मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रीगणेश जाताना… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रीगणेश जाताना… ☆ श्रीशैल चौगुले ☆

☆

श्रीगणेश जाताना

काळजास दुःख आहे

पुन्हा आगमनाची

भक्ती रुख रुख आहे.

*

पुजा पाठ नेवैद्य

आरतीत तोच आहे

देवळी मुर्ती विना

अप्रसन्न पेच आहे.

*

आरास गजबज

सारे कसे शांत होई

मन  खाई मनास

क्षण क्षण खंत देई.

*

देवाधिराज देव

गजानन बुध्दि दाता

विरह जणू युग

आशिर्वाद दुर होता,

 ☆

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पितृपक्ष ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पितृपक्ष ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

हिंदू धर्म सांगे | पितरांचे ध्यान |

भोजनाचे पान | पितृपक्ष ||१||

*

सात्विक विचार! चालवती श्राद्ध |

मुक्तीचे प्रारब्ध! पूर्वजांचे ||२||

*

पूर्वपार त्यांनी | जपली संस्कृती |

जीवन स्विकृती | संस्कारांची ||३||

*

काकस्पर्शसाठी | कावकाव साद |

दयावे आशिर्वाद | वारसांना ||४||

*

पंधरवाड्यात | चाले दानधर्म |

दातृवाचे कर्म | स्मरणाने ||५||

*

चौऱ्याऐंशी लक्ष | योनींचे भ्रमण |

जन्मलो आपण | मुक्तीसाठी ||६||

*

हिंदूनी जपावी | संस्कृती महान!

पितरांचे भान | कृतज्ञता ||७||

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सम्राज्ञी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ सम्राज्ञी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(दाशी ६+६+६+६ (२४))

☆

दिसला मज चंद्र खुळा मनमुराद हसताना

चांदणीस वाटेवर थांब जरा म्हणताना

* 

नयनानी केलेल्या भावखुणा कळल्यावर

दिलखुलास रमली ती दर्पणात बघताना

 *

ती हसली मग फसली प्रेमातच कायमची

स्वप्नाच्या दरबारी विनयाने फिरताना

* 

मनमौजी प्राणसखा आवडता स्मरताना

प्रेमाच्या झोक्यावर ती दिसली झुलताना

* 

गझलेला सापडले विश्वतिचे आवडते

जगण्याचे मनभावन गीतनवे रचताना

*

मंदधुंद वास किती आसपास दरवळतो

मिलनाच्या ओढीने अंतरात फुलताना

* 

गूढ गीत गाताना सूर नवा सापडला

बनली मग सम्राज्ञी संसारी मुरताना

☆

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३३२ ☆ गझल – आपले नसते कुणीही… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३३२ ?

☆ गझल – आपले नसते कुणीही… ☆  प्रभा सोनवणे ☆

☆

समजला नाही कधी तो आगळा अनुनय मला

या कहाणीचा कधी कळलाच ना आशय मला

*

 चारचौघा सारखा नव्हतास तू सामान्यही

 भव्यतेचा नेहमी आलाय की प्रत्यय मला

*

 माणसे जातात का, सहचर्य अर्धे सोडुनी

तू असा जाशील, नव्हता हा कधी  संशय मला

*

 कोणत्या पक्षात जाता लाभते खुर्ची इथे

 धूर्त नेते सांगती, दावून खोटे भय मला

*

 आपले नसते कुणीही वेळ येता समजले

पात्र आता द्रौपदीचे लाभले अक्षय मला

☆

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दुष्काळ ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ दुष्काळ… ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

☆

दिली पावसानं वड

पिकं गेलं करपून

हाता तोंडाचा घास

गेला मातीत मिटून

* 

ये गं ये गं सरी धावून

टाक शिवार भिजवून

माझ्या अंतरीची धग

टाक पावसात विझवून

 *

मरगळला हिरवा जीव

वाट रानाची चालवेना

करपल्या पिकाचं दुःख

आता काळजाला सोसेना

 *

दडी मारली पावसानं

तापलं भादव्याचं उन

मोहरून आलेलं शिवार

टाकील दुष्काळ गिळून

 *

करपल्या पिकाची व्यथा

आता कुणाकडं मांडावी

देवा तुझ्या कृपेची धार

आभाळातनं सांडावी

 ☆

©  वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३४२ ☆ देशभक्तिचे वेड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४२ ?

☆ देशभक्तिचे वेड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

देशभक्तिचे वेड लागले पुजतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

युद्ध खेळणे केवळ नाही काम एवढे

कुठल्याही कामाचे नसते इथे वावडे

पूर वादळा सोबतसुद्धा झटतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

पालन नियमांचे करण्याची सक्ती आहे

देशावरती नितांत कायम भक्ती आहे

म्हणून आम्ही धारातीर्थी पडतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

डोंगर सोडा हिमालयावर चढतो आम्ही

कण वाळूचे तप्त जाळती जळतो आम्ही

देशासाठी आनंदाने भिजतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

या पायांना हिरवळ सांगा कोठे दिसते

ढग युद्धाचे नसतानाही पळपळ असते

ओझे असते पाठीवरती पळतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

विझण्यासाठी आम्ही पेटुन उठतो येथे

देशासाठी बाधा ठरती काही नेते

विचार त्यांचा मनास अमुच्या छळतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

☆

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संत विवेकी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ संत विवेकी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

☆

ऐसीए संगत भक्तास रंगत

संतांची पंगत आत्मसुखी.

*

श्लोकांची आरास ओवींचे तोरण

मुक्तीचे कारण पांडुरंग.

*

अभंग अक्षरे शब्दांचे रोपण

इंद्रिया कुंपण शुध्दभावे.

*

महती त्र्यैलोकी विठ्ठल गजर

भुलोकी पाझर अंतर्यामी.

*

अगंध व्यासंग चौघडा वारीचा

विवेकी स्वारिचा संतसंगी.

 ☆

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ करारनामा फक्त चुकला !  श्री आशिष  बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? करारनामा फक्त चुकला ! ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

ह्रदयाच्या बिऱ्हाडात,

राहतेस तू एकटी |

आणि भाडे दयावे मीच,

रीत कशी ग उलटी |

… लहानतोंडी मोठा घास… सुरेश भट साहेबांच्या या चार ओळीवरून सुचलेली रचना 

– – – 

डोकावले बिऱ्हाडात,

आठवणींचा खजिना |

रमतो तुटण्यात मी,

संपता तो संपेना |

*

हिरे माणकं फिकी,

दिपतो त्या क्षणांनी |

चमक चेहऱ्यावर,

गुलाबी आठवांनी |

*

गंध बकुळ गजऱ्याचा,

मनास सुखावतो |

निर्माल्याच्या गाभाऱ्यात,

येण्यास खुणावतो |

*

भाडेकरू नव्हतीस कधी,

मालकीणच झालीस |

करारनामा फक्त चुकला,

एकटी सोडून गेलीस |

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आहेत वंचनेच्या पाठीशी पखाली… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आहेत वंचनेच्या पाठीशी पखाली… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

☆

संसार पेलताना जनता पिचून गेली

लटकी उगी जगाला सांगू नका खुशाली

जगणेच आज येथे झाले आहे हमाली

आहेत वंचनेच्या पाठीवरी पखाली

 *

होणार पूर्ण नाही अशा मनात जपली

अंधार उजळणा-या नाहीत या मशाली

आहेच वास्तवाची काळोख रात आली

झालोय आज आम्ही स्वप्नात भाग्यशाली

 *

सरली उमेद आहे बांधून ठेवलेली

सगळीकडे निराशा आहेच पसरलेली

संधी सुधारणांची फसवून दूर गेली

सद्भावना कुणाची नाही कुठेच दिसली

 *

समता इथेच दिसते द्वेषात गुंतलेली

जातियतेत आहे धूसफूस चाललेली

वाचनास जाणारी नियती निघून गेली

संस्कार संस्कृती ही नाही कुठेच उरली

 *

माणूस माणसाचा नाहीच आज वाली

बदलून भावभक्ती झालीय आज नकली

जिकडे बघाल तिकडे विध्वंसता पसरली

होईल काय पुढती चिंताच फक्त उरली

☆

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बुद्धी दाता आणि ज्ञान दाता! 🙏 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

🙏 बुद्धी दाता आणि ज्ञान दाता! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

साम्य वाटले मजला

PC आणि गणेशात,

सांगतो समजावून कसे

बघा येतंय कां ध्यानात!

 *

साऱ्या विश्वाची खबर

लंबकर्ण कानी आकळे,

साठवी माहिती जगातून

PCचे इंटरनेट जाळे!

 *

मोठी सोंड वक्रतुंडाची

करी दुष्टांचे निर्दालन,

अँटीव्हायरस करतो

स्व जंतूचे स्वतः हनन!

 *

ठेवी लंबोदर उदरात

भक्तांच्या पाप पुण्याला,

PCची हार्डडिस्क पण

येते ना त्याच कामाला?

 *

येई स्वारी गजाननाची

मूषक वाहना वरुनी,

PCचा माऊस पण चाले

एका चौकोनी पॅडवरुनी!

 पण,

भले भले भरकटती

PCच्या मोह जालात,

एकच गणेश बुद्धीदाता

ठेवा कोरून हृदयात!

ठेवा कोरून हृदयात!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares