मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. इरावती कर्वे – लेखक – बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ डॉ. इरावती कर्वे – लेखक – बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर

“ए दिनू मी जाते” अशी नवऱ्याला शंभर वर्षापूर्वी हाक मारणारी, थोर समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, चिकित्सक संशोधक, लेखिका, डा.इरावतीबाई कर्वे यांचा ११ ऑगस्ट हा स्मृतीदिन.

महाराष्ट्राला ज्यांचा विसर पडला आहे अशा अनेक विद्वान व्यक्तीपैकी डा.इरावतीबाई कर्वे याही एक आहेत.पुण्याच्या फर्ग्युसन कालेजचे प्राचार्य डा.दिनकर धोंडो कर्वे यांच्या त्या पत्नी व महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्नूषा आहेत.बाईंचा जन्म म्यानमार येथे १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला.वडीलांचे नाव गणेश हरी करमरकर व आईचे नाव भागीरथीबाई होते.वडिल म्यानमरधील एका कंपनीत नोकरी करीत होते.मूळचे हे कुटुंब कोकणातले आहे.त्यांना पाच भाऊ होते.म्यानरमधील इरावती नदीवरुन त्यांचे नाव “इरावती” असे ठेवले.कुटुंबात त्यांना माई म्हणत.विद्यार्थी व मित्रपरिवारात त्यांना आदराने “बाई” असे म्हटले जायचे.

लालसर गोरापान रंग, उंच, धिप्पाड देहयष्टी, रसरसशीत कांती.ठसठशीत कुंकु.घट्ट बुचडा, नऊवारी साडी, निळ्या, निळ्या डोळ्यात चमकणारे प्रचंड बुध्दीचे तेज असे त्यांचे सुंदर व अत्यंत विलोभनीय व्यक्तीमत्व होते.पुण्यातील रस्त्यावरुन १९५२च्या सुमारास भरधाव वेगाने स्कूटर चालवीत डेक्कन कालेजकडे जाणाऱ्या या महान विदूषीकडे अवघे पुणेकर कूतूहलाने व आदराने पाहत असत.

वयाच्या सातव्या वर्षी हुजूरपागा शाळेत त्यांना दाखल केले.आणि मग त्या कायमच्या पुणेकर झाल्या.१९२२ साली त्या मट्रिक झाल्या.१९२६ साली फर्ग्युसन कालेजमधून त्या तत्वज्ञान विषय घेऊन बी.ए.झाल्या.आणि त्याचवर्षी त्यांचा फर्युसन कालजचे प्राध्यापक दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी प्रेमविवाह झाला.१९२८ साली त्या एम.ए.झाल्या.त्याचवर्षी महर्षि कर्व्यांचा विरोध असताना त्या अट्टाहासाने पी.एचडी करण्यासाठी जर्मनीला गेल्या.१९३० साली “मानवी कवटीची अरुप प्रमाणता”(A semetry of human skull) या विषयात त्यांना पी.एचडी मिळाली.तत्कालीन काळात स्त्रिया पदवीधर होणे हेच अवघड होते.बाई तर परदेशात जाऊन पी.एचडी.होऊन आल्या होत्या.पुण्यात त्यावेळी ही अपुर्वाईच होती.काही काळ त्यांनी एसएनडीटी विद्यापीठात कुलसचिव पदावर काम केले.व नंतर त्यांनी डेक्कन कालेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली.संशोधन हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते.त्यामध्ये त्या रमून गेल्या.महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना फर्ग्युसन कालेजचे प्राचार्य रँग्लर र.पु.परांजपे यांचा सहवास लाभला होता.त्यांच्या घरीच त्या राहत होत्या.या विद्वान, ऋषितुल्य गुरुंचे संस्कार बाईंच्या व्यक्तीमत्वात गडदपणे ऊमटले.

संशोधन, चिकित्सा, साहित्य, काव्य यांची अभिरुची त्यांच्या संस्कारात निर्माण झाल्या.संशोधक हा त्यांचा मूळ पिंडच होता.संशोधन करण्यासाठी सारा भारतभर त्या फिरल्या.जगभर प्रवास केला.मानववंशशास्त्र व समाजशास्त्र यामध्ये त्यांनी आयुष्यभर संशोधन केले.अखंड वाचन केले.शंभरहून अधिक संशोधनपर लेख लिहिले.जगभर व्याख्याने दिली.त्यांचे सारे लेखन चिंतनगर्भ आहे.चिकित्सा करतानाही अत्यंत सहृदयपणे विवेचन त्यांनी केले आहे.हिंदू समाजरचना, हिंदू समाज एक अन्वयार्थ, महाराष्ट्र अँड इटस् पीपल, किनशीप आरगनायझेशान इन इंडिया(नातेदारी संबध)असे पुष्कळ वैचारिक व संशोधनात्मक त्यांनी लेखन केले आहे. Kiniship organization in India या ग्रंथाने त्यांना जगप्रसिध्द किर्ती मिळवून दिली.नात्यासंबधी शब्द, त्यांचा अभ्यास व स्त्रियांच्या प्रश्नासंबधी त्यांचे लेखन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.रुढअर्थाने त्या स्त्रिवादी नाहीत.परंतु त्यांच्या वैचारिक चिंतनातून आपसूकच स्त्रिवादी विचार प्रसवले आहेत.हे त्यांचे हवे तर द्रष्टेपण म्हणता येईल.स्रिया पुरुषाबरोबर समानतेचे हक्क मागतात.इरावतीबाईंनी स्त्रीयांना समानतेचे हक्क काय मागता तर समानतेपेक्षा जास्तच मागा असे सांगितले.त्यांचे सासरे महर्षि कर्वे यांनी स्रियांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढले.परंतु इरावतीबाईंनी महिलासाठी वेगळ्या विद्यापीठाची गरजच नाही असे म्हटले.त्यांना पुरुषांच्याबरोबरीने शिकू द्या असे सांगितले.

इरावतीबाईनी मानवंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्म, संस्कृती याविषयी वैचारिक आणि संशोधनात्मक लेखन केलेच शिवाय त्यांनी जे ललित लेखन केले आहे ते फारच ऊच्च दर्जाचे केले आहे.महाराष्ट्र संस्कृती त्यांच्या लेखनात ऊमटली आहे.त्यांच्या वैचारिक लेखनामुळे त्यांचे ललित लेखनही विलक्षण टापटिपीचे व हृदयगंम झाले आहे.”युगांत” मधील व्यक्तीरेखाने त्यांना मराठी साहित्यात अढळ स्थान प्राप्त करुन दिले आहे.महाभारतील गूढ व्यक्तीमत्वाचा शोध त्यांनी मानवंशशास्त्र व समाजशास्त्रीय अनुबंधाने घेतला आहे.हे पुस्तक वाचताना आपण देहभान विसरतो.भोवरा, युगान्त, परिपूर्ती असे पुष्कळसे ललित लेखन त्यांनी केले आहे.परिपूर्ती या पुस्तकात परिपूर्ती या शिर्षकाचा लघुकथेच्या अंगाने जाणारा त्यांचा आत्मलेख आहे.एका समारंभात बाईंची ओळख करुन देताना अमक्याची सून, अमक्याची मुलगी, अमक्याची पत्नी अशी करुन दिली.समारंभ संपला.बाई घरी चालल्या.परंतु त्यांचे मन विलक्षण अस्वस्थ होते, मन सैरभैर झाले होते.त्यांना कसले तरी अपुरेपण जाणवत होते.काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते.याच विचारात त्या घरी चालल्या होत्या.वाटेत मुलांचा खेळ चालला होता.बाईंना पाहताच एक मुलगा मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे! शूः शूः त्या बाई पाहिल्यास का? ती बाई जात आहेत ना? त्या आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का”.एवढ्या गलक्यातून ते वाक्य ऐकताच बाई चपापल्या.त्यांचे डोळे आनंदाने चमकू लागले.आता त्यांना काहीतरी हरवले होते ते गवसले होते.मनाची परिपूर्ती झाली होती.समारंभातील अपूरी ओळख आता पूर्ण झाली होती.” आधीच्या परिचयात प्रतिष्ठा होतीच.”कर्व्याची आई”या शब्दाने प्राणप्रतिष्ठा झाली.

खरेतर बाईनी ही गोष्ट उपहासाने लिहिली होती.स्त्री कितीही कर्तबगार झाली तरी ती कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाची पत्नी अशीच असते, तिला स्वतःची वेगळी ओळख नसते.हे त्यांना सांगायचे होते.परंतु कर्व्याची आई ही त्यांची ओळख त्यांना जीवनाची परिपूर्ती वाटून गेली.

त्यांचे सारे ललित साहित्य असेच अंतर्मुख करणारे आहे.मनाचा तळ ढवळून काढणारे आहे.वैचारिक घुसळण करणारे आहे.एवढ्या विद्वान बाई, इंग्लिश सहीत अनेक पाश्चात्य भाषा अस्खलित बोलणारी पंढरपूरची वारी करते याचे मराठी माणसाला केवढे अप्रुप वाटायचे.अगोदर ऊंच असलेल्या बाई आणखी ऊंच वाटू लागायच्या.प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून घेणारी ही बुध्दीप्रामाण्यवादी, प्रचंड विद्वान बाईं वारीत सामील व्हायच्या.भक्ती आणि ज्ञान याचा केवढा हा मनोज्ञ संगम! विद्वतेची, पांडित्याची भरजरी वस्त्रे बाजुला सारुन फाटक्या तुटक्या, दीन- बापुड्या गरीब वारकऱ्याबरोबर पांडुरंगाच्या ओढीने पंढरीला जाणारी ही पहिलीच भारतीय उच्चविद्याविभूषित विदूषी आहे.बाईंना फक्त ६५ वर्षाचे आयुष्य लाभले.११ आगष्ट १९७० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.परंतु एवढ्या आयुष्यात कोणी शंभर वर्षे जगून होणार नाही एवढे संशोधन व वैचारिक लेखन केले, खूप भ्रमंती केली.खूप व्याख्याने दिली.परदेशात लौकिक मिळविला.शंभर वर्षांपूर्वी स्त्री असल्याचा कोणताही अडसर न मानता विद्वत्तेच्या उंच शिखरावर विराजमान झाल्या.सनातनी पुण्यातल्या भररस्त्यावर भरधाव वेगाने स्कूटर चालवणारी, फर्ग्यूसन कालेजच्या प्राचार्य असलेल्या आपल्या नवऱ्याला “ए दिनू मी जाते रे” अशी एकेरी बोलणारी या महाराष्ट्राच्या विद्वान सुपूत्रीला साष्टांग दंडवत.

लेखक – बी. एस. जाधव 

प्रस्तुती – उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कटू वास्तव – – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

श्री अमोल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कटू वास्तव– – –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं. 

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या.आपण टपरीवर चहा घेऊ.” 

ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा.”

आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉल मध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला. 

तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरिया मध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या. 

५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो. 

 बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते. 

“पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय? ” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्स मध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं. 

पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही. 

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही..! बिल भरून माणसं निघूनही गेली. 

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात..! पराक्रम दाखवण्याच्या नादात एकस्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया..! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात..! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल..

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय?

आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही. 

महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का?

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत.

बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील?

कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही. 

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाइक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे..! रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात?

सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? 

जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही. 

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावायलाच हवा.

*राष्ट्रहित सर्वोपरी* 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ CPR…अर्धवट ज्ञान धोक्याचे! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

CPR…अर्धवट ज्ञान धोक्याचे! ☆ श्री संभाजी बबन गायके 

दुस-याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे, हे नेहमीच कौतुकास्पद आहे. परंतु अर्धवट वैद्यकीय ज्ञान, गैरसमज यांमुळे एखाद्या व्यक्तीची जीव वाचवला जाण्याची शक्यता बरीच कमी होऊ शकते!

आपल्याकडे अपघातात सापडलेल्या व्यक्तीला पाणी पाजण्याची रीत आहे. आणि अशा व्यक्तीला यावेळी पाणी पिण्याची प्रचंड इच्छा होते, हेही खरे आहे. या व्यक्तीला जर मांडीवर घेतले तर हनुवटी त्याच्या गळयाच्या खाली टेकते आणि त्यामुळे त्याचा श्वासमार्ग काहीसा अवरुद्ध होतो…अशावेळी त्याला पाणी पाजले तर ते पाणी पोटात न जाता फुप्फुसात जाण्याची आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होण्याची खूप शक्यता असते. यामुळे त्या व्यक्तीला उपायापेक्षा अपायच होऊ शकतो. 

हल्ली हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले आहे. आणि कधीही, कुणालाही, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी याला सामोरे जावे लागू शकते. हृदयविकाराच्या झटक्याचे एकापेक्षा अधिक प्रकार असतात. Heart Attack आणि Cardiac Arrest यांमध्ये फरक असतो. 

Heart Attack (Myocardial Infarction): A plumbing problem where blood flow to a part of the heart muscle is blocked. The person is usually conscious, breathing, and has a pulse. CPR is not performed in this state.:- हृदयाच्या स्नायूंना होणा-या रक्तपुरवठ्यामध्ये काही अडथळा येतो. असा रुग्ण सर्वसाधारणपणे शुद्धीवर असतो, श्वास सुरु असतो, त्याच्या श्वासांची नाडी लागते. या प्रकारात सीपीआर दिला जात नाही.

Cardiac Arrest: An electrical problem where the heart abruptly stops beating and pumping blood. The person loses consciousness, stops breathing normally (or only gasps), and has no pulse. This is when CPR is required.:- या प्रकारात हृदयाचे काम अचानकपणे थांबते आणि रक्त आत घेण्याची आणि बाहेर टाकण्याची प्रक्रिया थंडावते. रुग्ण बेशुद्ध होतो, नियमित श्वास घेत नाही, दीर्घ उसासे टाकतो आणि त्याची श्वासाची नाडी लागत नाही. या प्रकारात cpr दिला जातो. 

गरज नसताना cpr दिला जात असताना, cpr देणारी व्यक्ती प्रशिक्षित नसल्याने एका महिलेच्या बरगड्या मोडल्याचा प्रकार नुकताच घडला, त्याची बातमी आपण वाचली असेलच! यात cpr देणा-याचा हेतू चांगलाच होता…मात्र परिणाम चुकीचा झाला!

वरील माहिती इंटरनेटवरून घेतली असून त्याचे स्वैर भाषांतर केले आहे. आणि हे १०० टक्के बरोबर असेल, असे अजिबात नाही. मात्र सर्वसामान्य माहिती द्यावी, म्हणून दिली आहे. 

मुख्य मुद्दा हाच आहे की, cpr अर्थात cardiopulmonary resuscitation (हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन) कसे द्यावे. भारतातील केवळ २ टक्के लोकांना याचे प्रशिक्षण मिळालेले आहे!

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत एक माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहे. ते प्रत्येकाने एकदा तरी नजरेखालून घालावे! मोठी माणसे आणि लहान मुले यांना cpr द्यायचा झाल्यास स्वतंत्र सूचना आहेत!

आणखी एक गोष्ट, cpr देताना छातीवर दाब द्यावाच लागतो, या दाबामुळे रुग्णाच्या बरगड्या तुटू शकतात! आणि वयस्कर व्यक्ती ज्यांचे हाडे वयोमानामुळे ठिसूळ झालेली आहेत तसेच लहान मुले यांच्यात हे प्रमाण अधिक होऊ शकते. काही अज्ञानी लोक डॉक्टरांनी जोरात cpr दिला आणि त्यामुळे रुग्णाची हाडे तुटली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला…असे समजतात! याला काही अर्थ नाही. उलट जीव वाचवण्याचा निकराचा प्रयत्न करीत असताना बरगड्या मोडल्या तरी cpr थांबवून चालत नाही..अन्यथा रुग्णाची वाचवले जाण्याची शक्यता संपून जाऊ शकते!

 शासनाने प्रसिद्ध केलेली cpr देण्याची पद्धत सांगणारी pdf इंटरनेट वर उपलब्ध आहे. मी whatsapp वर पाठवू शकतो.

 अधिकृत माहितीसाठी प्रत्येकाने शासकीय अधिकृत लेखी साहित्य पहावे. या लेखावर विसंबून राहू नये, ही नम्र विनंती.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्णाचं गुप्तदान… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्णाचं गुप्तदान…  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

अर्जुन एकदा श्रीकृष्णाला विचारता होतो – “कृष्णा, कर्णाप्रमाणेच मीसुद्धा खूप दान करतो, मग लोकं कर्णाचेच दानशूर म्हणून का गोडवे गातात? “

कृष्ण अर्जुनाला एका टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या एका गावात घेऊन जातो. कृष्ण आपल्या मंत्रशक्तीने त्या टेकडीचे सोन्याच्या ढीगात रूपांतर करतो आणि अर्जुनाला सांगतो, “हे सोनं या गावातल्यांना वाटून टाक.”

अर्जुन गावात दवंडी पिटवतो व दुसऱ्या दिवशी सकाळपासून सर्वांना सोन्याचं दान स्वीकारायला बोलावतो. दिवसभर अर्जुन दान वाटतो आणि प्रश्नार्थक मुद्रेने कृष्णाकडे पाहतो.

कृष्ण काही उत्तर न देता कर्णाकडे जातो व त्यालाही एका टेकडीएवढ्या सोन्याचं दुसऱ्या एका गावात वाटप करायला सांगतो. हा निरोप मिळताक्षणी कर्ण त्या गावच्या मुखियाकडे जातो, व सांगतो की तुमच्या गावाच्या वेशीवर सोनं ठेवलं आहे, तुम्ही तुमच्या गावकऱ्यांत वाटून टाका.

निरोप दिल्यावर क्षणभरही न थांबता कर्ण तिथून निघून जातो. अर्जुन हे सर्व पहात असतो आणि ही निरपेक्ष वृत्ती बघून तो मनात खजिल होतो. कृष्ण त्याला सांगतो, “तू स्वत: उभा राहून दान वाटत होतास तेव्हा तुझ्या मनात सुक्ष्म अहंकार होता – हे दान *मी* देत आहे, *मी* गावकऱ्यांना मदत करत आहे, *माझं* कौतुक व्हावं. कर्णाचं तसं नाही. त्याच्या डाव्या हातानं दिलेलं दान उजव्या हाताला कळतही नाही, या त्याच्या प्रसिद्धीच्या मागे न धावण्यातच त्याचं श्रेष्ठत्व आहे.”

अर्जुनाला आणखी काही सांगायची गरज नव्हती.

— — — —

करोना काळातली ही कथा. गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील रांदेर गावाजवळील गोराट नावाचं छोटंसं खेडं! रेड झोनमधील करोना प्रभावित क्षेत्र. सकाळी दोन तास किराणा भाजीपाला विक्रीला परवानगी असण्याच्या वेळात एक छोटासा टेंपो खेड्याच्या बाजाराच्या जागी येऊन उभा राहिला. टेंपोच्या सर्व बाजूंच्या फलकावर – बॅनर्सवर “गरजूंसाठी प्रत्येकी एक किलो पीठाचं वाटप” असं लिहीलेलं.

ना लाऊडस्पीकर, ना गाजावाजा, ना फोटोग्राफरची फौज. टेंपोचा ड्रायव्हर गाडी थांबवून मागच्या बाजूला येऊन हातात एक किलो पीठाची पिशवी घेऊन उभा राहिलेला. तोही डोक्यावर टोपी घातलेला आणि मास्क वगैरे जामानिम्याने चेहरा जवळपास दिसतच नव्हता.

खरंच गरजू जे होते, ज्यांना एक किलो पीठाचीही महती होती असे पाच पन्नास जण येत गेले, तो ड्रायव्हर प्रत्येकाला एक एक किलो पीठाची पिशवी देत होता, अदबीने मनापासून नमस्कार करत होता, थोडे धीर देणारे दोन शब्द बोलत होता आणि मग रांगेतील पुढच्या माणसाकडे वळत होता.

— — — —

हनुमान मंदिराजवळच्या मासीने (मावशी) एक किलो पीठ घेतलं होतं. लॉकडाऊनमुळे तिचं टिकल्या बांगड्या विकण्याचं छोटेखानी दुकान गेला महिनाभर बंदच होतं. जवळची पुंजी संपत आलेली. थोडं उधार उसनवार करून कसंबसं ती चिल्ल्यापिल्यांना दोन घास खाऊ घालत होती.

आज असलेल्या तुटपुंज्या पैशातून तिनं थोडी भाजी, थोडे तांदुळ, थोडी डाळ घेतली होती. आज गव्हाचं पीठ मिळालं होतं, पोराबाळांना एक दोन दिवस तरी पोळी खायला मिळणार होती.

घरी आली, कणिक मळायला तिनं पीठाची पिशवी फोडली, पीठ काढताना पीठात एक प्लॅस्टिकची पिशवी तिच्या हाताला लागली. ती पिशवी तिनं झटकून उघडली, पाहिलं तर एक नोटांचं छोटं पुडकं त्या पिशवीत होतं. तिच्या छोट्या कुटुंबाची महिन्या दोन महिन्याची डाळ तांदुळाची सोय करेल इतके पैसे त्यात होते.

मासीने ते पीठ तसंच ठेवलं. कशीबशी दाराला बाहेरून कडी घातली आणि ती बाजारपेठेतल्या त्या टेंपोवाल्याला शोधायला; त्याला भेटायला; त्याचे आभार मानायला धावतच निघाली.

तास दोन तास वाटप करून, “इदं न मम” म्हणत, आपलं काम चालू ठेवण्यासाठी टेंपो जसा आला तसाच गुमनामपणे पुढच्या गावाला निघून गेला होता आणि बाजारपेठेत त्याच्याकडून पीठ घेतलेली मासी, रसिकाबेन, चंपककाका, अस्लम, राघाभाई, करसनकाका त्याला शोधत होते आणि तो गेला त्या वाटेकडे बघत हात जोडून नमस्कार करत त्याचे आभार मानत होते.

— — आजही गुप्तदान करणारे दानशूर कर्ण डाव्या हाताने दिलेलं दान उजव्या हाताला कळू देत नाहीयेत.

डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ताकदीने जगलेला विचार, प्रेमाने घडवलेले कार्यकर्ते – भाग २ – लेखक : प्रसाद चिक्षे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ ताकदीने जगलेला विचार, प्रेमाने घडवलेले कार्यकर्ते – भाग २ – लेखक : प्रसाद चिक्षे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले

विवेकानंद केंद्र -एकनाथजी रानडे -ए. बालकृष्णन

 – मा. श्री. ए. बालकृष्णन… विवेकानंद विचार आणि पूर्वांचलाशी आयुष्यभर नातं जोडणाऱ्या एका विलक्षण कर्मयोग्याला श्रद्धांजली… मृत्यू दि. २७/८/२

परस्परं भावयन्तः…

बालकृष्णनजींबरोबर प्रवास करताना त्यांनी तिनसुकियाला भगवद्गीतेतील एक श्लोक आम्हाला समजावून सांगितला—

“परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ।”

संघटनेच्या कामाचा हा किती जबरदस्त आधार आहे, हे तेव्हा जाणवलं.

एकमेकांना वाढवणं, एकमेकांना बळ देणं आणि एकमेकांच्या विकासातून मोठं कार्य उभं करणं—हा विचार बालकृष्णनजींच्या कार्यपद्धतीतच होता.

त्यांच्या पॅशनेट नेतृत्वाखाली विवेकानंद केंद्राचं पूर्वांचलातील काम अफाट वाढलं.

शेकडो मुलांशी असलेला संपर्क काही हजार मुलांपर्यंत आणि पुढे लाखो लोकांपर्यंत पोहोचला.

अनेक सेवाकार्ये उभी राहिली… अनेक शाळा उभ्या राहिल्या… अनेक प्रकल्प उभे राहिले… 

या प्रकल्पांचं नियोजन, त्यांची स्थापना आणि त्यांची अंमलबजावणी—सगळंच आखीव-रेखीव आणि जबरदस्त होतं.

‘विवेकानंद केंद्र शिक्षा प्रसारक विभाग’ त्यावेळी अरुणाचल प्रदेशातील अनेक शाळांचं काम पाहत होता. त्या शिक्षण प्रसारक विभागाचा मी सदस्य झालो.

बालकृष्णनजींच्या नेतृत्वात काम करताना एक गोष्ट सतत जाणवायची—

… ते कामाला केवळ प्रकल्प म्हणून पाहत नव्हते; ते त्याला राष्ट्रकार्य म्हणून पाहत होते.

विचार जगलेला माणूस

बालकृष्णनजी फारसं वैचारिक बोलायचे नाहीत.

ते बोलायचे ते विचार जगलेलं आयुष्य.

ते सांगायचे ते त्यांनी अनुभवलेली भगवद्गीता.

ते सांगायचे ते त्यांनी अनुभवलेली केंद्र प्रार्थना.

ते सांगायचे ते त्यांनी अनुभवलेली उपनिषदं.

म्हणूनच त्यांच्या शब्दांना वेगळी ताकद होती.

२००६मध्ये कन्याकुमारीमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम येणार होते. आम्ही काही कार्यकर्ते बालकृष्णनजींबरोबर शिलास्मारकावर होतो.

बालकृष्णनजी ज्या पद्धतीने कलामांना शिलास्मारक समजून सांगत होते, ती पद्धत मला फार अफलातून वाटली.

त्यांच्या प्रत्येक शब्दामागे अनुभव होता.

प्रत्येक गोष्टीमागे अभ्यास होता.

आणि प्रत्येक अभ्यासामागे काम होतं.

देशावरचं संकट म्हणजे स्वतःचं संकट

२००८-०९च्या सुमारास मी दिब्रुगडला गेलो होतो. त्या वेळी बालकृष्णनजी तिथे होते.

मी ‘ज्ञान प्रबोधिनी’चं काम करत होतो. विवेकानंद केंद्राचं काम तेव्हा सोडलं होतं.

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा काळ होता. अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई हादरवून सोडली होती.

बालकृष्णनजी दिवसभर त्याचे अपडेट्स घेत होते.

‘Spiritually Oriented Service Mission’ असलेल्या विवेकानंद केंद्राचा एक प्रमुख कार्यकर्ता देशावर आलेल्या संकटाचा पदोपदी, क्षणोक्षणी अभ्यास करतो, समजून घेतो—हे माझ्यासाठी नवलाचं होतं.

कारण त्यांच्यासाठी आध्यात्मिकता म्हणजे जगापासून दूर जाणं नव्हतं.

वो अपने भाई हैं!

बालकृष्णनजी आणि ज्ञान प्रबोधिनी यांचं एक वेगळंच नातं होतं.

एखादा प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यात ज्ञान प्रबोधिनीचा उल्लेख आहे असं सांगितलं की ते म्हणायचे—

“अरे, वो अपने भाई हैं। उनके साथ करना ही पड़ेगा! ”

प्रबोधिनीबरोबर एखादं काम करण्याचा प्रस्ताव मी ठेवला आणि त्यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला, असं मला आठवत नाही.

क्षणाचाही विलंब न लावता ते ‘हो’ म्हणायचे.

एकदा विवेकानंद केंद्राच्या प्रमुख शिक्षकांना आणि जीवनव्रतींना इम्पॅक्ट, इम्पॅक्ट प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन यांचं प्रशिक्षण द्यावं, असा मी प्रस्ताव ठेवला.

त्यांनी विचारलं—

“वो कौन देगा रे प्रशिक्षण? ”

मी म्हणालो—

“अजितराव कानिटकर.”

क्षणात उत्तर आलं—

“अरे, वो अपना अजित है! उसको बुलाओ, कोई बात नहीं. लेकिन रेल से मत बुलाओ, प्लेन से बुलाओ. उसको सब मालूम है.”

त्यांच्या मनात माणसांबद्दल किती विश्वास होता, याची ही छोटीशी झलक.

पूर्वांचलावर प्रेम करणाऱ्यांवरही प्रेम

पोंगसे सरांबद्दल बोलताना ते म्हणायचे—

“अरे, विवेक तो सच्चा कार्यकर्ता है रे वो! उसको नॉर्थ-ईस्ट के बारे में बहुत प्यार है.”

पूर्वांचलाबद्दल त्यांचं प्रेम अफाट होतं.

आणि पूर्वांचलावर प्रेम करणाऱ्या लोकांवरही त्यांचं तितकंच प्रेम होतं.

हीच कदाचित त्यांच्या नेतृत्वाची मोठी ताकद होती.

ते प्रदेशावर प्रेम करत होते, पण त्याहून अधिक माणसांवर प्रेम करत होते.

प्रसाद को प्रसाद दिया…

बालकृष्णनजींबरोबरचा माझा शेवटचा अनुभव कन्याकुमारीतील विघ्नहर्ता गणेश मंदिरातला.

संध्याकाळच्या वेळी ते आरतीला प्रसाद घ्यायला यायचे. त्यांच्या द्रोणामधला थोडा प्रसाद स्वतः घ्यायचे आणि उरलेला मला द्यायचे….. आणि मग खळखळून हसायचे. ते हसायचे तेव्हा त्यांचं पूर्ण शरीर हसतंय असं वाटायचं. म्हणायचे—

“आज प्रसाद को प्रसाद दिया, मेरा काम खतम! ”

या एका वाक्यात त्यांचं प्रेम, त्यांचा विनोद आणि माझ्याशी असलेली त्यांची आत्मीयता—सगळं सामावलेलं होतं.

एका शब्दातून दिसलेली त्यांची दृष्टी

सलग दहा-बारा दिवस आम्ही कन्याकुमारीत होतो. मातृभूमी पूजनाचा कार्यक्रम निवेदिता दीदी आणि बालकृष्णनजींच्या उपस्थितीत झाला.

या संपूर्ण प्रक्रियेकडे बालकृष्णनजी किती बारकाईने पाहत होते, हे मला एका छोट्याशा प्रसंगातून जाणवलं.

त्या पोथीत एक शब्द होता—‘परराज्यातील’, ‘परभाषेतील’.

बालकृष्णनजींनी शांतपणे मला सांगितलं—

“प्रसाद, यहाँ ‘परराज्य’, ‘परभाषा’ ये शब्द युज करने से ज्यादा ‘अन्य भाषा’, ‘अन्य राज्य’ हे शब्द युज करने से बहुत अच्छा रहेगा.”

मी थक्क झालो.

एका शब्दामध्ये दडलेला भावार्थही ते इतक्या बारकाईने पाहत होते!

मग विचार आला—

जे माणूस एका शब्दाचा आयाम इतक्या बारकाईने पाहतं, ते माणूस संपूर्ण कामाचे आयाम किती बारकाईने पाहत असेल?

प्रबोधिनीतील एखादी प्रक्रिया ते शांतपणे समजून घेत असतील, तर विवेकानंद केंद्रातील—विशेषतः पूर्वांचलातील—प्रत्येक प्रक्रियेचा किती बारकाईने विचार करत असतील!

आज सकाळी…

आज सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घेतला.

राधा दीदींच्या पोस्टवरून बालकृष्णनजींचं निधन झाल्याचं समजलं.

क्षणभर काहीच कळलं नाही.

सुन्न झालो.

कुणीतरी आपल्या जिवाभावाचा माणूस गेल्याची जाणीव झाली.

बालकृष्णनजी,

तुम्ही आम्हाला काय दिलंय, याची गणतीच करता येणार नाही.

प्रचंड ताकदीने काम करत राहणं,

तेवढ्याच शुद्धतेने काम करत राहणं,

प्रचंड श्रद्धेने काम करत राहणं—

हीच तुम्हाला खरी श्रद्धांजली असेल.

पदोपदी कुठेही काम करत असताना विवेकानंद विचार आणि पूर्वांचल विसरायचा नाही, हे आम्ही तुमच्या आचरणातून शिकलो.

दूर, साडेतीन-चार हजार किलोमीटरवर असलेल्या आपल्या बांधवांशी एक वेगळं नातं तुम्ही आमचं निर्माण केलंत.

हे नातं आम्ही नक्की जपू.

तुम्ही निजधामाला गेलात.

पण तुम्ही ज्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला, त्यांच्यावरचा तुमचा विश्वास आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही.

पुन्हा कधीतरी तुम्हाला भेटायला आलो, तर तुम्ही उभं केलेलं कार्य आणखी मोठं झालेलं असेल.

आणखी कितीतरी कार्यकर्ते त्या कार्यात जोडले गेलेले असतील.

आणि पूर्वांचलाशी जोडलेलं ते नातं आणखी दृढ झालेलं असेल.

तुमचा कार्यकर्त्यांवर सगळ्यात जास्त विश्वास होता, बालकृष्णनजी.

तो विश्वास सार्थ ठरवणं—

हीच आमची तुम्हाला खरी श्रद्धांजली.

बालकृष्णनजी, नमस्कार!

लवकरच भेटू…

तोपर्यंत तुम्ही दाखवून दिलेल्या मार्गावर आम्ही चालत राहू.

– समाप्त –

लेखक : प्रसाद चिक्षे

ज्ञान प्रबोधिनी

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ताकदीने जगलेला विचार, प्रेमाने घडवलेले कार्यकर्ते – भाग १ – लेखक : प्रसाद चिक्षे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ ताकदीने जगलेला विचार, प्रेमाने घडवलेले कार्यकर्ते – भाग १ – लेखक : प्रसाद चिक्षे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले

विवेकानंद केंद्र -एकनाथजी रानडे -ए. बालकृष्णन

 – मा. श्री. ए. बालकृष्णन… विवेकानंद विचार आणि पूर्वांचलाशी आयुष्यभर नातं जोडणाऱ्या एका विलक्षण कर्मयोग्याला श्रद्धांजली… मृत्यू दि. २७/८/२६.

१९६२च्या चीन युद्धानंतर भारतीय मानस पूर्णपणे खचून गेलेलं होतं. त्या युद्धानंतर ईशान्य भारतातून अनेक सैनिक परत येऊ लागले. त्यांनी सांगितलेल्या कहाण्या ऐकून अंगावर काटा यायचा. आजही यूट्यूबवरील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या चिनी आक्रमणाची दाहकता लक्षात येते.

एकीकडे चीनचं आक्रमण आणि दुसरीकडे देशाच्या मनात निर्माण झालेली निराशा—या परिस्थितीत देशाला अधिक सामर्थ्यवान, अधिक आत्मविश्वासपूर्ण बनवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार सुरू झाला. याच काळात भारतभर स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी वर्ष मोठ्या प्रमाणावर साजरं करण्याची तयारी सुरू झाली.

१९६३ हे स्वामी विवेकानंदांचं जन्मशताब्दी वर्ष.

स्वामीजींना त्यांच्या आयुष्याचं ध्येय ज्या कन्याकुमारीच्या शिलेवर सापडलं, त्याच शिलेवर त्यांचं भव्य स्मारक उभं करावं, असा संकल्प करण्यात आला. पण हे काम काही केल्या पुढे सरकत नव्हतं. त्या स्मारकाला दक्षिण भारतातील काही ख्रिश्चन मिशनऱ्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा प्रचंड विरोध होता. त्या शिलेबद्दल वेगवेगळे दावे करण्यात येत होते.

आणि अशा वेळी एका जबरदस्त व्यक्तिमत्त्वाची एंट्री झाली—एकनाथजी रानडे.

एकनाथजींच्या अथक प्रयत्नांनी आणि सर्व भारतीयांच्या सहकार्याने अखेर कन्याकुमारीचं भव्य विवेकानंद शिलास्मारक उभं राहिलं. ’

पण एकनाथजींना केवळ दगडाचं स्मारक उभं करायचं नव्हतं.

त्यांना विवेकानंदांचं जिवंत स्मारक उभं करायचं होतं.

विवेकानंदांचं जिवंत स्मारक म्हणजे त्यांच्या विचारांनी भारावून जाऊन आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित करणारी माणसं—महिला, पुरुष, युवक, युवती. One Life, One Mission या भावनेने जगणारे कार्यकर्ते.

– – यातूनच विवेकानंद केंद्राची निर्मिती झाली. विवेकानंद केंद्राचा कणा असणारा कार्यकर्त्यांचा वर्ग म्हणजे जीवनव्रती. जीवनव्रती प्रशिक्षणात एकनाथजींनी तरुणांना आवाहन केलं—

या राष्ट्रकार्यासाठी तुम्ही सहभागी व्हा.

– – या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या तरुणांमध्ये एअरफोर्समधला एक तडफदार, विलक्षण ऊर्जावान युवक होता—ए. बालकृष्णन.

अफाट ताकद. मनात काहीतरी करून दाखवण्याची प्रचंड इच्छा. मनाची विलक्षण शुद्धता. तीव्र इच्छाशक्ती. कोणत्याही परिस्थितीचं तुफान विश्लेषण करून निर्णय घेण्याची क्षमता. आणि त्याला जोडलेली अफाट पॅशन.

… हा तरुण विवेकानंद केंद्राचा जीवनव्रती कार्यकर्ता झाला. एकनाथजींच्या सहवासात त्याच्या या अफाट ऊर्जेला दिशा मिळाली.

त्या काळात पूर्वांचल—ईशान्य भारत—हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता. चीनपासून असलेला धोका तर होताच; पण त्याचबरोबर तिथल्या सांस्कृतिक वैविध्यालाही मोठं आव्हान होतं.

निसर्गाने निर्माण केलेली सृष्टी, मानवी जीवन आणि समाजव्यवस्था इतकी वैविध्यपूर्ण आणि सुंदर आहे की तिची विविधता टिकवणं, त्या विविधतेतलं सौंदर्य टिकवणं आणि त्या विविधतेच्या मुळाशी असलेली अंतर्निहित एकात्मता टिकवणं ही काळाची गरज होती.

याच पूर्वांचलाच्या कामाची जबाबदारी घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पुढे अग्रस्थानी आले—बालकृष्णनजी.

विवेकानंद केंद्राच्या पूर्वांचलातील कामाचे ते प्रमुख संघटक झाले.

पहिली भेट

बालकृष्णनजींना मी पहिल्यांदा कन्याकुमारीमध्ये पाहिलं.

सकाळची वेळ होती. आम्ही काही जीवनव्रती कार्यकर्ते भोजनगृहातून ‘नचिकेता’कडे जात होतो. आपल्याच मस्तीत होतो. एकमेकांची हसी-मजाक सुरू होती.

अचानक समोरून एक व्यक्ती आली… आकाशी निळ्या रंगाचा शर्ट, पांढरी धोती, पांढरीशुभ्र आणि भरीव दाढी, पांढरेशुभ्र केस आणि डोळ्यांवर चष्मा. एका हाताने धोतीचा पदर सावरत ते आमच्याकडे चालत आले.

अचानक एक भारदस्त आवाज कानावर पडला—

“ए, कम हिअर!  व्हॉट्स युवर नेम? ”

विवेकानंद केंद्रात ‘तुझं नाव काय? ’, ‘कुठून आलास? ’ असे प्रश्न सहज विचारले जातात, याचा मला अनुभव होता. मी लगेच उत्तर दिलं—

“आय अॅम प्रसाद. ”

पण पुढचा क्षण वेगळाच होता.

त्या व्यक्तीने थेट माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं—

“कसा आहेस?  ठीक आहेस ना?  बरं वाटतंय का इथे?  काही त्रास तर नाही? ”

मी अचंबित झालो.

पाठीवर थाप देत त्यांनी आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.

आवाजात जरब. व्यक्तिमत्त्वात भारदस्तपणा. पण बोलण्यात प्रचंड प्रेम.

हे काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन होतं.

आम्ही नंतर शांतपणे ‘नचिकेता’कडे परत आलो. मी रमणमूर्तीजींना विचारलं—

“हे कोण? ”

उत्तर मिळालं—

“बालकृष्णनजी! ”

बालकृष्णनजींबद्दल मी आधी खूप काही ऐकलं होतं. त्यामुळे माझ्या मनात त्यांचं एक वेगळंच चित्र तयार झालं होतं—अतिशय ताकदीचा माणूस, एअरफोर्समधला माणूस, नॉर्थ-ईस्टच्या कुठल्याही अवघड परिस्थितीत फिरणारा माणूस, कोणतंही आव्हान स्वीकारून ते पूर्ण करणारा माणूस.

अखंड पूर्वांचलाचा चप्पा-चप्पा माहीत असलेला माणूस.

प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव माहीत असलेला आणि त्यांच्याशी थेट संपर्क ठेवणारा माणूस.

प्रचंड इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशा असलेला माणूस.

पण हा एवढा जबरदस्त माणूस आपल्याशी इतक्या प्रेमाने बोलू शकतो, ही अनुभूतीच विलक्षण होती.

“Purity is important…”

पुढे सलग पंधरा दिवस बालकृष्णनजींचा सहवास मिळाला.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हाला विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती प्रशिक्षणाची दीक्षा देण्यात आली. आमचं प्रशिक्षण आणि काम सुरू झालं.

त्या वेळी बालकृष्णनजींनी केलेलं भाषण आजही माझ्या कानात घुमतं—

“Purity is important.

Dedication is important.

Character is important.

Willpower is important.

Learning is important. ”

– – एकामागून एक ते वाक्य फेकत होते, जणू काही बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात!

पण त्या प्रत्येक वाक्यामागे त्यांचा स्वतःचा अनुभव होता.

ते आम्हाला केवळ विचार सांगत नव्हते… ते स्वतः जगलेला विचार आमच्यासमोर ठेवत होते.

कन्याकुमारीमध्ये त्यांच्यासोबत अनेक क्षण घालवता आले. प्रशिक्षणात त्यांनी आम्हाला केंद्र प्रार्थना समजून सांगितली. केंद्र प्रार्थनेचा एक वेगळाच आयाम त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला.

यानंतर ते पूर्वांचलाच्या दौऱ्यावर निघून गेले.

… पूर्वांचल म्हणजे त्यांचा जीव की प्राण!  आणि तिथले कार्यकर्ते म्हणजे त्यांच्यासाठी लाखमोलाची ठेव.

अरुणाचलमध्ये खरा सहवास

माझी पोस्टिंग अरुणाचल प्रदेशमध्ये ‘अरुण ज्योती’च्या कामासाठी झाली. त्यानंतर बालकृष्णनजी अरुणाचलमध्ये आले आणि त्यांच्याबरोबरचा माझा खरा सहवास सुरू झाला.

बालकृष्णनजींची झोपण्याची व्यवस्था जिथे केली होती, त्याच्या बाजूलाच मी झोपायचो. कॉटवर बालकृष्णनजी आणि खाली बाजूला मी… आमच्या खूप साऱ्या गप्पा व्हायच्या.

आमच्या दोघांच्या वयामध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. पण एवढा मोठा माणूस आपल्याशी अगदी लहान भाऊ किंवा मुलगा असल्यासारखा प्रेमाने वागतो, ही अनुभूतीच दिव्य होती.

त्यांची पॅशन जबरदस्त होती. बोलण्यात नेमकेपणा होता. पण त्याचबरोबर ते प्रचंड विनोदीही होते.

एकदा सकाळी उठल्यानंतर काही वेळाने मी उठलो. बालकृष्णनजी माझ्याकडे पाहून हसायला लागले.

म्हणाले—

“अरे प्रसाद, तू तो नींद में बहुत बात करता है!  मुझसे बात कर रहा था—‘मुझे घर जाना है, घर जाना है. ’ सही में घर जाना है क्या? ”

मी चकित झालो.

माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी मला सांगत होतं की मी झोपेत बोलतो!

नंतर मी त्यांना विचारलं—

“मी खरंच झोपेत बोलतो का? ”

तेव्हा ते म्हणाले—

“नाही, तू बोलत नाहीस. मी तुझी मजा करत होतो. ”

इतके अफाट विनोद मी बालकृष्णनजींबरोबर अनुभवले आहेत.

– क्रमशः भाग पहिला

लेखक : प्रसाद चिक्षे

ज्ञान प्रबोधिनी

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अगदी तुमच्या माझ्या घरातील वास्तव… – लेखक : एक अज्ञात ☆ रमा मोडक ☆

रमा मोडक

? इंद्रधनुष्य ?

☆ अगदी तुमच्या माझ्या घरातील वास्तव… – लेखक : एक अज्ञात ☆ रमा मोडक ☆

 – – – खरंच सांगतो मन अस्वस्थ झाले…

“प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म किती वाजता झाला? ” 

“श्रीकृष्णाचा जन्म किती वाजता झाला? “

“नृसिंह जन्म कुठल्या वेळी झाला? “

“हनुमंतांचा जन्म कुठल्या वेळी झाला? ” 

अशा प्रकारचे काही प्रश्न मी डिसेंबर महिन्यातल्या एका सेशनमध्ये मुलामुलींना विचारले होते. समोर बसलेली सगळी मुलंमुली १३ ते २५ वयोगटातली, उच्चशिक्षित कुटुंबातली, आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेली, नामांकित खाजगी शाळांमध्ये जाणारी होती. पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत. मी त्यांना वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं यांची नावं सांगून त्यांच्या सेवनातून आपल्याला कुठले घटक मिळतात, असं विचारलं. त्याचीही उत्तरं मिळाली नाहीत.

“घरात तुम्ही एकटेच आहात आणि भूक लागली तर तुम्ही काय करुन खाल? “असं विचारल्यावर जवळपास सगळ्यांनी मॅगी नूडल्स, पास्ता, जॅम टोस्ट अशी नावं सांगितली.

“श्रावण महिन्यात आपल्या घरी कोणकोणते कार्यक्रम असतात? “

“गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती घरातून बाहेर पडताना आपण उंबऱ्यापाशी काय म्हणतो?” 

“गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी पाडव्यादिवशी आपण सरस्वती पूजन किंवा पाटीपूजन करतो का? “

“पाटीवरची सरस्वती काढता येते का? “

“पंचामृत कसं करतात? “

“नैवेद्याचं पान कसं वाढतात? “

“चैत्रांगण कसं काढतात? ” 

“चैत्रगौर म्हणजे काय? “

“खंडेनवमीच्या दिवशी काय करतात? “

“आषाढी एकादशीचं महत्त्व काय? “

यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर एकालाही देता आलं नाही. मग मात्र मला जरा अस्वस्थता आली.

एका जुडीमध्ये किती दुर्वा असतात? , माळावस्त्र कसं करतात?, औक्षण कसं करतात – तेलाच्या दिव्यानं की तुपाच्या दिव्यानं? , पुरणाची आरती माहिती आहे का? , धोतर कसं नेसतात?  तुमचं कुलदैवत आणि कुलदेवता माहिती आहे का? … हे प्रश्न विचारले तेव्हाही हाच अनुभव आला. अनेकांनी तर “आमच्या घरी असे काही सणवार आम्ही करतच नाही. सगळे सण मोठ्या घरी असतात किंवा गावी असतात” अशी उत्तरं दिली. मुंज झालेल्यांना बहुतेक सगळ्यांना मुंज का करतात?  हेही ठाऊक नव्हतं.

मुलांना श्लोक, वेचे येत नाहीत. संतांचे अभंग येत नाहीत, एक तेवढी गणपतीची सोडली तर बाकी आरत्या येत नाहीत. उत्तमोत्तम कवींच्या कविता येत नाहीत. त्यांनी प्रवासवर्णनं वाचलेली नाहीत. वाचनालयात जाण्याची सवय नाही. एखादं चार ओळींचं पत्र लिहिता येत नाही. पाकिटावर पत्ता कुठल्या क्रमानं लिहितात, ते माहिती नाही. फार तर गणपती स्तोत्र, रामरक्षा, मारुती स्तोत्र येतं. पण, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, पांडुरंगाष्टक, भगवद्गीतेचे अध्याय, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, आदित्यहृदय स्तोत्र येत नाही. मनाचे श्लोक येत नाहीत, करुणाष्टके ठाऊक नाहीत. संपूर्ण वन्दे मातरम् सुद्धा ठाऊक नाही.

आपत्कालीन परिस्थितीत काय कराल?  असं विचारलं, तर तेही सांगता येईना. ॲम्ब्युलन्स कशी बोलवाल?  गॅस सिलेंडर लिकेज असेल तर काय कराल?  कुणी लिफ्ट मध्ये अडकलं तर काय कराल?  सीसीटीव्ही फुटेज पाहता येतं का?  ऑफलाईन रेल्वे रिझर्व्हेशन करता येतं का?  बँकेत चेक भरता येतो का?  वीजबिल वाचता येतं का?  पुण्यात बस ने फिरता येईल का?  धान्य निवडता येतं का?  हॉट प्रेस ऑईल आणि कोल्ड प्रेस ऑईल यात फरक काय असतो?  पाम ऑईल म्हणजे नेमकं काय?  वनस्पती तूप म्हणजे काय?  कोलेस्टेरॉल म्हणजे काय?  हेही कुणाला सांगता येईना…!

घरातल्या सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करता येते का?  उभी इस्त्री आणि आडवी इस्त्री म्हणजे काय?  वॉशिंग मशीन न वापरता कपडे धुता येतात का?  शाळेतला डबा स्वतःचा स्वतःला घासून ठेवता येतो का?  शर्टाचं बटण तुटलं तर लावता येतं का किंवा उसवला तर टाके घालता येतात का?  गिफ्ट पॅक करता येतं का?  कोऱ्या कागदांची वही शिवता येते का?  भाज्या निवडता, चिरता येतात का?  कंपोस्ट खत करता येतं का?  फोडणी करता येते का?  दह्याचं विरजण लावता येतं का?  ताक करता येतं का?  लोणी कढवता येतं का?  मुगाची खिचडी करता येते का?  असं विचारलं तर तेही येत नव्हतं.

हे सगळं इतक्या स्पष्ट समोर आलं आणि त्याचीच अस्वस्थता मनातून जाता जाईना. मुलांच्या जडण-घडणीला जो सांस्कृतिक आधार असायला हवा, तो तयारच झाला नसल्याचं लक्षात आलं. वय वर्षे पंधरा-सोळा ते वय वर्षे बावीस-तेवीस या वयोगटात यातलं काहीही येत नसेल तर मामला गंभीर आहे, हे पालकांना जाणवून देणं गरजेचं वाटलं.

फक्त भरभक्कम गुणांच्या मार्कलिस्ट मिळवल्या आणि भरपूर पॅकेज मिळवलं म्हणजे आपलं आयुष्य परिपूर्ण झालं, असं होऊ शकत नाही, हे मुलं आणि पालक या दोघांनाही लक्षात यायला हवं. बरं, शालेय अभ्यासात तरी उत्कृष्ट गुणवत्ता आहे का?  तर पुष्कळदा तसंही नसतं. वर्षानुवर्षं मराठी ऐकून, वाचून, बोलून सुद्धा “भेटलं, मिळालं, सापडलं” यातला फरक कळत नाही. “जर आणि अगर” यातला फरक कळत नाही. मराठी बोलताना हिंदी इंग्रजी शब्द बेसुमार घुसवलेले असतात. देवनागरी लिखाणाबद्दल तर विचारायलाच नको. विज्ञानात पुस्तकी सर्किट डायग्राम येते, पण प्रत्यक्षात सर्किट तयार करता येत नाही. साधा सिलिंग मधला एलईडी बल्ब पण बदलता येत नाही.

रात्री झोपण्यापूर्वी गॅस सिलेंडरचा नॉब बंद करता येत नाही. आखूड आणि तंग कपड्यांपेक्षा अंगभर शुद्ध सुती कपडे वापरण्याचं महत्त्व समजत नाही. जंक फूड मधला धोका लक्षात येत नाही. रोजच्या आयुष्यात प्लॅस्टिकचा वापर कसा टाळावा, हे कळत नाही. सिग्नलला थांबल्यावर दुचाकी बंद करावी, यातलं पर्यावरण महत्व कळत नाही. कापडी पिशवीचा वापर का वाढवायला हवा, हे समजत नाही. बाहेरून अन्न पार्सल आणायला जाताना सोबत स्टीलचा डबा घेऊन जावा, गरम पदार्थ प्लॅस्टिक कंटेनर किंवा फॉइल मधून पार्सल आणू नये, हे विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कळू नये?  कृत्रिम शीतपेये कशी हानिकारक आहेत, हे कळत नाही. मग विज्ञानाचा नेमका अभ्यास ही मुलंमुली करतात तरी कशी?  

मग आयुष्य उत्तम जगण्यासाठीची सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, भावनिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक, वैज्ञानिक, आर्थिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विषयक जीवनदृष्टी आहे का?  ते सर्वांगीण जीवनपोषण आपल्या मुलामुलींना कसं मिळणार, कुठून मिळणार, कोण देणार ह्याचा विचार आपण केला आहे का?  

हे प्रश्न इतके लख्ख समोर दिसल्यावर दोन महिन्यांपूर्वी आम्ही पालकांसाठी एक सत्र आयोजित केलं होतं. त्यामध्ये “आपल्या मुलांनी कोणत्या गोष्टी शिकाव्यात, असं तुम्हाला वाटतं? ” असा प्रश्न मी उपस्थित पालकांना विचारला. बहुतेक सगळ्या पालकांची गाडी ‘शाळेच्या परीक्षेत भरपूर मार्क’ याच गोष्टीपाशी अडली होती. नॅशनल एन्ट्रन्सेस मध्ये स्कोअर झाला की बस्स.. डोक्यात एवढा एकच विचार.. आपल्या जगण्याची गुणवत्ता फक्त पैसा कशी ठरवणार?  

आपल्या मुलामुलींचा सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक बुद्धिभेद का होतो आहे?  “मी, माझं, मला, फक्त माझ्यापुरतं” हा फॉर्म्युला आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं कितपत उपयोगी पडणार आहे?  “आयुष्यात पैसा हेच एकमेव सत्य आहे” ही धारणा आपल्या मुलांना सुरक्षित आणि स्वस्थ जगवेल का?  असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत, ह्याचं मला फार आश्चर्य वाटलं आणि तेवढंच वाईटही वाटलं. आपल्या मुलामुलींना चांगले मित्र मैत्रिणी नाहीत, चांगलं वाचनीय साहित्य त्यांना ठाऊक नाही, विद्वानांचा सहवास नाही, आपल्याला मिळालेल्या चांगल्या आयुष्याविषयी कृतज्ञता नाही. निदान आपल्या चांगल्या आरोग्याविषयी तरी दैनंदिन जीवनात बदल घडवायला हवा, तर तेही नाही.

जर असं असेल तर हा केवळ शिक्षणव्यवस्थेचा दोष नाही. नव्या पिढीला घडवण्याचं धोरण समाजानंच ठरवण्याची गरज आहे. कारण, कुठलाच पुस्तकी अभ्यासक्रम आणि मार्कलिस्ट आपल्या मुलांच्या सुदृढ, समंजस आणि शहाण्या जगण्याचा पाया घालण्यासाठी पुरा पडणार नाही. शाळा, कुटुंब आणि समाज या तिघांनीही एकत्र येऊन काही नीति ठरवली तर हे चित्र बदलता येईल. समाजातल्या प्रत्येकानं ‘ही माझी जबाबदारी आहे’ असं मान्य करुन सक्रिय सहभाग घेतला नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांची आयुष्याची वस्त्रं अशी फाटत राहतील, ज्यांना लावायला ठिगळं अपुरी पडतील.

पुस्तकी अभ्यास, विद्याभ्यास आणि कौशल्याभ्यास या तीनही वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या आयुष्यात या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे मान्यच आहे. पण शाळेची सुट्टी ही पुस्तकी अभ्यासाची सुट्टी आहे, असं लक्षात घेऊन जीवनविद्या आणि कौशल्य विकास या दोन्हीं विकासांवर भर द्यायला हवा. जाणिवेच्या समृद्धीपासून ते प्रत्यक्ष कृतिशीलतेपर्यंतचा प्रवास व्हायला हवा. आपल्या संस्कृतीमधलं विज्ञान मुलांना समजायला हवं आणि विज्ञानातली नैतिक संस्कृती सुद्धा उमगायला हवी. खिशाला पटणं आणि मनाला पटणं यातला फरक नव्या पिढीला शिकवायला हवा.

पर्यावरणाच्या स्वास्थ्याला आणि राष्ट्रीय हिताला ज्या गोष्टी हिताच्या नाहीत, त्या कितीही आर्थिक मोबदला देणाऱ्या असल्या तरीही त्या नाकारण्याचं धैर्य मुलांमध्ये यायला हवं. महिन्याभराचा अनलिमिटेड डेटा पॅक मारुन घरात निवांत बसून सोशल मीडियावर वाट्टेल तसं व्यक्त होण्यात काहीही कर्तृत्व नाही, उलट ते लाज आणणारं लक्षण आहे, हेही घडवणं आता संस्कारांचा भाग झालंय. महापुरुषांचे विचार कृतीमध्ये आणण्यासाठी आणि अनुकरण करण्यासाठी असतात. डॉल्बी सिस्टिमपुढं नाचण्यानं ते विचार आपल्या व्यक्तिमत्वात येत नाहीत, हाही संस्कार आता नितांत गरजेचा झाला आहे. तरच ‘आयुष्य म्हणजे इव्हेंट नसतो’ हे पुढच्या पिढ्यांमध्ये रुजायला मदत होईल.

म्हणूनच म्हणतो पालकमित्रांनो, उन्हाळी सुट्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला. मूल घडवण्याचा खरा अभ्यासक्रम फार व्हास्ट आहे आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला स्वतःलाच पाण्यात उतरावं लागेल. मुलांच्या पाठीशी नाही तर त्यांच्या सोबत राहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्याला मानेवरचं जोखड न समजता स्वतः डेव्हलपमेंटल मेंटॉर होण्यातला आनंदसुद्धा मनसोक्त लुटला पाहिजे.

लक्षात घ्या, आपल्या मुलांना आपल्याच सक्रियतेची सगळ्यात जास्त गरज आहे. ती जबाबदारी आऊटसोर्स करता येणार नाही. केवळ जन्म दिल्यानं पालक होता येत नाही आणि शाळा, कोर्सेस, ग्राउंड, शिबिरं यांच्या फिया भरल्यानं संगोपन केलं असं म्हणता येत नाही. आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचं शिल्प अधिक देखणं घडवायचं असेल तर, शिक्षकांसोबत आपणही ती शिल्पकला शिकून घेणं गरजेचं आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय मुलांना उत्तमपण येणार नाही अन् ते घाव आपणच घातल्याशिवाय आपलं पालकत्व सुफळ संपूर्ण होणार नाही. तेव्हां, पालकत्वाचं व्रत स्वतःच केलं तरच त्याचा लाभ आपल्या पदरी पडेल, अन्यथा…!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : रमा मोडक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०१ आणि १०२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०१ आणि १०२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 श्लोक क्र. १०१ – – 

जया नावडे नाम त्या येम जाची ।

विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ।

म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे ।

मुखे बोलता दोष जाती स्वभावे ।।१०१।।

अर्थ : ज्या व्यक्तीला भगवंताचे नाम आवडत नाही अशा व्यक्तीला यम त्रास देतो. नामाबद्दल शंका आणि नाना प्रकारचे तर्क कुतर्क ज्याच्या मनात येतात अशा व्यक्तीला तिरस्करणीय नरक प्राप्त होतो. म्हणूनच अत्यंत आदराने भगवंताचे नाम घ्यावे. जो भगवंताचे नाम घेतो त्याच्या स्वभावातील दोष हळूहळू नाहीसे होऊ लागतात.

(येम – यमदूत, जाची – त्रास देतात, विकल्प – शंका/संशय, तर्क – नानाविध कल्पना, स्वभावे – सहजच/नैसर्गिकरित्या)

विवेचन – एखादी गोष्ट कर असे वारंवार सांगूनही जर कोणी ऐकत नसेल, तर त्या व्यक्तीला तसे न करण्याचे काय परिणाम होतील असे आपण समजावून सांगतो. विशेषतः लहान मुलांना एखाद्या गोष्टीतले धोके आपण समजावून सांगतो आणि मग तरी त्यांनी ती करावी अशी अपेक्षा करतो. तसेच समर्थ इथे आपल्याला नामस्मरणाचे महत्व समजावून सांगताना करत आहेत. वारंवार सांगूनही आपण जर नामस्मरण केले नाही तर अंतकाळी आपल्याला यम त्रास देतील, आपल्या मनात नामाबद्दल नको त्या कल्पना आणून जर आपण नाम घेतले नाही, तर लोकांमध्ये आपली छी थू होऊन आपल्या वाट्याला नरक ठरलेलाच आहे. म्हणूनच अत्यंत आदराने भगवंताचे नाम घ्यावे.

आपल्या धर्मशास्त्रात मृत्यूनंतरच्या जीवनासाठी स्वर्ग आणि नरक अशा कल्पना आहेत. पुण्यवान माणसाला स्वर्गप्राप्ती होते आणि पापी मनुष्य नरकात जातो अशी साधारण त्यातील कल्पना आहे. ज्याने पाप केले असेल, भगवंताचे नाम घेतले नसेल अशा व्यक्तीला यमदूत त्रास देतात. नाम न घेणाऱ्याला अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते असे समर्थ सांगतात. समर्थांच्या काळात अशा कल्पनांवर लोकांचा जास्त विश्वास होता म्हणून समर्थांनी त्या प्रकारे समजावून सांगितले आहे. आज आपण ज्या काळात जगतो आहोत, त्या काळातील लोक स्वर्ग, नरक, यम इ. कल्पनांवर विश्वास ठेवणारे नाहीत. म्हणूनच या गोष्टींचा अर्थ आपण वेगळ्या प्रकाराने घ्यायला हवा.

आज जरी बरेचसे लोक स्वर्ग, नरक, यम इ. गोष्टींवर विश्वास ठेवत नसले तरी बरेचसे लोक हे मानतात की आपल्या बऱ्यावाईट वागण्याची फळं आपल्याला या ठिकाणीच भोगावी लागतात. सर्व संतांनी एकमुखाने भगवंताच्या नामाचा महिमा सांगितला आहे. संतांचे वागणे आणि बोलणे यात एकवाक्यता असते. ते जे बोलतात, त्यामागे स्वानुभवाचे सामर्थ्य असते. गोंदवलेकर महाराज आपल्याला जेव्हा रामनाम घ्यायला सांगतात, तेव्हा त्या नामाची महती त्यांनी स्वतः अनुभवलेली असते. ‘ आधी केले मग सांगितले ‘ असा हा रोकडा व्यवहार असतो. म्हणून निदान संतांच्या सांगण्यावर तरी आपण विश्वास ठेवून नाम घ्यायला हवे.

नाम घेण्याची ही सवय जर लावून घेतली नाही तर अंतकाळी देखील सवयीनुसार नाम न येता दुसऱ्याच गोष्टीत जीव अडकेल. प्राण जाताना त्यामुळे जीवाला वेदना होतील. ऐहिक गोष्टीतच जीव अडकेल. पुन्हा मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकू. हाच यमदूतांनी दिलेला त्रास आहे असे आपण मानायला हरकत नाही. संतांनी एवढया कळकळीने सांगूनही जर नामाबद्दल विश्वास नसेल आणि त्याच्या खरेपणाबद्दल भलतेच विचार मनात येत असतील, तर मन नामाकडे वळणारच नाही. अशा वेळी माणूस मग दुसऱ्या आकर्षणात अडकतो. कसले नाम, कसला स्वर्ग आणि नरक?  मरणानंतर जे काही होईल ते कोणी पाहिले आहे?  तेव्हा मौजमजा करून या जीवनाचा उपभोग घेऊ असा विचार करून माणूस नको त्या गोष्टीत अडकतो. नको त्या गोष्टी करण्यात वाहवत जातो. मग समाजात अशा व्यक्तीची छी थू होते. त्याची प्रतिष्ठा राहत नाही. लोकांच्या दृष्टीने अशी व्यक्ती तिरस्करणीय बनते. असे जगणे म्हणजे एक प्रकारचा नरकच आहे.

तेव्हा मनात कोणतीही शंका न ठेवता भगवंताचे नाम घ्यावे. अति आदराने ते नाम घेत जावे. भगवंताच्या नामाचे सामर्थ्य असे आहे की जो कोणी ते नाम घेईल त्याचे दोष हळूहळू कमी होत जातात. जे गुण भगवंताला प्रिय आहेत, असे गुण व्यक्तीच्या स्वभावात वास करतात. त्याच्या हातून अनुचित गोष्टी घडत नाहीत. व्यक्ती अंतिमतः सुखी आणि समाधानी असते.

स्वसंवाद 

१. मरणानंतरच्या नरकाची भीती बाळगण्यापेक्षा, मी आजच्या माझ्या चुकीच्या प्रवृत्तींमुळे माझे चालू आयुष्यच ‘नरकप्राय’ करून घेत नाहीये ना?  

२. संतांनी स्वानुभवातून सांगितलेल्या नामस्मरणाच्या ‘रोकड्या व्यवहारावर’ विश्वास ठेवण्याऐवजी, माझे मन अजूनही ‘तर्क-कुतर्कात’ आणि संशयात वेळ वाया घालवत आहे का?  

३. “अंतकाळी सवयीनुसार नाम मुखात यावे” यासाठी मी माझ्या दैनंदिन जीवनात आजपासूनच नामस्मरणाची सवय लावून घेण्यास किती प्राधान्य देतो?  

४. नाम घेतल्याने जर स्वभावातील दोष ‘स्वभावे’ (सहजच) गळून पडणार असतील, तर मी माझ्या अहंकाराचा आणि रागाचा त्याग करून नामस्मरणाचा आश्रय का घेत नाही?  

=====

श्लोक क्र. १०२ – – 

अती लीनता सर्वभावे स्वभावे ।

जना सज्जनालागी संतोषवावे ।

देहे कारणी सर्व लावीत जावे ।

सगूणी अति आदरेंसी भजावे ।।१०२।।

अर्थ : आपल्यामध्ये स्वभावतःच अतिशय नम्रता असावी. अशा सहज नम्रतेने सत्पुरुषांना आनंद द्यावा. आपला देह सर्व चांगल्या कामांसाठी झिजवावा. अतिशय आदरपूर्वक सगुण भक्ती करावी.

(लीनता – नम्रता, सर्वभावे – अगदी मनापासून, कारणी – चांगल्या गोष्टींसाठी)

विवेचन – भक्ताच्या अंगी कोणते गुण असावेत ते या श्लोकात समर्थ आपल्याला सांगत आहेत. भगवंताचा भक्त लीन म्हणजे नम्र असतो. अध्यात्मात लीनता हा अतिशय मोठा गुण मानला गेला आहे. ज्या व्यक्तिजवळ लीनता नसेल, त्याच्या ठायी अहंकार निर्माण होतो. हे मी केले, ते माझ्यामुळे झाले अशा प्रकारचा अहंकार निर्माण होतो. साधकासाठी अहंकार हा प्रगतीतील मोठा अडथळा आहे. त्यामुळे आपल्या स्वभावात नम्रता असणे आवश्यक आहे. ती सुद्धा मनापासून असावी. आतून उमलून आलेली असावी. एखाद्या हसतमुख व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणारे हास्य आतून उमलून आलेले असते. हास्याचा कृत्रिम मुखवटा त्याला धारण करावा लागत नाही. तशीच नम्रता देखील आतून यावी. ती स्वभावाचाच एक भाग असावी असे समर्थांना सांगायचे आहे. हल्ली कार्पोरेट जगतात आपले काम साधून घेण्यासाठी लोक कृत्रिम नम्रतेचा आश्रय घेतात. निवडणुका जवळ आल्या म्हणजे मते मागण्यासाठी नेते मंडळी अति नम्र होतात. पण ही खरी नम्रता नसून तो काही काळापुरता धारण केलेला एक मुखवटा असतो.

अहंकारी व्यक्ती कोणालाच आवडत नाहीत. नम्रतेने वागणाऱ्या व्यक्ती समोरच्याचे मन सहज जिंकून घेतात. फळांनी लगडलेले झाड वाकलेले असते. ज्याला साधक व्हायचे त्याने तर नम्र असलेच पाहिजे. आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचे श्रेय भगवंताला किंवा गुरूंना दिले पाहिजे. दोष असतील तर ते आपले अशी भावना हवी. कर्तेपण भगवंताकडे देतो तो खरा साधक. अशा प्रकारची नम्रता किंवा लीनता अंगी बाणली की सत्पुरुषांना संतोष होतो. गर्विष्ठ किंवा अहंकारी व्यक्ती त्यांना आवडत नाही. ज्ञानेश्वरांसारख्या महान संतांनी आपल्या हातून जे काही कार्य घडले त्याचे श्रेय आपल्या गुरूंना दिले आहे.

आपला हा नरदेह सर्व चांगल्या कारणांसाठी झिजला पाहिजे. केवळ देहाचे भरणपोषण केले तर आपल्यात आणि पशूत फरक काय?  समाजात अनेक चांगली कार्ये होत असतात. अशा कामांना पैशाने नाही तरी शरीराच्या माध्यमातून श्रम करून हातभार लावला पाहिजे. शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरात, गोंदवल्याला गोंदवलेकर महाराजांच्या मठात अनेक भक्त स्वेच्छेने सेवा देत असतात. अशी उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. यातून भगवंताची सेवा तर घडतेच पण देह भगवंताच्या कारणाने झिजतो. माणसाला जो देहाभिमान असतो, तो नष्ट व्हायला मदत होते. देहबुद्धी कमी होत जाते.

सर्व संतांनी सगुण भक्ती केली आहे. परमेश्वराच्या सेवेत आपला देह झिजवला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी पांडुरंगाची सगुण भक्ती केली. रामकृष्ण परमहंस कालीमातेची सेवा करीत. मीराबाईंनी श्रीकृष्णाची भक्ती केली. परमार्थात प्रगती करायची असेल तर सगुणाकडूनच निर्गुणाकडे जावे लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात ‘ सगुणी अति आदरेसी भजावे ‘ सगुणात प्रेम निर्माण झाले नाही तर ते निर्गुणात कसे येणार?

स्वसंवाद 

१. माझ्या रोजच्या वागण्या-बोलण्यात असणारी नम्रता ही केवळ माझे ‘काम साधून घेण्यासाठी’ घातलेला मुखवटा आहे, की ती माझ्या अंतःकरणातून आलेली खरी ‘लीनता’ आहे?  

२. ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे, माझ्या आयुष्यातील यशाचे श्रेय मी देवाच्या आणि गुरूंच्या चरणी अर्पण करतो, की ‘मी केले’ या अहंकाराचा फुगा फुगवत बसतो?  

३. भगवंताने दिलेला हा सुंदर नरदेह मी केवळ स्वतःच्या उपभोगासाठी आणि देहभरणासाठी वापरतो आहे, की कधी सामाजिक व सत्कार्यात ‘श्रमदान’ करून तो कारणी लावतो?  

४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, मी माझ्या आराध्य दैवताची भक्ती केवळ ‘वरवरची’ करतो, की मनात अथांग आदर आणि प्रेम बाळगून सगुण स्वरूपात त्या परमेश्वराला शोधतो?  

– क्रमशः श्लोक १०१ आणि १०२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकाच स्त्रीच्या प्रेमात… सात वेळा… – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – मराठी अनुवादक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ एकाच स्त्रीच्या प्रेमात… सात वेळा… – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – मराठी अनुवादक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

एका १८ वर्षांच्या नातवाने आपल्या ८० वर्षांच्या आजोबांना विचारले:

“आजोबा… तुम्ही ६० वर्षे एकाच स्त्रीच्या प्रेमात कसे राहू शकलात? “

“परस्परांना समजून घेणे गरजेचे असते… “

“मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे… “

“तडजोड आणि जुळवून घेणे आवश्यक असते… “

नातवाला अशा उत्तरांची अपेक्षा होती.

पण आजोबा हसले, क्षणभर आजीकडे पाहिले आणि म्हणाले:

मी ६० वर्षे एकाच स्त्रीच्या प्रेमात होतो, असे तुला कोणी सांगितले? “

नातवाला आश्चर्य वाटले.

आजोबा पुढे म्हणाले…

“वयाच्या २० व्या वर्षी, मी तिच्या सौंदर्याच्या आणि तिच्या उत्साही स्वभावाच्या प्रेमात पडलो.

ते माझे पहिले प्रेमहोते.

वयाच्या ३० व्या वर्षी, ती आई झाली. रात्री जागून आपल्या बाळाला हळुवारपणे झोपवणाऱ्या त्या स्त्रीच्या मी प्रेमात पडलो.

ते माझे दुसरे प्रेमहोते.

वयाच्या ४० व्या वर्षी, मी त्या धाडसी स्त्रीच्या प्रेमात पडलो जिने चेहऱ्यावर हास्य ठेवून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलली.

ते माझे तिसरे प्रेमहोते.

वयाच्या ५० व्या वर्षी, मी त्या स्त्रीच्या प्रेमात पडलो जिने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःची स्वप्ने आणि इच्छांचा त्याग केला.

ते माझे चौथे प्रेमहोते.

वयाच्या ६० व्या वर्षी, तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, पण मी त्या सोबतीण स्त्रीच्या प्रेमात पडलो जी केवळ एका नजरेने माझ्या चिंता समजू शकत होती.

ते माझे पाचवे प्रेमहोते.

वयाच्या ७० व्या वर्षी, मी त्या स्त्रीच्या प्रेमात पडलो जी मला दररोज विचारायची:

‘तुम्ही तुमचे औषध घेतले का? ‘

तिची ती काळजी माझ्या मनाला भिडली.

ते माझे सहावे प्रेमहोते.

आणि आता, वयाच्या ८० व्या वर्षी, मी त्या स्त्रीच्या प्रेमात आहे जी माझ्या शेजारी हळू चालते, मला आपल्या जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा सांगते आणि माझ्यासोबत हसते.

ते माझे सातवे प्रेमआहे. “

नातू गप्प राहिला.

आजोबा हसले आणि शेवटी म्हणाले:

लग्न म्हणजे केवळ आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत राहणे नव्हे”…

तर, आयुष्य बदलत असताना त्याच व्यक्तीच्या वेगवेगळ्या रूपांच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडायला शिकणे, म्हणजे लग्न होय. “

सौंदर्य बदलते.

वय बदलते.

शरीर बदलते.

परिस्थिती बदलते.

पण या सर्व बदलांमधूनही, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे पाहून असे म्हणू शकत असाल की…

तूच ती व्यक्ती आहेस जिच्यावर मी प्रेम करतो/करते. “

तर हेच दीर्घ आणि आनंदी वैवाहिक जीवनाचे खरे गुपित आहे.

कारण…

प्रेम म्हणजे केवळ एकदाच प्रेमात पडणे नव्हे.

खरे प्रेम म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडणे.

खरे प्रेम म्हणजे 

जैसे थेराहणे नव्हे तर ते आहे एकत्रितपणे बदलणे…

आणि 

तरीही, प्रत्येक दिवशी एकमेकांचीच निवड करणे.

मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात 

मराठी अनुवादक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९९ आणि १०० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९९ आणि १०० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 श्लोक क्र. ९९ – – 

जगी धन्य वाराणसी पुण्यरासी ।

तयेमाजि जाता गती पूर्वजांसी ।

मुखे रामनामावळी नित्यकाळी ।

जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ।।९९।।

अर्थ : वाराणसी अर्थात काशीक्षेत्र पुण्याने परिपूर्ण असल्याने खरोखरच जगात धन्य आहे. तिथे गेल्यानंतर तेथील पुण्यप्रभावामुळे आपल्यासह आपल्या पूर्वजांना गती मिळते. मुखाने सदैव श्रीरामांचे नाम घ्यावे असा उपदेश भगवान शंकर तिथे आपल्या कानात करतात.

(पुण्यरासी – पुण्याने परिपूर्ण/भरलेले, गती – मृत्यूनंतर सद्गती अथवा मुक्ती मिळणे) 

विवेचन : या श्लोकात रामनामाचे महत्व स्पष्ट करताना समर्थांनी काशीक्षेत्राचे उदाहरण दिले आहे. आपल्याकडे काशीक्षेत्र सर्व तीर्थांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. त्यावरून ‘ काशीस जावे नित्य वदावे ‘ अशी म्हण आपल्याकडे पडली आहे. म्हणजे प्रत्यक्ष काशीला जायला जमले नाही तरी मला काशीला जायचे आहे असे नेहमी म्हणत राहावे. यावरून काशीक्षेत्राचे महत्व आपल्या लक्षात येईल. आपल्याकडे भाविकांमध्ये अशी समजूत आहे की काशीला गेल्यानंतर आपल्याला आपल्या अंतकाळी उत्तम गती प्राप्त होते. केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पूर्वजांना देखील उत्तम गती मिळते. म्हणून ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आपण आयुष्यात एकदा तरी काशीला जावे अशी इच्छा असते. पूर्वीच्या काळी तर वृद्ध माणसे काशीला जात असताना तिकडेच देह ठेवला तर मुक्ती मिळाली असे समजत असत. तशी इच्छा मनात धरून बरीचशी मंडळी काशीला जात असत. आजही बऱ्याच भाविकांची तशी श्रद्धा आहे.

वरील श्लोकात दुसऱ्या ओळीत आलेला ‘ जाता ‘ हा शब्द दोन अर्थांनी घेता येतो. पहिला अर्थ म्हणजे काशीला गेल्यानंतर असा घेता येतो तर दुसरा अर्थ काशीला देह ठेवल्यानंतर असा घेता येतो. कोणताही अर्थ घेतला तरी काशी क्षेत्राचा महिमा अपरंपार आहे हे लक्षात येते. काशीला भगवान शंकरांचे मंदिर ‘ काशी विश्वनाथ ‘ म्हणून प्रसिद्ध आहे. देवाधिदेव महादेवाचे हे स्थान द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे असे मानले जाते. इथे येणाऱ्या प्रत्येक जीवाला भगवान शंकर स्वतः ‘ मुखाने सतत रामनाम घ्या ‘ ही आपल्या हिताची गोष्ट तेथे कानात सांगतात असे म्हटले जाते.

थोडक्यात म्हणजे समर्थांनी या ठिकाणी पुन्हा एकदा भगवान शंकरांचे उदाहरण देऊन रामनामाचे महत्व स्पष्ट केले आहे. ज्या काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्याने मोक्ष प्राप्ती होते असे आपण मानतो, ते भगवान शंकर स्वतः रामनाम घेतात आणि आपल्यालाही रामनाम घेण्याचा उपदेश करतात. तुम्ही काशीला जा किंवा जाऊ नका. पण मुखाने सतत रामनाम घ्या. तेच तुमच्या हिताचे आहे ही गोष्ट समर्थांनी इथे आपल्या मनावर ठसवली आहे. सातत्याने आपण रामनाम घेत गेलो तर आपला देह, आपले मन पवित्र, शुद्ध आणि स्वच्छ होईल. तेच काशीक्षेत्र होईल.

स्वसंवाद

१. भौतिकदृष्ट्या ‘काशीला’ जाण्याची ओढ असण्यासोबतच, मी माझ्या अंतःकरणात रामनामाची ‘पुण्यरासी’ (काशी क्षेत्र) निर्माण करण्याचा प्रयत्न करतो का?

२. जीवाला उत्तम गती प्राप्त होणे म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारे सुख नसून, चालू आयुष्यात रामनामाच्या अनुसंधानात राहून जन्माचे सार्थक करणे आहे, हे मला पटते आहे का?

३. “काशी विश्वनाथ स्वतः प्रत्येक जीवाच्या कानात रामनामाचा उपदेश करतात, ” हे ऐकल्यावर माझ्या दैनंदिन जीवनात रामनाम आदराने घेण्याची माझी वृत्ती अधिक दृढ झाली आहे का?

४. ‘पूर्वजांना गती मिळणे’ आणि स्वतःचा उद्धार करणे यासाठी विनामूल्य आणि अत्यंत सोपे असणारे रामनाम घेण्यासाठी मी रोज किती वेळ शांत चित्ताने देतो?

===== 

 श्लोक क्र. १०० – –

यथासांग रे कर्म ते हि घडेना ।

घडे धर्म ते पुण्य गांठी पडेना ।

दया पाहता सर्वभूती असेना ।

फुकाचे मुखी नाम ते हि वसेना ।।१००।।

अर्थ :  पुण्य प्राप्तीसाठी आपण जे कर्म करतो, ते यथासांग घडत नाही. जे काही कर्म आपण त्यासाठी करतो, त्यात काहीतरी उणीव राहिली तरी पुण्य पदरी पडत नाही. सर्व प्राणिमात्रांबद्दल मनात दयेचा भावही उपजत नाही. हे सगळे समजण्यासारखे असले तरी फुकटचे असलेले भगवंताचे नाम देखील मुखात येत नाही.

 विवेचन : समर्थांनी लिहिलेला हा शंभरावा श्लोक विशेष आहे. मानवी प्रवृत्तीवर समर्थांनी अचूक बोट ठेवले आहे. माणूस सगळेच साध्य करण्याच्या मागे लागतो. संसार करता करता पुण्यप्राप्ती व्हावी काही धर्मकार्य करतो. परंतु धार्मिक कार्य करताना त्यात बऱ्याच वेळा काहीतरी उणीव राहून जाण्याची शक्यता असते. ते यथासांग, यथाविधी पार पडेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे त्यातून आपल्या गाठी काही पुण्याचा संचय होईल अशी अपेक्षा करणाऱ्या यजमानाच्या पदरी फारसे काही पडत नाही. त्यातच अलीकडच्या काळात धार्मिक कार्ये विधिवत करण्यापेक्षा त्यात ते जास्त देखणे आणि भव्य कसे होईल याकडे लक्ष असते. त्यातून अमाप खर्च केला जातो. आलेली पाहुणे मंडळी, त्यांचे आहेर इत्यादी गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावे लागते. ही कोणाला अतिशयोक्ती वाटली तरी वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत यजमानांचे लक्ष धार्मिक कार्यात कमी आणि इतर ठिकाणीच जास्त अशी अवस्था होते.

सर्वाभूती ईश्वर असे आपण मानतो. ज्ञानेश्वरीत तर ज्ञानेश्वर माउली ‘ जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत ‘असे म्हणतात. असे केले तरी त्या त्या रूपातील असणाऱ्या ईश्वराचीच पूजा आपल्या हातून घडते. सगळ्या संतांची चरित्रे या दृष्टीने आदर्श आहेत. संत एकनाथांनी तृषार्त गाढवाला पाणी पाजून त्याचा आत्मा शांत केला. ज्ञानदेवांनी सर्वांभूती एकच ईश्वर आहे हे नुसते सांगितले नाही तर रेड्याच्या मुखी वेद वदवून ते सिद्ध केले. पण आपण सामान्य माणसे. आपल्याकडून ‘ सर्वभूती दया ‘ हे तत्व देखील नीट पाळले जात नाही. प्राणिमात्रांचे तर सोडून द्या पण घरातील नोकर, मोलकरीण यांच्याशी तरी आपण समभावाने वागतो का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

समर्थ म्हणतात, इथपर्यंतही ठीक आहे. समजण्यासारखे आहे. पण हे मना, अरे रामनाम किंवा भगवंताचे नाम घेण्यासाठी तर काही खर्च करावा लागत नाही ना? त्यासाठी कोणतेही धार्मिक विधी किंवा खर्च करावा लागत नाही. त्यात काही न्यून किंवा उणीव राहील अशी शक्यता देखील नाही. असे असूनही हे जीवा तू फुकटचे असे भगवंताचे नाम का घेत नाही? संत सोयराबाई म्हणतात, ‘ सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. ‘ हेच आपणही करायला हवे.

स्वसंवाद :: 

१. माझ्या हातून होणारी धार्मिक कृत्ये ही केवळ बाह्य प्रदर्शनासाठी होतात की त्यात अंतःकरणाची खरी शुद्धता आणि विधीवरील निष्ठा असते?

२. ज्ञानेश्वर माऊलींच्या “जे जे भेटे भूत” या वचनाचा आदर मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांशी आदराने वागून करतो का?

३. धार्मिक विधीत काहीतरी उणीव राहून जाण्याची भीती असते; पण ज्या नामात कोणतीही उणीव राहण्याची शक्यता नाही, ते विनामूल्य असणारे रामनाम मी आवडीने घेतो का?

– क्रमशः श्लोक ९९ आणि १००

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares