाच्या प्रदीर्घ प्रवाहात कितीतरी गोष्टी वाहून गेल्या. राजे गेले, राजवटी गेल्या. साम्राज्ये उभी राहिली आणि इतिहासाच्या पानांत विरून गेली. पिढ्या बदलल्या. जगण्याची साधने बदलली.

पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे—

– – सत्याचा शोध घेणाऱ्या मनाची ओढ.

हजारो वर्षांपूर्वी एखाद्या अरण्यातील आश्रमात, यज्ञकुंडाजवळ किंवा निसर्गाच्या सान्निध्यात बसून एका ऋषीने जो प्रश्न विचारला असेल, तोच प्रश्न आजचा माणूस वेगळ्या भाषेत विचारत आहे—

“जीवनाचा अर्थ काय? ”

– – याच प्रश्नाच्या शोधातून भारतीय संस्कृतीची एक विराट परंपरा उभी राहिली.

– ती म्हणजे ऋषीपरंपरा.

– आणि भाद्रपद शुक्ल पंचमी तिच्या स्मरणाची पवित्र तिथी—ऋषिपंचमी.

ऋषी म्हणजे केवळ प्राचीन काळातील तपस्वी नव्हेत.

– ते ज्ञानाचे उपासक होते. चिंतनाचे साधक होते. सत्याच्या शोधात स्वतःला झोकून देणारे अनासक्त पुरुष होते.

– त्यांच्याजवळ राजदंड नव्हता; पण विचारांचे सामर्थ्य होते.

– संपत्ती नव्हती; पण प्रज्ञेची श्रीमंती होती.

– ऐहिक वैभव नव्हते; पण अंतःकरणात विश्व सामावून घेण्याची विशालता होती.

– – त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि विश्वाचा शोध घेतला. निसर्गाकडे पाहिले आणि त्याच्याशी नाते ओळखले. स्वतःच्या अंतर्मनात उतरले आणि अस्तित्वाचा अर्थ शोधला.

त्यांनी प्रश्न विचारले.

प्रश्नांमागे गेले.

आणि उत्तरांपेक्षाही शोधाला मोठे मानले.

वेदांच्या ऋचा, उपनिषदांचे चिंतन, जीवनमूल्यांची जडणघडण—या प्रदीर्घ ज्ञानपरंपरेमागे ऋषींच्या तपश्चर्येचा अदृश्य हात आहे.

– म्हणूनच भारतीय मनाने ऋषींना केवळ विद्वान मानले नाही.

त्यांना वंदनीय मानले. त्यांच्या ज्ञानापुढे मस्तक नमविले. त्यांच्या तपस्येविषयी कृतज्ञता बाळगली. आणि त्यांच्या परंपरेला आपल्या संस्कृतीच्या स्मृतिपटलावर जपून ठेवले.

– – ऋषिपंचमीचे मर्म याच कृतज्ञतेत आहे.

या तिथीला सप्तर्षींचे स्मरण केले जाते.

– – पण त्या स्मरणाचा अर्थ केवळ एका धार्मिक विधीत शोधला, तर ऋषिपंचमीचा व्यापक आशय आपल्या हातातून निसटून जाईल.

ही तिथी आपल्याला सांगते—

आपण आज जे आहोत, ते केवळ आपल्या प्रयत्नांचे फल नाही.

आपल्यामागे असंख्य पिढ्यांचे चिंतन आहे. अनुभव आहे. तपश्चर्या आहे. ज्ञानसाधना आहे.

आपण आज ज्या भूमीवर उभे आहोत, तिच्या मातीमध्ये पूर्वजांच्या पावलांचे ठसे आहेत; आणि आपल्या विचारविश्वाच्या पायाभरणीत ऋषींच्या चिंतनाचे संस्कार आहेत.

म्हणून ऋषिपंचमी म्हणजे ऋषिऋणाची जाणीव.

काळ बदलला आहे.

– – आज ज्ञानासाठी अरण्यातील आश्रम शोधावा लागत नाही. एका क्षणात जगभरातील माहिती आपल्या हातात येते. विज्ञानाने विश्वाची अनेक रहस्ये उलगडली आहेत. तंत्रज्ञानाने माणसाच्या हातांना अभूतपूर्व सामर्थ्य दिले आहे.

– – पण सामर्थ्य वाढले म्हणून प्रश्न संपलेले नाहीत. उलट ते अधिक गंभीर झाले आहेत.

– – ज्ञान किती असावे यापेक्षा त्याचा उपयोग कसा करावा, हा प्रश्न महत्त्वाचा झाला आहे.

– वेग मिळाला आहे; पण दिशा आहे का?

– माहिती वाढली आहे; पण विवेक वाढला आहे का?

– साधने वाढली आहेत; पण माणूसपण टिकले आहे का?

– – याच ठिकाणी ऋषींची परंपरा आजही आपल्याशी संवाद साधते.

– ऋषी आपल्याला आधुनिकतेपासून दूर नेत नाहीत. उलट ते आधुनिकतेला विवेकाची चौकट देतात.

– विज्ञानाने विश्व जिंकण्याची शक्ती दिली, तर ऋषींची दृष्टी विचारते—स्वतःवर विजय मिळविला का?

– तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, तर ऋषी विचारतात—मनुष्य मनुष्याच्या जवळ आला का?

– प्रगतीने सुखसाधने वाढविली, तर ऋषींची जीवनदृष्टी विचारते—या सुखाला समाधानाची जोड आहे का?

– – म्हणून ऋषी कालबाह्य झालेले नाहीत.

त्यांची गरज आजही आहे. कदाचित अधिकच आहे.

म्हणूनच ऋषिपंचमी हा केवळ स्मरणाचा दिवस नाही; तो आपल्या दायित्वाचा दिवस आहे.

परंपरा आपल्याला वारशाने मिळते; पण तिचे रक्षण आपोआप होत नाही.

– पुढच्या पिढीला केवळ आधुनिक जगाची साधने देऊन आपले कर्तव्य संपत नाही. त्यांना प्रश्न विचारण्याची दृष्टी द्यावी लागेल. ज्ञानाची ओढ द्यावी लागेल. सत्याचा आग्रह द्यावा लागेल. निसर्गाशी नाते जोडावे लागेल. आणि आपल्या संस्कृतीकडे अंधश्रद्धेने नव्हे, तर समजुतीने आणि स्वाभिमानाने पाहायला शिकवावे लागेल.

ऋषींचा वारसा म्हणजे भूतकाळाला कवटाळून बसणे नव्हे.

– – भूतकाळातून मूल्य घेऊन भविष्य घडविणे होय.

– हीच खरी परंपरानिष्ठा.

– हीच खरी ऋषिपूजा.

आज ऋषिपंचमी.

सप्तर्षींचे स्मरण होईल. पूजा होईल. नमस्कार होतील.

पण त्या नमस्कारामागे एक जाणीव जागी झाली, तरच त्या पूजेचे सार्थक होईल—

– – आपण एका महान परंपरेचे वारसदार आहोत.

– – आणि वारसदार असणे म्हणजे केवळ अभिमान बाळगणे नव्हे; ऋण स्वीकारणे होय.

ऋषींनी आपल्याला जे दिले, त्याची परतफेड कदाचित कधीच करता येणार नाही.

– कारण ऋण पैशाचे नाही.

– ते ज्ञानाचे आहे.

– ते संस्कारांचे आहे.

– ते प्रज्ञेचे आहे.

– – ते अस्तित्वाला अर्थ देणाऱ्या एका अखंड शोधाचे आहे.

– – म्हणून ऋषींच्या चरणी मस्तक ठेवताना एवढेच मागावेसे वाटते…

 

हे ऋषिवर्यांनो,

तुमच्या तपस्येची स्मृती आमच्या मनातून पुसू देऊ नका; तुमच्या ज्ञानाची ज्योत आमच्या विचारांत मंद होऊ देऊ नका; आणि तुमच्याकडून मिळालेला हा अमूल्य वारसा आमच्या हातून पुढच्या पिढीपर्यंत अखंड पोहोचू दे.

कारण—

– – ऋषी गेले नाहीत.

– ते आपल्या स्मृतीत आहेत.

– ते आपल्या संस्कारांत आहेत.

– ते सत्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येक प्रश्नात आहेत.

– – आणि जोपर्यंत एखाद्या मनात “सत्य काय? ” हा प्रश्न जिवंत आहे,

तोपर्यंत—

– – – ऋषी जिवंत आहेत.

 

©️ दिवाकर बुरसे

पुणे.

संपर्कः ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीगंगानगर मधील ‘मैला’ प्रवाह! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीगंगानगर मधील ‘मैला’ प्रवाह!☆ श्री संभाजी बबन गायके ☆

बलात्कारानंतरचे सोशल मिडीया बलात्कार!! 

श्रीगंगानगर.. राजस्थान. १८ जून. रात्रीचे सव्वा दहा वाजलेत. इयत्ता आठवीत शिकणारी, म्हणजे केवळ तेरा वर्षे वय असलेली एकटी मुलगी रामबाबू नावाच्या चालकाच्या ईरिक्षेत तिच्या घरी जाण्यासाठी बसते. तो तिला थेट एका लॉजिंग हॉटेल मध्ये घेऊन जातो आणि त्या हॉटेलमालकास तिची विक्री करतो. पुढे आणखी पाच दिवस त्या मुलीला विविध हॉटेल्सवर नेले जाते आणि या पाच दिवसांत सुमारे ३२ पुरुष तिच्यावर बलात्कार करतात.

इकडे मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली असते… आणि कुठूनतरी पोलिसांना खबर मिळते. पोलिस मुलीची सुटका करून तीन हॉटेल मालकांसह बारा पुरुषांना अटक करतात. ज्या तीन हॉटेल्समध्ये हा गुन्हा घडला होता, ती हॉटेल्स प्रशासनाने अनधिकृत हॉटेल्स असल्याचे सांगत पाडून टाकली आहेत किंवा sealed केलेली आहेत. मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाते. ही झाली पोलिसांनी दिलेली शासकीय, अधिकृत माहिती.

विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, यांनी सदर मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने आयोजित केली आहेत. पोलिसांचे उर्वरीत आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे कळते.

इकडे सोशल मिडीयावर विविध बातमी पत्रे, bloggers आणि poster boys and girls लोकांनी या प्रकरणाची माहिती(? ) देण्याचा सपाटा लावला. यामागे काही अंशी सामाजिक काळजी हे कारण असावे, पण मुख्य उद्देश जास्तीत जास्त views, likes, comments मिळवून पैसे कमावणे असावा, अशी शंका येते!

संबंधित मुलीचे आहेत असे भासवत आधीचे, भलत्याच राज्यातील, वेगळ्याच मुलींचे videos पुन्हा post केले जात आहेत. आणि त्यांना अपेक्षित प्रतिसादही मिळतो आहे.

बलात्कार पिडीत महिला, मुली यांची नावे, छायाचित्रे, चित्रफिती प्रसारित करू नयेत, असे न्यायालयाचे आदेश आहेत. एका चित्रफितीमध्ये तर चक्क एक राजकीय नेता एका पिडीत मुलीशी संवाद साधताना दिसतो.

राजस्थान मधील ही पिडीत मुलगी मरण पावल्याच्या खोट्या बातम्याही या सोशल स्वयंघोषित पत्रकारांनी लावलेल्या आहेत.

आरोपींना मारहाण करण्याची, त्यांची धिंड काढण्याची परवानगी अजून तरी आपला कायदा देत नाही. पण अशा बाबी जनमानसात लोकप्रिय आहेत. राजस्थान मधील सदर प्रकरणातील आरोपींची धिंड काढली जात आहे, पोलिस त्यांना लाठ्यांनी मारहाण करीत आहेत असे videos सुद्धा मोठ्या प्रमाणावर viral होत आहेत… की जे या प्रकरणातील आरोपींचे नाहीत… इतर राज्यातील आहेत.

आरोपींना सुनावणीसाठी आणताना, त्यांना घेऊन जाताना, आणताना त्यांचे चेहरे लोकांना दिसू नयेत यासाठी त्यांचे चेहरे झाकावेत, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. कारण पुढे आरोपींची ओळख परेड या महत्त्वाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन, आरोपींना त्याचा फायदा मिळण्याची शक्यता असते! अर्थात हा ही प्रकार सामान्य लोकांना मान्य नाही.

अशा प्रकरणात आरोपींना त्यांचा गुन्हा सिद्ध झाल्यास भरचौकात फाशी देण्यासोबत अन्य काही शिक्षाही सोशल मिडीयावर comments करणारी मंडळी सुचवत असतात. यात मोठ्या राजकीय नेत्यांचाही समावेश असतो.

देशातील बहुसंख्य नागरीकांनी कायद्यात बदल करण्याची अशी एकमुखी मागणी आपल्या न्यायव्यवस्थेकडे केल्यास आणि संविधान, दंडसंहिता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायदे, यांनी अशा मागण्या मान्य केल्यास हे शक्य आहे! तोपर्यंत प्रचलित न्यायप्रक्रियेनुसारच खटले चालतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही! असो.

एकाकी महिलांचे, मुलींचे रेल्वे स्थानकाबाहेरील बसथांबे, रिक्षा थांबे येथून अपहरण केले जाण्यामागे एक मोठे कारण आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे.

प्रवासात उशीर झाल्याने, घरून रागावून, रुसून बाहेर पडल्याने व नेमके कोठे जायचे हे माहीत नसल्याने, घ्यायला येतो असे सांगून प्रियकराने फसवल्याने आणि अशा काही कारणांनी महिला, मुली रात्री उशिरा अनोळखी शहरात बसथांब्यांवर बसची प्रतीक्षा करीत थांबतात. रात्री शासकीय बसेस सहसा उपलब्ध नसल्याने त्यांना रिक्षाचा पर्याय उरतो. दीदी, बेटा, madam असे संबोधन केले गेले की त्यांवर विश्वास ठेवणे साहजिक असते. यांपैकी काही रिक्षाचालक, बस चालक, खाजगी वाहनचालक या महिलांच्या, मुलींच्या असाहाय्यतेचा, भोळेपणाचा फायदा घेऊ शकतात.

दुसरे आणखी एक मोठे कारण आहे. वेश्याव्यवसाय जसा बंदिस्त जागेत केला जातो. तसा तो सार्वजनिक ठिकाणीही केला जातो… म्हणजे ग्राहक मिळवण्यासाठी संबंधित महिला, मुली काहीशा अंधाऱ्या जागी, विशेषत: बसथांबे, चौक, इत्यादी ठिकाणी व्यवस्थित वेशभूषा करून उभ्या राहतात.

 हल्ली तर कॉलेजला, ऑफिसला जाताना महिला जशी वेशभूषा करतात, अगदी तशीच वेशभूषा या महिला करताना आढळतात. त्यामुळे एखादी महिला त्या विशिष्ट कामासाठी त्या ठिकाणी उभी आहे, असे निश्चितपणे सांगता येत नाही. पण ही बाब गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना चांगलीच ठाऊक असते. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना जबरदस्तीने घेऊन जाण्याचे, त्यांचा फुकटात उपभोग घेण्याचे, आणि प्रसंगी त्यांना इजा करून फेकून देण्याचे प्रकार सर्रास घडतात.

दुसरे असे की, वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना पोलिसांच्या कारवाईची भीती असते. बरेचदा साध्या वेशातील पोलिस अशा महिलांना ग्राहक म्हणून सामोरे जात त्यांना अटक करतात. म्हणून आपल्याला न्यायला आलेली व्यक्ती निश्चित कोण आहे, याची खात्री पटेपर्यंत या महिला आरंभी नकार देतात! ज्यांना या महिला खोटाखोटा नकार देतात हे माहीत असते, ते लोक यांचे काही एक न ऐकता त्यांना जबरदस्तीने घेऊन जातात.

अशा परिस्थितीत या महिलांच्या जागी जर खरोखरच एखादी चुकून आलेली महिला, मुलगी सापडली, त्यांनी तिला विचारले, ती नाही म्हणाली… तरी ती महिला, मुलगी वरील प्रकारातीलच असल्याचा समज संबंधीत लोकांचा होऊ शकतो… हे नाकारता येत नाही!

मागील काही दिवसांपूर्वी वेषांतर करून संबंधित ठिकाणी मुद्दाम थांबलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांना असे अनुभव आल्याचे वाचनात आले आहे. विशेषत: मोठी शहरे यासाठी कुप्रसिद्ध आहेत.

रात्री रिक्षा व्यवसाय करणारे सर्वच व्यावसायिक वाईट असतात, असे मुळीच नाही. परंतू एकाकी बसथांबे, निर्जन रस्ते, अंधार, रिक्षा थांबे, तेथील चालक, व्यसनांध लोक, त्यांची लपण्याची, थांबण्याची ठिकाणे, हा एक वेगळाच आणि भयानक प्रकार आहे.

बसस्थानके, रेल्वेस्थानके, पुलाच्या खालच्या जागा इत्यादी ठिकाणे उघड्यावर वास्तव्य करणारे शेकडो लोक असतात. यांतील अनेक गरीब, असाहाय्य, मनोरुग्ण महिलांचे शोषण करणारे रात्री सक्रीय असतात. रस्त्यांवर झोपलेल्या लहान मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केले गेल्याचे गुन्हे घडले आहेतच! बरेचदा या गुन्ह्यांची नोंद होत नाही. गावा गावांत बेवारस फिरणाऱ्या मनोरुग्ण महिला, मुली यांचा समाजकंटकांनी गैरफायदा घेतल्याची उदाहरणे कमी नाहीत.

हल्ली एकल प्रवास, म्हणजे महिलांनी एकटीने प्रवास करण्याचा प्रकार बराच प्रसिद्ध झाला आहे. या महिला त्यांच्या प्रवासाचे videos प्रसिद्ध करून त्यांतून काही पैसे मिळवतात, असे समजते. आपल्याकडील सामाजिक, कायदा सुव्यवस्था लक्षात घेता, हे खूप मोठे धाडस आहे, असे वाटते!

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, गर्दीची ठिकाणे, यांमध्ये केला जाणारा महिलांचा लैंगिक छळ हाही खूप किळसवाणा प्रकार हल्ली सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. महिलांनी स्वत: याबाबत जागरूक राहणे हा एक उपाय आहे. कायदा आहे, पण त्याला मर्यादा आहेत. शिवाय कायदा गुन्हा घडून गेल्यानंतरची कारवाई करतो… पण गुन्हा होऊच नये याकडे अजून आपले पुरेसे लक्ष गेलेले नाही!

वाढती लोकसंख्या, माणसांचे नैतिक अध:पतन, स्त्री देह हा उपभोगाचे साधन अशी केलेली जाहिरात, पुरुषांच्या पौरुषाच्या विकृत कल्पना याही गोष्टी आहेतच.

रात्री अपरात्री प्रवास करावा लागणे, अनोळखी ठिकाणी जावे लागणे, एकट्यानेच प्रवास करणे, याबाबतीत महिलांचे प्रबोधन केले जाणे गरजेचे आहे. यामध्ये मोबाईल मोठी भूमिका बजावू शकतो.

काही वर्षांपूर्वी पुण्यात काही कॅब चालकांकडून अपहरण, बलात्कार यांसारखे गंभीर गुन्हे घडले होते. त्यांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी आणि खाजगी app वाल्यांनी मोबाईलच्या वापराबाबत उपाय सुचवलेले आहेत. त्याची माहिती तसेच emergency contacts, GPS tracking इत्यादी बाबीही सातत्याने प्रसिद्ध करायला पाहिजेत.

बलात्कार हा मानवी जीवनातील सर्वांत घृणास्पद गुन्हा आहे. हा केवळ शारीरिक अत्याचारच असतो असे नव्हे तर याचे दूरगामी परिणाम पिडीत व्यक्तींच्या मानसिकतेवर होत असतात. शिवाय आपला समाज पिडीतेशी कसे वर्तन ठेवेल, हे सांगता येत नाही. यासाठीच पिडीत महिलांची माहिती, छायचित्रे सार्वजनिक न करणे, न्यायालयीन कामकाज in camera अर्थात ओळख गुप्त राहील अशा पद्धतीने करणे, असे उपाय न्यायव्यवस्थेने केलेले आहेत. यालाच सोशल मिडीयामध्ये हरताळ फासला जातो आहे. अशा लोकांवर कायदेशीर पायबंद घालण्याचे प्रयत्न व्हायला पाहिजेत! अन्यथा पिडीत व्यक्तींवर झालेला हा आणखी एक बलात्कारच ठरेल!

बलात्कारी व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या शिक्षा, त्यांबाबत तपास करणारे अधिकारी, यांच्याबाबतीत भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती महोदया यांनी कोणतेही सार्वजनिक विधान केलेले नसतानाही त्यांची म्हणून काही विधाने सर्रासपणे सोशल मिडीयावर प्रसारित केलेली दिसतात, हे खूप गंभीर आहे!

कामवासनांची विकृत पूर्तता करण्यासाठी समाजाने विशिष्ट अशी अनैतिक व्यवस्था उभी केलेली आहे. यात अल्पवयीन मुलींची मागणी खूप मोठी असते. त्यासाठी खूप मोठी रक्कम मोजली जाते. ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने आपल्याच समाजातील माणसे या कृत्यांत सहभागी होतात, हे दुर्दैव आहे.

राजस्थानमधील संबंधित प्रकरणातील हॉटेल्सच्या चालक, रिक्षा चालक, ग्राहक यांच्याही कुटुंबांत अल्पवयीन मुली असतीलच… पण पैशांसाठी विवेक गहाण ठेवलेल्या, विकृत कामवासनेच्या आहारी गेलेल्या लोकांकडून अपेक्षा ती काय ठेवणार?

☆

© श्री संभाजी बबन गायके 

न-हे, पुणे 

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ काळाच्या पडद्याआड गेलेल्या परीक्षा शुभेच्छा ☆ वीणा कुलकर्णी ☆

वीणा कुलकर्णी

अल्प परिचय 

  • शैक्षणिक संस्थेत 34 वर्षे नोकरी.
  • 2018 मध्ये निवृत्त.
  • त्यानंतर लिखाणाची आवड जोपासण्यास सुरुवात.

? इंद्रधनुष्य ?

☆ काळाच्या पडद्याआड गेलेल्या परीक्षा शुभेच्छा ☆ वीणा कुलकर्णी ☆

इ. ४ थी व इ. ७ वी ची शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता ११ वी ची शालांत परीक्षा या परीक्षांना पारंपरिक शिक्षणपद्धतीत खूप महत्त्व असते. आजही आहे. फक्त परीक्षार्थीना शुभेच्छा देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झालाय हे मात्र खरे.

पूर्वी स्थानिक शाळा सोडून बाहेरच्या दुसऱ्या शाळातून विद्यार्थी स्कॉलरशिप (स्पर्धा परीक्षा) अथवा शालांत परीक्षेस बसणार ही गोष्ट खूप भारी गोष्ट असायची. एका दिवशी रोज दोन पेपर असायचे. दोन पेपर्सच्या मधल्या वेळात वाड्यातील वयाने मोठी मंडळी, मित्र ग्रूप, आप्त स्वकीय परीक्षा केंद्रावर पुष्पगुच्छ, खाऊ, फळे व पेय घेऊन परीक्षार्थी ला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा व पुढच्या पेपरला धीर देण्यासाठी आवर्जून येत असतं. यामध्ये अधिक सहभाग महिलांचा असे. वाड्यातील दोन महिला पुढाकार घेऊन सगळे ठरवायच्या. त्यास सर्वांची सहमती असायची. हा एक सार्वजनिक सोहळा असायचा.

ऐन उन्हाळ्याच्या दिवसात या परीक्षा आयोजित होत असतं. लग्नकार्य ठरवताना या तारखा टाकून दिवस ठरवला जायचा.

पित्त होऊ नये, झोप येऊ नये याची काळजी घेऊन फळे व पेय केंद्रावर घेऊन जायची प्रथा होती. द्राक्ष, उसाचा रस, कैरी सरबत, कोकम, लिंबू सरबत आवर्जून नेला जात असे. जमल्यास एखादा अंगारा पुडीत घालून दिला जायचा. (ही एक अंधश्रध्दा होती.)

आता मोबाईलचे पेव आले. कॉपी पेस्ट चा जमाना सुरू झाला… बेस्ट ऑफ लकचे कृत्रिम संदेश पास होऊ लागले, vedeo कॉलद्वारे शुभेच्छा देणे सुरू झाले व त्या इव्हेंटची मजा गेली.

अजूनही आठवतात त्या शुभेच्छा सख्खी मावशी, काकू, आज्जी, आईच्या मैत्रिणी, मित्र ग्रुप यांनी परीक्षा केंद्रावर समक्ष येऊन दिलेल्या शुभेच्छा. त्यावेळी त्यांनी पाठीवर आपुलकीने फिरवलेली थाप, आनंदाश्रू, त्यांचा आधार व त्यांनी दिलेला मूकआत्मविश्वास.

किती साधेपणा होता त्या सगळ्यात. खूप साधी सरळ माणसे पण मन मोठे, कुठेही दिखावा नाही, पोषाखीपणा नाही असे सगळे त्यावेळचे वातावरण. ते दिवस आठवले की आठवणीने भारावून जायला होते.

कुठे गेले हे सगळे?

गायब झाले काळाच्या ओघात

तंत्रज्ञानाच्या महासागरात

खूप खूप दूर 

कधीही मागे फिरून परत

न येण्यासाठी,

… आठवणीच्या कोनाड्यात lll

☆

© वीणा कुलकर्णी

संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वा ग त! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

🌴🌳 स्वा ग त! 🌹 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

संपता संपता श्रावण

धार धरली पावसाने,

डोलू लागली आनंदाने

झाडांची हिरवी पाने!

* 

संपता संपता श्रावण

होई हिरवीगार धरती,

शृंगार करुनी नटली

जणू नार घरंदाज गरती!

 *

संपता संपता श्रावण

आला बहर साऱ्या फुलां,

वाटे अवनीने ओढला

ना ना रंगांचा शेला!

 *

संपता संपता श्रावण

नदी तलाव तुडुंबले,

सीमा सोडून आपली

गावच्या शेतात घुसले!

 *

आता संपता श्रावण

लागेल चाहूल भादाची,

सुरु होईल मग लगबग

गणेशाच्या स्वागताची!

गणेशाच्या स्वागताची!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गजमुखाचा मागोवा ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ गजमुखाचा मागोवा ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

☆

प्रास्ताविक

हिंदू धर्मपरंपरेत महादेवता म्हणून मानल्या गेलेल्या देवतांमध्ये महादेव, महाविष्णू, महालक्ष्मी आणि महागणेश यांचे विशेष स्थान आहे. त्यांच्या नित्यपूजेत सूर्यदेवासह या पाच देवतांचा समावेश केला जातो. याला ‘देवपंचायतन’ असे म्हटले जाते.

या पंचदेवतांमध्ये श्रीगणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेशस्मरण आणि गणेशपूजनाने करावा, अशी धर्मशास्त्राची आज्ञा आहे. म्हणूनच आपल्या सांस्कृतिक जीवनात ‘श्रीगणेशा’ हा शब्द केवळ प्रारंभाचा समानार्थी राहिलेला नाही; त्यामागे श्रद्धेची प्रदीर्घ परंपरा उभी आहे.

गणपती अथर्वशीर्षात त्याला—

‘त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि’ असे म्हटले आहे.

ज्ञानदेवही गणेशाची स्तुती करताना म्हणतात—

ॐ नमोजि आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥

गणेशस्तुती, गणेशमहात्म्य आणि गणेशोपासना यांवर विपुल वाङ्मय उपलब्ध आहे. सनातन हिंदू धर्मपरंपरेत तसेच भारतीय अध्यात्मतत्त्वज्ञानात श्रीगणेशाला अनन्यसाधारण स्थान आहे.

हे झाले धर्मशास्त्राचे. पण इतिहास श्रीगणेशाकडे कसा पाहतो?

इतिहास एखाद्या देवतेकडे श्रद्धेच्या दृष्टीने नव्हे, तर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पाहतो. काळ, संदर्भ, शिलालेख, मूर्ती, ग्रंथ, कलावशेष आणि अन्य उपलब्ध साधने यांच्या आधारे तो धागे शोधतो. त्या धाग्यांची सांगड घालतो. तर्क मांडतो. काही निष्कर्ष काढतो—आणि काही प्रश्न अनुत्तरितही ठेवतो.

पुढील लेखन हा श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा प्रयत्न नाही. तो आहे गजमुखाच्या ऐतिहासिक प्रवासाचा मागोवा घेण्याचा एक नम्र प्रयत्न.

या शोधप्रवासातील कोणता धागा ग्राह्य वाटतो, कोणता प्रश्न विचार करायला लावतो आणि कोणता निष्कर्ष पटतो—हे ठरविण्याचा अधिकार अर्थातच वाचकांचा.

एक प्रश्न

गणपतीच्या पायाशी बसलेला तो लहानसा मूषक मला नेहमी एक प्रश्न विचारतो—

‘या गजमुखापर्यंत आपण पोहोचलो तरी कसे?’

प्रश्न साधा आहे, उत्तर मात्र साधे नाही.

आज गणपती म्हटले की आपल्या मनात एकाच वेळी अनेक गोष्टी उभ्या राहतात—मंगलारंभ, बुद्धी, सिद्धी, ऋद्धी, विघ्नहर्ता, उत्सव, भक्ती, कला आणि घराच्या उंबरठ्यावर येऊन विसावलेले एक आपलेपण.

मातीच्या मूर्तीपासून पाषाणातील भव्य शिल्पापर्यंत आणि वैदिक मंत्रापासून लोकमानसातील जयघोषापर्यंतचा त्याचा प्रवास विलक्षण आहे.

पण या प्रवासाचा आरंभ कुठे झाला? गजमुख कधी प्रकटला?

त्याच्या हातात मोदक येण्यापूर्वी, पायाशी मूषक येण्यापूर्वी, तो कोण होता? कसा होता?

या प्रश्नांची उत्तरे शोधताना आपण केवळ एका देवतेचा मागोवा घेत नाही तर भारतीय मनाच्या बदलत्या रूपांचा मागोवा घेतो.

श्रीगणेश

आपल्या कोणत्याही मंगलकार्याचा आरंभ ‘श्रीगणेशा’ने होतो. या एका शब्दातच गणपतीचे स्थान दडले आहे. ‘गणपती’ हा शब्द ऋग्वेदातही आढळतो.

ऋग्वेदातील प्रसिद्ध ऋचा—

गणानां त्वा गणपतिं हवामहे

कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।

ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत

आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥

येथील ‘गणपती’ म्हणजे आज आपण ज्या गजमुख गणेशाची पूजा करतो तोच, असे सरळपणे म्हणता येत नाही.

वैदिक ‘गणपती’चा संबंध ब्रह्मणस्पती अथवा बृहस्पतीशी जोडला जातो. म्हणजे शब्द जुना पण त्याला लाभलेले आजचे गजमुख रूप नंतरचे.

याच ठिकाणी गणपतीच्या इतिहासाचा पहिला धागा हातात येतो.

‘गण’ कुठला?

‘गण’ म्हणजे केवळ देवांचा समूह नव्हे. प्राचीन समाजजीवनात विविध प्रकारचे समूह होते—गण, व्रात, संघ, पूग इ. त्या समूहाचा अधिपती म्हणजे ‘गणपती’. म्हणून ‘गणपती’ या नावामागे एखाद्या एकाकी देवतेपेक्षा सामूहिक जीवनाची जुनी सावली असावी, असे वाटते.

कदाचित देवतेचा जन्म आधी नावात झाला असेल. रूप नंतर घडले असेल.

पाषाणातील साक्ष

इतिहासाच्या धुक्यातून एखादी प्रतिमा अचानक स्पष्ट होते.

गुप्तकालीन उदयगिरीच्या सहाव्या गुहेतील गणेशप्रतिमा त्यापैकी एक. इ. स. चौथ्या-पाचव्या शतकाच्या उंबरठ्यावरची ही प्रतिमा गणेशाच्या प्राचीन प्रतिमाविकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. उदयगिरीतील इतर देवप्रतिमांसह तिचे अस्तित्व त्या काळातील धार्मिक विश्वात गणेशाला मिळू लागलेल्या स्थानाची साक्ष देते.

पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

गुप्तकालीन धार्मिक विश्वात कार्तिकेय, मातृका आणि इतर देवप्रतिमांचे अस्तित्व अधिक स्पष्टपणे जाणवते. गणपतीचे स्वतंत्र, व्यापक महत्त्व मात्र पुढील काळात अधिक ठळक होत गेले.

मग गणपतीचा उदय नेमका कधी झाला? उदयगिरी आपल्याला पूर्ण उत्तर देत नाही. ती फक्त एक खूण ठेवते.

भूमरेचा गजमुख

इ. स. विसाव्या शतकाच्या आरंभी मध्यप्रदेशातील ‘भूमरा’ येथून प्रकाशात आलेली गणेशप्रतिमा या शोधयात्रेतील आणखी एक महत्त्वाची खूण ठरते.

आजच्या गणपतीची कल्पना डोळ्यांसमोर ठेवली तर या प्रतिमेकडे पाहताना काही गोष्टी वेगळ्या जाणवतात. यात मूषक नाही. आजच्या परिचित अलंकारांची सारीच सजावट नाही. मुकुट आहे, अलंकार आहेत. एकदंत रूपाची छाया आहे, पण आपला परिचित गणपती अजून पूर्ण झालेला नाही. जणू एखादी कल्पना पाषाणात अजून आकार घेत आहे.

शास्त्रातला गजमुख

वराहमिहिराच्या बृहत्संहितेत गणपतीच्या स्वरूपाचा उल्लेख येतो. गजमुख देवतेची ओळख आता अधिक स्पष्ट होत जाते.

यातून एक गोष्ट सूचित होते—

गणपतीची प्रतिमा एका दिवसात सिद्ध झालेली नाही. ती लोकविश्वास, धार्मिक कल्पना, कलावंताची दृष्टी आणि बदलत्या सांस्कृतिक जाणिवांतून हळूहळू घडत गेली. देवता जशी पूजली जाते, तशीच ती घडतही जाते.

दोन प्रवाह

भारतीय संस्कृतीचा इतिहास हा केवळ एका प्रवाहाचा इतिहास नाही. विविध सांस्कृतिक प्रवाहांचा परस्परांशी संपर्क झाला. संघर्ष झाला. देवाणघेवाण झाली. समन्वय झाला.

गणपतीच्या रूपाकडे पाहताना हा विचार दुर्लक्षित करता येत नाही.

लोकदैवतांचे संस्कृतीकरण कसे होते? एखादी ग्रामदेवता व्यापक धार्मिक परंपरेत कशी सामावते?

एखाद्या स्थानिक प्रतीकाला सर्वमान्य देवतेचे रूप कसे प्राप्त होते? गणपतीच्या प्रवासात या प्रश्नांची उत्तरे दडलेली दिसतात.

मातंगांचा धागा

गणपतीच्या गजमुख रूपामागे ‘मातंग’ या प्राचीन समूहाचाही संदर्भ काही अभ्यासकांनी जोडला आहे.

हत्तीशी संबंधित समूहचिन्ह, ‘मातंग’ ही संज्ञा आणि गजमुख देवतेचे रूप—या तिन्हींचा परस्पर संबंध शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. पण इथे सावध राहावे लागते. इतिहासात काही धागे सापडतात. त्यांना जोडून चित्र उभे करता येते, पण प्रत्येक जोडणी म्हणजे पुरावा नव्हे.

टोटेमची सावली

काही अभ्यासकांनी गणपतीच्या उत्पत्तीचा संबंध टोटेम परंपरेशी जोडला आहे.

मानवसमूह एखाद्या प्राण्याला आपल्या समूहाचे चिन्ह, रक्षक किंवा प्रतीक मानतो. त्या प्रतीकाभोवती श्रद्धा तयार होते. पुढे त्याला धार्मिक रूप लाभते.

हत्ती भारतीय स्मृतीत सामर्थ्याचे, ऐश्वर्याचे आणि वन्य निसर्गाच्या विराटतेचे प्रतीक राहिला आहे.

गजमुख देवतेच्या निर्मितीत या प्राचीन प्रतीकसृष्टीचा काही अंश असावा का? प्रश्न उरतो.

गणपतीचा जन्म एका सूत्राने समजावून सांगता येणार नाही.

त्याच्या मागे अनेक स्मृती आहेत.

मूषक कुठून आला?

गणपतीच्या पायाशी बसलेला मूषक या कथेत आणखी एक गूढ घेऊन येतो.

खारवेलाच्या हाथीगुंफा शिलालेखाच्या काही वाचन-व्याख्यांमध्ये ‘हस्तिगण’ आणि ‘मुषिकगण’ यांसंबंधी उल्लेखांचा संदर्भ घेतला गेला आहे. या संदर्भांवरून काही अभ्यासकांनी प्राचीन गणसमूहांतील संघर्ष किंवा परस्परसंबंधांची शक्यता मांडली आहे. मात्र या वाचनांभोवती विद्वानांमध्ये मतभेदही आहेत.

एक कल्पना अशीही मांडली गेली आहे की हत्तीशी संबंधित गण आणि मूषकाशी संबंधित गण यांच्यातील संघर्षाच्या स्मृती पुढे गणपतीच्या प्रतिमेत रूपांतरित झाल्या असाव्यात आणि मूषक त्याचे वाहन बनला असावा. पण हा निश्चित पुरावा नाही, हे एक अनुमान आहे.

गजमुखाची वाटचाल

गजमुखाला धार्मिक ओळख मिळाली आणि त्याची यात्रा भारतापुरती राहिली नाही.

तो तिबेटमध्ये तो पोहोचला. चीनमध्ये गेला. जपानमध्ये त्याचे वेगळे रूप दिसते. कोरियातही त्याच्या स्मृतींचे ठसे आढळतात.

स्थान बदलले की रूप बदलले.

नावे बदलली. उपासनेच्या पद्धती बदलल्या, पण गजमुखाची मूलभूत ओळख टिकून राहिली.

पुराणांचा काळ

गणेशपुराण आणि मुद्गलपुराण यांनी गणपतीच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक विस्तार दिला. गाणपत्य परंपरेत तो स्वतंत्र उपास्यदेव झाला. तांत्रिक परंपरेत त्याला नवी रूपे लाभली. विविध मंत्र, साधना, स्वरूपे आणि आख्यायिका त्याच्याभोवती विणल्या गेल्या.

आता तो केवळ एखाद्या गणाचा अधिपती राहिला नव्हता. तो विघ्नहर्ता झाला. बुद्धिदाता झाला. मंगलमूर्ती झाला. लोकांच्या दैनंदिन जीवनात प्रवेश करणारा आपला देव झाला.

कैलासातील क्षण

वेरूळच्या कैलास लेण्यात शिव-पार्वतीच्या विवाहाचे भव्य शिल्प पाहताना गणपतीची उपस्थिती लक्ष वेधून घेते.

.. शिव-पार्वतीच्या विवाहप्रसंगातील गजाननाचे अस्तित्व कालक्रमाच्या दृष्टीने प्रश्न उभे करते, पण लोकमानसाला कालक्रमाची फारशी क्षिती नसते. त्याला आपला देव हवा असतो.

जिथे विवाह आहे, तिथे गणपती असतो. जिथे मंगल आहे, तिथे गणपती असतो. कथेला इतिहासापेक्षा भक्तीचे माप मिळते आणि मग शिल्पकारही लोकविश्वासापुढे कालक्रम विसरतो.

घराघरांतला बाप्पा

कधीकाळी राजाश्रय मिळाला.

नंतर पेशव्यांच्या काळात गणपती उपासनेला विशेष महत्त्व आले. पुणे आणि परिसरातील गणेशोपासना अधिक व्यापक झाली. पुढे अष्टविनायक परंपरेने महाराष्ट्राच्या धार्मिक स्मृतीत गणपतीला स्वतंत्र स्थान दिले.

पण गणपतीचे खरे सामर्थ्य राजवाड्यात नव्हते, ते घरात होते, उंबरठ्यावर होते, चुलीजवळ होते, मुलांच्या हातातील मातीच्या गोळ्यात होते. कारण गणपती हा केवळ देव्हाऱ्यातला देव नाही.

तो घराचा सदस्य होऊ शकतो.

सार्वजनिक गजर

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला नवे रूप दिले. _घरातील देव सार्वजनिक झाला. _ उत्सवाला सामाजिक आशय मिळाला. लोक एकत्र आले. परकीय सत्तेच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजजागृती, संघटन आणि राष्ट्रीय भावनेला चालना देण्याचे कार्य केले. धार्मिक प्रतीकाला सामाजिक शक्ती मिळाली. गणपती पुन्हा एकदा ‘गणां’चा अधिपती ठरला. यावेळी त्या गणांचे स्वरूप वेगळे होते.

शतकानुशतके बदलत आलेल्या गणपतीच्या प्रतिमेत आधुनिक काळाने स्वतःचे प्रतिबिंब पाहिले.

माती, पाषाण, धातू, आणि आता प्रसारमाध्यमांचे युग. देव तोच. विश्वासाची अभिव्यक्ती मात्र बदलत राहिली.

पुन्हा तोच प्रश्न

गणपती नेमका कुठून आला?

ऋग्वेदातील ‘गणपती’पासून?

प्राचीन गणसंघांच्या स्मृतीतून?

लोकदैवतांच्या प्रवाहातून?

हत्तीच्या टोटेमिक प्रतीकेतून?

मातंगांच्या स्मृतीतून? किंवा 

या साऱ्यांच्या संमीलनातून? कदाचित प्रत्येक उत्तरात थोडे सत्य आहे, आणि म्हणूनच एक उत्तर अपुरे पडते.

गणपतीची कथा ही एखाद्या व्यक्तीची जन्मकथा नाही.

ती भारतीय समाजाच्या स्मृतीची घडण आहे. ज्या समाजाने नवे स्वीकारले, जुने विसरले नाही.

ज्याने विरोधकांना सदैव शत्रू ठेवले नाही, तर कधीकधी त्यांनाही आपल्या देवाच्या पायाशी जागा दिली. ज्याने पाषाणाला देव केले, मातीला रूप दिले आणि त्या रूपाला स्वतःचे मन दिले.

मातीचा गणपती

विसर्जनानंतर दरवर्षी गणपती येतो.

नवी माती, नवे रूप.

नवी सजावट, नवे गीत.

नवा गजर आणि…

 मग विसर्जन.

मूर्ती पाण्यात जाते, पण कथा जात नाही. श्रद्धा जात नाही. स्मृती जात नाही. पुढच्या वर्षी पुन्हा माती हातात घेतली जाते.

पुन्हा गजानन घडतो. पुन्हा मूषक त्याच्या पायाशी घुटमळू लागतो. पुन्हा घरात मंगलध्वनी होतो!

कदाचित म्हणूनच गणपतीची खरी मूर्ती पाषाणात नाही.

ती आपल्या सामूहिक स्मृतीत आहे! गजमुखाचा मागोवा घेत घेत आपण अखेर स्वतःचाच मागोवा घेतो. तो कुठून आला, हा प्रश्न आता तितका महत्त्वाचा राहत नाही. महत्त्वाचे एवढेच—

तो आजही आपल्यात आहे! माती बदलते. रूप बदलते. युगे बदलतात, पण गजमुख पुन्हा उभा राहतो आणि आपण पुन्हा उच्चरवात सहघोष करतो—

गणपती बाप्पा मोरया!

पुढच्या वर्षी लवकर या!

☆

संदर्भ:

गणेश कोश — डॉ. अभ्यंकर

गणेशपुराण — गोरखपूर आवृत्ती

दासबोध, ज्ञानेश्वरी 

भारतीय संस्कृती कोश — वाई

ऋग्वेद मराठी — म. म. चित्रावशास्त्री

गणपतिदेवता — लो. बापूजी अणे

डॉ. अशोक राणा — गणपतिदेवता : शोध, विकास

लोकायत — डॉ. स. रा. गाडगीळ

लोकदैवतांचे विश्व — डॉ. रा. चिं. ढेरे

जानपदगीते — सरोजिनी बाबर

अष्टविनायक देवस्थानांचे स्फुट साहित्य.

©️ दिवाकर बुरसे

पुणे.

संपर्कः ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वर्गणी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? इंद्रधनुष्य ?

☆ “वर्गणी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

मागच्या वर्षीची गोष्ट.

“गुंफा” सोसायटीतल्या गणपतीचं पहिलं वर्ष.

‘सार्थ’ गणपती.

प्रथमेश मोने.

राहणार A- 5, गुंफा सोसायटी, पुणे 29.

‘सार्थ गणपती’ हे नाव सुद्धा त्यानंच सुचवलेलं.

सार्वजनिक गणपतीला, तसा फारसा काही ‘अर्थ’ राहिला नव्हता.

निदान “गुंफा” मधला गणेशोत्सव तरी ‘अर्थ’पूर्ण असावा..

प्रथमेशला असं दिलसे वाटायचं.

म्हणून ‘सार्थ’ गणपती.

प्रथमेश नुकताच नोकरीला लागला होता तेव्हा.

सीओईपीवाला.

कॅम्पसमधनं सिलेक्ट झालेला.

पंधरा लाखाचं पॅकेज.

‘गणपतीबाप्पा’ प्रथमेशचा आवडता बाप्पा.

पहिला पगार झाला.

ठरवून ‘ऊडवला’.

सगळ्यांना वाटण्यातच संपवला.

आबा, आजी, आई, बाबा, दादा, काका, काकू, आत्या, मावशी, शिक्षक, चुलत-आते- मावस भावंड, मैत्रगण..

ईस्त्रीवाला, पेपरवाला, भाजीवाला, वाॅचमनकाका…

प्रथमेश पंधरा दिवस नुसत्या गिफ्ट वाटत होता.

” आपली माणसं “.

प्रथमेशचं मनापासून कौतुक करणारी.

आयुष्यभर प्रथमेशला सतत काहीतरी देणारी.

इटस् युवर टर्न, प्रथमेश…

सगळ्यांना मनापासून गिफ्टस् द्यायच्या.

पाया पडायचं.

आशीर्वाद घ्यायचे.

आनंदाचे डोही आनंद तरंग.

आमचा प्रथमेश दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललेला.

दुसर्या महिन्याचा पगार झाला.

घरी त्याच्या पगारावर काहीही अवलंबून नव्हतंच.

दोन तीन महिन्यानंतर, प्रथमेश फ्लॅट बुक करणार होता.

जस्ट ईनव्हेस्टमेंट म्हणून.

मग जरा पगाराला कात्री लागणार होती.

तोवर जियो जी भरके..

पंधरा दिवसांवर गणपती.

‘गुंफा’ सोसायटी तशी नवीनच झालेली.

दहा बिल्डींग्ज.

दोनशे फ्लॅटस्.

लोकांची आपापसात अजून फक्त तोंडओळख.

आमचा प्रथमेश मात्र वल्ली माणूस.

सकाळी आठ ते सहा..

आॅफीस एके आॅफीस.

मान मोडून काम.

मग मात्र क्षणभरही तिथं थांबणार नाही.

घरी आला की खेळायला खाली.

एवढा मोठा झाला तरी..

मस्त क्रिकेट खेळायची सगळी पोरं.

प्रथमेशदादा सगळ्यांचा लाडका.

तो स्वतः स्टेटलेवलपर्यंत खेळलेला.

पोरांना मस्त गाईड करायचा.

असाच खेळ संपलेला.

अंधारायला सुरवात झालेली.

प्रथमेश दादाबरोबर, पोरांच्या गप्पा रंगात आलेल्या.

एकदम दादाची अनाऊन्समेंट…

” आपल्या सोसायटीत गणपती बसवायचाय. “

पोरं खुष.

एका पायावर तयार.

पुढचा आठवडाभर क्रिकेट बंद.

प्रथमेशदादा आॅफीसमधून घरी आला की,

बच्चागँग जमायची.

मिटींगावर मिटींगा.

ठरलं..

कामं वाटून घेतली.

पहिल्यांदा प्रथमेशदादानं ” सार्थ गणपती ” च्या नावानं, बँक अकाऊंट ऊघडलं.

एक पावतीपुस्तक आणलं.

दोन जणांची टीम.

वर्गणी मागायला घरी.

पाचशेचा आकडा ठरवला गेला.

सगळ्यांना सहज परवडणेबल.

आयडिया थोडा चेंज.

दोघं जणं प्रत्येक घराची बेल वाजवायचे.

पाचशे रूपयांची पावती द्यायचे.

घरातल्या सगळ्या मोठ्यांना नमस्कार करून बाहेर.

कुणी पैसे द्यायला लागलं तर ‘नाही’ म्हणायचं.

वर्गणी आत्ता नाही..

थेट पुढच्या वर्षी घेणार.

तेही यावर्षीचा गणेशोत्सव आवडला तर…

अरे हे चाललंय काय?

बजेट ठरलेलं.

एक लाख रूपये.

साधारण दिवसाला दहा हजार.

प्रसाद, हारफुलं, पाहुण्यांचे स्वागत, त्यांची ने आण, मानधन, इतर साहित्य, सगळं सगळं त्यात समाविष्ट.

सगळा कॅशलेस व्यवहार.

दीड फुटाची शाडूची मूर्ती.

बुक केली.

परांजपेकाकांची गाडी सध्या नगरला.

त्यांच्या मुलाकडे.

त्यांचं पार्कींग रिकामंच होतं.

तिथं साधासा मंडप.

बाकी कार्यक्रम क्लब हाऊसमधे.

दोनशे घरांचा वाॅटस्सप ग्रुप फाॅर्म केला.

” सार्थ गणपती” नावाचा.

तिथंच दैनंदिन कार्यक्रमाची माहिती दिली जायची.

गो पेपरलेस.

सकाळची आरती सोसायटीतल्या पेन्शनर्स गँगकडे.

आजोबा – आजी गँग आनंदानं तयार झाली.

संध्याकाळच्या आरतीची जबाबदारी बच्चा गँगकडे.

रोज संध्याकाळी सात ते नऊ वेगवेगळे कार्यक्रम.

प्रत्येक दिवशी संध्याकाळी एक पाहुणा.

संध्याकाळची आरती पाहुण्यांच्या हस्ते.

पहिला दिवस ” सुंदर गणेश “

आजचे पाहुणे सजावटकार श्री. लवाटे.

पुष्पसजावट करण्यात एक्सपर्ट.

प्रत्येक घरासाठी फुलं दिली गेलेली.

गुलाब, निशिगंध, जर्बेरा, ग्लॅडीओडस..

प्रत्येक घरातली टीम लवाटेसरांना फाॅलो करत होती.

तासाभरात मस्त कलाकृती तयार.

फुलांची सजावट.

घरच्या गणपतीला.

लवाटे सरांनी केलेली सजावट सार्थ गणपतीला.

‘सुंदर गणेश’ सगळ्यांना आवडलाच.

दुसरा दिवस ” आरोग्यगणेश”

आजचे पाहुणे डाॅ. गंधे.

‘फॅमिली डाॅक्टर’ या विषयावर मस्त गप्पा.

दैनंदिन आहार, व्यायाम, आरोग्यविषयक काळजी, विविध तपासण्या…

डाॅक्टर मस्त बोलले.

नंतर लोकांचे प्रश्न.

शंकानिरसन.

प्रथमेशनं सोसायटीतल्या प्रत्येक व्यक्तीचा ब्लडग्रुप आणि फोन नंबर याची लिस्ट केली.

नोटीसबोर्डवर लावून टाकली.

डाॅक्टर नेत्रदानाविषयी बोलले.

बर्याच लोकांनी उत्स्फूर्तपणे नेत्रदानाचे फाॅर्म भरून दिले.

” आरोग्य गणेशा” तुझी कृपा अशीच राहू दे.

तिसरा दिवस ” अर्थ गणेश”

आजचे पाहुणे अर्थ तज्ञ आणि सी. ए. श्री. सुवर्णपाठकी.

गुंतवणूक, करबचत, म्युच्युअल फंड, रिअल ईस्टेटमधली गुंतवणूक, फायनान्शियल पोर्टफोलिओ,

इन्शुरन्स पाॅलीसीज..

सुवर्णपाठकी सर प्रत्येक विषयावर छान बोलले.

अर्थसाक्षरतेत भर पडली.

“अर्थ गणेश ” आवडलाच.

आता ‘उद्या’ची काळजी नाही.

चौथा दिवस ” पर्यटनगणेश “

आजचे पाहुणे श्री. वैकर.

छोटा ब्रेक, देशातली बघायलाच हवीत अशी पर्यटन स्थळे, विदेशातल्या सहली, पासपोर्टविषयक माहिती, ट्रीपला जाताना बॅग कशी भरावी?

प्रत्येक विषयावर वैकर सर छान बोलले.

त्यांच्या टूरकंपनीतर्फे ‘गुंफा’साठी खास डिस्काऊंटेड स्कीम सुद्धा अनाऊन्स केली.

लोकांची दिवाली टूर ठरलीसुद्धा.

” पर्यटन गणेश ” आवडलाच.

पाचव्या दिवशी ” हरित गणेश “

आजचे पाहुणे ऊद्यानतज्ञ श्री. पानतावणे.

कुंडीतली बाग, गच्चीतली बाग याविषयी मस्त गप्पा.

झाडांची काळजी, खते, कीडनाशके, मातीविरहित बाग.

खूपच नवीन माहिती मिळाली.

सहावा दिवस “संगीतगणेश “

आजचे पाहुणे सोसायटीतलेच.

संगीतशिक्षक श्री. देवडीकर.

मस्त मैफल रंगलेली.

फक्त गणपतीची गाणी.

गजानना श्री गणराया…

सातवा दिवस ” साहित्य गणेश “

आजचे पाहुणे प्रकाशक श्री. वाडेकर.

‘काय वाचाल? ‘याविषयी मस्त मार्गदर्शन.

‘मस्ट रीड’ पुस्तकांची यादी.

किंडल, ईबुक, आॅडिओ बुक याची माहिती.

त्यांच्या प्रकाशनातर्फे सवलतीत पुस्तके.

आठवा दिवस ” आकाश गणेश “

आजचे पाहुणे खगोलशास्त्रज्ञ श्री. निरगुडकर.

सगळी सोसायटी गच्चीवर.

त्यांनी आणलेली भलीमोठी दुर्बीण.

आकाशवाचन.

ग्रहतार्यांशी गळाभेट.

झाले मोकळे आकाश.

मजा आ गया.

नववा दिवस ” मानस गणेश “

आजचे पाहुणे मानसशास्त्रज्ञ डाॅ. शेळगीकर.

” मनाचे आरोग्य “.

“आनंद कुठे विकत मिळेल? “

डाॅक्टरांनी सगळ्यांना आनंदात जगायला शिकवलं.

मग शेवटी सगळ्या आजोबा आजींचा रॅम्पवाॅक.

धमाल मजा.

दहावा दिवस.

विविध गुणदर्शन.

दुपारी बच्चा गँगचा प्रोग्रॅम.

आणि मग देशपांडे गुरूजींनी सांगितलेला,

‘अथर्वशीर्षा’ चा अर्थ.

सोसायटीतल्या सोसायटीत काढलेली गोल मिरवणूक.

आजी गँगने म्हणलेल्या आरत्या.

तात्पुरत्या ऊभारलेल्या विसर्जन कुंडात बाप्पांचं विसर्जन.

दुसर्या दिवशी तीच माती सोसायटीतल्या झाडांना अर्पण.

अहाहा…

गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनावर सगळे खूष.

सोसायटीचं घट्ट कुटुंब झालेलं.

प्रथमेश हीरो झालेला.

बघता बघता वर्ष होत आलंय.

यावर्षीचे गणपती जवळ आले.

प्रथमेशनं डिटेल्ड रिपोर्ट वाॅटस्सप केला.

पै न पै चा हिशोब.

जमा लाख रूपये?

कुठनं आले?

हा प्रथमेशचा दुसर्या महिन्याचा पगार.

कालच एक मेसेज टाकलाय.

‘गेल्या वर्षी ‘ ची वर्गणी जमा करण्याबद्दल.

पावतीपुस्तक छापलंच नाही.

फक्त ‘सार्थ गणेश’चा अकाऊंट नंबर.

एका दिवसात, सगळ्यांनी पैसे अकाऊंटला जमा केले सुद्धा.

प्रथमेश तयारच नव्हता.

सोसायटीवाल्यांनी त्याचे लाख रूपये परत केले.

परांजपेकाका पोरांशी तावातावाने काल भांडले सुद्धा.

कशासाठी?

यावर्षीची वर्गणी घेतली नाही म्हणून.

कशी घेणार?

या वर्षीची वर्गणी भरली गेलीय.

अॅडव्हान्समधे.

आमचा टेन्याही गेल्याच महिन्यात नोकरीला लागलाय.

समजलं ना?

बाप्पांची कृपा.

आमच्या ‘गुंफा’त काय म्हणतात माहित्येय?

वर्गणी कधीच मागायची नसते.

मनापासून द्यायची असते.

परवडणेबल तेवढीच.

तरच बाप्पा प्रसन्न होतो.

गणपती बाप्पा मोरया.

 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सियाचीनचे वाघ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सियाचीनचे वाघ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

 – – कर्नल विजयंत कुमार आणि शिपाई सरदार सिंग!

सुमारे ७६ किलोमीटर्स लांबी आणि सुमारे २ ते ८ किलोमीटर्सची रुंदी असलेल्या एखाद्या भूभागाची किंमत ती कितीशी असणार? किंमत प्रचंड आहे… ८६९ जीव!

हा काही जमिनीचा सामान्य तुकडा नाही. इथं जर पाय रोवून उभं नाही राहिलं तर काहीच काळात ती जागा शत्रू गिळून टाकेल… आणि मग आणखी आत येईल आपल्या भूभागाचा लचका तोडायला! म्हणून एवढी मोठी किंमत चुकवून आपले लोक इथं लढत असतात.. शत्रूशीही आणि इथल्या हवामानाशीही. समुद्रसपाटीपासूनची उंची ५७५३ मीटर्स म्हणजे १८८७५ फूट. ज्या ऋतूला आपण साधारणपणे उन्हाळा म्हणतो त्या दिवसांत इथं सपाटीवर तापमान १० अंश असते… त्याचवेळी तिथून सुमारे १८०० फूट उंचीवर हेच तापमान शून्याखाली २० ते कितीही खाली जाते! ही सियाचीनची अल्पशी ओळख.

इथं माणूसच काय पण कोणताही प्राणी जिवंत राहूच नये, असा जणू निसर्गाने चंगच बांधलेला आहे. पण देशाच्या सीमांचं रक्षण करण्याच्या कार्यात निसर्गाला तोंड देण्याशिवाय पर्यायच नाही ठेवलेला आपल्या शत्रूने. १९८४ मध्ये पाकिस्तान आपल्या या हद्दीत घुसण्याच्या मार्गावर असतानाच अगदी काहीच दिवस आधी ऑपरेशन मेघदूतने बाजी मारली! सियाचीनच्या बर्फाच्छादीत प्रदेशावर १९७९ मध्ये भारतीय सैन्याचे पर्वतारोही अधिकारी ब्रिगेडीअर श्री. नरेंद्र कुमार यांनी एखाद्या गरुडाच्या नजरेसारखी तीक्ष्ण नजर फिरवली… त्यांच्या लक्षात आलं की आपल्या भूभागावर पाकिस्तान आक्रमण करू शकतो… त्यांनी या कठीण तापमानात अनेक मोहिमा हाती घेतल्या आणि अत्यंत सविस्तर अभ्यास करून अहवाल दिला! १९८४ मध्ये भारताने सियाचीनवर पावलं रोवली! कुमार साहेब सियाचीनचं वर्णन ‘एक प्रचंड लांबीचा श्वेतसर्प’ असा करतात!

पण इथं केवळ ताबा मिळवून चालणार नव्हतं… तो टिकवणेही महत्त्वाचे होते. १९८४ मध्ये मात खाल्लेल्या पाकला इथं पोहोचायला त्यांच्या बाजूने केवळ काही तासच पुरू शकतात. भारताला मात्र इथवर पोहोचायला काही दिवस लागतात. सियाचीनवर लष्करी अस्तित्त्व टिकवून ठेवण्याचा आपला रोजचा खर्च आहे सुमारे सहा कोटी. पाकिस्तानला यामानाने अगदी कमी पैसे पडतात! त्यामुळे आपण एक क्षणही दुर्लक्ष केले की ते पुढे येण्याचा प्रयत्न करतात… टपून बसलेल्या कोल्हया-कुत्र्यांसारखे. अर्थात पाकिस्तानचे सैनिकही या प्रयत्नांत मोठ्या प्रमाणात दगावलेले आहेत… दोन्ही देशांचे मिळून सुमारे दोन-अडीच हजार लोक सियाचीनमध्ये दगावलेले आहेत!

सियाचीनमध्ये जगणे किती कठीण आहे, यावर शेकडो पानांचा प्रबंध लिहिता येईल. आणि याही स्थितीत तिथे लढणा-या आपल्या भारतीय सैनिकांपैकी एका आपल्याला अज्ञात असलेल्या एका सैन्याधिका-याची आणि एका जवानाची ही कथा… ३० एप्रिल, १९८९ रोजी सियाचीनवर घडलेली.

पाकिस्तानच्या हद्दीत त्यांनी उंचावर म्हणजे Point 6400 वर एक Observation Post (सैन्यचौकी) निर्माण केलेली होती. ६४०० ही तेथील त्या पर्वताची फुटांमधली उंची तिथून ते आपल्या सैन्यावर नजर ठेवून त्यांच्या तोफखान्यास सूचना देत गोळीबार करण्यास साहाय्य करीत. ही चौकी तिथून हटवल्याशिवाय आपला धोका कमी होणार नव्हता. इथं हल्ला करण्यासाठी साधनसामुग्री पोहोचवणे सोपे व्हावे म्हणून हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा तयार करणे गरजचे होते. या तयारीनिशी आपले २, डोग्रा रेजिमेंटचे वीस सैनिक वर निघाले. त्यांचे युवा अधिकारी कॅप्टन विजयंत कुमार यांना जिथे helipad बनवायचे होते, त्या जागेवर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने उतरवण्यात आले… आपले सैनिक वर पोहोचेपर्यंत विजयंत साहेब तिथे एकटेच होते… त्या भयावह थंडीत. आणि वरून पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार होण्याची अगदी खूपच शक्यता असतानाही! आपले सैनिक खालून रस्ता तयार करीत करीत वर चढत येत होते… जागोजागी दोर बांधावे लागतात… शिड्या लावाव्या लागतात! तापमान होते उणे ३५ पेक्षाही कमी. विजयंत साहेबांनी हेलीकॉप्टर साठी योग्य जागा शोधून ठेवली. आपले सैनिक तिथवर पोहोचले. ११ एप्रिल रोजी निघालेले हे दल तिथे चार दिवसांनी पोहोचले. आणि त्यांनी तिथे एक चौकी निर्माण केली… helipad तयार केले. आणि २१ एप्रिल रोजी तिथे हेलीकॉप्टर उतरवण्याचा प्राथमिक सराव करण्यात आला… यशस्वीरीत्या!

काहीच दिवसांत या ठिकाणी आपले सशक्त सैन्यचौकी कार्यान्वित झाली. इथल्या चौकीत एकावेळी केवळ चार सैनिक आणि एक अधिकारी राहू शकत एवढीच जागा होती. पाकिस्तान्यांच्या दृष्टीस ही गोष्ट पडणार नाही, असे शक्यच नव्हते. त्यांनी घाई-घाईत एक योजना आखली आणि आपल्या या चौकीवर हल्ला करण्यासाठी हेलीकॉप्टरला खाली दोरीला लटकावून एक अधिकारी आणि काही सैनिक इथवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतू या भागात हेलीकॉप्टर उडवणे ही खूप कौशल्याची बाब असते. त्यांचे हेलीकॉप्टर हवेतच थांबले आणि खाली कोसळू लागले. त्यांनी दोर कापून त्यांच्या सैनिकांना नशीबाच्या भरवशावर सोडून ते निघून गेले! हे सैनिक नेमके पडले ते भारतीय चौकीच्या खालच्या बाजूला! ते खाली गेले असते तर आपल्या सैनिकांच्या टप्प्यात आले असते. त्यांनी एक रस्ता शोधला आणि त्यांनी एक योजन आखली… आपल्या या चार सैनिक असलेल्या चौकीवर खालून वर चढून येत अचानक हल्ला करायची!

या चार सैनिकांसाठी बर्फात खड्डे घेऊन खंदक तयार करण्यात आले होते. या खंदकावर रायफली ठेवून सैनिक उभे असत. या रायफली थंड पडू नयेत म्हणून पायांजवळ केरोसीनचा स्टोव्ह पेटता ठेवावा लागतो.. अन्यथा हत्यारे गोठून जातात… आणि फायरींग करू शकत नाहीत.!

चार सैनिक आणि एक अधिकारी अशी पाच जणांची तुकडी. दोघा सैनिकांनी दोन तास पहारा द्यायचा… तोवर इतर तिघे जण आराम करतील… असे आळीपाळीने करायचे अशी व्यवस्था होती.

सायंकाळची वेळ. कॅप्टन विजयंत कुमार साहेबांचा buddy अर्थात साहाय्यक सैनिक लान्स नायक प्रेम सिंग साहेबांशी गप्पा मारतो आहे… म्हणाला, ”साहेब, मला मुलगा झाल्याची बातमी कालच समजली! ” यावर विजयंत साहेबांनी त्याचे अभिनंदन केले… आणि इथून खाली गेल्यावर पार्टी करण्याचे निश्चित केले! तेवढ्यात शिपाई सरदार सिंग आणि लान्स नायक कमलेश्वर आपली पाळी संपवून चौकीत परत आले… सरदार सिंग यांनी आपल्या पायांतील बूट काहीवेळा उतरवले आणि तंबूतील स्टोवच्या उष्णतेवर ते पाय शेकू लागले! आता उरलेल्या दोघांना पहा-यावर जायचे होते! त्यानुसार प्रेमसिंगही पहा-यावर गेले… आणि त्यांनी शत्रूला पाहिले… दुश्मन… दुश्मन! अशी आरोळी दिली… सरदार सिंग हत्यार घेऊन अनवाणी पायानेच बाहेर धावले… आणि बर्फातून धावत जात त्यांनी चौकीवर चालून येणा-या शत्रूवर अचूक हल्ला चढवला… इकडे पहा-यावर नुकत्याच परतलेल्या प्रेमसिंग यांची गन अजून थंड असल्याने फायर होतच नव्हती… ते जबर जखमी झाले. सरदार सिंग यांनी प्रेम सिंग यांना तिथून उचलून मागे आणले… तंबूत ठेवले… आणि त्यांच्याकडची काडतुसे घेऊन पुन्हा बाहेर धाव घेतली… तीन दुश्मन उडवले… आणि त्याच प्रयत्नात खांद्यावर गोळी लागून जखमीही झाले.

इकडे एका क्षणात कॅप्टन विजयंत कुमार साहेबांनी कृती केली… चौकीत घुसले आणि तिथे असलेले rocket launcher हाती पेलले… आणि या चौघा-पाच जणांच्या दिशेने फायर केले… यावेळी शत्रूही गोळीबार करीत होता… पण कॅप्टन साहेबांनी त्याची पर्वा केली नाही!

Rocket launcher च्या एका गोळ्याने काम फत्ते केले… ते पाचही जण मागे फेकले गेले… आणि कुठे खाली दरीत गेले समजले नाही! याच दरम्यान आपले तिन्ही सैनिक खंदकात पोहोचले… त्यांनी तिथे गरम करण्यासाठी ठेवलेल्या हत्यारांचा वापर करण्यास सुरुवात केली… जोरदार गोळीबार सुरु केला… तिथले पहाड या आवाजांनी एकदम सावध झाले! एरव्ही तिथे इतर आवाज विरळाच असतात. हा आवाज अर्थातच इथून ५०० मीटर्स खाली असलेल्या सैन्य तुकडीने ऐकला होताच. त्यांना वाटले आपली ही चौकी गेली… कारण विजयंत साहेब खाली रेडीओ मेसेज देण्याच्या स्थितीत नव्हते… ते जिथून पाकिस्तानी सैनिक वर चढून आले होते त्यांच्या दिशेने सुमारे पाचशे मीटर्स पर्यंत चालत गेले होते. जाताना कमरेला दोर बांधून घेतला… कारण वाटेत कुठेही बर्फाचा चिंचोळा खड्डा असू शकतो… अंधार होता… त्यांनी खाली वाकून पाहिले तर तिथे दोर लावलेला होता… आणि तो दर हेलाकावे खात होता… अर्थात खालून आणखी काही सैनिक वर येण्याच्या प्रयत्नात होते! कॅप्टन साहेबांनी दोर कापून टाकला…!

इकडे चौकी आणखी एका बाजूने पाच पाकिस्तानी बर्फात सरपटत सरपटत हल्ला करण्यास पुढे सरसावले… आपली पहा-याची पाळी संपवून तंबूत माघारी आलेल्या शिपाई सरदार सिंग यांनी आपली चांगली तापलेली गन अचूक डागत त्यांना ठोकले!

इकडे खालून वर पाहणा-या आपल्या सैनिकांना वाटले की आपल्या चौकीवर हल्ला करून ती पाकने जिंकून घेतली आहे.. आणि आता ते आणखी मागे म्हणजे आपल्यापर्यंत येतील! त्यांनी जिथे कॅप्टन साहेबांनी rocket launcher डागले होते, त्या जागेचा संदर्भ घेत खालून तोफा डागण्याची तयारी केली होती… तेवढ्यात कॅप्टन साहेब तंबूत परतले… त्यांनी खाली रेडीओ मेसेज केला… हलो… विक्टर हिअर! आमचा 

खाली हा मेसेज ऐकणा-या अधिका-यांचा क्षणभर त्यांच्या आवाजावर विश्वासच बसला नाही… कारण त्यांनी त्या चौकीवर तीन बाजूंनी झालेला गोळीबार पाहिला होता!

सुदैवाने आपला गोळीबार सुरु होण्याआधीच कॅप्टन साहेबांनी संदेश पोहोचवला आणि मोठा अनर्थ टळला… कारण बोफोर्स तोफेचा गोळा जिथं पडतो त्या जवळचा कित्येक मीटर्सचा परिसर भाजून निघतो! यावेळी पाक तोफखानाही जागा झाला… आणि त्यांनी गोळे डागायला सुरुवात केली… आपल्या बोफोर्स या रात्री हजार वेळा कडाडल्या!

कॅप्टन विजयंत यांच्या तुकडीच्या जागी मग खालून नऊ सैनिक आणि एक अधिकारी अशी सुसज्ज तुकडी निघाली… परंतू तोफांच्या मां-यामुळे त्या परिसरातील बर्फाचे कडे पिचकले गेले होते… असाच एक मोठा हिमनग निसटला आणि त्यात आपले हे नऊ सैनिक आणि सुभेदार भागसिंग हुतात्मा झाले… त्यांचे देह ताब्यात येण्यास महिना-दीड महिना लागला… ही किंमत असते सियाचीनमधल्या लढाईची!

वर मदतीस येणारी दुसरी तुकडी येण्यास अजून अवकाश होता. विजयंत साहेब आणि त्यांचे चार सैनिक आता अधिकच सावध राहू लागले… झोप विसरली गेली. दोन तीन दिवस सतत खूप बर्फ पडले… पाच फूट उंचीचा बर्फ साठला… डोळ्यांच्या पापण्यांवर जर डोळ्यांतून येणा-या पाण्याचा थेंब थांबला… की त्याचे बर्फात रुपांतर होते… पापण्यांवरील ते गोठलेले बर्फ बोटांनी चुरा करून काढून टाकले तरच समोरचे दिसणार!

या दरम्यान या चौकीतील सर्वांनाच हिमबाधा झाली… तिघांची हातांची बोटे कापून काढावी लागली.. एक सैनिक हुतात्मा झाला… विजयंत साहेबांच्या पायांना जखमा झाल्या… त्या ब-या होण्यास खूप कालावधी जावा लागला!

सहा एप्रिल रोजी हवामान थोडे सुधारल्यावर कॅप्टन विजयंत आणि इतरांना खालच्या मुख्य तळावर आणण्यात आले. तेथे त्यांचे खूप जोशात स्वागत करण्यात आले! शिपाई सरदार सिंग आणि कॅप्टन विजयंत कुमार या दोघांनाही वीर चक्र सन्मान जाहीर करण्यात आला.

पाकिस्तानी चौकीला शह देण्यासाठी हाती घेतल्या गेलेल्या या सैन्य कारवाईला ऑपरेशन आयबक्स असे नाव दिले गेले होते. आयबक्स हा बर्फाळ प्रदेशात राहणारा मेंढासदृश प्राणी असून डोंगराच्या अगदी नव्वद अंशाच्या उभ्या भिंतीवर नीडरपणे चढून जाण्यासाठी हा प्राणी वाकबगार आहे.

पुढे या भागातून दोन्ही देशांनी मागे जावे असा करार झाला होता. पाकिस्तान करार पाळण्याच्या बाबतीत कुप्रसिद्ध असल्याने आपले सैन्य इथे चोवीस तास सज्ज असते!

कॅप्टन विजयंत कुमार यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. पण या मोहिमेदरम्यान गमावलेल्या दहा सैनिक आणि एका अधिका-याच्या आठवणी त्यांना आजही सतत भेडसावत असतात!

☆

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares